M’Cheyne Bible Reading Plan
योवाशकडून मंदिराची पुनर्बांधणी
24 योवाश राजा झाला तेंव्हा सात वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिब्या. ही बैर-शेबा नगरातली होती. 2 यहोयादा हयात असेपर्यंत योवाशची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. 3 यहोयादाने योवाशला दोन बायका करुन दिल्या. त्याला मुले बाळे झाली.
4 पुढे योवाशने परमेश्वराच्या मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचे ठरवले. 5 तेव्हा त्याने याजक आणि लेवी यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “यहूदामधील सर्व गावांमध्ये जा आणि इस्राएल लोकांकडून वार्षिक कर गोळा करा. त्या पैशातून देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या. या कामाला विलंब लावू नका.” पण लेवीनी याबाबतीत तप्तरता दाखवली नाही.
6 तेव्हा राजा योवाशने मुख्य याजक यहोयादा याला बोलावून घेतले आणि विचारले की, “लेवींना तू यहूदा आणि यरुशलेममधून कर गोळा करायला का लावले नाहीस? परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएली लोक यांनी हा कर पवित्र सभामंडपासाठी म्हणून वापरलेला आहे.”
7 पूर्वी अथल्याच्या मुलांनी देवाच्या मंदिरात घुसून तिथल्या पवित्र वस्तू बाल दैवतांच्या पूजेसाठी वापरल्या होत्या. अथल्या ही एक दुष्ट बाई होती.
8 राजा योवाशच्या आज्ञेवरुन एक पेटी तयार करुन ती परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी ठेवण्यात आली. 9 लेवीनी मग यहूदा यरुशलेममध्ये दवंडी पिटली. परमेश्वरासाठी बसवलेला कर भरायला त्यांनी लोकांना सांगितले. इस्राएल लोक वाळवंटात असताना परमेश्वराचा सेवक मोशे याने तो इस्राएल लोकांवर बसवला होता. 10 तेव्हा अधिकाऱ्यांनी आणि लोकांनी मोठ्या आनंदाने कर आणून पेटीत जमा केला. पेटी भरेपर्यंत ते पैसे देत गेले. 11 लेवी पेटी भरली की राजाच्या कारभाऱ्यांकडे जमा करत. पैशाने भरलेली ती पेटी पाहून राजाचे सचिव आणि मुख्य याजकाचा कारभारी येऊन त्यातले पैसे काढून घेत. पेटी पुन्हा पहिल्या जागी नेऊन ठेवली जाई. असे अनेकदा होऊन मुबलक पैसा जमा झाला. 12 राजा योवाश आणि यहोयादा यांनी मग ही रक्कम परमेश्वराच्या मंदिराचे काम करणाऱ्यांच्या हवाली केली. या लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णेध्दारासाठी कसबी सुतार, कोरीव काम करणारे, लोखंड पितळ या धातूंमध्ये काम करणारे कारागीर यांना मजुरीवर कामाला घेतले.
13 या कामावर देखरेख करणारे लोक अतिशय विश्वासू होते. परमेश्वराच्या मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम पूर्ण झाले. देवाचे मंदिर पुन्हा पूर्वीसारखेच नीटनेटके आणि पहिल्यापेक्षा भक्कम झाले. 14 कारागिरांचे काम आटोपल्यावर उरलेली रक्कम त्यांनी योवाश आणि यहोयादा यांना आणून दिली. त्या पैशातून परमेश्वराच्या मंदिरातील सेवेची उपकरणे आणि होमबलीसाठी वापरावयाची पात्रे बनविण्यात आली. त्यांनी याशिवाय सोन्यारुप्याचे कटोरे व इतर पात्रे केली. या परमेश्वराच्या मंदिरात यहोयादाचे आयुष्य असे तोवर याजक दररोज होमबली अर्पण करत असत.
15 पुढे यहोयादा वयोवृध्द झाला. तो दीर्घायुषी होऊन वारला. मृत्युसमयी त्याचे वय 130 वर्षे इतके होते. 16 दावीदनगरात इतर राजांच्या कबरी शेजारीच त्याचे लोकांनी दफन केले. देवासाठी आणि त्याच्या मंदिरासाठी त्याने इस्राएलमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आपल्या हयातीत केल्या म्हणून लोकांनी त्याचे या ठिकाणी दफन केले.
17 यहोयादा मरण पावल्यावर यहूदाच्या सरदारांनी राजा योवाशला येऊन मुजरा केला. राजाने त्यांचे ऐकून घेतले. 18 पुढे राजा आणि हे सरदार यांनी परमेश्वर देवाच्या मंदिराचा त्याग केला. त्यांचे पूर्वज या परमेश्वर देवाला शरण गेले होते पण यांनी अशेरा देवीचे खांब आणि इतर मूर्ती यांची पूजा सुरु केली. राजा आणि सरदार यांच्या या अपराधांमुळे यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांवर देवाचा कोप झाला. 19 लोकांना परत आपल्याकडे वळवायला परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्ट्यांना पाठवले. संदेष्ट्यांनी लोकांना परमेश्वराच्या क्रोधाची पूर्वकल्पना दिली पण लोक ऐकेनात.
20 तेव्हा जखऱ्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. जखऱ्या हा यहोयादा या याजकाचा मुलगा. जखऱ्या लोकांपुढे उभा राहून म्हणाला, “देव म्हणतो, ‘तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन का करता? तुम्हाला यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग केलात. आता परमेश्वरही तुम्हाला सोडून देत आहे.’”
21 पण लोकांनी जखऱ्याविरुध्द कट केला. राजाने लोकांना जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्याला दगडफेक करुन मारले. हे त्यांनी मंदिराच्या आवारातच केले. 22 जखऱ्याचे वडील यहोयादा यांनी दाखवलेले सौजन्य राजा योवाश विसरला. यहोयादाच्या मुलाला जखऱ्याला राजाने ठार केले. जखऱ्या मृत्यूपूर्वी म्हणाला, “हे पाहून परमेश्वर तुला शासन करो.”
23 वर्ष अखेरीला अरामच्या सैन्याने योवाशवर हल्ला केला. यहूदा आणि यरुशलेमवर हल्ला करुन त्यांनी सर्व सरदारांची हत्या केली. तेथील सर्व धन लुटून त्यांनी ते दिमिष्काच्या राजाकडे पाठवले. 24 अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी यहूदाच्या मोठ्या सेनेवर परमेश्वराने त्यांना विजय मिळवून दिला. आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा यहूदा लोकांनी त्याग केल्यामुळे परमेश्वराने योवाशला हे शासन केले. 25 अरामी योवाशला घायाळ अवस्थेत सोडून गेले तेव्हा योवाशच्या सेवकांनीच त्याच्याविरुध्द कट केला. यहोयादा या याजकाच्या मुलाला, जखऱ्याला योवाशने मारल्यामुळे ते या कारस्थानाला प्रवृत्त झाले. योवाशला त्यांनी त्याच्या शय्येवरच ठार केले. दावीदनगरात लोकांनी त्याला मूठमाती दिली. पण राजांच्या दफन भूमीत त्याचे दफन केले नाही.
26 जाबाद आणि यहोजाबाद हे ते फितूर सेवक. जाबादच्या आईचे नाव शिमथ. ही अम्मोनची होती. यहोजाबादच्या आईचे नाव शिम्रिथ. ही मवाब येथील होती. 27 योवाशचे पुत्र, त्याला सांगितलेली मोठी शिक्षा आणि त्याने केलेला देवाच्या मंदिराचा जीर्णोध्दार याविषयी राजांच्या बखरीत (राजाविषयी) लिहिले गेले आहे. योवाशचा मुलगा अमस्या हा त्याच्यानंतर राजा झाला.
दोन साक्षीदार
11 मग मला मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येण्यासारखी काठी देण्यात आली. आणि मला सांगण्यात आले, “जा आणि देवाचे मंदिर, वेदी व तेथील उपासकांचे मोजमाप कर. 2 पण बाहेरचे अंगण सोडून दे. त्याचे मोजमाप करु नको. कारण ते विदेशी लोकांना दिलेले आहे. ते बेचाळीस महिने पवित्र शहर तुडवितील. 3 आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना सामर्थ्य देईन. ते देवाचा संदेश 1,260 दिवस देतील. ते तागाची वस्त्रे [a] घालतील.”
4 हे दोन साक्षीदार म्हणजे दोन जैतुनाची झाडे आहेत. आणि पृथ्वीच्या प्रभुसमोर असणाऱ्या दीपसमया आहेत. 5 जर एखाद्या व्यक्तीने त्या साक्षीदारांना दुखविण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या तोंडातून अग्नि निघून त्यांच्या शत्रूंना भस्म करीत राहत असे. जो कोणी त्यांना इजा करण्याचा प्रयत्न करीत असे त्याला अवश्य मरावे लागे. 6 या साक्षीदारांना ते संदेश देत असताना पाऊस पडला तर तो थांबविण्याचे सामर्थ्य आहे. त्या साक्षीदारांना पाण्याचे रक्त करण्याचे सामर्थ्य आहे. पृथ्वीवर प्रत्येक प्रकारचे संकट पाठविण्याचे सामर्थ्य आहे आणि त्यांना पाहिजे तितके वेळा ते हे करु शकतात.
7 आणि जेव्हा दोन साक्षीदार त्यांचा संदेश देण्याचे संपवतील तेव्हा त्या अभांग दऱ्यातून येणारा प्राणी त्यांच्याशी लढाई करील. प्राणी त्यांचा पराभव करील व, त्यांना मारुन टाकील. 8 त्या साक्षीदारांची शरीरे मोठ्या शहराच्या रस्त्यावर पडतील. त्या शहरांचे नाव सदोम आणि इजिप्त असे आहे. शहरांच्या या नावांना विशेष अर्थ आहे. या शहरातच आपल्या प्रभूला वधस्तंभावर मारण्यात आले. 9 साडेतीन दिवसांपर्यंत प्रत्येक वंशाचे. जमातीचे, भाषेचे आणि राष्ट्राचे लोक त्या साक्षीदारांच्या शरीरांकडे पाहतील. पण त्यांना पुरण्यास नकार देतील. 10 पृथ्वीवर राहणारे लोक त्या दोन साक्षीदारांच्या मृत्यूने आनंद पावतील ते मेजवान्या आयोजित करतील व एकमेकांना भेटी पाठवतील. ते असे करतील कारण या दोन साक्षीदारांनी पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना अतोनात क्लेश दिले होते.
11 पण साडेतीन दिवसांनंतर देवाकडील जीवनाच्या श्वासाने त्या साक्षीदारांमध्ये प्रवेश केला. आणि ते त्यांच्या पायांवर उभे राहिले. ज्या सर्व लोकांनी त्यांना पाहिले ते सर्व घाबरुन गेले. 12 मग त्या दोन साक्षीदारांनी स्वर्गातून मोठा आवाज ऐकला. तो म्हणाला, “इकडे वर या!” मग ते दोन साक्षीदार ढगातून स्वर्गात गेले. त्यांच्या शत्रूंनी त्यांना वर जाताना पाहिले.
13 त्याच वेळेला मोठा भूकंप झाला. एक दंशाश शहर नष्ट झाले व भूकंपात सात हजार लोक मारले गेले. जे लोक मेले नाहीत ते खूप घाबरले होते. त्यांनी स्वर्गातील देवाला गौरव दिले.
14 दुसरे मोठे संकट संपले. तिसरे मोठे संकट लवकरच येत आहे.
सातवा कर्णा
15 सातव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाले. ते आवाज म्हणाले:
“जगाचे राज्य आता आमच्या प्रभुचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे.
आणि तो अनंतकाळपर्यंत राज्य करील.”
16 मग जे चोवीस वडील सिंहासनावर बसले होते, ते आपल्या चेहऱ्यावर पडले व त्यांनी देवाची भक्ति केली. हे वडील देवासमोर त्यांच्या सिंहासनावर बसले. 17 ते म्हणाले:
“आम्ही तुझे आभार मानतो. सर्वसमर्थ प्रभु देवा,
तूच एक आहेस की जो तू आहेस व होतास.
आम्ही तुझे उपकार मानतो कारण तुझे महान सामर्थ्य वापरुन
सत्ता चालविण्यास सुरुवात केलीस
18 जगातील लोक रागावले
पण आता तुझा राग आला आहे,
आता मेलेल्या माणसांचा न्याय करण्याची वेळ आली आहे.
तुझे सेवक, संदेष्टे यांना बक्षीस देण्याची वेळ आली आहे.
आणि तुझ्या पवित्र लोकांना बक्षिस देण्याची वेळ आली आहे.
जे लहानमोठे लोक तुझा आदर करतात,
त्यांना बक्षिस देण्याची वेळ आली आहे.
जे पृथ्वीचा नाश करतात, त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे!”
19 मग देवाने स्वर्गातील मंदिर उघडले. तेव्हा तेथे कराराचा कोश दिसला आणि विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट, भूकंप व गारांचे वादळ झाले.
परमेश्वराला दयाळूपणा व करुणा पाहिजे
7 पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षांच्या नवव्या माहिन्याच्या (किसलेव महिन्याच्या) चौथ्या दिवशी, जखऱ्याला परमेश्वराकडून संदेश आला. 2 बेथेलच्या लोकांनी शरेसर, रगेम्मेलेक व त्यांची माणसे यांना परमेश्वराकडे एक प्रश्न विचारायला पाठविले. 3 ते संदेष्ट्यांकडे आणि सर्व शक्तिमान परमेश्वराच्या मंदिरातील याजकाकडे आणि सर्व शक्तिमान परमेश्वराच्या मंदिरातील याजकाकडे गेले आणि त्यांनी पुढील प्रशन विचारला: “मंदिराच्या नाशाबद्दल आम्ही गेली कित्येक वर्षे शोक प्रकट करीत आलो आहोत. प्रत्येक वर्षाच्या पाचव्या महिन्यात आम्ही शोक प्रकट करण्यासाठी आणि उपवासासाठी खास वेळ देत आलो आहोत. हे आम्ही असेच चालू ठेवायचे का?”
4 मला सर्व शक्तिमान परमेश्वराकडून पुढील संदेश मिळाला: 5 “याजकांना आणि या देशातील इतर लोकांना सांग की तुम्ही 70 वर्षे प्रत्येक वर्षांच्या पाचव्या आणि सातव्या महिन्यात उपवास केलात व शोक प्रकट केलात. पण हा उपवास खरोखरीच माझ्यासाठी होता का? नाही! 6 तुम्ही खाल्ले-प्यायले ते माझ्यासाठी होते का? नाही ते तुमच्याचसाठी होते. 7 याच गोष्टी सांगण्यासाठी देवाने फार पूर्वीच या आधीच्या संदेष्ट्यांचा उपयोग केला होता. जेव्हा यरुशलेम ही एक भरभराट झालेली आणि लोकांनी गजबजलेली नगरी होती, तेव्हादेखील देवाने ह्याच गोष्टी सांगितल्या होत्या. यरुशलेमच्या भोवतालच्या गावात, नेगेवला व पश्चिमेकडील डोंगरपायथ्याशी जेव्हा लोकवस्ती होती, तेव्हादेखील देवाने हीच वचने सांगितली हीती.”
8 परमेश्वराचा जखऱ्याला पुढीलप्रमाणे संदेश आहे:
9 “सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की,
‘जे योग्य व न्याय्य आहे तेच तुम्ही करा.
एकमेकांवर दया करा.
एकमेकांना करुणा दाखवा.
10 विधवा, अनाथ,
परके व गरीब यांना दुखवू नका.
एकमेकांचे वाईट करण्याचे मनातसुध्दा आणू नका.’”
11 पण त्या लोकांनी ऐकण्याचे नाकारले.
देवाला पाहिजे ते करण्यास नकार दिला.
देवाची वाणी ऐकू येऊ नये म्हणून
त्यांनी आपले कान झाकून घेतले.
12 ते अतिशय दुराग्रही बनले.
ते नियम पाळीनान.
सर्व शक्तिमान परमेश्वराने आपल्या आत्म्याचा उपयोग करुन
संदेष्ट्यांमार्फत त्याच्या लोकांना संदेश पाठविले.
पण लोक ऐकेनात.
तेव्हा सर्व शक्तिमान परमेश्वर कोपला.
13 मग तो म्हणाला,
“मी त्यांना आवाहन केले
पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आता, त्यांनी माझा धावा केल्यास,
मी ओ देणार नाही.
14 एखाद्या झंझावाताप्रमाणे मी इतर राष्ट्रांना त्यांच्याविरुध्द उठवीन.
ज्या राष्ट्रांची त्यांना माहिती नव्हती,
अशी राष्ट्रे देशावर आक्रमण करुन
त्यांचा नाश करतील
आणि हे प्रसन्न राष्ट्र नाश पावेल.”
मेंढपाळ आणि त्याची मेंढरे
10 येशू म्हणाला, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो. जेव्हा एखादा मनुष्य मेंढवाड्यात प्रवेश करतो, तेव्हा त्याने दाराचाच उपयोग करावा. जर तो दुसऱ्या मार्गाने चढतो तर तो लुटारु आहे. तो मेंढरे चोरण्याचा प्रयत्न करीत आहे. 2 परंतु मेंढरांची काळजी घेणारा दारातूनच आत जातो, तो मेंढपाळ आहे. 3 दारावरचा पहारेकरी मेंढपाळासाठी दार उघडतो आणि मेंढरे आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकतात, मेंढपाळ आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाका मारतो, आणि त्यांना तो बाहेर घेऊन जातो. 4 आपली सर्व मेंढरे बाहेर पडल्यावर तो त्यांच्या पुढे पुढे चालतो. (त्यांचे नेतृत्व करतो). मेंढरे त्याच्या मागोमाग जातात. कारण ती त्याचा आवाज ओळखतात. 5 अनोळखी माणसांच्या मागे मेंढरे कधीच जाणार नाहीत. ती त्या माणसापासून दूर पळून जातील. कारण त्यांना त्यांचा आवाज परिचयाचा नसतो.”
6 येशूने लोकांना हा दाखला सांगितला. परंतु तो काय सांगत आहे हे लोकांना समजले नाही.
येशू उत्तम मेंढपाळ आहे
7 म्हणून येशू पुन्हा म्हणाला. “मी तुम्हांला खरे सांगतो. मी मेंढरांचे दार आहे. 8 माझ्या अगोदर आलेले सर्व चोर व लुटारु होते. मेंढरांनी त्यांचे आवाज ऐकले नाहीत. 9 मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल. त्याला आत येता येईल व बाहेर जाता येईल. त्याला पाहिजे ते सर्व त्याला मिळेल. 10 चोर चोरी करायला, ठार मारायला आणि नाश करायला येतो. परंतु मी जीवन देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे.
11 “मी चांगला मेंढपाळ आहे. चांगला मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी स्वतःचा जीव देतो. 12 ज्याला मजुरी देऊन मेंढरे राखायला ठेवलेले असते तो मेंढपाळापेक्षा निराळा असतो. मजुरीवर मेंढरे राखणारा कळपाचा मालक नसतो. मेंढपाळ हाच कळपाचा मालक असतो. म्हणून मजुरीवर काम करणार माणूस लांडगा येताना पाहून मेंढरे सोडतो आणि पळून जातो. मग लांडगा मेंढरांवर हल्ला करुन त्यांची दाणादाण करतो. 13 मजूर पळून जातो कारण तो रोजंदारीवरचा कामगार असतो, तो मेंढरांची खरी काळजी करीत नाही.
14-15 “मी मेंढरांची (लोकांची) काळजी घेणारा मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो तसा मी माझ्या मेंढरांना ओळखतो. आणि जसा मी पित्याला ओळखतो तशी माझी मेंढरे मला ओळखतात. या मेंढरांसाठी मी आपला जीव देतो. 16 माझी दुसरीही मेंढरे आहेत ती येथे या कळपात नाहीत. त्यांनाही मला मार्गदर्शन केले पाहिजे. ते माझा आवाज ऐकतील आणि भविष्यकाळात एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. 17 मी आपला जीव देतो म्हणून माझा पिता मजवर प्रीति करतो. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो. 18 तो कोणी माझ्यापासून घेत नाही. मी माझा स्वतःचा जीव स्वतःच्या इच्छेने देतो. माझा जीव देण्याचा मला अधिकार आहे. आणि मला तो परत घेण्याचाही अधिकार आहे. हेच करण्याची माझ्या पित्याने मला आज्ञा दिली आहे.”
19 येशूने सांगितलेल्या ह्या गोष्टींमुळे यहूदी लोकांचे आपापसात एकमत होईना. 20 यहूदी लोकांपैकी पुष्कळजण म्हणाले, “याला भूत लागले आहे. म्हणून याचे डोके ठिकाणावर नाही. त्याचे का ऐकावे?”
21 परंतु दुसरे काही जण म्हणाले, “हा करतो तशा गोष्टी भूताने डोके फिरविलेला मनुष्य करीत नाही. भूत आंधळ्या माणसाचे डोळे बरे करील काय? मुळीच नाही!”
येशूच्या विरोधात यहूदी पुढारी
22 यरुशलेमात साजरा होणारा समर्पणाचा सण [a] जवळ आला. तो हिवाळा होता. 23 येशू मंदिरातील शलमोनाच्या देवडीत [b]होता. 24 यहूदी लोक येशूच्याभोवती जमा झाले, आणि म्हणाले. “किती दिवस तुम्ही आम्हांला असे गोंधळात ठेवणार आहात? जर तुम्हीच ख्रिस्त असाल तर आम्हांला तसे स्पष्टच सांगा!”
25 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला आधीच सांगितले. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या पित्याच्या नावाने जी कामे करतो, ती कामे सुध्दा मी कोण आहे याची साक्ष देतात. 26 पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. कारण माझी मेंढरे (लोक) नाहीत. 27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो. आणि ती माझ्यामागे येतात. 28 मी माझ्या मेंढरांना अनंतकाळचे जीवन देतो. ती कधीच मरणार नाहीत. आणि त्यांना कोणीच माझ्या हातून हिरावून घेणार नाही. 29 माझ्या पित्याने माझी मेंढरे माझ्या हाती दिली आहेत. तो सर्वांहून थोर आहे. माझ्या पित्याच्या हातून ती कोणी हिरावून घेणार नाही. 30 माझा पिता आणि मी एक आहोत.”
31 तेव्हा यहूदी पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्यासाठी पुन्हा धोंडें उचलले. 32 परंतु येशू त्यांना म्हणाला, “पित्यापासून आलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी मी केल्या. त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. त्यापैकी कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मला जिवे मारीत आहात?”
33 यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हांला मारीत नाही. परंतु तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या देवाविरुद्ध आहेत. तुम्ही फक्त मानव आहात, पण स्वतःला देवासारखेच आहोत असे मानता! आणि म्हणून आम्ही तुम्हांला धोंडमार करुन ठार करीत आहोत!”
34 येशूने उत्तर दिले, “तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे; ‘मी म्हणालो, तुम्ही देव आहात’ [c] 35 ज्या लोकांना देवाने त्याची आज्ञा वचने दिली त्यांच्याविषयी ते सांगते. पवित्र शास्त्रात त्या लोकांना देवाने असे म्हटले आणि पवित्र शास्त्र नेहमीच खरे आहे. 36 त्याच्या कामासाठी देवाने मला निवडले. देवाने मला जगात पाठविले. मी देवाचा पुत्र आहे. आणि तुम्ही म्हणता, मी बोलतो त्या गोष्टी देवाविरूद्ध आहेत, 37 जे माझा पिता करतो ते जर मी करत नाही, तर तुम्ही माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. 38 परंतु माझा पिता करतो तीच कृत्ये जर मी करतो, तर मी करतो त्या माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पण मी करतो त्या गोष्टींवर तरी विश्वास ठेवा. मग तुम्ही ओळखाल आणि समजून घ्याल की, पिता माइयामध्ये आहे, आणि मी पित्यामध्ये आहे.”
39 यहूदी लोकांनी येशूला पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला. परंतु येशू त्यांच्यातून निघून गेला.
40 मग येशू यार्देन नदी ओलांडून माघारी गेला. येशु जेथे योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे तेथे गेला. येशू तेथेच राहिला. 41 आणि पुष्कळ लोक त्याच्याकडे आले. लोक म्हणाले, “योहानाने कधी चमत्कार केला नाही. परंतु योहानाने या मनुष्याविषयी जे सांगितले ते खरे आहे.” 42 आणि त्याठिकाणी अनेक लोकांनी येशूवर विश्वास ठेवला.
2006 by World Bible Translation Center