Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 17

यहूदाचा राजा यहोशाफाट

17 आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा मुलगा. इस्राएलला तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटने यहूदाचे बळ वाढवले. त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या. आसाने काबीज केलेल्या एफ्राइमच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने ठाणी बसवली.

यहोशाफाटला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. तो बाल देवतेच्या भजनी लागला नाही. आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या. इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही. परमेश्वराने यहोशाफाटला यहूदाचा खंबीर राजा केले. यहूदा लोकांनी यहोशाफाटसाठी नजराणे आणले त्यामुळे त्याला धन तसेच मानसन्मान मिळाला. परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्च स्थाने आणि अशेरा देवीचे खांब त्याने काढून टाकले.

आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून लोकांना शिकवण द्यायला पाठवले. बेन-हईक, ओबद्या, जखऱ्या, नखनेल आणि मीखाया हे ते सरदार होत. त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असायेल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवींचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले. हे सरदार, लेवी आणि याजक या सर्वांनी लोकांना शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातल्या गावोगावी जाऊन ते लोकांना शिकवत गेले.

10 यहूदाच्या आसपासच्या देशांनी परमेश्वराची धास्ती घेतली होती. त्यामुळे त्यांनी यहोशाफाटवर स्वारी करुन युध्दाला तोंड फोडले नाही. 11 काही पलिष्टे यहोशाफाटसाठी भेटी आणत. या राजाचे वर्चस्व ते जाणून असल्यामुळे रुपेही आणत. काही अरबी शेळ्या-मेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे 7,700 मेंढे आणि 7,700 बोकड त्याला दिले.

12 यहोशाफाटचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारे बांधली. 13 या कोठारांच्या गावांमध्ये त्याने भरपूर साठा केला. यरुशलेममध्ये यहोशाफाटने चांगली लढाऊ माणसेही ठेवली. 14 आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे:

यहूदातील सरदार असे:

अदना हा 3,00,000 सैनिकांचा सेनापती होता.

15 यहोहानानच्या हाताखाली 2,80,000 सैनिक होते.

16 जिख्रीचा मुलगा अमस्या हा त्या खालोखाल 2,00,000 जणांचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.

17 बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे:

एल्यादाच्या अखत्यारीत 2,00,000 सैनिक धनुष्यबाण आणि ढाली वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता.

18 यहोजाबादकडे युध्दसज्ज असे 1,80,000 जण होते.

19 ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. या खेरीज यहूदाभरच्या नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.

प्रकटीकरण 6

The Lamb Opens the Scroll

मग मी पाहिले की, कोकऱ्याने सात शिक्क्यांपैकी एक उघडला. मी त्या चार जिवंत प्राण्यांपैकी एकाला ढगाच्या गडगडाटासारखे बोलताना ऐकले. तो म्हणाला, “ये!” मी पाहिले आणि तेथे माझ्यासमोर पांढरा घोडा होता. घोडेस्वाराने धनुष्य धरले होते. त्याला मुगुट देण्यात आला होता. तो निघाला, शत्रूचा पराभव करीत निघाला, तो विजय मिळविण्यासाठी निघाला.

जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा मी दुसऱ्या प्राण्याला बोलताना ऐकले. तो म्हणाला, “ये!” मी पाहिले तेव्हा लाल रंग असलेला दुसरा घोडा निघाला. घोडेस्वाराला पृथ्वीवरुन शांति काढून घेण्याचा अधिकार दिला होता. म्हणजे लोकांनी आपापसांत एकमेकाला ठार करावे. त्याला मोठी तरवार देण्यात आली होती.

जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तेव्हा मी तिसऱ्या जिवंत प्राण्याला बोलताना ऐकले, “ये!” मी पाहिले तेव्हा माझ्यासमोर काळा घोडा होता व घोडेस्वाराच्या हातात तराजू होते असे मला दिसले मग मी जणू काय चारही जिवंत प्राणी बोलल्यासारखा आवाज ऐकला. ते म्हणत होते, “एक किलो गहू एका दिवसाच्या मजुरीइतके, आणि तीन किलो बार्ली एका दिवसाच्या मजुरीइतकी, मात्र तेल व द्राक्षारस वाया घालवू नका.”

जेव्हा त्याने चौथा शिक्का उघडला, तेव्हा मी चौथ्या जिवंत प्राण्याचा आवाज ऐकला. तो म्हणाला, “ये आणि पाहा!” मी पाहिले तेव्हा माझ्यासमोर फिक्या रंगाचा घोडा मला दिसला. त्यावरच्या घोडेस्वाराचे नाव मृत्यु होते. आणि त्याच्या मागोमाग अधोलोक चालला होता. आणि त्यांना पृथ्वीच्या चौथ्या भागावर (पृथ्वीच्या पाव भागावर) लोकांना तरवारीने मारण्याचा, दुष्काळाने आणि पटकीने मारण्याचा व पृथ्वीवरील जंगली हिस्र प्राण्यांकडून मारण्याचा अधिकार दिला होता.

जेव्हा त्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी काही आत्मे वेदीखाली पाहिले. त्यांना देवाच्या वचनासाठी आणि त्यांनी राखलेल्या साक्षीमुळे ठार मारण्यात आले होते. 10 ते मोठ्या आवाजात म्हणाले, “पवित्र आणि सत्य प्रभु, कोठपर्यंत तू पृथ्वीवरील लोकांचा न्याय करणार नाहीस आणि आम्हाला ठार मारल्याबद्दल त्यांना शिक्षा करणार नाहीस?” 11 त्या प्रत्येक आत्म्याला मग एक एक पांढरा शुभ्र झगा देण्यात आला. आणि त्यांना सांगण्यात आले की, त्यांचे काही बांधव ख्रिस्ताच्या सेवेत आहेत व यांना जसे मारण्यात आले, तसे त्यांनाही मारण्यात येईल व ते पूर्ण होइपर्यंत त्यांनी थोडा वेळ थांबावे.

12 मग कोकऱ्याला सहावा शिक्का उघडताना मी पाहिले. तेव्हा मोठा भूकंप झाला, सूर्य मेंढीच्या केसांपासून बनविलेल्या काळ्या कापडासारखा झाला, पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला. 13 ज्याप्रमणे अंजिराचे झाड वारा आला म्हणजे अंजिरे खाली पाडते तसे आकाशातून तारे पृथ्वीवर पडले. 14 जसे गुंडाळी गुंडाळतात तसे, आकाश गुंडाळले गेले, आणि प्रत्येक पर्वत व बेट त्याच्या स्थानावरुन हलविले गेले.

15 मग सर्व लोक गुहेत, पर्वतांच्या, खडकांच्या मागे लपले. त्यामध्ये जगातील राजे, सत्ताधीश, सेनापती, श्रीमंत लोक आणि सामर्थ्यशाली लोक होते. प्रत्येक व्यक्ति, गुलाम किंवा स्वतंत्र लपून बसली. 16 लोक पर्वतांना आणि खडकांना म्हणाले, “आमच्यावर पडा. जो सिंहासनावर बसला आहे त्याच्या चेहऱ्यासमोरुन आम्हांला लपवा. कोकऱ्याच्या रागापासून आम्हाला लपवा. 17 कारण त्याच्या रागाचा मोठा दिवस आला आहे. त्यासमोर कोणीच टिकाव धरु शकत नाही!”

जखऱ्या 2

यरुशलेमची मोजणी

मग मी नजर वर वळविली, तेव्हा मला मोजमापाची दोरी घेतलेला एक माणूस दिसला. मी त्याला विचारले, “तू कोठे चाललास?”

तो मला म्हणाला, “मी यरुशलेमची मोजणी करायाला चाललोय मला यरुशलेमची लांबी-रुंदी पाहायची आहे.”

मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत निघून गेला. आणि दुसरा देवदूत त्याच्याशी बोलायला गेला. दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हमाला, “धावत जा, आणि त्या तरुणाला सांग की यरुशलेम मोजमाप करण्यापलीकडे होईल. त्याला पुढील गोष्टी सांग

‘यरुशलेम ही तटबंदी नसलेली नगरी असेल.
    कारण तेथे खूप माणसांचे व प्राण्यांचे वास्तव्य असेल.’
परमेश्वर म्हणतो,
‘मी तिचे रक्षण करणारा अग्नीची भिंत बनेन.
    तिला वैभव प्राप्त व्हावे म्हणून मी स्वतः तेथे राहीन.’”

आपल्या लोकांना देवाचे पाचारण

देव म्हणतो,
“त्वरा करा! उत्तरे तील प्रदेशातून पळून जा.
    होय! मी तुमच्या लोकांना प्रत्येक दिशेला पांगविले हे सत्य आहे.
तुम्ही सियोनवासी बाबेलचे कैदी आहात.
    पण आता निसटा! त्या नगरातून दूर पळा!”
सर्वशक्तिमान परमेश्वर माझ्याविषयी असे म्हणाला,
    “की त्याने तुमची लूट करणाऱ्या मला पाठवले.
    तुम्हाला मान मिळावा म्हणून त्याने मला पाठवले.
का? कारण जर त्यांनी तुला दुखविले तर ते (कृत्य) देवाच्या डोळ्यातील बुबुळाला इजा करण्यासारखेच आहे.
बाबेलच्या लोकांनी माझ्या लोकांना कैदी म्हणून पकडून नेले.
    आणि त्यांना गुलाम बनवले.
पण मी त्यांचा पराभव करीन आणि ते माझ्या लोकांचे गुलाम होतील.”
    तेव्हा तुम्हाला पटेल की सर्वशक्तिमान परमेश्वराने मला पाठविले आहे.

10 परमेश्वर म्हणतो,
“सियोने, खूष हो!
    का? कारण मी येत आहे व मी तुझ्या नगरीत राहीन.
11 त्या वेळी पुष्कळ राष्ट्रांमधील लोक
    माझ्याकडे येतील.
ती माझी माणसे होतील.
    मी तुझ्या नगरीत राहीन.”
मग मला सर्व शक्तिमान परमेश्वराने पाठविले
    असल्याचे तुला समजेल.

12 स्वतःची खास नगरी म्हणून परमेश्वर यरुशलेमची फेरनिवड करील
    यहूदा म्हणजे परमेश्वराच्या पवित्र भूमीचा वाटा असेल.
13 सर्वजण शांत राहा!
    आपल्या पवित्र निवासातून परमेश्वर येत आहे.

योहान 5

तळ्याकाठच्या रोग्याला येशू बरे करतो

नंतर एका यहुदी सणासाठी येशू यरुशलेमला गेला. यरुशलेमात एक तळे आहे. त्या तळ्याला लागून पाच पडव्या आहेत. (होत्या) यहूदिभाषेत। [a] त्या तळ्याला बेथेझाथा [b] म्हणत. हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे. तव्व्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी पडून असत. त्यात काही आंधळे, लंगडे व काही पांगळे होते. [c] कारण की देवदूत वेळोवेळी तव्व्यात उतरुन पाणी हालवीत असे आणि पाणी हालविल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला एक रोगी पडून होता. येशूने त्याला तेथे पडलेला पाहिले, तो मनुष्य तेथे बराच काळ पडून असावा हे येशूने ओळखले. म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले. “तुला बरे व्हावयाला पाहिजे का?”

त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले, “महाराज, पाणी हालते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ कोणीच व्यक्ति नाही. सर्वांत अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की, माझ्या अगोदर दुसराच रोगी पाण्यात उतरतो.”

मग येशू म्हणाला, “उठून उभा राहा! आपली खाट उचल आणि चालू लाग.” तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला, तो आपली खाट उचलून चालू लागला.

हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाथाचा दिवस होता. 10 म्हणून बऱ्या झालेल्या त्या मनुष्याला यहुदी म्हणाले, “आज शब्बाथाचा दिवस आहे. शब्बाथाच्या दिवशी तू आपली खाट उचलून नेणे आपल्या नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”

11 परंतु तो मनुष्य म्हणाला, “ज्याने मला बरे केले, त्यानेच मला सांगितले की, तू आपली खाट उचल आणि चालू लाग.”

12 यहुदी लोकांनी त्या मनुष्याला विचारले. “तुला आपली खाट उचलून चालायला कोणी सांगितले?”

13 परंतु तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या माणसाला माहीत नव्हते त्या ठिकाणी बरेच लोक होते, आणि येशू तेथून निघून गेला होता.

14 त्यानंतर तो मनुष्य येशूला मंदिरात भेटला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, आता तू बरा झाला आहेस. पण पाप करण्याचे सोडून दे. नाही तर तुझे अधिक वाईट होईल!”

15 नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या यहूदी लोकांकडे परत गेला. त्याने त्यांना सांगितले की, ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे.

16 येशू शब्बाथ दिवशी या गोष्टी करीत होता म्हणून यहूदी लोक येशूशी दुष्टपणे वागू लागले. 17 परंतु येशू यहूदी लाकांना म्हणाला, “माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करतो”.

18 यावरुन यहूदी लोकांचा येशूला जिवे मारण्याचा पक्का निश्चय झाला. ते म्हणाले, “पहिली गोष्ट ही की, येशू शब्बाथासंबंधीचा नियम मोडतो. दुसरे, ‘देव माझा पिता आहे!’ असे तो म्हणाला. तो स्वतःची देवाशी बरोबरी करतो”.

येशूला देवाचा अधिकार आहे

19 परंतु येशूने उत्तर दिले, “मी तुम्हांला खरे सांगतो. पुत्र जरी सर्व करु शकत असला, तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करु शकत नाही. पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करतो. 20 पिता पुत्रावर प्रीति करतो आणि ज्या गोष्टी पिता करतो त्या सर्व तो पुत्राला दाखवितो. हा मनुष्य बरा झाला, परंतु यापेक्षाही मोठमोठ्या गोष्टी करण्याचे पिता पुत्राला दाखवील. तेव्हा तुम्ही सर्व जण चकित व्हाल. 21 पिता लोकांना मेलेल्यांतून उठवितो आणि जीवन देतो. तसेच पुत्रही त्याला, ज्यांना द्यायला पाहिजे, त्यांना जीवन देतो.

22 “याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही. परंतु न्याय करण्याचा सर्व अधिकार पित्याने पुत्राला दिलेला आहे. 23 देवाने हे अशासाठी केले की, लोक जसा पित्याचा सन्मान करतात, तसा त्यांनी पुत्राचाही करावा. जर कोणी पुत्राचा मान राखीत नाही, तर तो पित्याचाही मान राखीत नाही. पित्यानेच पुत्राला पाठविले आहे.

24 “मी तुम्हांला खरे तेच सांगतो: जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकालचे जीवन मिळेल. त्याला दोषी ठरविले जाणार नाही. तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे. 25 मी तुम्हांला खरे सांगतो. अशी महत्वाची वेळ येत आहे. ती वेळ जवळजवळ आलेलीच आहे. जे लोक पापामध्ये मृत आहेत ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि देवाच्या पुत्राकडून ऐकलेल्या गोष्टी जे लोक स्वीकारतील त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. 26 खुद्द पित्यापासून (देवापासून) जीवनाचा लाभ होतो. म्हणून पित्याने पुत्रालाही जीवन देण्याची देणगी दिली आहे. 27 आणि पुत्राने सर्व लोकांचा न्यायनिवाडा करावा असा अधिकार पित्याने पुत्राला दिला आहे. कारण तो पुत्र मनुष्याचाही पुत्र आहे.

28 “तुम्ही याचे आश्चर्य मानू नका. अशी वेळ येत आहे की, सर्व लोक जे मेलेले आहेत व आपल्या कबरेत आहेत ते त्याची वाणी ऐकतील. 29 मग ते आपल्या कबरेतून बाहेर येतील. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली, ते उठतील आणि त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. परंतु ज्या लोकांनी वाइट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील.

30 “मी एकटा काहीच करु शकत नाही. मला सांगितल्याप्रमाणेच मी न्याय करतो, म्हणून माझा न्याय योग्य आहे. कारण मी स्वतःच्या समाधानासाठी नाही; परंतु ज्याने मला पाठविले त्याच्या समाधानासाठी न्याय करतो.”

येशू यहूदी लोकांशी बोलणे चालू ठेवतो

31 “जर मी स्वतःच माझ्याविषयी लोकांना सांगितले तर लोक त्या गोष्टी मानणार नाहीत. 32 परंतु लोकांना याविषयी सांगणारा दुसरा एक जण आहे. आणि तो माझ्याविषयी ज्या गोष्टी सांगतो त्या खऱ्या आहेत, हे मला माहीत आहे.”

33 “तुम्ही योहानाकडे काही लोकांना पाठविले आणि सत्याविषयी त्याने तुम्हांला सांगितलेच आहे. 34 माझ्याविषयी लोकांना सांगण्यास मला कोणाही माणसाची गरज नाही. परंतु तुमचे तारण व्हावे म्हणून मी या गोष्टी तुम्हांला सांगतो. 35 पेटलेला दिवा प्रकाश देतो, तसाच योहान होता आणि तुम्हांला त्याच्या प्रकाशाकडून काही काळ आनंद मिळाला.

36 “परंतु मजजवळ माझ्याविषयी योहानापेक्षाही मोठा पुरावा आहे. जी कामे मी करतो तीच माझा पुरावा आहेत. या गोष्टी माझ्या पित्याने मला करण्यासाठी दिलेल्या आहेत. त्या गोष्टींवरुन हे सिद्ध होते की, पित्याने मला पाठविले आहे. 37 आणि ज्या पित्याने मला पाठविले त्याने स्वतःही माझ्याविषयी साक्ष दिलेली आहे. परंतु तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही, तो कसा दिसतो हे तुम्ही कधी पाहिले नाही. 38 पित्याची शिकवण तुमच्यामध्ये राहात नाही. कारण पित्याने ज्या एकाला तुमच्याकडे पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, 39 तुम्ही शास्त्राचा काळजीपूर्वक अभ्यास करता. त्या शास्त्राच्या द्वारे आपल्याला अनंतकाळचे जीवन मिळते, असे तुम्हांला वाटते, तेच शास्त्र माझ्याविषयी सांगते! 40 तरी तुम्ही अनंतकालचे जीवन मिळण्यासाठी मजकडे येण्यास नकार देता.”

41 “मला माणसांकडून स्तुति नको. 42 पण मी तुम्हांला ओळखतो- तुम्हांमध्ये देवाविषयी प्रीति नाही हे मला माहीत आहे. 43 मी माझ्या पित्यापासून आलो आहे- मी त्याच्यावतीने बोलतो. परंतु तरीही तुम्ही मला स्वीकारीत नाही. पण जर दुसरा कोणी मनुष्य फक्त स्वतःविषयी सांगत आला, तर मात्र तुम्ही त्याचे मानाल. 44 तुम्हांला एकमेकांकडून स्तुति करवून घ्यायला आवडते. परंतु एकाच देवाकडून होणारी स्तुति मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही कधी करीत नाही, मग तुम्ही माझ्यावर कसा काय विश्वास ठेवाल? 45 मी पित्यासमोर उभा राहून तुम्हांला दोषी ठरवीन असे समजू नका. तुमजे चुकते असे मोशेच तुम्हांला म्हणतो, आणि मोशे आपले तारण करील अशी तुम्हांला आशा आहे. 46 जर तुम्ही खरोखरच मोशेवर विश्वास ठेवला आहे, तर तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवाल. कारण खुद्द मोशेनेच माझ्याविषयी लिहिले आहे. 47 परंतु मोशेने जे लिहिले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवीत नाही, तर मी सांगतो त्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू शकणारच नाही.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center