Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 इतिहास 9-10

इस्राएलच्या सर्व लोकांची नोंद वंशावळ्यांमध्ये केलेली आहे. इस्राएलच्या राजाचा इतिहास या पुस्तकात ती ग्रंथित केलेली आहे.

यरुशलेममधील लोक

देवाशी एकनिष्ठ न राहिल्याने यहूदाच्या लोकांना बाबेल येथे कैद करुन नेण्यात आले. त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, गावात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग.

यरुशलेममध्ये राहणाऱ्या यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्शे घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे:

ऊथय हा अम्मीहूदचा मुलगा. अम्मीहूद हा अम्रीचा मुलगा. अम्री इम्रीचा मुलगा. इम्री बानीचा मुलगा. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा मुलगा.

यरुशलेममध्ये राहणारे शिलोनी लोक असे: ज्येष्ठ पुत्र असाया आणि त्याचे मुलगे.

यरुशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर 690 भाऊबंद.

यरुशलेममधील बन्यामीन घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे: सल्लू हा मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम होदव्याचा मुलगा. होदवा हस्सनुवाचा मुलगा. इबनया हा यरहोरामचा मुलगा. एला उज्जीचा मुलगा. उज्जी मिख्रीचा मुलगा. मशुल्लाम शफाटयाचा मुलगा. शफाटया रगुवेलचा मुलगा रगुवेल इबनीया याचा मुलगा. बन्यामीनच्या वंशावळीवरुन असे दिसते की यरुशलेममध्ये हे एकंदर 256 होते. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते.

10 यरुशलेममधील याजक पुढीलप्रमाणे: यदया, यहोयारीब, याखीन, 11 अजऱ्या. अजऱ्या हा हिल्कीयाचा मुलगा. हिल्कीया मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम सादोकचा. सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा मुलगा. अहीटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकाही होता. 12 यहोरामचा मुलगा अदाया होता. यहोराम हा पशहूरचा मुलगा. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा मुलगा मसय. अदीएल यहजेराचा मुलगा, यहजेरा मशुल्लामचा मुलगा, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा मुलगा.

13 असे एकंदर 1,760 याजक होते. ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते. देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

14 यरुशलेममधील लेवी घराण्यातले लोक याप्रमाणे: हश्शूबचा मुलगा शमाया. हश्शूब अज्रीकामचा मुलगा. अज्रीकाम हशब्याचा मुलगा. हशब्या हा मरारीच्या वंशातला. 15 याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरुशलेममध्ये राहत होते. मतन्या मीखाचा मुलगा. मीखा जिख्रीचा मुलगा. जिख्री आसाफचा मुलगा. 16 ओबद्या शमाया याचा मुलगा. शमाया गालालचा मुलगा. गालाल यदूथूनचा मुलगा. याखेरीज आसा याचा मुलगा बरेख्या हाही तेथे राहत होता. आसा एल्कानाचा मुलगा. एल्काना हा नटोफाथी लोकांच्या जवळच्या छोट्या गावांमध्ये राहत होता.

17 यरुशलेममधील द्वाररक्षक पुढीलप्रमाणे: शल्लूम, अक्कूब, टल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य. 18 हे लोक आता राजाच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारापाशी उभे असतात. हे लेवीच्या वंशातले होते. 19 शल्लूम हा कोरे याचा मुलगा. कोरे हा एब्यासाफचा मुलगा. एब्यासाफ कोरहचा मुलगा. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहच्या वंशातले होते. पवित्र निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते हे काम पार पाडत होते. त्यांच्या पूर्वजांकडेही हीच जबाबदारी होती. 20 पूर्वी फिनहास द्वारपालाचा प्रमुख होता. फिनहास हा एलाजारचा मुलगा. परमेश्वर फिनहासचा पाठीराखा होता. 21 जखऱ्या पवित्र निवासमंडपाचा द्वारपाल होता.

22 पवित्र निवासमंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर 292 निवडक द्वाररक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दावीद आणि शमुवेल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती 23 परमेश्वराच्या मंदिराच्या, पवित्र निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती. 24 पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती. 25 आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत.

26 या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते. 27 देवाच्या मंदिरावर पहारा करत ते रात्रभर जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते.

28 मंदिरात वापरायच्या पात्रांची देखभाल काही द्वारपाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत. 29 लाकडी सामान, विशेष उपकरणे यांच्यावर इतर काही द्वारपाल नेमलेले होते. पीठ, द्राक्षारस, तेल, धूप, सुवासिक द्रव्य यांच्यावरही 30 त्यांचीच देखरेख होती. हे सुवासिक द्रव्य सिध्द करण्याचे काम याजकांचे होते.

31 अर्पणाच्या भाकरी भाजण्याच्या कामगिरीवर मत्तिथ्या नावाचा लेवी होता. मत्तिथ्या हा शल्लूमचा थोरला मुलगा. शल्लूम कोरा कुटुंबातील होता. 32 कोरा कुटुंबातील काही द्वार रक्षकांना शब्बाथच्या दिवशी मेजावर मांडायचा पाव तयार करण्याचे काम सोपवलेले होते.

33 लेर्वीपैकी जे घराण्यांचे प्रमुख आणि गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत असत. मंदिरातील कामाची जबाबदारी रात्रंदिवस त्यांच्यावर असल्याने अमुकच असे काम त्यांच्यावर सोपवलेले नव्हते.

34 हे सर्व लेवी आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी वंशावळ्यांमध्ये नोंद आहे. ते यरुशलेममध्ये राहत असत.

शौल राजाच्या घराण्याचा इतिहास

35 ईयेल म्हणजे गिबोनचे वडील. ईयेल गिबोन मध्येच राहत होता. त्याच्या बायकोचे नाव माका. 36 ईयेलच्या ज्येष्ठ मुलाचे नाव अब्दोन. सूर, कीश, बाल, नेर आणि नादाब त्याची आणखी मुले. 37 शिवाय गदोर, अह्यो, जखऱ्या आणि मिकलोथ ही त्याचीच मुले. 38 मिकलोथने शिमामला जन्म दिला. ईयेलचे कुटुंब यरुशलेममध्ये आपल्या भाऊबंदाजवळच राहत होते.

39 नेर हे कीशाचे वडील. कीश शौलाचे वडील. योनातान, मलकी शुवा, अबीनादाब आणि एश्बाल ही शौलची मुले.

40 मरीब्बाल हा योनाथानचा मुलगा. मीखा हा मरीब्बालाचा मुलगा.

41 पीथोन, मेलेख आणि तरहेया हे मीखाचे मुलगे. 42 आहाजने यारा याला जन्म दिला. [a] आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्रीयांना याराने जन्म दिला. जिम्रीने मोसा याला जन्म दिला. 43 मोसाचा मुलगा बिना. बिनाचा मुलगा रफाया. रफायाचा मुलगा एलासा आणि एलासाचा मुलगा आसेल.

44 आसेलला सहा मुलगे झाले. त्यांची नावे अशी: अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही झाली आसेलची मुले.

शौल राजाचा मृत्यू

10 पलिष्टी इस्राएल लोकांशी लढले. इस्राएल लोकांनी पळ काढला. गिलबोवा डोंगरात बरेच इस्राएल लोक मारले गेले. पलिष्ट्यांनी शौल आणि त्याचे मुलगे यांचा पाठलाग चालूच ठेवला. त्यांना पकडले आणि ठार केले. योनाथान, अबीनादाब आणि मलकीशुवा या शौलच्या मुलांना पलिष्ट्यांनी मारले. शौलावर त्यांनी तीव्र मारा केला. धनुष्यबाणांनी वेध घेऊन त्याला सैन्याने जायबंदी केले.

तेव्हा आपल्या शस्त्रवाहकाला शौल म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि ती माझ्यावर चालव. नाहीतर हे उपरे येऊन माझी विटंबना करतील.”

पण शौलाच्या या शस्त्रवाहकाचा धीर झाला नाही. त्याने शौलाला मारण्यास नकार दिला. तेव्हा शौलाने स्वतःची तलवार स्वतःला मारण्यासाठी वापरली. तो स्वतःतलवारीच्या टोकावर पडला. शौल मरण पावलेला पाहून शस्त्रवाहकाने तलवार उपसून त्यावर पडला व स्वतःचा जीव घेतला. अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन मुलगे यांना मरण आले. शौलाच्या कुटुंबाला एकदमच मृत्यू आला.

आपल्या सैन्याने पळ काढला आहे. तसेच शौल आणि त्याचे मुलगे मेले हे खोऱ्यात राहणाऱ्या इस्राएल लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनीही आपली घरेदारे सोडून पळ काढला. इस्राएल लोकांनी सोडलेल्या त्या नगरामध्ये पलिष्टी आले आणि तेथेच राहू लागले.

दुसऱ्या दिवशी हे पलिष्टी मृतांच्या अंगावरील मौल्यवान चीजवस्तू लुटायला आले. तेव्हा गिलबोवा डोंगरावर त्यांना शौल आणि त्याचे मुलगे यांचे मृतदेह सापडले. शौलाच्या देहावरील वस्तू त्यांनी घेतल्या. त्याचे मस्तक आणि चिलखत लांबवले. हे वर्तमान आपल्या दैवतांना आणि लोकांना कळवायला त्यांनी देशभर दूत रवाना केले. 10 पलिष्ट्यांनी शौलाचे चिलखता आपल्या देवळात आणि शिर दागोनच्या देवळात टांगले.

11 पलिष्ट्यांच्या या कृत्याची वार्ता याबेश गिलाद नगरातील लोकांच्या कानावर गेली. 12 तेव्हा त्यांच्यातील शूर माणसे शौल आणि त्याची मुले यांचे मृतदेह आणायला निघाली. ते मृतदेह त्यांनी याबेश गिलाद येथे आणले. तेथे एका मोठ्या वृक्षाखाली त्यांनी त्यांच्या अस्थी पुरल्या आणि सात दिवस उपवास केला.

13 परमेश्वराशी प्रामाणिक नसल्याने शौलाला मरण आले. शौलाने परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन केले. 14 शिवाय परमेश्वराला विचारण्याऐवजी भूतविद्या जाणणाऱ्या बाईकडे जाऊन त्याने सल्ला विचारला. म्हणून परमेश्वराने शौलाला मृत्युदंड दिला आणि इशायाचा मुलगा दावीद याला राज्य दिले.

इब्री लोकांस 12

येशूचे उदाहरण आपणसुध्दा अनुसरावे

12 म्हणून, विश्वास धरणारे पुष्कळ ढगांसारखे साक्षीदार सभोवती असल्याने आपल्याला अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टी तसेच सहजासहजी गुंतविणारे पाप आपण दूर फेकू या व जी शर्यत आपल्यासमोर आहे ती शर्यत आपण चिकाटीने पूर्ण करू. जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या सिंहासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे. तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून पापी लोकांचा मोठ्या प्रमाणातील विरोध सहन कला. त्याचा विचार करा.

God Is Like a Father

पापाविरुद्धच्या तुमच्या युद्धात तुम्ही रक्त सांडेपर्यंत अजून झगडा दिला नाही. ज्याच्याकडून तुम्हांला उत्तेजन मिळेल असा जो शब्द (मुले) तुम्हाला उद्देशून वापरण्यात आला आहे त्याचा कदाचित तुम्हाला विसर पडलेला दिसतो:

“माइया मुला, प्रभूच्या शिस्तीचा अनादर करू नको,
    आणि जेव्हा तो तुला ताळ्यावर आणतो, तेव्हा तू धीर सोडू नको.
कारण ज्याच्यावर प्रभु प्रेम करतो, त्यांना तो शिस्त लावतो आणि
    ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्यांना तो शिक्षा करतो.” (A)

हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन कर. ते असे दर्शविते की, देव तुम्हांला मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत? जर तुम्हांला शिस्त लावलेली नाही तर जसा इतर सर्व मुलांचा अनुभव असतो तसे तुम्ही अनौरस मुले आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही. याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हाला शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या किती तरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे? 10 आमच्या मानवी वडिलांनी त्यांच्या दृष्टीने अती उत्तम अशी शिस्त थोड्या काळासाठी लावली. पण देव आम्हाला आमच्या चांगल्यासाठी शिस्त लावतो, यासाठी की, त्याच्या पवित्रपणात आपणही वाटेकरी व्हावे. 11 शिक्षेने शिस्त लावण्याच्या वेळेस कोणतीही शिक्षा चांगली वाटत नाही, तर दु:खाची वाटते पण नंतर ज्या लोकांना शिस्तीचे धडे शिकायला मिळाले आहेत, त्यांना धार्मिकपणाच्या आणि शांतीच्या जीवनाची फळे चाखण्याची संधि मिळते.

आपण कसे जगतो याविषयी जागरुक राहा

12 म्हणून तुमचे गळून गेलेले हात उंच करा आणि तुमचे अशक्त गुडघे बळकट करा! 13 तुमच्या पावलांकरीता सरळ रस्ता तयार करा यासाठी की, लंगडे पाय निकामी होऊ नयेत, तर उलट ते बरे व्हावेत.

14 सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण त्याशिवाय (पवित्रतेशिवाय) कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही. 15 कोणीही देवाची कृपा चुकवू नये, यासाठी तिकडे लक्ष द्या आणि इकडे लक्ष द्या की, कोणतेही कडूपणाचे मूळ वाहून त्यापासून समस्या निर्माण होऊ नये व इतर लोकांची मने कलुषित करू नये, म्हणून जपा. 16 कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणापायी आपला वडीलकीचा हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या. 17 नंतर तुम्हाला माहीत आहे जेव्हा त्याला वारसहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या वडिलांचे मन तो बदलू शकला नाही.

18 ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दु:ख व वादळ यांनी भरलेला आहे, अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नविन ठिकाणी आला आहात. 19 कर्ण्याच्या आवाजाजवळ तुम्ही आला नाहीत किंवा शब्द उच्चारणाऱ्याच्या वाणी याजवळ तुम्ही आला नाही. असा आवाज ज्यानी ऐकला त्यानी अशी विनंती केली की, त्यांनी यापुढे आणखी वाणी ऐकवू नये. 20 कारण ते जी आज्ञा केली होती सहन करू शकले नाहीत. “जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा.” [a] 21 खरोखर ते दृश्य इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “भीतीमुळे मी थरथर कांपत आहे.” [b]

22 परंतु तुम्ही सीनाय पर्वताजवळ जिवंत देवाच्या नगराजवळ आणि स्वर्गीय यरुशलेम येथे आलेले आहात आणि तुम्ही आनंदाने जमा झालेल्या हजारो देवदूतांजवळ आलेले आहात. 23 आणि तुम्ही प्रथम जन्मलेल्या मुलांच्या मंडळीकडे, ज्यांची नावे स्वर्गात लिहिली आहेत अशांकडे आला आहात, आणि तुम्ही देव जो सर्वांचा न्यायाधीश आहे त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही नीतिमान लोकांच्या आत्म्यांकडे जे पूर्ण आहेत त्यांच्याकडे आला आहात. 24 आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक चांगल्या गोष्टी सांगते.

25 जो बोलतो त्याचे ऐकण्यासाठी नकार देऊ नका. त्याविषयी खात्री असू द्या. ज्याने पृथ्वीवर त्यांना सावध राहण्याविषयी सांगताना त्याचे ऐकायचे नाही असे ज्यांनी ठरविले ते लोक जर सुटू शकले नाहीत तर मग जो स्वर्गातून सावध करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला सुटकेसाठी कोणता मार्ग राहीला बरे? 26 त्यावेळेस त्याच्या आवाजाने भूमि हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हादरवून टाकीन.” [c] 27 “पुन्हा एकदा” हे शब्द हेच दर्शवितात की, ज्या गोष्टी उत्पन्न केलेल्या आहेत त्या काढून टाकण्यात येतील. ज्या गोष्टी हलविता येत नाहीत त्या तशाच राहतील.

28 म्हणून, आम्हाला अढळ असे राज्य देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या, आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची उपासना करू. 29 कारण आपला देव भस्म करणारा अग्नि आहे.

आमोस 6

इस्राएलचा शुभ-समय काढून घेतला जाईल

सयोनमधील काहींचे जीवन आरामदायी आहे.
    शोमरोनच्या पर्वतावरील काही लोकांना नर्धास्त वाटते.
पण तुमच्यावर खूप संकटे येतील.
    जगातील उत्तम नगरीतील तुम्ही “महत्वाचे लोक” आहात इस्राएलचे (लोक) मदत मागण्यासाठी तुमच्याकडे येतात.
कालनेला जाऊन पाहा.
    तेथून महानगरी हमाथला जा.
    पलिष्ट्यांची नगरी गथला जा.
तुम्ही ह्या राज्यांपेक्षा चांगले आहात का?
    नाही. त्याचे देश तुमच्या देशापेक्षा मोठे आहेत.
तुम्ही लोक करीत असलेल्या कृत्यांमुळे शिक्षेचा दिवस जवळ जवळ येत आहे.
    तुम्ही त्या हिंसाचाराच्या नियमाला जवळ जवळ आणता.
पण तुम्ही सर्व सुखसोयी उपभोगता.
    तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि गाद्या-गिर्द्यावर पसरता.
तुम्ही कळपातील कोवळी कोकरे
    व गोठ्यातील वासरे खाता.
तुम्ही वीणा वाजविता.
    आणि दाविदाप्रमाणे वाद्यांवर सराव करता.
तुम्ही दिमाखदार प्यालांतून मद्य पिता.
    तुम्ही चांगली अत्तरे वापरता.
पण योसेफच्या वंशाचा नाश होत आहे,
    ह्याचा तुम्हाला खेदही वाटत नाही.

ते लोक त्यांच्या गाद्या-गिर्द्यावर पसरले आहेत पण त्यांचा चांगला काळ संपेल कैद्यांप्रमाणे त्यांना परकीय देशांत नेले जाईल ते अशारीतीने नेले जाणाऱ्यांतील पहिले असतील. परमेश्वराने, माझ्या प्रभूने, स्वतःची शपथ घेतली. सर्वशक्तिमान परमेश्वर देवाने अशी शपथ घेतली,

“याकोबला ज्या गोष्टींचा अभिमान वाटतो,
    त्या गोष्टींचा मला तिटकारा करतो.
त्याच्या जबूत मनोऱ्यांचा मी तिटकारा करतो.
    म्हणून मी शत्रूला ती नगरी व त्यातील सर्व काही घेऊ देईन.”

फार थोडे इस्राएली जिवंत राहतील

त्या वेळी, कदाचित् काही घरांत दहा लोक जिवंत राहतील आणि ते सुध्दा मरतील. 10 प्रेत घेऊन जाळण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित् कोणी लपले असेल तर त्याला लोक विचारतील “तुझ्याजवळ आणखी एखादे प्रेत आहे का?”

तो माणूस म्हणेल, “नाही……”

मग त्या माणसाचा नातेवाईक म्हणेल, “शू! आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नसतो.”

11 पाहा! परमेश्वर देव आज्ञा देईल,
    मग मोठ्या घरांचे तुकडे तुकडे होतील.
    व लहान घरांचे लहान लहान तुकडे होतील.
12 घोडे खडकावरून धावतात का?
    नाही. लोक गायांच्या साहाय्याने जमीन नांगरतात का?
नाही. पण तुम्ही सर्वकाही वरचे खाली करता.
    तुम्ही चांगुलपणा व न्याय यांचे वीष केले.
13 तुम्ही लो-देबारमध्ये सुखी आहात.
    तुम्ही म्हणता, “आम्ही आमच्या बळावर कर्नाईम घेतले.”

14 “पण इस्राएल, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन. ते राष्ट्र. तुमच्या संबंध देशाला लेबो-हमाथपासून अराबाच्या ओढ्यापर्यंतच्या सगळ्या प्रदेशाला अडचणीत आणेल.” सर्वशक्तिमान परमेश्वर देव हे सर्व बोलला.

लूक 1:39-80

जखऱ्या व अलीशिबेला मरीया भेटते

39 त्याच वेळी मरीया तयार झाली आणि लगेच यहूदीयाच्या डोंगराळ भागातील एका गावी गेली. 40 तिने जखऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलीशिबेला अभिवादन केले. 41 आणि असे झाले की, जेव्हा अलीशिबेने मरीयेचे अभिवादन ऐकले तेव्हा तिच्या पोटातील बालकाने उडी मारली. आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरुन गेली.

42 ती मोठ्या आवाजात बोलली, “सर्व स्त्रियांमध्ये तू अधिक धन्य आहेस, तुझ्या पोटचे फळ धन्य आहे. 43 परंतु माझ्या बाबतीत अशी कोणती गोष्ट घडली की माझ्या प्रभूच्या आईने माझ्याकडे यावे? 44 कारण तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानी पडताक्षणीच, माझ्या पोटातील बाळाने आनंदाने उडी घेतली. 45 प्रभूने तुला ज्या गोष्टी घडतील असे सांगितले त्यावर तू विश्वास ठेवलास म्हणून तू धन्य आहेस.”

मरीया देवाची स्तुति करते

46 आणि मरीया म्हणाली,

47 “माझा आत्मा प्रभूची स्तुति करतो;
    माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो.
48 कारण त्याने त्याच्या नम्र दासीची काळजी वाहिली होय,
    येथून पुढे सर्व लोक मला धन्य म्हणतील.
49 कारण सर्वसमर्थाने माझ्यासाठी महान कृत्ये केली आहेत,
    त्याचे नाव पवित्र आहे.
50 जे त्याचे भय धरतात,
    त्यांच्यावर तो पिढ्यानपिढ्या दया करतो.
51 त्याने आपल्या बाहूंनी आपले सामर्थ्य दाखविले;
    गर्विष्ठ लोकांना त्यांच्या बढाईखोर विचारांसह विखरुन टाकले आहे.
52 सत्ताधीशांना त्याने त्यांच्या सिंहासनावरुन खाली आणले आहे,
    आणि नम्र जनांना त्याने उंच केले आहे.
53 त्याने भुकेलेल्यांना उत्तम पदार्थांनी समाधान दिले आहे.
    श्रीमंत लोकांना त्याने रिकामे पाठविले आहे.
54 त्याचा सेवक जो इस्राएल याला
    मदत करण्यास तो आला आहे.
55 त्याने आपल्या पूर्वजांना जे अभिवचन दिले होते त्याप्रमाणे
    अब्राहाम व त्याच्या वंशजांवर दया करण्याचे तो लक्षात ठेवतो.”

56 मरीया अलीशिबेबरोबर तीन महीने राहिली, आणि मग ती तिच्या घरी परत गेली.

योहानाचा जन्म

57 अलीशिबेला तिचे मूल होण्याची वेळ आली, तेव्हा तिने एका मुलाला जन्म दिला. 58 तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले की, देवाने तिच्यावर मोठी कृपा केली आहे, ते तिच्या आनंदात सहभागी झाले.

59 मग असे झाले की, आठव्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले, ते, त्याच्या बापाचे जे नाव होते तेच म्हणजे जखऱ्या नाव ठेवणार होते. 60 पण त्याची आई म्हणाली, “नाही, त्याला योहान असे म्हणावे.”

61 ते तिला म्हणाले, “तुझ्या कोणत्याच नातेवाईकाचे नाव ते नाही.” 62 नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना खुणेने विचारले, “त्याला कोणते नाव ठेवायचे आहे?”

63 त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि लिहिले, “त्याचे नाव योहान आहे.” त्या सर्वांना खूपच आश्चर्य वाटले. 64 लगेच त्याचे तोंड उघडले आणि त्याची जीभ मोकळी झाली, आणि तो बोलू लागला व देवाची स्तुति करु लागला. 65 सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहूदीयाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टींबद्दल बोलत होते. 66 ज्या कोणी हे ऐकले त्या प्रत्येकाने याविषयी नवल केले, ते म्हणाले, “हे मूल पुढे कोण होणार आहे?” कारण देवाचा वरदहस्त त्यांच्यावर होता.

जखऱ्या देवाची स्तुति करतो

67 मग त्याचा पिता जखऱ्या पवित्र आत्म्याने भरला गेला, त्याने भविष्यवाणी केली; तो म्हणाला,

68 “प्रभु, इस्राएलाचा देव धन्यवादित असो,
    कारण तो त्याच्या लोकांना मदत करण्यास,
    व त्यांना मुक्त करण्यास आला आहे.
69 त्याने आमच्यासाठी आपला सेवक दाविद याच्या घराण्यातून
    आम्हांला सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे.
70 देव म्हणाला की, मी असे करीन
    त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांकरवी तो हे बोलला व ते फार वर्षां पूर्वी होऊन गेले.
71 जे आमचे शत्रु आहेत व जे आमचा द्वेष करतात
    त्यांच्यापासून मुक्त करण्याचे अभिवचन त्याने आम्हांला दिले.
72 आमच्या पूर्वजांवर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे.
    व त्यांच्याशी केलेला पवित्र करार लक्षात ठेवण्यासाठी तो आमचे रक्षण करणार आहे.
73 हा करार एक शपथ होती, जी त्याने आमचा पूर्वज अब्राहाम याच्याशी घेतली
74     ती अशी की, तो आम्हांला शत्रुच्या सामर्थ्यापासून मुक्त करील, अशासाठी की,
आम्ही त्याची सेवा निर्भयपणे करु शकू.
75     त्याची अशी इच्छा होती की, आम्ही त्याच्यासमोर धार्मिकतेने व पवित्रतेने आमच्या आयुष्याचे सर्व दिवस जगावे.

76 “मुला, आता तुला सर्वोच्च देवाचा संदेष्टा म्हणातील.
    प्रभूच्या येण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी तू त्याच्या (प्रभु) पुढे चालशील.
77 कारण तू प्रभूसमोर, त्याचा मार्ग तयार करण्यासाठी आणि पापक्षमा मिळून तुमचे तारण होईल
    हे त्याच्या लोकांना सांगण्यासाठी पुढे जाशील.

78 “कारण देवाच्या हळुवार करुणेमुळे
    स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत जे जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल.
79 आणि शांतीच्या मार्गावर आमच्या
    पावलांना मार्गदर्शन करील.”

80 अशा रीतीने तिचा मुलगा मोठा होत गेला आणि आत्म्यात सामर्थ्यशाली झाला. इस्राएल लोकांना प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center