Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 15

अजऱ्याची यहूदातील कारकीर्द

15 इस्राएलचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजऱ्या राजा झाला. तेव्हा अजऱ्या सोळा वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये बावन्र वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या ती यरुशलेममधली होती. अजऱ्याचे वर्तन आपल्या वडीलांप्रमाणेच परमेश्वराने सांगितले तसे उचित होते. आपले वडील अमस्या जसे वागले तसाच हाही वागला. परंतु उंचस्थानावरील पूजास्थळे त्याने नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.

परमेश्वराच्या अवकृपेने राजा अजऱ्या याला कुष्ठरोग झाला. मरेपर्यंत तो त्यातून बरा झाला नाही. तेव्हा तो वेगळा राहू लागला. त्याचा मुलगा योथाम याने राजाच्या या घराची देखभाल केली आणि तोच लोकांचा न्यायनिवाडा करु लागला.

अजऱ्याने जे केले ते सर्व यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहून ठेवलेले आहे. अजऱ्याचे निधन झाले. दावीदनगरात त्याचे पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा योथाम त्याच्यानंतर राज्यावर आला.

जखऱ्याची इस्राएलवर अल्पजीवी कारकीर्द

यराबामचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनमध्ये सहा महिने राज्य केले. यहूदाचा राजा अजऱ्या याच्या कारकिर्दीचे तेव्हा अडतिसावे वर्ष होते. जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये केली. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच याने केली.

10 मग याबेशचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट केला. इब्लाममध्ये त्याने जखऱ्याला ठार केले. आणि स्वतः राज्यावर आला. 11 जखऱ्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. 12 अशा रीतीने परमेश्वराचा शब्द खरा ठरला. येहूच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील असे परमेश्वराने येहूला सांगितले होते.

शल्लूमची इस्राएलवर अल्प कारकीर्द

13 याबेशाचा मुलगा शल्लूम इस्राएलचा राजा झाला तेव्हा उज्जीया यहूदाचा राजा झाल्याला एकोणचाळिसावे वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले.

14 गादीचा मुलगा मनहेम तिरसाहून शोमरोनमध्ये आला त्याने शल्लूमला ठार केले. मग मनहेम स्वतः राजा झाला.

15 शल्लूमने जे केले ते सगळे, तसेच त्याने जखऱ्याविरुध्द केलेला कट इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात लिहिलेले आहे.

इस्राएलमध्ये मनहेमचे राज्यअल्प

16 शल्लूमच्या मृत्यूनंतर मनहेमने तिफसाहचा तसेच त्याच्या भोवतालच्या प्रदेशाचा पाडाव केला. लोकांनी नगराची वेस उघडायला विरोध केला तेव्हा त्यांनाही नेस्तनाबुत करुन त्याने गर्भवती स्त्रियांनाही कापून काढले.

17 यहूदाचा राजा अजऱ्या याच्या एकोणचाळिसाव्या वर्षात गादीचा मुलगा मनहेम इस्राएलवर राज्य करु लागला. मनहेमने शोमरोनमध्ये दहा वर्षे राज्य केले. 18 मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचा अधःपात झाला तीच पापे मनहेमने केली.

19 अश्शूरचा राजा पूल इस्राएलवर चाल करुन आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे या इराद्याने मनहेमने पूलला पंचाहत्तर पौंड चांदी दिली. 20 हा पैसा उभा करायला मनहेमने श्रीमंत आणि वजनदार लोकांवर कर बसवला. प्रत्येकाला त्याने वीस औंस चांदी कररूपाने द्यायला लावली. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.

21 मनहेमच्या पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.

22 मनहेम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा पेकह्या नवीन राजा झाला.

पेकह्याची इस्राएलवर कारकीर्द

23 अजऱ्याच्या यहूदावरील राज्याच्या पन्नासाव्या वर्षी मनहेमचा मुलगा पेकह्या शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने दोन वर्षे राज्य केले. 24 परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते पेकह्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचे अधःपतन झाले तीच पापे पेकह्याने केली.

25 रमाल्या याचा मुलगा पेकह हा पेकह्याच्या सैन्याचा सरदार होता. पेकहने पेकह्याला मारले. शोमरोन मध्ये राजवाड्यातच त्याने हा वध केला. वधाच्या वेळी पेकह बरोबर गिलादमधली पन्नास माणसे होती. यानंतर पेकह राजा झाला.

26 पेकह्याच्या सर्व पराक्रमांची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.

पेकहाची कारकीर्द

27 रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा अजऱ्या याचे बावन्नावे वर्ष होते. पेकहाने वीस वर्षे राज्य केले. 28 पेकहाने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याच्या पापांनी इस्राएलचा अधःपात झाला. पेकह त्याच मार्गाने गेला.

29 अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.

30 एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला. उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी हे झाले.

31 पेकहने जे पराक्रम केले त्याची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.

योथामचे यहूदावर राज्य

32 उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करु लागला तेव्हा रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलमध्ये राज्यावर आल्यावर दुसरे वर्ष चालू होते. 33 योथाम तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. सादोकची मुलगी यरुशा ही त्याची आई. 34 आपले वडील उज्जीया यांच्या प्रमाणेच योथामही परमेश्वराच्या दृष्टीने योग्य अशी कृत्ये करत होता. 35 पण त्यानेही उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तेथे यज्ञ करत, धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामने एक वरचा दरवाजा बांधला. 36 यहूदांच्या राजाचा इतिहास या पुस्तकात योथामने केलेल्या पराक्रमांची नोंद आहे.

37 अरामचा राजा रसीन आणि रमाल्याचा मुलगा पेकह यांना याच वेळी परमेश्वराने यहूदावर चालून जायला उद्यक्त केले.

38 योथाम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. दावीद नगर या आपल्या पूर्वजांच्या नगरात त्याला पुरले. त्याच्या नंतर त्याचा मुलगा आहाज नवा राजा झाला.

तीताला 1

देवाचा सेवक व येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल याजकडून, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासात त्यांना मदत करण्यासाठी मला पाठविण्यात आले. त्या लोकांना सत्याची ओळख करवून देण्यासाठी मला पाठविले. व ते सत्य लोकांना देवाची सेवा कशी करायची हे दाखविते. तो विश्वास आणि ते ज्ञान अनंतकाळच्या जीवनाच्या आमच्या आशेमुळे येते. काळाची सुरुवात होण्यापूर्वी देवाने त्या जीवनाचे अभिवचन आम्हांला दिले. आणि देव खोटे बोलत नाही. देवाने आपल्या योग्य वेळी त्या जीवनाविषयीचा संदेश जगाला प्रकट केला. देवाने ते काम माझ्यावर सोपविले. त्या गोष्टीविषयी मी संदेश दिला कारण आमच्या तारणाऱ्या देवाने मला तसे करण्याची आज्ञा केली होती.

विश्वासातील माझा खरा मुलगा तीत याला मी लिहीत आहे.

देव पिता व ख्रिस्त येशू आपला तारणारा याजकडून तुला कृपा, दया व शाति असो.

तीताचे क्रेतातील कार्य

मी तुला क्रेत येथे सोडून या कारणासाठी आलो: की जे अजून अपूर्ण राहिले होते ते तू व्यवस्थित करावेस व मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे प्रत्येक गावी वडील नेमावेत. ज्याच्यावर दुराचरणाचा दोष नसेल, ज्याला एकच पत्नी असेल, ज्याला मुले असून ती विश्वासणारी असतील. ज्याच्यावर स्वैर जीवन जगल्याचा आरोप नसेल, अशा प्रकारच्या व्यक्तीस नेमावे. कारण अध्यक्ष (सर्वांगीण काळजीवाहक) हा देवाचा कारभारी असल्यामुळे तो दोषी नसावा. तो उद्धट नसावा, त्याला लवकर राग येऊ नये; तो मद्यपान करणारा नसावा, तो भांडणाची आवड नसणारा, अप्रामाणिकपणे पैसे मिळविण्याची आवड नसणारा असावा. तर तो आदरातिथ्य करणारा, चांगुलपणावर प्रेम करणारा, शहाणा, नीतिमान, भक्तीशील व स्वतःवर संयम ठेवणारा असावा. विश्वसनीय संदेश जसा तो शिकविला गेला त्याला दृढ धरून राहावे यासाठी की, हितकारक शिक्षणाने लोकांना बोध करण्यास समर्थ असावे. व जे विरोध करतात, त्यांची चूक कौशल्याने त्यांना पटवून द्यावी.

10 हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे. 11 त्यांची तोंडे बंद केलीच पाहिजेत, ज्या गोष्टी शिकवू नयेत त्या ते शिकवीत आहेत. ते हे यासाठी करीत आहेत की, अयोग्य मार्गाने पैसे मिळवावेत. अशा रीतीने ते संपूर्ण घराण्याचा नाश करीत आहेत. 12 त्यांच्यापैकीच एक क्रेतीय संदेष्टा (भविष्यवादी) स्वतःम्हणाला, ʇक्रेतीय नेहमीच खोटारडे आहेत. दुष्ट पशू आणि आळशी, खादाड आहेत.ʈ 13 हे वाक्य खरे आहे. म्हणून नेहमीच त्यांना कडक रीतीने धमकाव. यासाठी की, त्यांनी विश्वासात खंबीर व्हावे. 14 आणि यहूदी भाकडकथा व जे सत्य नाकारतात अशा लोकांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये.

15 शुद्ध असणाऱ्या सर्वांना, सर्व गोष्टी शुद्ध आहेत; पण ज्यांचे विचार व विवेकभाव ही दोन्हीही पापाने भ्रष्ट झाली आहेत व जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना काहीच शुद्ध नाही. 16 ते देवाला ओळखत असल्याचा दावा करतात, पण ते त्यांच्या कृत्यांनी देवाला ओळखल्याचे नाकारतात. ते अमंगळ व आज्ञा मोडणारे, व कोणतेच चांगले कृत्य करण्यास लायक नसलेले असे त्यांचे त्यांनीच दाखवून दिले आहे.

होशेय 8

मूर्तिपूजेने इस्राएलला नाशाकडे नेले

“रणशिंग फुंकून इषारा द्या परमेश्वराच्या घरावरील गरुडाप्रमाणे व्हा. इस्राएल लोकांनी माझा करार मोडला आहे त्यांनी माझे नियम पाळले नाहीत ‘परमेश्वर, आम्ही इस्राएलमधील लोक तुला ओळखतो’ असे ते किंचाळून मला म्हणतात. पण इस्राएलने चांगल्या गोष्टी नाकारल्या म्हणून शत्रू त्याचा पाठलाग करतात. इस्राएल लोकांनी त्यांचा राजा निवडला, पण सल्ला विचारण्यासाठी ते माझ्याकडे आले नाहीत. इस्राएल लोकांनी नेते निवडले, पण मी ओळखत असणाऱ्या लोकांची निवड त्यांनी केली नही. इस्राएल लोकांनी त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचा उपयोग स्वतःसाठी मर्ती तयार करण्याकंरिता केला. म्हणून त्यांचा नाश होईल. 5-6 शोमरोन, तुझे वासरू परमेश्वराने नाकारले आहे. परमेश्वर म्हणतो, ‘मी इस्राएल लोकांवर रागावलो आहे.’ इस्राएलच्या लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा केली जाईल काही कामगारांनी ते पुतळे घडविले ते काही परमेश्वर नाहीत. शोमरोनच्या वासराचे तुकडे तुकडे केले जातील इस्राएल लोकांनी मूर्खपणा केला. तो वाऱ्याला पेरण्याप्रमाणे होता. म्हणून त्यांच्यावर संकटे येतील-ते वावटळीचे पीक निर्माण करतील. शेतांत पीक वाढेल, पण त्यापासून अन्न मिळणार नाही. जर काही पिकलेच, तर परकेच ते खाऊन टाकतील.

“कोणालाही नको असलेल्या ताटासारखा इस्राएल असल्यामुळे त्याचा नाश केला गेला.
    इस्राएलला दूर फेकण्यात आले.
    म्हणून इस्राएल लोक इतर राष्ट्रांत विखुरले गेले.
एफ्राईम त्याच्या ‘प्रेमिकाकडे’ गेला.
    रानटी गाढवाप्रमाणे तो अश्शूरकडे भटकला गेला.
10 इस्राएल लोक इतर राष्ट्रांतील आपल्या ‘प्रियकरांकडे’ गेले.
    पण मी इस्राएलींना एकत्र गोळा करीन.
पण त्या सामर्थ्यवान राजाच्या ओझ्यामुळे
    त्यांना थोडासा त्रास झालाच पाहिजे.

इस्राएल देवाला विसरून मूर्तीना पुजतो

11 “एफ्राईमने पुष्कळ वेद्या
    बांधून पापच केले.
त्या वेद्या एफ्राईमच्या पापाच्या वेद्या बनल्या आहेत.
12 मी एफ्राईमसाठी जरी 10,000 नियम लिहिले,
    पण एफ्राईमने ते परक्यासाठी असल्याप्रमाणे मानले.
13 इस्राएलींना बळी देणे आवडते.
    ते मांसाचा नैवेद्य दाखवून ते खातात.
परमेश्वर त्यांनी दिलेले बळी स्वीकारीत नाही.
त्याला त्यांची पापे स्मरतात.
    म्हणून तो त्यांना शिक्षा करील.
कैदी म्हणून त्यांना मिसरला नेण्यात येईल.
14 इस्राएलने राजवाडे बांधले.
    पण तो आपल्या कर्त्याला विसरला आता यहूदा गढ्या बांधतो आहे.
पण मी यहूदातील गावाला आग लावीन
    आणि ती आग त्या गढ्यांना बेचिराख करील!”

स्तोत्रसंहिता 123-125

वर व मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.

123 देवा, मी वर बघून तुझी प्रार्थना करतो.
    तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस.
गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी
    मालकावर अवलंबून असतात.
त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो.
    आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो.
परमेश्वरा, आमच्याशी दयाळू राहा.
    खूप काळापासून आमचा अपमान होत आला आहे म्हणून तू दयावंत हो.
५गर्विष्ठ लोकांनी आमचा खूप काळ अपमान केला.
    ते इतर लोकांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटते.

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दावीदाचे स्तोत्र.

124 परमेश्वर जर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
    इस्राएल, मला उत्तर दे.
लोकांनी आपल्यावर हल्ला केला
    तेव्हा जर परमेश्वर आपल्या बाजूला नसता तर आपले काय झाले असते?
आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते
    तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.
आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते.
    नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.
गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे
    आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.

परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना
    आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.

जाळ्यात सापडलेल्या आणि
    नंतर त्यातून सुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आपण आहोत.
    जाळे तुटले आणि आपण त्यातून सुटलो.
परमेश्वराकडून आपली मदत आली.
    परमेश्वराने पृथ्वी आणि स्वर्ग निर्माण केला.

वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र

125 जे लोक परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सियोन पर्वतासारखे आहेत.
    ते कधीही थरथरणार नाहीत.
    ते सदैव असतील.
यरुशलेमच्या सभोवती पर्वत आहेत आणि परमेश्वर त्याच्या माणसांभोवती आहे.
    तो त्याच्या माणसांचे सदैव रक्षण करील.
दुष्ट लोक चांगल्या माणसांच्या जमिनीवर कधीही ताबा मिळवू शकणार नाहीत.
    जर तसे घडले तर चांगले लोकही वाईट वागायला लागतील.

परमेश्वरा, तू चांगल्या लोकांशी चांगला राहा.
    ज्या लोकांची मने शुध्द आहेत त्यांच्याशी तू चांगला राहा.
दुष्ट लोक वाईट गोष्टी करतात.
    परमेश्वर त्या दुष्ट लोकांना शिक्षा करील.

इस्राएलमध्ये शांती नांदू दे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center