Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 इतिहास 1

विवेकबुध्दीसाठी शलमोनाची प्रार्थना

परमेश्वर देवाची शलमोनाला साथ असल्यामुळे दाविदाचा पुत्र शलमोन एक बलाढ्य राजा झाला. परमेश्वराने शलमोनाला थोर केले.

शलमोन सर्व इस्राएल लोकांशी म्हणजेच, सरदार, अधिकारी, न्यायाधीश, इस्राएलमधील प्रमुख मंडळी या सर्वांशी बोलला. मग तो आणि त्याच्या बरोबरची ही सर्व मंडळी गिबोन येथील उच्चस्थानी गेली. परमेश्वराचा सभामंडप तेथे होता. परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएल लोक वाळवंटात असताना मोशेने तो बनवला होता. दावीदाने परमेश्वराचा करारकोश किर्याथ यारीमाहून यरुशलेम येथे आणला होता. यरुशलेममध्ये तो ठेवण्यासाठी दावीदाने जागा तयार केली होती. करारकोशासाठी त्याने यरुशलेममध्ये तंबू उभारला होता. उरीचा मुलगा बसलेल याने पितळी वेदी केली होती. ती वेदी गिबोन येथील परमेश्वराच्या निवसमंडपासमोर होती. म्हणून शलमोन आपल्या बरोबरच्या इस्राएल लोकांसह गिबोन येथे परमेश्वराचा सल्ला घेण्यासाठी गेला. परमेश्वराच्या निवासमंडपासमोरील पितळी वेदी वर शलमोनाने 1,000 होमार्पणे केली.

त्यारात्री देवाने शलमोनाला दर्शन दिले. तो म्हणाला, “शलमोन, मी तुला काय द्यावे अशी तुझी इच्छा आहे ते मला माग.”

शलमोन परमेश्वराला म्हणाला, “माझे वडील दावीद यांच्यावर तुझी फार कृपा दृष्टी होती. त्यांच्याजागी तू मला नवीन राजा म्हणून निवडलेस. आता, हे परमेश्वर देवा, त्यांना तू दिलेले वचन पूर्ण कर. एका फार मोठ्या राष्ट्राचा तू मला राजा केले आहेस. त्यातील प्रजेची संख्या धरतीवरील रजःकणांसारखी विपुल आहे. 10 एवढ्या लोकांना उचित मार्गाने नेण्यासाठी मला शहाणपण आणि ज्ञान दे. तुझ्या मदतीखेरीज एवढ्या बहुसंख्य लोकांवर राज्य करणे कोणालाच जमणार नाही.”

11 तेव्हा परमेश्वर शलमोनाला म्हणाला, “तुझे म्हणणे बरोबर आहे. तू धनसंपत्ती, ऐश्वर्य किंवा मानसन्मान यांची मागणी केली नाहीस. शत्रूंचा नि:पात व्हावा असेही मागितले नाहीस. स्वतःसाठी दीर्घायुष्य मागितले नाहीस. यापैकी काहीही न मागता ज्यांचा मी तुला राजा केले त्या प्रजेसाठी धोरणीपणाने निर्णय घेता यावेत म्हणून तू शहाणपण आणि ज्ञान मागितलेस. 12 तेव्हा ते मी तुला देईनच पण त्याखेरीज मालमत्ता, ऐश्वर्य आणि मानसन्मानही देईन. तुझ्या आधीच्या कोणाही राजाला मिळाले नसेल एवढी संपत्ती व मानसन्मान देईन. पुढेही तुझ्याएवढे कोणत्याही राजाला मिळणार नाही.”

13 तेथून शलमोन गिबोन येथे उच्चस्थानी गेला. सभामंडपाकडून तो पुन्हा राजाची कर्तव्ये पार पाडण्यासाठी यरुशलेम येथे गेला.

शलमोनाचे सैन्यबल आणि संपत्ती

14 शलमोनाने सैन्यासाठी घोडे आणि रथ यांची जमवाजमव सुरु केली. त्याच्याकडे 1,400 रथ आणि 12,000 घोडेस्वार जमा झाले. त्यांना त्याने पागा आणि रथांसाठी जागा असलेल्या नगरांमध्ये ठेवले. काहींना त्याने आपल्याजवळ यरुशलेम येथेच ठेवून घेतले. 15 यरुशलेममध्ये त्याने चांदीसोन्याचा भरपूर साठा केला.सोने चांदी सामान्य दगडांसारखी विपुल होती तर गंधसरुचे लाकूड पश्चिमेकडच्या डोंगराळ भागात उंबराचे लाकूड असे तितके विपुल होते. 16 मिसर आणि क्यू येथून शलमोनाने घोडे आणवले होते. राजाचे व्यापारी क्यू येथे घोड्यांची खरेदी करत. 17 या व्यापाऱ्यांनी मिसरमधून 600 शेकेल चांदीला एकेक रथ आणि 150 शेकेल चांदीला घोडा या प्रमाणे ही खरेदी केली. हित्ती आणि अरामी राजांना मग ते हे रथ आणि घोडे विकत.

1 योहान 1

जगाच्या सुरुवातीपासून हे होते. हे आम्ही ऐकले आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे. आम्ही ते निरखून पाहिले आहे. आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे. जो शब्द जीवन देतो त्याविषयी आम्ही बोलत आहोत. ते जीवन आम्हास प्रकटविण्यात आले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो; आणि त्या अनंतकाळच्या जीवनाविषयी आम्ही तुम्हांला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याबरोबर होते आणि ते आम्हाला प्रकटविण्यात आले. आम्ही ते पाहिले आहे व ऐकले आहे आणि आम्ही आता ते तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमचीही आमच्यासह सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे. म्हणून आम्ही तुम्हांला या गोष्टींविषयी लिहीत आहोत. यासाठी की तुमचा आनंद पूर्ण व्हावा.

देव आमच्या पापांची क्षमा करतो

आणि हा संदेश आहे जो आम्ही येशू ख्रिस्ताकडून ऐकला आहे आणि जो आम्ही तुम्हाला घोषित करीत आहोत. देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही. जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही राहतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व आम्ही सत्याला अनुसरत नाही. पण जर आम्ही प्रकाशात चालतो, जसा देव प्रकाशात आहे तर आमची विश्वासणारे या नात्याने एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करते.

जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवीत आहोत. आणि आमच्यामध्ये सत्य नाही. जर आम्ही आमची पापे कबूल करतो, तर आमच्या पापांपासून आम्हांला क्षमा करण्यास देव विश्वासू व न्यायी आहे. आणि आमच्या सर्व अनीतीपासून तो आम्हाला शुद्ध करतो. 10 जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही तर आम्ही देवाला लबाड ठरवितो. आणि त्याचा संदेश आमच्या अंतःकरणात नाही.

मीखा 7

लोकांच्या दुष्कृत्यांमुळे मीखा अस्वस्थ झाला आहे

मी अस्वस्थ झालो आहे कारण माझी स्थिती गोळा केलेल्या फळासारखी
    आणि अगोदरच द्राक्षे तोडल्यामुळे खाण्यासाठी द्राक्षे शिल्लक नाहीत तशी झाली आहे.
खाण्यासाठी द्राक्षे शिल्लक नाहीत.
    मला आवडणारी पहिल्या बहराची अंजिरे अजिबात नाहीत.
ह्याचाच अर्थ, सर्व प्रामाणिक लोक गेलेत.
    ह्या देशात चांगले लोक उरले नाहीत.
प्रत्येकजण कोणाला तरी ठार मारण्यासाठी टपला आहे.
    प्रत्येकजण आपल्या भावाला सापळ्यात अडकविण्याच्या प्रयत्नात आहे.
लोक दोन्ही दोन्ही हातांनी दुष्कृत्ये करण्यात पटाईत आहेत.
    अधिकारी लाच मागतात.
    न्यायालयातील निकाल बदलण्यासाठी न्यायाधीश पैसे घेतात.
“मोठे नेते” चांगले आणि न्याय निर्णय घेत नाहीत.
    ते मनात येईल ते करतात.
त्यांच्यातील अतिशय चांगलाही काटेरी झुडुपाप्रमाणे आहे.
    ते गुंत्तागुंत असलेल्या कोटेरी झुडुपापेक्षा वाकडा (कपटी) आहे.

शिक्षेचा दिवस येत आहे

हा दिवस येईल असे तुमच्या संदेष्ट्यांनी सांगितले होते.
    तो तुमच्या पहारेकऱ्यांनी सांगितलेला दिवस आला आहे.
आता तुम्हाला शिक्षा होईल.
    तुमचा गोधंळ उडेल.
तुमच्या शेजाऱ्यांवर विश्वास ठेवू नका.
    मित्रावरही विश्वासून राहू नका.
तुमच्या पत्नीशीसुध्दा मनमोकळे बोलू नका.
स्वतःच्या घरातील माणसेच वैरी होतील.
    मुलगा वडिलांना मान देणार नाही.
मुलगी आईविरुध्द जाईल.
    सून सासूच्या विरोधात जाईल.

परमेश्वर रक्षणकर्ता आहे

म्हणून मी मदतीसाठी परमेश्वराकडे पाहतो.
    परमेश्वराने माझे रक्षण करावे म्हणून मी वाट पाहतो.
    माझा परमेश्वर माझे ऐकेल.
मी पडलो आहे.
    पण शत्रूंनो, मला हसू नका.
मी पुन्हा उठेन आता मी अंधारात बसतोय
    पण परमेश्वरच माझा प्रकाश होईल.

परमेश्वर क्षमा करतो

मी परमेश्वराविरुध्द पाप केले.
    म्हणून तो माझ्यावर रागावला.
पण न्यायालयात तो माझ्यासाठी माझ्या दाव्यात वाद घालेल.
    माझ्यासाठी योग्य गोष्टी तो करील.
मग तो मला बाहेर उजेडात आणील.
    मग मला त्याचे बरोबर आहे हे कळेल.
10 माझा शत्रू मला म्हणाला:
    “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?”
पण माझा शत्रू ही पाहील आणि तो लज्जित होईल.
    त्यावेळी मी तिला हसेन. [a]
रस्त्यातील चिखलावरुन चालावे.
    तसे लोक त्याला तुडवीत चालतील.

यहूद्यांचे परत येणे

11 तुमचे तट परत बांधण्याची वेळ येईल.
    त्या वेळेला, देशाचा विस्तार होईल.
12 तुमचे लोक तुमच्या देशात परत येतील.
    ते अश्शूर आणि मिसरमधील गावे येथून परततील.
ते मिसरमधून व फरात नदीच्या
    पैलतीरावरुन येतील.
पश्चिमेकडच्या समुद्राकडून
    आणि पूर्वेच्या पर्वतांतून ते येतील.

13 देशात राहणाऱ्या लोकांमुळे
    व त्यांच्या कृत्यांमुळे देशाचा नाश झाला आहे.
14 म्हणून तुझ्या दंडाने लोकांवर राज्य कर.
    तुझ्या मालकीच्या लोकांच्या समुदायावर राज्य कर.
तो लोकांचा समुदाय एकटाच रानात
    आणि कर्मेल पर्वतावर राहतो.
पूर्वीप्रमाणेच तो बाशान
    व गिलाद यांच्यामध्ये रातो.

इस्राएल त्याच्या शत्रूचा पाडाव करील

15 तुम्हाला मिसरमधून बाहेर आणताना मी खूप चमत्कार केले.
    त्यांच्यासारखे आणखी चमत्कार मी तुम्हाला दाखवीन.
16 राष्ट्रे ते चमत्कार पाहून
    लज्जित होतील.
माझ्या तुलनेत त्यांची “शक्ती” काहीच नाही,
    हे त्यांना दिसेल.
ते विस्मयचकित होतील
    आणि आश्चर्याने तोंडावर हात ठेवतील.
कान झाकून घेऊन
    ते ऐकण्याचे नाकारतील.
17 ते सापाप्रमाणे मातीत सरपटतील.
    भीतीने थरथर कापतील.
जमिनीत राहणाऱ्या किड्यांप्रमाणे
    आपल्या बिळातून प्रभूकडे,
    आपल्या परमेश्वराकडे, यायला लागतील.
हे परमेश्वरा, ते तुला घाबरतील आणि मान देतील.

परमेश्वराची स्तुती

18 परमेश्वरा तुझ्यासारखा दुसरा देव नाही.
    पापी लोकांनाही तू क्षमा करतोस.
    तुझ्या वाचलेल्या लोकांनाही तू क्षमा करतोस.
परमेश्वर अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणारा नाही.
    का? कारण त्याला दयाळू व्हायला आवडते.
19 तो परत येईल व आमचे सांत्वन करील.
    तो आमच्या पापांचा चुराडा करील आणि आमची पापे खोल समुद्रात फेकून देईल.
20 हे देवा, याकोबशी प्रामाणिक राहा.
    अब्रहामबद्दल तुला असलेले खरे प्रेम दाखव.
    फार पूर्वी तू आमच्या पूर्वजांना दिलेले वचन पाळ.

लूक 16

खरी संपत्ती

16 येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “एक श्रीमंत मनुष्य होता. त्याचा एक कारभारी होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो. असे त्या श्रीमंत माणसाला सांगण्यात आले. म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्याला आत बोलावले आणि म्हणाला, ‘हे मी तुझ्याविषयी काय ऐकत आहे तुझ्या कारभाराचा हिशेब दे, कारण यापुढे कारभारी म्हणून तुला राहता येणार नाही.’

“तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला, ‘मी काय करु? माझे मालक माझे कारभाऱ्याचे काम काढून घेत आहेत. शेतात कष्ट करण्याइतका मी बळकट नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते. मी काय करावे हे मला माहीत आहे. यासाठी की जेव्हा मला कारभाऱ्याच्या कामावरुन काढून टाकतील, लोक मला त्यांच्या घरांमध्ये घेतील.’

“मग त्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, ‘तू माइया मालकाचे किती देणे लागतोस?’ तो म्हणाला, ‘चार हजार लीटर जैतून तेल.’ मग तो त्याला म्हणाला, ‘तुझी पावती घे बघू, खाली बस आणि लवकर त्यावर दोन हजार लीटर लिही.’

“मग दुसऱ्याला तो म्हणाला, ‘आणि तुझे किती देणे आहे?’ तो म्हणाला, ‘तीस हजार किलो गहू.’ तो त्याला म्हणाला, ‘तुझी हिशेबाची पावती घे व त्यावर पंचवीस हजार किलो लिही.’

“आणि मालकाने त्या अप्रामाणिक कारभाऱ्याची प्रशंसा केली. कारण तो धूर्तपणे वागला होता. या जगाचे पुत्र त्यांच्यासारख्यांशी वागताना प्रकाशाच्या पुत्रांपेक्षा अधिक धूर्ततेने वागतात.

“मी तुम्हांस सांगतो, तुमच्यासाठी तुमच्या ऐहिक संपत्तीने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा ते संपेल तेव्हा ते तुमचे अनंतकाळच्या घरात स्वागत करतील. 10 ज्या कोणावर थोडा विश्वास ठेवणे शक्य आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवला जाण्याची शक्यता आहे. व जो कोणी थोडक्याविषयी अविश्वासू आहे तो अधिकाविषयीसुद्धा अविश्वासू आहे. 11 “म्हणून जर तुम्ही ऐहिक संपत्तीविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या संपत्तीविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील? 12 जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हांस कोण देईल?

13 “कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो द्वेष करील व दुसऱ्यावर तो प्रेम करील किंवा एकाशी तो प्रामाणिक राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करु शकणार नाही.”

देवाचे नियमशास्त्र बदलणे शक्य नाही(A)

14 मग जे परुशी धनलोभी होते, त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी त्याचा उपहास केला. 15 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता दाखविता, पण देव तुमची अंतःकरणे ओळखतो. जे लोकांना महत्त्वाचे वाटते ते देवाच्या दृष्टीने टाकावू आहे.

16 “नियमशास्त्र व संदेष्टे योहानापर्यंत होते, तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली जात आहे. व प्रत्येक जण त्यात घुसण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. 17 एकवेळ आकाश व पृथ्वी नाहीशी होणे शक्य होईल पण नियमशास्त्राचा एक काना मात्राही नाहीसा होणार नाही.

घटस्फोट आणि पुनर्विवाह

18 “जो कोणी आपल्या पत्नीस सूटपत्र देतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो व्याभिचार करतो आणि जो कोणी एखाद्या स्त्रीशी- जिला तिच्या पतीने टाकलेले आहे तिच्याशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.”

श्रीमंत मनुष्य व लाजार

19 “एक मनुष्य होता. तो श्रीमंत होता. तो जांभळी आणि तलम वस्त्रे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐषारामात घालवीत असे. 20 त्याच्या फाटकाजवळ लाजार नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता. त्याच्या अंगावर फोड भरलेले होते. 21 त्या श्रीमंत मनुष्याच्या टेबलावरुन खाली पडलेले असेल ते खाण्याची तो आतुरतेने वाट पाही. कुत्रीदेखील येऊन त्याचे फोड चाटीत असत.

22 “मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला, व देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्याला पुरले गेले. 23 आणि अधोलोकात. जेथे तो (श्रीमंत मनुष्य) यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले, व दूरवर असलेल्या अब्राहामाला पाहिले आणि लाजाराला त्याच्या शेजारी पाहिले, 24 तो मोठ्याने ओरडला, ‘पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजाराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या अग्नीत मी भयंकर वेदना सहन करीत आहे.!’

25 “परंतु अब्राहाम म्हणाला, ‘माझ्या मुला, लक्षात ठेव की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजाराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता येथे तो समाधानात आहे व तू दू:खात आहेस. 26 आणि या सगळ्याशिवाय, तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की, येथून तुमच्याकडे ज्यांना जायचे आहे त्यांना जाता येऊ नये व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येऊ नये.’

27 “तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, ‘मग तुला मी विनंति करतो की पित्या, लाजाराला माझ्या पित्याच्या घरी पाठव, 28 कारण मला पाच भाऊ आहेत. त्याला त्यांना तरी सावध करु दे. म्हणजे ते तरी या यातनेच्या ठिकाणी येणार नाहीत.’

29 “पण अब्राहाम म्हणाला, ‘त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’

30 “तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, ‘नाही, पित्या अब्राहामा, मेलेल्यातील कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.’

31 “अब्राहाम त्याला म्हणाला, ‘जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मेलेल्यांतून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.’”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center