M’Cheyne Bible Reading Plan
येहूचा अभिषेक करण्याचा अलीशाचा एका संदेष्ट्याच्या मुलाला आदेश
9 अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्याला म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ गिलाद येथे जा. 2 तेथे पोचल्यावर निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याला शोधून काढ. मग आत जाऊन त्याला त्याच्या भावांमधून उठवून आतल्या खोलीत ने. 3 त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!”
4 तेव्हा हा तरुण संदेष्टा रामोथ गिलाद येथे आला 5 तेथे पोचल्यावर त्याला सैन्यातील सरदार बसलेले आढळले. त्यांना तो म्हणाला, “तुमच्यासाठी एक निरोप आहे.”
येहू म्हणाला, “आम्ही सर्वच इथे आहोत. निरोप नक्की कुणासाठी आहे?”
तेव्हा तो तरुण म्हणाला, “हे सरदारा, तुझ्याशीच; माझे काम आहे.”
6 यावर येहू उठून घरात आला. त्या तरुण संदेष्ट्याने त्याच्या मस्तकावर तेलाचा अभिषेक केला. येहूला तो म्हणाला, “इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, ‘इस्राएलचा पुढचा राजा म्हणून मी तुला अभिषेक करत आहे. 7 तुमचा राजा अहाब याच्या घराण्याचा तू संहार करावास. अशा तऱ्हेने मी माझे सेवक, संदेष्टे, परमेश्वराचे सर्व सेवक यांच्या वधाचा सूड घेऊन ईजबेलला शासन करणार आहे. 8 म्हणजे अहाबचे घराणे नष्ट होईल. अहाबच्या घराण्यात एकही पुरुष संतान जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम. 9 नबाटचा मुलगा यराबाम तसेच अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यासारखी अहाबच्या घराण्याची मी गत करुन टाकीन. 10 ईजबेलला इज्रेल भागात कुत्री खातील. तिचे दफन होणार नाही.’”
एवढे बोलून हा तरुण संदेष्टा दार उघडून पळून गेला.
येहूला राजा म्हणून सेवक घोषित करतात
11 येहू पुन्हा राजाच्या सरदारांमध्ये आला. तेव्हा त्यांच्यातला एकजण म्हणाला, “येहू, सर्व कुशल आहे ना? तो वेडा तुझ्याकडे कशाला आला होता?”
येहू त्यांना म्हणाला, “तो माणूस आणि त्याच वेडपट बोलणं तुम्हाला माहीत आहेच.”
12 तेव्हा ते सर्व म्हणाले, “नाही, नाही खर काय झाल ते सांग. काय म्हणाला तो?” तेव्हा मग तो तरुण संदेष्टा काय म्हणाला ते येहूने सरदारांना सांगितले. येहू म्हणाला, “तो मला म्हणाला, ‘इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराच्या सांगण्यावरुन मी तुला अभिषेक करत आहे.’”
13 हे ऐकून मात्र त्यांनी ताबडतोब आपले अंगरखे उतरवले, येहूच्या समोरच्या पायऱ्यांवर ते ठेवले आणि शिंग फुंकून येहू राजा झाला असल्याची घोषणा केली.
येहू इज्रेल येथे जातो
14 निमशीचा मुलगा यहोशाफाट याचा मुलगा येहू याने योरामविरुध्द कट रचला.
यावेळी, अरामचा राजा हजाएल याच्यापासून रामोथ-गिलादचे संरक्षण करण्यासाठी योराम सर्व इस्राएलांसह झटत होता. 15 राजा योरामने हजाएलशी झुंज घेतली होती. पण अरामी लोकांनी योरामला जायबंदी केले होते तेव्हा जखमा भरुन येण्यासाठी तो इज्रेलला गेला होता.
तेव्हा येहू त्या सगळ्या सरदारांना म्हणाला, “नवीन राजा म्हणून मला तुमची मान्यता असेल तर ही बातमी नगरातून इज्रेलमध्ये जाऊ देऊ नका.”
16 योराम इज्रेलमध्ये आराम करत होता. येहू रथात बसून इज्रेलला गेला. यहूदाचा राजा अहज्या देखील तेव्हा योरामला भेटायाला इज्रेलला आला होता.
17 इज्रेलमध्ये बुरुजावर एक पहारेकरी होता. त्याने येहूला मोठ्या जमावानिशी येताना पाहिले. तो म्हणाला, “मोठाच जमाव दिसतोय”
योरामने त्याला सांगितले, “कोणाला तरी घोड्यावरुन त्यांच्याकडे पाठव ते सद्भावाने येत आहेत का ते त्या स्वाराला विचारायला सांग.”
18 तेव्हा एक सेवक घोड्यावरुन येहूला सामोरा गेला. राजा योरामच्या वतीने त्याने येहूला विचारले, “तुमचे येणे शांततेचे आहे ना?”
येहू त्याला म्हणाला, “शांतीशी तुला कर्तव्य नाही. असा माझ्या मागोमाग ये.”
पहरेकऱ्याने योरामला सांगितले, “आपला तिकडे पाठवलेला माणूस अजून परत आलेला नाही.”
19 तेव्हा योरामने दुसऱ्या घोडेस्वाराला पाठवले, तो येहू कडे आला आणि राजा योरामच्या वतीने सलोख्याचे अभिवादन केले.
येहू म्हणाला, “तुला सलोख्याशी काय करायचे आहे? असा माझ्या मागोमाग ये?”
20 पहारेकऱ्याने योरामला सांगितले, “संदेश घेऊन गेलेला दुसरा माणूसही परत आलेला नाही. रथ चालवणारा तर वेड्यासारखा भरधाव रथ हाकतो आहे. निमशीचा मुलगा येहू याच्यासारखीच पध्दत आहे.”
21 योरामने मग स्वतःचा रथ तयार ठेवण्यास सांगितले.
तेव्हा सेवकाने योरामचा रथ आणला. इस्राएलचा राजा योराम आणि यहूदाचा राजा अहज्या या दोघांनी आपापले रथ येहूच्या दिशेने पळवले. इज्रेलचा नाबोथ याच्या शेतात त्यांची येहूशी गाठ पडली.
22 येहूला पाहून योरामने त्याला विचारले, “येहू तू शांततेसाठीच आला आहेस ना?”
येहू म्हणाला, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार आणि चेटके चालू असेपर्यंत कसली आली आहे शांतता?”
23 योरामने ताबडतोब आपले घोडे वळवले आणि पळ काढण्याच्या तयारीत तो अहज्याला म्हणाला, “अहज्या, दगा आहे.”
24 पण येहूने सर्व शक्तीनिशी धनुष्य ओढून योरामचा बरोबर दोन बाहुंच्यामध्ये वेध घेतला. बाण योरामच्या हृदयातून आरपार गेला. योराम रथात मरुन पडला.
25 येहूने आपल्या रथाचा सारथी बिदकर याला सांगितले, “योरामचा मृतदेह उचल आणि तो इज्रेलचा नाबोथ ह्याच्या शेतात फेकून दे आपण दोघे, योरामचा बाप अहाब याच्याबरोबर बसून चाललो होतो तेव्हा हे असे घडणार असे परमेश्वराने सांगितले होते, ते आठवते ना? 26 परमेश्वर म्हणाला होता, ‘नाबोथ आणि त्याची मुले यांचे रक्त काल मला दिसले, तेंव्हा या शेतात मी अहाबला शिक्षा करीन.’ प्रत्यक्ष परमेश्वरच असे म्हणाला. तेव्हा उचल तो मृतदेह आणि परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे दे टाकून त्या शेतात!”
27 यहूदाचा राजा अहज्या याने ते पाहिले आणि तेथून पळ काढला. मळ्यातल्या एका घराच्या बाजूने तो गेला. येहूने त्याचा पाठलाग केला. येहू म्हणाला, “अहज्याचाही वध करा.”
तेव्हा येहूच्या माणसांनी अहज्याला इब्लाम जवळच्या गूरच्या रस्त्यावर जखमी केले. तेव्हा अहज्या मगिद्दोकडे पळाला पण तिथेच मरण पावला. 28 अहज्याच्या चाकरांनी त्याचा मृतदेह रथातून यरुशलेम येथे आणला. त्याचे त्यांनी दावीद नगरात त्याच्या पूर्वजांशेजारी दफन केले.
29 योरामचे इस्राएलचा राजा म्हणून अकरावे वर्ष चालू असताना अहज्या यहूदाचा राजा झाला होता.
ईजबेलचा निघृण वध
30 येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली. 31 येहूने नगरात प्रवेश केला. ईजबेल म्हणाली, “काय रे जिम्री? त्याच्या सारखेच तू ही आपल्या स्वामीला मारलेस!”
32 येहूने वर खिडकीकडे पाहात म्हटले, “माझ्या बाजूने कोण आहे? बोला!”
तेव्हा खिडकीतून दोन तीन खोजांनी त्याच्याकडे पाहिले. 33 येहू त्यांना म्हणाला, “त्या ईजबेलला खाली फेका.”
तेव्हा त्या खोजांनी ईजबेलला खाली फेकून दिले. भिंतीवर आणि घोड्यांवर तिचे रक्त उडाले. घोडे तिच्यावरुन चालून गेले. 34 येहू घरात शिरला आणि त्याने फराळाच्या पदार्थांचा समाचार घेतला. मग तो म्हणाला, “आता त्या शापित बाईला घ्या व तिचे दफन करा कारण ती राजकन्या होती.”
35 लोक तिला पुरायला पुढे झाले पण त्यांना तिच्या देहाचा पत्ता लागला नाही. फक्त तीचे शिर, पाय आणि हाताचे तळवे सापडले. 36 तेव्हा लोकांनी येऊन येहूला हे सांगितले. येहू त्यांना म्हणाला, “आपला सेवक एलिया तिश्बी याच्या मार्फत परमेश्वराने हेच सांगितले होते. एलिया म्हणाला होता. ‘इज्रेलच्या परिसरात ईजबेलचा देह कुत्री खातील. 37 शेणखता सारखा तिचा देह इज्रेलच्या भूमीवर पडेल. लोकांना तिचे प्रेत ओळखू येणार नाही.’”
Special Instructions for Slaves
6 जे सर्व गुलाम म्हणून विधर्मी मालकाच्या जुवाखाली काम करीत आहेत त्यांनी त्यांच्या मालकांना पूर्ण आदर देण्यायोग्य समजावे. यासाठी की देवाच्या नावाची आणि आमच्या शिक्षणावर अशीतशी टीका होणार नाही. 2 व ज्या गुलामांचे मालक विश्वासणारे आहेत, त्यांनी त्यांच्या मालकांना कमी मान देऊ नये. कारण वस्तुस्थिती अशी आहे की, ते मालक त्यांचे बंधू आहेत, उलट त्या गुलामांनी त्यांच्या मालकांची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करावी. कारण ज्यांना लाभ मिळतो ते विश्वासणारे व प्रियजन आहेत.
या गोष्टी लोकांना शिकीव व बोध करुन तसे करायला सांग.
खोटे शिक्षण आणि खरी संपत्ती
3 जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभु याची जी निकोप वचने आणि देवाच्या सेवेचे खरे शिक्षण मान्य करीत नाही 4 तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्याला काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क 5 आणि ज्यांची मने डागाळलेली आणि सत्यापासून हिरावलेली आहेत अशा माणसांची सततची भांडणे होतात, त्यांना असे वाटते की, देवाची सेवा करणे हे श्रीमंत होण्याचे माध्यम आहे.
6 वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे. 7 कारण आपण जगात काहीही आणले नाही म्हणून आपण हे ओळखावे की, आपणसुद्धा या जगातून काहीही बाहेर घेऊन जाऊ शकणार नाही. 8 जर आपणांस अन्न, वस्त्र (आसरा) असेल तर त्यामध्ये आपण संतुष्ट असावे. 9 पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते मोहात आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक वासनांच्या आहारी जाऊन नाश पावतात. 10 कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची इच्छा धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दु:ख करून घेतले आहे.
तू लक्षात ठेवाव्यास अशा काही गोष्टी
11 पण देवाच्या माणासा, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्याचीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रेम, सहनशीलता, आणि लीनता यासाठी जोराचा प्रयत्न कर. 12 विश्वासाच्या चांगल्या स्पर्धेत टिकून राहा. ज्यासाठी तुला बोलाविले होते. त्या अनंतकाळच्या जीवनाला दृढ धर. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस 13 जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो. 14 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या समयापर्यत निष्कलंक आणि दोषरहित राहावे म्हणून ही आज्ञा पाळ. 15 जो धन्य, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभु ह्या धन्यवादिताच्या निर्णयानुसार, योग्य समय आल्यावर हे घडवून आणील. 16 ज्या एकालाच अमरत्व आहे, ज्यापर्यंत पोहोंचता येणार नाही अशा प्रकाशात राहतो. ज्याला कोणीही पाहिले नाही किंवा पाहू शकत नाही, त्याला सन्मान आणि अनंतकाळचे सामर्थ्य असो.
17 या युगातील श्रीमंतांस आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवितो त्यावर आशा ठेवावी. 18 चांगले करण्याची त्यांना आज्ञा कर. चांगल्या कृत्यात धनवान आणि उदार असावे. व स्वतःजवळ जे आहे त्यात इतरांबरोबर सहभागी होण्याची इच्छा असावी. 19 असे करण्याने ते स्वतःसाठी स्वर्गीय धनाचा साठा करतील जो भावी काळासाठी भक्कम पाया असे होईल त्यामुळे त्यांना खऱ्या जीवनाचा ताबा मिळेल.
20 तिमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “ज्ञान” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी विश्वासापासून दूर जा. 21 ज्यांनी हा दावा केला ते या “विद्येमुळे” विश्वासाच्या खुणेपासून ढळले आहेत.
देवाची कृपा तुम्हांबरोबर असो.
परमेश्वराचा होशेयतर्फे संदेश
1 बैरीचा मुलगा होशेय याला परमेश्वराचा संदेश आला, त्या वेळेस उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते. व योवाशाचा मुलगा यराबाम इस्राएलावर राज्य करीत होता.
2 हा होशेयला आलेला परमेश्वराचा पहिलाच संदेश होता. परमेश्वर म्हणाला, “जा आणि वेश्येशी लग्न कर. तिला मुले होऊ देत. का? कारण ह्या देशातील लोक वेश्येप्रमाणेच वागले आहेत. त्यांनी परमेश्वराचा विश्वासघात केला आहे.”
इज्रेलचा जन्म
3 म्हणून होशयने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. तिला दिवस गेले व तिला मुलगा झाला. 4 परमेश्वराने होशेयला सांगितले, “या मुलाचे नाव इज्रेल ठेव. का? कारण लवकरच, येहू घराण्याने इज्रेल दरीत जो रक्तपात केला, त्याबद्दल मी त्यांना शिक्षा करणार आहे. मग मी इस्राएल राष्टांचा शेवट करीन. 5 त्या वेळी मी इज्रेल दरीत, इस्राएलाचे धनुष्य मोडीन.”
लो-रूहामाचा जन्म
6 मग गोमरला पुन्हा दिवस गेले. ह्या खेपेस तिने एका मुलीला जन्म दिला. परमेश्वर होशेयला म्हणाला, “तिचे नाव लो-रूहामा ठेव. का? कारण मी यापुढे इस्राएल राष्टाला अजिबात दया दाखविणा नाही. मी त्यांना क्षमा करणार नाही. 7 पण मी यहूदावर दया करीन. मी यहूदा राष्टाला वाचवीन, त्यांना वाचविण्यासाठी मी धनुष्य नाही. किंवा तलवार, यांचा उपयोग करणार नाही. मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर त्यांना तारीन.”
लो-अम्मीचा जन्म
8 मग लो-रूहमेचे दूध तुटल्यावर गोमरला पुन्हा दिवस गेले या खेपेला तिने एका मुलाला जन्म दिला. 9 परमेश्वराने त्या मुलाचे नाव “लो-अम्मी ठेवण्यास सांगितले. का? कारण तुम्ही माझे लोक नव्हेत व मी तुमचा परमेश्वर नाही.”
इस्राएल लोकांच्या बहुसंख्यत्वाविषयी परमेश्वराने वचन
10 “भविष्यकाळात, समुद्रकाठच्या वाळूच्या कणांप्रमाणे इस्राएली लोक असतील. तुम्ही वाळू मापू वा मोजू शकत नाही. मग ‘तुम्ही माझे लोक नव्हत’ असे ज्यांना म्हणण्यात आले, ‘त्याऐवजी त्यांना तुम्ही जिवंत परमेश्वराची लेकरे आहात.’ असे म्हणण्यात येईल.
11 “मग यहूदाचे व इस्राएलचे लोक एकत्र येतील. ते त्यांच्यासाठी एक राजा निवडतील. त्याचे राष्ट भूप्रदेशापेक्षा खूपच मोठे असेल. तेव्हा इज्रेलचा दिवस खरोखर चांगला असेल.”
योद
73 परमेश्वरा, तूच मला निर्माण केलेस
आणि तू मला तुझ्या हाताचा आधार देतोस.
तुझ्या आज्ञा शिकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मला मदत कर.
74 परमेश्वरा, तुझे भक्त मला पाहातात आणि मला मान देतात.
तू जे सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो म्हणून ते आनंदी आहेत.
75 परमेश्वरा, तुझे निर्णय योग्य असतात हे मला माहीत आहे
आणि तू मला शिक्षा केलीस तेही योग्यच होते.
76 आता तुझ्या खाऱ्या प्रेमाने माझे सांत्वन कर.
तू वचन दिल्याप्रमाणे माझे सांत्वन कर.
77 परमेश्वरा, माझे सांत्वन कर आणि मला जगू दे.
मला तुझी शिकवण मनापासून आवडते.
78 जे लोक स्वत:ला माझ्यापेक्षा चांगले समजतात त्यांनी माझ्याविषयी खोटं सांगितलं त्या लोकांना आता लाज वाटेल अशी मी आशा करतो.
परमेश्वरा, मी तुझ्या कराराचा अभ्यास करतो.
79 तुझे भक्त माझ्याकडे परत येतील अशी मी आशा करतो.
म्हणजे मग ते तुझ्या कराराचा अभ्यास करु शकतील.
80 परमेश्वरा, मला तुझ्या आज्ञा पूर्णपणे पाळू दे.
म्हणजे मला लाज वाटणार नाही.
काफ
81 परमेश्वरा, तू माझा उध्दा्र करशील म्हणून वाट बघता बघता मी आता मरुन जाणार आहे.
पण परमेश्वरा, तू जे सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.
82 तू ज्या गोष्टींचे वचन दिले होतेस त्या शोधता शोधता माझे डोळे अगदी थकून गेले आहेत.
परमेश्वरा, तू कधी माझे सांत्वन करणार आहेस?
83 मी जरी उकिरड्यावरच्या द्राक्षारसाच्या बुधलीसारखा झालो असलो
तरी मी तुझे नियम विसरणार नाही.
84 मी किती काळ जगणार आहे?
परमेश्वरा, जे लोक मला तुरुंगात माझा छळ करतात.
त्यांना तू कधी शिक्षा करणार आहेस?
85 काही गर्विष्ठ लोकांनी खोटे बोलून माझ्या शरीरात सुरा खुपसला
आणि ते तुझ्या शिकवणी विरुध्द आहे.
86 परमेश्वरा, लोक तुझ्या सगळ्या आज्ञांवर विश्वास ठेवू शकतात.
माझ्यावर खटला भरण्याची चूक त्यांनी केली.
मला मदत कर.
87 त्या लोकांनी जवळ जवळ माझा सर्वनाश केला.
पण मी तुझ्या आज्ञा पाळणे बंद केले नाही.
88 परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव आणि मला जगू दे.
तू जे सांगशील ते मी करेन.
लामेद
89 परमेश्वरा, तुझा शब्द सदैव चालू असतो.
तुझा शब्द स्वर्गात सदैव चालू असतो.
90 तू सदा सर्वदा इमानदार असतोस, परमेश्वरा.
तू पृथ्वी निर्माण केलीस आणि ती अजूनही आहे.
91 तुझ्या नियमांमुळे ती अजूनही आहे
आणि ती गुलामाप्रमाणे तुझे नियम पाळते.
92 जर तुझी शिकवण मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटली नसती
तर माझ्या दु:खाने माझा सर्वनाश झाला असता.
93 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा कधीच
विसरणार नाही कारण त्यांनी मला जगू दिले.
94 परमेश्वरा, मी तुझा आहे म्हणून माझा उध्दार कर.
का? कारण तुझ्या आज्ञा पाळण्याची मी शिकस्त करतो.
95 दुष्टांनी माझा नाश करायचा प्रयत्न केला.
पण तुझ्या कराराने मला शहाणे बनवले.
96 तुझ्या नियमांखेरीज इतर गोष्टींना मर्यादा असतात.
2006 by World Bible Translation Center