M’Cheyne Bible Reading Plan
हिज्कीया मरणासन्न अवस्थेत
20 याच सुमारास हिज्कीया आजारी पडून जवळ जवळ मृत्युशय्येवरच होता. आमोजचा मुलगा यशया हा संदेष्टा त्याच्याकडे गेला. तो हिज्कीयाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे आहे, ‘तू आता घराच्या कारभाराची निरवानिरव करावीस कारण तू फार काळ जगणार नाहीस तुझा मृत्यू समीप आला आहे.’”
2 तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे वळवले. [a] परमेश्वराची प्रार्थना करुन तो म्हणाला,3 “परमेश्वरा, मी तुझी मनःपूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” एवढे बोलून तो ओक्साबोक्शी रडला.
4 यशया मधला चौक ओलांडून जाण्यापूर्वीच पुन्हा त्याला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. परमेश्वर म्हणाला, 5 “पुन्हा मागे फिर आणि माझ्या प्रजेचा नेता हिज्कीया याच्याशी बोल. त्याला म्हणावे, ‘तुझा पूर्वज दावीद याचा परमेश्वर देव म्हणतो: तू करुणा भाकलीस ती मी ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले. तेव्हा मी तुला बरे करतो तिसऱ्या दिवशी तू परमेश्वराचे मंदिर चढून जाशील. 6 तुला मी आणखी पंधरा वर्ष आयुष्य दिले आहे. अश्शूरच्या राजाच्या हातून तुझी आणि या नगराची मी सोडवणूक करीन. या नगराचे मी रक्षण करीन स्वतःसाठी तसेच माझा सेवक दावीद याला मी दिलेल्या वचनासाठी मी हे करीन.’”
7 मग यशया म्हणाला, “अंजीराचे मिश्रण [b] करुन ते याच्या दुखऱ्या भागावर लावा.”
तेव्हा त्यांनी अंजीरांचे मिश्रण करुन हिज्कीयाच्या दुखऱ्या भागावर त्याचा लेप दिला. तेव्हा हिज्कीया बरा झाला.
8 हिज्कीया यशयाला म्हणाला, “परमेश्वराच्या कृपेने माझ्या प्रकृतीला उतार पडेल आणि तिसऱ्या दिवशी मी परमेश्वराचे मंदिर चढू शकेन याबद्दल काही खूण देता येईल का?”
9 यशया म्हणाला, “तुला काय हवे बोल. सावली दहा पावले पुढे जाऊ दे [c] की मागे येऊ दे? परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खूण आहे.”
10 हिज्कीया म्हणाला, “सावली दहा पावले पुढे जाणे स्वाभाविक आहे. तेव्हा तसं नको, ती दहा पावले मागे यावी.”
11 मग यशयाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराने सावली दहा पावले मागे घेतली. जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली.
हिज्कीया आणि बाबेलचे लोक
12 यावेळी बलदानचा मुलगा बरोदख-बलदान हा बाबेलचा राजा होता. त्याने हिज्कीयाकडे संदेश आणि भेटवस्तू पाठवल्या. हिज्कीया आजारी असल्याचे ऐकून त्याने हे पाऊल उचलले. 13 हिज्कीयाने त्याच्याकडून आलेल्या माणसांचे आगतस्वागत केले. त्यांना आपल्या घरातील सर्व मौल्यवान वस्तु दाखवल्या. सोने, चांदी, मसाल्याचे पदार्थ, किंमती अत्तरे, शस्त्रास्त्रे असा आपला सर्व खजिना त्यांना दाखवला. आपल्या घरातील आणि राज्यातील कोणतीही गोष्ट त्याने त्यांना दाखवायची शिल्लक ठेवली नाही.
14 तेव्हा यशया संदेष्ट राजाकडे येऊन म्हणाला, “हे लोक कोण? त्यांचे काय म्हणणे आहे?”
हिज्कीया म्हणाला, “हे फार लांबच्या प्रांतातून बाबेलमधून आले आहेत.”
15 यशयाने विचारले, “त्यांनी या घरातले काय काय पाहिले?”
हिज्कीयाने सांगितले, “त्यांनी सगळेच पाहिले. माझे सगळे भांडार मी त्यांच्यापुढे उघडे केले.”
16 तेव्हा यशया म्हणाला, “आता परमेश्वराचा हा निरोप ऐक. 17 तुझ्या घरातील सर्व चीजवस्तू आणि तुझ्या पूर्वजांनी जमवलेले सर्व धन आत्ता बाबेलला नेण्यात येईल. ती वेळ आता येऊन ठेपली आहे. काही म्हणता काही मागे उरणार नाही. ही परमेश्वराची वाणी आहे. 18 बाबेलचे लोक तुझ्या मुलांना घेऊन जातील. ती मुले बाबेलच्या राजवाड्यात खोजे बनून राहतील.”
19 तेव्हा हिज्कीया यशायाला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे योग्यच आहे.” तो पुढे म्हणाला, “निदान माझ्या कारकिर्दीत तरी शांतता लाभेल ना?”
20 शहराला पाणीपुरवठा करणारी तळी आणि कालवे यांच्यासकट हिज्कीयाने जी कामगिरी बजावली तिची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे. 21 हिज्कीया निधन पावला आणि त्याचा पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. त्याचा मुलगा मनश्शे गादीवर आला.
आमचे तारण नियमशास्त्रापेक्षा मोठे आहे
2 त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यातून निसटून जाऊ नये. 2 कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते. 3 तर आपण अशा महान तारणाकडे लक्ष दिले नाही, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभुने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली 4 देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भुत कृत्यांद्वारे, आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.
त्यांचे तारण करण्यासाठी ख्रिस्त मनुष्यांसारखा झाला
5 जे येणारे नवीन जग होते त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही, त्याच भविष्याकाळातील जगाविषयी आपण बोलत आहोत. 6 पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे:
“मनुष्य कोण आहे की ज्याची
तुला चिंता वाटते?
किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की
ज्याचा तू विचार करावास?
7 थोड्या काळासाठी तू त्याला देवदूतांपेक्षा कमी केले
तू त्याला गैरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस
8 तू सर्व काही त्याच्या पायाखाली (अधिकाराखाली) ठेवलेस.” (A)
देवाने सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवले आणि कोणतीही गोष्ट त्याच्या अधिपत्याखाली ठेवायची सोडली नाही. पण आता अजूनपर्यंत सर्व काही त्याच्या अधिपत्याखाली ठेवलेले आपण पाहत नाही. 9 परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुगुट घातल्याचे पाहत आहोत. कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
10 देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दु:खसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
11 जो लोकांना पवित्र करतो व ज्यांना पवित्र करण्यात आले आहे, ते सर्व एकाच कुटुंबाचे आहेत या कारणासाठी तो त्यांना बंधु आणि भगिनी म्हणण्यास लाजत नाही. 12 येशू म्हणतो,
“मी तुझे नाव माझ्या बंधु आणि भगिनिंना सांगेन
मी सभेसमोर तुझी स्तुति गाईन.” (B)
13 तो आणखी म्हणतो,
“मी माझा विश्वास देवावर ठेवीन.” (C)
आणि तो पुन्हा म्हणतो,
“येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.” (D)
14 म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने त्यानेसुद्धा त्या रक्तात व मांसात त्यांच्यासमवेत भाग घेतला. येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा. 15 आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे. 16 कारण हे स्पष्ट आहे की, तो काही देवदूतांना मदत करत नाही, उलट अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो, 17 या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा मुख्य याजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायशिचत करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते. 18 कारण ज्याअर्थी त्याला स्वतःला परीक्षेला व दु:खसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.
इस्राएलने आपला नाश स्वतःच करून घेतला
13 इस्राएलमध्ये एफ्राईमने स्वतःचे महत्व वाढविले तो बोलत असे व लोक भीतीने थरथर कापत. पण एफ्राईमने पाप केले त्याने बआल देवताला पूजणे सुरु केले. 2 ते इस्राएली अधिकच पाप करतात. ते स्वतःसाठी मूर्ती तयार करतात. कारागिर चमत्कतिपूर्ण चांदीच्या मूर्ती घडवितात व ते लोक त्या मूर्तीशी बोलतात. ते त्या मूर्तीपुढे बळी देतात. सोन्याच्या वासरांचे ते चुंबन घेतात. 3 ह्याच कारणामुळे ते लोक लवकरच अदृश्य होतील. सकाळच्या धुक्याप्रमाणे त्यांची स्थिती होईल. सकाळी धुके थोड्यावेळ दिसते. व लगेच नाहीस होते. इस्राएलींची दशा खळ्यातून उडणाऱ्या फोलकटाप्रमाणे होईल. धुराड्यातून निघणारा धूर काही क्षणातच दिसेनासा होतो, तसे त्याचे होईल.
4 “तुम्ही मिसर देशात असल्यापासून मी परमेश्वर तुमचा परमेश्वर आहे माझ्याशिवाय दुसरा देव तुम्हाला माहीत नव्हता. ज्याने तुम्हाला वाचविले तो मीच. 5 वाळवंटात, त्या रूक्ष प्रदेशात, मी तुम्हाला ओळखले. 6 मी इस्राएल लोकांना अन्न दिले. त्यांनी ते खाल्ले व ते संतुष्ट झाले,तृप्त झाले. ते गर्विष्ठ झाले आणि ते मलाच विसरले.
7 “म्हणूनच मी त्यांच्याशी सिंहासारखा वागेन. रस्त्यावर दबा धरून बसलेल्या चित्याप्रमाणे मी होईन. 8 जिची पिल्ले तिच्यापासून हिरावून घेतली गेली आहेत अशी अस्वलाची मादी जसा हल्ला करील, तसाच मीही त्याच्यावर तुटून पडेन. मी त्यांच्यावर चढाई करीन. मी त्यांच्या छाती फाडीन. सिंह किंवा इतर हिस्र पशू आपली शिकार जशा फाडून खातात तसेच मी करीन.”
परमेश्वराच्या क्रोधापासून इस्राएलला कोणीही वाचवू शकणार नाही
9 “इस्राएल, मी तुला मदत केली. पण तू माझ्याविरुध्द गेलास म्हणून आता मी तुझा नाश करीन. 10 तुझा राजा कोठे आहे? तुझ्या सर्व नगरांत तो तुला वाचवू शकत नाही. तुझे न्यायाधीश कोठे आहेत? ‘मला राजा व नेते दे’ अशी विनवणी तू केली होतीस. 11 मी रागावलो आणि तुला राजा दिला. माझा क्रोध अधिक भडकताच, मी तुझा राजा काढून घेतला.
12 “एफ्राईमने आपला अपराध लपविण्याचा प्रयत्न केला.
त्याचे पाप म्हणजे गुप्त गोष्ट हे असे
त्याला वाटले पण त्याच्या पापाची शिक्षा त्याला मिळेल.
13 त्याची शिक्षा प्रसूतिवेदनांप्रमाणे असेल.
तो सुज्ञ मुलगा नसेल
त्याची जन्मवेळ येईल,
तेव्हा तो वाचणार नाही.
14 “मी त्यांना थडग्यापासून वाचवीन मी
त्यांचा मृत्यूपासून बचाव करीन.
मरणा, तुझी रोगराई कोठे आहे?
थडग्या, तुझी शक्ती कोठे गेली?
मला सूड घ्यायचा नाही.
15 इस्राएल त्यांच्या भावांत वाढतो आहे.
पण पूर्वेकडून जोराचा वारा येईल.
परमेश्वराचा वारा वाळवंटाकडून वाहील.
मग इस्राएलची विहीर आटून जाईल.
त्याचा झरा कोरडा पडेल.
वारा इस्राएलच्या खजिन्यातील प्रत्येक मौल्यवान वस्तू काढून घेईल.
16 शोमरोनला शिक्षा झालीच पाहिजे, का?
कारण तिने परमेश्वराकडे पाठ फिरविली.
इस्राएली तलवारीला बळी पडतील.
त्यांच्या मुलांची खांडोळी केली जाईल.
त्यांच्या गर्भवती स्त्रियांना फाडून टाकले जाईल.”
137 आम्ही बाबेलच्या नद्यांजवळ बसलो
आणि सियोनची आठवण काढून रडलो.
2 आम्ही जवळच्या वाळुंज झाडावर आमच्या वीणा ठेवल्या.
3 बाबेलमध्ये आम्हाला पकडणाऱ्यांनी आम्हाला गायला सांगितले.
त्यांनी आम्हाला आनंदी गाणे गायला सांगितले.
त्यांनी आम्हाला सियोनचे गाणे गायला सांगितले.
4 परंतु परक्या देशात आम्ही
परमेश्वराचे गाणे गाऊ शकत नाही.
5 यरुशलेम, मी जर तुला कधी विसरलो,
तर मी पुन्हा कधीही गाणे वाजवणार नाही असे मला वाटते.
6 यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो,
तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते.
मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो.
7 यरुशलेम नेहमी माझा सर्वांत
मोठा आनंद असेल असे मी वचन देतो.
8 बाबेल, तुझा नाश होईल.
जो तुला तुझ्या योग्य अशी शिक्षा देईल त्याला देव आशीर्वाद देईल.
तू जसा आम्हाला दु:ख देतोस तसेच दु:ख जो तुला देईल त्याला धन्यवाद.
9 जो माणूस तुझी मुले धरतो आणि
त्यांना दगडावर आपटून ठार मारतो त्याचा धन्यवाद असो.
दावीदाचे स्तोत्र.
138 देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो.
मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन.
2 देवा, मी तुझ्या पवित्र मंदिरासमोर नतमस्तक होतो.
मी तुझ्या नावाची, तुझ्या खऱ्या प्रेमाची आणि तुझ्या इमानदारीची स्तुती करतो.
तू तुझ्या शब्द सामर्थ्याबद्दल प्रसिध्द आहेस.
आता तर तू ते अधिकच वाढवले आहेस.
3 देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली
आणि तू मला होकार दिलीस.
तू मला शक्ती दिलीस.
4 परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील
तेव्हा ते तुझी स्तुती करतील.
5 ते परमेश्वराच्या पध्दतीचे गुणगान करतील
कारण परमेश्वराची महिमा अगाध आहे.
6 देव फार म्हत्वाचा आहे पण तो दुबळ्यालोकांचा कैवारी आहे
गर्विष्ठ लोक काय करतात ते देवाला माहीत आहे
परंतु तो त्यांच्यापासून दूर राहातो.
7 देवा, मी जर संकटात सापडलो तर मला जिवंत ठेव.
जर माझे शत्रू माझ्यावर रागावले तर त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
8 परमेश्वरा, तू कबूल केलेल्या वस्तू मला दे.
परमेश्वरा, तुझे खरे प्रेम सदैव असते.
परमेश्वरा, तू आमची निर्मिती केलीस, आता आम्हाला सोडू नकोस.
2006 by World Bible Translation Center