M’Cheyne Bible Reading Plan
16 लेवींनी करारकोश आत आणून दावीदाने उभारलेल्या तंबूमध्ये तो ठेवला. मग त्यांनी देवाला होमार्पणे आणि शांती अर्पणे वाहिली. 2 हे झाल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांना आशीर्वाद दिला. 3 मग त्याने एकूनएक इस्राएल स्त्री-पुरुषांना एकएक भाकर, खजूर आणि किसमिस एवढे दिले.
4 दावीदाने मग काही लेवींची करार कोशाच्या सेवेसाठी निवड केली. इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम होते. 5 आसाफ हा पहिल्या गटाचा मुख्य होता. त्याचा गट झांजा वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी पुढीलप्रमाणे: उज्जियेल, शमिरामोथ, यहिएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत 6 बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी करार कोशापुढे रणशिंगे वाजवत. 7 परमेश्वराची स्तुतिगीते गाण्याचे काम दावीदाने आसाफला आणि त्याच्या भावांना दिले.
दावीदाचे आभारगीत
8 परमेश्वराचे स्तवन करा.
त्याला हाक मारा.
परमेश्वराने केलेली महान कृत्ये लोकांना सांगा.
9 परमेश्वराची स्तोत्रे गा.
त्यांचे स्तवन म्हणा.
त्याचे चमत्कार इतरांना सांगा.
10 परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान धरा.
परमेश्वराकडे येणाऱ्या तुम्हा सर्वांना आनंद मिळो.
11 परमेश्वराकडे पाहा त्याचे सामर्थ्य बघा.
मदतीसाठी त्याला शरण जा.
12 देवाच्या अद्भूत कृत्यांची आठवण ठेवा.
त्याने केलेले न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा.
13 इस्राएलचे लोक परमेश्वराचे सेवक आहेत.
याकोबाचे वंशज हे परमेश्वराने निवडलेले खास लोक आहेत.
14 परमेश्वर आमचा देव आहे.
त्याच्या सामर्थ्याची साक्ष सर्वत्र आहे.
15 त्याच्या कराराचे स्मरण असू द्या.
त्याने दिलेल्या आज्ञा पुढील हजारो पिढ्यांसाठी आहेत.
16 परमेश्वराने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा.
इसहाकाला त्याने दिलेल्या वचनाची आठवण असू द्या.
17 याकोबासाठी परमेश्वराने तोच नियम केला.
इस्राएलशी त्याने तसाच निरंतर करार केला.
18 इस्राएलला परमेश्वर म्हणाला, “मी तुम्हाला कनानचा प्रदेश देईन.
ते वतन तुमचे असेल.”
19 त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता,
परक्या प्रदेशात उपरे होता.
20 तुम्ही एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात भटकत होता.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात होता.
21 पण परमेश्वराने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही.
परमेश्वराने राजांना तशी ताकीद दिली.
22 परमेश्वराने या राजांना सांगितले, “मर्जीतील लोकांना दुखवू नका.
माझ्या संदेष्ट्यांना दुखवू नका.”
23 पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा.
परमेश्वराने आपल्याला वाचवल्याची शुभवार्ता रोज सर्वांना सांगा.
24 परमेश्वराच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा
तो किती अद्भूत आहे ते सर्वांना सांगा.
25 परमेश्वर थोर आहे.
त्याची स्तुती केली पाहिजे इतर दैवतांपेक्षा परमेश्वराचा धाक अधिक आहे.
26 का बरे? कारण जगातले इतर सगळी दैवते म्हणजे नुसत्या क्षुद्र मूर्ती
पण परमेश्वराने आकाश निर्माण केले.
27 परमेश्वराला महिमा आणि सन्मान आहे.
देव तेजस्वी लखलखीत प्रकाशाप्रमाणे आहे.
28 लोक हो, सहकुटुंब परमेश्वराच्या महिम्याची
आणि सामर्थ्याची स्तुती करा.
29 त्याचे माहात्म्य गा. त्याच्या नावाचा आदर करा.
त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा.
त्याची आराधना करा आणि त्याच्या सात्विक सौंदर्याचे गुणगान करा.
30 परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला खंबीरपणा दिला.
हे जग असे हलणार नाही.
31 पृथ्वी आणि आकाश आनंदी असो सर्वत्र
लोक म्हणोत, “हे परमेश्वराचे साम्राज्य आहे.”
32 समुद्र आणि त्यात सामावलेले सर्व काही आनंदाने गर्जना करो
शेतमळ्यांची सृष्टी उल्हासित होवो.
33 अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण
साक्षात परमेश्वरच जगाला न्याय देण्यासाठी आलेला असेल.
34 लोक हो, परमेश्वराचे कृतज्ञतेने स्मरण करा, कारण तो चांगला आहे.
त्याचे प्रेम चिरंतन आहे.
35 परमेश्वराला सांगा,
“देवा, तूच आमचा त्राता आहेस.
आमचे रक्षण कर, आम्हाला संघटित ठेव
आणि इतर राष्ट्रांपासून आमचा बचाव कर.
मग आम्ही तुझे नामसंकीर्तन करु.
तुझा माहिमा गाऊ.”
36 इस्राएलच्या परमेश्वर देवाचे अनादी काळापासून स्तवन केले जाते.
त्याची स्तुतिस्तोत्रे अखंड गायिली जावोत.
सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
37 आसाफ आणि त्याचे भाऊबंद यांना करार कोशाच्या नित्य दैनंदिन सेवेसाठी दावीदाने नेमले. 38 त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम आणि आणखी 68 लेवी यांना ठेवले. ओबेद-अदोम आणि होसा हे द्वाररक्षक होते. ओबेद-अदोम यदूथूनचा मुलगा.
39 सादोक हा याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांना दावीदाने गिबोन येथील उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर नेमले. 40 दररोज सकाळी आणि संध्याकाळी सादोक आणि इतर याजक होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर होमार्पणे करत असत. परमेश्वराने इस्राएलला जे नियमशास्त्र दिले होते त्यातील नियमांचे पालन करण्यासाठी ते असे करत होते. 41 परमेश्वराची कृपा निरंतर राहावी म्हणून त्याचे स्तुतिस्तोत्र गाण्यासाठी हेमान, यदूथून व इतर लेवी यांची नेमणूक केली. 42 हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे व कर्णे फुंकणे हे काम होते. देवाची स्तुतिगीते गाईली जात असताना इतर वाद्ये वाजवण्याचेही काम त्यांच्याकडे होते. यदूथूनचे मुलगे द्वाररक्षक होते.
43 हा कार्यक्रम संपल्यावर सर्व लोक घरोघरी गेले. दावीदही आपल्या घराण्याला आशीर्वाद द्यायला घरी परतला.
ज्या गोष्टी आपण बोलतो त्यावर ताबा ठेवणे
3 माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ पाहत नाहीत काय? तुम्हांला माहीत आहे की, जे आपण शिक्षक आहोत त्या आपला काटेकोरपणे न्याय होईल.
2 मी तुम्हाला सावध करीत आहे, कारण आपण पुष्कळ पापे करतो आणि जर कोणी त्याच्या बोलण्यात चुका करीत नाही तर तो परिपूर्ण मनुष्य आहे. 3 आपण घोड्यांच्या तोंडांना लगाम घालतो यासाठी की, त्यांनी आपल्या आज्ञा पाळाव्यात. आणि अशा प्रकारे आपण त्यांचे संपूर्ण शरीर नियंत्रणात ठेऊ शकतो. 4 किंवा जहाजाचे उदाहरण घ्या. जरी ते खूप मोठे असले व जोरदार वाऱ्यामुळे चालविले जाते तरी ते लहान सुकाणूद्वारे ताब्यात ठेवता येते व सुकाणूधर नावाड्याच्या इच्छेला येईल तिकडे नेता येते. 5 त्याचप्रकारे जीभ ही शरीराचा लहानसा भाग आहे, पण ती मोठमोठ्या गोष्टी केल्याची बढाई मारते.
फक्त विचार करा, कितीतरी मोठे जंगल लहानशा आगीन पेट घेते! 6 होय, जीभ ही ज्वाला आहे. आपल्या शरीराच्या सर्व अवयवामध्ये वाईट गोष्टींची ती खाणच आहे. जीभ ही आपल्या सर्व शरीराला विटाळविणारी आहे. ती आपल्याला अपवित्र करते. आपल्या सर्व अस्तित्वालाच ती आग लावते. ती नरकाच्या ज्वालांनी जीवन पेटवते.
7 पशू, पक्षी, सरपटणारे जीवजंतु, साप आणि समुद्रातील निरनिराळ्या जातीचे जीव माणूस पाळू शकतो आणि प्रत्यक्षात त्याने तसे केले आहे. 8 पण कोणताही मनुष्य आपली जीभ ताब्यात ठेवू शकत नाही. ती फार चंचल, भयंकर, हिंस्र, दुराचारी आणि जहाल विषाने भरलेली असते. 9 आपला प्रभु आणि स्वर्गीय पिता याची स्तुति आपण आपल्या जिभेने करतो आणि जे मानव देवाच्या प्रतिमेचे बनविलेले आहेत, त्यांना जिभेने शापही देतो! 10 एकाच तोंडातून आशीर्वाद निघतात व शापही निघतात. माझ्या बंधूंनो, हे असे असू नये. 11 एकाच झऱ्यातून गोड व कडू पाणी येऊ शकत नाही. 12 माझ्या बंधूंनो, अंजिराच्या झाडाला जैतुनाची फळे येतील काय? किंवा द्राक्षवेलीला अंजिर लागतील काय? कधीच नाही. तसेच खारट पाण्याच्या झऱ्यातून गोड पाणी येऊ शकणार नाही.
खरे शहाणपण
13 तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे. नम्रतेने केल्या जाणाऱ्या कृतीद्वारे त्याने आपले शहाणपण दाखवावे. 14 पण जर तुमच्या ह्रदयात कटूरता, मत्सर व स्वार्थी उद्देश असतील तर तुम्ही तुमच्या शहाणपणाची फुशारकी मारू शकणार नाही. कारण तसे करणे म्हणजे खोटेपणाच्या आड सत्य लपविण्यासारखे आहे. 15 कारण अशा प्रकारचे शहाणपण वरून, स्वर्गातून आलेले नाही, तर ते पृथ्वीवरचे आहे. अधार्मिक आणि सैतानी आहे. 16 कारण जेथे मत्सर व स्वार्थी ध्येये आढळतात तेथे अव्यवस्थितपणा व सर्व प्रकारचे वाईट व्यवहारही आढळतात. 17 पण वरून लाभलेले शहाणपण मुळात शुद्ध, शांतिदायक, समजूतदारपणाचे आणि मनमोकळे असून ते दयेचे व चांगली कामे यांना उत्तेजन देणारे असते. तसेच ते पक्षपात न करणारे व कळकळीचे असते. 18 जे लोक शांततेच्या मार्गाने शांति स्थापन करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सरळ, नीतिपूर्ण वागण्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींचा लाभ होतो.
अदोमला शिक्षा होईल
1 हा ओबद्याचा दृष्टांन्त आहे. परमेश्वर, माझा प्रभू अदोमाबद्दल पुढील प्रढील प्रमाणे म्हणाला:
आम्ही परमेश्वर देवाकडून हकिगत ऐकली.
राष्ट्रांकडे दूत पाठविला गेला.
तो म्हणाला, “आपण अदोमाविरुध्द लढण्यास जाऊ या.”
परमेश्वर अदोमशी बोलतो
2 “अदोम, मी तुला लहान राष्ट्र करीन.
लोक तुझा खूप तिरस्कार करतील.
3 तुझ्या गर्वाने तुला मूर्ख बनविले.
उंच कड्यावरील गुहांत तू राहतोस.
तुझे घर टेकडीवर उंच ठिकाणी आहे.
म्हणून स्वतःशी म्हणतोस,
‘मला कोणीही खाली जमिनीवर आणू शकत नाही.’”
अदोमला खाली आणले जाईल
4 परमेश्वर, देव, असे म्हणतो,
“जरी तू गरुडाप्रमाणे वर जातोस,
आणि ताऱ्यांमध्यो घरटे बांधतोस,
तरी मी तुला खाली आणील.
5 तुझा खरोखरीच नाश होईल.
तुझ्याकडे चोर येतील.
रात्री लुटारु येतील,
ते चोर त्यांना पाहिजे ते सर्व नेतील.
तुझ्या मळ्यातील द्राक्षे तोडताना
मजूर काही द्राक्षे मागे ठेवतात.
6 पण एसावचा लपविलेला खजिना शत्रू कसोशीने शोधेल.
आणि त्यांना ते सर्व सापडेल.
7 तुझे मित्र असलेले लोकच
तुला देशातून बळजबरीने बाहेर काढतील.
तुझे मित्र तुला फसवतील
व चुकीच्या गोष्टी करण्यासाठी तुझी खात्री करतील.
युध्दात तुझ्याबरोबर असलेले सोबती
तुझ्यासाठी सापळा रचायचा बेत करीत आहेत.
ते म्हणतात, ‘ते तुझ्या लक्षात येणार नाही.’”
8 परमेश्वर म्हणतो, “त्याच दिवशी,
मी अदोममधील सुज्ञांचा नाश करीन.
एसावच्या पर्वतातून समजूत नष्ट करीन.
9 तेमान, तुझे सामर्थ्यशाली पुरुष भयभीत होतील.
एसावच्या पर्वतावरील प्रत्येकाचा नाश होईल.
पुष्कळ लोक मारलो जातील.
10 तू अप्रतिष्ठेने माखशील.
आणि तुझा कायमचा नाश होईल.
का? कारण तू, तुझा भाऊ याकोब याच्याशी क्रूरपणे वागलास.
11 तू इस्राएलच्या शत्रूंना जाऊन मिळालास;
परक्यांनी इस्राएलचे धन लुटून नेले
परदेशी इस्राएलच्या गावाच्या वेशीतून आत शिरले;
त्यांनी यरुशलेमचा कोणता भाग घ्यायचा ह्यासाठी चिठ्या टाकल्या;
आणि तू अगदी तेथेच तुझ्या वाटणीची वाट बघत उभा होतास.
12 तुझ्या भावाच्या संकटांना तू हसलास.
तू असे करायला नको होतेस.
लोकांनी जेव्हा यहूदाचा नाश केला तेव्हा तू आनंद मानलास,
तू तसे करायला नको होतेस.
त्याच्या संकटसमयी तू प्रौढी मिरविलीस;
असेही तू करायला नको होतेस.
13 माझ्या लोकांच्या वेशीतून तू आत आलास;
आणि त्यांच्या समस्यांकडे पाहून हसलास;
तू असे करायला नको होतेस त्यांच्या संकटसमयी तू त्यांची संपत्ती घेतलीस,
तू असे करायला नको होतेस.
14 जिथे रस्ते एकमेकांना छेदतात तिथे तू उभा राहिलास
आणि पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा नाश केलास.
तू असे करायला नको होते.
जिवंत सुटलेल्यांना तू पकडलेस तू असे करायला नको होते.
15 परमेश्वराचा दिवस लवकरच
सर्व राष्ट्रांकडे येत आहे;
तू दुसऱ्या लोकांशी वाईट कृत्ये केलीस
त्या वाईट गोष्टी तुझ्या बाबतीत घडतील.
तू केलेली दुष्कर्मे तुझ्या
डोक्यावर येऊन आदळतील.
16 का? कारण तू माझ्या पवित्र पर्वतावर रक्त सांडलेस
म्हणून दुसरी राष्ट्रेही तुझे रक्त सांडतील. [a]
तू संपशील.
तू कधी अस्तित्वात नव्हतास, अशीच तुझी दशा होईल.
17 पण सियोन पर्वतावर काही वाचलेले असतील.
ते माझे खास लोक असतील.
याकोबाचे राष्ट्र [b] त्याच्या मालकीच्या गोष्टी
परत स्वतःकडे घेईल.
18 याकोबाचे घराणे आगीप्रमाणे होईल
योसेफाचे घराणे जाळासारखे असेल पण एसावाचे राष्ट्र [c] राखेप्रमाणे होईल
यहुदाचे लोक अदोम जाळतील, ते अदोमचा नाश करतील.
एसाव राष्ट्रात मग कोणी शिल्लक राहणार नाही.”
का? कारण परमेश्वर देव असे म्हणाला आहे.
19 नेगेवचे लोक
एसावाच्या पर्वतावर राहतील
डोंगराच्या पायथ्याशी राहणारे लोक पलिष्ट्यांचा देश
आपल्या ताब्यात घेतील.
ते एफ्राईमाच्या व शोमरोनच्या भूमीवर राहतील.
गिलाद बन्यामीनच्या कबजात जाईल.
20 इस्राएलच्या लोकांना त्यांची घरे बळजबरीने सोडावी लागली,
पण ते सारफथ पर्यंतचा कनानचा प्रदेश घेतील
यहूदाच्या लोकांना बळजबरीने यरुशलेम सोडावे लागले व ते सफारदमध्ये राहतात.
पण ते नेगेवची गावे घेतील.
21 विजेते सियोन पर्वतावर जातील,
एसाव पर्वतावर राहणाऱ्या लोकांवर ते राज्य करतील.
आणि राज्य परमेश्वराच्या मालकीचे होईल.
पेत्र, याकोब आणि योहान येशूच्या मागे जातात(A)
5 मग असे झाले की, लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती व ते देवाचे वचन ऐकत होते आणि तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा होता, 2 तेव्हा त्याने सरोवरातील दोन होड्या पाहिल्या, पण होड्यातील कोळी बाहेर गेले होते व त्यांची जाळी धूत होते. 3 त्यातील, शिमोनाच्या होडीवर येशू चढला आणि त्याने ती होडी किनाऱ्यापासून थोडी दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांना शिक्षण देऊ लागला.
4 जेव्हा त्याने बोलणे संपविले, तेव्हा तो शिमोनाला म्हणाला, “खोल पाण्यात होडी ने आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.”
5 शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी आपण सांगत आहात म्हणून मी जाळे खाली सोडतो.” 6 जेव्हा त्यांनी तसे केले तेव्हा त्यांच्या जाळ्यात भरपूर मासे लागले. पण त्यांचे जाळे तुटू लागल्याने 7 त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या जोडीदारांना मदत करण्यासाठी बोलाविले. ते आले आणि त्यांनी इतके मासे भरले की, दोन्ही होड्या बुडु लागल्या.
8-9 शिमोन पेत्राने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो येशूच्या पाया पडला आणि म्हणाला, “प्रभु, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे!” तो असे म्हणाला कारण तो आणि त्याच्या साथीदारांना इतके मासे मिळाले होते की, हे कसे झाले म्हणून ते आश्चर्यात पडले. 10 जब्दीचे पुत्र याकोब व योहान हे ही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले होते. ते शिमोनाचे भागीदार होते.
मग येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको. कारण येथून पुढे तू माणसे धरशील.”
11 त्यांनी त्यांच्या होड्या किनाऱ्याला आणल्या, नंतर त्यानी सर्व काही सोडले आणि त्याच्यामागे गेले.
येशू एका आजारी माणसाला बरे करतो(B)
12 आणि असे झाले की, तेव्हा येशू कुठल्या एका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता, जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो तोंडावर उपडा पडला आणि त्याला विनंति केली, “प्रभु, जर तुझी इच्छा असेल तर तू मला बरे करण्यास समर्थ आहेस.”
13 येशूने आपला हात लांब करुन त्याला स्पर्श केला आणि म्हटले, “मला तुला बरे करायचे आहे, बरा हो!” आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले. 14 मग येशूने त्याला आज्ञा केली की, “कोणालाही सांगू नकोस, पण जा आणि स्वतःला याजकाला दाखव आणि तुझ्या शुद्धतेबद्दल मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे अर्पण कर. त्यांना समजेल की तू बरा झाला आहेस. ते आश्चर्यचकित झाले, त्यांच्यासाठी हा पुरावा म्हणून कर.”
15 परंतु येशूविषयीच्या बातम्या अधिक पसरतच गेल्या. आणि मोठे जमाव त्याचे ऐकण्यासाठी व त्यांच्या रोगांपासून मुक्त होण्यासाठी येत असत. 16 परंतु येशू नेहमी एकांतात जात असे व प्रार्थना करीत असे.
येशू एका लंगड्या मनुष्याला बरे करतो(C)
17 असे झाले की एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परुशी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते गालील, यहूदीया आणि यरुशलेम या भागातील प्रत्येक गावातून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याजवळ होते त्यामुळे तो बरे करत होता. 18 काही लोक एका अर्धांगवायु झालेल्या मनुष्याला बिछान्यात घालून घेऊन आले. त्यांनी त्याला आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. 19 परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना. ते छपरावर गेले, आणि त्याला खाटेसाहित आत सोडले, कौले काढून बरोबर मध्यभागी जेथे येशू बसला होता तेथे सोडले. 20 त्यांचा विश्वास पाहून येशू त्याला म्हणाला, “मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे!”
21 नियमशास्त्राचे शिक्षक आणि परुशी स्वतःशी विचार करु लागले: “हा कोण आहे, जो असे दुर्भाषण करीत आहे? देवाशिवाय कोण पापांची क्षमा करु शकतो?”
22 पण येशू विचार जाणून होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या अंतःकरणात असा विचार का करता? 23 ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे’ किंवा ‘ऊठ आणि चालू लाग’ यांतील कोणते म्हणणे सोपे आहे? 24 पण तुम्हांला हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला [a] पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” तो अर्धांगवायु झालेल्या मनुष्याला म्हणाला, “मी तुला सांगतो ऊठ, आपला बिछाना उचल आणि घरी जा.”
25 ताबडतोब तो उभा राहिला, ज्या बिछान्यावर तो झोपला होता तो त्याने उचलला व देवाची स्तुति करीत आपल्या घरी गेला. 26 आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले, आणि देवाची स्तुति करु लागले, ते खरोखरच आश्चर्यचकित झाले, ते म्हणाले, “आम्ही आज आश्चर्य पाहिले!”
लेवी येशूमागे जातो(D)
27 यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात नाक्यावर बसलेले पाहिले, येशू त्याला म्हणाला, “माइया मागे ये!” 28 लेवी सर्व काही तेथेच सोडून उठला आणि त्याच्या मागे गेला.
29 नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली. जकातदारांचा आणि इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता. 30 परुशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्या शिष्यांकडे तक्रार केली, ते म्हणाले, “तुम्ही जकातदार आणि पापी लोकांबरोबर का जेवता?”
31 येशू त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही, पण जे रोगी आहेत, त्यांना वैद्याची गरज आहे. 32 मी धार्मिकांस नाही तर पाप्यांस पश्चाताप करण्यासाठी बोलावण्यास आलो आहे.”
येशू उपासासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर देतो(E)
33 ते त्याला म्हणाले, “योहानाचे शिष्य नेहमी उपास करतात आणि प्रार्थना करतात. आणि परुश्यांचे शिष्यसुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य नेहमीच खातपीत असतात.”
34 येशू त्यांना म्हणाला, “नवरा मुलगा (वर) बरोबर असताना त्याच्या पाहुण्यांना तुम्ही उपाशी ठेवाल काय? 35 पण असे दिवस येत आहेत की, वराला त्यांच्यापासून घेतले जाईल आणि त्या दिवसांत ते उपास करतील.”
36 त्याने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली, “कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही, जर तो तसे करतो तर तो नवे कापड फाडतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही. 37 आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या द्राक्षारसाच्या कातडी पिशवीत ठेवीत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षारस कातडी पिशवी फोडून बाहेर उसळेल. 38 नवा द्राक्षारस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे. 39 कोणालाही जुना द्राक्षारस प्याल्यानंतर नवा नको असतो कारण तो म्हणतो, ‘जुना द्राक्षारसच चांगला आहे.’”
2006 by World Bible Translation Center