Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 25

यहूदाचा राजा अमस्या

25 अमस्या राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. नंतर त्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव यहोअदान. ती यरुशलेमची होती. त्याची वर्तणूक परमेश्वराला पटेल अशी होती पण त्यात मनःपूर्वकता नव्हती. अमस्या शक्तिशाली राजा झाला मग त्याने आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांची हत्या केली. पण त्याच्या मुलांना त्याने ठार केले नाही कारण याबाबतीत मोशेच्या नियमशास्त्रातली आज्ञा त्याने पाळली. परमेश्वराची आज्ञा अशी आहे, “मुलांच्या अपराधासाठी आईवडिलांना आणि आईवडिलांच्या अपराधासाठी मुलांना मृत्युदंड देऊ नये. ज्याच्या हातून अपराध झाला त्या व्यक्तीलाच देहदंड व्हावा.”

अमस्याने सर्व यहूदा लोकांना एकत्र केले आणि त्यांच्या घराण्यांवर सेनापती आणि सेनानायक यांच्या नेमणुका केल्या. समस्त यहूदा आणि बन्यामिन सैनिकांवर या प्रमुखांचा अंमल होता. युध्दात भाग घेण्यासाठी वय वर्षे किमान वीस आणि त्यापुढील वयाचे सैनिक निवडले. भाले आणि ढाली या आयुधांनी सज्ज असे सैनिक त्याने मोजले. ते एकंदर 3,00,000 निवडक सैनिक युध्दाला तयार होते. यांच्याखोरीज आणखी 1 लक्ष सैन्याची कुमक अमस्याने इस्राएलकडून मागवली. त्यासाठी त्याने 3 3/4 टन चांदी एवढी किंमत मोजली. पण यावेळी देवाचा एक माणूस अमस्याकडे येऊन त्याला म्हणाला, “हे राजा, इस्राएलच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्राइमच्या वंशजांना म्हणजेच इस्राएलच्या लोकांना परमेश्वराची साथ नाही. तू भले कितीही तयारी करुन लढाईत उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे.”

यावर अमस्या त्या देवाच्या माणसाला म्हणाला, “पण इस्राएली सैन्याला मी पैसे देऊन बसलो आहे, त्याचे काय?” देवाचा माणूस म्हणाला, “परमेश्वराकडे अलोट संपत्ती आहे, तो तुला त्यापेक्षा कितीतरी जास्त देऊ शकेल.”

10 तेव्हा अमस्याने इस्राएलच्या सैन्याला एफ्राइमला परत पाठवले. या कृत्यामुळे इस्राएली सैन्य, यहुदाचा राजा आणि यहूदाचे लोक यांच्यावर संतापले आणि रागानेच घरी परतले.

11 यानंतर अमस्याने मोठेच धाडस करुन अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने या ठिकाणी सेइर मधील 10,000 लोकांना ठार केले. 12 आणखी 10,000 जणांना बंदिवान केले. त्यांना धरुन खडकाच्या मध्यावर नेले आणि एवढ्या उंचीवरुन त्यांचा कडेलोट केला. खालच्या दगडधोंड्यांवर त्यांचे देह छिन्नविच्छिन्न होऊन पडले.

13 नेमक्या याचवेळी इस्राएली सैन्याने यहूदातील काही नगरांवर हल्ला चढवला. त्यांनी बेथ-होरोनपासून थेट शोमरोनपर्यंत गावे उद्ध्वस्त केली. 3,000 लोकांना जिवे मारले आणि मौल्यवान चीजवस्तू लुटल्या. अमस्याने आपल्याला लढाईत सामील करुन न घेतल्यामुळे हे इस्राएली सैन्य भडकले होते.

14 अदोम्यांचा पाडाव करुन अमस्या आपल्या नगरात परतला. येताना त्याने सेइरमधील लोकांच्या देवाच्या मूर्ती बरोबर आणल्या आणि त्यांची पूजाअर्चा सुरु केली. या दैवतांना वंदन करुन तो त्यांच्यापुढे धूप जाळू लागला. 15 या कृतीमुळे परमेश्वराचा अमस्यावर कोप झाला. परमेश्वराने संदेष्ट्याला अमस्याकडे पाठवले. संदेष्टा राजाला म्हणाला, “अमस्या, त्या लोकांच्या दैवतांची पूजा तू का करत आहेस? त्या दैवतांना तर स्वतःच्याच लोकांचे तुझ्यापासून रक्षण करता आले नाही.”

16 अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, “आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प राहावे हे चांगले नाहीतर जिवाला मुकशील.” संदेष्टा गप्प बसला पण नंतर म्हणाला, “देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करु नये त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस.”

17 यहूदाचा राजा अमस्या याने यावर आपल्या सल्लागारांबरोबर विचार विनिमय केला. मग योवाशला त्याने निरोप पाठवला की, “आपली एकदा प्रत्यक्ष गाठ पडली पाहिजे.” योवाश हा यहोआहाजचा मुलगा आणि यहोआहाज येहूचा. येहू इस्राएलचा राजा होता.

18 इस्राएलचा राजा योवाश याने यहूदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योवाशने दृष्टांत दिला तो असा: “लबानोन मधल्या एका काटेरी झुडुपाने लबानोनच्याच एका गंधसरुला निरोप पाठवला की, ‘तुझ्या मुलींचे माझ्या मुलाशी लग्न व्हावे.’ पण तेवढ्यात ते झुडुप तिथून जाणाऱ्या एका वन्यपशूच्या पायाखाली तुडवले गेले. 19 ‘मी अदोमचा पारभव केला.’ असे तू खुशाल म्हण. तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. उगीच नसत्या फंदात पडून अडचणीत येऊ नकोस! पण तू तसे केलेस तर तू स्वतःच्या आणि त्याबरोबर यहूदाच्या नाशाला कारणीभूत होशील.”

20 पण अमस्याने या निरोपाला दाद दिली नाही. देवाच्याच मनात तसे होते. यहूदाच्या लोकांनी अदोमी लोकांच्या दैवताचे भजनपूजन सुरु केल्यामुळे इस्राएलकडून यहूदाचा पराभव करायचे परमेश्वराने योजले होते. 21 तेव्हा इस्राएलचा राजा योवाश आणि यहूदाचा राजा अमस्या यांची बेथ-शेमेश नगरात समोरासमोर गाठ पडली. बेथ-शेमेश यहूदातच आहे. 22 इस्राएलने यहूदाचा पराभव केला. झाडून सर्व यहूद्यांनी या लढाईतून पळ काढला. 23 योवाशने बेथ-शेमेश येथे अमस्याला पकडले आणि यरुशलेमला नेले. अमस्याच्या वडलांचे नाव योवाश. योवाशचे वडील यहोआहाज. योवाशने एफ्राइम वेशीपासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंतची यरुशलेमच्या तटबंदीची 600 हात लांबीची भिंत पार मोडून तोडून टाकली. 24 सर्व सोनेरुपे तसेच मंदिरातील उपकरणी, भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेदअदोमची होती. राजमहालातील चीजवस्तूही योवाशने लुटली. काही जणांना बंदिवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला.

25 योवाशच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जगला. अमस्याचे वडील म्हणजे यहुदाचा राजा योवाश. 26 यहूदा आणि इस्राएलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात, अमस्याने बाकी जे जे केले त्याची साद्यंत हकीकत आली आहे. 27 अमस्याने परमेश्वराचे आज्ञापालन करायचे थांबवल्यावर यरुशलेमच्या लोकांनी त्याच्याविरुध्द कट केला. तेव्हा तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या मागावर माणसे पाठवून त्याचा तेथे वध केला. 28 अमस्याचा मृत देह मग लोकांनी घोड्यावर लादला आणि यहूदानगरात आणून त्याला पूर्वजांशेजारी पुरले.

प्रकटीकरण 12

स्त्री आणि प्रचंड साप

12 आणि मग एक अदभुत महान चिन्ह आकाशात दिसले. तेथे एक स्त्री होती. ती सूर्याचा पेहराव केलेली होती. चंद्र तिच्या पायाखाली होता. तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुगुट होता. ती स्त्री गरोदर होती. ती (बाळाला) जन्म देणार असल्याने वेदनांनी ओरडली.

मग दुसरे एक चिन्ह आकाशात दिसले: तेथे फार मोठा तांबडा साप होता. त्या सापाला सात डोकी होती व त्या सातही डोक्यांवर एक एक मुगूट होता. त्या सापाला दहा शिंगे सुद्धा होती. त्या सापाने आपल्या शेपटीच्या फटकाऱ्याने एक तृतीयांश तारे झटकून पृथ्वीवर खाली टाकून दिले. जी स्त्री बाळाला जन्म देणार होती त्या स्त्रीच्या समोर तो प्रचंड साप उभा राहिला. त्या सापाला त्या स्त्रीने जन्म दिलेल्या बाळाला खायचे होते.

त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा लोखंडी दंडाने सर्व राष्ट्रांवर सत्ता चालविणार होता. तिच्या मुलाला देवाकडे व त्याच्या सिंहासनाकडे नेण्यात आले. ती स्त्री देवाने तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणाकडे पळून गेली. तेथे त्या स्त्रीची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात येईल.

मग स्वर्गात एक युद्ध झाले. मीखाएल [a] आणि त्याचे दूत त्या प्रचंड सापाविरुद्ध लढले. साप व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले. पण साप तितका बलवान नव्हता. प्रचंड साप व त्याच्या दूतांना स्वर्गातील त्यांचे स्थान गमवावे लागले. सापाला आकाशातून खाली फेकण्यात आले. तो प्रचंड साप, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला चकवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.

10 मग मी आकाशातून एक मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, “तारण, सामर्थ्य, आमच्या देवाचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही आली आहेत. कारण आमच्या भावांना दोष लावणारा जो अहोरात्र आमच्या देवासमोर त्यांना शिव्याशाप देत होता, याला खाली फेकण्यात आले आहे. आमच्या देवासमोर तो आमच्या भावांवर दिवस आणि रात्र दोषारोप करीत होता, त्याचा 11 आमच्या भावांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि जे सत्य ते सांगत होते, त्या सत्याने पराभव केला. त्यांनी त्यांच्या जिवांवर अति प्रेम केले नाही. ते मरणाला भ्याले नाही, 12 म्हणून आकाशांनो, व जे तुम्ही तेथे राहता ते तुम्ही आनंदी असा. पण पृथ्वी व समुद्राचे वाईट होईल. कारण सैतान खाली तुमच्याकडे गेला आहे. तो रागाने भरलेला आहे. त्याला माहीत आहे की त्याच्याकडे जास्त वेळ नाही.”

13 जेव्हा त्या प्रचंड सापाने पाहिले की त्याला पृथ्वीवर खाली फेकण्यात आले आहे तेव्हा ज्या स्त्रीने मुलाला जन्म दिला होता, तिच्या मागे तो लागला. 14 मग सापासमोरुन तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणी उडून जाता यावे म्हणून त्या स्त्रीला मोठ्या गरुडाचे पंख देण्यात आले होते. मग त्या ठिकाणी साडेतीन वर्षेपर्यंत तिचे पोषण केले जाते. 15 मग त्या सापाने आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. सापाने ते पाणी स्त्रीकडे ओतले यासाठी की तिने त्या पाण्यात वाहत जावे. 16 पण पृथ्वीने तिला मदत केली. पृथ्वीने तिचे तोंड उघडले व त्या प्रचंड सापाच्या तोंडातून आलेली नदी तिने गिळून टाकली. 17 मग तो साप त्या स्त्रीवर फार रागावला. मग तो साप त्या स्त्रीच्या इतर मुलांशी युद्ध करण्यास दूर निघून गेला. तिची मुले ही आहेत जी देवाच्या आज्ञेचे पालन करतात आणि येशूने शिकविलेले सत्य त्यांच्याकडे आहे.

18 तो प्रचंड साप समुद्रकिनाऱ्यावर उभा राहिला.

जखऱ्या 8

देवाचे यरुशलेमला आशीर्वाद देण्याचे वचन

सर्व शक्तिमान परमेश्वराचा हा संदेश आहे. सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “माझे सियोनवर खरोखरीच प्रेम आहे. माझे तिच्यावर इतके प्रेम आहे की तिची माझ्यावरील श्रध्दा उडताच माझा संताप झाला.” परमेश्वर म्हणतो, “मी सियोनला परत आलो आहे. मी यरुशलेमला रहात आहे. यरुशलेम निष्ठावान नगरी म्हणून ओळखली जाईल. सर्व शक्तिमान परमेश्वराचा पर्वत, ‘पवित्र पर्वत’ म्हणून ओळखला जाईल.”

सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “वृध्द स्त्री-पुरुष यरुशलेमच्या सार्वजानिक ठिकाणी पुन्हा दिसू लागतील. लोक इतके दीर्घायुषी होतील की चालताना त्यांना काठीच्या आधाराची गरज भासेल. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी ती नगरी राजबजून जाईल. देव म्हणतो, वाचलेल्यांना ह्याचे आश्चर्य वाटेल. आणि मलाही विस्मय वाटेल.”

सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “पाहा! पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशांतून मी माझ्या माणसांची मुक्तता करीत आहे. मी त्यांना परत येथे आणि ते यरुशलेममध्ये राहतील. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा कृपावंत वश्रध्दावान देव होईल.”

सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “सामर्थ्यवान व्हा! सर्व शक्तिमान परमेश्वराने मंदिराच्या पुननिर्मितीच्या वेळी पाया घालताना, संदेष्ट्यांमार्फत जो संदेश दिला, तोच तुम्ही आज ऐकत आहात. 10 त्या वेळेपूर्वी, पगारी कामगार ठेवायला वा भाड्याने जनावरे घ्यायला लोकांजवळ पैसा नव्हता. दळणवळण सुरक्षित नव्हते. सर्वच अडचणीतून सुटका झाली नव्हती. मी प्रत्येकाला दुसऱ्याविरुध्द भडकविले होते. 11 पण आता तसे नाही. वाचलेल्यांची स्थिती तशी असणार नाही.” सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

12 “ते लोक शांततेत लागवड करतील. त्यांच्या द्राक्षवेलींना द्राक्षे लागतील. जमीन चांगली पिके देईल आणि आकाश पाऊस देईल. मी ह्या सर्व गोष्टी माझ्या ह्या लोकांना देईल. 13 शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्राएल व यहूदाच्या नावाचा वापर करण्यास सुरवात केली होती. पण मी इस्राएलची व यहूदाची पापातून मुक्तता करीन त्यांची नावे म्हणजे आशीर्वचन बनतील तेव्हा घाबरु नका! सामर्थ्यवान. व्हा!”

14 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला संतापविले. म्हणून मी त्यांचा नाश करण्याचा निर्धार केला. माझा निश्चय बदलायचा नाही असे मी ठरविले.” सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणाला. 15 “पण आता मात्र माझे मनःपरिवर्तन झाले आहे. आणि म्हणून मी यरुशलेमवर व यहूदाच्या लोकांशी चांगले वागायचे ठरविले आहे. तेव्हा घाबरु नका! 16 पण तुम्हाला पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्यांना सत्य सांगा. न्यायालयात निर्णय घेतेवेळी जे सत्य आणि योग्य अशाच गोष्टी करा. त्यामुळे शांतता येईल. 17 आपल्या शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी कट करु नका. खोटी आश्वासने देऊ नका. अशा वाईट गोष्टीत आनंद मानू नका. का? कारण या गोष्टींची मला चीड आहे.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.

18 सर्वशक्तिमान परमेश्वराकडून मला पुढील संदेश मिळाला: 19 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “तुम्ही चौथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्याच्या विशिष्ट दिवशी शोक प्रकट करता उपवास करता. आता त्या शोकदिनांचे सणावारात परिवर्तन करा. ते छान, आनंदाचे सुटीचे दिवस होतील तुम्ही सत्य आणि शांती ह्यावर प्रेम केलेच पाहिजे.”

20 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
“भविष्यात, पुष्कळ गावचे लोक यरुशलेमला येतील.
21 निरनिराळ्या गावातील लोक एकमेकांना भेटतील.
    ते म्हणतील, ‘आम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यास जात आहोत.’
आणि इतरलोक म्हणतील,
    ‘आम्हालासुध्दा यावेसे वाटते.’”

22 पुष्कळ लोक आणि बलिष्ठ राष्ट्रे, सर्व शक्तिमान परमेश्वराच्या शोधात आणि त्याची उपासना करण्यासाठी यरुशलेमला येतील. 23 सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक यहूदाकडे येऊन त्याचा कोट पकडून त्याला विचारतील, ‘देव तुमच्याबरोबर आहे असे आम्ही ऐकलंय! त्याची उपासना करण्यासाठी आम्ही तुझ्याबरोबर येऊ का?’”

योहान 11

लाजराचा मृत्यू

11 लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो बेथानी गावात राहत होता. याच गावात मार्था आणि मरीया राहत होत्या. ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसांनी पुसले तिचा हा भाऊ होता. त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की, हे प्रभु ज्याच्यावर तू प्रीति करतोस तो आजारी आहे.

पण येशूने हे ऐकून म्हटले, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे.” येशू मार्था, मरीया व लाजर यांच्यावर प्रीति करीत असे. म्हणून तो आजारी आहे हे ऐकल्यावरही तो होता त्याच ठिकाणी दोन दिवस राहिला. नंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण यहूदीयात परत जाऊ.”

शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, यहूदी आपणांस दगडमार करु पाहत होते आणि आपण पुन्हा तेथे जात आहात काय?”

येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाहीत? जर एखादा दिवसा चालतो, तर त्याला ठेच लागत नाही. कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो. 10 पण जर कोणी रात्री चालतो, तर त्याला ठेच लागते कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो.”

11 या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे. पण मी त्याला झोपेतून जागे करावयास जात आहे.”

12 तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले, “प्रभु, तो झोपी गेला असेल तर बरा होईल.” 13 पण येशू खरे तर त्याच्या मरणाविषयी बोलला होता. पण तो त्याच्या नेहमीच्या झोपेविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले.

14 तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितले, “लाजर मेला आहे. 15 आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो. यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. आपण त्याच्याकडे जाऊ या.”

16 तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर जाऊ या अशासाठी की आपणही त्याच्याबरोबर मरु.”

बेथानीत येशू

17 येशू आल्यावर त्याला समजले की, लाजराला चार दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे. 18 बेथानी यरुशलेमापासून तीन किलोमीटर अंतरापेक्षा कमी होते. 19 आणि पुष्कळसे यहुदी मार्था, मरीयेकडे त्यांचा भाऊ मेला याबद्दल सांत्वन करण्यासठी आले होते.

20 जेव्हा मार्थाने ऐकले की, आपल्या घरी येशू येत आहे तेव्हा ती त्याला भेटायला बाहेर गेली, पण मरीया घरातच राहिली. 21 “प्रभु” मार्था येशूला म्हणाली, “तू जर येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता, 22 पण मला माहीत आहे की, तू जे मागशील ते देव तुला देईल.”

23 येशू म्हणाला, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”

24 मार्था म्हणाली. “मला माहीत आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल.”

25 येशू तिला म्हणाला, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल. 26 आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो. तो कधीच मरणार नाही. तू यावर विश्वास ठेवतेस काय?”

27 “होय प्रभु.” ती त्याला म्हणाली, “तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते. तू या जगात आलेला असा देवाचा पुत्र आहेस.”

येशू रडतो

28 आणि असे म्हटल्यानंतर ती परत गेली आणि आपली बहीण मरीया हिला एका बाजूला बोलाविले आणि म्हणाली, “गुरुजी येथे आहेत. आणि ते तुला विचारीत आहेत.” 29 जेव्हा मरीयेने हे ऐकले तेव्हा ती लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली. 30 आता तोपर्यंत येशू त्या खेड्याच्या आत आला नव्हता. तर मार्था त्याला भेटली, तेथेच अजूनपर्थंत होता. 31 तेव्हा जे यहूदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते, मरीया लगबगीने उठून बाहेर गेली असे पाहून, ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्यामागे गेले. 32 मग जेथे येशू होता तेथे मरीया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभु, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”

33 मग येशू तिला रडताना पाहून व तिच्याबरोबर असलेल्या यहूद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला. 34 तो म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?”

ते म्हणाले, “प्रभु, या आणि पाहा.”

35 येशू रडला.

36 तेव्हा यहूदी म्हणाले, “पहा! त्याला तो किती आवडत होता.”

37 पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचविता येऊ नये काय?”

येशू लाजराला जिवंत करतो

38 मग येशू पुन्हा अंतःकरणात विव्हळ झाला असता कबरेकडे आला. ती गुहा होती, आणि तिच्यावर दगड लोटला होता. 39 येशूने म्हटले, “हा दगड काढा.”

मार्था म्हणाली, “पण प्रभु, लाजर मरुन चार दिवस झाले आहेत, त्याला आता दुर्गंधी येत असेल.” ती मृत लाजराची बहीण होती.

40 येशूने तिला म्हटले, “जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय?”

41 मग त्यांनी दगड बाजूला केला. तेव्हा येशू वर पाहून म्हणाला, “पित्या, तू माझे ऐकले, म्हणून मी तुझे उपकार मानतो. 42 आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे, पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो. यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठेवावा.” 43 असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लजरा, बाहेर ये.” 44 मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते.

येशू लोकांना म्हणाला. “त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या.”

यहूदी पुढारी येशूला ठार मारण्याचा कट करतात(A)

45 जे यहूदी मरीयेकडे आले होते, त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. 46 पण त्यांच्यातील काहींनी परुश्यांकडे जाऊन येशूने जे केले होते ते त्यांना सांगितले. 47 तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले, “हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे. 48 आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यार विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.”

49 तेव्हा त्यांच्यातील कयफा नावाची व्यक्ति त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच माहिती नाही! 50 तुम्ही हे लक्षात घेत नाही की, सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.”

51 तो हे स्वतः होऊन बोलला नाही तर त्यावर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे. 52 केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की, त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे, म्हणून तो मरणार आहे.

53 म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याची मसलत केली. 54 यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे यहूघांमध्ये फिरला नाही. त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील ऐफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे शिष्यांसह राहिला.

55 तेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणाअगोदर पुष्कळ लोक आपणांस शुद्ध करायला देशातून वर यरुशलेमेस गेले. 56 ते येशूचा शोध करीत राहीले, आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? तो सणाला येणार नाही काय?” 57 पण मुख्य याजक व परुश्यांनी अशी आज्ञा केली होती की, येशू कोठे आहे हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे, म्हणजे ते त्याला पकडू शकतील.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center