Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 22-23

यहूदाचा राजा अहज्या

22 यहोरामच्या जागी यरुशलेमच्या लोकांनी यहोरामचा सर्वांत धाकटा मुलगा अहज्या याला राजा केले. यहोरामच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामच्या इतर सर्व थोरल्या मुलांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला. त्यावेळी तो बावीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. तिच्या वडिलांचे नाव अम्री. अहज्याची वागणूकही अहाबच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्याला दुराचरण करण्यास प्रवृत्त केले. अहाबच्या कुटुंबियांनी केले तसेच, परमेश्वराला मान्य नसलेले पापाचरण अहज्याने केले. अहज्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अहाबच्या घराण्याने त्याला सल्ला द्यायला सुरुवात केली. त्यांचे हे सल्ले अहज्याच्या भल्याचे नव्हते. बदसल्ल्यामुळेच त्याचा मृत्यू ओढवला. अहाब कुटुंबाच्या मसलतीनुसार अहज्या राजा योरामच्या बरोबर अरामचा राजा हजाएल याच्याशी लढण्यास रामोथ-गिलाद येथे गेला. योराम हा इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा. योराम या लढाईत अराम्यांकडून जायबंदी झाला. तेव्हा तो दुखण्याला उतार पडावा यासाठी इज्रेल येथे परतला. रामोथ येथे अरामचा राजा हजाएल याच्याशी लढताना तो घायाळ झाला होता. योरामला भेटायला म्हणून अहज्या इज्रेल येथे गेला. यहूदाचा राजा यहोराम याचा अहज्या हा मुलगा. योरामच्या वडिलांचे नाव अहाब. दुखापतीमुळे तो इज्रेला आला होता.

अहज्या (किंवा यहोआहाज) योरामला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी धाडले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामबरोबर निमशीचा मुलगा येहू याला भेटायला गेला. अहाबच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती. अहाबच्या घराण्याला शासन करीत असता येहूला यहूदाचे सरदार आणि अहज्याच्या सेवेत असलेले अहज्याचे आप्त आढळले. त्या सरदारांना आणि आप्तांना येहूने ठार केले. यानंतर येहूने अहज्याचा शोध घेतला. येहूच्या माणसांनी त्याला तो शोमरोनमध्ये लपण्याच्या प्रयत्नात असताना पकडले. अहज्याला त्यांनी येहूसमोर हजर केले, नंतर त्यांनी त्याला ठार केले आणि त्यांनी त्याचे दफन केले. ते म्हणाले, “अहज्या हा यहोशाफाटचा वारस. यहोशाफाट जिवाभावाने परमेश्वराला शरण गेला होता.” यहूदाचे राज्य सांभाळण्याइतके अहज्याचे घराणे समर्थ राहिले नव्हते.

राणी अथल्या

10 अथल्या ही अहज्याची आई. तिने आपला मुलगा मरण पावला आहे हे पाहिल्यावर यहूदाच्या सर्व राजवंशाचा संहार केला. 11 पण यहोशबाथ हिने अहज्याचा मुलगा योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामची मुलगी आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथने योवाशला लपवल्यामुळे अथल्या त्याला मारु शकली नाही. 12 परमेश्वराच्या मंदिरात त्याला याजकांच्या सहवासात सहा वर्षे लपवून ठेवले होते. या काळात अथल्याने राणी म्हणून अंमल चालवला.

संदेष्टा यहोयादा आणि राजा योवाश

23 यहोयादाने सहा वर्षांनंतर आपले सामर्थ्य दाखवले. त्याने यरोहामचा मुलगा अजऱ्या यहोहानानचा मुलगा इश्माएल, ओबेदचा मुलगा अजऱ्या, अदायाचा मुलगा मासेया आणि जिक्रीचा मुलगा अलीशाफाट या मुख्य अधिकाऱ्यांशी करार केला. त्यांनी यहूदाभर फिरुन यहूदात विखुरलेल्या लेवींना आणि इस्राएलच्या कुलप्रमुखांना एकत्र आणले. मग ते सर्व यरुशलेम येथे गेले. तेथे देवाच्या मंदिरात सर्व समुदायाने राजाशी करार केला.

यहोयादा या लोकांना म्हणाला, “परमेश्वर दावीदाच्या संततीविषयी जे बोलला आहे त्याला अनुसरुन राजाचा मुलगा गादीवर येईल. आता तुम्ही करायचे ते असे: तुमच्यापैकी जे एक तृतीयांश याजक आणि लेवी शब्बाथच्या दिवशी कामाला येतात त्यांनी मंदिरावर पहारा करावा. एकतृतीयांश लोकांनी राजमहालावर पहारा करावा, आणि उरलेल्या एकतृतीयांश लोकांनी वेशीपाशी असावे. यांच्याखेरीज बाकी सर्व लोकांनी परमेश्वराच्या मंदिराच्या आवारात राहावे. कोणालाही परमेश्वराच्या मंदिरात येऊ देऊ नये. सेवा करणारे याजक आणि लेवी यांनाच काय ते परमेश्वराच्या मंदिराच्या आत येता येईल कारण ते शुचिर्भूत असतात. पण इतरांनी परमेश्वराने नेमून दिलेली आपापली कामे करायची आहेत. लेवींनी राजाच्या निकट राहायचे. प्रत्येकाजवळ आपली तलवार सज्ज असावी. कोणी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ठार करावे. सर्वांनी राजाची सावलीसारखी सोबत करावी.”

लेवी आणि यहूदा या सर्व लोकांनी यहोयादा या याजकाने ज्या आज्ञा केल्या त्या सर्वांचे पालन केले. यहोयादाने याजकांपैकी कोणाचीही गय केली नाही. त्यामुळे शब्बाथच्या दिवशी आळीपाळीने आत येणाऱ्या व कामावरुन बाहेर जाणाऱ्या सर्वाची व्यवस्था केली. दावीद राजाचे भाले, छोट्या ढाली आणि मोठ्या ढाली ही शस्त्रे देवाच्या मंदिरामध्ये ठेवलेली होती. यहोयादा याजकाने शंभर सैनिकांच्या तुकड्यांच्या प्रमुखांना त्या दिल्या. 10 आणि त्यांनी कुठे, कसे उभे राहायचे ते सांगितले. प्रत्येकाजवळ आपापले शस्त्र होते. मंदिराच्या थेट उजव्या कोपऱ्यापासून डाव्या बाजूपर्यंत ही शस्त्रधारी माणसे उभी राहिली. वेदी, मंदिर आणि राजा यांच्याजवळ ती उभी होतीच. 11 मग त्यांनी राजपुत्राला बाहेर आणले आणि त्याच्या मस्तकावर मुगुट चढवला. त्याच्या हाती आज्ञापट दिला. योवाशला त्यांनी राजा केले. यहोयादा आणि त्याची मुले यांनी त्याला अभिषेक केला. “राजा चिरायु होवो” असे ते सर्वजण म्हणाले.

12 मंदिराकडे लगबगीने जाणाऱ्या लोकांचा गलका आणि राजाचा जयजयकार अथल्याने ऐकला. तेव्हा ती मंदिरात लोकांकडे आली. 13 पाहते तो तिला राजा दिसला. प्रवेशद्वाराशी तो राजस्तंभाजवळ उभा होता. कर्णे वाजवणारे कारभारी आणि लोक राजा जवळ उभे होते. देशभरचे लोक कर्णे वाजवून आनंद व्यक्त करत होते. गाणारे वाद्ये वाजवत होते आणि त्यांनी म्हटलेल्या स्तवनगीतापाठोपाठ लोक म्हणत होते. तेव्हा आपली तीव्र नापसंती दाखवण्यासाठी अथल्याने आपले कपडे फाडले आणि “फितुरी, फितुरी” असे ती ओरडली.

14 याजक यहोयादा याने सेनापतींना पुढे आणले. त्यांना तो म्हणाला, “तिला सैन्याच्या रांगांमधून बाहेर काढा. तिच्या मागे जो जाईल त्याला तलवारीने मारुन टाका.” मग याजकाने सैन्याला आज्ञा दिली, “परमेश्वराच्या मंदिरात अथल्याचा वध करु नका.” 15 राजमहालाच्या घोडावेशीजवळ अथल्या पोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्याठिकाणी तिला जिवे मारले.

16 यहोयादाने मग सर्व लोक आणि राजा यांच्याबरोबर एक करार केला. आपण सर्व परमेश्वराचे लोक आहोत असा तो करार होता. 17 मग सर्वजण बआल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्या मूर्तीची त्यांनी नासधूस केली. तिथल्या इतर मूर्ती आणि वेदीदेखील मोडून तोडून टाकल्या. बआलच्या वेदीपुढेच त्यांनी बआलचा याजक मत्तान याला ठार केले.

18 यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदिरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वराला होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले 19 सर्वार्थाने शुध्द-शुचिर्भूत होऊनच मंदिरात यावे, तसे नसणाऱ्याना अडवले जावे म्हणून यहोयादाने परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशीच द्वारपाल नेमले.

20 सर्व सैन्याधिकारी, लोकनायक, सरदार आणि सर्व प्रजा यांना यहोयादाने आपल्याबरोबर घेतले. मग त्याने राजाला परमेश्वराच्या मंदिराबाहेर काढले. तिथून वरच्या वेशीतून ते राजमहालात पोचले. तेथे त्यांनी राजाला सिंहासनावर बसवले. 21 अथल्याचा तलवारीने वध झाला त्या नंतर यहूदा लोकांमध्ये आनंदी आनंद पसरला आणि यरुशलेम नगर शांत झाले.

प्रकटीकरण 10

देवदूत आणि लहान गुंडाळी

10 मग मी आणखी एक शक्तीशाली देवदूत स्वर्गातून येताना पाहिला. तो ढगांनी आच्छादलेला होता. त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा होता, त्याचे पाय जणू काय अग्नीचे खांब होते. त्याने लहान गुंडाळी धरली होती, जी त्याच्या हातात उघडी होती. त्याने त्याचा उजवा पाय समुद्रात ठेवला होता व डावा पाय जमिनीवर ठेवला होता. आणि त्याने सिंहाच्या गर्जनेसारखी मोठ्याने गर्जना कली. जेव्हा तो ओरडला, तेव्हा त्या सात मेघगर्जनांनी आपापले शब्द उच्चारले.

जेव्हा त्या सात मेघगर्जना बोलल्या, त्यावेळी मी लिहिणार एवढ्यात मला आकाशातून वाणी आली, ती म्हणाली, “सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द बंद करुन ठेव. ते लिहू नको.”

मग ज्या देवदूताला मी समुद्रात व जमिनीवर पाहिले होते त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे उचलला. जो अनंतकाळ जगतो, ज्याने आकाश व त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी व तीवरील, त्याच्या नावाने शपथ वाहिली. आणि म्हणाला, “आता आणखी विलंब होणार नाही! पण जेव्हा सातवा देवदूत कर्णा वाजविण्याच्या तयारीत असेल त्या दिवसात देवाची गुप्त योजना पूर्ण होईल. त्याचे सेवक जे संदेष्टे (भविष्यवदी) त्यांना दिलेल्या वचनानुसार घडून येईल.”

तेव्हा आकाशातून झालेली वाणी जी मी ऐकली होती ती पुन्हा मला बोलली, “जा, गुंडाळी घे, जी गुंडाळी समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या देवदूताच्या हातात उघडी आहे ती घे.”

म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणालो. तो मला म्हणला, “ही घे, आणि ही खा. ती खाल्ल्याने तुझे पोट कडू होईल. पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधासारखे गोड लागेल.” 10 मी ती लहान गुंडाळी देवदूताच्या हातून घेतली व खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मदासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली, तेव्हा माझे पोट कडवट झाले. 11 तेव्हा मला सांगण्यात आले, “तू पुन्हा पुष्कळ लोकांना, राष्ट्रांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना व राजांना संदेश सांगितले पाहिजेत.”

जखऱ्या 6

चार रथ

मग मी वळून बघितले तेव्हा दोन जस्ताच्या पर्वतांतून चार रथ जाताना दिसले. लाल रंगाचे घोडे पहिला रथ ओढत होते. काळ्या रंगाचे घोडे दुसरा रथ ओढत होते. पांढऱ्या रंगाचे घोडे तिसरा रथ ओढत होते. तर लाल ठिपके असलेले घोडे तिसरा रथ ओढत होते. तर लाल ठिपके असलेले घोडे चौथा रथ ओढत होते. माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “महाराज, ह्या गोष्टींचा अर्थ काय?”

देवदूत म्हणाला, “ते चार प्रकारचे वारे [a] आहेत. जगन्नियंत्याससोरुन ते आत्ताच आलेत. काळे घोडे उत्तरेला, लाल घोडे पूर्वेला, पांढरे घोडे पश्चिमेला व तांबडे ठिपके असलेले घोडे दक्षिणेला जातील.”

तांबडे ठिपके असलेले घोडे, त्यांच्या भागात जाण्यास, उत्सुक दिसत होते. म्हणून देवदूताने त्यांना भूमीमधून संचार करण्यास सांगितले मग ते त्यांच्या भागांतून गेले.

मग परमेश्वराने मला मोठ्याने हाक मारुन सांगितले, “बघ, उत्तरेकडे गेलेल्या घोड्यांनी बाबेलमध्ये आपले काम पूर्ण केले आहे. त्यांनी माझा आत्मा शांत केला आहे. मी आता रागावलेलो नाही.”

वरिष्ठ याजक यहोशवाला मुकुट मिळतो

मग मला परमेश्वराचा आणखी एक संदेश मिळाला. तो म्हणाला, 10 “हेल्दय, तोबीया व यदया हे बाबेलच्या बंद्यांकडून आले आहेत. त्याच्याकडून सोने आणि चांदी घेऊन, सफन्याचा मुलगा, यहोशवाकडे जा. 11 त्या सोन्या-चांदीपासून मुकुट कर. तो योशीयाच्या डोक्यावर ठेव. (यहोशवा मुख्याजक होता. तो यहोसादाकचा मुलगा होता.) मग त्याला पुढील गोष्टी सांग: 12 सर्व शक्तिमान परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो:

‘कोंब नावाचा एक माणूस आहे.
    तो सामर्थ्यवान बनेल.
    तो परमेश्वराचे मंदिर बांधील.
13 तो परमेश्वराचे मंदिर बांधून
    गौरव प्राप्त करील.
स्वतःच्या सिंहासनावर बसून तो राज्य करील.
    त्याच्या सिंहासनाजवळ याजक उभे राहतील.
ते दोघे एकत्रितपणे, शांतपणे काम करतील.’

14 लोकांना आठवण राहावी म्हणून ते मुकुट मंदिरात ठेवतील. तो मुकुट हेल्दय, तोबीया, यदया व सफन्याचा मुलगा योशिया यांना राजाचे सामर्थ्य देवाकडून येते याची आठवण करुन देईल.”

15 दूरवर राहणारे लोक येतील आणि मंदिर बांधतील मग तुमची खात्री पटेल की परमेश्वरानेच मला तुमच्याकडे पाठविले. जर तुम्ही परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे वागलात, तरच ह्या गोष्टी घडून येतील.

योहान 9

जन्मापासून आंधळा असलेल्या मनुष्याला येशू दृष्टि देतो

येशू चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला. हा मनुष्य त्याच्या जन्मापासून आंधळा होता. येशूच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, हा मनुष्य आंधळा जन्मला. परंतु तो कोणाच्या पापामुळे आंधळा जन्मला? त्याच्या स्वतःच्या का त्याच्या आईवडिलांच्या पापामुळे?”

येशूने उत्तर दिले, “त्याच्या स्वतःच्या पापामुळे अगर त्याच्या आईवडीलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही. मी याला बरे करताना लोकांना देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला. दिवस आहे तोपर्यंत, ज्याने मला पाठविले त्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे. रात्र येत आहे आणि रात्री कोणी काम करु शकत नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.”

असे बोलल्यानंतर, येशू मातीवर थुंकला. त्याने त्या थुंकीने चिखल केला, आणि त्या चिखलाचा गोळा करुन त्याने त्या माणसाच्या डोळ्यांवर ठेवला. मग येशूने त्या मनुष्याला सांगितले, “जाऊन शिलोह तळ्यात डोळे धू.” (शिलोह म्हणजे पाठविलेला) म्हणून तो मनुष्य त्या तळ्यापाशी गेला. त्याने डोळे धुतले आणि तो परत आला, तेव्हा त्याला चांगले दिसू लागले होते.

काही लोकांनी त्याला भीक मागताना पूर्वी पाहिले होते. ही माणसे आणि त्याचे शेजारी म्हणाले, “पाहा! येथे बसून भीक मागत असे तो मनुष्य हाच आहे ना?”

काही लोक म्हणाले, “होय! हा तोच आहे.” परंतु दुसरे काही म्हणाले, “नाही हा तो मनुष्य नाही. हा फक्त त्याच्यासारखा दिसतो.”

मग तो माणूस स्वतः होऊनच म्हणाला, “अहो, मीच तो पूर्वीचा आंधळा आहे.”

10 लोकांनी विचारले, “अरे असे घडले तरी काय? तुला कसे दिसू लागले?”

11 त्या मनुष्याने उत्तर दिले. “लोक ज्याला येशू म्हणतात त्याने थोडा चिखल केला. त्याने तो चिखल माझ्या डोळ्यांवर लावला. मग येशूने मला शिलोह तळ्याकडे जाऊन धुण्यास सांगितले. म्हणून मी शिलोह तळ्यावर जाऊन डोळे धुतले. आणि मग मला दिसू लागले.”

12 लोकांनी त्या मनुष्याला विचारले, “तो मनुष्य कोठे आहे?”

त्या मनुष्याने उत्तर दिले, “मला माहीत नाही.”

येशूने बरे केलेल्या मनुष्याची परुश्यांकडून चौकशी

13 मग लोकांनी परुशी लोकांकडे त्या मनुष्याला नेले. हाच पूर्वी आंधळा मनुष्य होता. 14 येशूने चिखल करुन त्या मनुष्याचे डोळे बरे केले होते. ज्या दिवशी येशूने हे केले तो शब्बाथ दिवस होता. 15 म्हणून आता परुशी लोक त्या मनुष्याला विचारु लागले, “तुला कसे काय दिसू लागले?”

त्या मनुष्याने उत्तर दिले, “त्याने माझ्या डोळ्यांवर चिखल लावला. मी डोळे धुतले आणि आता मी पाहू शकतो.”

16 परुश्यांतील काही लोक म्हणाले, “हा मनुष्य शब्बाथाचा नियम पाळीत नाही. म्हणून तो देवापासून नाही.”

दूसरे लोक म्हणाले, “परंतु एखादा मनुष्य पापी असेल तर त्याला असे चमत्कार करताच येणार नाहीत.” याविषयी त्या यहूदी लोकांचे एकमत होईना.

17 मग यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला पुन्हा विचारले, “त्या मनुष्याने तुला बरे केले, आणि आता तुला दिसते, तर त्याच्याविषयी तुला काय म्हणायचे आहे?”

त्या मनुष्याने उत्तर दिले, “तो एक संदेष्टा आहे.”

18 हे या माणसाच्या बाबतीत घडले आहे यावर यहूदी लोकांचा विश्वासच बसेना, हा मनुष्य आंधळा होता आणि आता त्याला दिसते या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसत नव्हता. नंतर त्यांनी त्या मनुष्याच्या आईवडिलांना बोलावून घेतले. 19 यहुदी लोकांनी त्याच्या आईवडिलांना विचारले, “हा तुमचाच मुलगा आहे काय? तुम्ही म्हणता हा जन्मापासून आंधळा होता तर आता याला कसे काय दिसू लागले?”

20 त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले, “हा आमचाच मुलगा आहे. आणि तो आंधळाच जन्माला आला हे आम्हांला माहीत आहे. 21 परंतु त्याला आता कसे दिसायला लागले आणि त्याचे डोळे कोणी बरे केले हे आम्हांला माहीत नाही. त्यालाच विचारा. तो स्वतः बद्दल सांगण्याइतका सुज्ञ झाला आहे.” 22 त्याचे आईवडील असे म्हणाले कारण त्यांना यहूदी धर्मपुढाऱ्यांची फार भीति वाटत होती. येशू हा ख्रिस्त आहे, असे जो कोणी म्हणेल, त्याला शिक्षा करायची असे यहूदी पुढाऱ्यांनी अगोदरच ठरवून ठेवलेले होते. अशा लोकांना यहूदी पुढारी सभास्थानाबाहेर घालवू शकत होते. 23 म्हणून “त्यालाच विचारा तो आता मोठा झाला आहे” असे त्या मनुष्याचे आईवडील म्हणाले.

24 मग जो जूर्वी आंधळा होता त्याला यहूदी पुढाऱ्यांनी पुन्हा बोलाविले. ते त्याला म्हणाले, “तुला बरे केले म्हणून तू देवाला गौरव द्यावे. हा मनुष्य पापी आहे हे आम्हांला माहीत आहे.”

25 त्या मनुष्याने उत्तर दिले, “तो पापी आहे की नाही हे मला माहीत नाही. परंतु हे मला नक्की माहीत आहे की, मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते.”

26 यहूदी पुढाऱ्यांनी विचारले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे बरे केले?”

27 त्या मनुष्याने उत्तर दिले. “ते मी तुम्हांला अगोदरच सांगितले आहे. परंतु तुम्ही माझे ऐकत नाही. पुन्हा तुम्हांला ते ऐकावेसे वाटते काय? तुम्हांलाही त्याचे शिष्य व्हावयाची इच्छा आहे काय?”

28 यहूदी पुढारी फार संतापले आणि त्याला फारच वाईट रीतीने बोलू लागले. ते त्याला म्हणाले, “तू त्याचा शिष्य आहेस. आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत. 29 देव मोशेशी बोलत असे हे आम्हांला माहीत आहे. परंतु हा मनुष्य कोण, कोठून आला हे आम्हांला माहीत नाही.”

30 त्या मनुष्याने उत्तर दिले, “ही फारच विचित्र गोष्ट आहे. येशू कोठून आला हे तुम्हांला माहीत नाही. परंतु त्याने माझे डोळे बरे केले. 31 देव पापी लोकांचे ऐकत नाही हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण जो त्याची उपासना करतो आणि त्याची आज्ञा पाळतो त्याचेच तो ऐकेल. 32 जो मनुष्य जन्मजात आंधळा होता, त्याला दृष्टी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 33 हा मनुष्य देवाकडूनच आला असला पाहिजे. जर तो देवाकडूल आला नसता तर त्याला असे काहीच करता आले नसते.”

34 यहूदी पुढाऱ्यांनी उतर दिले, “तू तर पापात जन्मला आहेस तू आम्हांला शिकवू पाहतोस काय?” आणि यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला तेथून हुसकून लावले.

आध्यात्मिक आंधळेपणा

35 यहूदी पुढाऱ्यांनी त्या मनुष्याला बळजबरीने हुसकावून लावले, हे येशूने ऐकले, म्हणून येशू त्या मनुष्याला भेटला आणि म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”

36 त्या मनुष्याने विचारले, “महाराज, हा मनुष्याचा पुत्र कोण? मला सांगा, म्हणजे मला त्याच्यावर विश्वास ठेवता येईल.”

37 येशू त्याला म्हणाला, “तू त्याला अगोदरच पाहिले आहेस. मनुष्याचा पुत्र आता तुझ्याशी बोलत आहे.”

38 “होय, प्रभु, मी विश्वास ठेवतो.” त्या मनुष्याने उत्तर दिले. मग त्या मनुष्याने खाली वाकून येशूला वंदन केले.

39 येशू म्हणाल, “जगाचा न्याय व्हावा म्हणून मी जगात आलो आहे. मी आलो आहे तो यासाठी की, जे आंधळे आहेत त्यांना दिसावे. आणि आम्हांला पाहता येते असे वाटणारे आंधळे व्हावेत.”

40 परुश्यांतील काही जण येशूच्या आजूबाजूला होते. त्यांनी येशूला हे बोलताना ऐकले. आणि त्यांनी विचारले, “काय, आम्हीसुद्धा आंधळे आहोत असे तुला म्हणायचे आहे काय?”

41 येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच आंधळे (समज नसलेले) असता, तर तुम्ही पापाबद्दल दोषी ठरला नसता. परंतु ‘आम्हांस दिसते’ असे तुम्ही म्हणता (तुम्ही काय करता हे जाणता) म्हणून तुम्ही दोषी आहात.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center