Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 25

25 सिद्कीयाने बाबेलच्या राजाविरुध्द बंड केले आणि त्याच्या आज्ञा पाळण्याचे त्याने नाकारले. त्यामुळे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपल्या सैन्यासह यरुशलेमवर चाल करुन गेला. सिद्कीया राज्यावर आल्याचे ते नववे वर्ष, दहावा महिना, दहावा दिवस होता. नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमला वेढा देऊन लोकांची ये जा रोखली. मग त्याने नगराभोवती कचऱ्याचे अडसर निर्माण केले. सिद्कीयाच्या कारकिर्दीचे अकरावे वर्ष उजाडेपर्यंत हा वेढा चालू राहिला. दुष्काळाने परिस्थिती बिकट झाली होती. चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवसापर्यंत नगरातील सामान्य माणसांची अन्नान्नदशा झाली.

नबुखदनेस्सरच्या सैन्याने शेवटी तटाला खिंडार पाडले. त्या रात्री राजा सिद्कीया आणि त्याचे सैन्य यांनी पलायन केले. त्यांनी पळून जाण्यासाठी दुहेरी तटबंदीमधल्या गुप्त वाटेचा आश्रय घेतला. ही वाट राजाच्या बागेजवळ होती नगराभोवती शत्रूसैन्याचा वेढा होता पण सिद्कीया आणि त्याचे सैन्य वाळवंटाच्या दिशेने निसटले. बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना यरीहोजवळ गाठले. तेव्हा सिद्कीयाचे सैन्य त्याला एकटा सोडून पळून गेले.

बाबेलच्या लोकांनी राजा सिद्कीयाला धरुन रिब्ला येथे आपल्या राजाकडे नेले. या लोकांनी सिद्कीयाला जबर शासन करण्याचे ठरवले. त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्याला जेरबंद करुन बाबेलला नेले.

यरुशलेमचा विध्वंस

बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्यात सातव्या दिवशी नबुखदनेस्सर यरुशलेमवर चाल करुन आला. नबुजरदान हा राजाच्या उत्तम, निवडक सैन्याचा नायक होता. या नबुजरदानने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरुशलेममधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले.

10 मग बाबेलच्या सैन्याने यरुशलेमची तटबंदी पाडली. 11 नगरात अजून असलेले लोक नबुजरदानने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले. 12 अगदीच दरिद्री लोकांना तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमळे आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले.

13 परमेश्वराच्या मंदिरातील सर्व पितळी पात्रांची बाबेलच्या सैन्याने मोडतोड केली. पितळी खांब, ढकलगाड्या, मोठमोठी पितळी घंगाळी यांची मोडतोड करुन ते पितळ त्यांनी बाबेलला नेले. 14 इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली. 15 अग्निपात्रे, वाडगे, सोने-चांदीच्या लोभापायी सोन्यारुप्याची भांडीही नबुजरदानने हस्तगत केली. 16-17 अशाप्रकारे, नबुजरदानने बळकावलेल्या वस्तू: दोन पितळी स्तंभ (प्रत्येक स्तंभाची उंची सत्तावीस फूट त्यावरील कळस साडेचार फूट उंचीचे तेही पितळी असून त्यावर जाळीकाम आणि डाळिंबाची नक्षी होती दोन्ही स्तंभ अगदी सारखेच होते.) एक मोठे पितळी घंगाळ परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनने करवून घेतलेल्या ढकलगाड्या यांत इतके पितळ होते की त्याचे वजन करणे शक्य नव्हते.

यहूदी लोकांना कैदी बनवण्यात येते

18 नबुजरदानने मंदिरातून खालील लोकांना नेले मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल

19 आणि शहरातून एक सैन्याधिकारी अजूनही नगरात असलेले राजाचे पांच सल्लागार सैन्याधिकाऱ्याचा सचिव. हा जनगणना प्रमुख असून सैनिकांची निवड करत असे. शहरात सापडलेली साठ माणसेही त्याने घेतली.

20-21 हमाथ प्रदेशातील रिब्ला येथे नबुजरदानने या सर्वांना राजासमोर हजर केले. राजाने त्या सर्वांची तेथे हत्या केली. अशाप्रकारे यहूदींना आपल्या भूमीतून बंदीवान म्हणून जावे लागले.

यहूदाचा अधिकारी गदल्या

22 नबुखद्नेस्सरने काही लोकांना यहूदातच राहू दिले. त्यात एकजण होता त्याचे नाव गदल्या. हा अहीकामचा मुलगा आणि अहीकाम शाफानचा. या गदल्याला नबुखद्नेस्सरने यहूदा प्रांतावर अधिकारी म्हणून नेमले.

23 नथन्याचा मुलगा इश्माएल, कोरहाचा मुलगा यहोहानान आणि नटोफाथी तन्हुमेथाचा मुलगा सराया व माकाथीचा मुलगा याजन्या हे सैन्यातील सरदार होते. त्यांनी बाबेलच्या राजाने गदल्याला अधिकारी केल्याचे ऐकले म्हणून ते त्याला भेटायला मिस्पा येथे आले. 24 गदल्याने या सर्वाना अभय दिले आणि तो त्यांना म्हणाला, “बाबेलच्या अधिकाऱ्यांचे भय बाळगू नका. या देशातच राहून बाबेलच्या राजाशी एकनिष्ठ राहा. म्हणजे तुमचे भले होईल.”

25 अलीशामचा मुलगा नथन्या याचा मुलगा इश्माएल हा राजसंतानांपैकी होता. त्याने आणखी दहाजणांसमवेत सातव्या महिन्यात गदल्यावर हल्ला केला आणि सर्व यहूदी तसेच खास्दी यांना मिस्पा येथे ठार केले. 26 मग सर्व सैन्याधिकारी आणि लोक मिसरला पळून गेले. बाबेलच्या लोकांच्या धास्तीने कनिष्ठ पदावर असलेल्यापासून श्रेष्ठ पदावर असलेल्यांपर्यंत सर्व पळाले.

27 पुढे अबील मरोदख हा बाबेलचा राजा झाला. त्याने यहूदाचा राजा यहोयाखीन याची कैदेतून सुटका केली. यहोयाखीनला तोपर्यत तुरुंगात पडून सदतीस वर्षे झाली होती. अबील मरोदखने सत्तेवर आल्यावर बाराव्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी हे सुटकेचे काम केले. 28 यहोयाखीनच्या बाबतीत त्याचे धोरण मवाळपणाचे होते. त्याने यहोयाखीनला इतर राजांपेक्षा दरबारात उच्चासन दिले. 29 अबील मरोदखने त्याला तुरुंगातले कपडे बदलायला लावले. पुढे आयुष्यभर यहोयाखीन अबील मरोदखच्या शेजारी मेजावर बसून जेवत असे. 30 अबील मरोदखने त्याला पुढे त्याच्या आयुष्यभर रोज जेवण दिले.

इब्री लोकांस 7

मुख्य याजक मलकीसदेक

हा मलकीसदेक शालेमाचा राजा होता. आणि तो सर्वोच्च देवाचा याजक होता. राजांचा पराभव करून अब्राहाम परतत असताना मलकीसदेक त्याला भेटला. मलकीसदेकाने त्याला आशीर्वाद दिला. व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग त्याला (मलकीसदेकाला) दिला.

मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो. मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्यूची नोंद आढळत नाही. देवपुत्राच्या प्रतिमेशी तो हुबेहूब मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे.

यावरून तुम्ही पाहता की, मलकीसदेक किती महान पुरुष होता! मूऴ पुरुष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्याला दिला. आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे लोकांकडून (आपल्या सहोदरांकडून), जरी ते अब्राहामाचे वंशज होते तरी, दशांश गोळा करावा. मलकीसदेक लेव्याच्या वंशजांपैकी नव्हता, पण तरीही त्याने अब्राहामाकडून दशमांश घेतला. आणि ज्याला देवाकडून अभिवचन मिळाले होते, त्याला (अब्राहामाला) त्याने आशीर्वाद दिला. यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही की, श्रेष्ठ व्यक्ती कनिष्ठाला आशीर्वाद देते.

एका बाबतीत म्हणजेच लेव्यांच्या बाबतीत, जो मनुष्य मरतो तो दशमांश गोळा करतो, पण दुसऱ्या बाबतीत म्हणजे मलकीसदेकाच्या बाबतीत, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दशमांश अशा व्यक्तीने घेतला की जी अजूनही जिवंत आहे. एखादा असेही म्हणू शकतो की, लेवी जे दशमांश गोळा करीत, प्रत्यक्षात तेही अब्राहामाद्वारे मलकीसदेकाला दशमांश देत. 10 कारण जेव्हा मलकीसदेक अब्राहामाला भेटला त्यावेळी लेवी जणू त्याचा पूर्वज अब्राहाम याच्या शरीरात बीजरुपाने होता.

11 लेवीय वंशजांच्या याजकीय पद्धतीने लोकांना नियमशास्त्र दिले गेले पण तशा प्रकारच्या याजकीय पद्धतीने लोक धार्मिकदृष्ट्या परिपूर्ण बनू शकले नसते. म्हणून आणखी एका याजकाच्या येण्याची आवश्यकता होती. तो अहरोनासारखा नसून मलकीसदेकासारखा हवा होता. 12 कारण जेव्हा याजकपणात बदल होतो तेव्हा नियमशास्त्रसुद्धा बदलणे अपरिहार्य होते. 13-14 कारण या सर्व गोष्टी ज्याच्याबद्दल सांगितल्या आहेत, तो लेवी वंशापेक्षा वेगळ्या वंशाचा आहे. व त्याच्या (लेवीच्या) वंशातील कोणीही वेदीजवळ अशा प्रकारची याजकीय सेवा केलेली नाही. हे स्पष्ट आहे की, आमचा प्रभु यहूदा वंशातील होता आणि या वंशासंबंधी याजकपणाबद्दल मोशेने काहीही सांगितले नाही.

येशू हा मलकीसदेक याजकासारखा आहे

15 आणि जेव्हा या दुसऱ्या प्रकारचा नवीन याजक मलकीसदेकासारखा येतो तेव्हा ही गोष्ट आणखी स्पष्ट होते. 16 मानवी नियमशास्त्राच्या हुकूमाने येशूला याजक करण्यात आले नव्हते तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याच्या आधारे त्याला याजक करण्यात आले. 17 कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे: “तू मलकीसदेकासारखा अनंतकाळासाठी याजक आहेस” [a]

18 जुना नियम बाजूला ठेवण्यात आला आहे, कारण तो दुबळा व तिरुपयोगी होता. 19 कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता एक अधिक चांगली आशा आम्हांला देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.

20 हेसुद्धा महत्त्वाचे आहे की देवाने येशूला मुख्य याजक करताना शपथेशिवाय केले नाही. जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा त्यांना शपथेशिवाय याजक करण्यात आले. 21 पण येशू जेव्हा याजक बनला, तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्याला सांगितले की,

“प्रभूने शपथ वाहिली आहे,
    आणि तो आपले मत बदलणार नाही:
‘तू अनंतकाळचा याजक आहेस.’” (A)

22 याचा अर्थ असा की, येशू हा अधिक चांगल्या कराराची खात्री आहे.

23 तसेच, इतर पुष्कळ मुख्य याजक होते. परंतु मरणामुळे पुढे ते याजकपद चालवू शकले नाही. 24 त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो सर्वकाळ राहतो. 25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.

26 म्हणून येशू अगदी आपल्या गरजांस अनुरूप असा मुख्य याजक आहे, ज्याची आम्हाला गरज आहे. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाण्यांपासून वेगळा केलेला आहे. त्याला आकाशाहूनही उंच केलेले आहे. 27 दुसरे मुख्य याजक जसे दररोज अर्पणे अर्पण करतात तसे करण्याची त्याला गरज नाही, जे इतर याजक पहिल्यांदा त्यांच्या पापांसाठी व मग लोकांच्या पापांसाठी जसे अर्पण करतात तसे त्याला करण्याची गरज नाही. त्याने जेव्हा स्वतःला अर्पण केले त्याचवेळी एकदाच व कायमचेच अर्पण केले आहे. 28 कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. परंतु नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन देण्यात आल्यामुळे पुत्र हा सर्वकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला.

आमोस 1

आमोस तकोवा नगरीतील मेंढपाळ होता. यहूद्यांचा राजा उज्जीया आणि इस्राएलचा राजा यराबाम यांच्या कारकिर्दीत आमोसला दृष्टांन्त झाले. यराबाम योवाशाचा मुलगा होता हे दृष्टांन्त भूकंपाच्या आधी दोन वर्षे झाले त्याचा हा संदेश.

अरामाला शिक्षा

आमोस म्हणाला:
“परमेश्वर सियोनच्या सिंहाप्रमाणे गर्जना करतो.
    त्याची प्रचंड गुरगुर यरुशलेमपासून ऐकू येते;
मेंढपाळांची कुरणे सुकलीत.
    कर्मेल पर्वतसुध्दा सुकला आहे.”

परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, “दिमीष्कच्या लोकांनी पुष्कळ अपराध केल्यामुळे मी त्यांनी खात्रीने शिक्षा करीन. का? कारण त्यांनी गिलादला धान्य मळण्याच्या लोखंडी अवजाराने मारले. मी हजाएलच्या घराला (आरामला) आग लावीन आणि ती आग बेन-हदादच्या उंच मनोव्यांचा नाश करील.

“मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे बसणाऱ्याचा मी नाश करीन. बेथ-एदेन राजदंडधारी राजाला मी नष्ट करीन. अरामाच्या लोकांचा पराभव होईल लोक त्यांना कीर देशात नेतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.

पलिष्ट्यांना शिक्षा

परमेशवर असे म्हणाला, “मी गज्जाच्या लोकांना नक्कीच शिक्षा करीन कारण त्यांनी फार अपराध केले आहेत. का? कारण त्यांनी संपूर्ण राष्ट्रावर ताबा मिळवून लोकांना गुलाम म्हणून अदोमला पाठविले. म्हणून मी गज्जाच्या कोटाला आग लावीन. ही आग गज्जाचे उंच मनोरे नष्ट करील अश्दोदच्या गादीवर बसणाव्याचा मी नाश करीन. अष्कलोनच्या राजदंड धारी राजाला मी नष्ट करीन. एक्रोनच्या लोकांना मी सजा देईन. मग अजूनही जिवंत असलेले पलिष्ट्यांचे लोक मरतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.

फोनेशियासाठी शिक्षा

परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “सारेच्या पुष्कळ अपराधांबद्दल मी त्यांना नक्कीच शिक्षा करीन. का? कारण त्यांनी संपूर्ण राष्ट्र आपल्या ताब्यात घेऊन लोकांना गुलाम करून अदोमला पाठविले. त्यांच्या भावांबरोबर (इस्राएलबरोबर) केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही. 10 म्हणून सोरच्या तटबंदीला मी आग लावीन. सोरचे उंच मनोरे त्यामुळे नष्ट होतील.”

अदोमींना शिक्षा

11 परमेश्वर असे सांगतो, “अदोमच्या लोकांनी खूप अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच का? कारण अदोमने तलवारीने त्याच्या भावाचा (इस्राएलचा) पाठलाग केला. अदोमला अजिबात दया आली नाही अदोमचा राग कायम राहिला. तो हिंस्त्र पशूप्रमाणे इस्राएलला फाडत राहिला 12 म्हणून मी तेमानला आग लावीन. त्यात बस्राचे मनोरे नष्ट करीन.”

अम्मोनी लोकांना सजा

13 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “अम्मोनींच्या अनेक अपराधांबद्दल मी अमोनला नक्कीच शिक्षा करीन. का? कारण त्यांनी गिलादमध्ये गर्भवतींना ठार मारले. तेथील प्रदेश बळकावून आपल्या देशाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी हे केले. 14 म्हणून मी राब्बाच्या तटबंदीला आग लावीन. ती राब्बाचे उंच मनोरे भस्मसात करील त्यांच्यावर युध्दाच्या दिवशी होत असताना होणाऱ्या आरडाओरडीप्रमाणे आणि वावटळीप्रमाणे संकटे येतील. 15 मग त्यांचा राजा व नेते पकडले जातील. त्यांना बरोबरच दूर नेले जाईल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.

स्तोत्रसंहिता 144

दावीदाचे स्तोत्र

144 परमेश्वर माझा खडक आहे.
    परमेश्वराला धन्यवाद द्या.
परमेश्वर मला युध्दाचे शिक्षण देतो.
    परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो.
परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो.
    परमेश्वर माझी पर्वतावरची उंचसुरक्षित जागा आहे.
परमेश्वर माझी सुटका करतो.
    परमेश्वर माझी ढाल आहे.
मी त्याच्यावर विश्वास ठेवतो.
    परमेश्वर मला माझ्या लोकांवर राज्य करायला मदत करतो.

परमेश्वरा, तुला लोक महत्वाचे का वाटतात?
    आम्ही तुझ्या लक्षात तरी कसे येतो?
माणसाचे आयुष्य म्हणजे हवेचा झोत,
    माणसाचे आयुष्य म्हणजे नाहीशी होत जाणारी सावली.

परमेश्वरा, आकाश फाड आणि खाली ये,
    पर्वतांना हात लाव आणि त्यांतून धूर बाहेर येईल.
परमेश्वरा, विजेला पाठव आणि माझ्या शत्रूला पांगव,
    तुझे बाण सोड आणि त्यांना पळवून लाव.
परमेश्वरा, स्वर्गातून खाली पोहोच आणि मला वाचव.
    मला या शत्रूंच्या समुद्रात बुडू देऊ नकोस.
    मला त्या परक्यांपासून वाचव.
हे शत्रू खोटारडे आहेत.
    ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात.

परमेश्वरा, मी तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दलचे नवे गाणे गाईन.
    मी तुझी स्तुती करेन आणि दहा तारांची वीणा वाजवेन.
10 परमेश्वर राजांना त्यांच्या लढाया जिंकायला मदत करतो.
    परमेश्वराने त्याचा सेवक दावीद याला त्याच्या शत्रूंच्या तलवारीपासून वाचवले.
11 मला या परक्यांपासून वाचव.
    हे शत्रू खोटारडे आहेत.
    ते खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतात.

12 आमची तरुण मुले बळकट झाडांसाखी आहेत.
    आमच्या मुली राजवाड्यातल्या सुंदर सजावटीप्राणे आहेत.
13 आमची धान्यांची कोठारे वेगवेगळ्या धान्यांनी भरलेली आहेत.
    आमच्या शेतात हजारो मेंढ्या आहेत.
14     आमचे सैनिक सुरक्षित आहेत.
कुठलाही शत्रू आत येण्याचा प्रयत्न करीत नाही.
    आम्ही लढाईवर जात नाही.
    आमच्या रस्त्यात लोक ओरडत नाहीत.

15 अशा वेळी लोक खूप आनंदी असतात.
    जर परमेश्वर त्यांचा देव असेल तर लोक खूप आनंदी असतात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center