M’Cheyne Bible Reading Plan
शलमोन मंदिर बांधतो
3 यरुशलेममधील मोरिया पर्वतावर शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. शलमोनाचे वडील दावीद याला परमेश्वराने याच मोरिया पर्वतावर दर्शन दिले होते. दावीदाने तयार करुन ठेवलेल्या या जागेवर शलमोनाने मंदिर बांधले. ही जागा म्हणजेच ते अर्णान यबूसीचे खळे. 2 आपल्या कारकिर्दींच्या चौथ्या वर्षातल्या दुसऱ्या महिन्याच्या दुसऱ्या दिवशी शलमोनाने कामाला सुरुवात केली.
3 शलमोनाने बांधायला घेतलेल्या परमेश्वराच्या मंदिराच्या पायाची मोजमापे अशी: हा पाया 60 हात लांब आणि 20 हात रुंद होता. तेव्हा प्रचलित असलेले जुने क्युबिट परिमाण त्याने वापरले होते. 4 मंदिराच्या समोरचा द्वारमंडप 20 हात लांब आणि वीस हात उंच होता. त्याची आतील बाजू शलमोनाने शुध्द सोन्याने मढवली होती. 5 मोठ्या खोलीला सर्वबाजूंनी त्याने देवदारुच्या फळ्या बसवल्या. त्यांवर शलमोनाने सोन्याचा पत्रा चढवला आणि त्यावर खजुरीची झाडे व साखळ्या कोरुन काढल्या 6 मौल्यवान रत्ने जडवून त्याने मंदिराच्या सौदर्यात भर घातली. यात वापरलेले सोने पर्वाइमचे होते. 7 तुळया, दाराचे खांब, भिंती, दरवाजे हे मंदिराचे आतले भागही शलमोनाने सोन्याने मढवले. भिंतींवर त्याने करुब कोरुन काढले.
8 यानंतर शलमोनाने मंदिरातला अत्यंत पवित्र गाभारा बांधला. हे अत्यंत पवित्र स्थान 20 हात लांब आणि वीस हात रुंद होते. मंदिराइतकीच त्याची रुंदी होती. गाभाऱ्याच्या भिंतीही शलमोनाने सोन्याने मढवल्या. हे एकंदर 23 टन सोने होते. 9 सोन्याच्या खिळ्यांचे वजन 1 1/4 पौंड एवढे होते. वरच्या मजल्यावरची दालने ही शलमोनाने सोन्याने मढवली. 10 अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले. 11 करुबांच्या एकेका पंखाची लांबी 5 हात होती. त्यांची एकंदर लांबी 20 हात एवढी होती. पहिल्या करुबाचा एक पंख दालनाच्या एका बाजूच्या भिंतीला स्पर्श करत होता तर दुसरा पंख दुसऱ्या करुबाच्या एका पंखाला. 12 आणि दुसऱ्या करुबाचा दुसरा पंख दालनाच्या दुसऱ्या भिंतीला स्पर्श करत होता. 13 अशाप्रकारे करुबांच्या पंखानी वीस हात एवढे अंतर व्यापलेले होते. हे करुब पवित्र गाभाऱ्याकडे तोंड करुन उभे होते.
14 निळ्या, जांभळ्या आणि उंची किरमिजी वस्त्राचा पडदा करुन घेऊन शलमोनाने त्यावरही करुब करवून घेतले.
15 मंदिरासमोर शलमोनाने दोन स्तंभ उभे केले. हे स्तंभ 35 हात उंच होते. त्यांच्यावरचे कळस प्रत्येकी 5 हात उंचीचे होते. 16 शलमोनाने साखळ्या करुन त्या कळसांवर ठेवल्या. या साखळ्यांना त्याने 100 शोभिवंत डाळिंबे कलाकुसर म्हणून लावली. 17 हे स्तंभ मंदिरासमोर डाव्याउजव्या हाताला उभे केले. उजव्या बाजूच्या खांबाला शलमोनाने याखीम (संस्थापक) आणि डावीकडच्या खांबाला बवाज (सामर्थ्यवान) अशी नावे दिली.
मंदिरातील बांधकाम आणि सामान
4 शलमोनाने वेदी पितळेची केली. ती 30 फूटलांब, 30 फूट रुंद आणि 18 फूट उंच होती. 2 त्याने ओतीव पितळेचे एक गंगाळदेखील केले. हे गोल असून त्याचा व्यास 10 हात होता. त्याची उंची 5 हात आणि त्याचा कडेचा परीघ 30 हात होता. 3 या गंगाळाच्या खालच्या बाजूस सभोवार कडेला बैलांच्या चित्रकृती घडवलेल्या होत्या. त्यांची लांबी 10 हात होती. गंगाळ बनवतानाच या बैलांच्या दोन रांगा ओतल्या होता. 4 बारा घडीव बैलांनी हे प्रशस्त गंगाळ तोललेले होते. तीन बैल पूर्वाभिमुख, तीन पश्चिमाभिमुख, तीन उत्तराभिमुख तर तीन दक्षिणाभिमुख होते. आणि गंगाळ त्यांच्यावर होते. सर्व बैलांचा मागील भाग एकमेकांकडे आणि मध्यभागी आलेला होता. 5 या पितळी गंगाळाची जाडी 3 इंच होती. त्याची कड उमललेल्या कमलपुष्पासारखी होती. त्यात 17,500 गॅलन पाणी मावू शकत असे.
6 याखेरीज शलमोनाने दहा तस्ते बनवली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला पाच अशी बसवली. होमार्पणात वाहायच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही दहा तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी, होमार्पणाच्या वस्तू वाहण्यापूर्वी धुण्यासाठी होते.
7 शलमोनाने सोन्याचे दहा दीपवृक्षही केले. हे त्याने त्यांच्या विधीनुसार बनविले, आणि मंदिरात ठेवले. डावीकडे पाच आणि उजवीकडे पाच असे ते ठेवले. 8 दहा मेजेही शलमोनाने मंदिरात ठेवली. ती ही पाच डावीकडे आणि पाच उजवीकडे अशी ठेवली. शिवाय सोन्याचे शंभर वाडगे केले. 9 याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक आवार केले, एक प्रशस्त आवार आणि त्यांना दरवाजे केले. आवारांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले. 10 एवढे झाल्यावर आग्नेयला मंदिराच्या उजवीकडे त्याने ते मोठे पितळी गंगाळ ठेवले.
11 हिराम या कारागिराने हंडे, फावडी व वाडगे बनवले. शलमोनासाठी जे देवाच्या मंदिराचे काम त्याला करायचे होते ते त्याने पूर्ण केले.
12 दोन स्तंभ,
स्तंभावरचे कळस,
त्यावरील जाळ्यांची दोन सुशोभने हे काम हिरामने केले होते.
13 त्या जाळीदार आच्छादनांवरील चारशे शोभिवंत डाळिंबे हिरामनेच केली होती. प्रत्येक जाळीवर डाळिंबांच्या दोन रांगा होत्या. स्तंभांवरचे कळस या जाळ्यांनी आच्छादलेले होते.
14 तिवया आणि तिवयांवरची गंगाळी त्याने घडवली होती.
15 मोठे पितळी गंगाळ आणि त्याला आधार देणारे बारा बैल हिरामनेच केले.
16 शलमोनासाठी त्याने हंडे, फावडी, काटे इत्यादी मंदिरातली उपकरणे केली.
त्यासाठी लखलखीत, उजळ पितळ वापरलेले होते. 17 या सर्व गोष्टीसाठी शलमोनाने आधी चिकणमातीचे नमुने बनविले. त्यासाठी सुक्कोथ आणि सरेदा यांच्यामधली, यार्देन खोऱ्यातली माती वापरली. 18 शलमोनाने इतक्या अगणित गोष्टी करवून घेतल्या की त्यांना पितळ किती लागले याची मोजदाद कोणी केली नाही.
19 याखेरीज आणखी काही गोष्टी शलमोनाने देवाच्या मंदिरासाठी केल्या. सोन्याची वेदी, समर्पित भाकर ठेवण्याची मेजे केली. 20 सोन्याचे दीपवृक्ष आणि दिवे करवून घेतले. आतल्या सर्वांत पवित्र गाभाऱ्याच्या समोर योजना केल्याप्रमाणे लावण्यासाठी हे दिवे होते. 21 याशिवाय फुले, दिवे आणि निखारे उचलण्याचे चिमटे शुध्द सोन्याचे होते. 22 कातऱ्या, वाडगे, कटोरे, अग्निपात्रे, या गोष्टीही शलमोनाने सोन्यात घडवल्या. मंदिराची दारे, अत्यंत पवित्र गाभाऱ्यातली दारे, आणि मुख्य दालनाचे दरवाजे हे ही सोन्याचे होते.
आपण देवाची मुले आहोत
3 पित्याने आपल्यावर जे महान प्रेम केले आहे त्याविषयी विचार करा. आम्हांला देवाची मुले म्हणण्यापर्यंत त्याने प्रेम केले! आणि आम्ही खरोखरच (देवाची मुले) आहोत! या कारणामुळे जग आम्हाला ओळखत नाही, कारण त्यांनी (जगाने) ख्रिस्ताला ओळखले नाही. 2 प्रिय मित्रांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत, आणि भविष्यकाळात कसे असेल ते अजून माहीत करुन देण्यात आले नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू. कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू. 3 आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, तो स्वतःला शुद्ध करतो, जसा ख्रिस्त शुद्ध आहे.
4 प्रत्येकजण जो पाप करतो तो देवाचा नियम मोडतो. कारण पाप हे नियमभंग आहे. 5 लोकांचे पाप घेऊन जाण्यासाठी ख्रिस्त प्रकट झाला हे तुम्हांस माहीत आहे, आणि त्याच्यामध्ये कोणतेही पाप नाही. 6 प्रत्येकजण जो ख्रिस्तामध्ये राहतो तो पाप करीत राहात नाही. प्रत्येकजण जो पाप करीत राहतो त्याने त्याला पाहिले नाही, आणि त्याला तो ओळखत सुद्धा नाही.
7 प्रिय मुलांनो, तुम्हांला कोणी फसवू नये. जो योग्य ते करतो तो जसा ख्रिस्त चांगला आहे तसा चांगला आहे. 8 जो पापमय जीवन जगतच राहतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान सुरुवातीपासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करावी या उद्देशानेच देवाचा पुत्र प्रकट झाला.
9 जो देवाचा पुत्र झाला आहे तो कोणीही पाप करीत नाही. कारण खुद्द देवाची बी त्या व्यक्तीमध्ये असते. त्यामुळे तो पापात राहू शकत नाही. कारण तो देवाचे मूल बनला आहे. 10 जी देवाची मुले आहेत व जी सैतानाची मुले आहेत, त्यांना तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता: प्रत्येकजण जे योग्य ते करीत नाही आणि जो त्याच्या भावावर प्रेम करीत नाही तो देवाचा नाही.
आम्ही एकमेकांवर प्रीति केली पाहिजे
11 आपण एकमेकांवर प्रीति करावी, ही शिकवण आपण सुरुवातीपासून ऐकली आहे. 12 काईन जो त्या दुष्टाचा (सैतानाचा) होता तसे आम्ही असू नये कारण त्याने त्याच्या भावाला मारले आणि कोणत्या कारणासाठी त्याने त्याला मारले? त्याने तसे केले कारण त्याची स्वतःची कृत्ये दुष्ट होती, तर त्याच्या भावाची कृत्ये चांगली होती.
13 बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. 14 आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीति करतो. जो प्रीति करीत नाही तो मरणात राहतो. 15 जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे. आणि तुम्हांला माहीत आहे की, खुनी माणसाला त्याच्या ठायी असलेले अनंतकाळचे जीवन मिळत नाही.
16 अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. 17 जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजेत आहे हे तो पाहतो पण तरीही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते असे आपण कसे म्हणू शकतो? 18 प्रिय मुलांनो, आपली प्रीति केवळ शब्दांनी बोलण्याएवढीच मर्यादित नसावी तर ती कृती सहीत व खरीखुरी असावी.
19 आम्ही सत्याचे आहोत ते यावरुन आम्हांस कळेल आणि अशाप्रकारे देवासमोर आमच्या अंतःकरणाची खात्री पटेल 20 जेव्हा जेव्हा आमचे अंतःकरण आम्हांला दोष देईल, हे यासाठी की आमच्या अंतःकरणापेक्षा देव महान आहे, आणि सर्व काही (तो) जाणतो.
21 प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमची अंतःकरणे आम्हांला दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हांला खात्री आहे. 22 आणि देवाकडे आम्ही जे मागतो ते आम्हाला प्राप्त होते. कारण आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो, आणि त्याला जे संतोषकारक आहे ते आम्ही करीत आहोत. 23 तो आम्हांला अशी आज्ञा करतो की येशू ख्रिस्ताच्या नावावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे, जशी येशूने आम्हांला आज्ञा केली आहे. 24 जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्या व्यक्तीमध्ये राहतो. देव आमच्यामध्ये राहतो हे आम्हांला यावरुन समजते, त्याने दिलेल्या आत्म्यामुळे आम्हाला हे समजते.
निनवेचा नाश होईल
2 तुझ्यावर हल्ला करण्यासाठी शत्रू येत आहे
तेव्हा तुझ्या शहरातील भक्कम जागांचे रक्षण कर
रस्त्यांवर नजर ठेव
युध्दाला सज्ज हो!
लढाईची तयारी कर!
2 परमेशवर इस्राएलच्या वैभवाप्रमाणेच याकोबलाही पुन्हा वैभव प्राप्त करून देईल
इस्राएलच्या ऐश्वर्याप्रमाणेच याकोबचे ऐश्वर्य होईल
शत्रूने त्यांचा नाश केला
आणि त्याचे द्राक्षमळे उदध्वस्त केले.
3 त्या सैनिकांच्या ढाली लाल आहेत
त्यांचा पोशाख लालभडक आहे
लढण्यासाठी सज्ज होऊन
उभे राहिलेले त्यांचे रथ अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे चमड्ढताना दिसत आहेत
त्यांचे घोडे सरसावलेले आहेत.
4 रथ रस्त्यांतून मोकाटपणे धावत आहेत
चौकांमधून ते पुढे-मागे कसेही पळत आहेत
ते जळत्या मशालीप्रमाणे
किंवा ठिकठिकाणी तळपणाऱ्या विजेप्रमाणे दिसत आहेत.
5 अश्शूरचा राजा त्याच्या सर्वोत्तम सैनिकांना बोलवत आहे
पण ते वाटेतच अडखळून पडत आहेत
ते तटबंदीचे रक्षण करण्यासाठी धाव घेत आहेत
ते संरक्षक दरवाजे खाली ओढून लावून घेत आहेत.
6 पण नदीकाठची दारे उघडीच आहेत
तेथूत शत्रू पुरासारखा आत शिरतो आणि राजवाड्याचा नाश करतो.
7 शत्रू राणीला पकडून घेऊन जातात
आणि तिच्या दासी दु:खाने पारव्याप्रमाणे विव्हळातात
त्या छाती पिटून दू:ख व्यक्त करतात.
8 निनवे एक अशा तळ्यासारखे आले आहे
ज्याच्यातील पाणी वाहून जात आहे
लोक किंचाळतात थांबा! थांबा पळून जाऊ नका!
पण त्याचा काहीही उपयोग होत नाही.
9 निनवेचा नाश करणाव्या
सैनिकांनो चांदी सोने लुटा
तेथे लुटण्यासारखे पुष्कळ आहे.
खूप संपत्ती आहे.
10 आता निनवे ओसाड झाले आहे
सर्व चोरीला गेले आहे
शहर उद्ध्वस्त झाले आहे
लोकाचे धैर्य खचले आहे
भीतीने हदयाचे पाणी होत आहे
पाय लटपटत आहेत
शरीरांचा थरकाप होत आहे
चेहेरे पांढरेफटक पडले आहेत.
11 कोठे आहे ती सिंहाची गुहा (निनवे)?
सिंह-सिंहिणी तेथे राहात होत्या त्यांचे छावे निडर होते.
12 त्यांच्या छाव्यांना आणि सिंहिणींना तृप्त करण्यासाठी
सिंहाने (निनवेच्या राजाने) खूप लोकांना मारले
त्याची गुहा (निनवे) मानवी शरीरांनी भरली
त्याने मारलेल्या स्त्रियांनी त्यांची गुहा भरली.
13 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो,
“निनवे मी तुझ्याविरुध्द आहे
मी तुझे रथ जाळून टाकीन
लढाईत मी तुझ्या छाव्यांना ठार मारीन
तू पुन्हा पृथ्वीवर कोणाचीही शिकार करणार नाहीस
तुझ्या दूतांकडून पुन्हा कधीही लोकांना
वाईट बातमी ऐकावी लागणार नाही.”
देव त्याच्या लोकांना उत्तर देईल
18 त्यांनी नेहमी आशा न सोडता प्रार्थना करावी व ती करण्याचे कधीच सोडू नये हे शिकविण्यासाठी त्याने त्यांना एक बोधकथा सांगितली. 2 तो म्हणाला, “एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे लोकांना मानही देत नसे. 3 त्या नगरात एक विधवा होती. ती वारंवार येत असे व न्यायाधीशाला म्हणत असे, ‘माझ्या विरोधकांविरुद्ध मला न्याय मिळेल असे बघा!’ 4 काही काळ त्याची इच्छा नव्हती पण शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, ‘मी जरी देवाला भीत नाही व लोकांना मान देत नाही. 5 तरीही ती विधवा मला त्रास देत असल्याने तिला न्याय मिळेल असे मी करतो, यासाठी की ती वारंवार येऊन मला बेजार करणार नाही.’”
6 मग प्रभु म्हणाला, “अनीतिमान न्यायाधीश काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या. 7 आणि मग जे देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करावयास वेळ लावील काय? 8 मी तुम्हांस सांगतो, तो त्यांना न्याय देईल. तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येतो, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
देवाबरोबर योग्य ते संबंध असणे
9 अशा लोकांना जे स्वतःनीतिमान असल्याचा अभिमान बाळगत होते व इतरांना कमी लेखत होते, अशा लोकांसाठी येशूने ही गोष्ट सांगितली. 10 “दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. एक परुशी होता व दुसरा जकातदार होता. 11 परुशी उभा राहिला व त्याने अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, इतर लोकांसारखा म्हणजे चोर, फसविणारा, व्यभिचारी व या जकातदारासरखा मी नाही. 12 उलट मी आठवड्यातून दोनदा उपास करतो, व माझ्या सर्व उत्पन्नाचा दहावा भाग देतो.’
13 “परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहिला व आपले डोळे स्वर्गाकडे वर न उचलता आपली छाती बडवीत म्हणाला, ‘हे देवा, मज पापी माणसावर दया कर!’ 14 मी तुम्हांला सांगतो हा मनुष्य, त्या दुसऱ्या माणसापेक्षा नितीमान ठरुन घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला नीच केले जाईल आणि जो कोणी स्वतःला नीच करतो त्याला उंच केले जाईल.”
देवाच्या राज्यात कोण प्रवेश करील?(A)
15 आणि ते आपल्या बालकांनादेखील त्याच्याकडे आणीत यासाठी की त्याने त्यांना स्पर्श करावा. पण जेव्हा शिष्यांनी हे पाहिले तेव्हा ते त्यांना दटावू लागले. 16 पण येशूने बाळकांना त्याच्याकडे बोलाविले आणि म्हणाला, “बालकांना मजकडे येऊ द्या. त्यांना अडवू नका. कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. 17 मी खरोखर तुम्हांला सांगतो, जो कोणी देवाच्या राज्याचा बालकासारखा स्वीकार करीत नाही. त्याचा स्वर्गात प्रवेश होणार नाही.”
एक श्रीमंत मनुष्य येशूला प्रश्न विचारतो(B)
18 एका यहूदी पुढाऱ्याने त्याला विचारले, “उत्तम गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी मी काय करु?”
19 येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणीही उत्तम नाही. 20 तुला आज्ञा माहीत आहेतः ‘व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’” [a]
21 तो पुढारी म्हणाला, “या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणापासून पाळल्या आहेत.”
22 जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्याला म्हणाला, “तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची उणीव आहे: तुझ्याजवळचे सर्व काही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल. मग ये. माझ्या मागे चल.” 23 पण जेव्हा त्या पुढाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दु:खी झाला, कारण तो फार श्रीमंत होता.
24 जेव्हा येशूने पाहिले की, तो दु:खी झाला आहे, तो म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! 25 होय, श्रीमंत माणसाचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाने सुईच्या छिद्रातून जाणे सोपे आहे.”
कोणाचे तारण होईल?
26 नंतर ज्या लोकांनी हे ऐकले, ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होईल?”
27 येशू म्हणाला, “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”
28 मग पेत्र म्हणाला, “पाहा, आमच्याकडे जे होते, ते सर्व सोडून आम्ही तुमच्यामागे आलो आहोत.”
29 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांस खरे सांगतो, असा कोणीही नाही की ज्याने देवाच्या राज्यासाठी आपले घर किंवा पत्नी कींवा भाऊ, किंवा आईवडील सोडले आहेत, त्यांस या काळात व 30 येणाऱ्या काळातील अनंतकाळात याच्यापेक्षा कित्येक पटींनी मिळाले नाही.”
येशू मरणातून उठेल(C)
31 येशूने बारा प्रेषितांना बाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला, “ऐका! आपण वर यरुशलेमास जात आहोत आणि भविष्यवाद्यांनी मनुष्याच्या पुत्राविषयी जे काही लिहिले होते ते पूर्ण होईल. 32 होय, त्याला विदेश्यांच्या हाती धरुन देण्यात येईल, त्याची कुचेष्टा होईल, त्याची निंदा करतील, त्याच्यावर थुंकतील. 33 ते त्याला चाबकाचे फटके मारुन रक्तबंबाळ करुन ठार करतील. आणि तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठेल.” 34 शिष्यांना यातील काहीही कळाले नाही. कारण हे वचन त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. आणि तो कशाविषयी बोलत आहे हे त्यांना माहीत नव्हते.
येशू एका आंधळ्यास बरे करतो(D)
35 येशू यरीहोजवळ येत असताना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता. 36 जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या समुदायाचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले हे काय चालले आहे.
37 त्यांनी त्याला सांगितले की, “नासरेथकर येशू जात आहे.”
38 तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर!”
39 जे पुढे चालले होते त्यांनी त्याला गप्प राहण्यास सांगितले. परंतु तो आणखी मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!”
40 येशू थांबला, आणि त्याने आंधळ्याला आपणांकडे आणण्याची आज्ञा केली, जेव्हा आंधळा जवळ आला, तेव्हा येशूने त्याला विचारले, 41 “तुला काय हवे?”
आंधळा मनुष्य म्हणाला, “प्रभु, मला परत दृष्टी प्राप्त व्हावी.”
42 येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टि येवो: तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
43 तत्काळ त्याला दृष्टि आली आणि देवाचे गौरव करीत तो येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुति केली.
2006 by World Bible Translation Center