M’Cheyne Bible Reading Plan
मनश्शेची यहूदावरील कलंकित कारकीर्द
21 मनश्शे राज्य करु लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर पंचावन्न वर्षे, राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबा.
2 परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले तेच त्याने केले. इतर राष्ट्रे करत तसे अमंगळ आचरण मनश्शेने केले (आणि इस्राएली आले त्यावेळी याच राष्ट्रांना परमेश्वराने तेथून हुसकून लावले होते.) 3 हिज्कीयाने नष्ट केलेली उंचस्थानावरील पुजास्थळे मनश्शेने पुन्हा बांधली तसेच त्याने बालदेवतेसाठी वेदी बांधली आणि इस्राएलचा राजा अहाब याच्याप्रमाणे अशेरा देवीचे स्तंभ उभारले. मनश्शे नक्षत्रांची पूजाही करत असे. 4 परमेश्वराच्या मंदिरात त्याने इतर देवतांच्या पूजेसाठी वेद्या बांधल्या. (आपल्या नावाप्रीत्यर्थ परमेश्वराने हे मंदिर केले होते.) 5 या खेरीज या मंदिराच्या दोन्ही चौकांत मनश्शेने आकाशातील नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या. 6 आपल्या मुलाचाच बळी देऊन मनश्शेने त्याला वेदीवर जाळले. [a] जादूटोणा, मंत्रतंत्र, भुतंखेतं यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता.
परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला. 7 मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करुन तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दावीदचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व नगरांमधून मी यरुशलेमची निवड केली आहे. यरुशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन. 8 इस्राएल लोकांना या भूमीतून बाहेर पडावे लागू नये याची मी दक्षता घेईन. माझ्या सर्व आज्ञा तसेच मोशेची शिकवण त्यांनी तंतोतंत पाळली तर त्यांची इथेच या भूमीत वसती राहील.” 9 पण लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. इस्राएल लोक इथे येण्यापूर्वी कनानमधील राष्ट्रांनी जी वाईट वर्तणूक केली त्यापेक्षाही मनश्शेचे वर्तन निंद्य होते. इस्राएल लोक या भूमीत आले तेव्हा त्या राष्ट्रांना परमेश्वराने नष्ट केले होते.
10 तेव्हा परमेश्वराने आपल्या सेवक संदेष्ट्यांना हे सांगायला सांगितले, 11 “यहूद्यांचा राजा मनश्शे याने अत्यंत निंद्य कृत्ये केली आहेत. त्याच्या आधीच्या अमोऱ्यांपेक्षाही याचे वागणे भयंकर आहे. त्याच्या त्या मूर्तीमुळे त्याने यहूदालाही पाप करायला लावले आहे. 12 तेव्हा इस्राएलचा परमेश्वर म्हणतो, ‘यरुशलेम आणि यहूदा यांना मी आता अशा संकटाच्या खाईत लोटीन की ते ऐकूनच लोकांना धक्का बसेल. 13 शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबच्या घराण्याचा ओळंबा मी यरुशलेमवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करुन ठेवावी तशी मी यरुशलेमची गत करीन. 14 त्यातूनही काहीजण बचावतील. पण त्यांना मी तसेच सोडीन. त्यांना मी त्यांच्या शत्रूच्या ताब्यात देईन. ते त्यांना युध्दातील लुटीप्रमाणे कैदी करुन नेतील. 15 मी जे जे करु नका म्हणून बजावले ते ते त्यांनी केले त्याचे हे फळ होय. यांचे पूर्वज मिसरमधून बाहेर पडले त्या दिवसापासूनच यांनी मला संताप आणला आहे. 16 शिवाय मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. संपूर्ण यरुशलेम त्याने रक्तलांछित केले. यहूद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते मनश्शेने यहूदाला करायला लावले.’”
17 मनश्शेची पापे आणि इतर कृत्ये यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकांत लिहिलेली आहेत. 18 मनश्शे मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांच्या शेजारी दफन झाले. आपल्या घराच्या बगीच्यात त्याला पुरले. या बागेचे नाव “उज्जाची बाग” त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.
आमोनची छोटी कारकीर्द
19 आमोन राज्य करु लागला तेव्हा बावीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर दोन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ ही यटबा येथील हारुस याची मुलगी.
20 आपले वडील मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली. 21 तो आपल्या वडीलांसारखाच होता. वडीलांनी ज्या देवतांची पूजाअर्चा केली त्यांचीच पूजा आमोननेही आरंभली. 22 आपल्या पूर्वजांचा परमेश्वर देव याचा मार्ग त्याने सोडला आणि परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला.
23 आमोनच्या सेवकांनी त्याच्याविरुध्द कट करुन त्याच्या घरातच त्याला ठार केले. 24 आणि ज्यांनी आमोनशी फितुरी केली त्या सेवकांना देशातील लोकांनी जिवे मारले. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.
25 आमोनने जी इतर कृत्ये केली ती सर्व यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहून ठेवलेली आहेत. 26 उज्जाच्या बागेत आमोनचे दफन करण्यात आले. आमोनचा मुलगा योशीया राजा झाला.
येशू मोशेपेक्षा महान आहे
3 म्हणून पवित्र बंधूनो, ज्यांना देवाने बोलाविलेले आहे, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित (प्रतिनिधी) आणि आमच्या विश्वासाचा मुख्य याजक आहे. 2 ज्या देवाने त्याला प्रेषित व मुख्य याजक म्हणून नेमले त्याच्याशी येशू विश्वासू होता, जसा देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे देवाशी विश्वासू होता. 3 ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाराला अधिक मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला. 4 कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण देवाने सर्व काही बांधलेले आहे. 5 देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देव च्या गोष्टी पुढील काळात सांगणार होता, त्याविषयी त्याने लोकांना साक्ष दिली. 6 परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत.
आपण सतत देवाला अनुसरले पाहिजे
7 म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे,
“आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,
8 तर आपली अंतःकरणे कठीण करू नका.
ज्याप्रमाणे तुम्ही अरण्यामध्ये
देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली,
9 जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले,
तेथे त्यांनी चाळीस वर्षे सामर्थ्यशाली कामे पाहिली.
10 त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि म्हणालो,
‘या लोकांच्या मनात नेहमी चुकीचे विचार येतात,
या लोकांना माझे मार्ग कधीही समजले नाहीत’
11 म्हणून रागाच्या भरात मी शपथ वाहून म्हणालो,
‘हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.’” (A)
12 सावध असा, बंधूंनो, तुमच्यापैकी कोणाचीही अंतःकरणे दुष्ट व अविश्वासू असू नयेत, ती जिवंत देवापासून दूर नेतात. 13 उलट, “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत. 14 कारण आपण सर्व जण ख्रिस्तामध्ये त्याच्यावरील विश्वासाचे वाटेकरी आहोत. जर आम्ही सुरुवातीला धरलेला आमचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरून राहिलो, तर 15 पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे:
“आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल,
तेव्हा तुम्ही देवाविरुद्ध बंड केलेत;
तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.” (B)
16 ज्यांनी देवाची वाणी ऐकली पण त्याच्याविरुद्ध बंड केले असे कोण होते? तेच लोक नव्हते का, ज्यांना मोशेने इजिप्त देशातून बाहेर नेले होते? 17 आणि तो (देव) कोणावर चाळीस वर्षे रागावला होता? ते सर्व तेच नव्हते काय, ज्यांनी पाप केले आणि ज्यांची प्रेते अरण्यात पडली होती.
18 कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय? 19 म्हणून आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत.
परमेश्वराकडे परतणे
14 इस्राएला, तू पडलास. तू परमेश्वराविरुध्द पाप केलेस. पण आता परमेश्वराकडे, तुझ्या परमेश्वराकडे, परत ये. 2 तू ज्या गोष्टी बोलणार आहेस, त्याबद्दल विचार कर व परमेश्वराकडे परत ये.
“त्याला सांग की आमचे पाप धुवून टाक आम्ही करीत
असलेल्या चांगल्या गोष्टीं चा स्वीकार कर.
आम्ही आमच्या ओठांद्वारे तुझी स्तुती करू.
3 अश्शूर आम्हाला वाचविणार नाही.
आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही.
आम्ही हातांनी बनविलेल्या गोष्टींना
‘आमचा देव’ असे पुन्हा म्हणणार नाही का?
कारण अनाथांवर करुणा करणारा
तूच एकमेव आहेस.”
परमेश्वर इस्राएलला क्षमा करील
4 परमेश्वर म्हणतो,
“त्यानी माझा त्याग केली तरी मी त्यांना ह्या गोष्टीबद्दल क्षमा करीन.
मी मोकळेपणाने त्यांच्यावर प्रेम करीन.
आता मी त्यांच्यावर रागावलो नाही.
5 मी इस्राएलासाठी दहिवराप्रमाणे होईन.
इस्राएल लिलीप्रमाणे फुलेल,
लबानोनमधील गंधसरूंप्रमाणे तो फोफावेल.
6 त्याच्या फांद्यांचा विस्तार होईल
व तो जैतुनाच्या सुंदर वृक्षाप्रमाणे होईल.
लंबानोनमधील गंधसरूंच्या गंधाप्रमाणे
त्याचा सुवास असेल.
7 इस्राएलचे लोक, पुन्हा,
माझ्या सुराक्षितेत राहातील ते धान्याप्रमाणे
वाढतील ते वेलीप्रमाणे विस्तारतील.
ते लबानोनमधील द्राक्षारसाप्रमाणे होतील.”
परमेश्वर इस्राएलला मूर्ती बद्दल ताकीद देतो
8 “एफ्राईम, माझा (परमेश्वराचा) मूर्तीशी काहीही संबंध असणार नाही,
तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणारा मीच एकमीच आहे.
फक्त मीच तुमच्यावर लक्ष ठेवतो, मी सदाहरित देवदारूसारखा आहे.
माझ्यामुळे तुम्हाला फळ मिळते.”
अखेरचा सल्ला
9 शहाण्या माणसाला या गोष्टी समजतात.
चलाख माणसाने या गोष्टी शिकाव्या
परमेश्वराचे मार्ग योग्य आहेत.
त्यामुळे सज्जन जगतील
व दुर्जन मरतील.
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तुतिगीत.
139 परमेश्वरा, तू माझी परीक्षा घेतलीस
तुला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे.
2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते
तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
3 परमेश्वरा, मी कुठे जातो आणि केव्हा झोपतो ते तुला कळते.
मी जे जे करतो ते सर्व तुला माहीत आहे.
4 परमेश्वरा, मला काय म्हणायचे आहे
ते तुला माझे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आधीच कळते.
5 परमेश्वरा, तू माझ्या सभोवताली आहेस.
माझ्या पुढे आणि माझ्या मागे आहेस तू तुझा हात हळूवारपणे माझ्यावर ठेवतोस.
6 तुला जे सर्वकाही माहीत आहे
त्याचे मला आश्र्चर्य वाटते ते समजून घेणे मला खूप कठीण वाटते.
7 मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो.
परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही.
8 परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे
तू असतोस मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे ही तू असतोस.
9 परमेश्वरा, मी जर पूर्वेकडे, जिथे सूर्य उगवतो तिथे गेलो तर तिथे ही तू असतोस.
मी जर पश्चिमेकडे समुद्रावर गेलोतर तिथे ही तू असतोस.
10 तिथेही तुझा उजवा हात मला धरतो.
आणि तू मला हाताने धरुन नेतोस.
11 परमेश्वरा, कदाचित् मी तुझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीन आणि म्हणेन,
“दिवस रात्रीत बदलला आहे आणि आता काळोख मला खरोखरच लपवेल.”
12 पण परमेश्वरा, काळोख देखील तुझ्यासाठी पुरेसा दाट नाही
तुझ्यासाठी रात्र दिवसासारखीच प्रकाशमय आहे.
13 परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस
मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते.
14 परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो.
तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस
तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
15 तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे
माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस.
16 माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस.
तू माझी रोज पाहणी केलीस.
त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
17 तुझे विचार मला महत्वाचे आहेत,
देवा तुला खूप माहिती आहे.
18 मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त असेल.
आणि जेव्हा माझी झोप संपेल तेव्हा मी तुझ्याजवळच असेन.
19 देवा, दुष्ट लोकांना मारुन टाक.
त्या खुन्यांना माझ्यापासून दूर ने.
20 ते वाईट लोक तुझ्याबद्दल वाईट बोलतात.
ते तुझ्या नावाविषयी वाईट सांगतात.
21 परमेश्वरा, जे लोक तुझा तिरस्कार करतात त्यांचा मी तिरस्कार करतो.
जे लोक तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मी तिरस्कार करतो.
22 मी त्यांचा संपूर्ण तिरस्कार करतो.
तुझे शत्रू माझेही शत्रू आहेत.
23 परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि
माझे मन जाण माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.
24 माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ
आणि मला “सनातन मार्गाचा” रस्ता दाखव.
2006 by World Bible Translation Center