Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 19-20

अम्मोन्याकडून दावीदाच्या लोकांचा अपमान

19 नाहाश हा अम्मोन्याचा राजा होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा गादीवर आला. तेव्हा दावीदाने विचार केला, “नाहाशचे माझ्याशी सलोख्याचे संबंध होते. म्हणून त्याचा मुलगा हानून याच्याशी मी प्रेमाचे संबंध ठेवीन.” असे म्हणून दावीदाने हानूनच्या सांत्वनासाठी आपले दूत पाठवले. दावीदाचे हे सेवक अम्मोनला हानूनकडे घेऊन गेले.

तेव्हा अम्मोन्यांचे सरदार हानूनला म्हणाले, “या देखाव्याने फसू नकोस. तुझे सांत्वन करणे किंवा तुझ्या मृत वडीलांचा मान ठेवणे हा दावीदाचा हेतू नाही. दावीदाने या लोकांना तुझा प्रदेश पाहून ठेवायला आणि हेरगिरी करायला पाठवले आहे. त्याला तुझा प्रांत उद्ध्वस्त करायचा आहे.” हे ऐकून हानून ने दावीदाच्या दूतांना अटक केली आणि त्यांचे मुंडन केले. [a] त्यांची कमरेपर्यंतची वस्त्रेही फाडली आणि त्यांना वाटेला लावले.

दावीदाचे सेवक या गोष्टींमुळे इतके शरमिंदे झाले की त्यांच्याने घरी जाववेना. लोकांकडून दावीदाला ही बातमी समजली तेव्हा दावीदाने त्यांच्यासाठी पुढीलप्रमाणे निरोप पाठवला: “दाढी वाढेपर्यंत तुम्ही यरीही येथे रहा मग इकडे या.”

पण दावीदाने वैर ओढवूत घेतले आहे हे अम्मोनी लोकांच्या लक्षात आले तेव्हा हानून आणि अम्मोनी लोक यांनी मेसोपटेम्या येथून रथ आणि सारथी आणवण्यासाठी 75,000 पौंड चांदी खर्च केली. माका व सोबा या अराममधील नगरांमधूनही त्यांनी रथ आणि स्वार यांची खरेदी केली. अम्मोन्यांनी 32,000 रथ विकत घेतले. माकाच्या राजालाही त्यांनी आपल्या सैन्यासह मदतीला बोलावले व त्याचे मोल देऊ केले. तेव्हा त्यांनी येऊन मेदबा नगराजवळ तळ ठोकला. खुद्द अम्मोनीही नगराबाहेर पडून वेशीजवळ लढायला आले.

अम्मोनी लढाईला सज्ज झाले आहेत हे ऐकून दावीदाने यवाबाला इस्राएलच्या सर्व सैन्यासकट युध्दावर पाठवले. अम्मोनी लढायच्या जय्यत तयारीनिशी वेशीजवळ आले. त्यांच्या मदतीला आलेले राजे मैदानात स्वतंत्रपणे उभे होते.

10 सैन्याच्या दोन तुकड्या आपल्याविरुध्द उभ्या ठाकलेल्या असून त्यातली एक आपल्या मागे व एक पुढे आहे हे यवाबने पाहिले. तेव्हा त्याने इस्राएली फौजेतील निवडक लढवय्यांना अरामी सैन्यासमोर नियुक्त केले. 11 उरलेल्या इस्राएली फौजेला अबीशयच्या हाताखाली सोपवले. अबीशय हा यवाबचा भाऊ. हे सैन्य अम्मोन्याशी लढायला गेले. 12 यवाब अबीशयला म्हणाला, “अरामचे सैन्य जर मला भारी ठरले तर तू माझ्या मदतीला ये. आणि अम्मोनी तुझ्यापेक्षा प्रबळ ठरले तर मी तुला सहाय्य करीन. 13 आपल्या लोकांसाठी आणि देवाच्या या नगरांसाठी लढताना आपण प्रयत्नांची शिकस्त करु, शौर्य गाजवू. मग परमेश्वराला जे योग्य वाटेल ते तो करो.”

14 यवाब आपल्या सैन्यासह अरामी फौजेवर चालून गेला. तेव्हा अरामच्या सैन्याने त्यांच्यापुढून पळ काढला. 15 अरामचे सैन्य माघार घेऊन पळून जात आहे हे पाहताच अम्मोन्यांनीही पलायन केले. अबीशय आणि त्याचे सैन्य यांच्याकडे त्यांनी पाठ फिरवली. अम्मोनी आपल्या नगरात परतले आणि यवाब यरुशलेमला परत आला.

16 इस्राएलपुढे आपला पराभव झाला आहे हे अरामी सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी जासूद पाठवून फरात नदीपलीकडील आपल्या लोकांना बोलवून घेतले. शोफख हा हदरेजरच्या अरामी फौजेचा सेनापती होता. त्याच्या नायकत्वाखाली ते आले.

17 अरामी लढाईची जमवाजमव करत आहेत हे दावीदाने ऐकले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांना एकत्र जमवले आणि यार्देन नदीपलीकडे जाऊन आराम्यांच्या समोर व्यूह रचला. सर्व तयारीनिशी त्यांनी आरम्यांवर हल्ला केला. 18 इस्राएल लोकांसमोरुन अराम्यांनी पळ काढला. दावीदाने व त्याच्या सैन्याने सात हजार अरामी सारथी आणि चाळीस हजार अरामी सैन्य यांना ठार केले. अरामी सैन्याचा नेता शोफख यालाही त्यांनी मारुन टाकले.

19 इस्राएलाने आपला पाडाव केला आहे हे हदरेजरच्या अधिकाऱ्यांचा लक्षात आल्यावर त्यांनी दावीदाशी तह केला. ते दावीदाच्या अधिपत्याखाली आले. अराम्यांनी पुन्हा अम्मोनी लोकांना मदत केली नाही.

यवाबकडून अम्मोन्यांचा संहार

20 राजे लढाईच्या मोहिमेवर बाहेर पडतात अशावेळी म्हणजे वर्षारंभी यवाब इस्राएलाचे सैन्य घेऊन युध्दासाठी निघाला. पण दावीद यरुशलेममध्येच राहिला. इस्राएलचे सैन्य अम्मोन्यांच्या नगरात शिरले आणि त्यांनी तो मुलूख उद्ध्वस्त केला. मग त्यांनी राब्बा नगराकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी नगराला वेढा घातला आणि लोकांची नाकेबंदी केली. राब्बा नगर पडेपर्यंत यवाबने इस्राएली सैन्यासह नगरावर हल्ला चालू ठेवला, व राब्बा उद्ध्वस्त केले.

दावीदाने, त्या लोकांच्या राजाच्या मस्तकावरील मुकुट काढला. त्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटाचे वजन पंचेचाळीस पौंड होते. तो दावीदाच्या मस्तकावर ठेवण्यात आला. राब्बा नगरातून आणखीही पुष्कळ लूट दावीदाला मिळाली. राब्बातील लोकांना बाहेर काढून दावीदाने त्यांच्याकडून करवती, कुऱ्हाही, पहारी या हत्यारांनी करायच्या कष्टाच्या कामाला जुंपले. अम्मोन्यांच्या सर्व नगरांमध्ये दावीदाने हेच केले. मग दावीद आणि त्याचे सैन्य यरुशलेमला परतले.

धिप्पाड पलिष्ट्यांचा वध

पुढे गेजेर येथे इस्राएल लोकांचे पलिष्ट्यांशी युध्द झाले. या लढाईत सिब्बखय हूशाथी याने सिप्पय याला ठार मारले. सिप्पय हा अत्यंत धिप्पाड व रेफाई वंशातला होता. तेव्हा हे पलिष्टि लोक इस्राएलींना शरण आले.

इस्राएलींची पुढे पुन्हा एकदा पलिष्ट्यांशी लढाई झाली. त्यावेळी याईरचा मुलगा एलहानान याने गथच्या गल्याथचा भाऊ लहमी याला ठार केले. लहमीचा भाला चांगला लांबलचक आणि जाडजूड होता. हातमागाच्या तुरीसारखा तो मोठा होता.

गथ येथे पलिष्ट्यांशी इस्राएल लोकांची आणखी एकदा लढाई झाली. या गावात तेव्हा एक प्रचंड आकारमानाचा माणूस होता. त्याच्या हातापायांना प्रत्येकी सहासहा, अशी एकंदर चोवीस बोटे होती. तो राक्षसपुत्रच होता. अशा माणसाने इस्राएल लोकांचा उपहास केल्यावर योनाथानने त्याला ठार केले. योनाथान हा शिमीचा मुलगा. शिमी दावीदाचा भाऊ.

पलिष्टे ही गथ नगरातील बलाढ्य लोकांची संतती. दावीद व त्याचे सेवक यांनी त्यांचे पारिपत्य केले.

1 पेत्र 1

येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र याजकडून

देवाचे निवडलेले लोक जे या जगात प्रवासी आहेत,

जे पंत, गलतिया, कप्पदुकिया आशिया व बिथुनिया प्रांतात विखुरलेले आहेत त्या यहूदी लोकांना, देवपित्याने फार पूर्वीच केलेल्या योजनेप्रमाणे आत्म्याच्याद्वारे तुम्ही पवित्र व्हावे, येशू ख्रिस्ताच्या आज्ञेत राहावे आणि येशूचे रक्त तुमच्यावर शिंपडून तुम्हांला शुद्ध करावे, याकरीता तुम्हाला निवडले आहे.

त्या तुम्हाला देवाची कृपा व शांति भरपूर प्रमाणात लाभो.

जिवंत आशा

आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या पित्याची, देवाची स्तुति असो! त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली. आणि ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याच्यावर काही दोष नाही, व जे कधी झिजत नाही असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे.

आणि शेवटच्या काळात प्रगट करण्यात येणारे तारण तुम्हाला मिळावे म्हणून विश्वासाच्या द्वारे, देवाच्या सामर्थ्याने तुमचे रक्षण केले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या पिडांनी काही काळापर्यंत तुम्ही दु:खी होणे जरी जरुरीचे असले, तरी यामुळे आनंद करीत आहा. नाशवंत सोने शुध्द करण्याकरिता अग्नित टाकले जाते. त्याहून अधिक मौल्यवान अशा तुमच्या विश्वासाची कसोटी व्हावी, आणि येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुति, गौरव व सन्मान मिळावा याची आवश्यकता आहे.

जरी तुम्ही येशूला पाहिले नाही, तरी तुम्ही त्याच्यावर प्रीति करता. जरी आता तुम्ही त्याच्याकडे पाहू शकत नसला तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि तुम्ही व्यक्त करता येणार नाही, अशा गौरवी आनंदाने भरला आहात. तुमच्या विश्वासाचे ध्येय जे तुमच्या आत्म्याचे तारण ते तुम्हाला प्राप्त होत आहे.

10 तुमच्याकडे येणार असलेल्या कृपेसंबंधी ज्या संदेष्ट्यांनी भविष्य वर्तविले होते त्यांनी त्या तारणाबाबत फार मनःपूर्वक शोध घेतला व काळजीपूर्वक चौकशी केली. 11 ख्रिस्ताचा आत्मा त्यांच्यामध्ये राहात होता. ते शोध घेत होते की कोणत्या वेळी व कोणत्या परिस्थितीत ख्रिस्ताच्या दु:खाचा व गौरवाचा शोध घेण्यास आत्मा सुचवीत आहे.

12 स्वर्गातून पाठविलेल्या आत्म्याद्वारे ज्यांनी शुभवर्तमान तुमच्याकडे आणले, त्यांनीच तुम्हांस आता या गोष्टी विदित केल्या. त्याच गोष्टी कळविण्याची जी सेवा ते करीत होते, ती स्वतःसाठी नाही, तर आमच्यासाठी करीत होते, त्या गोष्टी बारकाईने पाहण्यासाठी देवदूतसुद्धा उत्सुक आहेत.

पवित्र जीवनाकरिता पाचारण

13 म्हणून मानसिकदृष्ट्या सावध असा आणि पूर्णपणे आत्मसंयमन करा. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा तुम्हाला जे आशीर्वाद देण्यात येतील त्यावर तुमची आशा केंद्रित करा. 14 आज्ञाधारक मुलांप्रमाणे वागा व तुम्ही अज्ञानी असताना, तुम्हांला पूर्वी ज्या दुष्ट इच्छा होत्या त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार देण्याचे थांबवा. 15 त्याऐवजी ज्या देवाने तुम्हाला पाचारण केले तो पवित्र आहे, तुम्हीसुद्धा प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल त्यात पवित्र असा. 16 कारण असे लिहिले आहे: “पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.” [a]

17 आणि ज्याप्रमाणे, देवाला तुम्ही पिता म्हणून हाक मारता, जो लोकांचा नि:पक्षपातीपणे, प्रत्येकाच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो, म्हणून या परक्या भूमीवर तुम्ही वास्तव्य करीत असताना, या काळात देवाबद्दलच्या आदरयुक्त भितीमध्ये आपले जीवन जगा. 18 तुम्हांला माहीत आहे की, सोने किंवा चांदी अशा कोणत्याही नाश पावणाऱ्या वस्तूंनी निरर्थक जीवनापासून तुमची सुटका करण्यात आली नाही. जी तुम्हांला तुमच्या पूर्वजापासून मिळाली आहे. 19 तर कसलाही डाग किंवा दोष नसलेल्या कोकऱ्यासारख्या ख्रिस्ताच्या बहुमोल रक्ताने तुमची सुटका केली आहे. 20 जगाच्या निर्मितिच्या अगोदर ख्रिस्ताची निवड करण्यात आली होती. पण तुमच्याकरिता या शेवटच्या दिवसात त्याला प्रकट करण्यात आले. 21 ज्या देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले व त्याला गौरव दिले त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवणारे झाला आहात. म्हणून तुमचा विश्वास आणि आशा देवामध्ये आहे.

22 आता तुम्ही स्वतःला शुद्ध केले आहे. सत्याची आज्ञा पाळून शेवटपर्यंत प्रामाणिक बंधुप्रीति करा. एकमेकांवर शुद्ध ह्रदयाने प्रीति करण्याकडे लक्षा द्या. 23 जे बीज नाशवंत आहे त्यापासून तुमचा नवा जन्म झाला नाही तर जे बीज अविनाशी त्यामुळे झाला आहे, तुमचा नवा जन्म देवाच्या वचनाद्वारे जे जिवंत आहे व टिकते त्यापासून झाला आहे. 24 म्हणून पवित्र शास्त्र सांगते,

“सर्व लोक गवतासारखे आहेत
    आणि त्यांचे सर्व वैभव गवतातील रानफुलासारखे आहे.
गवत सुकते,
    फूल गळून पडते,
25 परंतु आमच्या प्रभूचे वचन अनंतकाळ टिकते.” (A)

आणि हाच तारणाचा संदेश आहे, जो तुम्हाला सांगितला गेला.

योना 3

परमेश्वर बोलावितो आणि योना आज्ञा पाळतो

मग परमेश्वर योनाशी पून्हा बोलला. परमेश्वर म्हणाला, “त्या मोठ्या नगरीला, निनवेला जा आणि मी सांगतो तो संदेश सांग.”

मग योनाने परमेश्वराची आज्ञा पाळली. तो निनवेला गेला. निनवे फार मोठी नगरी होती. नगरीच्या एका टोकापासून दूसऱ्या टोकापर्यंत जाण्यास तीन दिवस चालावे लागे.

योना नगरी मध्यभागी जाऊन लोकांना उपदेश करु लागला. योना म्हणाला, “चाळीस दिवसानंतर निनवेचा नाश होईल.”

निनवेच्या लोकांनी परमेवराच्या संदेशावर विश्वास ठेवला. त्यांनी काही काळ उपवास करण्याचे ठरविले आणि आपल्या पापांचा विचार करण्याचा निश्चय केला. त्यांनी खेद प्रदर्शित करणारे खास कपडे घातले. नगरीतल्या सर्व लोकांनी असे केले. मग तो राव असो की रंक.

निनवेच्या राजाच्या कानावर या गोष्टी गेल्या. त्याला त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल खेद वाटला. त्याने त्याचे सिंहासन सोडले व आपली राजवस्त्रे उतरविली आणि दु:ख प्रकट करण्यासाठी असलेली वस्त्रे घातली. मग तो राखेत बसला. त्याने एक विशेष संदेश लिहिला आणि तो सर्व नगरीत घोषित केला.

राजा आणि महान राज्यकर्ते यांची आज्ञा:

काही काळ कोणत्याही माणसाने व पशूने काहीही खाऊ नये. गुराढोरांनी रानांत चरू नये. निनवेत राहणाऱ्या कोणत्याही सजीवाने खाऊ-पिऊ नये. प्रत्येक माणसाने व प्राण्याने दु:ख प्रकट करणारे वस्त्र पांघरले पाहिजे. माणसांनी परमेश्वरापाशी टाहो फोडला पाहिजे. प्रत्येकाचे जीवन बदलले पाहिजे आणि वाईट कर्मे करावयाचे थांबविले पाहिजे. मग कदाचित् देवाचे मनःपरिवर्तन होईल आणि योजलेल्या गोष्टी तो करणार नाही. कदाचित् देवाच्या मनात बदल होईल व तो रागावणार नाही, व आपला नाशही होणार नाही.

10 लोकांचे वागणे परमेश्वराने पाहिले. लोकांनी दुष्कृत्ये करावयाचे सोडून दिले हेही परमेश्वराने पाहिले. मग परमेश्वराचे मन बदलले व त्याने ठरविल्याप्रमाणे केले नाही. परमेश्वराने लोकांना शिक्षा केली नाही.

लूक 8

येशूबरोबरचे लोक

यानंतर असे झाले की, येशू सर्व गावांतून आणि खेड्यामधून उपदेश करीत व देवाच्या राज्यासंबंधीची सुवार्ता सांगत जात होता. आणि बारा प्रेषित त्याच्याबरोबर होते. ज्यांच्यामधून भुते काढली होती व ज्यांना आजारातून बरे केले होते अशा काही स्त्रियाही त्याच्याबरोबर होत्या: मरीया जिला मग्दालिया म्हणत, तिच्यातून सात भुते बाहेर पडली होती. हेरोदाच्या घराचा कारभारी खुजा याची पत्नी योहान्ना, सूसान्ना आणि इतर अनेक स्त्रिया होत्या, या स्त्रिया त्यांच्याकडे जे होते, म्हणजे त्यांच्या उत्पन्नातून येशू व त्याच्या शिष्यांना देत असत.

पेरणी करणाऱ्याची बोधकथा(A)

जेव्हा मोठा जनसमुदाय जमत असे व प्रत्येक गावातून लोक त्याच्याकडे येत असत, तेव्हा येशू बोधकथांचा उपयोग करुन बोलत असे:

“एक शेतकरी आपले बी पेरायला गेला. तो पेरत असताना काही बी रस्त्यावर पडले व ते तुडविले गेले. आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले आणि उगवल्यावर वाळून गेले कारण त्यात ओलावा नव्हता. काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडुपे त्याच्याबरोबर वाढली व त्याची वाढ खुंटविली. काही बी चांगल्या जमिनीवर पडले. ते उगवले, वाढले व जे पेरले होते त्यापेक्षा शंभर पट पीक जास्त आल.” या बोधकथा सांगत असता तो मोठ्याने म्हणाला,

“ज्याला ऐकण्यास कान आहेत, त्याने ऐकावे!”

त्याच्या शिष्यांनी या बोधकथेचा अर्थ काय असे विचारले.

10 म्हणून तो म्हणाला, “तुम्हांला देवाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. पण इतरांच्यासाठी ते बोधकथेमध्ये दिले आहे.

‘यासाठी की, जरी ते पाहत असले,
    तरी त्यांना दिसू नये आणि
ऐकत असले तरी
    त्यांना समजू नये.’ (B)

येशू बियाच्या बोधकथेचे स्पष्टीकरण करतो(C)

11 “बोधकथेचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. बी हे देवाचा संदेश आहे. 12 आणि जे बी वाटेवर पडले ते जे ऐकतात त्याचे दर्शक आहेत. नंतर सैतान येतो आणि त्यांच्या हृदयातील बी घेऊन जातो, यासाठी की त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांचे तारण होऊ नये. 13 जे बी खडकावर पडते ते असे आहे की, ते ऐकतात आणि आनंदाने संदेश ग्रहण करतात. पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळ विश्वास ठेवतात पण परीक्षेच्या वेळी देवापासून दूर जातात. 14 जे बी काटेरी झुडुपात पडलेले असते ते दर्शविते की, ते ऐकतात परंतु आपल्या मार्गाने जात असता काळजी, श्रीमंती, जीवनातील सुखे यांनी ते खुंटविले जाते, ते पक्व फळ देत नाही. 15 चांगल्या जमिनीतील बी दर्शविते की, ते चांगल्या व प्रामाणिक अंतःकरणाचे आहेत ते वचन ऐकतात, ग्रहण करतात व धीराने फळ देतात.

तुमच्या समजबुद्धीचा उपयोग करा(D)

16 “कोणीही दिवा लावून तो भांड्याने झाकून ठेवीत नाही, किंवा खाटेखाली ठेवीत नाहीत, तर तो दिवठणीवर ठेवतात, यासाठी की जे आत येतात त्यांना प्रकाश दिसावा. 17 लक्षात ठेवा, असे काहीही लपविलेले नाही, जे उघड होणार नाही. प्रत्येक रहस्य सर्वांना सांगितले जाईल आणि ते प्रकाशात येईल. 18 म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या कारण ज्याच्याजवळ आहे त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे आहे असे वाटते तेदेखील काढून घेतले जाईल”.

येशूचे शिष्य हेच त्याचे खरे कुटुंब(E)

19 येशूची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले. पण गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना. 20 म्हणून त्याला असे सांगण्यात आले की, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर उभे आहेत, त्यांना तुला भेटायचे आहे.”

21 पण त्याने त्यांना उत्तर दिले, “जे देवाचे वचन ऐकतात व त्याप्रमाणे करतात तेच माझी आई व माझे भाऊ आहेत.”

शिष्य येशूचे सामर्थ्य पाहतात(F)

22 त्या दिवसात एकदा असे झाले की, येशू त्याच्या शिष्यांसह नावेत बसला. आणि तो त्यांना म्हणाला, “आपण सरोवराच्या पलीकडच्या बाजूला जाऊ या.” 23 आणि ते निघाले. ते जात असता येशू झोपी गेला. सरोवरावर तुफान वादळी वारे सुरु झाले व नावेत पाणी जाऊ लागले. ते अतिधोकादायक स्थितीत सापडले. 24 म्हणून त्यांनी त्याला उठविले, ते त्याला म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण बुडत आहोत!”

मग तो उठला. त्याने वारा व लाटा यांना दटाविले. ते थांबले. व सर्वत्र शांतता पसरली. 25 येशू त्यांना म्हणाला, “तुमचा विश्वास कोठे आहे?”

पण ते भयचकित आणि विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण तो वारा आणि लाटा यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात?”

भुते अंगात असलेला माणूस(G)

26 नंतर ते गालील सरोवरापलीकडील गरसेकरांच्या प्रदेशात गेले. 27 जेव्हा तो किनाऱ्यावर उतरला, तेव्हा नगरातला एक मनुष्य त्याला भेटला. त्या माणसामध्ये अनेक भुते होती. बराच काळपर्यंत त्याने कपडे घातले नव्हते व तो घरातही राहिला नव्हता. तो कबरांमध्ये राहत होता.

28-29 जेव्हा त्याने येशूला पाहिले, तेव्हा तो मोठ्याने ओरडला व त्याच्यापुढे पडला. तो मोठ्या आवाजात म्हणाला, “येशू, सर्वोच्च देवाच्या पुत्रा, तुला माझ्यापासून काय पाहिजे? मी तुला विनंति करतो की, मला त्रास देऊ नको.”तो असे म्हणाला कारण येशूने भुताला त्याच्यातून बाहेर येण्याची आज्ञा केली होती. कारण त्याने त्याला पुष्कळ वेळ धरले होते. त्याला त्यावेळी साखळ्यांनी बांधले होते. पायात बेड्या होत्या व त्याला पहाऱ्यात ठेवले होते परंतु तो नेहमी साखळ्या तोडीत असे व भुते त्याला एकांतात घेऊन जात असत.

30 येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?”

तो म्हणाला, “सैन्य,” कारण त्याच्यात अनेक भुते शिरली होती. 31 भुतांनी येशूला विनवणी केली की, आम्हांला अनंतकाळच्या अंधारात [a] जाण्याची आज्ञा करु नको. 32 डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. भुतांनी त्याला विनंति केली, “आम्हांला त्या डुकरांच्या मध्ये जाऊ दे.” आणि येशूने त्यांना तसे करण्याची परवानगी दिली. 33 मग भुते त्या मनुष्यातून बाहेर आली आणि डुकरात शिरली. नंतर डुकरांचा कळप सरोवराकडे जोरात पळाला आणि तो सारा कळप सरोवरात बुडून मेला.

34 जेव्हा डुकरांचा कळप राखणाऱ्यांनी हे पाहिले, तेव्हा ते दूर पळाले व त्यांनी नगरात व त्या प्रदेशात हे वर्तमान सांगितले. 35 काय झाले हे पाहण्यासाठी लोक बाहेर आले. ते येशूकडे आले आणि त्यांनी ज्या माणसाच्या अंगातून भुते निघाली होती, त्याला येशूच्या पायाजवळ बसलेला त्यांनी पाहिले. त्याने नीट कपडे घातले होते व तो पूर्ण शुद्धीवर होता. या घटनेचे त्यांना भय वाटले. 36 ज्यांनी हे पाहिले त्यांनी तो भूत लागलेला मनुष्य कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. 37 तेव्हा गरसेकर प्रदेशातील सर्व लोकांनी येशूला त्यांना सोडून जाण्यास सांगितले. कारण ते सर्व फार घाबरले होते.

मग येशू नावेत बसून परत गेला. 38 ज्याच्या अंगातून भुते तिघाली होती तो त्याच्याबरोबर जाण्यासाठी विनवणी करु लागला. पण येशूने त्याला परत जायला सांगितले आणि म्हणाला, 39 “घरी जा आणि देवाने तुझ्यासाठी जे केले आहे ते सांग.”

तेव्हा तो मनुष्य गेला आणि येशूने त्याच्यासाठी जे काही केले ते नगारातील सर्व लोकांना त्याने सांगितले.

येशू मेलेल्या मुलीला जिवंत करतो व आजारी स्त्रीला बरे करतो(H)

40 नंतर जेव्हा येशू परत आला तेव्हा लोकांनी त्याचे स्वागत केले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. 41 त्याचवेळी याईर नावाचा एक मनुष्य आला. तेथील सभास्थानाचा तो अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंति केली. 42 कारण त्याला बारा वर्षांची एक मुलगी होती आणि ती मरावयास टेकली होती.

येशू जात असता लोकांची गर्दी झाली होती व तो चेंगरला जात होता. 43 आणि एक स्त्री तेथे होती. तिला बारा वर्षे रक्तस्राव होत होता. तिच्याकडे जे काही पैसे होते ते सर्व तिने वैद्यांसाठी खर्च केले पण कोणीही तिला बरे करु शकले नाही. 44 ती त्याच्या मागोमाग आली. व तिने त्याच्या वस्त्राच्या टोकाला स्पर्श केला आणि ताबडतोब तिचा रक्तस्राव थांबला. 45 मग येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?”

ते सर्व जण नाकारीत असताना पेत्र म्हणाला, “सर्व जण आपल्याभोवती गर्दी करीत आहेत आणि तुम्हांला चेंगरीत आहेत.”

46 परंतु येशू म्हणाला, “कोणी तरी मला स्पर्श केला आहे. कारण मला माहीत आहे की, माझ्यातून शक्ति निघाली आहे.” 47 आपण येशूच्या नजरेतून सुटू शकणार नाही हे जेव्हा त्या स्त्रीने पाहिले तेव्हा ती थरथर कांपत आली आणि त्याच्या पाया पडली. तेथे तिने सर्व लोकांसमोर आपण त्याला का स्पर्श केला व आपण कसे बरे झालो ते सांगितले. 48 तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा.”

49 तो हे बोलत असतानाच कोणी तरी सभास्थानाच्या अधिकार्याच्या घरुन आले आणि म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास देऊ नका.”

50 येशूने हे ऐकले व तो सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नको, फक्त विश्वास ठेव आणि ती मरणातून वाचविली जाईल.”

51 जेव्हा येशू त्या घरी आला, त्याने आपणाबरोबर पेत्र, योहान, याकोब आणि मुलीचे आईवडील यांच्याशिवाय कोणालाही आत येऊ दिले नाही. 52 सर्व लोक तिच्यासाठी रडत होते. येशू म्हणाला, “रडणे थांबवा, ती मेलेली नाही, ती झोपेत आहे.”

53 पण ते त्याला हसले. कारण त्यांना माहीत होते की ती मेली आहे. 54 परंतु त्याने तिचा हात धरला आणि मोठ्याने म्हणाला, “मुली, ऊठ!” 55 मग, तेव्हा तिचा आत्मा पुन्हा आला आणि ती लगेच उभी राहिली. नंतर त्याने तिला खाण्यास देण्याची आज्ञा केली. 56 तेव्हा तिचे आईवडील आश्चर्याने थक्क झाले, परंतु जे घडले त्याबद्दल कोणालाही सांगू नका अशी त्याने त्यांना आज्ञा केली.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center