M’Cheyne Bible Reading Plan
शलमोनाने बांधलेली नगरे
8 मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली. 2 मग हिरामने दिलेली नगरे शलमोनाने वसवली. त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांना वसती करण्यास मुभा दिली. 3 पुढे शलमोनाने हमाथ सोबा हे नगर जिंकून घेतले. 4 वाळवंटातील तदमोर हे नगरही त्याने वसवले. कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथमधली नगरे बांधली. 5 वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ-होरोन यांची उभारणीही शलमोनाने केली. ती त्याने भक्कम तटबंदीची नगरे केली. त्यांना मजबूत कोट, वेशी आणि अडसर करवले. 6 बालाथ आणि अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरुशलेम, लबानोनसकट आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली.
7-8 इस्राएल लोक राहात असलेल्या प्रदेशात अनेक परकी लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी. त्यांना शलमोनाने वेठबिगार केले. हे लोक मूळचे इस्राएल नव्हते. या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत. 9 इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठबिगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योध्दे होते. ते सैन्याधिकारी, रथाधिपती, स्वारांचे अधिकारी असे होते. 10 काही इस्राएलीजण तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी 250 होते.
11 शलमोनाने फारोच्या मुलीला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दावीद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा करारकोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत. तेव्हा माझ्या बायकोने दावीद नगरात राहू नये.”
12 मग शलमोनाने वेदीवर परमेश्वराला होमार्पणे वाहिली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती. 13 मोशेच्या आज्ञेप्रमाणे शलमोन रोज होमार्पणे करी. शब्बाथच्या दिवशी, नवचंद्र दर्शनीला, वर्षभरातल्या तीन सणांना होमार्पणे करायची असत. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण, आणि मंडपांचा सण हे तीन वार्षिक सण होत. 14 आपल्या वडिलांच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या. परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या. लेवींना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवींची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वराला मानणाऱ्या दावीदाने अशाच सूचना दिल्या होत्या. 15 याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यात इस्राएल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही.
16 शलमोनाची सगळी कामे सिध्दीला गेली. मंदिराच्या कामाला सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत त्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते. अशा रीतीने मंदिराचे काम तडीला गेले.
17 यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एस्योन-गेबेर आणि एलोथ या नगरांना गेला. 18 हिरामने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात तरबेज अशा हिरामच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर हे सेवक ओफिर येथे गेले आणि तेथून 17 टन सोने आणून त्यांनी ते शलमोनाला दिले.
1 वडिलाकडून, [a] माझ्या प्रिय मित्र गायस ज्याच्यावर मी सत्यामध्ये [b] प्रीति करतो त्यास,
2 माझ्या प्रिय मित्रा, जसे आध्यात्मिक जीवनात तुझे चांगले चालले आहे हे मला माहीत आहे तसेच इतर बाबतीतही तुझे चांगले चालावे आणि तुझे आरोग्य चांगले असावे अशी मी प्रार्थना करतो. 3 जेव्हा काही बंधु आले आणि सत्यात तू सातत्याने कसे चालतोस याविषयी त्यांनी साक्ष दिली आणि तू सत्याविषयीच्या विश्वासूपणाबद्दल मला सांगितले तेव्हा मला फार आनंद झाला. 4 माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून जितका आनंद मला होतो तितका कशानेही होत नाही.
5 माझ्या प्रिय मित्रा, आपल्या बंधूंच्या परक्यांच्या कल्याणासाठी जे काही करणे तुला शक्य आहे ते तू विश्वासूपणे करीत आहेस. 6 जे बंधु आले व ज्यांनी तू दाखविलेल्या प्रीतिविषयी मंडळीसमोर साक्ष दिली, त्यांच्या पुढील वाटचालीकारिता देवाला आवडेल अशा प्रकारे 7 शक्य ते सर्व कर, कारण ते ख्रिस्ताच्या सेवेसाठी दौऱ्यावर निघाले आहेत व अविश्वासणाऱ्यांकडून त्यांनी काहीही स्वीकारले नाही. 8 म्हणून आम्ही विश्वासणाऱ्यांनी त्यांना मदत केलीच पाहिजे. यासाठी की आम्ही सत्यासाठी एकमेकांचे भागीदार होऊ.
9 मी मंडळीला पत्र लिहिले पण दियत्रेफस ज्याला त्यांचा नेता व्हायचे आहे व जे सांगतो ते तो स्वीकारीत नाही. 10 या कारणामुळे जेव्हा मी येतो तेव्हा तो जो करीत आहे ते दाखवून देईन. तो वाईट शब्दांनी खोटेपणाने माझ्याविरुद्ध बोलत आहे व एवढ्यावरच तो समाधान मानीत नाही, तर त्यात भर म्हणून बंधूंचा तो स्वीकार करीत नाहीच उलट मंडळीतील जे लोक त्यांचा स्वीकार करु इच्छितात त्यांना अडथळा करतो, आणि त्यांना मंडळीबाहेर घालवितो!
11 माझ्या प्रिय मित्रा, जे चांगले आहे त्याचे अनुकरण कर. वाइटाचे अनुकरण करु नको. जे चांगले आहे ते जो करतो, तो देवाचा आहे. जो वाईट करतो त्याने देवाला पाहिले नाही.
12 प्रत्येक जण देमेत्रियाविषयी चांगली साक्ष देतात व सत्यदेखील तसेच सांगते. आणि आम्ही देखील त्याच्याविषयी तसेच म्हणतो, आणि तुम्हांला माहीत आहे की, आमची साक्ष खरी आहे.
13 मला तुला पुष्कळ गोष्टी लिहावयाच्या आहेत पण मला शाई व लेखणीने तुला लिहावे असे वाटत नाही. 14 त्याऐवजी, तुला लवकर भेटण्याची मला आशा आहे. मग आपल्याला समोरासमोर बोलता येईल. 15 तुझ्याबरोबर शांति असो. तुझे सर्व मित्र तुला सलाम सांगतात. तेथील सर्व मित्रांना नावाने आमचा सलाम सांग.
हबक्कूकची प्रार्थना
3 ही संदेष्टा हबक्कूकची शिगयोनोथ प्रार्थना आहे
2 परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली.
परमेश्वर तू भूतकाळात केलेल्या सामर्थ्यशाली गोष्टीने मी विस्मयचकित झालो आहे.
आता, आमच्या काळातही तू अशाच मोठ्या गोष्टी घडवाव्यास म्हणून मी प्रार्थना करतो.
कृपया आमच्या आयुष्यातच त्या घडव.
पण तुझ्या खळबळजनक घटनांच्या वेळीही, आमच्यावर दया करण्यास विसरु नकोस.
3 तेमानहून देव येत आहे.
पारान पर्वतावरुन पवित्र परमेश्वर येत आहे.
परमेश्वराच्या तेजाने स्वर्ग व्यापला जातो
आणि स्तुतीने पृथ्वी व्यापली जाते.
4 ते तेज तेजस्वी, चमकदार प्रकाशाप्रमाणे आहे त्याच्या हातातून किरण निघतात.
त्या हातात मोठे सामर्थ्य लपले आहे.
5 आजार त्याच्या आधी गेला.
आणि नाश करणारा त्याच्यामागून गेला.
6 परमेश्वराने स्वतः उभे राहून, पृथ्वीला न्याय दिला
त्याने राष्ट्रांतील लोकांवर नजर टाकली
आणि त्या लोकांचा भीतीने थरकाप झाला.
पुष्काळ वर्षे पर्वत घटृपणे उभे होते
पण त्यांचा चक्काचूर झाला.
अती प्राचीन टेकड्या खाली कोसळल्या
देवाचे नेहमीच हे असे असते.
7 कूशानची गावे संकटात असलेली मी पाहिली.
मिद्यानची घरे भीतीने कापली
8 परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का?
झऱ्यांवर तुझा राग होता का?
समुद्रावर तू संतापला होतास का?
विजयसाठी तुझ्या घोड्यांवर स्वार होताना किंवा रथांवर आरुढ होताना तू रागावला होतास का?
9 त्या वेळीसुध्दा तू इंद्रधनुष्य दाखविलेस.
पृथ्वीवरच्या वंशाबरोबर तू केलेल्या काराचा तो पुरावा होता
रुक्ष भूमीतून नद्या उगम पावल्या.
10 तुला पाहून पर्वत कापले भूमीतून पाणी उसळले.
समुद्राच्या पाण्याने प्रचंड गर्जना केली.
जणू काही त्याने आपली भूमीवरील सत्ता
गमावल्यामुळे ते आकांत करीत होते.
11 चंद्र-सूर्याचे तेज लोपले.
तुझ्या विजांचा तेजस्वी लखलखाट पाहून त्यांनी चमकणे सोडून दिले
त्या विजा म्हणजे जणू काही हवेत फेकलेले बाण व भाले होते.
12 रागाच्या भरात, तू पृथ्वी पायाखाली तुडविलीस
आणि राष्ट्रांना शिक्षा केलीस.
13 तू, तुझ्या माणसांच्या, रक्षणासाठी आलास.
तू निवडलेल्या राजाला, विजयकाडे नेण्यासाठी आलास.
रंकापासून रावापर्यंतच्या,
प्रत्येक दुष्ट घरातील प्रमुखाला
तू ठार मारलेस.
14 शत्रू-सैनिकांना थोपविण्यासाठी
तू मोशेच्या काठीचा उपयोग केलास.
ते सैनिक,
प्रचंड वादळाप्रमाणे, आमच्यावर हल्ला करण्यासाठी आले.
गरीब माणसाला एकांतात लुटावे,
तसा सहज आमचा पाडाव करता येईल असे त्यांना वाटले.
15 पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस
त्यामुळे समुद्र घुसळला गेला.
16 ही गोष्ट ऐकताच, मला कंप सुटला.
मी मोठ्याने किंचाळलो
मी अतिशय दुर्बल झाल्याचे मला जाणवले.
मी जागच्या जागी नुसताच थरथर कापत उभा राहिलो.
म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची वाट पाहीन शत्रू आमच्यावर हल्ला करील.
परमेश्वरामध्ये नेहमी आनंद करा
17 कदाचित् अंजिराच्या झाडांना अंजिरे लागणार नाहीत.
वेलीना द्राक्षे लागणार नाहीत.
जैतूनाच्या झाडांना फळे लागणार नाहीत.
शेतांत धान्य उगवणार नाही,
गोठ्यात शेळ्या मेंढ्या, गाईगुरे राहणार नाहीत,
18 तरी मी परमेश्वराठयी आनंद करीन.
माझ्या तारणहाराजवळ, देवाजवळ मला सुख मिळेल.
19 परमेश्वर, माझा प्रभू मला शक्ती देतो.
हरिणाप्रमाणे जलद धावायला मदत करोत
देवच मला सुरक्षितपणे पर्वतांवर नेतो.
माझ्या तारा लावलेल्या वाद्यांत असलेल्या त्या संगीत दिग्दर्शकाला.
यहूदी पुढारी येशूला ठार मारावयास टपतात(A)
22 नंतर बेखमीर भाकरीचा सण ज्याला वल्हांडण म्हणतात, तो समय जवळ येत होता. 2 आणि मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल हे बघत होते. कारण त्यांना लोकांची भीति वाटत होती.
यहूदा येशूचा शत्रु होतो(B)
3 नंतर सैतान यहूदामध्ये, ज्याला इस्कर्योत म्हणत, व जो बारा जणांपैकी एक होता, त्याच्यात शिरला. 4 यहूदा मुख्य याजक व मंदिराचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि येशूला त्यांच्या हाती कसे धरुन देता येईल याविषयी त्याने बोलणी केली. 5 त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्याला पैसे देण्याचे मान्य केले. 6 म्हणून त्याने संमति दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधि शोधू लागला.
वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी(C)
7 बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला. 8 तेव्हा त्याने पेत्र व योहान यांना सांगून पाठविले की, “जा आणि आपणांसाठी वल्हांडण सणाचे भोजन तयार करा म्हणजे आपण ते खाऊ.”
9 पेत्र व योहान येशूला म्हणाले, “आम्ही ते कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे?”
10 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हांला भेटेल. तो ज्या घरात जाईल तेथे जा. 11 आणि घरमालकांस सांगा, ‘गुरुजींनी तुम्हांला विचारले आहे की, माझ्या शिष्यांसह वल्हांडण सणाचे भोजन करता येईल ती पाहुण्यांची खोली कोठे आहे?’ 12 तो मनुष्य तुम्हांला माडीवरील सजविलेली खोली दाखवील. तेथे तयारी करा.”
13 तेव्हा पेत्र व योहान तेथून निघाले. जसे येशूने सांगितले तसेच सर्व घडले तेव्हा त्यांनी वल्हांडणाच्या भोजनाची तयारी केली.
प्रभु भोजन(D)
14 वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या शिष्यांसह भोजनास बसला. 15 तो त्यांना म्हणाला, “मी दु:ख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती. 16 कारण मी तुम्हांस सांगतो की, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.”
17 नंतर त्याने पेला घेतला आणि उपकार मानले. तो म्हणाला, “हे घ्या, आणि आपसात वाटून घ्या. 18 कारण मी तुम्हांस सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षफळांचा रस घेणार नाही.”
19 नंतर त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. त्याने ती मोडली आणि त्यांना दिली व म्हणाला, “हे माझे शरीर आहे जे तुम्हांसाठी दिले आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.” 20 त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे.” [a]
येशू विरुद्ध कोण जाईल?
21 “परंतु पाहा! माझा विश्वासघात करणाऱ्याचा हात माझ्याबरोबरच मेजावर आहे. 22 कारण मनुष्याचा पुत्र जसे निश्चित केले आहे, त्याप्रमाणे मरावयास जाईल. परंतु ज्याने त्याचा विश्वासघात केला आहे, त्याचा धिक्कार असो.”
23 आणि ते आपापसात एकमेकाला प्रश्न विचारु लागले, “हे करणारा आपणापैकी कोण असावा?”
सेवकासारखे व्हा
24 तसेच, त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये सर्वांत श्रेष्ठ कोण आहे. 25 पण येशू त्यांना म्हणाला, “विदेश्यांचे राजे त्यांच्या लोकांवर (प्रजेवर) सत्ता गाजवितात. इतर लोकांवर अधिकार असणारी माणसे लोकांनी त्यांना लोकांचे उपकारकर्ते म्हणण्यास भाग पाडतात. (स्वतःला उपकारकर्ते म्हणवून घेतात.) 26 परंतु तुम्ही तसे नाही. त्याऐवजी तुमच्यातील सर्वांत मोठा असलेल्याने सर्वांत लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे. 27 तेव्हा मोठा कोण: जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हांमध्ये सेवा करणारासारखा आहे.
28 “परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात. 29 ज्याप्रमाणे माझ्या पित्याने माझी नियुक्ति केली तशी मी तुमची नियुक्ति राज्यावर करतो. 30 म्हणून तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे आणि आसनावर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय करावा.
तुमचा विश्वास ढळू देऊ नका(E)
31 “शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे. 32 परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना कसून केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.”
33 परंतु शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभु, मी तुझ्याबरोबर तुरुंगात जाण्यासाठी व मरण्यासाठी तयार आहे.”
34 पण येशू म्हणाला, “पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे तीन वेळा नाकारीपर्यंत आज कोंबडा आरवणार नाही.”
संकटासाठी तयार राहा
35 येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हांला थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हांस काही कमी पडले का?”
ते म्हणाले, “काहीही नाही.”
36 तो त्यांना म्हणाला, “पण आता, ज्याच्याजवळ थैली आहे त्याने ती घ्यावी व त्याने पिशवीसुद्धा घ्यावी. आणि ज्याच्याजवळ तलवार नाही त्याने आपला झगा विकावा आणि एक विकत घ्यावी. 37 कारण मी तुम्हांस सांगतो, हा शास्त्रभाग माझ्यामध्ये परिपूर्ण झालाच पाहिजे:
‘आणि तो अपराधी असा गणला गेला.’ (F)
होय, हा माझ्याविषयीचा संदर्भ पूर्ण होत आहे.”
38 ते म्हणाले, “प्रभु, पहा, येथे दोन तरवारी आहेत.”
तो त्यांना म्हणाला, “तेवढे पुरे!”
येशू प्रेषितांना प्रार्थना करण्यास सांगतो(G)
39-40 तो निघाला आणि नेहमीप्रमाणे जैतूनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. तो त्या ठिकाणी आला तेव्हा त्यांना म्हणाला, “तुम्ही मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
41 तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले. आणि अशी प्रार्थना केली, 42 “पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माइयाकडून घे. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” 43 स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्याला सामर्थ्य देत राहिला 44 दु;खाने ग्रासलेला असतानासुद्धा त्याने अधिक काकुळतीने प्रार्थना केली. आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता. 45 आणि जेव्हा प्रार्थना करुन तो उठला आणि शिष्यांकडे आला तेव्हा ते त्यांच्या दु:खामुळे थकून जाऊन झोपी गेलेले आढळले. 46 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का झोपत आहात? उठा, आणि मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
येशूला अटक(H)
47 तो बोलत असता लोकांचा जमाव आला. आणि बारा शिष्यातील यहूदा इस्कर्योत म्हटलेला एक जण त्यांच्यापुढे चालत होता. येशूचे चुंबन घेण्यासाठी तो त्याच्याजवळ आला.
48 परंतु येशू त्यास म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राचा तू विश्वासघात करतोस काय?” 49 त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे पाहून म्हणाले, “प्रभु. आम्ही तलवारीने मारावे काय?” 50 त्यांच्यापैकी एकाने मुख्य याजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला.
51 येशूने उत्तर दिले, “असे काही करु नका.” त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्याला बरे केले.
52 नंतर येशू मुख्य याजक, मंदिराचे मुख्य अधिकारी आणि वडील जे त्याच्यावर चालून आले होते, त्यांना म्हणाला, “तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन माझ्यावर चालून आलात, जसा काय मी लुटारु आहे. 53 मी तर तुम्हांबरेबर दररोज मंदिरात असे आणि तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही. परंतु ही तुमची आणि अंधाराची राज्य करण्याची वेळ आहे.”
मी येशूला ओळखतो असे म्हणण्याची पेत्राला भीति वाटते(I)
54 त्यांनी त्याला अटक केली व ते त्याला मुख्य याजकाच्या घरी घेऊन गेले. पण पेत्र दुरुन त्यांच्या मागे चालला. 55 त्यांनी अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटविला, आणि त्याच्याभोवती बसले. पेत्रही त्यांच्यात बसला. 56 एका दासीने तेथे त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहिले. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि ती म्हणाली, “हा मनुष्यही त्याच्याबरोबर होता.”
57 पेत्र ते नाकारुन म्हणाला, “बाई, मी त्याला ओळखत नाही!” 58 थोड्या वेळानंतर दुसऱ्या मनुष्याने त्याला पाहिले आणि म्हणाला, “तू सुद्धा त्यांच्यापैकी एक आहेस!”
पण पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही!”
59 नंतर सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण ठामपणे म्हणाला, “खात्रीने हा मनुष्यसुद्धा त्याच्याबरोबर होता, कारण हा गालीलाचा आहे.”
60 परंतु पेत्र म्हणाला, “गृहस्था तू काय बोलतोस ते मला कळत नाही!”
तो बोलत असताना त्याच क्षणी कोंबडा आरवला. 61 आणि प्रभुने वळून पेत्राकडे पाहिले. पेत्राला प्रभूने उच्चारलेले वाक्य आठवले. “आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,” असे सांगितलेले त्याला आठवले. 62 मग तो बाहेर गेला आणि अतिदु:खाने रडला.
लोक येशूचा उपहास करतात(J)
63 येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्याला मारायला सुरुवात केली. 64 त्यांनी त्याचे डोळे बांधले, व त्याला प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?” 65 आणि ते त्याचा अपमान करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले.
यहूदी पुढांऱ्यांसमोर येशू(K)
66 दिवस उगवला तेव्हा वडील लोकांची म्हणजे त्यात दोन्ही प्रकारचे लोक, मुख्य याजक, व नियमशास्त्राचे शिक्षक यांची सभा भरली. आणि ते त्याला त्यांच्या सभेत घेऊन गेले. 67 ते म्हणाले, “जर तू ख्रिस्त आहेस तर आम्हांला सांग.”
येशू त्यांना म्हणाला, “जरी मी तुम्हांला सागितले तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. 68 आणि जरी मी तुम्हांला प्रश्न विचारला तरी तुम्ही उत्तर देणार नाही. 69 पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल.”
70 ते सर्व म्हणाले, “तर मग तू देवाचा पुत्र आहेस काय?” त्याने त्यांना उत्तर दिले, “मी आहे असे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.”
71 मग ते म्हणाले, “आता आपल्याला आणखी साक्षीची काय गरज आहे? आपण स्वतः त्याच्या तोंडचे शब्द ऐकले आहेत.”
2006 by World Bible Translation Center