Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 21

इस्राएलच्या जनगणनेचे पातक

21 सैतान इस्राएल लोकांच्या विरुध्द होता. त्याने दावीदाला इस्राएल लोकांची जनगणना करण्यास प्रवृत्त केले. दावीद यवाबला आणि अधिकाऱ्यांना म्हणाला, “इस्राएलमधील सर्व लोकांच्या मोजणीला लागा. बैरशेब्यापासून दानपर्यंत सर्व प्रदेश पालथा घाला. कोणीही वगळले जाता कामा नये. मग मला एकंदर संख्या किती आहे ते येऊन सांगा.”

यावर यवाब म्हणाला, “परमेश्वर आपले राष्ट्र आहे त्यापेक्षा शंभर पटीने वाढवो. इस्राएलमधील सर्व लोक आपले दास आहेत, तेव्हा माझे स्वामीराज, आपण ही गोष्ट कशासाठी करता? त्याने इस्राएलचे लोक दोषी आणि पातकी ठरतील.”

पण राजा दावीद काहीही ऐकून घेण्यास तयार नव्हता. तेव्हा यवाबला राजाज्ञेप्रमाणे वागणे भाग पडले. यवाब निघाला आणि लोकांची मोजणी करत त्याने सर्व प्रदेश तुडवायला सुरुवात केली. मग यरुशलेमला परत येऊन दावीदाला त्याने एकंदर लोकसंख्या सांगितली. इस्राएलमध्ये 11,00,000 तलवार धारी पुरुष होते आणि यहूदात 4,70,000. यवाबाने लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती कारण राजा दावीदाचा हुकूम त्याला मान्य नव्हता. देवाच्या दृष्टीने दावीदाची ही चूक होती म्हणून देवाने इस्राएलला शासन केले.

इस्राएलला शासन

मग दावीद देवाला म्हणाला, “माझ्या हातून हा मूर्खपणा झाला आहे. इस्राएलमधील लोकांची मोजणी करुन मी पाप केले आहे. या अपराधाबद्दल या तुझ्या सेवकाला तू या पापाची क्षमा करावीस अशी मी विनवणी करतो.”

9-10 गाद हा दावीदाचा संदेष्टा होता. त्याला परमेश्वर म्हणाला, “जा, जाऊन दावीदाला सांग: ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे: तीन गोष्टीमधून निवड करायची संधी मी तुला देतो. तू त्यांतील एक निवड. तू निवडशील ती शिक्षा मी तुला करीन.’”

11-12 मग गाद दावीदाकडे गेला. दावीदाला तो म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘दावीद तुझ्या शिक्षेची निवड तूच कर: अन्नधान्याच्या टंचाईची तीन वर्षे, किंवा शत्रू तलवारीने तुझा पाठलाग करत आहे आणि तुला पळता भुई थोडी झाली आहे असे तीन महिने किंवा परमेश्वराच्या शिक्षेचे तीन दिवस. या काळात देशभर भयंकर रोगराई पसरेल आणि परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांचा संहार करील.’ दावीद मला देवाने पाठवले आहे. आता मी त्याला काय उत्तर देऊ ते तू ठरव आणि मला सांग.”

13 दावीद गादला म्हणाला, “मी भलत्याच संकटात सापडलो आहे. माझ्या शिक्षेच्या बाबतीत माणूस काय ठरवणार? परमेश्वर दयाघन आहे. मला शासन कसे करायचे ते त्यालाच ठरवू दे.”

14 तेव्हा परमेश्वराने इस्राएलभर रोगराई पसरवली. त्यात 70,000 लोक मृत्युमुखी पडले. 15 यरुशलेमचा नाश करायला देवाने दूत पाठवला. पण त्याने यरुशलेमच्या संहाराला सुरुवात केली तेव्हा परमेश्वराला ते अरिष्ट पाहून वाईट वाटले. परमेश्वराने हा संहार थांबवायचे ठरवले. परमेश्वर त्या संहारक दूताला म्हणाला, “थांब, पुरे झाले” त्या वेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ होता.

16 दावीदाने वर पाहिले तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत आकाशात उभा असलेला दिसला. त्याने आपली तलवार यरुशलेम नगरावर उपसलेली होती. दावीद आणि पुढाऱ्यांनी नम्रपणे वाकून अभिवादन केले. या सर्वांनी दुखवट्याच्या वेळी घालतात तसे शोक प्रदर्शित करणारे कपडे घातलेले होते. 17 दावीद देवाला म्हणाला, “पाप माझ्या हातून घडले आहे लोकांच्या मोजणीचा हूकूम मी दिला. माझे चुकले. इस्राएल लोक निरपराध आहेत. परमेश्वरा, देवा शासन करायचे ते मला आणि माझ्या कुटुंबियांना कर. पण तुझ्या लोकांचा जीव घेणारी ही रोगाची साथ थांबव.”

18 मग परमेश्वराचा दूत गादला म्हणाला, “परमेश्वराच्या उपासनेसाठी दावीदाला एक वेदी बांधायला सांग. अर्णान यबूसीच्या खळ्या जवळ त्याने ती बांधावी.” 19 गादने हे दावीदाला सांगितले. दावीद अर्णानच्या खळ्याकडे गेला.

20 अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता. तो मागे वळून पाहतो तर त्याला देवदूत दिसला. अर्णानचे चारही मुलगे त्याला पाहून लपून बसले. 21 दावीद अर्णान कडे गेला. अर्णान खळ्यातून राजाजवळ गेला आणि त्याने राजाला डोके जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला.

22 राजा त्याला म्हणाला, “तुझे हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. तेथे मला परमेश्वराच्या उपासने करिता वेदी बांधायची आहे. म्हणजे ही जीवघेणी मरी थांबेल.”

23 अर्णान दावीद राजाला म्हणाला, “हे खळे मी तुम्हाला दिले. तुम्ही आमचे स्वामी आणि पोशिंदे आहात. तुम्ही त्याचे हवे ते करा. यज्ञात अर्पण करण्यासाठी मी बैलही देईन. तसेच वेदीवरील होमात घालण्यासाठी लाकडी फळ्या, आणि धान्यार्पणासाठी गहू हे ही सर्व मी तुम्हाला देईन.”

24 तेव्हा राजा दावीद अर्णानला म्हणाला, “मी तुला त्याची पूर्ण किंमत देईन. तुझ्याकडून काढून घेऊन मी ते परस्पर परमेश्वराला वाहणार नाही. फुकट मिळालेला होमबली मी अर्पण करणार नाही.”

25 आणि दावीदाने खळ्याचे मूल्य म्हणून अर्णानला 25 पौंड सोने दिले. 26 दावीदाने त्या जागी परमेश्वराच्या उपासनेकरिता वेदी बांधली. तेथे त्याने होम आणि शांती-अर्पणे केली. दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली. त्याला उत्तर म्हणून परमेश्वराने स्वर्गातून अग्नी पाठवला. तो दिव्य अग्नी नेमका होमार्पणाच्या वेदीवर पडला. 27 मग परमेश्वराने देवदूताला आपली तलवार म्यान करायला सांगितले.

28 अर्णानच्या खळ्यावर परमेश्वराने आपल्याला उत्तर दिलेले पाहून दावीदाने परमेश्वरासाठी यज्ञ केले. 29 (पवित्र निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनमध्ये उच्च स्थानावर होती. इस्राएल लोक वाळवंटात असताना मोशेने तो पवित्र निवासमंडप बांधला होता. 30 परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या धाकाने दावीद देवापुढे पवित्र निवासमंडपाकडे जाण्यास घाबरत होता.)

1 पेत्र 2

जिवंत धोंडा व पवित्र राष्ट्र

म्हणून सर्व प्रकारची दुष्टता, तसेच फसवणूक, ढोंगीपणा हेवा, निंदा यापासून सुटका करुन घ्या. नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळासारखे तुम्ही शुद्ध आध्यात्मिक दूधाची इच्छा धरा. यासाठी की त्यापासून तुमची वाढ होईल व तुमचे तारण होईल. आता “प्रभु चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेतला आहे.” [a]

जिवंत धोंडा जो प्रभु येशू त्याच्याकडे या. जो जगातील लोकांकडून नाकारला गेला. पण जो देवाला बहुमोल असा आहे आणि ज्याला देवानेच निवडले आहे. तुम्हीसुद्धा, जिवंत धोंड्याप्रमाणे आध्यात्मिक मंदिर बांधण्यासाठी रचिले जात आहा. पवित्र याजकगणांप्रमाणे सेवा करण्यासाठी, ज्यांचे काम म्हणजे आध्यात्मिक अर्पणाचा देवासमोर यज्ञ करणे असे आहे. जे देवाला, येशू ख्रिस्ताद्वारे मान्य आहे. म्हणून खालील उतारा पवित्र शास्त्रात नमूद केला आहे:

“पहा सियोनात मी कोनशिला बसवितो,
    जो मौल्यवान व निवडलेला आहे
आणि जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो तो कधीही लज्जित होणार नाही.” (A)

तुम्ही जे या धोंड्यावर विश्वास ठेवता, त्या तुम्हांला तो मौल्यवान आहे, पण जे विश्वास धरीत नाहीत त्यांना,

“बांधणाऱ्यांनी नापंसत केलेला धोंडा
    तोच कोनशिला झाला आहे.” (B)

तो असा झाला,

“एक धोंडा जो लोकांना अडखळवितो
    आणि एक खडक जो लोकांना पाडतो.” (C)

ते लोक अडखळतात कारण ते देवाची आज्ञा पाळत नाहीत. त्यांना त्याच्यासाठी नेमलेले आहे.

पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.

10 एकवेळ तुम्ही लोक नव्हता
    पण आता तुम्ही देवाचे लोक आहात.
एके काळी तुम्हाला करुणा दाखविण्यात आली नव्हती
    पण आता तुम्हाला देवाची करुणा दाखविण्यात आली.

देवासाठी जगा

11 प्रियजनहो, मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके असल्यासारखा बोध करतो की, तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा. 12 जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की, तुमची चांगली कामे पाहून विदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे.

प्रत्येक मानवी अधिकाऱ्याची आज्ञा पाळा

13 प्रभुकरिता प्रत्येक मानवी अधिकाऱ्याच्या अधीन असा. 14 राजाच्या अधीन असा, जो सर्वोच्च अधिकारी आहे आणि राज्यपालांच्या अधीन असा. कारण अयोग्य करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी आणि चांगली कामे करणाऱ्यांना शाबासकी देण्यासाठी प्रान्ताधिपतीने त्यांना पाठविले आहे. 15 म्हणून जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा मूर्ख लोकांचे अविचारी बोलणे तुम्ही बंद करता आणि हीच देवाची इच्छा आहे. 16 मुक्त लोकांसारखे जगा. पण तुमच्या मुक्तपणे जगण्याच्या नावाखाली वाईट गोष्टींना वाव देऊ नका. उलट देवाचे सेवक असल्याप्रमाणे जगा. 17 सर्व लोकांचा आदर करा. ख्रिस्तातील तुमच्या बंधूवर्गावर प्रीति करा. देवाप्रती भीतीयुक्त आदर असू द्या. राजाला मान द्या.

ख्रिस्ताच्या दु:खसहनाचे उदाहरण

18 घरातील गुलामांनो, संपूर्ण आदराने तुमच्या मालकाच्या अधीन असा, जे चांगले आणि दयाळू आहेत त्यांच्याशीच नव्हे तर जे कठोरतेने वागतात त्यांच्यासुद्धा अधीन असा. 19 कारण हे प्रशंसनीय आहे. जर एखादा त्याच्या अंतःकरणात असलेल्या देवाच्या इच्छेसंबंधाने जागरुक आहे व अन्यायामुळे त्याला दु:ख सोसावे लागते. 20 कारण जर तुम्ही केलेल्या चुकीबद्दल तुम्हांला मार मिळाला आणि तुम्हांला तो सहन करावा लागतो, तर ते देवासमोर मान्य आहे. 21 यासाठी देवाने आपल्याला बोलावले आहे; कारण ख्रिस्ताने देखील आपल्यासाठी दु:ख सहन केले आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून चालावे, म्हणून स्वतःच्या अशा वागण्याने आपल्यासमोर उदाहण ठेवले.

22 “त्याने कोणतेही पाप केले नाही,
    त्याच्या मुखात कपट नव्हते.” (D)

23 जेव्हा लोकांनी त्याचा अपमान केला तेव्हा त्याने उलट अपमान केला नाही. जेव्हा त्याने दु:ख सहन केले तेव्हा त्याने धमकी दिली नाही. परंतु जो न्यायाने निवाडा करतो त्या देवाच्या हाती स्वतःला सोपवून दिले. 24 त्याने स्वतःआमची पापे वाहिली त्याच्या शरीरावर घेऊन वधस्तंभावर वाहिली, यासाठी की आम्ही आमच्या पापाला मरावे. आणि नीतीमत्त्वासाठी जगावे. त्याला झालेल्या जखमांमुळे तुम्हाला आरोग्य मिळाले. 25 तुम्ही मेंढराप्रमाणे बहकत होता. पण आता तुमच्या जीवनाचा जो मेंढपाळ व संरक्षक त्याच्याकडे परत आला आहात.

योना 4

परमेश्वराच्या दयेचा योनाला राग येतो

परमेश्वराने नगरी वाचविली, ह्याचा योनाला आनंद झाला नाही तर उलट तो रागावला. योनाने परमेश्वराकडे तक्रार केली. तो म्हणाला, “हे असे होणार हे मला माहीतच होते! मी माझ्या देशात होतो. तू मला येथे येण्यास सांगितलेस. त्याच वेळी मला कळले की या पापी नगरीच्या लोकांना तू क्षमा करणार. म्हणून मी तार्शिशला पळून जायचे ठरविले. तू दयाळू परमेशवर आहेस. हे मला ठाऊक होते. तू दया दाखवितोस आणि लोकांना शिक्षा करण्याची तुझी इच्छा नसते हे मला माहीतच होते. तू दयेचा सागर आहेस, हे मी जाणून होतो. मला माहीत होते की हे लोक पापांपासून परावृत्त झाल्यास, त्यांचा नाश करण्याचा बेत तू बदलशील. म्हणून आता मी, परमेशवरा. तुला मला ठार मारण्याची विनंती करतो. माझ्या दृष्टीने जगण्यापेक्षा मरणे बरे!”

मग परमेशवर म्हणाला, “मी त्या लोकांचा नाश केला नाही म्हणून तू असे रागावणे योग्य आहे असे तुला वाटते का?”

पण ह्या सर्व गोष्टींबद्दल अजूनही योनाच्या मनात राग होता म्हणून तो नगरीबाहेर निघून गेला. नगरीजवळच्या, पूर्वाेकडील एका ठिकाणी योना गेला तेथे त्याने स्वतःसाठी निवारा तयार केला. मग तेथे तो सावलीत नगरीचे काय होते ह्याची वाट पाहात बसला.

भोपळ्याचा वेल आणि किडा

परमेशवराने, योनाच्या डोक्यावर, झटपट एक भोवळ्याचा वेल वाढविलास त्यामुळे योनाला बसायला थंड जागा झाली. त्याला आणखी आराम मिळायला मदत झाली ह्या वेलामुळे योनाला खूप आनंद झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी वेलीचा काही भाग खाण्याकरिता परमेशवराने एक किडा पाठविला किड्याने वेल खायला सुरवात केली व वेल मेला.

सूर्य डोक्यावर असताना, परमेशवराने गरम पूर्वेचा वारा निर्माण केला. त्याने मरणासाठी परमेशवराची विनवणी केली तो म्हणाला “माझ्या मताने जगण्यापेक्षा मरणे बरे!”

पण परमेशवर त्याला म्हणाला “हा वेल मेला म्हणून रागावणे तुला योग्य वाटते का?”

योना उत्तरला, “हो माझा राग अगदी बरोबर आहे मी रागाने मरुन जाण्याइतका रागावलो आहे.”

10 मग परमेशवर म्हणाला, “तू त्या वेलासाठी काहीही केले नाहीस. तू त्याला वाढविले नाहीस. तो एका रात्रीत वाढला व दुसऱ्या दिवशी मेला आणि आता तुला त्या वेलाबद्दल वाईट वाटत आहे. 11 तू एका वेलासाठी अस्वस्थ होऊ शकतोस तर मग निनवेसारख्या मोठ्या नगरीसाठी मला वाईट वाटणे अगदी शक्य आहे त्या नगरीत 1,20,000 पेक्षा जास्त लोक व खूप प्राणी आहेत. त्या लोकांना आपण चुकीचे वागत आहेत ह्याची जाणीव नव्हती.”

लूक 9

येशू बारा प्रेषितांना कामगिरीवर पाठवितो(A)

येशूने बारा शिष्यांना एकत्र बोलाविले, आणि त्याने त्यांना सर्व भुतांवर सामर्थ्य व अधिकार दिला. आणि त्यांना त्याने रोग बरे करण्याचे सामर्थ्य दिले. नंतर त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठविले. तो त्यांना म्हणाला, “तुमच्या प्रवासासाठी बरोबर काठी, पिशवी, भाकरी, चांदीची नाणी, दोन-दोन अंगरखे असे काहीही घेऊ नका. आणि ज्या घरात तुम्ही जाल त्या घरातच तुम्ही राहा. व दुसऱ्या गावाला जाताना ते घर सोडा. जेथे लोक तुमचे स्वागत करणार नाहीत, तेथे गाव सोडताना त्यांच्याविरुद्ध साक्ष म्हणून आपल्या पायावरील धूळ झटकून टाका.”

ते निघाल्यानंतर सर्व गावातून सुवार्ता सांगत व लोकांचे रोग बरे करीत गेले.

हेरोदाचा येशूविषयी गोंधळ होतो(B)

जेव्हा हेरोद राज्यपालाने जे सर्व काही घडत होते त्याविषयी ऐकले, तेव्हा तो घोटाळ्यात पडला. कारण काही जणांनी असे म्हटले की, “योहान मेलेल्यांतून उठविला गेला आहे.” इतर काही जण असे म्हणत होते की, “एलीया पुन्हा आला आहे.” इतर काही जणांनी असे सांगितले की, “फार पूर्वीच्या संदेष्ट्यांपैकी एक जण मेलेल्यांतून पुन्हा जिवंत झाला आहे.”

परंतु हेरोद म्हणाला, “मी योहानाचा शिरच्छेद केला आहे, मग ज्याच्याविषयी अशा गोष्टी ऐकत आहे, तो कोण आहे?” म्हणून हेरोदाने येशूला पाहण्याचा प्रयत्न केला.

येशू पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना जेवू घालतो(C)

10 शिष्य परत आले तेव्हा त्यांनी येशूला आपण केलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. नंतर येशू त्यांना घेऊन बेथसैदा नावाच्या नगरास गुप्तपणे गेला. 11 पण लोकसमुदायाला हे कळले व ते त्याच्यामागे गेले. त्याने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना स्वर्गराज्याविषयी सांगितले. ज्यांना बरे होण्याची आवश्यकता होती, त्यांना त्याने बरे केले.

12 दिवस मावळत असता प्रेषित त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “लोकांना जाऊ द्या. म्हणजे ते आजूबाजूच्या शेतात आणि खेड्यात जातील व त्यांना खावयाला व राहण्यास मिळण्याची शक्यता आहे का ते पाहतील. कारण आपण दूर ठिकाणी आहोत.”

13 पण तो त्यांना म्हणाला, “तुम्ही त्यांना काही खावयास द्या.”

ते म्हणाले, “आम्ही जाऊन या सर्व लोकांसाठी अन्न विकत घ्यावे असे तुम्हांला वाटते काय? आमच्याजवळ फक्त पाच भाकरी आणि दोन मासे याशिवाय काही नाही.” 14 तेथे ते सुमारे पाच हजार पुरुष होते.

परंतु तो आपल्या शिष्यांस म्हणाला, “त्यांना सुमारे पन्नासाच्या गटाने बसवा.”

15 त्यांनी तसे केले व सर्वांना खाली बसविले. 16 नंतर त्याने पाच भाकरी व दोन मासे घेतले, मग स्वर्गाकडे बघून त्याने भाकरी व मासे याबद्दल देवाचे उपकार मानले. त्याचे तुकडे केले. नंतर लोकांना वाढण्यासाठी शिष्यांना दिले. 17 लोक जेवले व सर्व तृप्त झाले. आणि जेवून झाल्यानंतर उरलेले गोळा करण्यात आले तेव्हा त्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरल्या.

येशू हा ख्रिस्त आहे(D)

18 मग असे झाले की एकदा येशू एकटाच प्रार्थना करीत असताना, त्याचे शिष्य त्याच्याबरोबर होते. त्याने त्यांना विचारले, “मी कोण आहे याबद्दल लोक काय म्हणतात?”

19 ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणारा योहान, इतर काही एलीया आणि काहीजण म्हणतात की, फार पूर्वी होऊन गेलेल्या संदेष्ट्यांपैकी कोणी तरी उठला आहे.”

20 तो त्यांना म्हणाला, “तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”

पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.”

21 तेव्हा ताकीद देऊन त्याने त्यांना सूचना दिली की, हे कोणालाही सांगू नका.

येशू म्हणतो की त्याने मेलेच पाहिजे(E)

22 येशू म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला पुष्कळ दु:ख सोसणे आवश्यक आहे, आणि वडिलांनी, मुख्य याजकांनी, नियमशास्त्राचे शिक्षक यांनी नाकारावे व त्यांच्याकडून मारले जावे व पुन्हा तिसऱ्या दिवशी उठावे हे आवश्यक आहे.”

23 नंतर तो त्या सर्वांना म्हणाला, “जर कोणा व्यक्तीला माझ्या मागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारले पाहिजे. व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे आले पाहिजे. 24 जो कोणी स्वतःचा जीव वाचवू पाहतो, तो त्याला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी जिवाला मुकेल तो त्याला बाचवील. 25 कोणी सर्व जग मिळविले परंतु स्वतःचा नाश करुन घेतला किंवा स्वतःला गमाविले तर त्याला काय लाभ? 26 जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या वैभवाने, पित्याच्या आणि पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा तोही त्याची लाज धरील. 27 परंतु मी तुम्हांला खरे सांगतो येथे उभे राहिलेल्यांमध्ये असे काही आहेत की, स्वार्गाचे राज्य पाहिल्याशिवाय त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”

मोशे, एलीया आणि ख्रिस्त(F)

28 मग असे झाले की, तो असे बोलल्यावर साधारणपणे आठ दिवसांनंतर, आपल्याबरोबर पेत्र, योहान व याकोब यांना घेऊन डोंगरावर प्रार्थना करण्यास गेला. 29 मग असे घडले की, तो प्रार्थना करीत असताना त्याच्या चेहऱ्याचे रुप पालटले व त्याचे कपडे डोळे दिपविण्याएवढे पांढरेशुभ्र झाले. 30 आणि तेथे दोघे जण त्याच्याबरोबर बोलत होते. ते एलीया व मोशे होते. ते गौरवामध्ये प्रगट झाले होते, 31 आणि ते येशूच्या मरणाविषयी, जे तो यरुशलेमामध्ये पूर्ण करणार होता, त्याविषयी बोलत होते. 32 पण पेत्र व त्याच्याबरोबर असलेले सर्व झोपी गेले होते, जेव्हा ते जागे झाले, त्यांनी येशूचे गौरव पाहिले, आणि दोन मनुष्यांना त्याच्याबरोबर उभे असलेले पाहिले. 33 मग असे झाले की, ते दोघे जण येशूपासून विभक्त होत असताना, पेत्र येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही येथे आहोत ते चांगले झाले. आपण तीन मंडप तयार करु या, एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.” (तो काय बोलत होता हे त्याचे त्याला कळत नव्हते.)

34 पण तो या गोष्टी सांगत असता एक मेघ खाली आला आणि त्याने छायेने झाकून टाकले. त्यांनी मेघामध्ये प्रवेश केल्यानंतर ते घाबरले. 35 आणि त्यानां वेढलेल्या ढगातून एक वाणी ऐकू आली; ती म्हणाली, “हा माझा पुत्र आहे; तो माझा निवडलेला आहे, त्याचे ऐका.”

36 जेव्हा वाणी झाली तेव्हा येशू एकटाच तेथे होता. आणि याविषयी ते गप्प राहिले. त्यांनी त्यावेळी जे काही पाहिले होते त्याविषयी कोणालाही काही सांगितले नाही.

येशू भूतग्रस्त मुलाला बरे करतो(G)

37 नंतर दुसऱ्या दिवशी असे झाले की, जेव्हा ते डोंगरावरुन खाली आले तेव्हा मोठा जमाव येशूला भेटण्यासाठी आला. 38 आणि त्याचवेळी जमावातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी तुम्हांला विनंति करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे. 39 एकाएकी त्याला अशुद्ध आत्मा धरतो व तो अचानक किंचाळतो, आणि तो त्याला झटके देईपर्यंत पिळतो, त्यामुळे त्याच्या तोंडाला फेस येतो, तो त्याला सोडीत नाही व त्याला गलितगात्र करतो. 40 मी तुमच्या शिष्यांना तो अशुद्ध आत्मा काढण्याची विनंति केली, पण त्यांना ते शक्य झाले नाही.”

41 येशू म्हणाला अहो, “अविश्वासू व चुकलेल्या लोकांनो! मी तुमच्याबरोबर किती काळ राहू व किती काळ तुमचे सोसू? त्या मुलाला इकडे आणा.”

42 परंतु तो येत असतानाच भुताने त्याला पाडले आणि पिळवटले. येशूने अशुद्ध आत्म्याला धमकावले. त्याने मुलाला बरे केले आणि त्याला त्याच्या वडिलांजवळ परत दिले. 43 देवाचा महिमा पाहून ते सर्व फार आश्चर्यचकित झाले.

येशू त्याच्या मरणाविषयी सांगतो(H)

पण सर्व लोक येशूने जे केले त्याविषयी आश्चर्य व्यक्त करीत असताना, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला. 44 “मी तुमच्याजवळ ज्या गोष्टी सांगतो त्याकडे काळजीपूर्वक लक्षा द्या. मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती देण्यात येईल.” 45 पण शिष्यांना त्याचे बोलणे समजले नाही. ते त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आले होते. यासाठी की ते त्यांना समजू नये. आणि या बोलण्याविषयी त्याला विचारण्याची त्यांना भीति वाटत होती.

अतिमहत्त्वाची व्यक्ती(I)

46 आपणांमध्ये सर्वांत मोठा कोण असा शिष्यांमध्ये वाद सुरु झाला. 47 पण येशूला त्यांच्या मनातले विचार समजले, तेव्हा त्याने एका लहान बालकाला घेतले व त्याच्याजवळ त्याला उभे केले. 48 येशू त्यानां म्हणाला, “जो कोणी ह्या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतो. कारण जो कोणी तुम्हा मध्ये सर्वांत लहान बनेल तो सर्वांत मोठा आहे.”

जी व्यक्ति तुमच्याविरुद्ध नाही ती तुम्हांला अनुकूल आहे(J)

49 परंतु योहानाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही कोणाला तरी तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, व आम्ही त्याला मना केले, कारण आम्ही जे तुम्हांला अनुसरतो त्यापैकी तो नाही.”

50 परंतु येशू योहानाला म्हणाला, “त्याला मना करु नका, कारण जो तुमच्याविरुद्ध नाही तो तुम्हांला अनुकूल आहे.”

शोमरोननगर

51 आता असे घडले की, जेव्हा त्याला स्वर्गात घेण्याची वेळ आली, त्याने यरुशलेमाला जाण्याचे ठरविले. 52 त्याने आपणांपुढे निरोपे पाठविले. ते गेले आणि येशूच्या येण्याविषयीच्या तयारीसाठी एका शोमरोनी खेड्यात गेले. 53 पण शोमरोन्यांनी येशूचा स्वीकार केला नाही, कारण तो यरुशलेमाकडे निघाला होता. 54 जेव्हा याकोब व योहान या शिष्यांनी पाहिले, तेव्हा ते म्हणाले, “प्रभु, स्वर्गातील अग्नीने येऊन त्यांचा नाश करावा यासाठी आम्ही आज्ञा करावी असे तुला वाटते काय?”

55 तेव्हा त्याने वळून त्यांना धमकावले. 56 आणि ते दुसऱ्या खेड्यात निघून गेले.

येशूला अनुसरणे(K)

57 ते रस्त्याने चातल जात असता कोणी तरी त्याला म्हणाले, “तू जेथे कोठे जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.”

58 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे आहेत, आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी आहेत, पण मनुष्याच्या पुत्राला डोकेसुध्दा टेकावयास जागा नाही.”

59 तो दुसऱ्या एकाला म्हणाला, “माझ्यामागे ये.”

पण तो मनुष्य म्हणाला, “पहिल्यांदा मला जाऊ दे आणि माझ्या वडिलांना पुरु दे.”

60 पण येशू त्याला म्हणाला, “मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरु दे. तू जा आणि देवाच्या राज्याची घोषणा कर.”

61 दुसरा म्हणाला, “मी तुला अनुसरेन, प्रभु पण अगोदर मला माझ्या घरातील लोकांचा निरोप घेऊ दे.”

62 पण येशू त्यांस म्हणाला, “जो कोणी नांगराला हात घालतो व मागे पाहतो तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center