M’Cheyne Bible Reading Plan
दावीद इस्राएलचा राजा होतो
11 सर्व इस्राएल लोक हेब्रोन येथे दावीदाकडे जमले. ते त्याला म्हणाले, “आम्ही तुझे भाऊबंद आहोत, तुझ्याच रक्तामांसाचे आहोत. 2 पूर्वी लढाईत तू आमचे नेतृत्व केले आहेस. शौल राजा असतानाही तू ते केले आहेस. परमेश्वर तुला म्हणाला, ‘दावीदा, तू माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ होशील. माझ्या लोकांचे नेतृत्व करशील.’”
3 इस्राएल लोकांमधील सर्व वडीलधारी मंडळी दावीद राजाकडे हेब्रोन येथे आली. परमेश्वरासमोर दावीदाने त्यांच्याशी करार केला. तेव्हा त्या पुढाऱ्यांनी दावीदास अभिषेक केला. आता दावीद इस्राएलाचा राजा झाला. शमुवेल मार्फत परमेश्वराने असे होणार असे वचन दिले होते.
दावीद यरुशलेम घेतो
4 सर्व इस्राएल लोकांबरोबर दावीद यरुशलेम नगराकडे गेला. यरुशलेमला त्याकाळी यबूस असे म्हणत असत; आणि तेथे राहणाऱ्यांना यबूसी. ते नगरवासी 5 दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरात पाऊल टाकू शकणार नाहीस.” तरीही दावीदाने त्यांचा पाडाव केलाच. दावीदाने सियोनचा किल्ला घेतला. यालाच दावीदनगर हे नाव पडले.
6 दावीद म्हणाला, “यबूसी लोकांवरील हल्ल्याचे जो नेतृत्व करील तो माझा सेनापती होईल.” यवाबने हे नेतृत्व केले. हा सरुवेचा मुलगा. यवाब सेनापती झाला.
7 दावीदाने किल्ल्यातच आपला मुक्काम केला म्हणून त्याला दावीद नगर नाव पडले. 8 या किल्ल्याभोवती दावीदाने नगराची उभारणी केली. मिल्लो पासून नगराच्या तटबंदीपर्यंत त्याने ते बांधले. जेथे पडझड झाली होती तिथे दुरुस्ती केली. 9 दावीदाच्या मोठेपणात भर पडत गेली. सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता.
दावीदाची फौज
10 दावीदाच्या, खास सैनिकांच्या पुढाऱ्यांची नावे या यादीत आहेत. दावीदाच्या राज्यात त्यांचेही बळ वाढले. त्यांनी आणि समस्त इस्राएल लोकांनी दावीदाला पाठिंबा दिला आणि त्याला राजा केले. देवाने कबूल केल्याप्रमाणेच हे घडले.
11 दावीदाकडील खास सैनिकांची नावे अशी:
याशबाम हखमोनी. हा रथचालकांचा प्रमुख होता. याशबाम एकावेळी तीनशे जणांना आपल्या भाल्याने ठार करु शकत असे.
12 त्यानंतर दोदय अहोही याचा मुलगा एलाजार. एलाजार तिघा पराक्रमींपैकी एक होता. 13 पसदम्मीम येथे हा दावीदाबरोबर होता. पलिष्टे त्या ठिकाणी लढायला आले होते. तेथे शेतात जवाचे पीक उभे होते. इस्राएल लोक तेव्हा पळून गेले. 14 पण तीन शूर वीर तिथेच पाय रोवून उभे राहिले आणि त्यांनी बचाव करायचा प्रयत्न केला. पलिष्ट्यांचा त्यांनी पराभव केला. परमेश्वराने इस्राएल लोकांना मोठा विजय मिळवून दिला.
15 एकदा, दावीद अदुल्लामच्या गुहेत होता. पलिष्ट्यांचे सैन्य तिथून खाली रेफाईमच्या खोऱ्यात होते. त्यावेळी तीस वीरांपैकी तिघेजण गुहेत असलेल्या दावीदाकडे जायला जमिनीवरुन सरपटत रांगत निघाले.
16 आणखी एकदा दावीद किल्ल्यांत असताना पलिष्ट्यांचे सैन्य बेथलहेममध्ये होते. 17 तेव्हा आपल्या गावचे पाणी प्यावे असे दावीदाला फार वाटले. तो म्हणाला, “बेथलहेमच्या वेशीजवळ विहीर आहे तिच्यातले पाणी मला कोणी आणून दिले तर किती बरे होईल.” त्याला पाणी हवे होते असे नाही पण तरी तो हे म्हणाला. 18 यावर त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीतून मोठ्या हिकमतीने वाट काढली, बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतील पाणी काढले आणि ते त्या तिघांनी दावीदाला आणून दिले. दावीदाने ते पाणी प्यायला नकार दिला. त्याने ते जमिनीवर ओतून परमेश्वराला अर्पण केले. 19 दावीद म्हणाला, “देवा, हे पाणी मी कसे पिऊ? हे मी प्यायलो तर ते इथपर्यंत आणायला ज्यांनी आपला जीव धोक्यात घातला त्यांचे रक्तच प्यायल्यासारखे होईल.” त्याने ते पाणी न प्यायचे कारण हे होय. त्या तीन शूरांनी असे बरेच पराक्रम केले.
दावीदाकडील आणखी शूर वीर.
20 यवाबचा भाऊ अबीशय हा या तिघांचा प्रमुख होता. त्याने आपल्या भाल्याने तीनशे जणांचा प्रतिकार केला आणि त्यांना ठार केले. अबीशय त्या तिघांएवढाच प्रसिध्द होता. 21 त्या तीन शूरांपेक्षा जास्त याने नाव कमावले. तो त्या तिघामधला नसला तरी त्यांचा नायक झाला.
22 यहोयादा हा एका बलाढ्य माणसाचा मुलगा होता. यहोयादाचा मुलगा बनाया. हा कबसेल येथला होता. बनायाने खूप पराक्रम केले. मवाबातील दोन अग्रगण्य माणसांना त्याने ठार केले. एकदा बर्फ पडत असताना गुहेत शिरुन त्याने सिंहाचा वध केला. 23 मिसरच्या एका मजबूत सैनिकालाही त्याने मारले. हा सैनिक साडेसात फूट उंचीचा होता. त्याच्याजवळ चांगला लांब आणि भक्कम भाला होता. विणकराच्या मागावरील तुळईएवढा हा भाला होता. बनायाजवळ फक्त गदा होती. बनायाने त्या सैनिकाच्या हातून भाला हिसकावून घेतला आणि त्यानेच त्या मिसर सैनिकाला ठार केले. 24 यहोयादाचा मुलगा बनाया याने असे बरेच पराक्रम केले. तीन शूरांप्रमाणेच त्याने नाव मिळवले. 25 तीस शूरांपेक्षा बनायाचा बोलबाला जास्त झाला. पण तो त्या तिघांपैकी नव्हता. दावीदाने बनायाला आपल्या अंगरक्षकांचे प्रमुख म्हणून नेमले.
तीस पराक्रमी वीर
26 सैन्यातील शूर सैनिक (तीस वीर) पुढीलप्रमाणे:
यवाबचा भाऊ असाएल,
बेथलेहेमच्या दोदोचा मुलगा एलहानान,
27 हरोरी शम्मोथ,
हेलस पलोनी,
28 तकोइच्या इक्केशचा मुलगा ईरा,
अनाथोथचा अबियेजेर
29 शिब्बखाय हूशाथी,
ईलाय अहोही,
30 महरय नटोफाथी,
बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेद,
31 बन्यामीनांच्या संतानांमधला गिबोथकर रीबय याचा मुलगा इत्तय,
बनाया पिराथोनी,
32 गाशच्या झऱ्यांजवळचा हूरय,
अबीएल अर्बाथी,
33 अजमावेथ बहरुमी,
अलीहबा शालबोनी,
34 हामेश गिजोनी याचे मुलगे,
शागे हरारी याचा मुलगा योनाथान,
35 साखार हरारी याचा मुलगा अहीयाम,
ऊरचा मुलगा अलीफल,
36 हेफेर मखेराथी,
अहीया पलोनी,
37 हेस्त्री कर्मेली,
एजबयचा मुलगा नारय,
38 नाथानचा भाऊ योएल,
हग्रीचा मुलगा मिभार,
39 सेलक अम्मोनी,
सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
40 ईरा, इथ्री,
गारेब, इथ्री,
41 उरीया हित्ती,
अहलयाचा मुलगा जाबाद,
42 शीजा रउबेनी याचा मुलगा अदीना हा रउबेन्यांचा अधिकारी व तीस शूरांपैकी एक,
43 माकाचा मुलगा हानान
आणि योशाफाट मिथनी,
44 उज्जीया अष्टराथी,
होथाम अरोएरी याचे मुलगे शामा ईयेल
45 शिम्रीचा यदीएल योहा तीसी
आणि त्याचा भाऊ योहा
46 अलीएल महवी व
एलानामचे मुलगे यरीबय
आणि योशव्या व इथ्मा मवाबी,
47 अलीएल, ओबेद न यासीएल मसोबायी.
दावीदाला येऊन मिळालेले शूर वीर
12 दावीद सिकलागला असताना त्याच्याकडे आलेल्यांची ही यादी. दावीद तेव्हा कीशचा मुलगा शौल याच्या भयाने लपून राहत होता. या लोकांनी दावीदाला लढाईत मदत केली. 2 धनुष्यबाण चालवणे किंवा गोफणगुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या उजव्या दोन्ही हातांनी सराईतपणे करीत. बन्यामीनच्या वंशात जे शौलचे नातेवाईक होते त्यांच्यापैकी हे होत. त्यांची नावे अशी:
3 अहीएजर हा त्यांच्यातला प्रमुख. मग योवाश (गिबा येथील शमा याचे हे मुलगे) त्यानंतर यजिएल आणि पलेट. हे अजमावेथ याचे मुलगे. अनाथोच येथील बराका व येहू. 4 गिबोन येथील इश्माया (हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख.) गदेराथ लोकामधून यिर्मया, यहजिएल, योहानान आणि योजाबाद. 5 एलूजय, यरीमोथ, बाल्या, शमऱ्या, हरुफी शफट्या 6 एलकाना, इश्शीया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरही, 7 तसेच यहोहाम गदोरी याचे मुलगे योएला आणि जबद्या.
गाद वंशातील लोक
8 गादी यांच्यातील काही लोक दावीदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल वापरणे, भालाफेक यात ते वाकबगार होते. ते सिंहासारखे उग्र आणि डोंगरातल्या हरणासारखे चपळ होते.
9 गाद वंशातील एजेर हा सैन्याचा प्रमुख होता. ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा. 10 मिश्मन्ना चवथ्या क्रमाकांवर तर यिर्मया पाचव्या वर होता. 11 अत्तय सहावा, एलीएल सातवा, 12 योहानन आठवा, एलजाबाद नववा, 13 यिर्मया दहावा, मखबन्नय अकरावा.
14 हे गादी सैन्यातील सरदार होते. त्यांच्यातला कनिष्ठसुध्दा शत्रूच्या शंभर जणांना भारी होता आणि त्यांच्यातला खंदा वीर हजाराच्या सैन्याशी एकटा लढू शकत असे. 15 गादच्या घराण्यातील हेच सैनिक, वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी पार करुन गेले. नदीला तेव्हा पूर आलेला होता. खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्र्चिमेला पळवून लावले.
इतर सैनिक दावीदाला येऊन मिळतात
16 बन्यामिन आणि यहूदा वंशातील लोकही दावीदाला गढीत येऊन मिळाले. 17 दावीदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना तो म्हणाला, “मला मदत करायला तुम्ही सदभावनेने आला असाल तर तुमचे स्वागत असो. तुम्ही माझ्याकडे या पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून तुम्हाला शासन करो.”
18 अमासय हा तीस वीरांचा सरदार होता. त्याच्यात परमेश्वरी आत्म्याचा साक्षात्कार झाला आणि तो म्हणाला,
“दावीदा, आम्ही तुझ्या बाजूचे
आहोत इशायाच्या मुला,
आम्ही तुझ्या पाठीशी आहोत शांती असो!
तुला साहाय्य करणाऱ्यांनाही शांती असो.
कारण देव तुझा पाठीराखा आहे.”
तेव्हा दावीदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले.
19 मनश्शेच्या वंशातील काहीजणही दावीदाला येऊन मिळाले. दावीद पलिष्टंयाबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले. पण दावीदाने आणि त्याच्या सैन्याने पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही. पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी दावीदाची मदत घेण्याचा विचार केला पण मग त्यांनी त्याला परत पाठवले. त्यांनी विचार केला, “दावीद जर आपला स्वामी शौल याच्याकडे परत गेलाच तर आपला शिरच्छेद होईल.” 20 दावीद सिक्लागला गेला. त्याच्या बरोबर आलेले मनश्शेचे लोक याप्रमाणे: अदनाह, योजाबाद, यदीएल, मीखाएल, योजाबाद, अलीहू, आणि सिलथय. हे सर्व मनश्शे वंशातील सरदार होते. 21 लुटारुंना तोंड द्यायला त्यांनी दावीदाला मदत केली. या लुटारुंच्या टोळ्या देशभर लोकांना त्रस्त करत होत्या. मनश्शे वंशातील लोक मात्र शूर होते. दावीदाच्या सैन्यात ते अधिकारपदावर चढले.
22 दावीदाच्या मदतीला येणाऱ्यांत रोजच्यारोज भर पडत गेली. त्यामुळे त्यांचे सैन्य वरचढ होत गेले.
हेब्रोन येथे दावीदाला येऊन मिळालेले आणखी काही लोक
23 हेब्रोन नगरात दावीदाकडे आणखी बरेच लोक आले. ते लढाईला तयार होते. शौलचे राज्य त्यांना दावीदाला द्यायचे होते. असे घडणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. त्या लोकांची संख्या अशी:
24 यहूदाच्या घराण्यातील 6,800 हत्यारबंद सैनिक ढाल आणि भाले यांसह ते सज्ज होते.
25 शिमोनच्या कुळातून 7,100 जण लढाईला तयार असे शूर सैनिक होते.
26 लेवीच्या कुळातून 4,600 जण. 27 यहोयादा यांच्यात होता. हा अहरोनच्या घराण्याचा पुढारी होता. यहोयादाबरोबर 3,700 चे सैन्य होते. 28 सादोक ही त्यांच्यात होता. तो तरुण लढवय्या होता. आपल्या घराण्यातील बावीस सरदार त्याने बरोबर आणले.
29 बन्यामीनच्या वंशातील 3,000 जण होते. ते शौलचे नातेवाईक होते. तो पर्यंत ते बहुतेक शौलच्या घराण्याशी एकनिष्ठ होते.
30 एफ्राइमच्या घराण्यातील 20,800 शूर सैनिक ते सर्व आपापल्या कुळात नावाजलेले होते.
31 मनश्शेच्या वंशातील निम्मे म्हणजे 18,000 लोक आले. दावीदाला राजा करण्यासाठी म्हणून त्यांना नावानिशी बोलवून आणले होते.
32 इस्साखारच्या घराण्यातील 200 जाणती, जबाबदार माणसे आली. इस्राएलने केव्हा काय करणे योग्य आहे याचे त्यांना चांगले भान होते. त्यांचे भाऊबंद त्यांच्या सोबत, त्यांच्या आज्ञेत होते.
33 जबुलून घराण्यातले 50,000 अनुभवी सैनिक तयार होते. सर्व शस्त्रे ते कुशलतेने हाताळू शकत. दावीदाशी ते एकनिष्ठ होते.
34 नफतालीच्या घराण्यातून 1,000 सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे 37,000 लोक होते.
35 दानच्या वंशातून 28,000 जण युध्दाला तयार होते.
36 आशेर मधले 40,000 सैनिक युध्दावर जायला तयार असे होते.
37 यार्देन नदीच्या पूर्वेकडील रऊबेनी, गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील 1,20,000 लोक सर्व प्रकारच्या हत्यारांसह सज्ज होते.
38 हे सर्व जण पराक्रमी होते. दावीदाला इस्राएलचा राजा करायचे याबाबतीत इतर इस्राएल लोकांची एकवाक्यता होती. म्हणूनच ते हेब्रोन येथे एकत्र आले. इस्राएलमधील इतर लोकांचीही दावीदाने राजा व्हावे हीच इच्छा होती. 39 या लोकांनी हेब्रोन येथे दावीद बरोबर तीन दिवस घालवले. खाद्यपेयांचा आस्वाद घेतला कारण त्यांच्या नातलगांनी सर्व सिध्दता केली होती. 40 याखेरीज इस्साखार, जबुलून, नफताली अशा आसपासच्या भागात राहणाऱ्यांनी गाढव, उंट, खेचर, गुरं यांच्या पाठीवर लादून अनेक खाद्यपदार्थ आणले. कणीक, अंजीराच्या ढेपा, मनुका, द्राक्षारस, तेल, गुरे-मेंढरे असे बरेच काही आणले. इस्राएलमध्ये आनंदीआनंद पसरला होता.
Worship That Pleases God
13 ख्रिस्तामध्ये एकमेकांवर अखंडपणे बंधु व भगिनीसारखी प्रीति करा. 2 पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे. 3 तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही देहात असल्याने जे दु:ख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.
4 सर्वांनी लग्नाचा आदर करावा. व वैवाहिक अशुद्धता असू नये. कारण जे व्यभिचारी व विषयवासनेबद्दल भ्रष्ट आहेत अशा लोकांचा देव न्याय करील. 5 आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवाने असे म्हटले आहे.
“मी कधीही तुला सोडणार नाही,
मी कधीही तुला त्यागणार नाही” (A)
6 म्हणून आपण खात्रीने म्हणू शकतो,
“देव माझा सहाय्यकर्ता आहे,
मी भिणार नाही.
मनुष्य माझे काय करणार?” (B)
7 ज्यांनी तुम्हांला देवाचा संदेश दिला त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील निष्पत्ती पाहा. आणि त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. 8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे. 9 निरनिराळ्या तऱ्हेच्या विचित्र शिकवणुकींमुळे बहकून जाऊ नका. अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली ह्रदये बळकट केलेली फार बरी. कारण अन्नाच्या विधींचे पालन करण्याने कोणाचेही हित झालेले नाही.
10 ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे. 11 यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात. 12 म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांना शुद्ध करावे यासाठी नगराच्या वेशी बाहेर दु:ख सोसले, 13 म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ. 14 कारण कायमस्वरूपी असे नगर आपल्याला येथे नसले तरी भविष्याकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत. 15 तर मग आपण येशूच्या द्वारे स्तुतीचा यज्ञ सातत्याने करू या. म्हणजे त्याचे नाव आपल्या ओठांनी सतत घेऊ या 16 आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
17 आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दु:खाने न करता आनंदाने करावे.
18 आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सदसदविवेक बुध्दि शुद्ध आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्व बाबतीत जे नेहमी बरोबर आहे तेच सदैव करीत राहावे अशी आमची इच्छा आहे. 19 मी तुम्हांला विनंति करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून प्रार्थना करा.
20-21 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभु येशू ख्रिस्त याला रक्ताच्या युगानुयुगाच्या नव्या कराराद्वारे उठविले. त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हांला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन.
22 बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंति तुम्हांला करतो. 23 आपला बंधु तीमथी हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हाला भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.
24 तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व संतांना सलाम सांगा, इटली येथील सर्वजण तुम्हांला सलाम सांगतात.
25 देवाची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो. आमेन.
टोळांचा दृष्टांन्त
7 परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या: दुसरे पीक वाढण्यास सुरुवात व्हायच्या वेळेलाच. तो टोळ तयार करीत होता. पहिल्या पिकाची राजाची कापणी झाल्यानंतरचे हे दुसरे पीक होते. 2 टोळांनी देशातील सर्व गवत खाल्ले. त्यानंतर मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, मी विनवणी करतो, आम्हाला क्षमा कर. याकोब जगू शकणार नाही तो फारच दुबळा आहे.”
3 मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मनःपरिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”
अग्नीचा दृष्टांन्त
4 परमेश्वराने, माझ्या प्रभूने, मला पुढील गोष्टी दाखविल्या मी पाहिले की परमेश्वर देवाने अग्नीला न्याय देण्यास बोलाविले. अग्नीने मोठा डोह नष्ट केला व त्याने भूमी गिळण्यास सुरवात केली. 5 पण मी म्हणालो, “हे परमेश्वर देवा, थांब, मी तुझी करूणा भाकतो याकोब जगू शकणार नाही तो खूपच लहान आहे.” 6 मग परमेश्वराचे ह्या गोष्टीबाबत ह्रदयपरिवर्तन झाले. परमेश्वर प्रभू म्हणाला, “हीही घटना घडणार नाही.”
ओळंब्याचा दृष्टांन्त
7 परमेश्वराने मला पुढील गोष्टी दाखविल्या. परमेश्वर, त्याच्या हातात ओळंबा घेऊन एका भिंतीजवळ उभा होता (भिंत ओळंब्याने सरळ केलेली होती.) 8 परमेश्वर मला म्हणाला, “आमोस, तुला काय दिसते?”
मग माझा प्रभू म्हणाला, “पाहा, माझ्या माणसांमध्ये, इस्राएलमध्ये मी ओळंबा धरीन. मी त्यांच्या दृष्टपणाकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही. मी वाईट डाग काढून टाकीन. 9 इसहाकच्या उच्च स्थानाचा नाश होईल. इस्राएलची पवित्र स्थाने धुळीला मिळतील. मी यराबाम घराण्यावर हल्ला करीन आणि त्यांना तलवारीने ठार मारीन.”
अमस्या आमोसला थांबविण्याचा प्रयत्न करतो
10 बेथेल येथील एक याजक अमस्या ह्याने, “इस्राएलचा राजा यराबाम ह्याला पुढील निरोप पाठविला. आमोस तुझ्याविरुध्द उठाव करावा म्हणून प्रयत्न करीत आहे. तो इतका बोलतोय की हा देश त्याचे सर्व शब्द मानू शकत नाही. 11 आमोस म्हणाला असे आहे, यराबाम तलवारीच्या वाराने मरेल, आणि इस्राएलच्या लोकांना त्यांच्या देशातून कैदी म्हणून बाहेर नेले जाईल.”
12 अमास्या आमोसला असेही म्हणाला, “अरे द्रष्ट्या, खाली यहूदात जा आणि तेथे जेव! तेथेच दे तुझे प्रवचन. 13 पण यापुढे बेथेलमध्ये संदेश देऊ करू नकोस. ही यराबामची पवित्र जागा आहे, हे इस्राएलचे मंदिर आहे.”
14 मग आमोस अमास्याला म्हणाला, “मी धंदेवाईक संदेष्टा नाही. मी संदेष्ट्यांच्या घराण्यातीलही नाही. मी गुरे राखत होतो. आणि उंबरांच्या झाडांची निगा राखत होतो. 15 मी मेंढपाळ होतो मेंढ्यांच्या मागे जात असतानाच परमेश्वराने माझा स्वीकार केला. परमेश्वर मला म्हणाला, ‘जा माझ्या लोकांना, इस्राएलला, संदेश सांग.’ 16 म्हणून परमेश्वराचा संदेश ऐका ‘इस्राएलविरुध्द संदेश सांगू नकोस, इसहाकच्या घराण्याविरुध्द प्रवचन देऊ नकोस’ असे तू मला सांगतोस. 17 पण परमेश्वर म्हणतो, ‘तुझी बायको गावची वेश्या होईल. तुझी मुलेमुली तलवारीने मरतील. दुसरे लोक तुमची भूमी घेऊन तिची आपापसात वाटणी करतील. तू परदेशात मरशील इस्राएलच्या लोकांना निश्चितच त्यांच्या देशातून कैदी म्हणून नेले जाईल.’”
येशूचा जन्म(A)
2 त्या दिवसात कैसर औगुस्तकडून हुकुम झाला की, रोमन जगातील सर्व लोकांच्या नावांची नोंद झालीच पाहिजे. 2 ही पहिली नावनोंदणी होती. क्वीरीनिय हा सूरिया प्रांताचा राज्यपाल होता त्यावेळेस ही नावनोंदणी झाली. 3 प्रत्येक जण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गावी गेला.
4 मग योसेफसुद्धा गालीलातील नासरेथ गावाहून यहूदीयातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला. कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. 5 जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते व जी गरोदर होती, त्या मरीयेसह तो तेथे नावनोंदणी करण्यासाठी गेला. 6 ते तेथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली. 7 आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्याला फडक्यांमध्ये गुंडाळले व गोठ्यात ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.
काही मेंढपाळ येशूविषयी ऐकतात
8 आणि तेथे काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते. 9 आणि देवाचा एक दूत त्यांच्यामोर प्रगट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले. आणि ते मेंढपाळ घाबरुन गेले. 10 देवदूत त्यांना म्हणाला: “भिऊ नका, कारण मी तुम्हांला आनंदाची बातमी सांगणार आहे, जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे. 11 कारण आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभु आहे. 12 आणि तुमच्यासाठी ही खूण असेल: फडक्यात गुंडाळलेले आणि गोठ्यात निजविलेले बाळ तुम्हांला आढळेल.”
13 आणि अचानक तेथे देवदूताबरोबर स्वर्गातील सैन्याचा समुदाय जमला. ते देवाची स्तुति करीत होते आणि म्हणत होते;
14 “स्वर्गात देवाला गौरव आणि
ज्यांच्याबद्दल देव समाधानी आहे, त्या पृथ्वीवरील मनुष्यांत शांति”
15 जेव्हा देवदूत त्यांना सोडून परत स्वर्गात गेले, तेव्हां मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, “चला, बेथलेहेमला जाऊ या आणि घडलेली जी गोष्ट देवाने आम्हांला कळविली ती पाहू या.”
16 ते घाईने गेले आणि त्यांना मरीया व योसेफ आढळले आणि त्यांनी गोठ्यात ठेवलेले बाळ पाहिले. 17 जेव्हा मेंढपाळांनी त्याला पाहिले तेव्हा देवदूताने त्यांना त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते सर्वांना सांगितले. 18 ज्यांनी हे ऐकले ते सर्व मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे चकित झाले. 19 पण मरीयेने या गोष्टी स्वतःजवळच ठेवल्या, व सतत त्याविषयी विचार करु लागली. 20 त्यांनी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या सर्व गोष्टीविषयी देवाचे गौरव आणि स्तुति करीत मेंढपाळ घरी गेले: त्यांना जसे सांगण्यात आले तसेच सर्व घडले.
21 आणि जेव्हा बाळाची सुंता करण्याचा आठवा दिवस आला, तेव्हा त्याचे नाव येशू ठेवले गेले. हे नाव देवदूतांनी त्याला त्याची गर्भधारणा होण्यापूर्वीच ठेवले होते.
येशूचा मदिंरात प्रस्तुत केला गेला
22 मोशेच्या नियमाप्रमाणे जो त्यांचा शुद्धीकरणाच्या विधीचा काळ होता तो आला तेव्हा त्याला देवापुढे सादर करण्याचा विधि करण्यासाठी ते त्याला घेऊन यरुशलेमला गेले. 23 ज्याप्रमाणे प्रभूच्या नियमात लिहिले आहे; “प्रत्येक प्रथम जन्मलेला तर प्रभूला अर्पण करावा.” [a] 24 आणि “कबुतरांच्या जोडीचा किंवा पारव्याच्या दोन पिलांचा यज्ञ करावा.” [b]प्रभूच्या या नियमाप्रमाणे यज्ञ अर्पण करण्यास ते गेले:
शिमोन येशूला पाहतो
25 यरुशलेम येथे एक मनुष्य होता, त्याचे नाव शिमोन होते; तो नीतिमान आणि भक्तिशील होता. इस्राएलाचे सांत्वन होण्याची तो वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता. 26 पवित्र आत्म्याने त्याला दाखवून दिले की, प्रभू ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तो मरणार नाही. 27 आत्म्याने भरलेला तो मंदिरात गेला. आणि येशूच्या आईवडिलांनी बाळाला नियमशास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे करण्यासाठी त्याच्याजवळ आणले. 28 शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले, आणि त्याने देवाची स्तुति केली. तो म्हणाला:
29 “आता, प्रभु, आपल्या वचनाप्रमाणे आपल्या सेवकाला जाऊ दे,
30 कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे,
31 जे तू सर्व लोकांच्या समोर केलेस.
32 तो यहूदीतर लोकांना तुझा मार्ग प्रगट करण्यासाठी प्रकाश असा आहे.
आणि तो तुझे लोक इस्राएल यांच्यासाठी गौरव असा आहे.”
33 त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले. 34 मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला, तो येशूची आई मरीया हिला म्हणाला, “इस्राएलात, हे मूल, अनेकांचे पडणे व उठणे यांस कारणीभूत ठरेल. जे चिन्ह नाकारले जाईल ते होण्याकरिता याची नेमणूक झाली आहे. 35 अनेकांच्या मनातील विचार प्रगट होण्यासाठी तुझ्या जिवातून तरवार आरपार जाईल.”
हन्ना येशूला पाहते
36 तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी स्त्री होती. ती फनूएलाची मुलगी होती. ती अशेर वंशाची होती. ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली. 37 ती विधवा असून आता चौऱ्याऐंशी वर्षांची होती. तिने मंदिर कधीही सोडले नाही; उपास व प्रार्थना करुन ती रात्रंदिवस उपासना करीत असे.
38 ती त्यावेळी बालकाच्या आईवडिेलांकडे आली व तिने देवाचे आभार मानले. आणि जे यरुशलेमच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.
योसेफ आणि मरीया घरी येतात
39 प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांनी सर्व पूर्ण केले व नंतर ते गालीलातील त्यांच्या नासरेथ या गावी परतले. 40 बालक वाढत होता, तो बलवान झाला, तो ज्ञानाने परिपूर्ण झाला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.
येशूचे बालपण
41 प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरुशलेमाला जात. 42 जेव्हा तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी वर गेले. 43 सण संपल्यावर ते घरी परतत असता, येशू (मुलगा) मात्र यरुशलेमातच राहिला, पण त्याच्या आईवडिलांना हे माहीत नव्हते. 44 कुठल्या तरी प्रवाश्यांच्या घोळक्याबोरबर तो येत असावा असा विचार करुन पुढे एक दिवसाचा प्रवास केला. मग ते त्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये व मित्रांमध्ये शोधू लागले. 45 जेव्हा तो त्यानां सापडला नाही तेव्हा त्याला शोधण्यासाठी यरुशलेमास परत गेले.
46 असे घडले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात सापडला, तो गुरुजनांच्यामध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारीत होता. 47 ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले. 48 जेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला पाहिले तेव्हा ते चकित झाले. त्याची आई त्याला म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का केले? तुला शोधत असताना तुझे वडील व मी अतिशय काळजीत होतो.”
49 मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का केलात? माझ्या पित्याचे कार्य जेथे आहे, तेथे मी असावे हे तुम्हांला माहीत नव्हते काय?” 50 परंतु त्याने हे जे उत्तर दिले ते त्यांना समजले नाही.
51 मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला. आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याची आई या सर्व गोष्टी अंतःकरणात ठेवीत होती. 52 येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढला.
2006 by World Bible Translation Center