M’Cheyne Bible Reading Plan
करारकोश यरुशलेममध्ये
15 दावीदाने दावीदानगरात स्वतःसाठी घरे बांधली. तसेच करारकोश ठेवण्यासाठी एक स्थान उभारले. ते एका तंबूसारखे होते. 2 मग दावीद म्हणाला, “फक्त लेवींनाच करारकोश वाहून आणण्याची परवानगी आहे. या कामासाठी आणि सर्वकाल परमेश्वराची सेवा करण्यासाठीच लेवींची निवड झाली आहे.”
3 या जागेपाशी करारकोश आणायला म्हणून दावीदाने यरुशलेममधील सर्व इस्राएल लोकांना एकत्र बोलावले. 4 अहरोनाचे वंशज आणि लेवी यांनाही यायला सांगितले.
5 कहाथच्या घराण्यातील 120 माणसे होती. उरीयेल त्यांचा प्रमुख होता.
6 मरारीच्या कुळातले. 220 जण होते. असाया हा त्यांचा नेता होता.
7 गर्षोमच्या घराण्यातली 130 लोक असून, योएल हा त्यांचा प्रमुख होता.
8 अलीसाफानच्या घराण्यापैकी 200 लोक होते. त्यांचा नेता शमाया होता.
9 हेब्रोनच्या वंशातले 80 लोक होते. अलीएल त्यांचा नेता होता.
10 उज्जियेलच्या घराण्यातले 112 जण असून अमीनादाब हा प्रमुख होता.
याजक आणि लेवी यांच्याशी दावीदाची बातचीत
11 दावीदाने मग सादोक आणि अब्याथार याजकांना बोलावले. तसेच उरीयेल, असाया, योएल, शमाया, अलीएल आणि अम्मीनादाब या लेवीनाही बोलावून घेतले. 12 दावीद त्यांना म्हणाला, “तुम्ही लेवी घराण्यांचे प्रमुख आहात. तुम्ही आणि सर्व लेवींनी शुचिर्भूत झाले पाहिजे. त्यानंतर मी तयार केलेल्या जागेत तुम्ही तो करारकोश आणा. 13 गेल्या वेळी हा कोश कसा आणवा याबद्दल आपण परमेश्वराला विचारले नाही. तुम्हा लेवींनी तो आणला नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला ती शिक्षा दिली.”
14 इस्राएलच्या परमेश्वर देवाचा करारकोश आणता यावा यासाठी मग सर्व याजक आणि लेवी शुचिर्भूत झाले. 15 मोशेने सांगितले होते त्याप्रमाणे करारकोश खांद्यावरुन आणण्यासाठी लेवींनी विशेष प्रकारच्या काठ्या घेतल्या. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच त्यांनी तो करारकोश आणला.
गायक
16 दावीदाने लेवी प्रमुखांना आपल्या गायकबंधूंना बोलावून घ्यायला सांगितले. सतार, वीणा, झांजा ही वाद्ये आणून त्यांना मंगलगीते म्हणायला सांगितले.
17 लेवींनी मग हेमान आणि त्याचे भाऊ आसाफ आणि एथान यांना नेमले. हेमान हा योएलचा मुलगा. आसाफ बरेख्याचा मुलगा. एथान कुसायाचा मुलगा. हे सर्वजण मरारीच्या घराण्यातले होते. 18 याखेरीज लेवींचा आणखी एक गट होता. जखऱ्या, बेन, यजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, बनाया, मासेमा, मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम आणि ईयेल हे ते होत. हे द्वारपाल होते.
19 हेमान, आसाफ आणि एथान यांनी पितळी झांजा वाजवल्या. 20 जखऱ्या, अजीएल, शमीरामोथ, यहीएल, उन्नी, अलीयाब, मासेया, बनाया हे उच्च स्वरात सतारी वाजवत होते. 21 मत्तिथ्या, अलीफलेह, मिकनेया, ओबेद-अदोम, ईयेल आणि अजज्या हे मंदसुरात वीणा वाजवण्याच्या कामावर होते. त्यांचे हे नेहमीचेच काम होते. 22 लेवींचा प्रमुख कनन्या हा मुख्य गायक होता. गायनात निपुण असल्यामुळे त्याच्यावर ही कामगिरी होती.
23 बरेख्या आणि एलकाना हे करार कोशाचे रक्षक होते. 24 शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक करारकोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे करार कोशाचे आणखी दोन रक्षक होते.
25 दावीदा, इस्राएलमधील वडीलधारी मंडळी, सरदार करार कोश ओबेद-अदोमच्या घरातून आणायला पुढे गेले. सर्वजण अत्यंत आनंदात होते. 26 करार कोश उचलून आणणाऱ्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात गोऱ्हे आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले. 27 करारकोश वाहून नेणाऱ्या सर्व लेवींनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायकप्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाचा अंगरखा देखील तलम कापडाचा होता. शिवाय त्याने तशाच कापडाचा एफोद सुध्दा घातला होता.
28 अखेर सर्व इस्राएल लोकांनी करार कोश आणला. जयघोष करत रण-शिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा वाजवत त्यांनी तो आणला.
29 करार कोश दावीदनगरात पोहंचला तेव्हा शौलची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून त्याच्याबद्दलचा तिचा आदर नाहीसा झाला. तिला त्याचा तो वेडगळपणा वाटला.
सर्व लोकांवर प्रेम करा
2 माझ्या बंधूंनो, गौरवी प्रभु येसू ख्रिस्तावरील विश्वासाची व पक्षपातीपणाची सांगड घालू नका. 2 समजा एक मनुष्य सोन्याची अंगठी व सुंदर कपडे घालून तुमच्या सभेला आला व एक गरीब मनुष्य अव्यवस्थित कपडे घालून आला. 3 आणि समजा चांगला पोशाख घालून आलेल्या मनुष्याला तुम्ही विशेष मानसन्मान दाखवूत त्याला म्हणाला, “येथे ज्या चांगल्या खुर्च्या आहेत त्यापैकी एखाद्या खुर्चीवर बसा.” आणि समजा तुम्ही त्या गरीब माणासाला म्हणाला, “तिकडे उभा राहा.” किंवा “माझ्या पायाजवळ बस.” 4 तर या बाबतीत तुम्ही दोघांत पक्षपातीपणा दाखविलात की नाही? आणि तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना बाळगणारे न्यायाधीश ठरलात की नाही?
5 माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका! देवानेच जगाच्या दृष्टिकोनातून गरीब असले त्यांना विस्वासात श्रीमंत होण्यासाठी निवडले नाही काय, आणि जे त्याच्यावर प्रीति करतात त्यांना देवराज्याचे वारस म्हणून निवडण्याचे अभिवचन दिले नाही का? 6 पण तुम्ही तर गरीब मनुष्याला तुच्छ लेखिले! तुमची पिळवणूक करणारे श्रीमंत लोकच नाहीत काय आणि तुम्हाला न्यायालयात नेणारे तेच लोक नाहीत काय? 7 ख्रिस्ताच्या उत्तम नावाची, जे नाव तुम्हाला देण्यात आले त्याची निंदा हेच श्रीमंत लोक करीत नाहीत का?
8 जर तुम्ही पवित्र शास्त्रातील महान आज्ञा “आपल्या शेजाऱ्यावर आपल्यासारखीच प्रीति करा” पाळता तर तुम्ही योग्य करता. 9 पण जर तुम्ही पक्षपात करता, तर तुम्ही पाप करता आणि नियम मोडण्याचा दोष तुमच्यावर येतो.
10 कारण जर कोणी संपूर्ण नियमशास्त्राचे पालन करतो पण एका नियमाबाबतीत चुकतो, तर तो संपूर्ण नियमशास्त्राबाबतीत दोषी ठरतो. 11 कारण “व्यभिचार करू नको” असे जो म्हणाला, तो असे सुद्धा म्हणाला की, “खून करू नको.” म्हणून जर तुम्ही व्यभिचार करीत नाही पण खून करतो तर तुम्ही नियमशास्त्र मोडता.
12 अशा लोकांसारखे बोला व वागा की, ज्यांचा न्याय अशा नियमांमुळे होणार आहे की, ज्यामुळे स्वातंत्र्य मिळेल. 13 जो दयाळूपणे वागला नसेल त्याचा न्यायही देव त्याच्यावर दया न दाखविताच करील. पण दया न्यायावर विजय मिळविते!
विश्वास व चांगली कामे
14 माझ्या बंधूंनो, जर एखादा म्हणतो की, मी विश्वास धरतो पण तशी कृती करीत नाही तर त्याचा काय उपयोग? तो विश्वास त्याला तारू शकणार नाही. शकेल का? 15 जर एखादा बंधु किंवा भगिनी यांना कपड्यांची आवश्यकता असेल व त्यांना रोजचे अन्रसुद्धा मिळत नसेल 16 आणि तुमच्यापैकी एखादा त्यांना म्हणतो, “देवबाप तुम्हांला आशीर्वाद देवो! उबदार कपडे घाला आणि चांगले खा.” पण तुम्ही त्यांच्या शरीराला जे आवश्यक ते देत नाही, तर तो काय चांगले करतो? 17 त्याचप्रमाणे विश्वासाबरोबर जर कृतीची जोड नसेल तर तो केवळ एक मृत असाच विश्वास असेल.
18 पण एखादा म्हणेल, “तुझ्याकडे विश्वास आहे तर माझ्याकडे काम आहे.” कृतीशिवाय तुझा विश्वास दाखव, आणि माझा विश्वास मी माझ्या कृतीने दाखवीन. 19 तुम्ही असा विश्वास धरता का की, फक्त एकच देव आहे? उत्तम! भुतेदेखील असा विश्वास धरतात व थरथर कापतात.
20 अरे मूढ माणास, कृतीशिवाय विश्वास व्यर्थ आहे याचा तुला पुरावा पाहिजे काय? 21 आपला पूर्वज अब्राहाम याने त्याचा पुत्र इसहाक याला वेदीवर परमेश्वराला अर्पण करण्याची तयारी दर्शविली, तेव्हा त्याच्या या कामामुळे तो देवाच्या दृष्टीत नीतिमान ठरला नाही काय? 22 तू पाहतोस की त्याच्या कृतीमध्ये विश्वाससुद्धा बरोबरीने कार्यरत होता व त्याचा विश्वास त्याच्या कृतीमुळे पूर्ण झाला. 23 आणि अशा रीतीने पवित्र शास्त्र जे सांगते, ते परिपूणे झाले की, “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास हा त्याचे नीतिमत्त्व मोजला गेला.” [a] आणि त्या कारणामुळे त्याला “देवाचा मित्र” असे म्हटले गेले. 24 केवळ विश्वासामुळे नव्हे, तर त्याच्या कृतीमुळे मनुष्य देवासमोर नीतिमान ठरविला जातो, हे तुम्ही पाहता.
25 त्याचप्रमाणे राहाब वेश्येने इस्राएली हेरांना आसरा देऊन, काही वेळानंतर निराळया वाटेने तेथून निसटून जाण्यासाठी मदत केली. तेव्हा ही कृती तिचे नीतिमत्त्व मानले गेले नाही काय?
26 म्हणून, ज्याप्रमाणे शरीर हे आत्म्याशिवाय मेलेले आहे, त्याचप्रमाणे विश्वास हा कृत्यांवाचून मेलेला असा आहे.
परमेश्वर वेदीजवळ उभा असल्याचा दृष्टांन्त
9 मी प्रभूला वेदीजवळ उभे असल्याचे पाहिले तो म्हणाला,
“खांबांच्या माथ्यावर मार
मग इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल.
खांब लोकांच्या डोक्यावर पाड.
कोणी जिवंत राहिल्यास,
मी त्याला तलवारीने ठार मारीन.
एखादा पळून जाईल, पण सुटणार नाही.
लोकांपैकी एकही सुटून
पळू शकणार नाही.
2 त्यांनी जमिनीत खोल खणले,
मी त्यांना तेथून ओढून काढीन.
ते आकाशात उंच गेले,
तरी मी त्यांना तेथून खाली आणीन.
3 ते जरी कर्मेल पर्वताच्या लपले,
तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन.
व तेथून उचलून घेईन.
जर त्यांनी माझ्यापासून लपण्यासाठी समुद्राचा तळ गाठला,
तर मी सापाला आज्ञा करीन.
व तो त्यांना चावेल.
4 जर ते पकडले गेले.
आणि त्यांचे शत्रू त्यांना घेऊन गेले.
तर मी तलवारीला आज्ञा करीन.
आणि ती त्यांना तेथे ठार मारील.
मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन हे खरे,
पण त्यांना त्रास कसा होईल हे मी पाहीन.
त्यांचे भले कसे होईल, हे मी पाहणार नाही.”
शिक्षा लोकांचा नाश करील
5 माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेशवर, जमिनीला स्पर्श करील
आणि ती वितळेल.
मग देशात राहणारे सर्व लोक मृतांसाठी शोक करतील
मिसरमधील नील नदीप्रमाणे
भूमीवर उठेल व खाली पडेल.
6 आकाशाच्यावर परमेश्वराने माड्या बांधल्या.
तो त्याचे आकाश पृथ्वीवर ठेवतो.
तो समुद्राच्या पाण्याला बोलवितो.
आणि पावसाच्या रूपात जमिनीवर ओततो, त्याचे नाव याव्हे [a] आहे.
इस्राएलच्या नाशाचे परमेश्वर वचन देतो
7 परमेश्वर असे म्हणतो:
“इस्राएल, तू मला कूशी लोकांप्रमाणे आहेस.
मी इस्राएलला मिसर देशातून बाहेर आणले.
पलिष्ट्यांना मी कफतोरमधून
आणि अरामींना कीर मधून आणले.”
8 परमेश्वर, माझा प्रभू, पापी राज्यावर (इस्राएलवर) लक्ष ठेवीत आहे.
परमेश्वर म्हणाला,
“मी इस्राएलला पृथ्वीतळावरून पुसून टाकीन.
पण याकोबच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही.
9 इस्राएल राष्ट्रांच्या नाशाची आज्ञा मी देत आहे.
सर्व राष्ट्रांमध्ये मी इस्राएलच्या लोकांना पांगवीन.
पण पीठ चाळण्यासारखे ते असेल.
चाळणीतील पीठ हलविल्यावर, चांगले पीठ खाली पडते.
व चाळ चाळणीतच राहते, याकोबच्या घराण्याचे तसेच होईल.
10 “माझ्या लोकांतील पापी म्हणतात,
‘आमचे काही वाईट होणार नाही.’
पण त्या सर्वांना तलवारीने ठार मारले जाईल.”
राज्याच्या पुनर्बांधणीचे परमेश्वर वचन देतो
11 “दाविदचा तंबू पडला आहे.
पण त्या वेळी, मी तो तंबू पुन्हा उभारीन.
मी भिंतींतील भगदाडे बुजवीन, उद्ध्वस्त झोलेल्या वास्तू मी पुन्हा बांधीन.
मी त्या पूर्वाे होत्या, तशाच बांधीन.
12 [b] मग अदोममध्ये जिवंत असलेले लोक
आणि माझे नाव लावणारे लोक परमेश्वराकडे मदतीच्या आशेने पाहतील.”
परमेश्वर असे म्हणाला
व तो तसेच घडवून आणील.
13 परमेश्वर म्हणतो, “असे दिवस येत आहेत की नांगरणी करणारा कापणी करणाऱ्याला,
द्राक्षे तुडविणारा द्राक्षे तोडणाऱ्याला, गाठील.
टेकड्यां-डोंगरांतून गोड द्राक्षरस ओतला जाईल,
14 मी माझ्या लोकांना, इस्राएलला,
कैदेतून सोडवून परत आणीन.
ते उद्ध्वस्त झालेली गावे पुन्हा वसवतील.
आणि त्यांत वस्ती करतील.
ते द्राक्षांचे मळे लावतील.
आणि त्यापासून मिळणारा द्राक्षरस पितील.
ते बागा लावतील.
व त्यापासून मिळणारे पीक खातील.
15 मी माझ्या लोकांना त्यांच्या देशात रुजवीन.
आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पून्हा उपटले जाणार नाहीत.”
परमेश्वराने, तुमच्या परमेश्वराने, हे सांगितले आहे.
येशूची परीक्षा(A)
4 येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरुन यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले. 2 तेथे सैतानाने त्याला चाळीस दिवस मोहात टाकले. त्या दिवसांत येशूने काहीही खाल्ले नाही. जेव्हा ती वेळ संपली, तेव्हा येशूला भूक लागली.
3 सैतान त्याला म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस, तर या दगडांची भाकर करुन दाखव.”
4 येशून त्याला उत्तर दिले, “असे लिहिले आहे:
‘मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.’” (B)
5 मग सैतान त्याला वर घेऊन गेला. आणि एका क्षणात जगातील सर्व राज्ये त्याला दाखविली. 6 सैतान त्याला म्हणाला, “मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व गौरव देईन कारण ते मला दिलेले आहे. आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो. 7 जर तू माझी उपसना करशील, तर हे सर्व तुझे होईल.”
8 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे:
‘तू प्रभु तुझा देव याचीच उपासना केली पाहिजे,
आणि फक्त त्याचीच सेवा केली पाहिजे.’” (C)
9 नंतर त्याने त्याला यरुशलेमाला नेले. आणि मंदिराच्या उंच टोकावर त्याला उभे केले. आणि तो म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी मार! 10 असे लिहिले आहे:
‘तो मुझे संरक्षण करण्याची
देवादूतांना आज्ञा करील.’ (D)
11 आणि असेही लिहीले आहे:
‘ते तुला आपल्या हातावर उचलून धरतील,
त्यामुळे तुझा पाय दगडावर आपटणार नाही.’” (E)
12 येशून उत्तर दिले. “पवित्र शास्त्रत असेही म्हटले आहे,
‘तु प्रभु, तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस.’” (F)
13 म्हणून सैतानाने प्रत्येक प्रकारे भुरळ घालण्याचे संपविल्यावर, योग्य वेळ येईपर्यंत तो येशूला सोडून गेला.
येशू गालीलात त्याच्या कामाचा प्रारंभ करतो(G)
14 मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालीलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली. 15 त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले, आणि सर्वांनी त्याची स्तुति केली.
येशू आपल्या गावी जातो(H)
16 मग तो नासरेथला गेला. जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बाथ दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला, तो वाचण्यासाठी उभा राहिला, 17 आणि यशया संदेष्ट्याचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे:
18 “प्रभूचा आत्मा मजवर आहे,
कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी
बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी,
आंधळ्यांना दृष्टि मिळावी व त्यांनी बघावे यासाठी,
जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी
19 आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे.” (I)
20 मग त्याने पुस्तक बंद केले आणि सेवकाला परत दिले व तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येक जण त्याच्याकडे रोखून पाहत होता. 21 त्यांने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली: “तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्रवचन पूर्ण झाले.”
22 तेव्हा प्रत्येकाने त्याच्याविषयी चांगले उद्गार काढले. आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले. आणि ते म्हणाले, “हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?”
23 तो त्यांना म्हणाला, “अर्थात, तुम्ही मला ही म्हण लागू कराल; ‘वैद्या, स्वतःला बरे कर.’ ‘कफर्णहूमात ज्या गोष्टी तू केल्याचे आम्ही ऐकले त्या गोष्टी तुझ्या स्वतःच्या गावातसुद्धा कर.’” मग तो म्हणाला, 24 “मी तुम्हांला खरे सांगतो, कोणीही संदेष्टा त्याच्या स्वतःच्या गावात स्वीकारला जात नाही.
25 “मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात एलीयाच्या काळात पुष्कळ विधवा होत्या, जेव्हा साडेतीन वर्षेपर्यंत पाऊस पडला नाही आणि सर्व प्रदेशात मोठा दुष्काळ पडला होता 26 तरीही एलीयाला इतर कोणत्याही विधवेकडे पाठविण्यात आले नाही. त्याला सिदोन प्रांतातील सारफथ येथील विधवेकडेच पाठविण्यात आले.
27 “अलीशा संदेष्ट्याच्या वेळेस इस्राएलात अनेक कुष्ठरोगी होते परंतु त्यापैकी कोणीही शुद्ध झाला नाही. केवळ सूरीया येथील नामान कुष्ठरोग्यालाच शुद्ध करण्यात आले होते.”
28 जेव्हा सभास्थानातील लोकांनी हे ऐकले, तेव्हा ते फार रागावले. 29 ते लोक उठले आणि त्यांनी त्याला (येशूला) शहराबाहेर घालवून दिले आणि ज्या टेकडीवर त्यांचे गाव वसले होते, त्या टेकडीच्या कड्याकडे त्याला ढकलून देण्यासाठी घेऊन गेले. 30 परंतु तो त्यांच्यातून निघून आपल्या वाटेने गेला.
येशू अशुद्ध आत्मा असलेल्या मनुष्याला बरे करतो(J)
31 नंतर तो गालीलातील कफर्णहूम गावी गेला. तो त्यांना शब्बाथ दिवशी शिक्षण देत असे. 32 ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण तो अधिकारवाणीने शिकवीत असे.
33 सभास्थानात एक मनुष्य होता, त्याच्यात अशुद्ध आत्मा होता. 34 तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे नासरेथच्या येशू, तुला आमच्याकडून काय पाहिजे? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे: देवाचा पवित्र तोच तू आहेस.” 35 येशूने त्याला दटावले आणि म्हटले, “शांत राहा आणि त्याच्यातून नीघ!” तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्याला जमिनीवर खाली ढकलले व त्या माणसाला काहीही इजा न करता तो बाहेर आला.
36 सर्व जण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, “हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्यांना आज्ञा करतो व ते बाहेर येतात.” 37 अशा प्रकारे त्या भागात त्याच्याविषयी सगळीकडे ही बातमी पसरली.
येशू एका स्त्रीला बरे करतो(K)
38 येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू अति तापाने आजारी होती. त्यांनी येशूला तिला बरे करण्याविषयी विनविले. 39 येशू तिच्याजवळ उभा राहिला. त्याने तापाला आज्ञा दिली व ताप निघाला. ती ताबडतोब उठली आणि त्यांची सेवा करु लागली.
इतर अनेकांना येशू बरे करतो
40 सूर्य मावळतीला जात असताना, ज्यांची माणसे निरनिराळ्या रोगांनी आजारी होती त्या सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले. 41 कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, “तू देवाचा पुत्र आहेस.” परंतु त्याने त्यांना दटावले व बोलू दिले नाही कारण त्यांना माहीत होते की, तो ख्रिस्त आहे.
येशू इतर शहरांमध्ये जातो(L)
42 जेव्हा दिवस उगवला तेव्हा तो एकांत स्थळी गेला. पण लोक त्याला शोधत होते. तो जेथे होता तेथे ते लगेच आले. आणि त्याने त्यांच्यातून निघून जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. 43 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे. कारण याच कारणासाठी मला पाठविले आहे.”
44 आणि तो यहूदियाच्या वेगवेगळ्या सभास्थानात उपदेश करीत होता.
2006 by World Bible Translation Center