M’Cheyne Bible Reading Plan
शलमोनाची प्रार्थना
12 शलमोन परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले. 13 बाहेरच्या आवारात प्रत्येकी 7 1/2 फूट लांबी, रुंदी आणि उंची असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने बसवला होता. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले 14 शलमोन म्हणाला,
“हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस. 15 तुझा सेवक दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे वडील होते. तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस. 16 तसेच आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, दावीद या सेवकाला दिलेले हे वचनही खरे कर. तू असे म्हणाला होतास: ‘माझ्यासमक्ष इस्राएलच्या गादीवर न चुकता तुझ्या वंशातीलच कोणीतरी येत जाईल. मात्र तुझ्या मुलांनी काटेकोर वर्तन केले पाहिजे. तुझ्याप्रमाणेच त्यांनीही माझा करार पाळला पाहिजे.’ 17 तेव्हा आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, हे ही शब्द खरे होऊ देत. आपला सेवक दावीद याला तू तसा शब्द दिला आहेस.
18 “परमेश्वर पृथ्वीवर लोकांमध्ये वस्ती करु शकत नाही ही गोष्ट, हे देवा, आम्हाला माहीत आहे. आकाश आणि त्या पुढचे अवकाशही तुला सामावून घ्यायला असमर्थ आहेत. या मी बांधलेल्या मंदिरातही तू मावू शकत नाहीस हे आम्ही जाणतो 19 पण माझी एवढी प्रार्थना ऐक. मी करुणा भाकतो तिच्याकडे लक्ष दे. परमेश्वर देवा, माझी आर्त हाक ऐक. मी तुझा एक दास आहे. 20 या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास. मी या मंदिराकडे तोंड करुन प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक. 21 तुझ्या इस्राएल लोकांनी तसेच मी केलेल्या प्रार्थना तू ऐक. या प्रार्थनास्थळाकडे तोंड करुन आम्ही प्रार्थना करु तेव्हा तिच्याकडे तू लक्ष दे. तुझ्या आकाशातील स्थानावरुन तुझे इथे लक्ष असू दे. आमच्या प्रार्थना ऐक आणि आम्हाला क्षमा कर.
22 “एखाद्याने दुसऱ्याची काही आगळीक केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असताना, 23 तू स्वर्गातून ऐक. तुझ्या सेवकाचा योग्य न्यायनिवाडा कर. ज्याच्या हातून आगळीक घडली असेल त्याला शासन कर. त्याच्यामुळे इतरांना जसा त्रास झाला तसाच याला होऊ दे. ज्याचे वागणे उचित होते तो निर्दोष असल्याचे सिध्द कर.
24 “इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द पाप केल्यामुळे जर शत्रूंनी तुझ्या इस्राएल लोकांचा पराभव केला आणि अशावेळी इस्राएल लोक तुझ्याकडे येऊन तुझ्या नावाने क्षमायाचना करु लागले, या मंदिरात येऊन विनवणी करु लगले तर 25 तू स्वर्गातून ते ऐकून इस्राएल लोकांना क्षमा कर. तू त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर त्यांना पुन्हा परत आण.
26 “इस्राएल लोकांनी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन पर्जन्यवृष्टी झालीच नाही आणि त्यावेळी पश्चात्तापाने इस्राएल लोकांनी मंदिराच्या दिशेने पाहात क्षमायाचना केली, तू केलेल्या शिक्षेमुळे पापाचरण थांबवले, 27 तर स्वर्गातून त्यांचे ऐकून घे. त्याचे ऐक आणि त्यांना माफ कर. इस्राएल लोक तुझे दास आहेत. त्यांना जगण्याचा सन्मार्ग दाखव. तुझ्या भूमीवर पाऊस पाड. ती तूच तुझ्या लोकांना दिलेली जमीन आहे.
28 “कदाचित् एखादेवेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूचा हल्ला झाला, असे काही झाल्यास 29 तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो तो आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल. 30 तेव्हा तू ते स्वर्गातून ऐक. तू स्वर्गात राहातोस. तू त्यांची प्रार्थना ऐकून त्यांना क्षमा कर. प्रत्येकाचा मनोदय तुला माहीत असल्यामुळे ज्याला जे योग्य असेल त्याला ते दे. मानवाचे मन फक्त तूच ओळखतोस. 31 असे झाले म्हणजे तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या या भूभागावर त्यांची वसती असेपर्यंत लोक तुझा धाक बाळगतील आणि तुझे ऐकतील.
32 “तुझ्या इस्राएल प्रजेपेक्षा वेगळा असा कोणी उपराही कदाचित् दूर देशाहून इथे आलेला असेल. तुझ्या नावाची महती, आणि तुझे समर्थ बाहू यांच्यामुळे तो आलेला असेल. त्याने येऊन या मंदिराकडे पाहात प्रार्थना केली तर 33 तू ती स्वर्गातून ऐक. त्याची मागणी पुरव. म्हणजे इस्राएल लोकांप्रमाणेच पृथ्वीवरील इतर लोकांनाही तुझ्या नावाचा महिमा कळेल आणि त्यांना तुझ्याविषयी आदर वाटेल. हे मी बांधलेले मंदिर तुझ्या नावाचे आहे हे पृथ्वीवरील सर्व लोकांना कळेल.
34 “शत्रूशी लढण्यासाठी जेव्हा तू आपल्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी पाठवशील आणि तिथून ते तू निवडलेल्या या नगराच्या आणि मी बांधलेल्या मंदिराच्या दिशेने पाहात प्रार्थना करु लागतील. 35 तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विनंती प्रमाणे त्यांना मदत कर.
36 “पाप कोणाच्या हातून होत नाही? तेव्हा लोक तुझ्या विरुध्द पाप करतील तेव्हा तुझा त्यांच्यावर कोप होईल. तू शत्रूंकरवी त्यांचा पाडाव करशील, बंदी म्हणून त्यांना बळजबरीने इथून दूरच्या किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी नेले जाईल. 37 पण तिथे त्यांचे ह्रदयपरिवर्तन होऊन, परभूमीत कैदी होऊन पडलेले ते म्हणतील, ‘आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले आहे. आम्ही दुराचरण केले आहे.’ 38 असतील तिथून ते अंतरीच्या उमाळ्याने तुला शरण येतील. या देशाच्या तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाच्या दिशेने आणि तू निवडलेल्या नगराच्या दिशेने पाहात ते प्रार्थना करतील. तुझ्या नावाखातर मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने पाहात ते प्रार्थना करतील. 39 असे होईल तेव्हाही तू तुझ्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक. त्यांच्या विनवणीला कान दे, त्यांना मदत कर. ज्यांनी तुझ्या विरुध्द पाप केले आहे अशा तुझ्या लोकांना क्षमा कर. 40 आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक.
41 “आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ्य मिरवणाऱ्या
या करारकोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी ये.
तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत.
तुझे भक्त या सुजनतेने सुखी होवोत.
42 हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्वीकार कर.
तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.”
देवाची मुले जगाविरुद्ध विजयी होतात
5 प्रत्येकजण जो विश्वास ठेवतो की येशू हा ख्रिस्त आहे तो देवाचे मूल झालेला आहे. आणि प्रत्येकजण जो पित्यावर प्रीति करतो तो त्याच्या मुलावरही प्रीति करतो. 2 अशा प्रकारे आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या पुत्रावर प्रीति करतो: देवावर प्रीति करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने. 3 देवाप्रती असलेली आमची प्रीति आम्ही त्याच्या आज्ञापालनाकडून दाखवू शकतो आणि त्याच्या आज्ञा फार अवजड नाहीत. 4 कारण प्रत्येकजण जो देवाचा मूल होतो तो जगावर विजय मिळवितो, आणि यामुळे आम्हांला जगावर विजय मिळाला: आमच्या विश्वासाने. 5 येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे?
देवाने आम्हाला त्याच्या पुत्राविषयी सांगितले
6 येशू ख्रिस्त आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला. तो केवळ पाण्याद्वारेच आमच्याकडे आला असे नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला, व आत्मा ही साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे. 7 साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेतः 8 आत्मा, पाणी आणि रक्त, आणि तिघेही एकच साक्ष देतात.
9 जर आम्ही मनुष्यांनी दिलेली साक्ष स्वीकारतो, तर देवाने दिलेली साक्ष त्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे हे आपण ओळखले पाहिजे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या एकुलत्या एका पुत्राविषयीची आहे. 10 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवीत नाही, त्याने देवाला लबाड ठरविले आहे. कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही. 11 आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की, देवाने आपल्याला अनंतकाळचे जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. 12 ज्याच्याजवळ पुत्र आहे त्याला खरे जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्याला खरे जीवन नाही.
आता आपल्याला अनंतकाळचे जीवन आहे
13 जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हाला अनंतकाळचे जीवन आहे, याविषयी तुम्ही निश्र्चिंत असावे, 14 आणि आम्हांला देवामध्ये खात्री आहे की, जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीसाठी त्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतो, तेव्हा तो आमचे ऐकतो. 15 आणि आम्हांला हे माहीत आहे की जर तो आमचे ऐकतो, तर कोणत्याही कारणासाठी जरी आम्ही प्रार्थना केली, तर आम्हांस माहीत आहे की, जे काही आम्ही मागितले आहे ते आम्हांला मिळालेच आहे.
16 जर एखाद्याला त्याचा भाऊ पापांत पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम अनंतकाळचे मरण नसेल तर त्या भावासाठी त्याने प्रार्थना करावी. आणि देव त्याला जीवन देईल. ज्या गोष्टीचा परिणाम अनंतकाळचे मरण नाही अशा पापामध्ये पडणाऱ्यासाठी जे जीवन (देव देतो) त्या जीवनाविषयी मी हे बोलत आहे. ज्या पापाचा परिणाम मरण आहे. अशा तऱ्हेच्या पापाबाबत तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही. 17 सर्व अनीति हे पाप आहे, पण असे पाप आहे ज्याचा परिणाम मरण नाही.
18 आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत रहात नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात लावू शकत नाही. 19 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत, जरी संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे. 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्या देवाला आम्ही ओळखावे. आणि आपणास माहीत आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आला आहे व जो खरा देव आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याजमध्ये आम्ही राहात आहोत. पिता हा खरा देव आहे आणि तो अनंतकाळचे जीवन आहे. 21 माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तिपूजेपासून दूर राखा.
हबक्कूकची देवाकडे तक्रार
1 संदेष्टा हबक्कूकला दिलेला संदेश आसा आहे:
2 परमेश्वरा, मी मदतीसाठी सतत आळवणी करीत आहे. माझ्या हाकेला तू ओ कधी देणार? हिंसाचाराबद्दल मी किती आरडाओरड केली पण तू काहीच केले नाहीस. 3 लोक चोऱ्या करीत आहेत, दुसऱ्यांना दुखवीत आहेत, वादविवाद करीत आहेत आणि भांडत आहेत. अशा भयंकर गोष्टी तू मला का पाहायला लावीन आहेस? 4 कायदा दुबळा झाला असल्याने, लोकांना योग्य न्याय मिळत नाही. दुष्ट सज्जनांवर विजय मिळवितात. म्हणजेच कायदा न्याय राहिलेला नाही. न्यायाचा जय होत नाही.
देवाचे हबक्कूकला उत्तर
5 परमेश्वर म्हणाला, “इतर राष्ट्रांकडे पाहा! त्यांच्यावर लक्ष ठेव. मग तू विस्मयचकित होशील. मी अशा काही गोष्टी घडवून आणीन की तुझा विश्वास बसले. नुसते सांगून तुला ते खरे वाटणार नाही. 6 मी बाबेलला एक बलिष्ठ राष्ट्र बनवीन, तेथील लोक क्षुद्र वृत्तीचे पण समर्थ आणि दुष्ट लढवय्ये आहेत. ते सर्व जग पायाखाली घालतील. त्यांच्या मालकीची नसलेली घरे व गावे, ते स्वतःच्या ताब्यात घेतील. 7 खास्दी लोक इतरांना घाबरतील. ते त्यांना पाहिजे ते करतील आणि पाहिजे तेथे जातील. 8 त्यांचे घोडे चित्यांपेक्षा चपळ आणि सूर्यास्ताच्या वेळच्या लांडग्यांपेक्षा वाईट वृत्तीचे असतील. त्यांचे घोडेस्वार दूरदूरच्या ठिकाणाहून येतील. भुकेला गरुड ज्याप्रमाणे आकाशातून एकदम झडप घालतो, त्याप्राणेच ते शत्रूंवर हल्ला करतील. 9 खास्द्यांना एकच गोष्ट करायला आवडते आणि ती म्हणजे लढाई. वाळवंटातील वाऱ्याप्रमाणे बाबेलचे सैन्य वेगाने कूच करील. वाळूच्या अगणित कणांप्रमाणे, असंख्य कैद्यांना खास्दी सैनिक धरुन नेतील.
10 “ते सैनिक इतर राष्ट्रांच्या राजांना हसतील. परदेशी राज्यकर्ते त्यांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय असेल. उंच व भक्कम तटबंदी असलेल्या गावांची ते टर उडवतील. ते तटाच्या भिंतीच्या टोकापर्यंत मातीचे साधे रस्ते बांधून सहजगत्या गावांचा पाडाव करतील. 11 मग ते वाऱ्याप्रमाणे निघून जातील व दुसरीकडे लढतील. ते खास्दी त्यांच्या सामर्थ्यालाच फक्त भजतात.”
हबक्कूकची दुसरी तक्रार
12 त्यानंतर हबक्कूक म्हणाला, “परमेश्वरा, तू सनातन परमेश्वर आहेस
तू माझा कधीही न मरणारा पवित्र, देव आहेस
परमेश्वरा, जे केलेच पाहिजे, ते करण्यासाठीच तू खास्द्यांना निर्मिले आहेस आमच्या खडका,
यहूद्यांच्या लोकांना शिक्षा करण्यासाठी तू त्यांना निर्मिले आहेस.
13 तुझे डोळे इतके शुध्द आहेत की त्यांचा दुष्टपणा पाहवत नाही.
लोकांचे चुकीचे वागणे तू पाहू शकत नाहीस.
मग त्या दुष्टांचा विजय तू कसा पाहू शकतोस?
सज्जनांचा दुर्जन पराभव करतात तेव्हा तू प्रतिकार का करत नाहीस?
14 तू लोकांना समुद्रातल्या माशांप्रमाणे केले आहेस
कोणीही प्रमुख नसलेल्या समुद्रातील लहान जीवांप्रमाणे लोक आहेत.
15 शत्रू त्यांना गळाच्या आणि जाळ्याच्या साहाय्याने पकडतो तो त्यांना आत ओढतो.
आपण पकडलेल्या सावजावर, शत्रु असतो.
16 त्याचे जाळे त्याला, श्रीमंत म्हणून जगायला
व उत्तम अन्नाच्या चवीचे सुख मिळवायला मदत करते.
म्हणून शत्रू जाळ्यांची आराधना करतो.
त्याच्या जाळ्याचा मान राखण्यासाठी तो यज्ञ अर्पण करतो आणि धूप जाळतो.
17 त्याच्या जाळ्याच्या मदतीने तो संपत्ती घेतच राहणार का?
कोणतीही दया न दाखविता, तो लोकांचा नाश करीतच राहणार का?
यहूदी पुढारी येशूला एक प्रश्न विचारतात(A)
20 एके दिवशी येशू मंदिरात लोकांना शिक्षण देत असताना व सुवार्ता सांगत असताना एकदा एक मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, वडीलजनांसह एकत्र वर त्याच्याकडे आले. 2 ते त्याला म्हणाले, “आम्हांला सांग, कोणत्या अधिकाराने तू या गोष्टी करत आहेस! तुला हा अधिकार कुणी दिला?”
3 तेव्हा त्याने त्यास उत्तर दिले, “मी सुद्धा तुम्हांला एक प्रश्न विचारीन, तुम्ही मला सांगा: 4 योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता की मनुष्यापासून?”
5 त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, “जर आपण स्वर्गापासून म्हणावे, तर तो म्हणेल, तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? 6 पण जर आपण मनुष्यांकडून म्हणावे, तर सर्व लोक आपणांस दगडमार करतील कारण त्यांची खात्री होती की, योहान संदेष्टा होता.” 7 म्हणून त्यांनी असे उत्तर दिले की, तो कोणापासून होता हे त्यांना माहीत नाही.
8 मग येशू त्यांस म्हणाला, “मग मी या गोष्टी कोणत्या अधिकाराने करतो हे तुम्हांला मी सुध्दा सांगणार नाही.”
देव आपला पुत्र पाठवितो(B)
9 मग तो लोकांना ही गोष्ट सांगू लागला: “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला. व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूर गेला. 10 हंगामाच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठविले. यासाठी की, त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित. पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठविले. 11 नंतर त्याने दुसऱ्या नोकराला पाठविले, पण त्यालासुद्धा त्यांनी मारले. त्या नोकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली. आणि रिकाम्या हाताने परत पाठविले. 12 तेव्हा त्याने तिसऱ्या नोकराला पाठविले. पण त्यालाही त्यांनी जखमी करुन बाहेर फेकून दिले.
13 “द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, ‘मी काय करु? मी माझा स्वतःचा प्रिय पुत्र पाठवतो. कदाचित ते त्याला मान देतील.’ 14 पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, ‘हा तर वारस आहे, आपण त्याला ठार मारु, म्हणजे वतन आपले होईल.’ 15 त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व ठार मारले.
“तर मग द्राक्षमळ्याचा मालक काय करील? 16 तो येईल आणि त्या शेतकऱ्यांना ठार मारील व तो द्राक्षमळा दुसऱ्यांना सोपवून देईल.”
त्यांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “असे कधीही न होवो.” 17 येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले,
“‘तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला
तोच कोनशिला झाला?’ (C)
असे जे लिहिले आहे त्याचा अर्थ काय? 18 जो कोणी त्याच्यावर पडेल त्याचे तुकडे होतील परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा चुराडा होईल.”
19 नियमशास्त्राचे शिक्षक आणि मुख्य याजक यांनी त्याचवेळी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना लोकांची भीति वाटत होती. त्यांना त्याला अटक करायचे होते, कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता.
यहूदी पुढारी येशूला फसविण्याचा प्रयत्न करतात(D)
20 तेव्हा त्यानी त्याच्यावर पाळत ठेवली. आणि आपण प्रामाणिक आहोत असे भासविणारे हेर पाठविले. त्यांची अशी योजना होती की, त्याच्या बोलण्यात त्याला पकडावे म्हणजे त्यांना त्याला राज्यपालाच्या ताब्यात देऊन त्यांच्या अधिकाराच्या कक्षेत आणता आले असते. अधिकारामध्ये सुपूर्त करता आले असते. 21 म्हणून त्या हेरांनी त्याला प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी, आम्हांला माहीत आहे की, जे योग्य ते तुम्ही बोलता व शिकविता आणि तुम्ही पक्षपात करीत नाही. तर सत्याने देवाचा मार्ग शिकविता. 22 आम्ही कैसराला कर द्यावा हे योग्य आहे किंवा नाही?”
23 ते धूर्तपणे आपल्याला फसवू पाहत आहेत याची येशूला कल्पना होती. 24 “मला एक नाणे दाखवा. त्यावर कोणाचा मुखवटा व शिक्का आहे?”
ते म्हणाले, “कैसराचा.”
25 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला द्या.”
26 तेव्हा लोकांसमोर तो जे बोलला त्यात त्याला धरणे त्यांना शक्य झाले नाही. त्याच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले. आणि शांत झाले.
काही सदूकी येशूला फसविण्याचा प्रयत्न करतात(E)
27 मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्याला प्रश्न विचारला. ते म्हणाले, 28 “गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मेला, व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्याला मुले व्हावीत. 29 सात भाऊ होते. पाहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मेला. 30 नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले. 31 नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले. सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली. कोणालाही मुले न होता ते मरण पावले. 32 नंतर ती स्त्रीही मरण पावली. 33 तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते.”
34 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “या युगातले लोक लग्न करुन घेतात व लग्न करुन देतात. 35 परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न करुन घेणार नाहीत, आणि लग्न करुन देणार नाहीत 36 आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत. 37 जळत्या झुडुपाविषयी मोशेने लिहिले, तेव्हा त्याने परमेश्वराला अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव असे म्हटले व मेलेलेसुद्धा उठविले जातात हे दाखवून दिले. 38 देव मेलेल्यांचा नाही तर जिवंतांचा देव आहे. सर्व लोक जे त्याचे आहेत ते जिवंत आहेत.”
39 काही नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले, “गुरुजी, उत्तम बोललात!” 40 तेव्हा त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही.
ख्रिस्त दावीदाचा पुत्र असेल काय?(F)
41 परंतु तो त्यांना म्हणाला, “ख्रिस्त दावीदाचा पुत्र आहे असे ते कसे म्हणतात? 42 कारण दावीद स्वतः स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो,
‘प्रभु माझ्या प्रभूला म्हणाला:
तू माझ्या उजवीकडे बैस,
43 जोपर्यंत मी तुझ्या शत्रूला तुझ्या पायाखालचे आसन करीत नाही तोपर्यंत.’ (G)
44 अशा रीतिने दावीद त्याला ‘प्रभु’ म्हणतो, तर मग ख्रिस्त दावीदाचा पुत्र कसा?”
नियमशास्त्रातील शिक्षकांविरुद्ध इशारा(H)
45 सर्व लोक हे ऐकत असताना तो शिष्यांना म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांविषयी सावध असा, त्यांना लांब झगे घालून फिरणे आवडते, 46 त्यांना बाजारात नमस्कार घेण्यास, सभास्थानात महत्त्वाच्या आसनावर व मेजवानीच्या वेळी मानाच्या जागी बसणे आवडते. 47 ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या माणसांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.”
2006 by World Bible Translation Center