M’Cheyne Bible Reading Plan
अमस्याचे यहूदावर राज्य
14 योवाशचा मुलगा अमस्या यहुदाचा राजा झाला. तेव्हा इस्राएलचा राजा यहोआहाज याचा मुलगा योवाश गादीवर आल्याला दुसरे वर्ष होते. 2 अमस्या राज्य करु लागला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. अमस्याने यरुशलेममध्ये एकोणतीस वर्षे राज्य केले. अमस्याच्या आईचे नाव यहोअदान. ही यरुशलेमची होती. 3 परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित तेच अमस्याने केले. पण त्याबाबतीत तो आपला पूर्वज दावीद याच्या इतका पूर्णत्वाला गेला नाही. आपले वडील योवाश यांनी केले तेच अमस्याने केले. 4 त्याने उंचवट्यावरील पुजास्थळे नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी अजूनही लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.
5 राज्यावर त्याची चांगली पकड असतानाच, आपल्या वडीलांचे मारेकरी असलेल्या अधिकाऱ्यांचा त्याने वध केला. 6 पण त्या मारेकऱ्यांच्या मुलांना त्याने मारले नाही कारण मोशेच्या नियमशास्त्रात याबद्दलचे नियम सांगितलेले आहेत. मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने पुढील आज्ञा सांगितलेली आहे: “मुलांच्या गुन्ह्या करिता आईवडिलांना मृत्युदंड देता कामा नये. तसेच, आईवडिलांनी जे केले त्याबद्दल मुलांना मारले जाऊ नये. अपराधाचे शासन अपराध करणाऱ्यालाच व्हावे.”
7 मिठाच्या खोऱ्यात अमस्याने दहाहजार अदोम्यांना मारले. या लढाईत सेला नगर त्याने घेतले आणि त्याचे नाव “जोकथेल” ठेवले अजूनही ते त्याच नावाने ओळखले जाते.
अमस्याची योवाशवर चढाई करण्याची इच्छा
8 इस्राएलचा राजा येहू याचा मुलगा यहोआहाज त्याचा मुलगा योवाश याच्याकडे अमस्याने संदेश पाठवला. संदेशात म्हटले होते, “ऊठ, समोरासमोर एकमेकांना भिडून आपण लढू.”
9 तेव्हा योवाशने यहूदाचा राजा अमस्या याला उत्तर पाठवले की, “लबानोनमधल्या काटेरी झुडुपाने लबानोनमधल्या गंधसरुच्या वृक्षाला निरोप पाठवला, ‘तुझ्या मुलीला माझ्या मुलाची बायको करुन घ्यायचे आहे.’ पण लबानोनमधला एक वन्यपशू वाटेने जाताना त्या काटेरी झुडुपाला तुडवून पुढे गेला. 10 अदोमचा तू पराभव केलास हे खरे पण त्या विजयाने तू उन्मत्त झाला आहेस. पण आहेस तिथेच राहून बढाया मार. स्वतःला संकटात लोटू नको. हे ऐकले नाहीस तर तुझा आणि तुझ्याबरोबर यहूदाचाही पाडाव होईल.”
11 योवाशच्या या इषाऱ्याकडे अमस्याने दुर्लक्ष केले. तेव्हा यहूदातील बेथ-शेमेश या ठिकाणी इस्राएलचा राजा योवाश यहूदाचा राजा अमस्या याच्या समोर लढाईला उभा ठाकला. 12 इस्राएलने यहूदाचा पराभव केला. यहूदातील एकूण एक सर्व माणसांनी आपापल्या तंबूत पळ काढला. 13 अहज्यापुत्र योवाशचा मुलगा यहूदाचा राजा अमस्या याला इस्राएलचा राजा योवाश याने बेथशेमेश येथे अटक केले. योवाशने अमस्याला यरुशलेम येथे आणले. तेथे पोचल्यावर यरुशलेमच्या तटबंदीला योवाशने एफ्राईमच्या दरवाज्यापासून कोपऱ्यातील दरवाजापर्यंत जवळ जवळ सहाशे फुटांचे खिंडार पाडले. 14 पण परमेश्वराच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या खजिन्यातील सोने, चांदी आणि सर्व पात्रे योवाशने लुटली. तसेच येथील सर्व माणसांना बंदिवान केले. मगच तो शोमरोनला परतला.
15 यहूदाचा राजा अमस्या याच्याशी झालेल्या या लढाईतील पराक्रमाबरोबरच योवाशने केलेल्या इतर महान कृत्यांचीही नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात केलेली आहे. 16 योवाश मरण पावला आणि आपल्या पूर्वंजांना जाऊन मिळाला. इस्राएलच्या राजांशेजारी शोमरोनमध्ये त्याचे दफन झाले. योवाशनंतर त्याचा मुलगा यराबाम गादीवर आला.
अमस्याचा मृत्यू
17 इस्राएलचा राजा यहोआहाज याचा मुलगा योवाश याच्या मृत्यूनंतर अमस्या पंधरा वर्षे जिवंत होता. 18 त्याने केलेल्या सर्व थोर कृत्यांची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात केलेली आहे. 19 अमस्याविरुध्द यरुशलेममध्ये लोकांनी कट केला. तेव्हा अमस्या लाखीश येथे पळाला. पण लोकांनी माणसे पाठवून त्याचा लाखीशर्पंत पाठलाग केला आणि त्यांनी अमस्याचा तेथे वध केला. अमस्याचा मृत्यू 20 लोकांनी अमस्याचा मृतदेह घोड्यावर लादून परत आणला. दावीदनगरात यरुशलेम येथे आपल्या पूर्जजांच्या समवेत त्याचे दफन झाले.
यहूदावर अजऱ्याचा अंमल
21 मग यहूदाच्या सर्व लोकांनी अजऱ्याला राजा केले. अजऱ्या तेव्हा सोळा वर्षांचा होता. 22 राजा अमस्याच्या निधनानंतर त्याला त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. अजऱ्याने एलाथची पुन्हा उभारणी केली आणि एलाथ यहूदाच्या स्वाधीन केले.
दुसरा यराबाम याची इस्राएलवर सत्ता
23 इस्राएलचा राजा योवाश याचा मुलगा यराबाम शोमरोनमध्ये राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा योवाश याचा मुलगा अमस्या याच्या कारकिर्दींचे पंधरावे वर्ष होते. यराबामने एक्के चाळीस वर्षे राज्य केले. 24 यराबामने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच या यराबामने चालू ठेवली. 25 लेबो-हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंतची इस्राएलची भूमी यराबामने पुन्हा संपादन केली. गथ-हेफेर मधला संदेष्टा अमित्तयचा मुलगा योना याला इस्राएलच्या परमेश्वराने सांगितले त्या प्रमाणेच हे घडले. 26 इस्राएलचे दास काय किंवा स्वतंत्र माणसे काय, सर्वच अडचणीत आलेले आहेत, हे परमेश्वराने पाहिले. यातला कोणीच इस्राएलला वर आणण्याच्या पात्रतेचा नाही हे त्याने ओळखले 27 इस्राएलचे नाव जगाच्या पाठीवरुन पुसून टाकू असे काही परमेश्वर म्हणाला नव्हता. तेव्हा योवाशचा मुलगा यराबाम याच्यामार्फत परमेश्वराने इस्राएलला तारले.
28 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात यराबामच्या पराक्रमांची नोंद आहे. दिमिष्क आणि हमाथ त्याने इस्राएलच्या भूमीला पुन्हा जोडले याचीही नोंद त्यात आहे. (ही नगरे यहूदाच्या ताब्यात होती) 29 यराबाम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. यराबामचा मुलगा जखऱ्या राजा म्हणून गादीवर आला.
4 देवासमोर आणि ख्रिस्त येशूसमोर मी तुला गांभीर्याने आज्ञा करतो, जे जिवंत आहेत व जे मेलेले आहेत त्यांचा येशू ख्रिस्त हाच न्याय करणार आहे. येशू ख्रिस्ताचे राज्य व त्याचे परत येणे याविषयी घोषणा कर. मी तुला देवासमोर व ख्रिस्तसमोर ही आज्ञा करतो. 2 वचन गाजवीत राहा. सोयीच्या किंवा गैरसोयीच्या अशा कोणत्याही वेळी तुझे कार्य करण्यास तयार राहा. लोकांना जे करायचे आहे, त्याविषयी त्यांची खात्री पटव. जेव्हा ते चुका करतील तेव्हा त्यांना सावध कर; लोकांना उत्तेजन दे. आणि हे सर्व काळजीपूर्वक शिक्षण देण्याने व मोठ्या सहनशीलतेने कर.
3 मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण ऐकण्याची इच्छी धरणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील, त्यांची कानउघडणी कर. 4 सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते भाकड कथांकडे लावतील. 5 पण तुझ्याबाबतीत स्वतः सावधानतेने वाग, दु:ख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.
6 माझ्याबाबतीत म्हणायचे तर, मी अगोदरच पेयार्पणा सारख ओतला जात आहे. व माझी या जीवनातून जाण्याची वेळ आली आहे. 7 मी सुयुद्ध जिंकेले आहे. मी माझी शर्यत संपविली आहे. मी विश्वास राखला आहे. 8 आता माझ्यासाठी विजेत्यासाठी असलेला मुकुट जो नीतिमत्त्व, तो वाट पाहत आहे. आणि प्रभु जो नीतिमान न्यायाधीश, तो मला त्या दिवशी मुकुट देईल आणि केवळ मलाच तो देईल असे नाही तर जे सर्व त्याच्या येण्याची प्रेमाने वाट पाहत आहेत, अशा सर्वांना देईल.
व्यक्तिगत संदेश
9 तुला शक्य होईल तितक्या लवकर मला भेटावयाला येण्याचा प्रयत्न कर. 10 कारण देमास मला सोडून थेस्सलनीकास गेला आहे. कारण त्याला आजचे हे जग प्रिय आहे. क्रेस्केस गलतीयास गेला आहे. व तीत दालमतीयास गेला आहे. 11 लूक एकटा असा आहे की, जो अजूनदेखील माझ्याजवळ आहे. जेव्हा तू येशील तेव्हा मार्कलाही तुझ्याबरोबर घेऊन ये. कारण सेवेकरिता तो मला उपयोगी आहे. 12 तुखिकाला मी इफिसास पाठविले आहे.
13 त्रोवसात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये. तसेच माझी पुस्तके, विशेषतः चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये.
14 आलेवसांद्र तांबटाने माझे खूप नुकसान केले आहे. त्याने केलेल्या त्याच्या कृत्यांबद्दल देव त्याची फेड करील. 15 त्याच्यापासून स्वतःचे रक्षण कर. कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता.
16 पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये. 17 प्रभु माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व विदेश्यांनी ती ऐकावी. सिंहाच्या मुखातून त्याने मला सोडविले. 18 प्रभु मला सर्व दुष्कृत्यांपासून सोडवील व त्याच्या स्वर्गाच्या राज्यात सुखरूपपणे आणिल. त्याला सदासर्वकाळपर्यंत गौरव असो.
शेवटचा सलाम
19 प्रिस्कीला अविवल्ला आणि अनेसिफरच्या घरातील लोकांना सलाम सांग. 20 एरास्त करिंथात राहिला. त्रफिमाला मी मिलेता येथे सोडले कारण तो आजारी होता. 21 तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर.
युबुल, पुदेश, लीन, वलौदिया व इतर सर्व बंधु तुला सलाम सांगतात.
22 प्रभु तुझ्या आत्म्याबरोबर असो. देवाची कृपा तुम्हां सर्वांबरोबर असो.
7 “मी इस्राएलला बरे करीन.
मगच लोकांना एफ्राईमच्या पापाविषयी कळून येईल.
लोकांना शोमरोनाचा खोटेपणाही समजेल.
त्या नगरीत ये जा करणाऱ्या चोरांबद्दलही लोकांना समजेल.
2 मी त्याचे अपराध लक्षात ठेवीन, असे त्या लोकांना वाटत नाही.
त्याची दुष्कृत्ये सगळीकडे पसरली आहेत.
मला त्यांची पापे स्पष्ट दिसू शकतात.
3 त्यांची दुष्कृत्ये त्यांत्या राजाला आनंद देतात.
त्यांची दैवते त्यांच्या नेत्यांना खूश करतात.
4 रोटीवाला रोट्या बनविण्यासाठी
कणीक मळतो तो रोटी भट्टीत ठेवतो
रोटी फुगत असताना तो आच मोठी ठेवत नाही.
पण इस्राएलचे लोक तसे नाहीत.
ते त्यांची आच नेहमीच मोठी ठेवतात.
5 आमच्या राजाच्या दिवशी, ते आच जास्त मोठी करतात.
ते पेयांच्या मेजवान्या देतात.
मद्याच्या गरमीने नेत्यांना मळमळते.
मग राजाही परमेश्वराच्या निंदकांत सामील होतो.
6 लोक कट रचतात.
त्यांची मने तापलेल्या भट्टीप्रमाणे उत्तेजित होऊन जळतात.
त्यांच्या मनातील खळबळ रात्रभर जळत राहाते.
आणि सकाळी ती अतितप्त विस्तवाप्रमाणे होते.
7 ते तापलेल्या भट्टीप्रमाणे आहेत.
त्यांनी त्यांच्या राज्यकर्त्यांचा नाश केला.
त्यांचे सर्व राजे पडले
पण एकानेही मदतीसाठी मला हाक मारली नाही.”
इस्राएलचा नाश केला जाणार आहे, हे इस्राएलला ठाऊक नाही
8 “एफ्राईम राष्ट्राबरोबर मिसळतो
तो दोन्हीकडून न भाजलेल्या भाकरीप्रमाणे आहे.
9 परके एफ्राईमची शक्ती नष्ट करतात.
पण एफ्राईमला ते कळत नाही.
त्याच्यावर पिकलेले केस पसरले आहेत.
पण ते त्याला माहीत नाही.
10 एफ्राईमचा गर्व त्यांच्याविरुध्द
बोलतो लोकांना खूपच अडचणी आहेत,
तेरी ते परमेश्वराकडे, त्यांच्या परमेश्वराकडे परत जात नाहीत.
ते मदतीसाठी त्याच्याकडे पाहात नाहीत.
11 म्हणजेच एफ्राईम मूर्ख पारव्याप्रमाणे बेअक्कल झाला आहे.
लोकांनी मदतीसाठी मिसरला हाक मारली.
ते मदत मागायला अश्शूरकडे गेले.
12 ते मदतीसाठी त्या देशांकडे जातात खरे,
पण मी त्यांना सापळ्यात पकडीन.
मी माझे जाळे त्यांच्यावर फेकीन,
आणि जाळ्यात अडकलेल्या आकाशातील पक्ष्याप्रमाणे मी त्यांना खाली आणीन.
त्यांच्या करारांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन.
13 ते त्यांच्या दृष्टीने वाईट आहे.
त्यांनी माझा त्याग केला.
त्यांनी माझी आज्ञा पाळण्यांस नकार दिला म्हणून त्यांचा नाश होईल.
मी त्या लोकांचे रक्षण केले पण ते माझ्याविरुध्द खोटे बोलतात.
14 मनापासून ते मला कधीही बोलावीत नाहीत.
हो! ते त्यांच्या बिछान्यात रडतात
आणि धान्य व नवीन मद्य मागताना ते स्वतःला माझ्यापासून अलगच करतात
मनाने ते माझ्यापासून दूर गेले आहेत.
15 मी त्यांना शिकवण दिली आणि त्यांचे हात बळकट केले.
पण त्यांनी माझ्याविरुध्द दुष्ट बेत रचले आहेत.
16 ते मोडक्या धनूष्याप्रमाणे आहेत.
त्यांनी दिशा बदलल्या पण ते परत माझ्याकडे आले नाहीत.
त्यांचे नेते त्यांच्या सामर्थ्याबद्दल बढाई मारतात.
पण ते तलवारीच्या वाराने मारले जातील.
मग मिसरचे लोक त्यांना हसतील.
वर मंदिरांत जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
120 मी संकटात होतो, मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने मला वाचवले.
2 परमेश्वरा, माझ्याविषयी खोट बोलणाऱ्या लोकांपासून मला वाचव.
त्या लोकांनी खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगितल्या.
3 खोटारड्यांनो तुम्हाला काय मिळणार आहे ते माहीत आहे का?
त्यापासून तुमचा काय फायदा होणार आहे ते तुम्हाला माहीत आहे का?
4 सैनिकाचे अणकुचीदार बाण आणि
जळते निखारे तुम्हाला शिक्षा म्हणून मिळतील.
5 खोटारड्यांनो, तुमच्याजवळ राहाणे म्हणजे मेशेखात राहाण्यासारखे आहे,
केदारच्या तंबून राहाण्यासारखे आहे
6 शांतीचा तिरस्कार करणाऱ्या लोकांजवळ
मी खूप काळ राहिलो आहे.
7 मी म्हणालो, मला शांती हवी,
म्हणून त्यांना युध्द हवे आहे.
वर मंदिरांत जाण्याच्या वेळेचे स्तोत्र.
121 मी वर डोंगरांकडे बघतो.
पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे?
2 माझी मदत परमेश्वराकडून,
स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे.
3 देव तुला खाली पडू देणार नाही.
तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
4 इस्राएलचा पाठीराखा झोपाळू होत नाही.
देव कधीही झोपत नाही.
5 परमेश्वर तुझा पाठीराखा आहे
तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो.
6 दिवसा सूर्य तुला दु:ख पोहोचवणार नाही.
आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.
7 परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील.
परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील.
8 परमेश्वरा तुला जाण्या-येण्यात मदत करील.
परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे दाविदाचेस्तोत्र.
122 “आपण परमेश्वराच्या मंदिरात जाऊ या,”
असे लोक म्हणाले तेव्हा मी खूप आनंदात होतो.
2 आपण इथे आहोत.
यरुशलेमच्या दरवाजात उभे आहोत.
3 हे नवीन यरुशलेम आहे.
हे शहर पुन्हा एक एकत्रित शहर म्हणून वसवण्यात आले.
4 कुटुंबांचे जथे जिथे जातात ती हीच जागा.
इस्राएलचे लोक तिथे परमेश्वराच्या नावाचे गुणगान करण्यासाठी जातात.
ही कुटुंबे देवाची आहेत.
5 राजांनी त्या ठिकाणी लोकांना न्याय देण्यासाठी सिंहासने मांडली.
दावीदाच्या वंशातील राजांनी आपली सिंहासने त्या ठिकाणी मांडली.
6 यरुशलेममध्ये शांती नांदावी म्हणून प्रार्थना करा.
“जे लोक तुझ्यावर प्रेम करतात त्यांना इथे शांती मिळेल,
7 अशी मी आशा करतो.
तुझ्या चार भिंतींच्या आत शांती असेल अशी मी आशा करतो.”
8 तुझ्या मोठ्या इमारतीत, सुरक्षितता असेल अशी मी आशा करतो”.
माझ्या भावांच्या आणि शेजाऱ्यांच्या भल्यासाठी तिथे शांती नांदो अशी मी आशा करतो.
9 आपला देव, आपला परमेश्वर, त्याच्या मंदिराच्या भल्यासाठी
या शहरात चांगल्या गोष्टी घडाव्यात अशी मी प्रार्थना करतो.
2006 by World Bible Translation Center