M’Cheyne Bible Reading Plan
करारकोश माघारी आणणे
13 दावीद आपल्या सैन्यातील अधिकाऱ्यांशी बोलला. 2 मग दावीदाने इस्राएलमधील सर्व लोकांना एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “तुम्हाला जर हे योग्य वाटत असेल आणि परमेश्वराचीही ती इच्छा असेल तर इस्राएलच्या सर्व भागात पसरलेल्या आपल्या बांधवांसाठी आपण एक संदेश पाठवू. आपापल्या नगरांत आणि खेड्यांत त्यांच्याबरोबर जे याजक आणि लेवी आहेत त्यांनाही आपण निरोप पाठवू. त्या सर्वांना आपण इकडे यायला सांगू. 3 आपला करारकोश आपण पुन्हा यरुशलेममध्ये आणू. शौल राजा असताना आपण करारकोशाची नीट देखभाल केलेली नाही.” 4 दावीदाच्या या बोलण्याशी सर्व इस्राएल लोक सहमत झाले. सर्वाना त्याचे म्हणणे पटले.
5 मिसरमधील शीहोर नदीपासून लेबो हामाथच्या प्रवेशापर्यंत पसरलेल्या सर्व इस्राएल लोकांना मग दावीदाने एकत्र केले. किर्याथ यारीमहून हा कोश आणण्यासाठी ते सर्व जमले. 6 किर्याथ-यारीम म्हणजेच यहूदातील बाला येथे दावीदासह सर्व इस्राएली पोचले. करारकोश म्हणजे करुबांवरती राहणाऱ्या परमेश्वराचा करार कोश. तो आणावा म्हणून ते आले.
7 लोकांनी अबीनादाबच्या घरातून हा करारकोश हलवला. तो नव्या गाडीवर चढवला. उज्जा आणि अह्यो हे दोघेजण ही गाडी हाकत होते.
8 दावीद आणि इस्राएल लोक देवापुढे जल्लोष करत चालले. देवाची स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.
9 किदोनच्या खळ्यापर्यंत ते पोचले. तेव्हा गाडी ओढणारे बैल जरा अडखळले. त्यामुळे करारकोश अगदी पडायला आला. तेवढ्यात उज्जाने कोशाला हात दिला. 10 परमेश्वराचा उज्जावर कोप झाला. उज्जाने कोशाला हात लावला म्हणून देवाने त्याला ठार केले. उज्जा तत्क्षणी देवासमोर मरण पावला. 11 देवाने उज्जावर असा राग काढावा याचे दावीदाला वाईट वाटले. तेव्हा पासून आजतागायत त्या ठिकाणाचे नाव “पेरेस-उज्जा” असे आहे.
12 दावीदाला त्यादिवशी देवाची धास्ती वाटली. दावीद म्हणाला, “आपल्या इथे मी परमेश्वराचा कोश कसा आणू?” 13 त्यामुळे त्याने दावीदनगराला तो करारकोश आणला नाही. तेथेच त्याने करार कोश ओबेद-अदोम याच्या घरी नेला. ओबेद-अदोम हा गथ नगरातील होता. 14 हा करारकोश त्याच्या घरात तीन माहिने होता. ओबेद-अदोमच्या घराला आणि त्याचे जे काही होते त्या सगळ्याला परमेश्वराने आपले आशीर्वाद दिले.
दावीदाच्या राज्याची भरभराट
14 हिराम सोराचा राजा होता. त्याने दावीदाकडे दूत पाठवले. याखेरीज त्याने गंधसरुचे ओंडके, गवंडी, सुतार हे देखील पाठवून दिले. दावीदासाठी घर बांधायला म्हणून त्याने ही मदत केली. 2 तेव्हा, परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलचा राजा केले आहे हे दावीदाच्या लक्षात आले. दावीदावर आणि इस्राएलच्या लोकांवर प्रेम असल्यामुळे देवाने दावीदाचे साम्राज्य विशाल आणि मजबूत केले.
3 यरुशलेम नगरातल्या आणखी काही स्त्रियांशी दावीदाने लग्ने केली. त्याला आणखी मुले-मुली झाली. 4 यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या या मुलांची नावे अशी: शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन, 5 इभार, अलीशवा, एल्पलेट, 6 नोगा, नेफेग. याफीय, 7 अलीशामा, बेल्यादा, अलीफलेट.
दावीदाकडून पलिष्ट्यांचा पाडाव
8 दावीदाला इस्राएलचा राजा केले आहे हे पलिष्ट्यांना कळले तेव्हा ते दावीदाच्या मागावर निघाले. दावीदाला ही बातमी कळली तेव्हा तो पलिष्ट्यांशी लढायला निघाला. 9 पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर चढाई करुन त्यांना लुटले. 10 दावीद देवाला म्हणाला, “पलिष्ट्यांवर मी प्रतिहल्ला करु काय? मला तू त्यांचा पराभव करु देशील काय?”
परमेश्वराने दावीदाला सांगितले, “जरुर जा. मी तुझ्या हातून पलिष्ट्यांचा पराभव करवीन.”
11 मग दावीद आणि त्याची माणसे बाल-परासीम येथपर्यत जाऊन पोचली. त्यांनी पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “धरणाला खिंडार पाडून पाणी घुसते त्याप्रमाणे देवाने माझ्या शत्रूला मागे सारले आहे. माझ्या कडून देवाने हे करवून घेतले.” म्हणून आता त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम-देवाने पाडलेले खिंडार-असे पडले आहे. 12 पलिष्ट्यांनी आपली दैवते तिथेच बाल-परासीम येथे टाकून दिली. दावीदाने आपल्या माणसांना त्या मूर्ती जाळून टाकायला सांगितल्या.
पलिष्ट्यांवर आणखी एक विजय
13 रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला. 14 दावीदाने पुन्हा देवाची प्रार्थना केली. देवाने त्या प्रार्थनेला ओ दिली. तो म्हणाला, “दावीदा, तू पलिष्ट्यांवर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन न जाता पाठीमागून जा. तुतीच्या झाडांमागे लपून बस. त्या झाडांवर चढून बस. 15 तिथे तुला सैन्य चाल करुन जात आहे याची चाहूल लागेल. तेव्हा पलिष्ट्यांवर हल्ला चढव. मी (म्हणजे देव) पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे होईन आणि त्यांचा पराभव करीन.” 16 दावीदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाने आपल्या लोकांसह पलिष्ट्यांचा पाडाव केला. गिबोनपासून गेजेपर्यंत त्यांनी पलिष्ट्यांच्या सैन्याला झोडपून काढले. 17 त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्वदूर पसरली. देवाने सर्व राष्ट्रांत दावीदाची दहशत निर्माण केली.
1 देवाचा आणि प्रभु येशू ख्रिस्ताचा सेवक, याकोब याजकडून,
देवाच्या लोकांचे “बारा वंश” जे जगभर विखुरलेले आहेत त्यांना सलाम!
विश्वास आणि शहाणपण
2 माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतील तेव्हा तुम्ही स्वतःला अत्यंत सुदैवी समजा, 3 कारण तुम्हांला माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे धीर निर्माण होतो. 4 आणि त्या धीराला परिपूर्ण काम करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे व्हावे.
5 म्हणून जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे. जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो, आणि जो दोष शोधीत नाही, असा देव ते त्याला देईल. 6 पण त्याने विश्वासाने मागितले पाहिजे व संशय धरू नये. कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे इकडेतिकडे हेलकावणाऱ्या समुद्रातील लाटेसारखा आहे. 7-8 अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्याला काही प्राप्त होईल. कारण तो द्विधा आहे आणि तो जे करतो त्या सर्वांत तो अस्थिर आहे.
खरी संपत्ती
9 गरिबीत असलेल्या बंधूने, देवाने त्याला आध्यात्मिक संपत्ती दिलेली आहे याविषयी अभिमान बाळगावा. 10 आणि श्रीमंत बंधूने देवाने त्याला दीनतेत आणले याचा अभिमान बाळगावा. कारण तो एखाद्या रानफुलासारखा नाहीसा होतो. 11 सूर्य त्याच्या प्रखर उष्णतेसह वर येतो आणि झुडपे वाळून जातात. मोहोर गळून पडतो व त्याचा लोभसवाणा पेहराव नाहीसा होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यदेखील त्याच्या उद्योगात असताना नाहीसा होईल.
परिक्षा देवापासून येत नाही
12 धन्य तो पुरूष जो त्याच्या परीक्षेत टिकतो, कारण जेव्हा ती परीक्षा तो उत्तीर्ण होईल, तेव्हा त्याला विजेत्याचा मुगूट मिळेल. तो मुगुट देवाने जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना देण्याचे अभिवचन दिले आहे. 13 कोणीही, जेव्हा तो परीक्षेत पडतो, तेव्हा असे म्हणू नये की, “हे संकट देवाने माझ्यावर आणले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही. 14 तर प्रत्येक जण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो. तो आकृष्ट केला जातो व मोहात पडतो. 15 मनात वासना निर्माण झाली की, तिच्या पोटी पापाचा जन्म होतो व पापाची जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा ते मरणाला जन्म देते.
16 माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका. 17 प्रत्येक उत्तम व परिपूर्ण देणगी वरून येते. स्वर्गीय प्रकाश ज्याने निर्माण केला त्या पित्यापासून ती येते. आणि ज्याच्यावर तारांगणाच्या हालचालीचा काहीही परिणाम होत नाही, अशा पित्यापासून ती देणगी येते. 18 सत्याच्या संदेशाद्वारे आपण त्याची मुले व्हावे ही त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली निवड केली आहे. पित्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपण “प्रथम फळ” व्हावे यासाठी त्याने असे केले.
ऐकणे आणि आज्ञा पाळणे
19 माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा: प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागावण्यात मंद असावा. 20 कारण मनुष्याच्या रागामुळे देव ज्या नीतीमत्त्वाची अपेक्षा करतो ते निर्माण होत नाही. 21 म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगऴ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या. आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्विकारा.
22 देवाची शिकवण काय सांगते त्याप्रमाणे नेहमी करा व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. 23 जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले नैसर्गिक तोंड पाहणाऱ्यासारखा आहे. 24 तो मनुष्या स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो. 25 पण देवाचे परिपूर्ण व लोकांना स्वतंत्र बनविणारे जे नियम आहेत, त्यांच्याकडे जो बारकाईने पाहतो, सतत अभ्यास करतो आणि वचन ऐकून ते विसरून न जाता त्यानुसार चालतो, तो मनुष्य जे काही करतो त्यामध्ये आशीर्वादित होईल.
देवाच्या उपासनेचा मार्ग
26 जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवीत नाही, तर तो स्वतःला फसवितो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे. 27 अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो, व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.
पिकलेल्या फळाचा दृष्टांन्त
8 परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या मी एक उन्हाळी फळांची टोपली पाहिली. 2 परमेश्वराने मला विचारले, “आमोस, तुला काय दिसते?”
मी म्हणालो, “उन्हाळी फळांची टोपली.”
मग परमेश्वर मला म्हणाला, “माझ्या लोकांचा, इस्राएलचा, शेवट आला आहे. ह्यापुढे मी त्यांच्या पापाकडे दुर्लक्ष करणार नाही. 3 मंदिरातील गाण्याचे रूपांतर विलापिकेत होईल. परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला. सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील. लोक गुपचूप, प्रेते उचलतील आणि ढिगावर फेकतील.”
इस्राएलच्या व्यापाऱ्यांना फक्त पैसे मिळविण्यात स्वारस्य आहे
4 माझे ऐका! तुम्ही असहाय्य लोकांना तुडविता
ह्या देशातील गरिबांचा नाश करण्याचा तुम्ही प्रयत्न करीत आहात.
5 तुम्ही, व्यापारीलोक म्हणता,
“प्रतिपदा केव्हा संपेल? म्हणजे मग आम्ही आमचे धान्य विकू शकू.
शब्बाथ, केव्हा संपेल?
म्हणजे मग आम्हाला गहू विकता येईल?
आम्ही किंमत वाढवू शकतो
आणि माप लहान करू शकतो
तराजू आपल्या सोयीचे करून
आपण लोकांना फसवू शकतो.
6 गरीब कर्ज फेडू शकत नाहीत,
तेव्हा आपण त्यांना गुलाम म्हणून विकत घेऊ.
एका जोड्याच्या किंमतीत आपण
त्या असहाय्य लोकांना विकत घेऊ.
हो! आणि जमिनीवर सांडलेले गहू
आपण विकू शकू.”
7 परमेश्वराने वचन दिले आहे त्याने त्याच्या नावाची, याकोबच्या अभिमानाची शपथ घेऊन वचन दिले.
“त्या लोकांनी केलेली कृत्ये मी कधीही विसरणार नाही.
8 त्या कृत्यांमुळे सर्व भूमी हादरेल.
ह्या देशात राहणारा प्रत्येकजण मृतासाठी रडेल.
मिसरमधील नील नदीप्रमाणे,
संपूर्ण देश वर फेकला जाऊन खाली आदळेल.
देश हेलकावे खाईल.”
9 परमेश्वराने पुढील गोष्टीही सांगितल्या,
“त्या वेळी, मी सूर्याचा दुपारीच अस्त करीन.
स्वच्छ निरभ्र दिवशी, मी जगावर अंधार पसरवीन.
10 मी तुमचे उत्सव शोकदिनांत बदलीन.
तुमची सर्व गाणी ही मृतांसाठीची शोकागीते होतील.
मी प्रत्येकाला शोकप्रदर्शक कपडे घालीन.
मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन.
एकुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो,
तसा मी करीन.
तो फारच कडू शेवट असेल.”
देवाच्या वचनांच्या उपासमारीची भयंकर वेळ येत आहे
11 परमेश्वर म्हणतो,
“पाहा! मी देशात उपासमार आणीन.
ते दिवस येतच आहेत लोकांना भाकरीची भूक नसेल.
ते पाण्यासाठी तहानेले नसतील
परमेश्वराच्या वचनांचे ते भूकेले असतील.
12 लोक मृतसमुद्रापर्यंत
आणि उत्तरेपासून पूर्वेपर्यंत भटकतील.
परमेश्वराचे वचन शोधत लोक इकडे तिकडे भटकतील.
पण त्यांना ते सापडणार नाहीत.
13 त्या वेळी, सुंदर तरुण-तरुणी
तहानेने दुर्बल होतील.
14 शोमरोनच्या पापाच्या [a] जोरावर त्यांनी वचने दिली.
ते म्हणाले, ‘दान, तुझा परमेश्वर जिवंत आहे, तितक्याच खात्रीपूर्वकआम्ही वचन देतो….’
आणि ते म्हणाले,
‘जितका बैर-शेबा परमेश्वर जिवंत आहे, तितक्याच खात्रीपूर्वक आम्ही वचन देतो….’
हे लोक पडतील,
आणि ते परत कधीही उठणार नहीत.”
योहानाचा संदेश(A)
3 तिबिर्य कैसराच्या कारकीर्दीच्या पंधराव्या वर्षी,
जेव्हा पंतय पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता,
आणि हेरोद गालीलचा अधिकारी असताना,
आणि त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया व त्राखोनीती या देशांचा अधिकारी होता,
व लूसनिय हा अबिलेनेचा अधिकारी होता.
2 हनन्या व केफा हे मुख्य याजक होते, तेव्हा वाळवंटात देवाचे वचन जखऱ्याचा पुत्र योहान याच्याकडे आले. 3 तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात गेला, व लोकांना त्यांच्या पापांपासून क्षमा मिळण्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्याविषयी घोषणा करीत फिरला. 4 हे यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे झाले:
“वाळवंटात कोणाचा तरी आवाज ऐकू आला,
‘प्रभूसाठी मार्ग तयार करा,
त्याचे रस्ते सरळ करा.
5 प्रत्येक दरी भरुन येईल,
आणि प्रत्येक डोंगर व टेकडी सपाट केली जाईल
वाकड्यातिकड्या जागा सरळ केल्या जातील
ओबडधोबड रस्ते सपाट केले जातील
6 आणि सर्व लोक देवाचे तारण पाहतील!’” (B)
7 त्याच्याकडून बाप्तिस्मा करुन घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला: “अहो, सापाच्या पिल्लांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करुन घेण्यासाठी तुम्हांला कोणी सावध केले? 8 पश्चातापास योग्य असे फळ द्या, आणि आपापसात असे म्हणू नका की, ‘आमच्यासाठी अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ मी तुम्हांला सांगतो की, अब्राहामासाठी मुले निर्माण करण्यास देव या खडकांचा उपयोग करण्यास समर्थ आहे. 9 आणि झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड अगोदरच ठेवलेली आहे. आणि प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून आगीत टाकले जाईल.”
10 जमावाने त्याला विचारले, “मग आता आम्ही काय करावे?”
11 त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन सदरे असतील त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ते वाटून द्यावे. ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
12 काही जकातदारही बाप्तिस्मा करुन घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”
13 तो त्यांना म्हणाला, “गरजेपेक्षा जास्त जमा करु नका.” हेच तुम्हांला सांगितले आहे.
14 काही शिपायांनीसुद्धा त्याला विचारले, “आणि आम्ही काय करावे?”
योहान त्यांना म्हणाला, “कोणाकडून बळजबरीने पैसे घेऊ नका, कोणावरही खोटा आरोप करु नका. आणि तुम्हांला मिळणाऱ्या पगारात समाधानी राहा.”
15 लोक मशीहाची अपेक्षा करीत होते. आणि ते सर्व त्यांच्या मनामध्ये योहानाबद्दल आश्चर्य करीत होते व असा विचार करीत होते की, “कदाचित तो ख्रिस्त असण्याची शक्यता आहे.”
16 त्या सर्वांना योहानाने उत्तर दिले; तो म्हणाला. “मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण एकजण जो माझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली आहे तो येत आहे. त्याच्या वहाणांचे बंद सोडण्यासही मी पात्र नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील. 17 त्याचे खळे स्वच्छ करण्यासाठी व त्याच्या कोठारात गहू साठविण्यासाठी त्याच्या हातात त्याचे सूप आहे पण भुसा तो न विझविता येणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.” 18 योहानाने इतर पुष्कळ उत्तेजन देणाऱ्या शब्दांनी त्यांना बोध करुन सुवार्ता सांगितली.
योहानाचा कार्य कशा संपलि
19 योहानाने हेरोद या सताधीशाची कानउघडणी केली. कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नीशी-हेरोदीयाशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या. 20 हे सर्व करुन सुद्धा त्यात भर म्हणून की काय त्याने योहानाला तुरुंगात टाकले.
योहानाकरवी येशूचा बाप्तिस्मा(C)
21 तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा केला जात होता, तेव्हा येशूचा सुद्धा बाप्तिस्मा झाला. तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले. 22 आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रुपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून एक वाणी आली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुझ्याविषयी फार संतुष्ट आहे.”
योसेफाच्या घराण्याचा इतिहास(D)
23 जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोकांना असे वाटे की, येशू योसेफाचा मुलगा आहे.
योसेफ एलीचा मुलगा होता.
24 एली मत्ताथाचा मुलगा होता.
मत्ताथ लेवीचा मुलगा होता.
लेवी मल्खीचा मुलगा होता.
मल्खी यन्रयाचा मुलगा होता.
यन्रया योसेफाचा मुलगा होता.
25 योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता.
मत्तिथ्य अमोसाचा मुलगा होता.
अमोस नहूमाचा मुलगा होता.
नहूम हेस्लीचा मुलगा होता.
हेस्ली नग्गयाचा मुलगा होता.
26 नग्गय महथाचा मुलगा होता.
महथ मत्तिथ्याचा मुलगा होता.
मत्तिथ्य शिमयीचा मुलगा होता.
शिमयी योसेखाचा मुलगा होता.
योसेख योदाचा मुलगा होता.
27 योदा योहानानचा मुलगा होता.
योहानान रेशाचा मुलगा होता.
रेशा जरुब्बाबेलाचा मुलगा होता.
जरुब्बाबेल शल्तीएलाचा मुलगा होता.
शल्तीएल नेरीचा मुलागा होता.
28 नेरी मल्खीचा मुलगा होता.
मल्खी अद्दीचा मुलगा होता.
अद्दी कोसोमाचा मुलगा होता.
कोसोम एल्मदामाचा मुलगा होता.
एल्मदाम एराचा मुलगा होता.
29 एर येशूचा मुलगा होता.
येशू अलिएजराचा मुलगा होता.
अलिएजर योरीमाचा मुलगा होता.
योरीम मत्ताथाचा मुलगा होता.
मत्ताथ लेवीचा मुलगा होता.
30 लेवी शिमोनाचा मुलगा होता.
शिमोन यहूदाचा मुलगा होता.
यहूदा योसेफाचा मुलगा होता.
योसेफ योनामाचा मुलगा होता.
योनाम एल्याकीमाचा मुलगा होता.
31 एल्याकीम मल्लयाचा मुलगा होता.
मल्ल्या मिन्नाचा मुलगा होता.
मिन्ना मत्ताथाचा मुलगा होता.
मत्ताथ नाथानाचा मुलगा होता.
नाथान दाविदाचा मुलगा होता.
32 दावीद इशायाचा मुलगा होता.
इशाय ओबेदाचा मुलगा होता.
ओबेद बवाजाचा मुलगा होता.
बवाज सल्मोनाचा मुलगा होता.
सल्मोन नहशोनाचा मुलगा होता.
33 नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता.
अम्मीनादाब अर्णयाचा मुलगा होता.
अर्णय हेस्रोनाचा मुलगा होता.
हेस्रोन पेरेसाचा मुलगा होता.
पेरेस यहूदाचा मुलगा होता.
34 यहूदा याकोबाचा मुलगा होता.
याकोब इसहाकाचा मुलगा होता.
इसहाक अब्राहामाचा मुलगा होता.
अब्राहाम तेरहाचा मुलगा होता.
तेरह नाहोराचा मुलगा होता.
35 नाहोर सरुगाचा मुलगा होता.
सरुग रऊचा मुलगा होता.
रऊ पेलेगाचा मुलगा होता.
पेलेग एबराचा मुलगा होता.
एबर शेलहाचा मुलगा होता.
36 शेलह केनानाचा मुलगा होता.
केनान अर्पक्षदाचा मुलगा होता.
अर्पक्षद शेमाचा मुलगा होता.
शेम नोहाचा मुलगा होता.
नोहा लामेखाचा मुलगा होता.
37 लामेख मथुशलहाचा मुलगा होता.
मथुशलह हनोखाचा मुलगा होता.
हनोख यारेदाचा मुलगा होता.
यारेद महललेलाचा मुलगा होता.
महललेल केनानाचा मुलगा होता.
38 केनान अनोशाचा मुलगा होता.
अलोश शेथाचा मुलगा होता.
शेथ आदामाचा मुलगा होता.
आदाम देवाचा मुलगा होता.
2006 by World Bible Translation Center