Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 29

मंदिराच्या बांधकामासाठी दाने

29 राजा दावीद सर्व इस्राएल समुदायाला म्हणाला, “देवाने शलमोनाला निवडले आहे. शलमोन अजून कोवळा तरुण आहे. या कामासाठी काय करायला लागेल त्याची त्याला पूर्ण कल्पना नाही. पण हे काम फार महत्वाचे आहे. हे घर काही सामान्य माणसाचे नव्हे; ते परमेश्वराचे देवाचे निवासस्थान आहे. माइया देवाच्या मंदिराची योजना करण्यात मी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. सर्व वस्तूंसाठी लागणारे सोने-चांदी, पितळ मी दिलेले आहे. एवढेच नव्हे तर लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी सामानासाठी लाकूड जडावाच्या कामासाठी गोमेद, पाषाण, विविधरंगी मौल्यवाने रत्ने आणि शुभ्र संगमरवर हे ही देऊ केले आहे. परमेश्वराच्या मंदिरासाठी अशा अनेकविध गोष्टी मी दिल्या. हे देवाचे मंदिर बांधून व्हावे असे मला मनापासून वाटते म्हणून सोन्या चांदीची माझी ठेवही मी देत आहे. पवित्र मंदिरासाठी मी हे करत आहे. 110 टन ओफीरचे शुध्द सोने, 260 टन निर्भेळ चांदी मी दिली. मंदिराच्या भिंती या चांदीने मढवायच्या आहेत. कुशल कारागिरांनी मंदिरातील तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू कराव्या म्हणून त्यासाठी लागणारे सोनेरुपे मी दिले. आता तुम्हा इस्राएलींपैकी किती जण आज परमेश्वरासाठी काही द्यायला तयार आहात?”

तेव्हा, वडीलधारी मंडळी, इस्राएल घराण्यांचे प्रमुख सरदार, अधिकारी, राजसेवेतील कारभारी यासर्वांनी आपापल्या बहुमोल वस्तू देणगीदाखल दिल्या. देवाच्या निवासस्थानासाठी त्यांनी दिलेल्या वस्तू पुढीलप्रमाणे: 190 टन सोने, 375 टन चांदी, 675 टन पितळ, आणि 3,750 टन लोखंड. ज्यांच्याकडे मौल्यवान रत्ने होती त्यांनी ती परमेश्वराच्या मंदिरासाठी दिली. गेर्षोन घराण्यातील यहीएल याच्याकडे त्यांनी ती सुपूर्द केली. या सर्व प्रमुख मंडळींनी अगदी मनापासून आणि खुशीने, मुक्तहस्ताने दिले. त्यामुळे सर्व लोकांमध्ये आनंद पसरला. राजा दावीदालाही आनंद वाटला.

दावीदाची भावपूर्ण प्रार्थना

10 त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले. ते असे:

“हे परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, आमच्या पित्या,
    सदासर्वकाळ तू धन्य आहेस.
11 महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि सन्मान ही सर्व
    तुझीच आहेत कारण स्वर्ग-पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे.
परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे.
    या सागळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस.
12 वैभव आणि सन्मान यांचा स्रोत तूच.
    सर्वांवर तुझा अधिकार आहे.
सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत एकवटले आहे.
    कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे.
13 देवा, आम्ही तुझे आभार मानतो
    आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो.
14 या सगळ्या गोष्टी देणारा मी कोण?
किंवा हे लोक तरी कोण?
    तुझ्यामुळेच त्या आमच्याकडे आल्या.
    तुझ्याकडून मिळालेलेच आम्ही तुला परत करत आहोत.
15 आमच्या पूर्वजांप्रमाणेच आम्ही सुध्दा
    या भूतलावरचे तात्पुरते प्रवासी आहोत.
आमचे अस्तित्व ओझरत्या सावलीसारखे.
    ते थांबवणे आमच्या हाती नाही.
16 हे परमेश्वर देवा, तुझे मंदिर उभारायला या सगळ्या गोष्टी आम्ही जमा केल्या.
    तुझ्या सन्मानार्थ आम्ही हे मंदिर बांधत आहोत
पण ही सामुग्री तुझ्यामुळेच प्राप्त झालेली आहे.
    जे आहे ते सगळे तुझेच आहे.
17 हे देवा, लोकांची तू पारख करतोस
    आणि त्यांच्या भलेपणाने तुला आनंद होतो हे मी जाणतो.
मी शुध्द आणि प्रामाणिक मनाने हे
    सगळे तुला सानंद अर्पण करत आहे.
हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत
    आणि या सर्व वस्तू ते खुशीने तुला देत आहेत;
    हे मी पाहतो आहे.
18 अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या आमच्या पूर्वजांचा,
    हे परमेश्वरा, तूच देव आहेस.
त्यांनी उचित तेच करावे म्हणून तू सर्वतोपरी सहाय्य कर.
    त्यांची मने तुझ्याठायी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहावीत याची तू काळजी घे.
19 शलमोन तुझ्याशी एकनिष्ठ राहावा म्हणून त्याचे मन तुझ्याठायी स्थिर कर.
    तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे पालन त्याने करावे,
या सर्व गोष्टी कराव्या आणि
    माझ्या नियोजित मंदिराची उभारणी त्याने करावी म्हणून त्याला सात्विक मन दे.”

20 तेथे जमलेल्या सर्व लोकांना उद्देशून दावीद पुढे म्हणाला, “आता आपल्या परमेश्वर देवाला धन्यवाद द्या.” तेव्हा आपल्या पूर्वजांनी ज्याची उपासना केली त्या परमेश्वराला लोकांनी धन्यावाद दिले. राजाच्या आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ ते नतमस्तक झाले.

शलमोन गादीवर येतो

21 दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वराला यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. 1,000 गोऱ्हे, 1,000 एडके, 1,000 कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलींसाठी त्यांनी आणखीही पुष्कळ यज्ञ केले. 22 मग परमेश्वरासमोर सर्व लोकांनी खाद्यपेयांचा मनमुराद आस्वाद लुटला.

दावीदाचा मुलगा शलमोन याला त्यांनी दुसऱ्यांदा राज्याभिषेक केला. [a] राजपदासाठी शलमोनाला आणि याजक म्हणून सादोकला अभिषेक केला गेला. हे सर्व परमेश्वरासमोर झाले.

23 त्यानंतर परमेश्वराच्या राजासनावर शलमोन स्थानापन्न झाला. शलमोनाने आपल्या वडीलांची जागा घेतली. राजा म्हणून तो यशस्वी ठरला. इस्राएलचे सर्व लोक शलमोनाचे आज्ञापालन करत. 24 एकूणएक सरदार, सैनिक आणि राजा दावीदाची मुले यांना तो राजा म्हणून मान्य होता आणि ते सगळे त्याच्या आज्ञेत होते. 25 परमेश्वराने शलमोनाची भरभराट केली. परमेश्वराच्या कृपेने तो मोठा होत आहे हे इस्राएलींना ठाऊक होते. राजाला शोभेल असा दरारा परमेश्वराने त्याला प्राप्त करुन दिला. इस्राएलाच्या या आधीच्या कोणाही राजाच्या वाट्याला असे भाग्य आले नव्हते.

दावीदाचा मृत्यू

26-27 इशायाचा मुलगा दावीद याने संपूर्ण इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले. दावीद हेब्रोन नगरात सात वर्षे राजा होता. मग यरुशलेममध्ये त्याची कारकीर्द 33 वर्षांची होती. 28 पुढे वृध्द झाल्यावर दावीदाला मृत्यू आला. त्याला सफल आणि दीर्घ आयुष्य लाभले. वैभव आणि सन्मान यांची त्याला कमतरता नव्हती. त्याच्यानंतर त्याच्या मुलगा शलमोन राजा झाला.

29 राजा दावीदाचे साद्यंत वृत्त संदेष्टा शमुवेल याच्या ग्रंथात, संदेष्टा नाथानच्या ग्रंथात तसेच गाद या संदेष्ट्याचा ग्रंथात नमूद केलेले आहे. 30 इस्राएलचा राजा म्हणून त्याने जे जे केले ते सर्व या लेखनात आलेले आहे. त्याचे पराक्रम आणि त्याची कारकीर्द, इस्राएल आणि अवतीभवतीचे सर्व देश यांच्यावर या काळात गुदरलेले प्रसंग याची हकीकत या ग्रंथांमध्ये आहे.

2 पेत्र 3

येशू परत येईल

प्रिय मित्रांनो, हे दुसरे पत्र मी तुम्हाला लिहिले आहे. दोन्ही पत्रांमध्ये या गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी तुमची शुद्ध मने जागी करण्याचा प्रयत्न केला आहे. देवाच्या पवित्र संदेष्ट्यांनी वापरलेले शब्द आणि तुमच्या प्रेषितांकडून आपल्या प्रभु व तारणाऱ्याने दिलेल्या आज्ञांची तुम्ही आठवण करावी अशी माझी इच्छा आहे.

पहिल्यांदा आम्ही जे तुम्हाला सांगितले ते तुम्ही समजून घेतले पाहिजे, ते म्हणजे, शेवटच्या दिवसांत थट्टेखोर लोक येतील जे आपल्या इच्छेप्रमाणे वागतील. आणि म्हणतील, “ख्रिस्ताच्या येण्याविषयीच्या अभिवचनाचे काय झाले? आम्हाला ते जाणून घ्यायचे आहे, कारण आमचे पूर्वज मेल्यापासून प्रत्येक गोष्ट जगाच्या निर्मितीच्या पासून जशी चालत आली तशीच ती आजसुद्धा घडत आहे.”

पण जेव्हा ते असे म्हणतात, तेव्हा ते मुद्दामच विसरतात की, फार पूर्विपासून आकाश व पृथ्वी अस्तित्वात होती, जी देवाच्या शब्दाने पाण्यामधून आकारास आली. जेव्हा मागे जग अस्तित्वात होते तेव्हा याच घटकणेमुळे महापूर येऊन पृथ्वीचा नाश झाला. परंतु आता जे आकाश व पृथ्वी आहेत ती याच शब्दाने अग्निद्वारे नष्ट होण्यासाठी राखून ठेवली आहेत. त्यांना त्याच दिवसासाठी राखून ठेवण्यात आले आहे, जेव्हा अधार्मिक लोकांचा न्याय होऊन त्यांचा नाश होईल.

परंतु, प्रिय मित्रांनो, ही एक गोष्ट विसरु नका की, प्रभूला एक दिवस एक हजार वर्षांसारखा आणि एक हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. [a] देव त्याच्या अभिवचनाची परिपूर्ती करण्यासाठी उशीर लावणार नाही. जसे काही लोकांना वाटते, परंतु तो आमच्याशी धीराने वागतो. कारण आपल्यापैकी कोणाचा नाश व्हावा असे त्याला वाटत नाही. वास्तविक सर्व लोकांनी पश्चात्ताप करावा असे त्याला वाटते.

10 परंतु प्रभूचा दिवस एका चोरासारखा येईल, त्यादिवशी आकाश मोठ्या गर्जनेने नाहीसे होईल व आकाशातील सर्व गोष्टी जळून नाहीशा होतील आणि पृथ्वीवरील लोक व त्यांची कामे उघडकीस येतील. [b] 11 जर अशा प्रकारे सर्व गोष्टींचा नाश होणार आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारचे लोक असायला पाहिजे याचा विचार करा. तुम्ही आपले जीवन पवित्रतेने जगावे व देवाच्या सेवेत मग्न असावे.

12 तुम्ही प्रभुच्या येण्याच्या दिवसाची वाट पाहावी यासाठी की देवाच्या येण्याचा दिवस अधिक लवकर यावा. त्या गर्जनेने (आवाजाने) आकाश पेटून नष्ट होईल व आकाशातील सर्व गोष्टी आगीत वितळतील. 13 पण देवाच्या वचनाप्रमाणे, जथे चांगुलपणा वास करतो असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची आपण वाट पाहू.

14 म्हणून प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी तुम्ही या गोष्टींची वाट पाहत आहात, त्याअर्थी आपणास प्रभूसमोर डागरहीत, दोषरहित व शांतता टिकविण्यांचा आटोकाट प्रयत्न करा. 15 आणि ही गोष्ट मनामध्ये ठेवा की, आपल्या प्रभूचा धीर म्हणजे तारण, ज्याप्रमाणे आपला प्रिय बंधू पौल याला देवाने दिलेल्या शहाणपणामुळे त्याने तुम्हांला लिहिले. 16 त्या पत्रात, जसे इतर सर्व पत्रांत असते, त्याप्रमाणे तो या गोष्टीविषयी सांगतो. त्याच्या पत्रामध्ये काही गोष्टी आहेत ज्या समजण्यास कठीण आहेत. अज्ञानी व चंचल मनाचे लोक पवित्र शास्त्रातील इतर गोष्टींप्रमाणे या गोष्टींचादेखील विपर्यास करुन गैर अर्थ लावतात व परिणामी आपला स्वतःचा नाश करुन घेतात.

17 यासाठी, प्रिय मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी अगोदरच माहीत असल्याने स्वतःचे रक्षण करा. यासाठी की, नियमशास्त्रविरहित लोकांच्या चुकीमुळे तुम्ही भरकटत जाऊ नये आणि तुमची जी विश्वासाविषयीची अढळ भूमिका आहे, तिच्यापासून विचलित होऊ नये म्हणून संभाळा. 18 परंतु आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानात वाढत राहा. त्याला आता आणि अनंतकाळपर्यंत गौरव असो.

मीखा 6

परमेश्वराची तक्रार

परमेश्वर काय म्हणतो,
“ते आता ऐका. पर्वतांसमोर तुमची बाजू मांडा.
    टेकड्यांना तुमची हकिगत ऐकूद्या. [a]
परमेश्वराची त्याच्या लोकांविरुध्द तक्रार आहे.
    पर्वतांनो, परमेश्वराची तक्रार ऐका!
पृथ्वीचे पाये असलेल्यांनो,
    परमेश्वराचे ऐका!
इस्राएल चूक आहे,
    हे तो सिध्द करुन दाखवील.”

परमेश्वर म्हणतो, “माझ्या माणसांनो, मी काय केले ते सांगा!
    मी तुमच्या विरुध्द काही चूक केली का?
    मी तुम्हाला जगणे अवघड केले का?
मी केलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे.
    मी मोशे, अहरोन व मिर्यामला तुमच्याकडे पाठविले.
मिसर देशातून मी तुम्हाला आणले.
    दास्यातून मी तुमची मुक्तता केली.
माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याचे दुष्ट कट आठवा.
    बौराचा मुलगा बलाम, बालाकला काय म्हणाला त्याची आठवण करा.
शिट्टीमपासून गिल्गापर्यत [b] काय घडले त्याचे स्मरण करा.
    ह्या गोष्टींचे स्मरण केल्यावर तुमच्या लक्षात येऊल की परमेश्वर बरोबर होता.”

परमेश्वराला आपल्याकडून काय पाहिजे

परमेश्वराला भेटायला येताना मी काय आणले पाहिजे?
    स्वर्गातील परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मी काय केले पाहिजे?
होमार्पणे व एक वर्षाचे वासरु घेऊन मी परमेश्वरापुढे यावे का?
1,000 मेंढे व 10,000 तेलाच्या नद्या
    यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का?
माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का?
    माझ्या पोटच्या पोराला माझ्या पापांची किंमत चुकती करण्याकरिता द्यावे का?

हे माणसा, चांगुलपणा म्हणजे काय हे परमेश्वराने तुला सांगितले.
    परमेश्वर तुमच्याकडून पुढील गोष्टींची अपेक्षा करतो.
दुसऱ्यांशी न्यायाने वागा. दया व निष्ठा ह्यावर प्रेम करा.
    तुमच्या परमेश्वरापुढे नम्र होऊन राहा.
    भेटी देऊन त्याच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करु नता.

इस्राएल लोक काय करीत होते?

परमेश्वराची वाणी नगरात ओरडते:
“सुज्ञ परमेश्वराच्या [c] नामाचा मान राखतात.
    म्हणून शिक्षेच्या दंडाकडे आणि ज्याने तो धरला आहे त्याच्याकडे लक्ष द्या. [d]
10 वाईट माणसे, त्यांनी चोरलेली संपत्ती,
    अजून लपवितात का?
ज्यांच्या टोपल्या अतिशय लहान आहेत,
    त्यांना हे वाईट लोक अजूनही फसवितात का?
होय या सर्व गोष्टी अजूनही होत आहेत.
11 जे दुष्ट लोक अजूनही लोकांना
    फसवण्यासाठी वजन मापांचा उपयोग करतात त्यांना मी क्षमा करावी का?
चुकीचे माप देणारी वजने असलेली थैली वापरणाऱ्यांना मी माफ करावे का?
12 त्या नगरीतील श्रीमंत अजूनही क्रूर आहेत.
    तेथील लोक अजूनही खोटे बोलतात.
    होय, ते लोक त्यांच्या लबाड्या सांगतात.
13 म्हणून मी तुम्हाला शिक्षा करायला सुरवात केली आहे.
    तुम्ही पाप केले म्हणून मी तुमचा नाश करीन.
14 तुम्ही खाल, पण तृप्त होणार नाही.
    तुम्ही भुकेले आणि रिते राहाल [e]
लोकांना सुरक्षितेत आणण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.
    पण तुम्ही ज्यांना सोडविले त्यांना तलवारधारी लोक जीवे मारतील.
15 तुम्ही बी पेराल.
    पण तुम्हाला धान्य मिळणार नाही.
जैतुनांपासून तेल काढण्याचा तुम्ही प्रयत्न कराल,
    पण तुम्हाला तेल मिळणार नाही.
तुम्ही द्राक्षांचा चुराडा कराल
    पण तुम्हाला पुरेसा रस पिण्यास मिळणार नाही.
16 का? कारण तुम्ही अम्रीचे नियम पाळता.
अहाबचे घराणे करते त्या सर्व वाईट गोष्टी तुम्ही करता.
तुम्ही त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागता.
    म्हणून मी तुमचा नाश होऊ देईन.
तुमची नष्ट झालेली नगरी पाहून लोक विस्मयोदगार काढतील.
    माझे लाजिरवाणे लोक कैदी म्हणून
नेले जातील [f] इतर राष्ट्रे तुम्हाला लाजिरवाणे करतील.
    ती लाज तुम्हाला बाळगावी लागेल.”

लूक 15

स्वर्गातील आनंद(A)

15 सर्व पापी लोक त्याचे ऐकायला त्याच्याकडे येत होते. तेव्हा परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करु लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांचे स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर जेवतो!”

मग येशूने त्यांना ही गोष्टी सांगितली. “जर तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानांत सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय? आणि जेव्हा त्याला ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो. आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्याना एकत्र करुन म्हणतो, ‘माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरु सापडले आहे.’ मी तुम्हांस सांगतो, त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांपेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल.

“समजा एका बाईजवळ चांदीची दहा नाणी आहेत. जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय? आणि जेव्हा तिला ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’ 10 त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हांस सांगतो.”

घर सोडून गेलेला मुलगा

11 मग येशू म्हणाला, “एका मनुष्याला दोन मुलगे होते. 12 त्यापैकी धाकटा म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या.’ आणि वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये विभागली.

13 “नंतर फार दिवस झाले नाहीत तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली. 14 त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर, त्या देशांत भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली. 15 मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करु लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारावयास पाठविले. 16 तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई, पण कोणी त्याला काहीही दिले नाही.

17 “नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, ‘माझ्या पित्याच्या घरी किती तरी मजुरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे! 18 मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वार्गाविरुद्ध (देवाविरुद्ध) आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. 19 तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे ठेवा.’ 20 मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला.

मुलगा परततो

“तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्यात पडले आणि त्याचे मुके घेतले. 21 मुलगा त्यांना म्हणाला, ‘बाबा, मी स्वार्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.’

22 “परंतु वडील आपल्या नोकरांस म्हणाले, ‘त्वरा करा, चांगला झगा आणून त्याला घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. 23 आणि पुष्ट वासरु आणून कापा, आपण खाऊ आणि आनंद करु! 24 कारण हा माझा मुलगा मेला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे.’ व ते आनंद करु लागले.

मोठा मुलगा येतो

25 “त्याचा मोठा मुलगा शेतात होता. तो घराकडे निघाला. जेव्हा तो घराजवळ आला, तेव्हा त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला. 26 त्याने एका नोकराला बोलावून विचारले, ‘हे सर्व काय चालले आहे?’ 27 तो नोकर त्याला म्हणाला. ‘तुमचा भाऊ आला आहे. तो सुखरुप आला म्हणून तुमच्या वडिलांनी पुष्ट वासरु कापले आहे.’

28 “मोठा मुलगा रागावला त्याला आत जाण्याची इच्छा होईना. तेव्हा वडिलांनी येऊन त्याची समजूत काढली. 29 परंतु त्याने वडिलांना उत्तर दिले, ‘पाहा, इतकी वर्षे मी तुमचीसेवा केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी बकरीसुद्धा दिली नाही. 30 ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांसाठी उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरु कापले!’

31 “वडील त्याला म्हणाले, ‘माझ्या मुला, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. 32 आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मेला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.’”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center