M’Cheyne Bible Reading Plan
द्वारपालांची व्यवस्था
26 द्वारपालांचे गट: हे पहारेकरी कोरहाच्या घराण्यातील होते. त्यांची नावे अशी:
मेशेलेम्या आणि त्याची मुलेबाळे. (आसाफच्या कुळातील कोरहचा हा मुलगा.) 2 मेशेलेम्या याला मुलगे होते. जखऱ्या हा त्यांतला मोठा. यदिएल दुसरा, जबद्या तिसरा, यथनिएल चौथा 3 अलाम पाचवा, यहोहानान सहावा, एल्योवेनय सातवा.
4 आता ओबेद-अदोम, याची मुले. शामाया थोरला, अहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा, 5 अम्मीएल सहावा, इस्साखार सातवा, पउलथय आठवा. देवाची ओबेद-अदोमवर खरोखरच कृपादृष्टी होती. 6 शमाया हा ओबेद-अदोमचा मोठा मुलगा. त्यालाही पुत्रसंतती होती. हे मुलगे चांगले कणखर योध्दे असल्यामुळे त्यांची आपल्या पितृकुळावर सत्ता होती. 7 अथनी, रफाएल, ओबेद एलजाबाद, अलीहू आणि समख्या हे शमायाचे पुत्र. एलजाबादचे भाउबंद सर्व प्रकारच्या कामात कुशाल होते. 8 हे सर्व ओबेद-अदोमचे वंशज त्याची मुले, नातेवाईक असे सर्वच पुरुष पराक्रमी होते. ते सावध पहारेकरी होते. ओबेद-अदोमचे एकंदर 62 वंशज होते.
9 मेशेलेम्याचे पुत्र आणि भाऊबंद मिळून अठराजण होते. ते सर्व पराक्रमी होते.
10 मरारीच्या वंशातले द्वारपाल पुढीलप्रमाणे: त्यापैकी एक होसा. शिम्री या त्याच्या मुलाला ज्येष्ठपद दिले होते. खरे म्हणजे हा जन्माने थोरला नव्हे, पण त्याच्या वडीलांनी त्याला तो मान दिला होता. 11 हिल्कीया दुसरा. टबल्या तिसरा. जखऱ्या चौथा. होसाला मुलगे आणि भाऊबंद मिळून तेराजण होते.
12 द्वारपालांच्या गटांवर प्रमुख नेमलेले होते. आपल्या इतर भाऊबंदाप्रमाणेच द्वारपालांनाही परमेश्वराच्या मंदिरातील सेवेचे काम नेमून दिलेले होते. 13 एकेका दरवाजाच्या रक्षणाची जबाबदारी एकेका घराण्याकडे दिलेली होती. एकेका दारासाठी चिठ्ठी टाकून हे काम सोपवले गेले. त्यात वयाने लहान मोठा असा भेदभाव नव्हता.
14 शेलेम्याच्या वाटणीला पूर्वेकडचे दार आले. त्याचा मुलगा जखऱ्या याच्यासाठी नंतर चिठ्ठी टाकण्यात आली. हा सूज्ञ मंत्री होता. उत्तरेच्या द्वारासाठी त्याची निवड झाली. 15 ओबेद-अदोमच्या वाटणीला दक्षिण दरवाजा आला. मौल्यवान चीजवस्तू ठेवलेल्या भांडाराचे रक्षण करण्याचे काम ओबेद-अदोमच्या मुलांकडे आले. 16 शुप्पीम आणि होसा यांची निवड पश्र्चिम दरवाजासाठी आणि शल्लेकेथची, चढणीच्या वाटेवरील दरवाजासाठी झाली.
पहारेकरी एकमेकांलगत उभे असत. 17 पूर्व दरवाजावर सहा लेवी, उत्तर दरवाजावर चार लेवी, दक्षिण दरवाजावर चार जण, भांडाराच्या रक्षणासाठी दोन लेवी दिवसभर सतत पहारा देत. 18 पश्मिमेकडील शिवारावर चारजण पहारा देत. आणि त्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर दोन रक्षक असत.
19 कोरह आणि मरारी यांच्या घराण्यातील द्वाररक्षकांच्या गटांची यादी पुढीलप्रमाणे:
खजिणदार आणि दुसरे अधिकारी
20 अहीया हा लेवी घराण्यातील होता. देवाच्या मंदिरातील मौल्यवान चीजवस्तूंच्या कोठारावर तो प्रमुख होता. पवित्र उपकरणे ठेवलेल्या जागेची जबाबदारी अहीयावर होती.
21 लादान हा गेर्षोनच्या वंशातील. यहीएली हा लादानच्या घराण्यातील प्रमुखांपैकी एक. 22 जेथाम आणि त्याचा भाऊ योएल हे यहीएलीचे मुलगे. परमेश्वराच्या मंदिरातील मौल्यवान चीजवस्तूंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
23 अम्रामी, इसहारी, हेब्रोनी आणि उज्जियेली यांच्या कुळांमधून आणखी काही प्रमुखांची नेमणूक करण्यात आली.
24 अबुएल हा परमेश्वराच्या मंदिरातील भांडारावरचा नायक म्हणून नेमला गेला. अबुएल गेर्षोनचा मुलगा. गेर्षोम मोशेचा मुलगा. 25 अबुएलाचे भाऊबंद पुढीलप्रमाणे: अलीयेजार कडूनः रहब्या हा अलीयेजाचा मुलगा. रहब्याचा मुलगा यशया. यशयाचा मुलगा योराम. योरामचा मुलगा जिख्री. आणि जिख्रीचा मुलगा शलोमोथ. 26 दावीदाने मंदिरासाठी जे जे जमवले होते त्या सगळ्यांवर शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद यांची देखरेख होती.
सैन्यातील सरदारांनीही मंदिरासाठी वस्तू दिल्या होत्या. 27 यापैकी काही युध्दात मिळालेली लूट होती. ती त्यांनी परमेश्वराच्या मंदिराच्या कामासाठी देऊन टाकली. 28 शमुवेल हा द्रष्टा, कीशचा मुलगा शौल आणि नेरचा मुलगा अबनेर, सरुवेचा मुलगा यवाब यांनी परमेश्वराला दिलेल्या पवित्र वस्तूंची देखभालही शलोमोथ आणि त्याचे भाऊबंद करत असत.
29 कनन्या हा इसहार घराण्यातील होता. कनन्या आणि त्याची मुले यांना मंदिराबाहेरचे काम होते. इस्राएलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था आणि न्यायदान करणे ही कामे ते सांभाळत. 30 हशब्या हा हेब्रोन घराण्यातला. यार्देन नदीच्या पश्चिमेकडे पसरलेल्या इस्राएलच्या भूमीवरील परमेश्वराचे कार्य आणि राज्याचा कारभार हशब्या आणि त्याचे भाऊबंद पाहात असत. या गटात 1,700 शूर वीर होते. 31 हेब्रोन घराण्याच्या इतिहासावरुन असे दिसते की यरीया हा त्यांचा प्रमुख होता. चाळीस वर्षे राज्य केल्यावर दावीदाने जेव्हा शूर आणि कसबी पुरुषांचा शोध घेतला तेव्हा गिलाद मधल्या याजेर नगरात त्याला हेब्रोन घराण्यांत अशी माणसे आढळली. 32 आपापल्या घराण्यांचे प्रमुख आणि पराक्रमी असे असे 2,700 नातलग यरीयाला होते. परमेश्वराचे कार्य आणि राज्याचे कामकाज यांसाठी, रऊबेनी, गादी आणि मनश्शेचा अर्धावंश यांच्यावर देखरेख करणारे असे हे 2,700 जण दावीदाने नेमले.
सैन्याची व्यवस्था
27 राजाच्या सैन्यात नोकरीला असलेल्या इस्राएल लोकांची गणना अशी: त्यांचा प्रत्येक गट दर वर्षी एक महिना कामावर असे. राजाकडे चाकरीला असलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या घराण्यांचे प्रमुख, सरदार, अधिकारी, सुरक्षा-अधिपती असे सर्वजण होते. प्रत्येक सैन्यगटात 24,000 माणसे होती.
2 पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा मुलगा. याशबामच्या गटात 24,000 जण होते. 3 तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्यांचा याशबाम प्रमुख होता.
4 अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा मुख्य असून त्याच्या गटात 24,000 माणसे होती.
5 तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेनापती बनाया. हा यहोयादाया मुलगा. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली 24,000 माणसे होती. 6 तीस प्रसिध्द शूरांमधला पराक्रमी सैनिक तो हाच. त्यांचा नायकही हाच होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात प्रमुख होता.
7 चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती असाएल. हा यवाबचा भाऊ. असाएलचा मुलगा जबद्या हा पुढे आपल्या वडिलानंतर सेनापती झाला. असाएलच्या तुकडीत 24,000 जण होते.
8 शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.
9 इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हा इक्केशचा मुलगा असून तको नगरातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
10 सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस पलोनी हा होता. हा एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
11 आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हुशाथी हा होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.
12 नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबियेजेर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात 24,000 सैनिक होते.
13 दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय. हा जेरह कुळातला असून नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
14 अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया. हा पिराथोनचा असून एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या गटात 24,000 लोक होते.
15 बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
वेगवेगळ्या घराण्यांचे प्रमुख
16 इस्राएलाच्या घराण्यांचे प्रमुख असे:
रऊबेनः
जिख्रिचा मुलगा अलीयेजर.
शिमोनः माकाचा मुलगा शफट्या.
17 लेवी: कमुवेलचा मुलगा हशब्या.
अहरोनः सादोक.
18 यहूदा: अलीहू. (हा दावीदाचा एक भाऊ),
इस्साखार: मीखाएलचा मुलगा अम्री.
19 जबुलूनः ओबद्याचा मुलगा इश्माया.
नफताली: अज्रिएलचा मुलगा यरीमोथ.
20 एफ्राईम: अजऱ्याचा मुलगा होशेथ.
पश्र्चिम मनश्शे: पदायाचा मुलगा योएल.
21 पूर्व मनश्शे: जखऱ्याचा मुलगा इद्दो.
बन्यामीनः अबनेरचा मुलगा यासिएल.
22 दानः यरोहामचा मुलगा अजरेल.
हे झाले इस्राएलींच्या घराण्यांचे प्रमुख
दावीदाने केलेली इस्राएल लोकांची जनगणना
23 दावीदाने इस्राएलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्राएलची लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे देवाने आश्वासन दिलेले असल्यामुळे इस्राएलमध्ये लोकसंख्या वाढली होती. तेव्हा दावीदाने वीस वर्षे वयाचे आणि त्या पुढच्या वयाचे पुरुष गणतीसाठी विचारात घ्यायचे ठरवले. 24 सरुवेचा मुलगा यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही गणती दावीद राजाच्या बखरीत नोंदलेली नाही.
राजाने नेमलेले व्यवस्थापक
25 राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे अधिकारी पुढीलप्रमाणे:
अदीएलचा मुलगा अज्मावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता.
शेतीवाडी, नगरे, गावे आणि किल्ले इथे असलेल्या भांडारांचा प्रमुख योनाथान हा होता. हा उज्जीयाचा मुलगा.
26 कलूबचा मुलगा एज्री हा शेतात राबणाऱ्यांवरचा प्रमुख होता.
27 रामा येथील शीमी हा द्राक्षमळ्यांवरचा अधिकारी होता.
शिफम येथील जब्दी हा द्राक्षमळ्यातून निघणारा द्राक्षारस आणि त्याची साठवण यावरचा अधिकारी होता.
28 गेदेरचा बाल-हानान हा जैतूनची झाडे आणि पश्चिमे कडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता.
योवाश जैतूनच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.
29 शारोनचा शिमय हा शारोन भोवतालच्या गाईगुरांचा मुख्य होता.
अदलयचा मुलगा शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.
30 इश्माएली ओबील हा उंटांवरचा प्रमुख होता.
येहद्या मेरोनोथी गाढवांचा मुख्य होता.
31 याजीज हाग्री मेंढरांचा मुख्य होता.
राजा दावीदाच्या मालमत्तचे हे सर्व रक्षणकर्ते होते.
32 योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखनिक होता. हा दावीदाचा काका. हखमोनी याचा मुलगा यहोएल याच्यावर राजपुत्रांच्या लालनपालनाची जबाबदारी होती. 33 अहीथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अकर लोकांपैकी होता. 34 अहीथोफेलची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा मुलगा. यवाब हा राजाचा सेनापती होता.
1 ख्रिस्त येशूचा दास व प्रेषित असलेल्या शिमोन पेत्राकडून,
देवाकडून, ज्यांना तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे, मौल्यवान विश्वास आमच्या बरोबरीनेच मिळाला आहे अशांना, 2 देव आणि आपला प्रभु येशू याच्या ओळखीमुळे तुम्हाला देवाची कृपा व शांति विपुल प्रमाणात लाभो.
प्रत्येक गोष्ट जी आम्हांला पाहिजे ती देवाने दिलेली आहे
3 जे काही जीवनासंबंधी व देवाच्या भक्तीसंबंधी आहे ते सर्व आम्हाला येशूच्या दैवी सामर्थ्याने दिले आहे. कारण ज्याने आम्हाला त्याच्या स्वतःच्या गौरवाने व चांगुलपणाने बोलविले आहे त्याला आम्ही ओळखतो. 4 या गोष्टींच्या म्हणजे गौरव व चांगुलपण यांच्याद्वारे देवाने आपल्याला फार महान आणि मौल्यावान असे आशीर्वादाचे अभिवचन दिले आहे यासाठी की, त्याच्याद्वारे आम्ही देवासारखे व्हावे आणि जगातील दुष्ट लोकांच्या वासनांमुळे नाशापासून सुटका करुन घ्यावी.
5 म्हणून या कारणासाठी आपल्या कडून होता होईल ते प्रयत्न करुन देण्यात उदारपणाची, विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची, 6 ज्ञानात आत्मसंयमनाची, आत्मसंयमात धीराची आणि धीरात देवाच्या प्रामाणिक सेवेची भर घाला. 7 आणि देवाच्या प्रामाणिक सेवेस बंधूप्रीतीची व बंधुप्रीतीस प्रीतीची जोड द्या. 8 जर या सर्व गोष्टी तुमच्यात असतील व या गोष्टी वाढत असतील तर त्या तुम्हाला क्रियाशील व फळ देणारे लोक करुन आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात परिपूर्ण करतील. 9 पण ज्याच्या अंगी हे गुण नसतील तो पायापुरते पाहणारा व आंधळा ठरेल. आणि त्याच्या गतकाळतील पापापासून त्याला शुद्ध केल्याचा विसर त्याला पडला आहे.
10 म्हणून बंधूंनो, तुम्हाला देवाने खरोखरच पाचारण केले आहे आणि निवडले आहे, हे दाखविण्यासाठी अधिक उत्सुक असा. कारण जर तुम्ही या गोष्टी करता तर तुम्ही कधीही अडखळणार नाही आणि पडणार नाही. 11 आणि अशा प्रकारे आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त याच्या अनंतकाळच्या राज्यात उदारपणे तुमचे स्वागत करण्यात येईल.
12 या कारणासाठी, या गोष्टींची मी तुम्हांला सतत आठवण करुन देत राहीन. जरी तुम्हांला त्या माहीत असल्या आणि तुमच्याप्रत आलेल्या सत्यात तुम्ही चांगले स्थिरावलेले असला, 13 तरी हे सांगणे मी अगदी योग्य समजतो की, जोपर्यंत या शरीराने मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हांला आठवण करुन देऊन जागे ठेवणे योग्य आहे. 14 कारण मला माहीत आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला हे स्पष्ट केले आहे की, लवकरच मला हे शरीर सोडावे लागणार आहे. [a] 15 म्हणून या जीवनातून गेल्यानंतर या गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी मी सर्व प्रंसगी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन.
आम्ही ख्रिस्ताचे वैभव पाहिले
16 कारण आपल्या प्रभु येशूच्या सामर्थ्ययुक्त आगमनाविषयी जेव्हा आम्ही तुम्हांला सांगितले, तेव्हा अक्क लहुशारीने बनवलेल्या भाखडकथांवर आम्ही विसंबून राहिलो नाही. उलट आम्ही आमच्या डोळ्यांनी त्याची महानता पाहिली. 17 कारण त्याला सन्मान व गौरव ही देवपित्याकडून प्राप्त झालीत, तेव्हा उदात्त गौरवाने अशी वाणी त्याच्याकडे आली: “हा माझा प्रिय पुत्र आहे याजविषयी मी संतुष्ट आहे.” 18 आणि त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना [b] ही वाणी स्वर्गातून येत असताना आम्ही स्वतः ऐकली.
19 आम्ही संदेष्ट्यांचे भविष्यवचन अती विश्वासनीय असे समजून त्यास मान देतो. त्याकडे लक्ष देऊन तुम्ही फार चांगले करता, कारण अगदी अंधारात प्रकाशणाऱ्या दीपाप्रमाणे ते दिसते म्हणून दिवस उजाडून प्रभात तारा तुमच्या अंतःकरणात प्रकाशेपर्यंत तुम्ही त्याकडे ध्यान देऊन पाहाल तर चांगले होईल. 20 प्रथम तुम्ही हे समजले पाहिजे की, पवित्र शास्त्रातील कोणतेही भविष्यवचन कोणाही मनुष्याच्या बुद्धीने उकलत नाही. 21 कारण एखाद्या मनुष्याला पाहिजे म्हणून भविष्यवाणी झालेली नाही, तर जे लोक पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले होते, त्यांनीच ती लोकांपर्यंत पोहचविलेली आहे.
यरुशलेममधून नियमशास्त्र येईल
4 शेवटल्या दिवसांत, देवाचे मंदिर ज्या पर्वतावर आहे, तो पर्वत सर्व पर्वतांत उंच असेल.
टेकड्यांपेक्षा तो उंच होईल.
आणि तिथे जाणाऱ्या लोकांचा प्रवाह सतत वाहत राहील.
2 तेथे पुष्कळ देशातले लोक जातील.
ते म्हणतील, “या! आपण परमेश्वराच्या पर्वतावर जाऊ या.
याकोबच्या देवाच्या मंदिरात आपण जाऊ या.
मग परमेश्वर आपल्याला त्याचा आचारधर्म शिकवील
व आपण त्याचे अनुसरण करु.”
परमेश्वराच्या शिकवणुकीचा आणि परमेश्वराच्या संदेशाचा प्रारंभ यरुशलेममधून सियोन पर्वतावरुन होईल.
मग तो सर्व जगात पसरेल.
3 तेव्हा सर्व राष्ट्रांतील लोकांचा परमेश्वर न्यायाधीश असेल.
दूरच्या देशातील पुष्कळ लोकांमधील वाद परमेश्वर मिटवील.
ते लोक लढण्यासाठी शस्त्रे वापरण्याचे सोडून देतील.
ते त्यांच्या तलवारीपासून नांगर बनवतील
आणि भाल्यांचा उपयोग झाडे छाटण्यासाठी करतील.
लोक एकमेकांशी लढाई करणार नाहीत.
लोकांना कधीही युध्दाचे शिक्षा दिले जाणार नाही.
4 प्रत्येकजण आपल्या द्राक्षवेलीखाली
व अंजिराच्या झाडाखाली बसेल.
त्यांना कोणीही घाबविणार नाही.
का? कारण सर्व शक्तिमान परमेश्वराने असे घडेल म्हणून सांगितले आहे.
5 दुसऱ्या राष्ट्रातील लोक आपापल्या दैवतांना अनुसरतात.
पण आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे नाव घेत सदासर्वकाळ चालत राहू.
राज्य परत आणले जाईल
6 परमेश्वर म्हणतो,
“यरुशलेमला दुखापत झाली व ती लंगडी झाली.
ती दूर फेकली गेली
तिला दुखविले गेले व शिक्षा झाली.
पण मी तिला माझ्याकडे परत आणीन.
7 “त्या लंगड्या नगरीतील लोकच
वाचतील एके काळी
त्या नगरीतील लोकांना बळजबरीने ती नगरी सोडावी लागली.
पण मी त्यांचे एक बलशाली राष्ट्र करीन.”
परमेश्वर त्यांचा राजा असेल.
तो सियोन पर्वतावरुन चिरंतन काळापर्यत राज्य करील.
8 आणि तू, कळपाच्या मनोऱ्या,
तुझी वेळ येईल.
योफल, सियोनच्या टेकाडा,
तू पुन्हा शासनाची जागा होशील.
हो! पूर्वीप्रमाणेच राज्य
यरुशलेममध्ये असेल.
इस्राएल लोकांनी बाबेलला का जायला पाहिजे?
9 आता, तू एवढ्या मोठ्याने का रडत आहेस?
तुझा राजा गेला का?
तुझ्या नेत्याला तू गमावलेस का?
प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीप्रमाणे तुला त्रास होत आहे.
10 सियोनच्या कन्ये, तुला वेदना जाणवू दे.
तू आपल्या बाळाला जन्म दे.
तुला या नगरीतून (यरुशलेममधून) बाहेर गेलेच पाहिजे.
तू रानात राहशील.
मला असे म्हणायचे आहे की तू बाबेलला जाशील.
पण त्या ठिकाणापासून तुझे रक्षण केले जाईल.
परमेश्वर तेथे जाऊन तुझी सुटका करील.
तो, तुला, तुझ्या शत्रूंपासून दूर नेईल.
परमेश्वर इतर राष्ट्रांचा नाश करील
11 पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द लढण्यास आली आहेत.
ती म्हणतात, “ती पाहा सियोन!
या, आपण तिच्यावर हल्ला करु या.”
12 त्या लोकांनी त्यांचे बेत केलेत.
पण परमेश्वर काय बेत करीत आहे, हे त्यांना माहीत नाही.
परमेश्वराने त्या लोकांना विशेष उद्देशाने येथे आणले आहे.
ते लोक, खळ्यातील धान्याप्रमाणे चिरडले जातील.
इस्राएल त्याच्या शत्रूंचा पाडाव करील
13 “सियोनच्या कन्ये, ऊठ आणि त्या लोकांना चिरडून टाक.
मी तुला खूप सामर्थ्यवान करीन.
तुला जणू काही लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर असतील.
तू पुष्कळांवर आघात करुन त्यांचे तुकडे तुकडे करशील.
तू त्यांची संपत्ती परमेश्वराला देशील.
तू त्याचे धन जगाच्या परमेश्वराला देशील.”
तुमची अंतःकरणे बदला
13 त्यावेळी तेथे काही लोक उपस्थित होते. त्यांनी येशूला गालीलातील त्या लोकांविषयी सांगितले, ज्यांचे रक्त पिलाताने [a] आधीच असलेल्या यज्ञपशूंच्या रक्तात मिसळले होते. 2 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला वाटते का की, ह्या गालीलकरांनी जे भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते? 3 नाही, मी तुम्हांस सांगतो, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मेले तसे तुम्हीही मराल. 4 किंवा त्या अठरा जणांचे काय? ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व ते मारले गेले? तुम्हांला वाटते का की, यरुशलेम येथे राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा ते अधिक दोषी होते? 5 नाही, मी तुम्हांला सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्व जण त्यांच्यासारखे मराल.”
निरुपयोगी झाड
6 नंतर त्याने ही बोधकथा सांगितली, “एका माणसाने त्याच्या बागेत अंजिराचे झाड लावले होते, त्यावर फळ असेल म्हणून तो पाहावयास आला परंतु त्याला काहीही आढळले नाही. 7 म्हणून तो माळयाला म्हणाला, ‘पाहा, या अंजिराच्या झाडावर फळ पाहण्यासाठी मी गेल्या तीन वर्षांपासून येत आहे, परंतु मला त्यावर काहीही आढळले नाही. तेव्हा ते तोडून टाक. त्याचा उगीच भुईला भार कशाला?’ 8 माळयाने उत्तर दिले, ‘मालक, या एका वर्षासाठी ते राहू द्या. मग मी त्याच्याभोवती खणून त्याला खत घालीन. 9 मग येत्या वर्षात फळ आले तर छानच! जर आले नाही तर मग आपण ते तोडून टाकावे.’”
येशू एका स्त्रीला शब्बाथ दिवशी बरे करतो
10 शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता. 11 तेथे एक स्त्री होती, तिला अशुद्ध आत्म्याने अठरा वर्षे पांगळे केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. 12 येशूने तिला पाहिले, त्याने तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस!” 13 नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ सरळ झाली. आणि ती देवाची स्तुति करु लागली.
14 नंतर सभास्थानाचा अधिकारी रागावला, कारण येशूने शब्बाथ दिवशी तिला बरे केले होते. तो लोकांना म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.”
15 येशूने त्याला उत्तर दिले, आणि म्हणाला. “ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येक जण त्याच्या बैलाला वा गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का? 16 ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. ज्या बंधनात ती होती त्यापासून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?” 17 तो असे म्हणाल्यावर जे त्याचा विरोध करीत होते त्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भुत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करु लागला.
देवाचे राज्य कशासारखे आहे?(A)
18 मग तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? आणि मी त्याची कशाबरोबर तुलना करु 19 देवाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो मोहरीचा दाणा एका मनुष्याने घेतला व आपल्या बागेत लावला, तो वाढला आणि त्याचे झाडे झाले. आकाशातील पाखरांनी त्याच्या फांद्यांवर घरटी बांधली.”
20 तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याची तुलना कोणाबरोबर करु 21 ते खमिरासारखे आहे. एका स्त्रीने तीन मापे पिठात खमिर मिसळले आणि ते सर्व खमिरामुळे फुगले.”
अरुंद दरवाजा(B)
22 येशू गावागावांतून आणि खेड्यापाड्यांतून जात असता व यरुशलेमाच्या दिशेने वाटचाल करीत असता तो लोकांना शिकवीत होता. 23 कोणीतरी त्याला विचारले, “प्रभु, फक्त थोड्या लोकांचेच तारण होईल का?”
तो त्यांना म्हणाला, 24 “अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हांला सांगतो की, पुष्कळ जण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही. 25 जेव्हा घराचा मालक उठून दार बंद करील, तेव्हा तुम्ही बाहेर उभे राहाल व दार ठोठवाल. आणि म्हणाल, ‘प्रभु, आम्हांसाठी दार उघडा!’ परंतु तो तुम्हांला उत्तर देईल, ‘तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही.’ 26 नंतर तुम्ही म्हणाल, ‘आम्ही तुमच्याबरोबर जेवलो, आम्ही तुमच्याबरोबर प्यालो, आमच्या रस्त्यावर तुम्ही शिक्षण दिले!’ 27 आणि तो तुम्हांला म्हणेल, ‘तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही, जे तुम्ही दुष्टपणा करता ते सर्व माझ्यापासून निघून जा.’
28 “तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला, आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर फेकलेले असाल. 29 आणि लोक पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येतील व देवाच्या राज्यात मेजासभोवती आपापल्या जागेवर बसतील. 30 लक्षात ठेवा की, जे शेवटचे आहेत ते पहिले होतील, व जे पहिले आहेत ते शेवटचे होतील.”
येशू यरुशलेमामध्ये मरण पावेल(C)
31 त्यावेळी काही परुशी येशूकडे आले. आणि ते त्याला म्हणाले, “येथून निघा व दुसरीकडे कुठे तरी जा, कारण हेरोद तुम्हांला ठार मारणार आहे.”
32 येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भुते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’ 33 तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टयांनी यरुशलेमाबाहेर मरणे ह्याचा विचार करणे चूक आहे.
34 “यरुशलेमे, यरुशलेमे, जी तू संदेष्टयांना मारतेस व देवाने पाठविलेल्यांवर दगडमार करतेस! कितीतरी वेळा कोंबडी जशी पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते तसे तुम्हा लोकांना एकवटण्याची माझी इच्छा होती, पण तुमची तशी इच्छा नव्हती. 35 पाहा, देवाने तुमच्या घराचा त्याग केला आहे. मी तुम्हांला सांगतो, ‘देवाच्या नावाने येणारा धन्यवादित असो [b] असे म्हणण्याची वेळ येईपर्यंत तुम्ही मला पाहणार नाही.’”
2006 by World Bible Translation Center