M’Cheyne Bible Reading Plan
19 यहूदाचा राजा यहोशाफाट यरुशलेममध्ये आपल्या घरी सुखरुप परतला. 2 हनानीचा मुलगा येहू हा द्रष्टा होता. तो यहोशाफाटला सामोरा गेला. येहू यहोशाफाटला म्हणाला, “दुष्टांच्या मदतीला तू का गेलास? परमेश्वराचा द्वेष करणाऱ्यांबद्दल तुला आपुलकी का वाटावी? म्हणूनच परमेश्वराचा तुझ्यावर कोप झाला आहे. 3 पण तू काही चांगल्या गोष्टीही केल्या आहेस. या देशातून तू अशेराचे खांब हटवलेस आणि परमेश्वराला अनुसरायचे तू मनःपूर्वक ठरवले आहेस.”
यहोशाफाट न्यायाधीशांची नेमणूक करतो
4 यहोशाफाट यरुशलेममध्ये राहात असे, त्याने पुन्हा एकदा बैर-शेब्यापासून एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत फिरुन लोकांच्या भेटी घेतल्या. त्याने लोकांना पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याकडे वळवले. 5 तसेच त्याने यहूदामध्ये आणि यहूदाच्या प्रत्येक तटबंदीच्या नगरांत न्यायाधीश नेमले. 6 यहोशाफाटने या न्यायाधीशांना सांगितले, “तुम्ही जे करायचे ते विचारपूर्वक करा. कारण लोकांसाठी नव्हे तर परमेश्वरासाठी तुम्ही न्याय करत आहात. तुमच्या निर्णयाला त्याची साथ असेल. 7 तुम्ही सर्वांनी परमेश्वराचे भय बाळगावे. तुम्ही जे काही कराल ते सांभाळून काळजीपूर्वक करा कारण आपला परमेश्वर देव न्यायी आहे. लोकांच्या बाबतीत तो पक्षपाती नाही. आणि लाच घेऊन न्याय फिरवणे हे ही त्याच्या नीतीत बसत नाही.”
8 यानंतर यहोशाफाटाने यरुशलेममध्ये काही परमेश्वराचे लेवी, याजक तसेच इस्राएल घराण्यांतील वडिलधारी मंडळी यांना न्यायाधीश म्हणून नेमले. परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन त्यांनी यरुशलेममधल्या रहिवाश्यांच्या वादांचा निकाल लावायचा होता. 9 यहोशाफाटने त्यांना आज्ञापूर्वक सांगितले की, “परमेश्वराचे भय धरुन विश्वसनीय रितीने आणि मनःपूर्वक ही सेवा करा. 10 वध, कायदा, नियम, आज्ञा, किंवा एखादा न्याय यासंबंधी तुमच्याकडे वाद येतील. हे वाद नगरात राहणाऱ्या तुमच्या बांधवांकडूनच उपस्थित केले जातील. अशा सर्व बाबतीत प्रत्येक वेळी लोकांना सांगा की त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप करु नये. हे तुम्ही निष्ठेने पार पाडले नाहीत तर तुमच्यावर आणि या तुमच्या भाऊबंदांवर परमेश्वराचा कोप ओढवेल. एवढे करा म्हणजे तुमच्या मनात अपराधभाव राहणार नाही.
11 “अमऱ्या हा मुख्य याजक आहे. परमेश्वराच्या बाबतीतल्या सर्व गोष्टींमध्ये त्याचे वर्चस्व राहील आणि इश्माएलचा मुलगा जबद्या, राजाच्या बाबतीतल्या सर्व गोष्टीविषयी मुखत्यार म्हणून नेमलेला आहे. जबद्या हा यहूदा वंशाचा अधिकारी आहे. लेवी हे लेखनिक कारभारी म्हणून तुमच्या दिमतीला आहेत. जे जे कराल ते धैर्याने करा. उचित तेच करणाऱ्यांना परमेश्वराची साथ असो.”
यहोशाफाटवर युध्दाचा प्रसंग
20 यानंतर मवाबी, अम्मोनी आणि काही मऊनीलोक युध्दाच्या हेतूने यहोशाफाटवर चालून आले. 2 काही लोकांनी येऊन यहोशाफाटला खबर दिली की, “मृतसमुद्राच्या पलीकडून अराम देशाकडून मोठी सेना तुमच्यावर चाल करुन येत आहे. ती हससोन-तामार!” (म्हणजेच एन-गेदी येथे येऊन ठेपली सुध्दा.) 3 यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वराला काय करावे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली. 4 तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले. 5 यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नवीन अंगणासमोर होता. यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांमध्ये तो उभा राहिला. 6 तो म्हणाला,
“आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रांमधल्या सर्व राज्यांचा तूच शास्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही. 7 तूच आमचा परमेश्वर आहेस या प्रदेशातील रहिवाश्यांना तू हाकलून लावलेस. तुझ्या या इस्राएलांदेखतच तू हे केलेस. तुझा मित्र अब्राहाम याच्या वंशजांना तू ही भूमी कायमची बहाल केलीस. 8 अब्राहामाचे वंशज या प्रदेशात राहिले आणि तुझ्या नावाखातर त्यांनी मंदिर बांधले. 9 ते म्हणाले, ‘तलवार, शासन, रोगराई किंवा दुष्काळ यांच्यारुपाने आमच्यावर अरिष्ट कोसळले असता आम्ही या मंदिरासमोर, आणि तुझ्यापुढे उभे राहू. या मंदिराला तुझे नाव दिले आहे. संकटाच्या वेळी आम्ही तुझा मोठ्याने धावा करु. आमची हाक ऐकून तू आम्हाला सोडव.’
10 “पण यावेळी अम्मोन, मवाब आणि सेइर पर्वत या भागातले हे लोक आहेत. इस्राएल लोक मिसरहून आले तेव्हा इस्राएल लोकांना तू त्यांच्या प्रदेशात प्रवेश करु दिला नाहीस. त्यामुळे इस्राएल लोकांनी तिकडे पाठ फिरवली आणि त्यांचे उच्चाटन केले नाही. 11 पण तेव्हाच त्यांचा नायनाट न केल्याचे हे काय फळ मिळाले पाहा, ते आम्हाला आमच्या प्रदेशातून हुसकावून लावायला निघाले आहेत. हा प्रदेश तू आम्हाला बहाल केला आहेस. 12 देवा, या लोकांना चांगले शासन कर. आमच्यावर चाल करुन येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हाला काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आम्ही मदतीसाठी तुझ्याकडे आलो आहोत.”
13 यहूदातील सर्व मंडळी आपल्या बायका आणि तान्ह्या मुलांसकट सर्व मुलाबाळांना घेऊन परमेश्वरासमोर उभी होती. 14 तेव्हा यहजीएल याच्यात परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. यहजीएल हा जखऱ्याचा मुलगा. जखऱ्या बनायाचा मुलगा. बनाया यईएलचा मुलगा. आणि यईएल मत्तन्याचा मुलगा. यहजीएल लेवी असून आसाफच्या वंशातला होता. या सभेत 15 यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरुशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. ‘एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे. 16 उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल. 17 तुम्हाला या लढाईत लढावे असे लागणारच नाही. आपल्या जागी ठाम उभे राहा. परमेश्वराने तुमचे रक्षण केलेले तुम्हाला आढळून येईल. यहूदा आणि यरुशलेम लोक हो, भिऊ नका, चिंता करु नका. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तेव्हा उद्या त्यांच्यावर चालून जा.’”
18 यहोशाफाटने मस्तक भूमीपर्यंत लववले. यहूदा आणि यरुशलेममधील सर्व लोक यांनी परमेश्वरापुढे दंडवत घातले. त्या सर्वांनी परमेश्वराची आराधना केली. 19 कहाथ आणि कोरह या घराण्यांतील लेवी इस्राएलच्या परमेश्वर देवाची भजने म्हणण्यास उभे राहिले. उच्च स्वरात त्यांनी परमेश्वराची भजने म्हटली.
20 यहोशाफाटचे सैन्य भल्यासकाळी तकोवाच्या वाळवंटात गेले. ते निघत असताना यहोशाफाट समोर उभा राहून त्यांना म्हणाला, “यहूदा आणि यरुशलेम नगरांमधील लोकहो, ऐका. आपल्या परमेश्वर देवावर श्रध्दा ठेवा आणि खंबीरपणे उभे राहा. परमेश्वराच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा. जय तुमचाच आहे.”
21 यहोशाफाटने लोकांना प्रोत्साहन दिले व सुचना दिल्या.परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यांनी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले,
“परमेश्वराचे स्तवन करा
कारण त्याची प्रीति सर्वकाळ आहे.”
22 लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने चाल करुन आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेइर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली. 23 अम्मोनी आणि मवाबी लोक सेइर पर्वतातल्या लोकांशी लढू लागले. अम्मोन्यांनी आणि मवाब्यांनी त्यांचा पुरता संहार केला. सेइरातल्या लोकांचा बीमोड केल्यानंतर त्यांनी एकमेकांचा नाश केला.
24 यहूदा लोक वाळवंटातील टेहळणीच्या बुरुजापाशी आले. शत्रूचे विशाल सैन्य कुठे दिसते का हे ते पाहू लागले पण त्यांना फक्त जमिनीवर विखुरलेले मृतदेह तेवढे दिसले. कोणीही जिवंत राहिला नव्हता. 25 यहोशाफाट आणि त्याचे सैन्य लुटीसाठी मृतदेहांपाशी आले. त्यात त्यांना खूप गुरेढोरे, धन, कपडेलत्ता आणि मौल्यवान वस्तू मिळाल्या. त्या त्यांनी स्वतःला घेतल्या. लूट एवढी होती की ती यहोशाफाट आणि त्याचे लोक यांना नेता येईना. ती प्रेतांमधून काढून न्यायला त्यांना तीन दिवस लागले. 26 चौथ्या दिवशी यहोशाफाट आणि त्याचे सैन्य बराखच्या खोऱ्यात जमले. याठिकाणी त्यांनी परमेश्वराला, धन्यवाद दिले. म्हणून आजही या खोऱ्याचे नाव “आशीर्वादाचे खोरे” असे आहे.
27 मग यहोशाफाटने समस्त यहूदा आणि यरुशलेम लोकांना यरुशलेम येथे माघारे नेले. परमेश्वराने त्यांच्या शत्रूंचा पाडाव केल्यामुळे त्यांच्यात आनंदीआनंद पसरला होता. 28 यरुशलेमला येऊन ते सतारी, वीणा व कर्णे घेऊन परमेश्वराच्या मंदिरात गेले.
29 परमेश्वराने इस्राएलच्या शत्रु सैन्याशी लढा दिला हे ऐकून सर्व देशांमधल्या सर्व राज्यांमध्ये परमेश्वराविषयी धाक निर्माण झाला. 30 त्यामुळे यहोशाफाटच्या राज्यात शांतता नांदली. देवाने यहोशाफाटला सर्व बाजूंनी स्वास्थ्य दिले.
यहोशाफाटच्या कारकीर्दीचा अस्त
31 यहोशाफाटने यहूदा देशावर राज्य केले.तो राज्यावर आला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर पंचवीस वर्षे राज्य केले. यहोशाफाटच्या आईचे नाव अजूबा ही शिल्हीची मुलगी. 32 आपले वडिल आसा यांच्याप्रमाणेच यहोशाफाट योग्य मार्गाने वागला.त्याने तो मार्ग सोडला नाही. परमेश्वराच्या दृष्टीने भले तेच यहोशाफाटने केले. 33 पण उच्चस्थाने काढण्यात आली नव्हती. लोकांनीही आपले मन आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे वळवले नव्हते.
34 हनानीचा पुत्र येहू याच्या बखरीमध्ये यहोशाफाटच्या बाकीच्या कृत्यांची साद्यंत नोंद आहे. इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथातही या गोष्टींचा समावेश करुन त्यांची नोंद केली आहे.
35 इस्राएलचा राजा अहज्या याच्याशी पुढे यहूदाचा राजा यहोशाफाट याने करार केला. यहोशाफाट ने हे वाईट केले. 36 तार्शीश नगराला जायच्या गलबतांबद्दल हा करार होता. एसयोन-गेबर येथे त्यांनी या गलबतांची बांधणी केली. 37 पुढे अलियेजर ने यहोशाफाट विरुध्द भविष्य सांगितले. मारेशा नगरातला दोदावाहू याचा अलियेजर हा मुलगा. तो म्हणाला, “यहोशाफाट, तू अहज्याशी हातमिळवणी केलीस म्हणून परमेश्वर तुझ्या कामांचा विध्वंस करील.” आणि जहाजे फुटली. त्यामुळे यहोशाफाट आणि अहज्या यांना ती तार्शीशला पाठवता आली नाहीत.
सातवा शिक्का
8 कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला. तेव्हा स्वर्गात अर्धा तासपर्यंत सर्वत्र शांतता होती. 2 आणि मी सात देवदूतांना देवासमोर उभे असलेले पाहिले. त्यांना सात कर्णे दिले होते.
3 दुसरा देवदूत आला आणि वेदीजवळ उभा राहिला. या देवदूताकडे सोनेरी धूप ठेवण्याचे भांडे होते, त्यांच्याकडे धूप प्रार्थनेसह अर्पण करण्यासाठी दिले होते. ह्या प्रार्थना देवाच्या पवित्र पवित्र लोकांच्या होत्या. देवदूताने त्याचे अर्पण सिंहासनासमोर सोनेरी वेदीवर ठेवले. 4 धुपाचा धूर देवदूताच्या हातातून देवाच्या सिंहासनासमोर गेला. धूर देवाच्या लोकांच्या प्रार्थनेसह गेला. 5 मग देवदूताने धुपाटणे घेऊन, वेदीवरील अग्नीने ते भरले व ते पृथ्वीवर टाकले तेव्हा विजा चमकू लागल्या. मेघांचा गडगडाट व इतर आवाज झाले. आणि भूकंप झाला.
सात देवदूत त्यांचे कर्णे वाजवितात
6 मग सात देवदूत त्यांचे कर्णे वाजविण्यास तयार झाले.
7 पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला आणि रक्तमिश्रित गारा व अग्नि पृथ्वीवर टाकण्यात आले. तेव्हा पृथ्वीचा एक तृतीयांश भाग आणि एक तृतीयांश झाडे व सर्व हिरवे गवत जळून गेले.
8 दुसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा अग्नीने जळत असलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. आणि एक तृतीयांश समुद्राचे रक्त झाले. 9 आणि एक तृतीयांश समुद्रातील जीव मेले. आणि एक तृतीयांश जहाजे नष्ट झाली.
10 तिसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला तेव्हा एक मोठा तारा मशालीप्रमाणे पेटलेला आकाशातून पडला. तो तारा नद्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला आणि झऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला. 11 त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि एक तृतीयांश पाणी कडू झाले. ते कडू असलेले पाणी पिऊन पुष्कळ लोक मेले.
12 चौथ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा सूर्याच्या एक तृतीयांश भागावर आघात झाला. चंद्राच्या एक तृतीयांश भागावर व ताऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर आघात झाला. त्यामुळे त्याचा एक तृतीयांश भाग काळा झाला. दिवसाचा एक तृतीयांश काळा भाग झाला. रात्रीचा एक तृतीयांश भाग काळा झाला.
13 मी पाहत असताना, आकाशात उंचावर मी गरुडाला उडताना पाहिले. गरुड मोठ्या आवाजात म्हणाला, “संकट! संकट! संकट, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर संकट येत आहे. हे संकट तीन देवदूतांनी कर्णा वाजविल्यावर येईल.”
दिवठाण आणि जैतुनाची दोन झाडे
4 मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला व त्याने मला जागे केले. झोपेतून जागा होणाऱ्या माणसाप्रमाणे मला वाटले. 2 मग देवदूताने मला विचारले, “तुला काय दिसते आहे?”
मी म्हणालो, “मला भरीव सोन्याचे दिवठाण दिसत आहे. त्यावर सात दिव [a] आहेत. दिवठाणाच्या डोक्यावर एक वाटी आहे. त्या वाटीतून सात नळ्या काढल्या आहेत. प्रत्येक नळी एकेका दिव्याला जोडली आहे. वाटीतील तेल नळीतून प्रत्येक दिव्याला पोहोचते. 3 वाटीच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस प्रत्येकी एकेक जैतूनाचे झाड आहे.” 4 माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “महाराज, या गोष्टींचा अर्थ काय?”
5 तो देवदूत मला म्हणाला, “तुला या गोष्टींचा अर्थ माहीत नाही?”
“नाही महाराज!” मी म्हणालो
6 मग त्याने मला सांगितले “हा जरुब्बाबेलला परमेश्वराचा संदेश आहे. तो असा: ‘तुझ्या बलाने अथवा शक्तीने नव्हे तर माझ्या आत्म्याद्वारे तुला मदत मिळेल.’ सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. 7 तो उंच पर्वत जरुब्बाबेलला सपाट प्रदेश वाटेल. तो मंदिर उभारेल. मंदिराचा सर्वांत महत्वाचा दगड बसविल्यावर लोक ‘सुंदर! सुंदर!’” असा जल्लोश करतील.
8 परमेश्वराच्या संदेशाने मला आणखी सांगितले, 9 “जरुब्बाबेल माझ्या मंदिराचा पाया घालेल. तो जेव्हा मंदिर बांधून पूर्ण करील तेव्हा तुम्हाला समजेल की सर्व शक्तिमान परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठविले आहे. 10 लोकांना लहानशा आरंभाची लाज वाटणार नाही. आणि जेव्हा जरुब्बाबेल ओळंबा घेऊन पूर्ण बांधून झालेल्या मंदिराची मोजमापे घ्याला लागेल व तपासून पाहील, तेव्हा त्यांना खरोखरीच आनंद वाटेल. तू पाहिलेल्या दगडाच्या सात बाजू म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत. ते पृथ्वीवरील सर्व काही पाहतात.”
11 मग मी (जखऱ्या) त्याला म्हणालो, “मी दिवठाणाच्या उजव्या व डाव्या बाजूस एकेक जैतुनाचे झाड बघितले. त्या जैतुनाच्या दोन झाडांचा अर्थ काय?” 12 मी त्याला असेही म्हणालो की मला जैतूनाच्या दोन शाखांना सोन्याच्या नळ्या जोडलेल्या दिसल्या. त्यातून सोनेरी तेल वाहात होते. ह्याचा अर्थ काय?
13 तेव्हा देवदूताने मला विचारले, “तुला ह्या गोष्टींबद्दल माहीती नाही?”
मी म्हणालो, “नाही, महाराज!”
14 तेव्हा देवदूत म्हणाला, “परमेश्वराची सेवा करण्यासाठी सर्व जगातून निवडलेल्या दोन माणसांची [b] ती प्रतीके आहेत.”
येशू आणि त्याचे भाऊ
7 यानंतर येशू गालील प्रांतात फिरला. येशूला यहूदीया प्रांतातूल प्रवास करायला नको होता, कारण तेथील काही यहूदी लोकांना येशूला जिवे मारायचे होते. 2 यहूदी लोकांचा मंडपाचा सण [a] जवळ आला होता. 3 म्हणून येशूचे भाऊ त्याला म्हणाले, “तू येथून सणासाठी यहूदीयात जा. म्हणजे तू करतोस ते चमत्कार तेथे तुझे शिष्य पाहू शकतील. 4 लोकांना माहिती व्हावी असे एखाद्याला वाटत असेल तर त्याने तो करतो ती कामे लपवू नयेत. तू जगाला प्रगट हो. तू जे चमत्कार करतोस ते त्यांना पाहू दे.” 5 येशूच्या भावांनीसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
6 येशू आपल्या भावांना म्हणाला. “माझी योग्य वेळ अजून आलेली नाही. पण तुम्ही जाण्यासाठी मात्र कोणतीही वेळ योग्य असेल. 7 जग तुमचा द्वेष करु शकत नाही. परंतु जग माझा द्वेष करते. कारण जगातील लोक वाईट कामे करतात हे मी त्यांना सांगतो. 8 तेव्हा तुम्ही सणासाठी जा. मी आत्ताच सणाला येणार नाही. माझी योग्य वेळ अजून आली नाही.” 9 हे सांगितल्यानंतर येशू गालीलातच राहिला.
10 म्हणून येशूचे भाऊ सणासाठी तेथून निघून गेले. ते गेल्यावर मग येशूही गेला. परंतु येशूने हे लोकांना उघडपणे दाखविले नाही. 11 सणाच्या काळात यहूदी लोक येशूचा शोध करीत होते. यहूदी म्हणाले, “तो मनुष्य कोठे आहे?”
12 लोकांचा मोठा जमाव त्या ठिकाणी जमा झालेला होता. त्यांतील अनेक लोक येशूविषयी आपसांत बोलत होते. काही म्हणाले, “तो चांगला मनुष्य आहे.” परंतु दुसरे काहीजण म्हणाले, “नाही, तो लोकांना ठकवितो.” 13 परंतु लोकांपैकी कोणीच येशूविषयी उघडपणे बोलायला धजत नव्हते. लोकांना यहूदी पुढाऱ्यांची भीति वाटत होती.
येशू यरुशलेमात शिक्षण देतो
14 अर्धाअधिक सण पार पडला होता तेव्हा येशू मंदिरात गेला आणि तेथे लोकांना शिक्षण देण्यास त्याने सुरुवात केली. 15 यहूदी लोकांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, “हा माणूस शाळेत कधी शिकला नाही. हे एकढे तो कोठून शिकला?”
16 येशूने उत्तर दिले, “मी ज्या गोष्टी शिकवितो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत. माझी शिकवण मला पाठविणाऱ्या पित्याकडून आलेली आहे. 17 जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो त्याला माझी शिकवण देवाकडून आहे हे कळेल. त्याला हे कळेल की, माझी शिकवण माझी स्वतःची नाही. 18 जो कोणी स्वतःच्या कल्पना शिकवितो, तो स्वतःला मानसन्मान मिळावा असा प्रयत्न करतो, परंतु ज्याने मला पाठविले त्याचा सन्मान करण्याचा जो प्रयत्न करतो तोच माणूस सत्य सांगतो. त्याचे काहीच खोटे नसते. 19 मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले. खरे ना? परंतु तुमच्यातील कोणी नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही का बरे मला जिवे मारायला पाहता?”
20 लोकांनी उत्तर दिले, “तुम्हांला भूत लागले आहे. आम्ही काही तुम्हांला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत नाही.”
21 येशू त्यांना म्हणाला, “मी एक चमत्कार केला आणि तुम्ही सारे चकित झालात. 22 मोशेने तुम्हांला सुंतेचा नियम दिला. परंतु खरे पाहता सुंता मोशेपासून आलेली नाही. ती मोशेच्या आधीच आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. म्हणून कधी कधी शब्बाथ दिवशीही तुम्ही मुलांची सुंता करता. 23 याचा अर्थ मोशेच्या नियमांचे पालन करण्यासाठी शब्बाथ दिवशीही बालकाची सुंता करता येते. मग मी शब्बाथ दिवशी एका माणसाचे संपूर्ण शरीर बरे केले तर तुम्ही माझ्यावर का रागावता? 24 वरवर पाहून न्याय करु नका. तर खरोखर काय बरोबर आहे याची कसून शहानिशा करुन योग्य प्रकारे न्याय करा.”
येशू हाच ख्रिस्त आहे काय? लोकांना पडलेला प्रश्न
25 मग यरुशलेमात राहणारे काही लोक म्हणाले, “याच माणसाला लोक जिवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत. 26 परंतु सर्व लोक आपल्याला पाहू आणि ऐकू शकतील अशा ठिकाणी हा शिक्षण देत आहे. आणि शिक्षण देताना त्याला थांबविण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. कदाचित हा खरोखरच ख्रिस्त आहे असे पुढारी लोकांनी ठरविले असेल. 27 परंतु हा माणूस कोठून आला आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि खरोखरचा ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठून येईल हे कोणालाच कळणार नाही.”
28 अजूनही येशू मंदिरात शिक्षण देत होता. येशू म्हणाला, “होय, तुम्ही मला ओळखता आणि मी कोठला हेही तुम्हांला माहीत आहे. परंतु मी स्वतःच्या अधिकाराने आलो नाही. जो खरा देव आहे त्याने मला पाठविले. तुम्ही त्याला ओळखीत नाही. 29 पण मी त्याला ओळखतो. मी त्याच्याकडून आलो आणि त्यानेच मला पाठविले.”
30 येशू हे बोलला तेव्हा लोकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याला धरु शकला नाही, कारण त्याला मारले जाण्याची वेळ अजून आली नव्हती. 31 परंतु लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूवर विश्वास ठेवला. लोक म्हणाले, “आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत. ख्रिस्त आला तर या मनुष्याने केले त्याहून जास्त चमत्कार तो करुन दाखवील काय? नाही! म्हणून हाच ख्रिस्त असला पाहिजे.”
यहुदी लोक येशूला अटक करण्याचा प्रयत्न करतात
32 लोक येशूविषयी जे बोलत होते ते परुश्यांनी ऐकले. म्हणून मुख्य याजक आणि परुशी यांनी येशूला अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले. 33 मग येशू म्हणाला, “मी तुम्हा लोकांबरोबर आणखी थोडा काळ राहीन. नंतर ज्याने मला पाठविले, त्याच्याकडे मी परत जाईन. 34 तुम्ही माझा शोध कराल पण मी तुम्हांला सापडणार नाही.”
35 यहूदी आपापसात म्हणाले, “हा माणूस असा कोठे जाणार आहे की जेथे आपण त्याला शोधू शकणार नाही? ग्रीक शहरात राहणाऱ्या यहूदी लोकांकडे हा जाईल काय? तो तेथील ग्रीक लोकांना शिक्षण देईल काय? 36 हा माणूस म्हणतो, ‘तुम्ही माझा शोध कराल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही.’ तो असेही म्हणतो, ‘जेथे मी आहे तेथे तुम्ही येऊ शकत नाही.’ याचा अर्थ काय?”
येशू पवित्र आत्याविषयी सांगतो
37 सणाचा शेवटचा दिवस आला. तो फार महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी उभे राहून येशू मोठ्याने म्हणाला, “ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38 जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवील तर त्याच्या अंतःकरणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” असे पवित्र शास्त्र सांगते. 39 येशू आत्म्याविषयी बोलत होता. लोकांना अजून पवित्र आत्मा देण्यात आला नव्हता. कारण येशू अजून मरण पावला नव्हता आणि गौरवात उठविला गेला नव्हता. परंतु नंतर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तो मिळणार होता.
लोक येशूविषयी वाद करतात
40 येशूने सांगितलेल्या या गोष्टी लोकांनी ऐकल्या. काही लोक म्हणाले, “हा माणूस खरोखरच संदेष्टा आहे.”
41 दुसरे म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.”
तर दुसरे काहीजण म्हणाले, “ख्रिस्त हा गालील प्रांतातून येणार नाही.” 42 पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “ख्रिस्त दावीद राजाच्या घराण्यातून येईल.” 43 आणि पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “दावीद राजा राहत असे त्या बेथलहेम गावातून ख्रिस्त येईल.” तेव्हा येशूमुळे लोकांचे एकमत होईना. 44 काहींना येशूला अटक करायचे होते पण तसा प्रयत्न कोणीच केला नाही.
यहूदी पुढारी येशूवर विश्वास ठेवण्यास नकार देतात
45 मंदिराचे शिपाई मुख्य याजकांकडे आणि परुश्यांकडे परत गेले. मुख्य याजकांनी व परुश्यांनी शिपायांना विचारले, “तुम्ही येशूला का आणले नाही?”
46 मंदिराचे शिपाई म्हणाले, “तो बोलतो त्या गोष्टी कोणत्याही मानवी शब्दांपेक्षा महान आहेत!”
47 मग परुशी म्हणाले, “म्हणजे येशूने तुम्हांलासुद्धा मूर्ख बनविले! 48 पुढाऱ्यांपैकी एकाने तरी येशूवर विश्वास ठेवला का? नाही! आम्हा परुश्यांपैकी एकाने तरी त्याच्यावर विश्वास ठेवला का? नाही! 49 परंतु बाहेरच्या लोकांना नियसशास्त्राची माहिती नाही, त्यांच्यावर देवाचा कोप होईल!”
50 परंतु त्या घोळक्यात निकदेम हजर होता. यापूर्वी हा निकदेमच येशूला भेटायला आला होता [b] निकदेम म्हणाला, 51 “एखाद्या माणसाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याला आपल्या नियसशास्त्राप्रमाणे दोषी ठरवता येत नाही. त्याने काय केले हे कळल्याशिवाय आपण त्याचा न्याय करु शकत नाही.”
52 यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तू सुद्धा गालील प्रांतामधील आहेस काय? पवित्र शास्त्र वाचून पाहा! गालीलातून एकही संदेष्टा येणार नाही. हे तुला कळेल.”
व्यभिचार करताना पकडलेली स्त्री
53 नंतर ते सर्व यहूदी पुढारी आपापल्या घरी गेले.
2006 by World Bible Translation Center