M’Cheyne Bible Reading Plan
मंदिराचे परमेश्वराला समर्पण
7 शलमोनाची प्रार्थना संपल्याबरोबर स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्याने होमबली आणि यज्ञार्पणे भस्मसात केली. परमेश्वराच्या लखलखीत तेजाने मंदिर भरुन गेले. 2 त्या तेजाने दिपून याजकांनाही परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना. 3 थेट स्वर्गातून अग्नी खाली येणे आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर पसरणे या गोष्टी इस्राएलच्या समस्त लोकांनी पाहिल्या. तेव्हा त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमन केले, परमेश्वराला धन्यवाद दिले आणि ते म्हणाले,
“परमेश्वर चांगला आहे
त्याची कृपा सर्वकाळ राहाते.”
4 मग शलमोनाने आणि सर्व इस्राएल लोकांनी परमेश्वरापुढे यज्ञ केले. 5 राजा शलमोनाने 22,000 बैल आणि 1,20,000 मेंढरे वाहिली. राजा आणि प्रजा यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. ते फक्त उपासनेसाठी वापरायचे होते. 6 याजक आपल्या कामाला सिध्द झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवी ही उभे राहिले. राजा दावीदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करुन घेतली होती. “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची कृपा चिरंतन आहे” असे याजक आणि लेवी गात होते. लेवींच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्राएल लोक तिथे उभे होते.
7 मंदिरासमोरचे मधले आवार शलमोनाने पवित्र केले. या जागी त्याने होमार्पणे आणि शांतिअर्पणांची वपा वाहिली. होमार्पणे, अन्नार्पणे आणि वपा यांचे प्रमाण एवढे प्रचंड होते की पितळी वेदीवर ते सर्व मावेना म्हणून मधले आवार त्याने वापरले.
8 शलमोन आणि इस्राएल लोक यांनी सात दिवस हा सण साजरा केला. हमाथच्या वेशीपासून ते मिसरच्या झऱ्या पर्यंतच्या भागातले सगळे इस्राएल लोक इथे आल्यामुळे शलमोनबरोबरचा जमाव खूपच मोठा होता. 9 आठव्या दिवशी त्यांनी पवित्र सभा घेतली कारण त्या आधी सात दिवस त्यांनी सण साजरा केला होता. वेदी पवित्र करुन ती परमेश्वराला समर्पण केली. ती फक्त परमेश्वराच्या उपासनेसाठी वापरायची होती. सात दिवस त्यांनी सण साजरा केला. 10 सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी शलमोनाने लोकांना घरोघरी परतायला सांगितले. दावीद, शलमोन आणि इस्राएल लोक यांच्यावर परमेश्वराने कृपा केल्यामुळे लोक आनंदी झाले होते. त्यांची अंतःकरणे आनंदाने भरुन गेली होती.
शलमोनाला परमेश्वराचे दर्शन
11 परमेश्वराचे मंदिर आणि राजगृह बांधण्याचे काम शलमोनाने पार पाडले. परमेश्वराचे मंदिर आणि आपले निवासस्थान यांच्याबाबतीत योजलेल्या सर्व गोष्टी त्याने यशस्वीपणे पूर्ण केल्या. 12 नंतर एकदा रात्री परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले. तो शलमोनाला म्हणाला,
“शलमोना तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हे स्थळ यज्ञगृह म्हणून मी निवडले आहे. 13 कधी जर मी पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून आकाशमार्ग बंद केला, धान्य फस्त करायला टोळधाड पाठवली किंवा रोगराईचा प्रसार केला 14 आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करुन माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वर्गातून त्यांच्या हाकेला ओ देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करीन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन. 15 आता माझी दृष्टी या ठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत. 16 हे मंदिर मी माझे म्हणून निवडले आहे.माझे नाव इथे सदासर्वकाळ रहावे म्हणून मी हे स्थान पवित्र केले आहे. माझी दृष्टी आणि माझे चित्त नेहमी या मंदिराकडे लागलेले असेल. 17 शलमोना, तुझे वडील दावीद यांच्याप्रमाणेच तू माझ्याशी वागलास, माझ्या आज्ञांचे पालन केलेस, माझे विधी आणि नियम पाळलेस, 18 तर मी तुला समर्थ राजा बनवील आणि तुझे राज्य महान होईल. तुझे वडील दावीद यांना मी तसे वचन दिले आहे. त्यांना मी म्हणालो होतो, ‘दावीद तुझ्या घराण्यातील पुरुषच इस्राएलच्या राजपदावर आरुढ होईल.’
19 “पण जर माझ्या आज्ञा आणि नियम तू पाळले नाहीस. इतर दैवतांची उपासना व सेवा केलीस, 20 तर मात्र मी दिलेल्या या भूमीतून इस्राएल लोकांना मी हुसकावून लावीन. माझ्या नावाप्रीत्यर्थ असलेले हे पवित्र मंदिर मी सोडून जाईन. इतकेच नव्हे तर ते इतर देशांमध्ये निंदेचा विषय करीन. 21 एकेकाळी पूज्य मानल्या गेलेल्या या मंदिरावरुन जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला आता आश्चर्य वाटेल. ते लोक म्हणतील, ‘हा प्रदेश आणि हे मंदिर यांची अशी अवस्था परमेश्वराने का केली बरे?’ 22 तेव्हा त्यांना इतर लोक सांगतील, ‘कारण आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचे या इस्राएल लोकांनी ऐकले नाही. या लोकांना या परमेश्वरानेच मिसरमधून बाहेर आणले. तरी हे इतर दैवतांच्या भजनी लागले. त्यांनी त्यांची उपासना व सेवा केली. त्यांनी मूर्तिपूजा सुरु केली. म्हणून इस्राएल लोकांवर परमेश्वराने हे अरिष्ट आणले.’”
1 वडिलाकडून, [a] देवाने निवडलेल्या बाईना [b] व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीति करतो, आणि तुमच्यावर प्रीति करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे सर्वजणसुद्धा प्रीति करतात. 2 या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये अनंतकाळपर्यंत राहील.
3 देवपित्यापासून आणि पित्याचा पुत्र प्रभु येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांति ही सत्यात व प्रीतित आपणबरोबर राहोत.
4 पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुमची काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले म्हणून मला फार आनंद झाला. 5 आणि आता, बाई, कुरिया, मी तुला नम्रपणे विनंति करतो की, आपण एकमेकांवर प्रीति करावी. मी ही तुला नवी आज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून तुला देण्यात आलेली होती, 6 आणि त्याच्या आज्ञेत राहणे म्हणजेच प्रीति करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही सुरुवातीपासून ऐकली आहे: की तुम्ही प्रीतीचे जीवन जगावे.
7 येशू मानवी देह धारण करुन या जगात आला या गोष्टीवर विश्वास न ठेवणारे अनेक फसवे भोंदू लोक जगात निघाले आहेत. असा फसविणारा भोंदू मनुष्य हाच ख्रिस्तविरोधी होय. 8 सावध असा! यासाठी की ज्यासाठी आम्ही काम केले ते तुम्ही हातचे जाऊ देऊ नये तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे.
9 जो मनुष्य ख्रिस्ताविषयीच्या शिकवणुकीप्रमाणे चालत नाही, तर तिचे उल्लंघन करतो, त्याला देव मिळाला नाही. जो कोणी ख्रिस्ताविषयीच्या शिकवणुकीप्रमाणे चालतो त्याला देवपिता व पुत्र असे दोन्ही मिळाले आहेत. 10 जर एखादा मनुष्य तुमच्या घरी आला आणि ख्रिस्ताची शिकवण आचरणात आणीत नसला तर त्याला आपल्या घरात घेऊ नका. किंवा त्याला सलामही करु नका. 11 कारण अशा मनुष्याला जो कोणी सलाम करतो तो त्याच्या वाईट कामांमध्ये सहभागी होतो.
12 मला जरी अनेक गोष्टी तुम्हांला लिहायच्या आहेत तरी त्या तुम्हांला मी शाई व लेखणीने लिहू इच्छित नाही. तर त्याऐवजी तुम्हांला भेटावे व प्रत्यक्ष सर्व काही बोलावे अशी आशा मनात बाळगून आहे. म्हणजे आपला आनंद त्यामुळे परिपूर्ण होईल. 13 देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणीची [c] मुले तुम्हांला सलाम सांगतात.
2 मी रखवालदारसारखा उभा राहून लक्ष ठेवीन परमेश्वर मला काय सांगतो,
त्याची मी वाट पाहीन मी वाट पाहीन
आणि तो माझ्या प्रश्नाला कसे उत्तर देतो ते बघीन.
देवाचे हबक्कूकला उत्तर
2 परमेश्वर मला म्हणाला, “मी तुला जे दाखवितो, ते लिहून ठेव लोकांना सहज वाचता यावे, म्हणून पाटीवर स्पष्ट लिही. 3 हा संदेश भविष्यातील विशिष्ट काळासाठी आहे. हा अंताबद्दलचा संदेश आहे आणि तो खरा ठरेल ती वेळ कदाचित कधीच येणार नाही असे वाटेल, पण धीर धरा आणि वाट पाहा! ती वेळ येईल ती येण्यास फार विलंब लागणार नाही. 4 जे लोक हा संदेश ऐकण्याचे नाकारतील, त्यांना त्याचा फायदा होऊ शकणार नाही. पण सज्जन माणूस ह्या संदेशावर विश्वास ठेवील. आणि तो त्याच्या श्रध्देमुळे जगे”
5 देव म्हणाला, “मद्य माणसाला दगा देऊ शकते. त्याप्रमाणे बलवान माणसाचा गर्व त्याला मूर्ख बनवू शकतो. पण त्याला शांती मिळणार नाही. तो मृत्यूसारखा असतो त्याची आसक्ती वाढतच राहाते. आणि मृत्यूप्रमाणेच, त्याला कधीही समाधान मिळत नाही. तो इतर राष्ट्रांचा पराभव करीतच राहील. त्या राष्ट्रांतील लोकांना तो कैद करीतच राहील. 6 पण लवकरच तो सर्व लोकांच्या चेष्टेचा विषय होईल. ते त्याच्या पराभवाच्या कथा सांगतील. ते हसून म्हणतील, ‘फारच वाईट झाले बुवा! त्या माणसाने खूप गोष्टी चोरल्या. त्याच्या मालकीच्या नसलेल्या गोष्टी त्याने उचलल्या. पण त्यांचेच आता त्याला ओझे होईल. त्याने कर्ज काढून स्वतःला श्रीमंत बनवले.’
7 “तू (बलवान माणसाने) लोकांकडून पैसा घेतलास. कधी ना कधी त्या लोकांना जाग येईल व काय झाले ते समजेल. मग ते तुझ्या विरुध्द उभे राहतील. तुझ्याकडून वस्तू घेतील व तू भयभीत होशील. 8 तू पुष्कळ राष्ट्रांतून बऱ्याच गोष्टी चोरल्यास. ते लोक तुझ्याकडून त्यांची वसुली करतील. तू पुष्कळ लोकांना ठार मारलेस, देश व गावे यांचा नाश केलास. त्या देशांतील व गावांतील लोकांना मारलेस.
9 “हो! खरेच! चुकीच्या मार्गाने श्रीमंत होणाऱ्या माणसाचे भले होणार नाही. हा माणूस सुरक्षित जागी राहायला मिळावे, म्हणून अशा गोष्टी करतो. त्याच्या उंच इमारतीमुळे तो वाचू शकेल असे त्याला वाटते. पण त्याचे वाईट होईल. 10 तू (बलवान माणसाने) खूप माणसांचा नाश करण्याचा कट रचला आहेस त्यामुळे तुझ्याच माणसांना मान खाली घालावी लागेल. तू वाईट गोष्टी केल्या आहेत आणि तुझे आयुष्य तू गमावशील. 11 भिंतींतील दगडसुध्दा तुझ्याविरुध्द ओरडतील तुझ्याच घराचे वासे त्यांना साथ देतील. कारण तू चुकतोस हे त्यांना पटेल.
12 “गाव वसविण्यासाठी लोकांना ठार मारुन नेत्यांनी पाप केले, ते त्यांच्यासाठी वाईट आहे. 13 त्या लोकांनी उभारलेले सर्व आगीत भस्मसात करावयाचे सर्वशक्तिमान परमेश्वराने ठरविले आहे. त्यांच्या कामाचा काहीही उपयोग होणार नाही. 14 मग मात्र सर्वच लोकांना परमेश्वराचे वैभाने (गौरवाने) कळेल. समुद्राच्या पसरणाऱ्या पाण्याप्रमाणे ही वार्ता सगळीकडे पसरेल. 15 जी व्यक्ति रागावते व इतर लोकांना सहन करायला लावते तिचे खूप वाईट होईल. रागाने ती व्याक्ति इतरांना जमीनवर जोरात आपटते. व त्यांना नग्न व दारुडे असल्याप्रमाणे वागावते.
16 “पण त्या माणसाला परमेश्वरा राग काय असतो ते कळेल. तो राग म्हणजे परमेश्वराच्या उजव्या हातातील जणू विषाचा प्याला आहे. त्याची चव घेताच, तो माणूस, मद्यप्यामप्रमाणे, जमिनीवर कोसळून पडेल.
“दुष्ट राजा, तू त्या प्याल्यातील विष पिशील. तुला मान तर मिळणार नाहीच, पण तुला लाज प्राप्त होईल. 17 तू लबानोनमधील पुष्कळांना दुखवविलेस. तेथील पुष्कळ गुरे तू चोरलीस. म्हणून त्या मृत माणसांची आणि तू तेथे केलेल्या दुष्कर्मांची तुला भीती वाटेल. तेथील गावांत तू वाईट कृत्ये केलीस आणि तेथील रहिवाशांशी तू वाईट वागलास त्यामुळे तू भयभीत होशील.”
मूर्ती विषयी संदेश
18 त्या माणसाचे दैवत त्याला मदत करणार नाही. का? कारण तो देव म्हणजे काही लोकांनी धातूत कोरलेला एक पुतळा आहे. ती फक्त एक मूर्ती आहे. तेव्हा घडविणाऱ्याने तिच्याकडून मदतीची अपेक्षा करु नये. तो पुतळा बोलूसुध्दा शकत नाही. 19 जो माणूस लाकडी पुतळ्याला “ऊठ उभा राहा” असे म्हणतो किंवा दगडाला “जागा हो” असे सांगतो, त्याचे वाईट होईल, ह्या गोष्टी त्याला मदत करु शकणार नाहीत. तो पुतळा कदाचित् सोन्या-चांदीने मढविलेला असेल, पण त्यात प्राण नाही.
20 पण परमेश्वर वेगळा आहे. परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे. म्हणूनच सर्व पृथ्वीवर शांतता असावी व सर्वानीच परमेश्वराचा मान राखावा.
खरे दान(A)
21 येशूने वर पाहिले व श्रीमंत लोकांना दानपेटीत दाने टाकताना न्याहाळले. 2 त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी टाकताना पाहिले. 3 तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले. (मी असे म्हणतो) 4 कारण या सर्व लोकांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु तिने गरीब असून आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”
मंदिराचा नाश(B)
5 शिष्यातील काही जण मंदिराविषयी असे बोलत होते की, ते सुंदर पाषाणांनी आणि नवसाच्या अर्पणांनी सुशोभित केले आहे.
6 येशू म्हणाला, “या गोष्टी तुम्ही पाहताना असे दिवस येतील की, एकावर एक असा एकही दगड ठेवला जाणार नाही. ते सर्व पाडले जातील.”
7 त्यांनी त्याला प्रश्न विचारला आणि ते म्हणाले, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?”
8 आणि तो म्हणाला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि तो ‘मी आहे’ असे म्हणतील. आणि ते म्हणतील, ‘वेळ जवळ आली आहे.’ त्यांच्यामागे जाऊ नका! 9 जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.”
10 मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल. 11 मोठे भूंकप होतील, दुष्काळ पडतील, आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील. आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.
12 “परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुम्हांला अटक करतील. ते तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हांस सभास्थानांसमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हांला राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील. 13 यामुळे तुम्हांला माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल. 14 आपला स्वतःचा बचाव कसा करायचा याविषयी काळजी करायची नाही अशी मनाची तयारी करा, 15 कारण मी तुम्हांला असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुद्ध बोलायला मुळीच जमणार नाही. 16 परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हांपैकी काही जणांना ठार मारतील. 17 माझ्या नावामुळे सर्व जण तुमचा द्वेष करतील. 18 परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही. 19 आपल्या सहनशीलतेने तुम्ही जिवाचे रक्षण कराल.
यरुशलेमेचा नाश(C)
20 “जेव्हा तुम्ही यरुशलेमाला सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हांला कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे. 21 जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये. 22 ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. 23 त्या दिवसांत ज्या गरोदरस्त्रिया आहेत, व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल. मी असे म्हणतो कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर देवाचा कोप ओढवेल. 24 ते तरवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना बंदीवान करुन राष्ट्रांत नेतील आणि यहूदीतर लोकांचा काळ संपेपर्यंत यहूदीतर राष्ट्रे यरुशलेम पायाखाली तुडवतील.
भिऊ नका(D)
25 “सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील. 26 भीतीमुळे लोक बेशुद्ध होतील आणि जगात काय घडणार आहे ह्या धास्तीमुळे व भीतिमुळे लोक दुर्बल होतील. आकाशातील सामर्थ्ये डळमळीत होतील. 27 नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने मेघात येताना पाहतील. 28 मग या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा. आणि तुमचे मस्तक वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”
माझी वचने सर्वकाळ टिकतील(E)
29 नंतर त्याने त्यांस एक बोधकथा सांगितली: “अंजिराच्या झाडाकडे व इतर दुसऱ्या सर्व झाडांकडे पाहा. 30 त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे. 31 त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे.
32 “मी तुम्हांस खरे सांगतो की, ह्या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. 33 आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
सर्वदा तयार राहा
34 “सावध राहा, दारुबाजी आणि अधाशीपणात तुमचा वेळ घालवू नका, किंवा ऐहिक गोष्टींमध्ये मग्न राहू नका. जर तुम्ही तसे कराल, तर तुम्ही व्यवस्थित विचार करु शकणार नाही, व तुम्ही तयार नसताना तो दिवस (शेवट) अकस्मात तुमच्यावर येईल. 35 खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व जिवंतांवर येईल. 36 सर्व समयी जागृत राहा. होणाऱ्या सर्व गोष्टींपासून जिवंत राहण्यासाठी आणि विश्वासाने मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहणे शक्य व्हावे यासाठी प्रार्थना करा.”
37 दर दिवशी तो मंदिरात शिक्षण देत असे. परंतु रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर जात असे. 38 सर्व लोक मंदिरात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे जात.
2006 by World Bible Translation Center