Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 28

मंदिर बांधणीची राजाची योजना

28 राजाने इस्राएल लोकांमधील सर्व पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. त्यांना त्याने यरुशलेमला येण्यास सांगितले. घराण्यांचे प्रमुख, राजाचे सेनापती, अधिकारी, अंमलदार, कोठारांची गुरांची, राजपुत्रांची जबाबदारी उचलणारे राजाचे सर्व महत्वाचे अधिकारी, शूर वीर आणि लढवय्ये या सर्वांना त्याने बोलावले.

राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा करारकोश ठेवण्यासाठी एक विश्रामधाम बांधावे असा माझा मानस होता. देवाच्या पादासनासाठी एक मंदिर बांधायचा माझा विचार होता. त्या मंदिराच्या इमारतीचा आराखडाही मी तयार केला. पण देव मला म्हणाला, ‘नाही दावीदा, तू माझ्यासाठी मंदिर उभारु नयेस. तू एक लढवय्या असूत तू अनेकांना ठार मारले आहेस.’

“इस्राएलचा परमेश्वर देव याने इस्राएलच्या बारा घराण्यांची धुरा सांभाळण्यासाठी यहूदा घराण्याची निवड केली. आणि मग त्यातून परमेश्वराने माझ्या वडीलांच्या घराण्याला अग्रणी केले. आता या कुटुंबातून देवाने माझी इस्राएलचा कायमचा राजा म्हणून निवड केली. मला इस्राएलचा राजा करावे अशी परमेश्वराची इच्छा होती. देवाने मला भरपूर पुत्रसंतती दिली आहे. या मुलांमधून परमेश्वराने शलमोनला माझा उत्तराधिकारी म्हणून निवडले आहे. पण खरे पाहता इस्राएल हे परमेश्वराचेच राज्य आहे. परमेश्वर मला म्हणाला, ‘दावीदा, माझे मंदिर आणि त्या भोवतालचे आवार याची उभारणी तुझा पुत्र शलमोन याच्या हातून होईल. कारण पुढे राजासनावर तो बसणार आहे. त्यासाठी मी त्याची पुत्र म्हणून निवड केली आहे आणि मी त्याचा पिता आहे. माझ्या आज्ञा आणि नियम यांचे पालन करायला शलमोनाने सुरवात केली आहे. त्याने कसोशीने हे आज्ञापालन असेच पुढे चालू ठेवले तर त्याच्या राज्याला मी सर्वकाळ स्थैर्य देईन.’”

दावीद म्हणाला, “तर आता सर्व इस्राएल बांधवांनो, परमेश्वरासमोर आणि तुमच्यासमोर मी सांगतो की परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञा काटेकोरपणे पाळा. तरच या सुपीक भूमीवर तुम्ही नांदाल. तुमच्यानंतर तुमचे वंशजही इथेच निर्वेधपणे राहू शकतील.

“आणि शलमोना, माझ्या मुला, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. शुध्द मनाने देवाची सेवा कर. देवाच्या सेवेत मनोमन आनंद मान. कारण परमेश्वरच सर्वांच्या अंतःकरणाचा ठाव घेतो. आपले सर्व विचार त्याला कळतात. आपण मदतीसाठी परमेश्वराकडे गेलो तर आपल्याला उत्तर मिळते. पण परमेश्वराकडे पाठ फिरवली तर मात्र तो आपल्याला कायमचा सोडून जातो. 10 शलमोन, परमेश्वराने त्याचे पवित्र स्थान म्हणजे मंदिर बांधून घेण्यासाठी तुझी निवड केली आहे हे चांगले लक्षात ठेव. हिंमत बाळग आणि हे कार्य पूर्णत्वाला ने.”

11 दावीदाने मग मंदिराचा आराखडा, आपला मुलगा शलमोन याच्या स्वाधीन केला. मंदिराभोवतालचे आवार, त्यातील इमारती, कोठाराच्या खोल्या, वरच्या मजल्यावरची आणि आतल्या बाजूची दालने, दयासनाचे स्थान यांचाही त्या आराखड्यात समावेश होता. 12 मंदिराच्या सर्व भागांची योजना दावीदाने केली होती, ती त्याने शलमोनाला दिली. मंदिरा भोवतीचे अंगण आणि इतर बांधकामे यांच्या योजना दावीदाने त्याला दिल्या. मंदिराच्या कोठाराच्या खोल्या आणि मंदिराची पवित्र उपकरणे ठेवण्यासाठी असलेली भांडारगृहे यांचेही नकाशे त्यात होते. 13 याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती दावीदाने शलमोनाला दिली तसेच मंदिरातील सेवेच काम आणि त्यात वापरायची उपकरणे याबद्दलही त्याने शलमोनाला सांगितले. 14 मंदिरातील सर्व वस्तूंसाठी किती सोने-चांदी वापरायची हे सांगितले. 15 सोन्या चांदीचे दिवे आणि दिवठणी यांचे नमुने केलेले होते. त्यातील प्रत्येक दिवा आणि दिवठण यासाठी नेमके किती चांदीसोने वापरायचे याची दावीदाने शलमोनाला कल्पना दिली. वेगवेगळ्या ठिकाणी गरजेप्रमाणे या दीपमाळा वापरायच्या होत्या. 16 पवित्र भाकरी ठेवायच्या मेजासाठी किती सोने-चांदी लागेल त्याचे वजन शलमोनाला दावीदाने सांगितले. 17 काटे, कटोरे, सुरया यांना लागणारे निर्भेळ सोने, तबकांसाठी लागणारे सोने-चांदी यांचे वजन दिले. 18 धूप जाळण्यासाठी जी वेदी करायची तिला लागणारे सोने किती हे ही त्याने सांगितले. परमेश्वराच्या करारकोशावर जे करुब देवदूत आपले पंख पसरुन धरत होते त्यासह असलेले दयासन म्हणजेच देवाचा रथ याचा नमुनाही शलमोनाला त्याने दिला. हे करुब सोन्यात करायचे होते.

19 दावीद म्हणाला, “हे सर्व नमुने परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे लिहून ठेवलेले आहेत. त्या नमुन्यांतील सर्व गोष्टी परमेश्वराने मला समजावून सांगितलेल्या आहेत.”

20 दावीद शलमोनाला पुढे म्हणाला, “धीर धर आणि न भिता या कामाची सांगता कर. प्रत्यक्ष परमेश्वर, माझा देव तुझ्या सोबत आहे, तेव्हा घाबरु नको. सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला साथ देईल. ही साथ तो अर्धवट सोडणार नाही. मंदिराचे बांधकाम तू पूर्णत्वाला नेशील. 21 याजक आणि लेवी यांचे वर्ग नेमले आहेत. ते देवाच्या मंदिराच्या कामाला सज्ज आहेत. सर्वप्रकारच्या कामासाठी कुशल कारागिर तुझ्याबरोबर आहेत. तुझी प्रत्येक आज्ञा अधिकारी आणि सर्व लोक मानतील.”

2 पेत्र 2

खोटे शिक्षक

तरीही देवाच्या लोकांमध्ये खोटे होऊन गेले तसे तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असणार. ते लोकांमध्ये विध्वंसक विचार पसरवतील. आणि ज्या प्रभूने त्यांच्यासाठी स्वातंत्र्य विकत घेतले त्याचा ते स्वीकार करणार नाहीत. असे करण्याने ते स्वतःवर ताबडतोब नाश ओढवून घेतील. तसेच पुष्कळ लोक प्रखर लैंगिक वासनांच्या आहारी जाऊन अनैसर्गिक शरीर व्यवहारात गुरफटतील. त्यांच्यामुळे खऱ्या मार्गाची निंदा होईल. त्यांच्या अधाशीपणामुळे त्यांनी तयार केलेल्या शिकवणुकीने पैशांसाठी तुमची पिळवणूक करतील. फार पूर्वी देवाने त्यांना दिलेली शिक्षा ही पोकळ धमकी नाही तर त्यांचा नाश त्यांची वाट पाहत आहे.

कारण देवाने, ज्या देवदूतांनी पाप केले त्यांनादेखील सोडले नाही, तर न्यायाचा दिवस येईपर्यंत त्यांना अधोलोकाच्या गडद अंधारात टाकले.

देवाने प्राचीन काळातील जगाचीसुद्धा गय केली नाही; तेव्हा त्याने नोहाचे, ज्याने लोकांना योग्य रीतीने राहण्यासाठी उपदेश केला व त्याच्याबरोबर इतर सात लोकांचे संरक्षण केले आणि अधार्मिक लोकांनी भरलेल्या या जगावर पाण्याचा महापूर आणाला.

देवाने सदोम व गमोरा या शहरांना जाळून बेचिराख करण्याची शिक्षा दिली व भविष्यकाळात अनैतिक लोकांचे काय होईल हे या उदाहरणाने दाखवून दिले. आपल्या अनीतिच्या वागण्याने ज्या बेबंद लोकांनी लोटासारख्या चांगल्या माणसाला कष्टविले, त्याची देवाने सुटका केली. दिवसेंदिवस त्या लोकांमध्ये राहत असताना, त्या नियमविरहीत लोकांमुळे जे तो पाहत व ऐकत होता त्यामुळे त्या चांगल्या मनुष्याला आपले धार्मिक ह्रदय, फाटून जाते की काय असे त्याला वाटत होते.

अशा प्रकारे, प्रभुला, धार्मिक लोकांची त्यांच्या दु:खापासून सुटका कशी करायची हे माहीत आहे आणि त्याला माहीत आहे की न्यायाच्या दिवसापर्यंत दुष्ट लोकांना शिक्षेसाठी कसे ठेवायचे. 10 विशेषतः

जे पापमय वासनांच्या भ्रष्ट मार्गाने गेले आहेत, आणि प्रभुचा अधिकार असताना देखील उद्धटपणे व मन मानेल तसे वागणारे ते लोक गौरवी देवदूतांची निंदा करायला भीत नाहीत. 11 याउलट देवदूत जे या लोकांपेक्षा सामर्थ्याने व बळाने महान आहेत, ते देवासमोर या लोकांविरुद्ध अपमानास्पद गैर काही बोलत नाहीत. 12 परंतु हे लोक ज्यांना पकडून मारुन टाकावे अशा देहस्वभावानुसार चालणाऱ्या बुद्धीहीन पशूंसारखे आहेत. ज्या गोष्टींबद्दल ते अज्ञानी आहेत, त्याविरुद्ध हे लोक बोलतात. ज्याप्रमाणे प्राण्यांचा नाश केला जातो, त्याचप्रमाणे (खोट्या शिक्षकांचाही) नाश केला जाईल. 13 आणि त्यांनी इतरांना दुखावल्याचे आणि अन्यायाचे फळ म्हणून त्यांनाही दुखाविण्यात येईल.

भर दिवसा वाईट गोष्ट करण्यात आनंद आहे असे ते लोक मानतात. ते डाग आणि कलंक असे आहेत. ते तुमच्याबरोबर मेजवानीत सामील होताना आपल्या कपटाच्या आनंदात बेभान होतात. 14 त्यांची पापी नजर प्रत्येक स्त्रीकडे कामूकतेने वळते व असले पाप करायचे ते कधीही सोडत नाहीत. डळमळीत मनाच्या लोकांना ते भुरळ घालून पापात ओढतात त्यांची मने अधाशीपणात तरबेज झालेली असतात. ते लोक शापित आहेत.

15 सरळ वाट सोडून ते भलतीकडे भरकटत गेले आहेत. बौराचा पुत्र बलाम याच्यासारखी वाट त्यांनी धरली आहे. बलामाला अयोग गोष्टी करण्याकरिता लाच घेणे आवडत असे. 16 परंतु त्याच्या दोषामुळे त्याची कानउघडणी करण्यात आली. कधीही बोलू न शकणाऱ्या गाढवाने माणसासारखे बोलून संदेष्ट्याच्या वेडगळपणास आवर घातला.

17 हे खोटे शिक्षक पाणी नसलेले कोरडे झरे व वादळाने पांगविलेले ढग आहेत. खोल अंधारात त्यांच्यासाठी जागा राखून ठेवली आहे. 18 ते पोकळ बढाया मारतात व जे लोक चुकीचे जीवन जगणाऱ्यांच्या संगतीपासून सुटकेचा प्रयत्न करु लागले आहेत, अशांची फसवणूक करुन देहवासनांच्या अनैतिकतेचा मोह टाकतात. 19 हे जे खोटे शिक्षक आहेत ते लोकांना मोकळीक देण्याचे वचन देतात परंतु ते स्वतःच नाशवंत जीवनाचे दास आहेत. कारण एखाद्या मनुष्यावर ज्या गोष्टीचा पगडा बसलेला असतो त्याचा तो गुलाम बनतो.

20 म्हणून आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त यांची ज्या लोकांना ओळख होते, त्यांची जगाच्या दूषित वातावरणापासून सुटका होते. परंतु नंतर पुन्हा एकदा जगाचे अशुद्ध वातावरण या लोकांवर आपला पगडा बसविते. मग त्यांची शेवटची स्थिती अगोदरच्या स्थितीहून जास्तच वाईट होते. 21 त्यांना जर चांगला मार्ग माहीत झाला नसता तर चांगले झाले असते कारण चांगला मार्ग माहीत होणे आणि त्या लोकांना दिलेल्या पवित्र शिक्षणापासून त्यांनी वळणे, यापेक्षा (अगोदरची स्थिती चांगली होती.) 22 त्यांच्या बाबतीत जे घडले ते या खऱ्या म्हणीत सांगितले आहे: “आपल्याच ओकीकडे परतणारा कुत्रा” आणि दुसऱ्या म्हणीतः “स्वच्छ केले तरी चिखलात लोळणारे डुक्कर.”

मीखा 5

बलशाली नगरी, आता तुझे सैनिक गोळा कर.
    ते आपल्यावर हल्ला करण्यासाठी सभोवती जमा होत आहेत.
ते आपल्या काठीने इस्राएलच्या न्यायाधीशाच्या
    गालावर प्रहार करतील.

बेथलहेममध्ये मसीहा (तारणारा) जन्म घेईल

बेथलहेम एफ्राथा,
    तू यहूदातील सर्वात लहान गाव आहेस.
तू इतका लहान आहेस की
    तुझ्या कुटुंबाची मोजदाद करणेही अशक्य आहे.
पण “इस्राएलचा राज्याकर्ता” माझ्यासाठी तुझ्यातून येईल.
    त्याचा प्रारंभ प्राचीन काळापासून, अनंत काळापासून, झाला आहे.
परमेश्वर, त्याच्या लोकांना, सोडून देईल.
    स्त्री आपल्या मुलाला, वचनदत राजाला जन्म देईपर्यंत. [a]
मग त्याचे उरलेले भाऊ
    इस्राएलच्या लोकांकडे परत येतील.
त्यानंतर इस्राएलचा राज्यकर्ता परमेश्वराच्या सामर्थ्याने उभा राहील.
    त्याचा देव परमेश्वर याच्या विस्मयकारीक नांवाल उभा राहील आणि कळपाला चारील.
ते शांतीने राहातील.
    का? कारण त्या वेळी परमेश्वराची महानता पृथ्वीच्या टोकापर्यंत पोहोचेल.
    मग शांती नांदेल.

हो! अश्शूरचे सैन्य आपल्या देशात येईल.
    आपल्या भव्य वाड्यांचा ते नाश करतील.
पण इस्राएलचा राज्यकर्ता सात मेंढपाळ
    आणि आठ नेते निवडील.
ते आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर सत्ता गाजवतील.
    निम्रोदच्या भूमीवर, हातात तलवार घेऊन, राज्य करतील.
ते लोकांवर राज्य करण्यासाठी आपल्या तलवारीचा उपयोग करतील.
    पण इस्राएलचा राज्याकर्ता, अश्शूरीपासून आपल्याला वाचवील.
ते लोक आमच्या देशात येतील
    व आमचे भव्य वाडे पायदळी तुडवतील.
मग पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक,
    परमेश्वराकडून पडलेल्या आणि माणसांवर अवलंबून नसलेल्या दवाप्रमाणे वाटतील.
कोणासाठी पण न थांबणाऱ्या गवतावरच्या
    सरीप्रमाणे ते असतील.
पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक,
    पुष्कळांना, जंगलातील प्राण्यांमधील सिंहाप्रमाणे वाटतील.
मेंढ्यांच्या कळपांत आलेल्या तरुण सिंहाप्रमाणे ते असतील मेंढ्यांच्या कळपातून जर सिंह गेला,
    तर तो त्याला पाहिजे तेथेच जातो.
त्याने जर एखाद्या जनावरावर हल्ला केला
    तर कोणीही त्या जनावराला वाचवू शकत नाही.
वाचलेले लोक असेच असतील.
तुम्ही तुमच्या शत्रूंवर हात उचलाल
    आणि त्यांचा नाश कराल.

लोक परमेश्वरावर अवलंबून राहतील

10 परमेश्वर म्हणतो,
“त्या वेळी, मी तुमचे घोडे काढून घेईन.
    तुमचे रथ नष्ट करीन.
11 तुमच्या देशातील गावांचा मी नाश करीन.
    तुमचे सर्व किल्ले मी पाडून टाकीन.
12 तुम्ही यापुढे जादूटोणा करण्याचा प्रयत्न करणार नाही.
    तुमच्यात यापुढे भविष्य सांगण्याचा प्रयत्न करणारे नसतील.
13 मी तुमच्या खोट्या देवाच्या मूर्ती नष्ट करीन.
    त्या खोट्या देवांचे स्मारकस्तंभ मी पाडून टाकीन.
    तुमच्या हातांनी घडविलेल्या वस्तूंची तुम्ही पूजा करणार नाही.
14 अशेराच्या पूजास्तंभांचा मी नाश करीन.
    मी तुमच्या खोट्या देवांचा नाश करीन.
15 काही लोक माझे ऐकणार नाहीत.
    पण मी माझा क्रोध त्यांच्यावर प्रकट करीन.
    मी त्यांचे उट्टे काढीन.”

लूक 14

शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?

14 एका शब्बाथ दिवशी तो प्रमुख परुश्यांपैकी एकाच्या घरी जेवावयास गेला, तेव्हा तेथे असणारे लोक येशूवर बारकाईने नजर ठेवीत होते. आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता. येशूने नियमशास्त्राच्या शिक्षकांना व परुश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की कसे?” पण ते गप्प राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी माणसाला धरुन त्याला बरे केले व त्याला पाठवून दिले. मग तो त्यांना म्हणाला, “जर तुमच्यापैकी एखाद्याला एक मुलगा किंवा एक बैल आहे व तो विहीरीत पडला, तर शब्बाथ दिवशी तुम्ही त्याला ताबडतोब बाहेर काढणार नाही काय?” आणि ह्या प्रश्नाला उत्तर देणे त्यांना जमले नाही.

स्वतःला महत्त्व देऊ नका

मग त्याने पाहुण्यांना एक बोधकथा सांगितली, कारण त्याने पाहिले की, ते त्यांच्यासाठी मानाच्या जागा शोधीत होते. तो त्यांना म्हणाला, “जेव्हा एखादा तुम्हांला लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका. कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या माणसाला त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल. मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल, आणि तुम्हांला म्हणेल, ‘या माणसाला तुझी जागा दे.’ मग खजील होऊन तुम्हांला खालच्या जागी बसावे लागेल.

10 “पण जेव्हा तुम्हांला आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या (शेवटच्या) जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हांला म्हणेल, ‘मित्रा, वरच्या आसनावर येऊन बैस.’ तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझा मान होईल. 11 कारण जो कोणी स्वतःला उच्च करितो त्याला लीन केले जाईल व जो स्वतःला लीन करील त्याला उच्च केले जाईल.”

तुम्हांला बक्षीस दिले जाईल

12 मग ज्याने आमंत्रण दिले होते त्याला तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, किंवा तुझ्या नातेवाईकांना वा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल. 13 पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. 14 आणि तुला आशीर्वाद मिळतील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही असणार नाही. कारण नीतीमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”

मोठ्या मेजवानीविषयीची गोष्ट(A)

15 आता जेव्हा मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “देवाच्या राज्यात जेवतो, तो प्रत्येक जण धन्य!”

16 मग येशू त्याला म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांना आमंत्रण दिले. 17 भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना ‘या, कारण सर्व तयार आहे’ हे सांगण्यासाठी नोकराला पाठविले. 18 ते सर्वजण सबब सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपा करुन मला क्षमा कर.’ 19 दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत व त्या कशा आहेत हे बघण्यासाठी मी चाललो आहे, कृपा करुन मला क्षमा कर.’ 20 आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे, व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’

21 “म्हणून जेव्हा तो नोकर परत आला, तेव्हा त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, ‘लवकर बाहेर रस्त्यावर आणि नगारातल्या गल्ल्यांमध्ये जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’

22 “नोकर म्हणाला, ‘आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे. आणि तरीही जागा आहे.’ 23 मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांना आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरुन जाईल. 24 कारण मी तुम्हांस सांगतो की, त्या आमंत्रित केलेल्या कोणालाही माझ्या मेजवानीतली चव पाहायला मिळणार नाही.’”

प्रथम तुम्ही योजना आखा(B)

25 मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला, 26 “जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जिवाचासुद्धा द्धेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. 27 जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.

28 “जर तुम्हांपैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करुन तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे आहे की नाही हे पाहणार नाही काय? 29 नाहीतर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करु शकणार नाही. आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील, 30 ‘या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करु शकला नाही!’

31 “किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्याला मुकाबला करता येणे शक्य आहे काय? 32 जर तो त्याला तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रु दूर अंतरावर असतानाच तो शिष्टमंडळ पाठवून शांततेसाठी तहअटींची विचारणा करील.

33 “त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्याला माझा शिष्य होता येणार नाही.

तुमचा प्रभाव गमावू नका(C)

34 “मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्याला खारटपणा कशाने येईल? 35 ते पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील.

“ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको!”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center