Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 16

आसाची अखेरची वर्षे

16 आसाच्या राज्याच्या छत्तिसाव्या वर्षी बाशाने यहूदावर स्वारी केली. बाशा हा इस्राएलचा राजा. रामा हे नगर निवडून त्याने त्याची मजबुती केली. यहूदाचा राजा आसा याच्याकडे कोणालाही येण्याजाण्याला प्रतिबंध व्हावा हा त्याचा त्यामागचा हेतू होता. तेव्हा आसाने परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजमहालातील सोने आणि चांदी काढून घेतली. अरामचा राजा बेन-हदाद दिमिष्काला राहात होता. आसाने त्याच्याकडे सोने, आणि चांदी पाठवून त्याला निरोप पाठवला, “आपण आपसात एक करार करु. आपल्या दोघांच्या वडिलांमध्येही तसा करार केलेला होता. मी माझ्याकडचे सोने-रुपे तुझ्याकडे पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याबरोबरचा तुझा करार मोड म्हणजे तो माझ्याकडे पाठ फिरवेल आणि मला त्रस्त करणार नाही.”

बने-हदाद या गोष्टीशी सहमत झाला. त्याने इस्राएली नगरांवर आपले सैन्याचे सरदार पाठवले. त्या सरदारांनी ईयोन, दान आबेल मईम या नगरांवर हल्ला केला. कोठारे असलेल्या नफतालीच्या नगरांवरही त्यांनी चढाई केली. या चढायांचे वृत्त बाशाच्या कानावर गेले. तेव्हा त्याने रामानगराच्या मजबुतीचे काम अर्धवट सोडून दिले. राजा आसाने मग सर्व यहूदींना बोलावले. या लोकांनी रामा नगर बांधण्यासाठी वापरलेले दगड, लाकूड ही सामग्री हस्तगत केली. त्यांनी ती गेबा आणि मिस्पा या नगरांच्या बांधकामासाठी वापरली.

यावेळी हनानी नावाचा संदेष्टा यहूदाचा राजा आसा याच्याकडे आला व त्याला म्हणाला, “आसा तू मदतीसाठी तुझ्या परमेश्वर देवावर भरवंसा न ठेवता अरामच्या राजावर अवलंबून राहिलास. तू परमेश्वराचे साहाय्य घ्यायला हवे होतेस. पण तू परमेश्वराचा धावा केला नाहीस म्हणून अरामचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे. कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते. पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला. अखिल पृथ्वीवर कोणाची आपल्यावर श्रध्दा आहे याचा शोध परमेश्वराची नजर सतत घेत असते व अशांना तो आपले पाठबळ देतो. पण आसा, तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.”

10 हनानीच्या या बोलण्याचा आसाला राग आला व क्रोधाच्या भरात त्याने हनानीला तुरुंगात डांबले. कधी कधी आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागे.

11 यहूदा आणि इस्राएल राजांचा इतिहास या पुस्तकात आसाच्या कारभाराचे साद्यंत वर्णन आहे. 12 आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी तो पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करुन घेतला. 13 आपल्या कारकीर्दीच्या 41 व्या वर्षी तो वारला व आपल्या पूर्वजांबरोबर त्याने चिरविश्रांती घेतली. 14 दावीदनगरात त्याने आधीच स्वतःसाठी करुन घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्याला ठेवले. त्याच्या सन्मानार्थ सुगंधी द्रव्ये जाळली. [a]

प्रकटीकरण 5

गुंडाळी उघडण्यास कोण पात्र आहे?

मग मी, जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते. आणि ती गुंडाळी सात शिक्के मारुन बंद केली होती. आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण पात्र आहे.?” परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ते शिक्के तोडण्यास आणि त्यामध्ये पाहण्यास समर्थ नव्हता. मी खूप रडलो कारण ती गुंडाळी उघडून आतमध्ये काय आहे हे पाहण्याच्या योग्यतेचे कोणीही नव्हते. पण वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.”

मग मी एक कोकरा पाहिला. सिंहासनाच्या मध्यभागी उभा असलेला व त्याच्या भोवती चार जिवंत प्राणी असलेले मी पाहिले. व वडीलही त्याच्याभोवती होते. कोकरा बांधल्यासारखा दिसत होता. त्याला सात शिंगे आणि सात डोळे होते. आणि हे जणू देवाचे सात आत्मे असून ते सर्व जगभर पाठविले होते. कोकरा आला आणि त्याने जो, सिंहासनावर बसला होता, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. आणि जेव्हा त्याने ती घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले. प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक उदाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. या वाट्या म्हणजे देवाच्या लोकांच्या प्रार्थना होत्या. आणि त्यांनी नवे गाणे गाईले:

“तू गुंडाळी घेण्यास
    आणि तिचे शिक्के उघडण्यास समर्थ आहेस,
कारण तुला वधण्यात आले
    आणि तू आपल्या रक्ताने मनुष्यांना
    प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून, आणि राष्टांतून विकत घेतले.
10 तू त्यांना राज्य आणि पृथ्वीवर आपल्या देवासाठी याजक बनविले
    आणि नंतर ते पृथ्वीवर सत्ता गाजवितील.”

11 मग मी पाहिले सिंहासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्या सभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती. 12 देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले,

“जो वधलेला कोकरा होता तो सामर्थ्य,
    संपत्ति, शहाणपण आणि शक्ति,
सन्मान, गौरव
    आणि स्तुतीस पात्र आहे!”

13 प्रत्येक निर्माण केलेली वस्तु आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्यांना मी असे गाताना ऐकले की,

“जो सिंहासनावर बसतो त्याला
    व कोकऱ्याला स्तुति, सन्मान, गौरव
    आणि सामर्थ्य अनंतकाळपर्यंत असो!”

14 चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्याला अभिवादन केले.

जखऱ्या 1

आपल्या लोकांनी परत यावे ही परमेश्वराची इच्छा

बरेख्या मुलगा जखऱ्या ह्याला परमेश्वराचा संदेश मिळाला. पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीला एक वर्ष आणि आठ महिने झाले, तेव्हाची ही गोष्टी. (जखऱ्या बरेख्याचा मुलगा व बरेख्या प्रेषित इद्दोचा मुलगा होय.) हा संदेश पुढीलप्रमाणे होता:

परमेश्वर तुमच्या पूर्वजांवर फार रागावला होता. म्हणून तू पुढील गोष्टी लोकांना सांगितल्या पाहिजेस. परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझ्याकडे या आणि मी तुमच्याकडे येईन.” सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

परमेश्वर म्हणाला, “तुमच्या पूर्वजांप्रमाणे वागू नका. तुमच्या पूर्वजांनी आपली वाईट वर्तणूक बदलावी, वाईट गोष्टी करण्याचे टाळावे, ही सर्व शक्तिमान परमेश्वराची इच्छा असल्याचे, त्या काळच्या संदेष्ट्यांनी त्यांना समजावून सांगितले. होते. पण त्यांनी माझे ऐकले नाही.” परमेश्वराने ह्या गोष्टीची आठवण करुन दिली.

परमेश्वर म्हणाला, “तुमचे पूर्वज कालवश झाले आणि ते संदेष्टेसुध्दा चिरकाल जगले नाहीत. ते संदेष्टे माझे सेवक होते. त्यांच्यामार्फत मी तुमच्या पूर्वजांना माझे नियम आणि शिकवणूक कळवीत असे. शेवटी तुमच्या पूर्वजांना धडा मिळाला. ते म्हणाले, ‘सर्व शक्तिमान परमेश्वराने बोलल्याप्रमाणे केले. आमच्या दुराचाराबद्दल व दुष्कृत्यांबद्दल आम्हाला शिक्षा केली.’ आणि ते देवाला शरण आले.”

चार घोडे

पारसचा राजा दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या महिन्याच्या म्हणजे शेवटच्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्याला परमेश्वराचा आणखी एक संदेश मिळाला. (जखऱ्या हा बरेख्याचा मुलगा. बरेख्या संदेष्टा इद्दोचा मुलगा.) संदेश असा होता:

रात्री, तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक माणूस मी पाहिला. तो दरीमध्ये हादस्सीमच्या झुडुपांत उभा होता. त्याच्या मागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते. मी विचारले, “महाराज, हे घोडे इकडे कशाकरिता?”

तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत म्हणाला, “हे घोडे इकडे कशाकरिता आलेत हे मी तुला दाखवीन.”

10 मग हादस्सीमच्या झुडुपांत उभा असलेला माणूस म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे घोडे पाठविलेत.”

11 नंतर ते घोडे हादस्सीमच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दूताशील बोलले. ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो. सर्वत्र स्थैर्य व शांतता आहे.”

12 मग परमेश्वराच्या दूताने विचारले, “परमेश्वरा, यरुशलेमची आणि यहूदाच्या नगरीचे तू समाधान करण्यापूर्वी त्यांची दु:खातून मुक्तता होण्यास आणखी किती वेळ आहे? गेली सत्तर वर्षे तू या नगरींवर कोपला आहेस.”

13 माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या दूताला मग परमेश्वराने उत्तर दिले. परमेश्वर चांगल्या व सांत्वनपर शब्दांत बोलला. 14 मग परमेश्वराच्या दूताने मला पुढील गोष्ट लोकांना कळविण्यास सांगितल्या: सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो:

“मला यरुशलेम व सियोन यांच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते.
15     आणि जी राष्ट्रे स्वतःला सुरक्षित समजतात, त्यांच्याबद्दल मला अतिशय राग आहे.
मी थोडासा रागावलो
    आणि माज्या लोकांना शिक्षा करण्यासाठी मी त्या राष्ट्रांचा उपयोग केला.
पण त्या राष्ट्रांनी प्रचंड नुकसान केले.”
16 म्हणून परमेश्वर म्हणतो, “मी यरुशलोमला परत येईन आणि दया करुन तिचे दु:ख हलके करीन.”
    सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमची पुन्हा उभारणी केली जाईल
    आणि तिथे माझे निवासस्थान बांधले जाईल.”

17 देवदूत म्हणाला, “लोकांना हेही सांग की, सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
    ‘माझ्या नगरी पुन्हा संपन्न होतील.
मी सियोनचे सांत्वन करीन.
    माझी खास नगरी म्हणून मी यरुशलेमची निवड करीन.’”

चार शिंगे व चार कामगार

18 मग मी वर बघितले असता मला चार शिंगे दिसली. 19 माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी त्या शिंगांचा अर्थ विचारला.

तो म्हणाला, “इस्राएल, यहूदा व यरुशलेम येथील लोकांना देशोधडीला लावण्यास ह्याच शिंगांनी भाग पाडले.”

20 मग परमेश्वराने मला चार कामगार दाखविले. 21 मी देवाला विचारले, “ते चार कामगार कशासाठी येत आहेत?”

तो म्हणाला, “ते शिगांना घाबरवण्यासाठी आणि त्यांना दूर भिरकावून देण्यासाठी आले आहेत. त्या शिंगांनी यहूदाच्या लोकांना बळजबरीने देशोधडीला लावले. त्या शिंगांनी कोणालाही दया दाखवीली नाही. ती म्हणजे यहूदाच्या लोकांवर हल्ला करुन त्यांना परागंदा करणाऱ्या राष्ट्रांची प्रतीके आहेत.”

योहान 4

येशू शोमरोनी स्त्रीशी बोलतो

परुश्यांनी हे ऐकले की, येशू योहानापेक्षा अधिक लोकांना बाप्तिस्मा देऊन शिष्य करुन घेत आहे. (परंतु खरे पहता, येशू स्वतः बाप्तिस्मा देत नसे, तर त्याचे शिष्य त्याच्या वतीने लोकांना बाप्तिस्मा देत असत.) परुश्यांनी आपणांविषयी ऐकले आहे हे येशूला समजले. म्हणून येशू यहूदीयातून निघून परत गालील प्रांतात गेला. गालीलाकडे जाताना येशूला शोमरोन प्रांतातून जावे लागले.

शोमरोनातील सूखार नावाच्या गावात येशू आला. याकोबाने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ हे गाव आहे. याकोबाची विहीर तेथे होती. लांबच्या प्रवासामुळे येशू थकला होता. म्हणून येशू विहीरीजवळ बसला. ती दुपारची वेळ होती. तेंव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनी [a] स्त्री त्या विहीरीवर आली. येशू तिला म्हणाला. “मला प्यावयास पाणी दे.” हे घडले तेव्हा येशूचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी गावात गेले होते.

ती शोमरोनी स्त्री म्हणाली, “तुम्ही यहूदी आहात आणि मी तर एक शोमरोनी स्त्री आहे. तुम्ही माझ्या हातून पाणी प्यावयास मागता याचे मला मोठे आश्चर्य वाटते.” (यहूदी लोकांचे शोमरोनी लोकांशी सलोख्याचे संबंध नव्हते. [b] )

10 येशूने उत्तर दिले, “देव काय दान देतो याविषयी तुला माहीत नाही आणि तुझ्या हातून पाणी मागणारा कोण हे देखील तुला माहीत नाही. तुला जर या गोष्टी माहीत असत्या तर तूच माझ्याकडे मागितले असतेस. आणि मी तुला जिवंत पाणी दिले असते.”

11 ती म्हणाली, “महाराज, जिवंत पाणी तुम्हांला कोठून मिळणार? विहीर तर फार खोल आहे. आणि पाणी काढण्यासाठी तुमच्याजवळ पोहरा वगैरे काही नाही. 12 आमचा पिता (पूर्वज) याकोब याच्यापेक्षाही तुम्ही मोठे आहात काय? याकोबानेच ही विहीर आम्हांला दिली. ते स्वतः या विहीरीचे पाणी पीत असत, शिवाय त्यांची मुले व गुरेढोरे याच विहीरीचे पाणी पीत असत.”

13 येशू म्हणाला, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. 14 परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.”

15 ती स्त्री येशूला म्हणाली, महाराज, “ते पाणी मला द्या, म्हणजे मला पुन्हा तहान लागणार नाही. आणि पाणी आणण्यासाठी मला इकडे परत यावे लागणार नाही.”

16 येशूने तिला सांगितले. “जा, तुझ्या पतीला घेऊन इकडे ये!”

17 ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.”

येशू तिला म्हणाला, “हे तू बरोबर सांगितलेस की, तुला नवरा नाही. 18 खरे तर तुझे पाच पती झाले, आणि आता तू ज्याच्याबरोबर राहतेस तो तुझा पती नाही. तेव्हा तू मला सत्यच सांगितलेस.”

19 ती स्त्री म्हणाली, “महाराज, मला आता कळले की, तुम्ही एक संदेष्टा आहात. 20 आमचे वाडवडील या डोंगरावर उपासना करीत. परंतु तुम्ही यहूदी लोक म्हणता की, यरुशलेम हीच ती जागा आहे जेथे लोकांनी उपासना केली पाहीजे.”

21 येशू म्हणाला, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव! अशी वेळ येत आहे की, आपल्या पित्याची (देवाची) उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही. 22 जे तुम्हांला समजत नाही त्याची तुम्ही शोमरोनी उपासना करता. आम्ही यहूदी लोक कशाची उपासना करतो हे आम्हांला चांगले कळते, कारण यहूदी लोकांकडूनच तारण येते. 23 असा काळ येत आहे की, खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपालना करतील. तशी वेळ आता आलेली आहे. आणि तशाच प्रकारचे उपासक पित्याला पाहिजेत. 24 देव आत्मा आहे. म्हणून त्याच्या उपासकांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना केली पाहिजे.”

25 ती स्त्री म्हणाली, “मशीहा येणार आहे हे मला माहीत आहे. मशीहा येईल तेव्हा तो आम्हांला प्रत्थेक गोष्ट समाजावून सांगेल.”

26 येशू म्हणाला, “ती व्यक्ति तुझ्याशी आता बोलत आहे. मीच तो मशीहा आहे.”

27 तेवढ्यात येशूचे शिष्य गावातून परत आले. येशू एका बाईशी बोलत आहे हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु “तुम्हांला काय पाहिजे?” अगर “तुम्ही तिच्याशी का बोलत आहात?” असे त्यांच्यापैकी एकानेही विचारले नाही.

28 मग ती स्त्री आपली पाण्याची घागर तशीच विहिरीवर सोडून परत गावात गेली. तिने गावांतील लोकांना सांगितले, 29 “एका मनुष्याने मी आतापर्यंत जे काही केलेले आहे ते सर्व सांगितले. त्याला भेटायला चला. कदाचित तो ख्रिस्त असेल.” 30 मग लोक गावातून बाहेर पडले आणि येशूला भेटायला आले.

31 ती स्त्री गावात होती तेव्हा येशूचे शिष्य त्याला विनवणी करु लागले, “गुरुजी, दोन घास खाऊन घ्या!”

32 परंतु येशूने उत्तर दिले. “माझ्याजवळ खावयाला जे अन्न आहे त्याविषयी तुम्हांला काहीच माहिती नाही.”

33 म्हणून शिष्य एकमेकांना विचारु लागले, “येशूला कोणीतरी अगोदरच काही खावयास आणून दिले काय?”

34 येशू म्हणाला, “ज्याने मला पाठवीले त्याच्या ईच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न! त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय. 35 जेव्हा तुम्ही पेरणी करता तेव्हा तुम्ही नेहमी म्हणता, ‘पीक गोळा करायला अजून चार महिने आहेत.’ परंतु मी तुम्हांला सांगतो, तुम्ही तुमचे डोळे उघडा. लोकांकडे पाहा. पीक तयार असलेल्या शेतांसारखेच ते आहेत. 36 आताही पीक कापणाऱ्या मजुराला मजुरी दिली जात आहे, तो अनंतकाळासाठी पीक गोळा करीत आहे. म्हणून आता पेरणी करणारा कापणी करणारासह आनंदी आहे. 37 ‘एक पेरणी करतो तर दुसरा कापणी’ असे जे आपण म्हणतो ते किती खरे आहे. 38 ज्या पीकासाठी तुम्ही मेहनत केली नाही, त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हांस पाठविले. दुसऱ्या लोकांनी काम केले आणि त्यांनी केलेल्या श्रमाचा फायदा तुम्हांस मिळतो.”

39 त्या गावातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. त्या स्त्रीने येशूविषयी जे सांगितले त्यावरुन त्यांनी विश्वास ठेवला. तिने त्यांना सांगितले होते, “मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली.” 40 शोमरोनी लोक येशूकडे आले. त्यांनी येशूला त्यांच्याबरोबर राहण्याची विनंती केली. म्हणून येशू तेथे दोने दिवास राहिला. 41 आणखी पुष्कळ लोकांनी येशूच्या शिक्षणामुळे विश्वास ठेवला.

42 ते लोक त्या स्त्रीला म्हणाले, “पहिल्यांदा तू जे आम्हांला सांगितलेस त्यामुळे आम्ही येशूवर विश्वास ठेवला. परंतु आता आम्ही स्वतःच त्याचे बोलणे ऐकले त्यामुळे विश्वास ठेवतो. आता आम्हांला कळले की, खरोखर हाच मनुष्य जगाचे तारण करील.”

येशू अधिकाऱ्याच्या मुलाला बरे करतो(A)

43 दोन दिवसांनी येशू तेथून निघाला आणि गालील प्रांतात गेला. 44 (पुर्वीच येशू म्हणाला होता की, संदेष्ट्याला त्याच्या देशात मान मिळत नाही.) 45 येशू जेव्हा गालीलात आला तेव्हा तेथील लोकांनी त्याचे स्वागत केले. वल्हांडण सणाच्या दिवसात यरुशलेम येथे येशूने केलेली सर्व कामे लोकांनी पाहिली होती. कारण ते लोकही सणानिमित तेथे गेले होते.

46 येशू पुन्हा गालीलातील काना गावाला भेट देण्यास गेला. काना गावीच येशूने पाण्याचे द्राक्षारसात रुपांतर केले होते. तेथे राजाचे जे मुख्य आधिकारी होते त्यापैकी एक आधिकारी कफर्णहूम नगरात राहत होता, या माणसाचा मुलगा आजारी होता. 47 येशू यहूदीयातून आला आहे आणि आता तो गालीलातच आहे हे त्या अधिकाऱ्याने ऐकले. म्हणून तो मनुष्य येशूकडे काना गावी गेला. येशूने कफर्णहूम तेथे येऊन आपल्या मुलाला बरे करावे म्हणून त्याने याचना केली. कारण त्याचा मुलगा जवळजवळ मेला होता. 48 येशू त्याला म्हणाला, “चमत्कार आणि अदभुत कामे पाहिली तरच तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवाल.”

49 राजाचा अधिकारी म्हणाला, “महाराज, माझा लहान मुलगा मरण्यापूर्व माझ्या घरी चला.”

50 येशूने उत्तर दिले, “जा, तुझा मुलगा वाचेल.”

येशूने सांगितले त्यावर विश्वास ठेवून तो मनुष्य घरी गेला. 51 तो घरी चाललेला असताना वाटेतच त्याचे नोकर त्या माणसाला भेटले. त्यांनी त्याला सांगितले, “तुमचा मुलगा बरा आहे.”

52 त्या मनुष्याने विचारले, “माझ्या मुलाला कधीपासून बरे वाटू लागले?”

नोकर म्हणाले, “काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप उतरला.”

53 “तुझा मुलगा वाचेल” असे एक वाजण्याच्या सुमारासच येशूने सांगितले होते, हे त्या मुलाच्या वडिलांना माहीत होते. म्हणून त्याने व त्याच्या घरातील सर्वांनी येशूवर विश्वास ठेवला.

54 यहुदीयातून गालील प्रांतात आल्यानंतर येशूने केलेला हा दुसरा चमत्कार.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center