M’Cheyne Bible Reading Plan
शबाच्या राणीची शलमोनाशी भेट
9 शलमोनाची कीर्ती शबाच्या राणीच्या कानावर गेली. तेव्हा त्याची परीक्षा पाहायला म्हणून ती यरुशलेमला आली. तिच्याबरोबर मोठा लवाजमा होता. मसाल्याचे पदार्थ, सोनेनाणे, मौल्यवान रत्ने या गोष्टी उंटांवर लादून तिने आणल्या होत्या.शलमोनाची भेट घेऊन ती त्याच्याशी बोलली. तिला शलमोनाला बरेच प्रश्न विचारायचे होते. 2 शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला त्यातले काहीच अवघड वाटले नाही. 3 शबाच्या राणीने त्याच्या सूज्ञपणाचा प्रत्यय घेतला, त्याचा महाल पाहिला. 4 त्याच्या मेजावरील अन्नपदार्थ तिने पाहिले, त्याच्या प्रमुख कारभाऱ्यांची बैठक पाहिली. त्यांची कार्यपध्दती आणि त्यांचे पोशाख पाहिले. शलमोनाचे मद्यपरिचारक आणि त्यांचे पोशाख, परमेश्वराच्या मंदिरातील शलमोनाने केलेली होमार्पणे हे सर्व तिने पाहिले आणि या दर्शनाने ती थक्क झाली.
5 मग ती राजा शलमोनाला म्हणाली, “तुझ्या कामगिरीची आणि शहाणपणाची जी वर्णने मी माझ्या देशात ऐकली ती खरीच आहेत. 6 इथे येऊन स्वतः अनुभव घेईपर्यंत मला त्या गोष्टी खऱ्या वाटत नव्हत्या. खरे तर तुझ्या सूज्ञपणाची थोरवी निम्म्यानेही माझ्यापर्यंत पोचली नव्हती. तुझ्याबद्दल जे ऐकले त्यापेक्षाही तू महान आहेस. 7 तुझ्या बायका, तुझी माणसे आणि अधिकारी फार भाग्यवान आहेत. तुझ्या सेवेत असतानाच त्यांना तुझ्या शहाणपणाचा लाभ होतो. 8 तुझा देव परमेश्वर ह्याची स्तुति असो. तो तुझ्यावर प्रसन्न आहे आणि आपल्या वतीने त्याने तुला राजा म्हणून सिंहासनावर बसवले आहे. परमेश्वराचे इस्राएलवर प्रेम आहे आणि इस्राएल वर त्याचा कायमचा वरदरस्त आहे. जे उचित आणि न्याय्य ते करण्यासाठी त्याने तुला राजा केले आहे.”
9 शबाच्या राणीने मग राजा शलमोन याला 4 1/2 टन सोने, अनेक मसाल्याचे पदार्थ आणि किंमती रत्ने यांचा नजराणा दिला. तिने दिले तसे मसाल्याचे जिन्नस शलमोनाला कधीच कुणाकडून मिळाले नाहीत.
10 हिराम आणि शलमोन यांच्या सेवकांनी ओफिराहून सोने आणले. रक्तचंदनाचे लाकूड आणि मौल्यवान रत्नेही त्यांनी आणली. 11 परमेश्वराच्या मंदिराच्या आणि राजमहालाच्या पायऱ्या तसेच गायकांच्या वीणा व सतारी यासाठी शलमोनाने हे रक्तचंदन वापरले. रक्तचंदनाचा वापर करुन बनवलेल्या इतक्या सुंदर वस्तू यापूर्वी यहूदात कधी कोणी पाहिल्या नव्हत्या.
12 शबाच्या राणीला जे हवे ते राजा शलमोनाने देऊ केले. त्याने जे देऊ केले ते तिने आणलेल्या नजराण्यापेक्षा जास्तच होते. मग शबाची राणी आपल्या लव्याजम्यासहित आपल्या देशात परतली.
शलमोनाची अवाढव्य संपत्ती
13 शलमोनाला वर्षभरात जेवढे सोने मिळे त्याचे वजन 25 टन एवढे असे. 14 याखेरीज, फिरस्ते व्यापारी आणि विक्रेते खूप सोने आणत. अरबस्तानचे राजे आणि वेगवेगळ्या प्रदेशांचे सुभेदार सोने-चांदी आणत, ते वेगळेच.
15 सोन्याचे पत्रे ठोकून 200 मोठ्या ढाली राजा शलमोनाने केल्या. अशाप्रत्येक ढालीला 7 1/2 पौंड वजनाचा सोन्याचा पत्रा लागला. 16 याखेरीज अशा घडीव सोन्याच्या तीनशे ढाली त्याने केल्या. त्यांना प्रत्येकी 3 3/4 पौंड सोने लागले. या सोन्याच्या ढाली त्याने लबानोनच्या अरण्यमहालात ठेवल्या.
17 राजा शलमोनाने हस्तिदंताचे मोठे सिंहासन केले. ते शुध्द सोन्याने मढवले. 18 या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या आणि सोन्याचे पादासन होते. दोन्ही बाजूला हात टेकवता येतील अशी सिंहासनाला सोय होती. आणि त्याला लागून एक एक सिंहाचा पुतळा होता. 19 सहा पायऱ्यांपैकी प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूला एकेक असे एकंदर 12 सिंह होते. दुसऱ्या कोणत्याही राज्यात असे सिंहासन नव्हते.
20 राजाची सर्व पेयपात्रे सोन्याची होती. लबानोनच्या अरण्यमहालातील सर्व घरगुती वापरायच्या वस्तू शुध्द सोन्याने घडवलेल्या होत्या. शलमोनाच्या काळात चांदी फारशी मौल्यवान मानली जात नसे.
21 तार्शीश येथे जाणारी गलबते त्याच्याकडे होती. हिरामची माणसे त्याच्या गलबतांतून मालाची ने-आण करीत. सोन-रुपे, हस्तिदंत, वानरे आणि मोर यांनी भरलेली ही गलबते दर तीन वर्षानी तार्शीशहून शलमोनाकडे येत.
22 वैभव आणि ज्ञान या बाबतीत पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही राजापेक्षा शलमोन महान झाला. 23 त्याच्या सल्लामसलतीचा लाभ घ्यायला सर्व ठिकाणचे राजे शलमोनाकडे येऊ लागले. परमेश्वरानेच शलमोनाला जो सूज्ञपणा दिला होता तो पाहायाला ते येत असत. 24 हे राजे दरवर्षी येताना शलमोनासाठी नजराणे घेऊन येत. त्यात सोन्यारुप्याच्या वस्तू, कपडे, चिलखते, मसाले, घोडे आणि खेचरे ह्यांचा समावेश असे.
25 घोडे आणि रथ यांच्यासाठी शलमोनाकडे 4,000 ठाणी होती. त्याच्यापदरी 12,000 रथचालक होते. त्यांची सोय त्याने मुद्दाम वसवलेल्या नगरात आणि स्वतःला लागतील तेवढ्यांची यरुशलेममध्ये केली होती. 26 फरात नदीपासून पलिष्ट्यांच्या देश आणि मिसरची सीमा येथपर्यंतच्या सर्व राजांवर शलमोनाचा अधिकार होता. 27 राजा शलमोनाकडे चांदी ही दगडधोंडे असावे इतकी आणि गंधसरुची झाडे, डोंगराळ देशातल्या उंबराच्या झाडांइतकी विपुल होती. 28 मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.
शलमोनाचा मृत्यू
29 शलमोनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यागोष्टी केल्या त्या नाथान या संदेष्ट्याच्या इतिहासात तसेच, अहीया शिलोनी याच्या संदेशलेखात आणि इद्दो या भविष्यवाद्याच्या इद्दोची दर्शने यात नोंदवलेल्या आहेत. नबाटाचा मुलगा यराबाम याविषयीही इद्दोने लिहिलेले आहे. 30 शलमोनाने यरुशलेममधून इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले. 31 मग तो आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दावीदनगरात दफन केले. शलमोनाचा मुलगा रहबाम हा पुढे शलमोनाच्या जागी राज्य करु लागला.
1 येशू ख्रिस्ताचा सेवक आणि याकोबाचा भाऊ असलेल्या यहूदाकडून, देवाने ज्या तुम्हांला पाचारण केले आहे त्यांस, देवपिता तुमच्यावर प्रीती करतो व येशू ख्रिस्ताद्वारे तुम्ही सुरक्षित ठेवले जात आहात.
2 देवाची करुणा, शांति आणि प्रीती तुम्हांला अधिकाधिक लाभो.
जे चुका करतात त्यांना देव शिक्षा करील
3 प्रिय मित्रांनो, जरी मली तुम्हांला आपल्या समाईक तारणाविषयी लिहिण्याची आतुरतेने तयारी करीत होतो तरी एका गोष्टीविषयी मला लिहावेसे वाटते. ते म्हणजे देवाने आपल्या संतांना, एकदा दिलेला विश्वास टिकविण्यासाठी लढत राहा. 4 याचे कारण ज्यांच्याविषयी पवित्र शास्त्रात फार पूर्वीच लिहिले आहे की अशी माणसे तुमच्यात चोरुन शिरली आहेत, ते अधार्मिक लोक आहेत. अनीतीने वागण्यासाठी देवाची दया हे निमित आहे असे ते मानतात. आणि आमचा प्रभु व एकमेव धनी अशा प्रभु येशू ख्रिस्ताला ते मानत नाहीत. जी शिक्षेसाठी यापूर्वीच नेमलेली होती, अशी ही माणसे आहेत.
5 जरी तुम्हांला या गोष्टी माहीत असल्या तरी मला तुम्हांला आठवण करुन द्यावीशी वाटते की, ज्या प्रभूने आपल्या लोकांना एकदा इजिप्त देशातून सोडवून आणल्यानंतर ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे नाकारले; अशांचा त्याने नंतर नाश केला, 6 तसेच ज्या देवदूतांनी आपली सार्वभौम सत्ता टिकवली नाही, परंतु आपली रहाण्याची जागा सोडून दिली, त्यांची देखील तुम्हाला आठवण करुन द्यायला पाहिजे. देवाने त्यांना सर्वकालच्या बंधनांनी जखडून काळोखात ठेवले यासाठी की शेवटच्या महान दिवशी त्यांचा न्याय करता यावा. 7 त्याचप्रमाणे, या देवदूतांसारखीच सदोम व गमोरा आणि त्या शहराच्या आसपासच्या नगरांनी लैंगिक अनीतीचे आचरण केले आणि अस्वभाविक लैंगिक संबंधांच्या मागे ती लागली. अनंतकाळच्या अग्निच्या शिक्षेसाठी ती राखून ठेवली आहेत. एक उदाहरण म्हणून ती आपल्यासमोर ठेवली आहेत. 8 अगदी तशाच प्रकारे, हे लोक जे तुमच्या गटात आले ते स्वप्नांनी बहकले व त्यांनी आपली शरीरे विटाळली आहेत. ते प्रभूचा अधिकार बाजूला ठेवतात व ते गौरवी थोरामोठ्यांविरुद्ध (देवदूतांविरुद्ध) निंदानालस्तीची भाषा वापरतात. 9 मीखाएल जो मुख्य देवदूत, याने जेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाबरोबर वाद घातला तेव्हा त्यानेसुद्धा त्याच्याविरुद्ध अपमानस्पद आरोप करण्याचे धाडस केले नाही. तो फक्त म्हणाला, “प्रभू तुला धमकावो.”
10 पण हे लोक, ज्या गोष्टी त्यांना समजत नाहीत त्यांची हे निंदा करतात. आणि जनावरासारखे केवळ मूळ स्वभावाला अनुसरुन जे काही त्यांना समजते. अगदी त्याच गोष्टीमुळे ते नाश पावतात. 11 या लोकांसाठी हे फार वाइट आहे! काईनाने जो मार्ग धरला तोच यांनी धरलेला आहे. आपला फायदा व्हावा म्हणून ते बलामाप्रमाणे गोंधळून मोकाट धावत सुटले आहेत आणि कोरहाच्या बंडाळीत भाग घेणाऱ्या लोकांचा नाश झाला तसाच या लोकांचा देखील नाश होत आहे.
12 हे लोक तुमच्या भातामध्ये दडलेले धोकादायक खडे, असल्यासारखे आहेत. ते खुशाल तुमच्याबरोबर जेवणखाणे करतात, ते फक्त स्वतःच चरत राहाणारे असे मेंढपाळ आहेत, ते पाणी नसलेल्या ढगांसारखे असून ते वाऱ्यामुळे वाहवत जातात. ते लोक म्हणजे हिवाळ्यातील फळहीन व समूळ उपटली गेलेली आणि दोनदा मेलेली झाडे आहेत. 13 ते लोक आपल्या लज्जास्पद कामामुळे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटांप्रमाणे आहेत, ते जणू काळ्याकुटृ अंधारात दडलेले तारे असे आहेत.
14 हनोख, आदामापासूनचा सातवा मनुष्य यानेसुद्धा या लोकांविषयी असेच भाकीत केले आहे: “पाहा हजारो पवित्र देवदूतांसह प्रभु येत आहे. 15 तो अखिल जगातील लोकांचा न्याय करील आणि सर्व लोकांना त्यांनी केलेल्या अधर्माच्या कामासाठी आणि देवाची चाड न बाळगणाऱ्या पापी लोकांनी त्याच्याविरुद्ध जे कठोर, वाईट शब्द आपल्या तोंडावाटे काढले त्याकरीता तो त्यांना दोषी ठरवील.”
16 हे लोक कुरकुर करणारे व दोष दाखविणारे आहेत, ते आपल्या वासनांप्रमाणे चालणारे आणि आपल्या तोंडाने बढाया मारणारे लोक आहेत, ते आपल्या फायद्यासाठी इतरांशी तोंडपूजेपणा करतात.
सावधानतेचा इशारा आणि करावयाच्या गोष्टी
17 पण, तुम्ही प्रियजनहो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेले शब्द आठवा. 18 त्यांनी सांगितले, “काळाच्या शेवटी देवाविषयी थट्टेने बोलणारे लोक असतील, ते त्यांच्या स्वतःच्याच अधार्मिक इच्छांच्या मागे जातील.” 19 असे लोक फूट पाडतात. ते त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे चालतात. त्यांना आत्मा नाही.
20 पण तुम्ही प्रिय मित्रांनो, आपल्यापवित्र शिकविण्यात आलेल्या विश्वासात परस्परांना आध्यात्मिक रीतीने बळकट करा. पवित्र आत्म्याने युक्त होऊन प्रार्थना करा. 21 आणि तुम्हांला अनंतकाळच्या जीवनात घेऊन जाणाऱ्या आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या कृपेची वाट पाहत, देवाच्या प्रीतीत स्वतःला राखा.
22 विश्वासात डळमळीत असलेल्या लोकांवर दया करा. 23 त्यांना अग्नीतून ओढून काढून वाचवा. पण दया दाखविण्याच्या वेळी काळजी घ्या. आणि त्यांच्या दैहिक पापामुळे मळीन झालेल्या कपड्यांचा तिरस्कार करा.
देवाची स्तुति करा
24 आता, तुम्ही पडू नये म्हणून तुम्हाला राखावयास जो समर्थ आहे आणि तुम्हाला आपल्या गौरवी समक्षतेत शुद्ध असे सादर करायला जो मोठ्या आनंदाने तयार आहे, त्याला आणि आपले तारण करणारा जो 25 एकच देव आहे, त्याला आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्याद्वारे गौरव, मान, पराक्रम आणि अधिकार काल, आज आणि अनंतकाळ असो. आमेन.
1 हा परमेश्वराने सफन्याला दिलेला संदेश आहे. योशीयाच्या कारकिर्दीत सफन्याला हा संदेश मिळाला. योशीया हा यहूदाचा राजा आमोन याचा मुलगा होता. सफन्या हा कूशींचा मुलगा होता. कूशी हा गदल्याचा, गदल्या अमऱ्याचा व अमऱ्या हिज्कीयाचा मुलगा होता.
लोकांना न्यायनिवाडा करण्याचा परमेश्वराचा दिवस
2 देव म्हणतो, “पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा मी नाश करीन. 3 सर्व प्राणिमात्रांचा मी नाश करीन. सर्व पक्षी व जलचर मी नष्ट करीन. मी पापी आणि त्यांना पाप करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व गोष्टी याचा नाश करीन मी पृथ्वीवरच्या सर्व लोकांना पृथ्वीवरुन दूर करीन.” परमेश्वर म्हणाला,
4 “मी यहूदाला आणि यरुशलेमवासीयांना शिक्षा करीन. त्या गोष्टींना मी त्या स्थानावरुन दूर करीन. बआल-पूजेचा शेवटचा अंशसुध्दा मी येथे राहू देणार नाही. याजक आणि छतांवर जाऊन ताऱ्यांची [a] पूजा करणाऱ्या सर्व लोकांना मी दूर करीन. 5 त्या भोंदू याजकांना लोक विसरुन जातील. काही लोक आम्ही तुझीच पूजा करतो असे म्हणतात. त्यांनी माझी उपासना करण्याचे वचन दिले होते. पण आता ते खोटा देव मिलकोम याची पूजा करतात. तेव्हा अशा लोकांना मी तेथून दूर करीन. 6 काही लोकांनी परमेश्वराकडे पाठ केली. त्यांनी परमेश्वराला अनुसरायचे सोडले. मदतीसाठी परमेश्वराला हाक मारायचे बंद केले, अशांना मी त्या ठिकाणाहून उठवीन.”
7 परमेश्वर माझ्या, प्रभूसमोर शांत रहा! का? कारण लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा परमेश्वराने ठरविलेला दिवस लवकरच येत आहे. परमेश्वराने यज्ञाची सिध्दता केली आहे त्याने त्याच्या निमंत्रित पाहुण्यांना तयार रहायला सांगितले आहे, [b]
8 परमेश्वर म्हणाला, “परमेश्वराच्या यज्ञार्पण करण्याच्या दिवशी, मी राजाचे मुलगे व इतर नेते ह्यांना शिक्षा करीन. परदेशीय वस्त्रे घातलेल्यांना पण मी सजा देईन. 9 त्या वेळी, उंबऱ्यावरुन उडी मारणाऱ्यांना आणि धन्याचे घर असत्य व हिंसाचाराने भरणाऱ्यांना मी शिक्षा ठोठावीन.”
10 परमेश्वरा असेही म्हणाला त्या वेळेला, लोक यरुशलेमच्या मासळी दाराशी मदतीसाठी हाका मारीत असतील. गावाच्या इतर भागांत लोक रडत असतील. नगरीभोवतीच्या टेकड्यांवरुन लोकांना वस्तूंचा नाश होत असताना येथो, तसा मोठा धडधडाट ऐकू येईल. 11 गावाच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही रडाल. का? कारण सर्व उद्योगपतींचा आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचा नाश होईल.
12 “तेव्हा मी एक दिवा घेऊन यरुशलेममधून शोध करीन. जे लोक स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्यात समाधान मानतात अशा सर्वांना मी शोधीन. ‘परमेश्वर काहीच करीत नाही. तो मदतही करीत नाही आणि दुखापतही करीत नाही’ त्यांना वाटते. अशा लोकांना शोधून काढून मी त्यांना शिक्षा करीन. 13 मग इतर लोक त्यांची संपत्ती बळकावतील आणि त्यांच्या घरांचा नाश करतील. त्या वेळी, ज्यांनी घरे बांधली, ते त्या घरात राहणार नाहीत आणि ज्यांनी द्राक्षमळे लावले, त्यांना त्या द्राक्षांचा द्राक्षारस मिळणार नाही. ह्या गोष्टी दुसऱ्यांनाच मिळतील.”
14 परमेश्वराने ठरविलेला न्यायदानाचा दिवस लवकरच येत आहे तो दिवस जवळच आहे, आणि वेगाने येत आहे. देवाच्या न्यायदानाच्या दिवशी. लोकांना मोठा आक्रांत ऐकू येईल. वीरसुध्दा रडतील. 15 देव तेव्हा आपला क्रोध प्रकट करील. तो भयंकर संकटाचा काळ असेल. ती विद्ध्वंसाची वेळ असेल. ती अंधाकाराची वेळ असेल. तो काळा, ढगाळ व वादळी दिवस असेल. 16 तो काळ युध्दकाळासारखा असेल. युध्दकाळात लोक सुरक्षित गावांतून व संरक्षक बुरुजांवरुन शिंग आणि तुतारी फुंकल्याचे आवाज ऐकतात.
17 परमेश्वर म्हणाला, “मी लोकांना जगणे कठीण करीन. अंधळ्यांना ज्याप्रमाणे आपण कोठे जात आहोत हे कळत नाही, तशी लोकांची स्थिती होईल का? कारण त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले. खूप लोक मारले जातील. त्याचे रक्त जमिनीवर सांडेल. त्यांची प्रेते शेणासारखी जमिनीवर पडतील. 18 त्यांच्या सोन्या-चांदीची त्यांना मदत होणार नाही. त्या वेळी, परमेश्वर खूपच कोपलेला व रागावलेला असेल. परमेश्वर सर्व जगाचा नाश करील. परमेश्वर पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा संपूर्ण नाशकरील.”
राज्यापाल पिलात येशूला प्रश्न विचारतो(A)
23 मग त्यांचा सर्व समुदाय उठला, व त्यांनी त्याला (येशूला) पिलाताकडे नेले. 2 व ते त्याच्यावर आरोप करु लागले. ते म्हणाले, “आम्ही या माणसाला लोकांची दिशाभूल करताना पकडले. तो कैसराला कर देण्यासाठी विरोध करतो आणि म्हणतो की, तो स्वतः ख्रिस्त, एक राजा आहे.”
3 मग पिलाताने येशूला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
येशू म्हणाला, “मी आहे हे तू म्हणतोस ते बरोबर आहे.”
4 मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, “या माणसावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही.”
5 पण त्यांनी आग्रह धरला. ते म्हणाले, “यहूदीयातील सर्व लोकांना तो आपल्या शिकवणीने भडकावीत आहे, त्याने गालीलापासून सुरुवात केली आणि येथपर्यंत आला आहे.”
पिलात येशूला हेरोदाकडे पाठवितो
6 पिलाताने हे ऐकले, तेव्हा त्याने विचारले की, “हा मनुष्य गालीलाचा आहे काय?” 7 जेव्हा त्याला समजले की, येशू हेरोदाच्या अंमलाखाली येतो. तेव्हा त्याने त्याला हेरोदाकडे पाठविले. तो त्या दिवसांत यरुशलेमामध्येच होता.
8 हेरोदाने येशूला पाहिले तेव्हा त्याला फार आनंद झाला, कारण त्याने त्याजविषयी ऐकले होते, व त्याला असे वाटत होते की, तो एखादा चमत्कार करील व आपल्याला तो बघायला मिळेल 9 त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले, पण येशूने त्याला उत्तर दिले नाही. 10 मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे होते. ते त्याच्याविरुद्ध जोरदारपणे आरोप करीत होते. 11 हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्याला पिलाताकडे परत पाठविले. 12 त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले. त्यापूर्वी ते एकमेकांचे वैरी होते.
येशू मेलाच पाहिजे(B)
13 पिलाताने मुख्य याजक, पुढारी आणि लोकांना एकत्र बोलावले. 14 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही या माणसाला तो लोकांना भडकावीत होता म्हणून आणले, आता मी त्याची तुमच्यासमोर चौकशी केली आहे आणि तुम्ही त्याच्याविरुद्ध जे आरोप करीत आहात त्यासाठी मला काहीही आधार सापडत नाही. 15 हेरोदालाही आरोपाविषयी काहीही आधार सापडला नाही. कारण त्याने त्याला परत आमच्याकडे आणले आहे. तुम्हीही पाहू शकता की, मरणाची शिक्षा देण्यास योग्य असे त्याने काहीही केलेले नाही. 16 म्हणून मी याला फटके मारुन सोडून देतो.” 17 [a]
18 पण ते सर्व एकत्र मोठ्याने ओरडले, “या माणसाला ठार करा! आणि आम्हांसाठी बरब्बाला सोडा!” 19 (बरब्बाने शहरात खळबळ माजवली होती. त्याने काही लोकांना ठारही केले होते, त्यामुळे त्याला तुरुंगात टाकले होते.)
20 पुन्हा पिलात त्यांच्याशी बोलला, कारण येशूला सोडण्याची त्याची इच्छा होती. 21 पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्याला वधस्तंभावर खिळा!”
22 तिसऱ्यांदा पिलात त्यांना म्हणाला, “परंतु या माणसाने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्याविरुद्ध काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो.”
23 परंतु ते मोठ्याने ओरडतच राहिले आणि त्याला वधस्तंभावर खिळण्याची मागणी करु लागले. आणि त्यांच्या ओरडण्याचा विजय झाला. 24 पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले. 25 जो मनुष्य दंगा आणि खून यासाठी तुरुंगात टाकला गेला होता, व ज्याची त्यांनी मागणी केली होती त्याला त्याने सोडून दिले. पिलाताने त्यांच्या इच्छे प्रमाणे करण्यासाठी येशूला त्यांच्या हाती दिले.
येशूला वधस्तंभावर खिळून ठार मारले(C)
26 ते त्याला घेऊन जात असताना, कुरेने येथील शिमोन नावाच्या मनुष्याला त्यांनी धरले. तो शेताकडून येत होता. त्यांनी वधस्तंभ त्याच्यावर ठेवला व त्यांनी त्याला तो वधस्तंभ येशूच्या मागे वाहावयास लावला.
27 लोकांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला होता. त्यामध्ये त्याच्यासाठी शोक करणाऱ्या आणि रडणाऱ्या काही स्त्रियांचाही समावेश होता. 28 येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “यरुशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या मुलांबाळांसाठी रडा. 29 कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, ‘धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत, आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत, व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही.’ 30 तेव्हा ते पर्वतास म्हणतील, ‘आम्हांवर पडा!’ आणि ते टेकड्यांस म्हणतील. ‘आम्हांला झाका!’ [b] 31 जर लोक असे करतात जेव्हा झाड हिरवे असते, तर झाड सुकल्यावर काय होईल?”
32 दोन दुसरी माणसे जी दोघेही गुन्हेगार होती, त्यांनाही मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी नेत होते. 33 आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्याला वधस्तंभी गुन्हेगारांमध्ये खिळले. एका गुन्हेगारला त्यांनी उजवीकडे ठेवले व दुसऱ्याला डावीकडे ठेवले.
34 नंतर येशू म्हणाला, “हे बापा, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.”
त्यांनी चिठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. 35 लोक तेथे पाहात उभे होते. आणि पुढारी थट्टा करुन म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचविले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वतःला वाचवावे!”
36 शिपायांनीही त्याची थट्टा केली. ते त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला आंब दिली. 37 आणि ते म्हणाले, “जर तू यहूद्यांचा राजा आहेस तर स्वतःला वाचव!” 38 त्याच्यावर असे लिहिले होते: “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”
39 तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याचा अपमान केला. तो म्हणाला, “तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हालाही वाचव!”
40 पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्याला दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. 41 पण आपली शिक्षा योग्य आहे. कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणांस मिळत आहे. पण या माणसाने काहीही अयोग्य केले नाही.” 42 नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर.”
43 येशू त्याला म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
येशूचा मृत्यू(D)
44 त्यावेळी जवळजवळ दुपारचे बारा वाजले होते आणि तीन वाजेपर्यंत सर्व प्रदेशावर अंधार पडला. त्यादरम्यान सूर्य प्रकाशला नाही. 45 आणि मंदिरातील पडदा फाटला आणि त्याचे दोन भाग झाले. 46 येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे म्हटल्यानंतर तो मेला.
47 जेव्हा रोमी सेवाधिकाऱ्याने काय घडले ते पाहिले तेव्हा त्याने देवाचे गौरव केले आणि म्हणाला, “खरोखर हा नीतिमान मनुष्य होता.”
48 हे दृष्य पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी घडलेल्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा ते छाती बडवीत परत गेले. 49 परंतु त्याच्या ओळखीचे सर्वजण हे पाहण्यासाठी दूर उभे राहिले. त्यामध्ये गालीलाहून त्याच्यामागे आलेल्या स्त्रियाही होत्या.
योसेफ अरिमथाईकर(E)
50-51 तेथे एक योसेफ नावाचा मनुष्य होता. तो यहूदी सभेचा सभासद होता. तो चांगला आणि धार्मिक मनुष्य होता.तो सभेच्या निर्णयाशी व कृतीशी सहमत नव्हता. तो यहूदीयातील अरिमथाई नगराचा होता. तो देवाच्या राज्याची वाट पाहत होता. 52 हा मनुष्य पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. 53 ते त्याने वधस्तंभावरुन खाली काढले आणि तागाच्या वस्त्रात गुंडाळले. नंतर ते खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ही कबर अशी होती की, जिच्यात तोपर्यंत कोणाला ही ठेवले नव्हते. 54 तो शुक्रवार (तयारीचा दिवस) होता, आणि शब्बाथ सुरु होणार होता.
55 गालीलाहून येशूबरोबर आलेल्या स्त्रिया योसेफाच्या मागे गेल्या. त्यांनी ती कबर व तिच्यामध्ये ते शरीर कसे ठेवले ते पाहिले. 56 नंतर त्या घरी गेल्या व त्यांनी सुगंधी मसाले आणि लेप तयार केले.
शब्बाथ दिवशी त्यांनी आज्ञेप्रमाणे विसावा घेतला.
2006 by World Bible Translation Center