M’Cheyne Bible Reading Plan
अथल्या यहूदामध्ये राजाच्या सर्व मुलांचा वध करते
11 अथल्या ही अहज्याची आई. आपला मुलगा मरण पावला हे पाहिल्यावर ती उठली आणि सर्व राजघराण्याची तिने हत्या केली.
2 यहोशेबा ही राजा योरामची मुलगी आणि अहज्याची बहीण. योवाश हा राजाच्या अनेक मुलांपैकी एक. इतर मुलांची हत्या होत असताना यहोशेबाने योवाशला बाजूला घेतले आणि आपल्या झोपायच्या खोलीत लपवून ठेवले. तिने योवाश आणि त्याची दाई यांना लपवले. यहोशेबा आणि ती दाई यांनी योवाशला अथल्याच्या तावडीतून सोडवले म्हणून तो मारला गेला नाही.
3 योवाश आणि यहोशेबा मग परमेश्वराच्या मंदिरात लपून राहिले. योवाश तिथे सहा वर्षे राहिला. यहूदावर अथल्याचे राज्य होते.
4 सातव्या वर्षी महायाजक यहोयादाने अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. परमेश्वराच्या मंदिरात त्या सगळ्यांना बोलावले आणि यहोयादाने त्यांच्याशी एक करार करुन त्यांच्याकडून शपथ घेतली मग योवाश या राजपुत्राला त्यांच्यापुढे आणले.
5 यहोयादाने त्यांना एक आज्ञा केली. तो म्हणाला, “तुम्हाला आता मी सांगतो तसे करायचे आहे. प्रत्येक शब्बाथला तुमच्यापैकी एकतृतीयांश लोकांनी आत यायचे. राजाचे त्याच्या घरात तुम्ही संरक्षण करायचे. 6 दुसऱ्या एकतृतीयांश लोकांच्या गटाने सूर वेशीवर थांबायचे आणि तिसऱ्या एकतृतीयांश गटाने पहारेकऱ्यांच्या मागे राहायचे. योवाशच्या मागे तुमची अशी संरक्षक भिंत होईल. 7 प्रत्येक शब्बाथ दिवसाच्या अखेरीला तुमच्यापैकी दोनतृतीयांश लोक परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करतील आणि राजा योवाशला संरक्षण देतील. 8 राजा योवाश जिथे जिथे जाईल तिथे तिथे सर्ववेळ तुम्ही त्याच्याबरोबर राहिले पाहिजे. तुम्ही त्याच्याभोवती कडे करावे. प्रत्येक पहारेकऱ्याच्या हातात शस्त्र असेल आणि कोणीही आपल्या फार जवळ आल्यास तुम्ही त्याला मारुन टाकावे.”
9 याजक यहोयाद याने ज्या ज्या आज्ञा दिल्या त्या सर्वांचे त्या अधिकाऱ्यांनी पालन केले. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या माणसांना बरोबर घेतले. एका गटाने शनिवारी राजाचे रक्षण करावयाचे होते. आठवड्यातले इतर दिवस बाकीचे गट ते काम करणार होते. हे सर्व लोक यहोयादाकडे गेले. 10 यहोयादाने भाले आणि ढाली अधिकाऱ्यांच्या हवाली केल्या. दावीदाने परमेश्वराच्या मंदिरात ठेवलेली शस्त्रे ती हीच. 11 मंदिराच्या डाव्या टोकापासून उजव्या टोकापर्यंत हे रखवालदार हातात आपापली शस्त्रे घेऊन उभे राहिले. ते वेदी आणि मंदिर यांच्याभोवती तसेच राजा मंदिरात येई तेव्हा त्याच्या भोवती उभे राहात.
12 या सर्वांनी योवाशला बाहेर काढले. त्याला त्यांनी मुकुट घातला आणि राजा व देव यांच्यातील करारलेख त्याला दिला. मग त्यांनी त्याला अभिषेक केला व राजा केले मग टाळ्यां वाजवून त्यांनी “राजा चिरायु होवो” म्हणून जयघोष केला. 13 हुजऱ्यांचा आणि लोकांचा हा गलबला राणी अथल्याच्या कानावर गेला. तेव्हा ती परमेश्वराच्या मंदिरापाशी गेली.
14 राजाची रीतीप्रमाणे स्तंभाजवळ उभे राहायची जी जागा तिथे अथल्याने राजाला उभे असलेले पाहिले. नेते आणि लोक कर्णे वाजवीत आहेत हे ही तिने पाहिले. लोकांना खूप आनंद झालेला आहे हे तिच्या लक्षात आले. कर्ण्यांचा आवाज ऐकून तिने नाराजी प्रदर्शित करण्याकरता आपली वस्त्रे फाडली आणि ती “फितुरी! फितुरी!” म्हणून ओरडू लागली.
15 हुजऱ्यांवरील अधिकाऱ्यांना याजक यहोयादाने आज्ञा दिली, “अथल्याला मंदिराच्या आवाराबाहेर काढावे. तिच्या अनुयायांचा वध करावा. मात्र परमेश्वराच्या मंदिरात तो करु नये.”
16 पहारेकऱ्यांनी मग तिला पकडले आणि घोडे ज्या दारातून आत येत असत त्या दाराने तिला बाहेर काढून तिचा त्यांनी वध केला.
17 यहोयादाने नंतर परमेश्वर, राजा आणि लोक यांच्यात करार केला. राजा आणि लोक या दोघांवरही परमेश्वराची सत्ता आहे असे त्या करारात होते. यहोयादाने या खेरीज राजा आणि लोक यांच्यातही एक करार केला. राजाची लोकांबाबत असलेली कर्तव्ये त्यात होती. तसेच लोकांनी राजाचे आज्ञापालन आणि अनुयायित्व करावे असे ही त्यात म्हटले होते.
18 या नंतर लोक बाल या देवतेच्या देवळात गेले. त्यांनी बालच्या मूर्तीची तसेच तेथील वेद्यांची नासधूस, मोडतोड केली. त्यांचे तुकडेतुकडे केले बालचा याजक मत्तान याला वेद्यांसमोरच लोकांनी ठार केले.
याजक यहोयाद याने परमेश्वराच्या मंदिरावर पहारेकरी नेमले. 19 सर्व लोकांना घेऊन तो परमेश्वराच्या मंदिराकडून राजाच्या निवासस्थानी गेला. राजाचे विशेष सुरक्षा सैनिक आणि अधिकारी राजाबरोबर होते. त्यांच्यापाठोपाठ बाकीचे लोक गेले. राजमहालाच्या प्रवेशद्वारापर्यंत ते गेले. राजा योवाश मग सिंहासनावर बसला. 20 लोक आनंदात होते आणि नगरात शांतता नांदत होती. महालाजवळच राणी अथल्या तलवारीने मारली गेली.
21 योवाश राजा झाला तेव्हा सात वर्षांचा होता.
योवाशच्या सत्तेची सुरुवात
12 येहू इस्राएलचा राजा झाल्याच्या सातव्या वर्षी योवाश (म्हणजेच यहोआश) याच्या सत्तेला सुरवात झाली. योवाशने येरुशलेममध्ये चाळीस वर्षे राज्य केले. योवाशच्या आईचे नाव सिब्या, ती बैर-शेबा इथली होती. 2 योवाशचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने उचित असेच होते. त्याने आयुष्यभर परमेश्वराचे ऐकले. याजक यहोयाद याने शिकवले तसे तो वागत होता. 3 पण उंचवट्यावरील पुजास्थळांना त्याने धक्का लावला नाही. लोक यज्ञ करायला, धूप जाळायला तिथे जातच राहिले.
मंदिर दुरुस्तीची योवाशची आज्ञा
4-5 योवाश याजकांना म्हणाला, “परमेश्वराच्या मंदिराची आर्थिक स्थिती चांगली आहे. लोकांनी मंदिराला बरेच काही दिले आहे. शिरगणती झाली तेव्हा लोकांनी कर भरला. केवळ इच्छेखातरही लोकांनी पैसे दिले. तुम्ही याजकांनी आता त्या पैशाचा विनियोग परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी करायला हवा. प्रत्येक याजकाने आपापल्या यजमानांकडून मिळालेले पैसे या कामी वापरले पाहिजेत. परमेश्वराच्या मंदिरात काही मोडतोड झाली असेल तर या पैशातून तिची दुरुस्ती व्हावी.”
6 तरीही याजकांनी काहीही सुरु केले नाही. योवाशचे राजा म्हणून तेविसावे वर्ष चालू होते तोपर्यत याजकांनी मंदिराची दुरुस्ती केलेली नव्हती. 7 तेव्हा मात्र योवाशने यहोयाद आणि आणखी काही याजक यांना बोलावणे पाठवले. त्यांना तो म्हणाला, “अजूनही तुमच्या हातून मंदिराची दुरुस्ती का झाली नाही? आता आपापल्या लोकांकडून पैसे घेणे आणि ते पैसे वापरणे बंद करा. त्या पैशाचा विनियोग मंदिराच्या दुरुस्तीसाठीच झाला पाहिजे.”
8 याजकांनी लोकांकडून पैसे घेण्याचे थांबवण्याबद्दल आपली सहमती दर्शवली खरी पण मंदिराची दुरुस्ती करायची नाही असेही ठरविले. 9 तेव्हा यहोयाद या याजकाने एक पेटी घेतली आणि तिच्या झाकणाला एक भोक ठेवले. ही पेटी त्याने वेदीच्या दक्षिण बाजूला ठेवली. लोक परमेश्वराच्या मंदिरात शिरल्याबरोबर ती पेटी दाराशीच होती. काही याजक उंबरठ्यापाशीच असत आणि लोकांनी परमेश्वराला वाहिलेले पैसे ते उचलून या पेटीत टाकत.
10 मग लोकही मंदिरात आल्यावर पेटीतच पैसे टाकत. राजाचा चिटणीस आणि मुख्य याजक अधून मधून येत आणि पेटीत बरेच पैसे साठलेले दिसले की ते पैसे काढून घेत. थैल्यांमध्ये भरुन ते मोजत. 11 मग दुरुस्तीचे काम करणाऱ्या मजुरांना ते पैसे देत. त्यात सुतार होते तसेच परमेश्वराच्या मंदिराचे काम करणारे इतर गवंडीही होते. 12 दगड फोडणारे, दगडाचे घडीव चिरे बनवणारे यांना देण्यासाठी तसेच लाकूड विकत घेणे दगड घडणे आणि दुरुस्तीचे इतर सामान विकत घेण्यासाठी हे पैसे वापरले जात.
13-14 लोक परमेश्वराच्या मंदिरासाठी पैसे देत. पण याजकांना ते चांदीची उपकरणी, कातऱ्या, वाडगे, कर्णे, सोन्या-चांदीची तबके यासाठी वापरता येत नव्हते, तर कारागिरांनाच ते पैसे दिले जात. त्या पैशाने ते मंदिराची दुरुस्ती करत. 15 कोणीही त्या पैशाची मोजदाद केली नाही की त्या पैशाचा हिशोब कारगिरांना विचारला नाही इतके ते कारागीर विश्वासू होते.
16 आपल्याहातून घडलेल्या अपराधांचे, पापांचे परिमार्जन व्हावे यासाठी अर्पणे करण्यासाठी लोक येत तेव्हा ते पैसे देत, पण हा पैसा कारागिरांना देण्यासाठी वापरला जात नसे. तो याजकांचा होता.
योवाश हजाएलपासून यरुशलेमचे रक्षण करतो
17 हजाएल अरामचा राजा होता. तो गथवर स्वारी करुन गेला. गथचा त्याने पाडाव केला आणि तो यरुशलेमवर चढाई करायचा विचार करु लागला.
18 योवाशच्या आधी त्याचे पूर्वज यहोशाफाट, यहोराम आणि अहज्या हे यहूदाचे राजे होते. त्यांनी परमेश्वराला बऱ्याच गोष्टी अर्पण केल्या होत्या. त्या मंदिरातच होत्या. योवाशनेही बरेच काही परमेश्वराला दिले होते. योवाशने ती सर्व चीजवस्तू, घरातील तसेच मंदिरातील सोने बाहेर काढले. या मौल्यवान गोष्टी त्याने अरामचा राजा हजाएल याला पाठवल्या. यरुशलेमला त्यांची भेट झाली. हजाएलने त्या शहराविरुध्द लढाई केली नाही.
योवाशचा मृत्यू
19 यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात योवाशच्या थोर कृत्यांची नोंद आहे.
20 योवाशच्या कारभाऱ्यांनी योवाशाविरुध्द कट केला. शिल्ला येथे जाणाऱ्या रस्तावरील मिल्लोच्या घरात त्यांनी योवाशचा वध केला. 21 शिमाथचा मुलगा योजारवार आणि शोमरचा मुलगा यहोजाबाद हे योवाशचे कारभारी होते. त्यांनी हे कृत्य केले.
दावीद नगरात लोकांनी योवाशला त्याच्या पूर्वजांसमवेत पुरले. योवाशचा मुलगा अमस्या त्याच्यानंतर राज्य करु लागला.
ख्रिस्त येशूचा एकनिष्ठ सैनिक
2 माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो. 2 माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांवर सोपवून दे. 3 ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने आपल्या दु:खाचा सहभागी बनून राहा. 4 सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे. 5 जर कोणी मैदानी स्पर्धेत भाग घेतो तर नियमाप्रमाणे स्पर्धेत घेतल्याशिवाय त्याला विजयाचा मुकुट मिळविता येत नाही. 6 अति श्रम करणारा शेतकरी हा पहिल्या फळाचा वाटा घेणारा असावा. 7 मी काय म्हणतो याविषयी तू विचार करावा अशी माझी इच्छा आहे. प्रभु तुला या सर्व गोष्टी समजून घेण्याचे सामर्थ्य देईल.
8 येशू ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठला व दाविदाचा वंशज आहे त्याची आठवण करीत राहा. जी सुवार्ता मी सांगतो तिचा हा गाभा आहे.
9 कारण सुवार्तेमुळे मी दु:ख सहन करतो. येथपर्यंत की, गुन्हेगाराप्रमणे साखळदंडानी मला बांधण्यात आले. पण देवाचे शिक्षण बांधले गेले नाही. 10 म्हणून, देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्व काही सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व अनंतकाळचे गौरव प्राप्त व्हावे.
11 येथे एक विश्वसनीय सत्य आहे:
जर आम्ही त्याच्यासह मेलेले आहोत.
तर त्याच्याबरोबर जीवंतही राहू
12 जर आम्ही दु:खसहन केले
तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू
जर आम्ही त्याला नाकारले
तर तोही आम्हाला नाकारील
13 जरी आम्ही अविश्वासू आहोत
तरी तो अजूनही विश्वासू आहे
कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही.
मान्य सेवक
14 लोकांना या गोष्टीची आठवण करुन देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दांविषयी भांडू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. फक्त जे ऐकतात त्यांचा ते नाश करते. 15 देवाने पसंत केलेला व देवाचे वचन योग्य रीतीने शिकवण्यास पात्र असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नसलेला असा देवाने पसंत केलेला कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
16 पण ऐहिक वादविवाद टाळ कारण ते लोकांना देवापासून अधिकाधिक दूर नेतात. 17 आणि अशा प्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हुमनाय आणि फिलेत आहेत, 18 जे सत्यापासून दूर गेले आहेत. ते म्हणतात की, मरणानंतरचे सर्व लोकांचे पुनरुत्थान आधीच झाले आहे व ते काही लोकांच्या विश्वासाचा नाश करीत आहेत.
19 तथापि देवाने घातलेला भक्कम पाया त्यावर असलेला शिक्का यासह स्थिर राहतो. “प्रभु जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो.” [a] “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने वाईटापासून वळलेच पाहिजे.”
20 मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनविलेलीही असतात. काही प्रतिष्ठेच्या कामात वापरण्यासाठी असतात तर दुसरी काही कनिष्ठ प्रतीच्या कामी वापरण्यासाठी नेमलेली असतात. 21 म्हणून जर मनुष्य या अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करील तर तो मानसन्मानस योग्य असे भांडे होईल व धन्यासाठी प्रत्येकसमर्पित कामासाठी पवित्र केलेले व उपयुक्त पात्र होईल.
22 पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीति आणि शांति यांच्या मागे लाग. 23 नेहमी मूर्ख व निरर्थक अशा वादविवादापासून दूर राहा. कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात. 24 देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी दयाधर्माने वागावे तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. 25 जे त्याला विरोध करतात, त्यांना विनयाने शिक्षण द्यावे या आशेने की देवाने त्यांना पश्चात्ताप करण्यास सहाय्य करावे आणि त्यांना सत्याची ओळख व्हावी. 26 ते शुद्धीवर यावेत व सैतानाच्या सापळ्यांतून जेथे सैतानाने त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी ठेवले आहे, तेथून त्यांची सुटका व्हावी.
होशेय गोमरला विकत घेऊन गुलामगिरीतून परत आणतो
3 मग परमेश्वर पुन्हा मला म्हणाला, “गोमरला खूप प्रियकर आहेत पण तू तिच्यावर प्रेम करीत राहिलेच पाहिजे. का? कारण परमेश्वर तसेच करतो. परमेश्वर इस्राएल लोकांवर सतत प्रेम करतो, पण ते लोक मात्र इतर दैवतांची पूजा करीत राहतात. त्यांना मनुकांच्या ढेपा खाणे आवडते.”
2 म्हणून मी सहा औस चांदी व 9 बुशेल जव देऊन गोमरला विकत घेतले. 3 मग मी तिला म्हणालो, “खूप दिवस तू माझ्याबरोबर घरात राहिले पाहिजेस. तू वेश्येप्रमाणे वागता कामा नयेस. तू दुसऱ्या पुरुषाबरोबर जाणार नाहीस. मीच तुझा पती असेन.”
4 ह्याचप्रमाणे, पुष्कळ दिवस इस्राएली लोकांना राजावाचून वा नेत्यावाचून काळ कंठावा लागेल. त्यांना बळी, स्मृतिशिळा, एफोद वा घराण्याचा देव यांच्यावाचून राहावे लागेल. 5 ह्यानंतर इस्राएलचे लोक परत येतील. मग ते परमेश्वराला म्हणजेच त्यांच्या देवाला आणि दीवीदाला म्हणजेच त्यांच्या राजाला शोधतील. शेवटच्या दिवसांत, ते परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आदर करतील.
परमेश्वर इस्राएलवर रागावला आहे
4 इस्राएलच्या लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका! ह्या देशात राहणाव्या लोकांविरुध्द परमेश्वर आपले म्हणणे मांडणार आहे. “ह्या देशातील लोकांना परमेश्वराची खरीखुरी ओळख नाही. ते सत्याने वागत नाहीत आणि परमेश्वराशी एकनिष्ठ नाहीत. 2 लोक शपथ घेतात, खोटे बोलतात, ठार मारतात आणि चोरी करतात ते व्यभिचाराचे पाप करतात आणि त्यांना मुले होतात ते पून्हा पून्हा खून करतात. 3 म्हणून देश, मृतासाठी शोक करणाव्या माणसाप्रमाणे झाला आहे. देशातील सर्व लोक दुर्बल झाले आहेत. रानातील प्राणी, आकाशातील पक्षी आणि समुद्रातील मासेसुध्दा मरत आहेत. 4 कोणीही दुसऱ्याशी वाद घालू नये वा दुसऱ्याला दोष देऊ नये. हे याजका! माझा वाद तुझ्याबरोबर आहे. [a] 5 तुम्ही (याजक) दिवसा-ढवव्व्या पडाल आणि रात्री, तुमच्याबरोबर संदेष्टे पडतील. मी तुमच्या आईचा नाश करीन.
6 “माझ्या लोकांचा अज्ञानामुळे नाश झाला. तुम्ही शिकण्याचे नाकारले आहे. म्हणून मी तुम्हाला माझ्या सेवेत याजक होण्यास नकार देईन. तुम्ही तुमच्या देवाचा नियम विसरलात, म्हणून मी तुमच्या मुलांना विसरेन. 7 ते गर्विष्ठ झाले, त्यांनी माझ्याविरुद्ध खूप पाप केले. म्हणून मी त्यांचे वैभवाचे लाजिरवाण्या स्थितीत रूपांतर करीन.
8 “लोकांच्या पापांमध्ये याजक सहभागी झाले. त्यांना ती पापे आणखी पाहिजे आहेत. 9 म्हणजेच याजक लोकांपेक्षा वेगळे नाहीत. त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन. त्यांच्या चुकांची मी परतफेड करीन. 10 ते खातील, पण त्यांची तृप्ती होणार नाही. ते व्यभिचाराचे पाप करतील, पण त्यांना मुले होणार नाहीत. का? कारण त्यांनी परमेश्वराचा त्याग केला आणि वेश्येप्रमाणे वर्तन केले.
11 “व्यभिचार, कडक पेय, व नवीन मद्य माणसाची सरळ विचार करण्याची ताकद नष्ट करतील. 12 माझी माणसे लाकडाच्या तकड्यांना सल्ला विचारीत आहेत. त्यांना वाटते की त्या काटक्या त्यांना उत्तर देतील. का? कारण ते वेश्यांप्रमाणे त्या खोट्या देवाच्या मागे धावले. त्यांनी त्यांच्या देवाचा त्याग केला व ते वेश्येप्रमाणे वागले. 13 पर्वतमाथ्यांवर ते बळी द्तात आणि डोंगरांवर अल्लोन लिबने व एला या वृक्षांखाली धूप जाळतात. ह्या वृक्षांची छाया चांगली असते. म्हणून तुमच्या मुली त्या वृक्षांखाली वेश्यांप्रमाणे झोपतात, आणि तुमच्या सुना व्यभिचाराचे पाप करतात.
14 “मी तुमच्या मुलींनी वेश्या झाल्याबद्दल वा तुमच्या सुंनाना व्यभिचाराचे पाप केल्याबरोबर झोपतात. ते मंदिरातील कलावंतिणीबरोबर बळी अर्पण करतात. म्हणजेच ते मूर्ख लोक स्वतःचाच नाश करून घेत आहेत.
इस्राएलाची लज्जास्पद पापे
15 “इस्राएल, तू वेश्येप्रमाणे वागतेस. पण यहूदाला अपराध करु देऊ नयेस. तू गिल्गालला किंवा वर बेथ-आवेनला जाऊ नकोस. वचने देताना परमेश्वराच्या नावाचा उपयोग करु नकोस ‘परमेश्वराशपथ’ असे म्हणू नकोस. 16 परमेश्वराने इस्राएलला खूप गोष्टी दिल्या आहेत. खूप गवत असलेल्या विस्तीर्ण कुरणात आपल्या मेंढ्यांना घेऊन जाणाव्या मेंढपाळाप्रमाणे परमेश्वर आहे. पण इस्राएल पुन्हा पुन्हा पळून जाणाव्या कालवडीप्रमाणे हट्टी आहे.
17 “एफ्राईमने त्याच्या मूर्तोशी हातमिळवणी केली आहे. तेव्हा त्याला ऐकटा ठेवा. 18 एफ्राईम त्यांच्या धुंदीत सामील झाला आहे. मद्यपान केल्यानंतर ते वेश्यांप्रमाणे वागत आहेत. ते आपल्या प्रियकरांकडून लाजिरवाण्या भेटी मागतात. 19 ते संरक्षणासाठी त्या दैवतांजवळ गेले आणि त्यांनी आपली विचार करण्याची शक्ती गमावली. त्यांनी अर्पण केलेले बळी त्यांना नामुष्कीच आणतात.
ऐन
121 जे योग्य आहे आणि चांगले आहे तेच मी केले परमेश्वरा,
ज्या लोकांना मला त्रास द्यायची इच्छा आहे त्याच्या हाती मला सोडून देऊ नको.
122 माझ्याशी चांगला वागशील असे मला वचन दे.
परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
त्या गर्विष्ठ लोकांना मला त्रास द्यायला लावू नकोस.
123 परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि
तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत.
124 मी तुझा सेवक आहे.
मला तुझे खरे प्रेम दाखव. मला तुझे नियम शिकव.
125 मी तुझा सेवक आहे,
मला समजून घ्यायला मदत कर म्हणजे मला तुझा करार समजू शकेल.
126 परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे.
लोकांनी तुझे नियम मोडले आहेत.
127 परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला
तुझ्या आज्ञा आवडतात.
128 मी काळजी पूर्वक तुझ्या सर्व आज्ञा पाळतो. [a]
मला खोटी शिकवण आवडत नाही.
पे
129 परमेश्वरा, तुझा करार अद्भुत आहे
म्हणूनच मी तो पाळतो.
130 जेव्हा लोक तुझा शब्द समजून घ्याला सुरुवात करतात तेव्हा
ते त्यांना योग्य तऱ्हेने जीवन कसे जगायचे ते सांगणाऱ्या प्रकाशासारखे असते.
तुझे शब्द अगदी साध्या लोकांना देखील शहाणे करतात.
131 परमेश्वरा, मला खरोखरच तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायचा आहे.
मी जोर जोरात श्वासोच्छवास करणाऱ्या
आणि अधीरतेने वाट बघणाऱ्या माणसासाखा आहे.
132 देवा, माझ्याकडे बघ आणि माझ्याशी दयाळूपणे वाग.
जे लोक तुझ्या नावावर प्रेम करतात त्यांच्यांसाठी योग्य गोष्टी कर.
133 परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे मला मार्गदर्शन कर.
माझे काहीही वाईट होऊ देऊ नकोस.
134 परमेश्वरा, जे लोक मला त्रास देतात त्यांच्यापासून मला वाचव
आणि मी तुझ्या आज्ञा पाळीन.
135 परमेश्वरा, तुझ्या सेवकाचा स्वीकार कर
आणि मला तुझे नियम शिकव.
136 लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत
म्हणून मी अश्रूंच्या नद्या वाहवल्या आहेत.
त्सादे
137 परमेश्वरा, तू चांगला आहेस
आणि तुझे नियम योग्य आहेत.
138 तू आम्हाला करारात चांगले नियम दिलेस
त्यावर आम्ही खरोखरच विश्वास ठेवू शकतो.
139 माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत.
माझे शत्रू तुझ्या आज्ञा विसरले म्हणून मी फारच अस्वस्थ झालो आहे.
140 परमेश्वरा, आम्ही तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो
याबद्दलचा पुरावा आमच्याजवळ आहे आणि मला ते आवडते.
141 मी एक तरुण आहे आणि लोक मला मान देत नाहीत.
पण मी तुझ्या आज्ञा विसरत नाही.
142 परमेश्वरा, तुझा चांगलुपणा सदैव राहो
आणि तुझ्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणे शक्य आहे.
143 माझ्यावर खूप संकटे आली आणि
वाईट वेळाही आल्या परंतु मला तुझ्या आज्ञा आवडतात.
144 तुझा करार नेहमीच चांगला असतो.
तो समजण्यासाठी मला मदत कर म्हणजे मी जगू शकेन.
2006 by World Bible Translation Center