Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 21

21 पुढे यहोशाफाट वारला. त्याचे त्याच्या पूर्वजांजवळ दफन केले. दावीद नगरात त्याला पुरले. यहोशाफाटच्या जागी त्याचा मुलगा यहोराम गादीवर बसला. अजऱ्या, यहीएल, अजऱ्या, मीखाएल व शफट्या हे यहोरामचे भाऊ, व यहोशाफाटचे मुलगे. यहोशाफाट हा यहूदाचा राजा होता. यहोशाफाटने आपल्या मुलांना यहूदातील तटबंदीच्या नगरांखेरीज सोन्या-रुप्याच्या आणि अन्य किंमती वस्तू भेटीदाखल दिल्या. यहोराम मात्र ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे त्याला त्याने राज्य दिले.

यहूदाचा राजा यहोराम

यहोराम आपल्या वडिलांच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडिलधाऱ्यांचा तलवारीने वध केला. वयाच्या बत्तिसाव्या वर्षी सत्तेवर येऊन यहोरामने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. अहाबच्या घराण्याप्रमाणे, इस्राएलच्या राजांच्या राहणीला अनुसरुनच याचे वागणे होते. कारण अहाबाच्या मुलीशी यहोरामने लग्न केले होते. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट अशा गोष्टी त्याने केल्या. पण परमेश्वराने दावीदाला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वर दावीदाच्या घराण्याचे उच्चाटन करु शकत नव्हता. दावीदाच्या वंशाचा दिवा सतत तेवत राहील असा परमेश्वराने दावीदाशी करार केला होता.

यहोरामच्या कारकीर्दीत अदोमने यहूदाच्या सत्तेविरुध्द बंड पुकारले. अदोमच्या लोकांनी स्वतः आपला राजा निवडला. तेव्हा आपले सर्व सेनापती आणि रथ यांच्यासह यहोराम अदोमवर चाल करुन गेला. अदोमी सैन्याने त्यांना वेढा घातला. पण यहोरामने रात्रीची वेळ साधून त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. 10 तेव्हा पासून आजतागायत अदोमची यहूदाशी बंडखोरी चालू राहिली आहे. लिब्ना नगरातील लोकांनीही यहोरामची सत्ता झुगारली. यहोरामने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केल्यामुळे असे झाले. 11 यहोरामने यहूदातील पहाडांवर प्रार्थनेसाठी उच्चस्थाने बांधली. असे करण्याने, परमेश्वराला लोकांनी जसे वागावे असे वाटत होते त्यात खंड पडला. यहोरामने यहूदा लोकांना परमेश्वरापासून दूर नेले.

12 एलीया या संदेष्ट्याकडून यहोरामला असा संदेश आला:

“परमेश्वरा देवाने असे सांगितले आहे. तुझे पूर्वज दावीद यांचा हा परमेश्वर आहे, परमेश्वर म्हणतो, ‘यहोराम, तुझे आचरण आपले वडील यहोशाफाट यांच्या सारखे नाही. यहूदाचा राजा आसा याच्यासारखे तुझे वर्तन नाही. 13 उलट तू इस्राएलच्या राजांचा कित्ता गिरवला आहेस. यहूदा आणि यरुशलेममधील लोकांना तू परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागायला लावले आहेस. अहाब आणि त्याचे घराणे यांनी हेच केले. ते परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले नाहीत. तू स्वतःच्या भावांची हत्या केलीस. ते तुझ्यापेक्षा वर्तणुकीने चांगले होते. 14 तेव्हा परमेश्वर आता तुझ्या लोकांना जबर शासन करणार आहे.तुझी मुले,बायका,मालमत्ता? यांना परमेश्वर शिक्षा करणार आहे. 15 तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसे दिवस बळावेल. त्यात तुझी आतडी बाहेर पडतील.’”

16 कूशी लोकांच्या शेजारचे अरब आणि पलिष्टी लोक यांना परमेश्वराने यहोरामविरुध्द भडकावले. 17 या लोकांनी यहूदावर स्वारी केली आणि त्यांनी राजाच्या महालातली सगळी धनदौलत लुटून नेली. यहोरामच्या बायकामुलांनाही त्यांनी पळवले. फक्त यहोआहाज हा सगळ्यात धाकटा मुलगा तेवढा बचावला.

18 या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले. 19 त्या आजारात दोन वर्षांनी त्याची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडिलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता तसा यहोरामच्या सन्मानार्थ पेटवला नाही. 20 यहोराम सत्तेवर आला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दु:ख झाले नाही. लोकांनी दावीदनगरातच त्याचे दफन केले, पण राजासाठी असलेल्या कबरीत नव्हे.

प्रकटीकरण 9

पाचव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला, तेव्हा मी आकाशातून एका ताऱ्याला, पृथ्वीवर पडताना पाहिले. अथांग दऱ्याकडे नेणाऱ्या खोल बोगद्याची किल्ली त्याला देण्यात आली. मोठ्या भट्टीतून धूर यावा तसा त्या बोगद्यातून धूर येऊ लागला. बोगद्यातून येणाऱ्या धुरामुळे सूर्य आणि आकाश काळे झाले

मग धुरातून टोळधाड पृथ्वीवर आली. त्यांना पृथ्वीवरील विंचवासारखा दंश करण्याचा अधिकार दिला होता. टोळांना सांगण्यात आले होते की त्यांनी गवताला, रोपांना किंवा झाडांना हानि पोहचवू नये. ज्या लोकांच्या कपाळावर देवाचा शिक्का मारण्यात आला नसेल त्यांनाच चावण्यास त्यांना सांगण्यात आले होते. या टोळांना लोकांना वेदना देण्यासाठी पाच महिने वेळ दिला होता. अधिकार दिला होता. पण त्यांना लोकांना ठार मारण्याचा अधिकार देण्यात आला नव्हता. त्यांच्या दंशाने ज्या वेदना होत त्या वेदना विंचवाने डंख मारल्यावर होतात तशा होत होत्या. या दिवसात अनेक जण मरण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतील पण त्यांना तो सापडणार नाही. त्यांना मरावेसे वाटेल पण मरण त्यांच्यापासून लपून राहील.

युद्धासाठी तयार असलेल्या घोड्यांसारखे टोळ दिसत होते. त्यांच्या डोक्यांवर त्यांनी सोनेरी मुगुटासारखे काही घातले होते. त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे दिसत होते. त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते. त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते. त्यांची छाती लोखंडी उरस्त्राणासारखी (चिलखतासारखी) दिसत होती आणि त्यांच्या पंखांचा आवाज युद्धात वेगाने धावणाऱ्या अनेक घोडयांच्या रथासारखा होता. 10 त्यांना विंचवासारख्या शेपट्या व नांग्या होत्या. लोकांना पाच महिने वेदना देण्याची त्यांच्या शेपटीत ताकद होती. 11 टोळांचा एक राजा होता. हा राजा अथांग दऱ्याचा दूत होता. यहूदी भाषेत त्याचे नाव अबद्दोन, आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपुल्लोन (विध्वंसमूलक) होते.

12 पहिले मोठे संकट आता येऊन गेले होते. आणखी दोन मोठी संकटे येणार आहेत.

सहावा कर्णा वाजतो

13 सहाव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा मी देवासमोर असलेल्या सोनेरी वेदीवरुन चारपैकी एका शिंगापासून येणारा आवाज ऐकला. 14 तो आवाज त्या सहाव्या दूताला ज्याच्याकडे कर्णा होता त्याला म्हणाला, “फरान नदीवर बांधून ठेवलेले चार देवदूत सोड.” 15 ते चार देवदूत या घटकेसाठी, या दिवसासाठी, या महिन्यासाठी, या वर्षासाठी तयार ठेवले होते. पृथ्वीवरील एक तृतीयांश लोकांना मारण्यासाठी हे देवदूत सोडण्यात आले. 16 घोडदळाची संख्या मी ऐकली. तो 200,000,000 इतके घोडदळ होते.

17 माझ्या दृष्टान्तात मी घोडे आणि घोड्यांवर असलेले स्वार पाहिले, ते अशा प्रकारे दिसत होते: तांबड्या रंगाचे, गडद निळे आणि पिवळे असे त्यांचे उरस्त्राण (चिल खत) होते. घोड्यांची मस्तके सिंहाच्या मस्तकासारखी दिसत होती. घोड्यांच्या तोंडांतून अग्नि, धूर व गंधरस येत होते. 18 घोडयांच्या तोंडातून येणाऱ्या या तीन पीडा-अग्नि, धूर व गंधरस यामुळे पृथ्वीवरील एक तृतीयांश लोक मारले गेले. 19 घोड्यांची शाक्ति त्यांच्या तोंडात तशी त्यांच्या शेपटीतसुद्धा होती. त्या शेपट्या सापासारख्या असून त्यांना दंश करण्यासाठी डोके होते. ते लोकांना जखमी करीत असत.

20 इतर लोकांना या वाईट गोष्टींमुळे मारले गेले नाहीत. पण तरीही या लोकांनी आपली अंतःकरणे व जीविते बदलली नाहीत. आणि आपल्या हातांनी ज्या गोष्टी ते करीत होते त्यापासून वळले नाहीत. ते सैतानाची म्हणजे सोने, चांदी, तांबे. दगड आणि लाकूड यांच्या मूर्तींची, ज्या पाहू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत व चालू शकत नाहीत, अशांची भक्ति करण्याचे त्यांनी थांबविले नाही. 21 या लोकांनी इतरांना मारण्यापासून आपली अंतःकरणे बदलली नाहीत खून चेटके तसेच लैंगिक पापांपासून आणि चोरीपासून परावृत्त झाले नाहीत.

जखऱ्या 5

उडता पट

मी पुन्हा वरती पाहिले आणि मला एक उडता पट दिसला. देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते?”

मी म्हणालो, “मला उडता पट दिसतो. तो 30 फूट लांब व 15 फूट रुंद आहे.”

तेव्हा देवदूताने मला सांगितले, “त्या पटावर एक शाप लिहिला आहे. पटाच्या एका बाजूवर जे लोक चोरी करतात त्यांच्यासाठी शाप आहे. आणि दुसऱ्या बाजूवर जेलोक वचन देताना खोटे बोलतात त्यांच्यासाठी शाप आहे. सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो: मी हा पट चोरांच्या आणि माझ्या नावाने खोटी वचने देणाऱ्या लोकांच्या घरी पाठवीन. तो तेथेच राहील आणि त्या घरांचा नाश करील. दगड व लाकडी खांबांचासुध्दा नाश होईल.”

स्त्री आणि बादली

मग माझ्याशी बोलणारा देवदूत बाहेर गेला. तो म्हणाला, “हे बघ! तुला काय येताना दिसतेय?”

मी म्हणालो, “माहीत नाही ते काय आहे?”

तो म्हणाला, “ती एक मापन-बादली आहे.” तो असेसुध्दा म्हणाला की “ह्या देशातील लोकांचे पाप मोजण्यासाठी ती आहे.”

बादलीवरचे शिसाचे झाकण कर उचलेले होते. आणि त्या बादलीत एक स्त्री बसली होती. [a] देवदूत म्हणाला, “ही बाई पापाचे प्रतीक आहे!” मग त्याने त्या बाईला बादलीत खाली ढकलले आणि ते शिशाचे झाकण बादलीच्या तोंडावर बसवले. नंतर मी वर पाहिले, तर मला करकोच्यासारखे पंख असलेल्या दोन स्त्रिया दिसल्या. त्या उडाल्या आणि पंखांनी वारा कापत त्यांनी ती बादली उचलली ती बादली घेऊन त्या उडू लागल्या. 10 माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “त्या ती बादली कोठे नेत आहेत?”

11 देवदूत मला म्हणाला, “त्या बादलीसाठी एक घर शिनार मध्ये बांधण्यासाठी त्या जात आहेत. त्या तेथे बादली ठेवतील.”

योहान 8

येशू जैतुनाच्या डोंगरावर [a] निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच येशू परत मंदिरात गेला. सर्व लोक येशूकडे आले. येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले.

नियमशास्त्राचे शिक्षक व परुशी एका स्त्रीला घेऊन तेथे आले. त्या स्त्रीला व्यभिचाराचे पाप करताना पकडले होते. या यहूदी लोकांनी त्या स्त्रीला बळजबरीने लोकांपुढे उभे केले. ते येशूला म्हणाले, “गुरूजी, जो हिचा नवरा नाही, अशा माणसाशी व्यभिचार करताना ह्या स्त्रीला पकडले. मोशेच्या नियमशस्त्रात अशी आज्ञा दिलेली आहे की, असे कर्म करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आम्ही धोंडमार करुन जिवे मारले पाहिजे. आम्ही काय करावे असे तुमचे मत आहे?”

येशूला पेचात पकडावे म्हणून यहूदी लोकांनी हा प्रश्न विचारला होता. काही तरी चुकीचे बोलताना येशूला धरावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे मग त्यांना येशूवर आरोप ठेवता आला असता. पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. यहूदी पुढारी येशूला प्रश्न विचारीतच राहिले, म्हणून येशू मान वर करुन त्यांच्याकडे पाहत म्हणाला, “ज्याने कधीच पाप केले नाही असा एकतरी मनुष्य येथे आहे काय? निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकू शकतो.” मग येशूने पुन्हा गुडघे टेकले व जमिनीवर लिहू लागला.

येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले, ते एक एक करुन निघून जाऊ लागले. जे वयस्कर होते ते अगोदर गेले. मग इतर लोक गेले. येशू एकटाच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता. ती त्याच्यासमोर उभी होती. 10 येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले, “बाई, ते सर्व लोक निघून गेले आहेत, त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय?”

11 त्या स्त्रीने उत्तर दिले. “महाराज, मला कोणीही दोषी ठरविले नाही.”

मग येशू म्हणाला, “मग मीही तुझा न्याय करीत नाही. आता तू जाऊ शकतेस, पण परत पाप करु नकोस.”

(वचने 7:53 ते 8:11 अति जुन्या व उत्तम ग्रीक प्रतीमध्ये ही वचने नाहीत)

येशू जगाचा प्रकाश आहे

12 नंतर येशू पुन्हा लोकांशी बोलू लागला. तो म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे, जो माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात राहणार नाही. त्या माणसाजवळ जीवन देणारा प्रकाश राहील.”

13 परंतु परुशी लोक येशूला म्हणाले, “जेव्हा तुम्ही स्वतः आपल्याविषयी बोलता, तेव्हा ह्या गोष्टी खऱ्या आहेत असे म्हणणारे तुम्ही एकटेच असता. तेव्हा तुम्ही सांगता त्या गोष्टी आम्ही स्वीकारु शकत नाही.”

14 येशूने उत्तर दिले, “होय, मी स्वतःच माझ्याविषयी या गोष्टी सांगत आहे. परंतु मी सांगतो त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवू शकतील. कारण मी कोठून आलो हे मला माहीत आहे व कोठे जाणार हे मला माहीत आहे. मी तुमच्यासारखा नाही. मी कोठून आलो व कोठे जाणार हे तुम्हांला माहीत नाही. 15 तुम्ही एखाद्याचा न्याय करता तसाच माझाही करता. मी कोणाचा न्याय करीत नाही. 16 पण जर मी न्याय केला तर त्यात माझा न्याय खरा असतो. कारण जेव्हा मी न्याय करतो तेव्हा मी एकटा नसतो. ज्या पित्याने मला पाठविले, तो माझ्याबरोबर असतो. 17 तुमचे स्वतःचेच नियमशास्त्र असे म्हणते की, दोन साक्षीदार एकाच गोष्टीविषयी साक्ष देतात तेव्हा ते काय म्हणतात, ते तुम्हांला स्वीकारावेच लागते. 18 स्वतःविषयी बोलणाऱ्या दोघा साक्षीदारांपैकी मी एक साक्षीदार आहे. आणि ज्या पित्याने मला पाठविले, तो दुसरा साक्षीदार आहे.”

19 लोकांनी येशूला विचारले, “तुमचा पिता कोठे आहे?”

येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला अगर माझ्या पित्याला ओळखत नाही. जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.” 20 येशू मांदिरात शिक्षण देत असता या गोष्टी बोलला. ज्या पेटीत लोक पैसे टाकीत त्या पेटीजवळच तो होता. परंतु येशूला कोणी अटक केली (पकडले) नाही. कारण त्याची वेळ अजून आलेली नव्हती.

यहूदी लोकांना येशूविषयी समजत नाही

21 येशू पुन्हा लोकांना म्हणाला, “मी लवकरच तुम्हांला सोडून जाईन. तुम्ही माझा शोध कराल, परंतु तुम्ही आपल्या पापात मराल. मी जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”

22 म्हणून यहूदी लोक एकमेकांस विचारु लागले. “येशू स्वतःला ठार करणार नाही ना? यासाठी तो असे म्हणाला का, ‘की मी जाणार आहे, तिकडे तुम्ही येऊ शकणार नाही’?”

23 पण येशू म्हणाला, “तुम्ही लोक येथील खालचे आहात, पण मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहा; परंतु मी या जगाचा नाही. 24 तुम्ही आपल्या पापात मराल असे मी म्हणालो, होय. ‘मी आहे’ [b] यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, तर तुम्ही पापात मराल.”

25 यहूदी लोकांनी विचारले. “मग तुम्ही कोण आहात?”

येशूने उत्तर दिले, “मी सुरुवातीपासून तुम्हांला सांगत आलो तोच मी आहे. 26 तुमच्याविषयी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी माझ्याकडे आहेत. मी तुमचा न्याय करु शकतो. परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडून ऐकलेल्या गोष्टीच मी लोकांना सांगतो. आणि तो सत्य सांगतो.”

27 येशू कोणाविषयी बोलत आहे, हे लोकांना समजेना. येशू त्यांना पित्याविषयी सांगत होता. 28 म्हणून येशू लोकांना म्हणाला. “तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल (वधस्तंभावर ठार माराल). मग तो मी आहे हे समजू शकाल. मी ज्या गोष्टी करतो त्या माझ्या स्वतःच्या अधिकारात करीत नाही, हे तुम्हांला समजेल. तुम्हांला समजेल की, ज्या गोष्टी मला पित्याने शिकविल्या त्याच गोष्टीविषयी मी बोलतो. 29 ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याला ज्यामुळे संतोष होतो तेच मी नेहमी करतो. म्हणून त्याने मला एकटे सोडले नाही.” 30 येशू या गोष्टी बोलत असता अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

पापापासून सुटका याविषयी येशू बोलतो

31 ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्या यहूदी लोकांना तो म्हणाला, “तुम्ही जर नेहमी माझ्या शिकवणुकीचे पालन कराल, तरच तुम्ही माझे खरे शिष्य आहात. 32 मग सत्य काय आहे हे तुम्हांला समजेल. आणि सत्य तुम्हांला मोकळे करील.”

33 यहूदी लोकांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे लोक आहोत आणि आम्ही कधीच गुलाम नव्हतो तर आम्ही मोकळे होऊ असे तुम्ही का म्हणता?”

34 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो, जो प्रत्येक पाप करतो तो गुलाम आहे. पाप त्याचा मालक आहे. 35 गुलाम कुटुंबात कायमचा राहत नाही. परंतु पुत्र कायमचा आपल्या कुटुंबात राहतो. 36 म्हणून जर पुत्र तुमजी सुटका करतो, तर तुम्ही खरोखरच मोकळे व्हाल. 37 तुम्ही अब्राहामाचे लोक आहात हे मला माहीत आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारावयास टपलेले आहात. कारण तुम्हांला माझे शिक्षण स्वीकारायला नको आहे. 38 माझ्या पित्याने जे काही मला दाखवून दिले, तेच मी तुम्हांला सांगत आहे. परंतु तुमच्या पित्याने तुम्हांला सांगितले तेच तुम्ही करता.”

39 यहूदी लोकांनी उत्तर दिले. “आमचा पिता अब्राहाम आहे.”

येशू म्हणाला, “तुम्ही जर खरोखरच अब्राहामाची संतति असता तर अब्राहामाने केल्या त्याच गोष्टी तुम्ही केल्या असत्या. 40 देवाकडून जे सत्य ऐकले ते तुम्हांला सांगणारा मी एक मनुष्य आहे. परंतु तुम्ही मला जिवे मारायला पाहता. अब्राहामाने तसे केले नाही. 41 पण अब्राहामाने जे केले नाही ते तुम्ही करता याचा अर्थ तुम्ही त्याची मुले नाहीत तर तुमचा पिता अब्राहाम नसून कोणी वेगळा आहे.”

परंतु यहूदी म्हणाले, “ज्या मुलांना आपला पिता कोण आहे ते माहीत नाही त्यांच्यासारखे आम्ही नाही! देव आमचा पिता आहे. तोच एक आमचा पिता आहे.”

42 येशू त्या यहूदी लोकांना म्हणाला, “जर देव खरोखरच तुमचा पिता असता, तर तुम्ही माझ्यावर प्रीति केली असती. मी पित्याकडून आलो आणि आता मी येथे आहे. मी माझ्या स्वतःच्या अधिकारात आलो नाही. देवानेच मला पाठविले. 43 मी म्हणतो, मी देत असलेली शिकवण तुम्हांला समजत नाही का? कारण की तुम्हांला माझी शिकवण स्वीकारता येत नाही. 44 तुमचा पिता सैतान आहे. तुम्ही त्याचे आहात, त्याला करायला पाहिजे तेच तुम्ही करता. सैतान सुरुवातीपासूनच खुनी आहे. सैतान सत्याच्या विरूद्ध आहे. आणि सैतानाच्या ठायी सत्य नाही. तो सांगतो त्या लबाड्याप्रमाणेच तो आहे. सैतान लबाड आहे. आणि तो असत्याचा पिता आहे.

45 “मी सत्य बोलतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही. 46 मी एखाद्या पापाविषयी दोषी आहे असे तुमच्यातील कोणी सिद्ध करु शकेल काय? जर मी सत्य सांगतो तर तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवीत नाही? 47 जो देवाचा आहे, तो देवाचे म्हणणे ऐकतो. परंतु तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत नाही. कारण तुम्ही देवाचे लोक नाहीत.”

स्वतःविषयी व अब्राहामाविषयी येशू बोलतो

48 यहूदी म्हणाले, “तुम्ही शोमरोनी आहात, तुम्हांला भूताने पछाडले आहे, असे आम्ही म्हणालो तर आम्ही म्हणतो तेच बरोबर नाही काय?”

49 येशूने उत्तर दिले. “मला भूत लागले नाही, मी तर आपल्या पित्याचा मान राखतो. परंतु तुम्ही माझा मान राखीत नाही. 50 स्वतःला सन्मान मिळविण्याचा प्रयत्न मी करीत नाही. माझा सन्मान व्हावा असे एकाला (देवाला) वाटते. तोच न्यायाधीश आहे. 51 मी तुम्हांला खरे तेच सांगतो. जो कोणी माझ्या शिक्षणाचे पालन करतो तो कधीही मरणार नाही.”

52 यहूदी लोक म्हणाले, “तुमच्यात खरोखर भूत संचारले आहे. हे आता आम्हांला माहीत झाले. अब्राहाम आणि संदेष्टे मेले. परंतु तुम्ही म्हणता, ‘जो माझ्या शिकवणूकीचे पालन करतो तो कधीच मरणार नाही.’ 53 तुम्ही आमचा पिता अब्राहाम याच्यापेक्षाही थोर आहात असे तुम्हांला वाटते काय? अब्राहाम मेला, तसेच संदेष्टेही मेले. तुम्ही स्वतःला समजता तरी कोण?”

54 येशूने उत्तर दिले, “जर मी स्वतःच स्वतःचा सन्मान केला तर त्या सन्मानाला काहीच अर्थ नाही. माझा पिता माझा सन्मान करतो. तो आमचा देव आहे असे तुम्ही म्हणता. 55 परंतु तुम्ही खरोखर त्याला ओळखीत नाही. पण मी त्याला ओळखतो. तो सांगतो त्याचे पालन मी करतो. मी त्याला ओळखीत नाही असे जर मी म्हणालो, तर तुम्ही लबाड आहात तसा मीही लबाड ठरेन. परंतु मी त्याला नक्कीच ओळखतो. आणि तो जे काही सांगतो त्याचे पालन करतो. 56 माझ्या येण्याचा दिवस पाहण्याच्या आशेने तुमचा पिता अब्राहाम आनंदित झाला होता. त्याने तो दिवास पाहिला आणि त्याला आनंद झाला.”

57 यहूदी लोक येशूला म्हणाले. “तुम्ही अब्राहामाला कधीच पाहिले नाही. तुम्ही पन्नास वर्षांचेही नाही!”

58 येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो: अब्राहामाच्या जन्मापूर्वि पासून मी आहे.” 59 जेव्हा येशू असे बोलला तेव्हा लोकांनी त्याला मारण्यासाठी दगड उचलले. पण येशू गुप्त झाला आणि नंतर मंदिरात निघून गेला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center