M’Cheyne Bible Reading Plan
अलीशा आणि कुऱ्हाड
6 एकदा संदेष्ट्याची मुले अलीशाला म्हणाली, “आम्ही राहतो ती जागा आम्हाला अपुरी पडते. 2 यार्देन नदीवर जाऊन आम्ही लाकूड तोडून आणतो. एकेकजण एकेक ओंडका आणू आणि आमच्यासाठी तिथे राहायला घर बांधू.”
अलीशा म्हणाला, “छान, जा आणि कामाला लागा.”
3 एकजण म्हणाला, “आमच्याबरोबर चला.”
अलीशा म्हणाला, “ठीक आहे, येतो.”
4 तेव्हा अलीशा त्या संदेष्ट्यांच्या मुलांबरोबर गेला. ते यार्देन नदी जवळ आले आणि झाडे तोडायला लागले. 5 झाड पाडत असताना एकाचे लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले. तेव्हा तो ओरडला, “स्वामी, मी तर ही कुऱ्हाड उसनी मागून आणली होती.”
6 अलीशाने विचारले, “ती पडली कुठे?”
तेव्हा त्याने, लोखंडी कुऱ्हाडीचे पाते पडले ती जागा दाखवली. अलीशाने मग एक काठी घेतली आणि ती त्या जागी पाण्यात टाकली. त्याबरोबर ते पाते काठीबरोबर तरंगत वर आले. 7 अलीशा म्हणाले, “घे ते पाते उचलून.” मग त्या माणसाने पुढे होऊन पाते उचलले.
आरामच्या राजाचा इस्राएलच्या राजावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न
8 अरामच्या राजाची इस्राएलशी लढाई चाललेली असताना त्याने आपल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांची एक सभा बोलावली. राजा म्हणाला, “अमुक ठिकाणी दबा धरुन बसा आणि इस्राएली लोक येतील तेव्हा त्यांच्यावर हल्ला करा.”
9 पण संदेष्टा अलीशा याने इस्राएलच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, “सावधगिरीने वागा. त्या ठिकाणी जाऊ नका. तेथे अरामी सैन्य लपून बसले आहे.”
10 ज्या जागेबद्दल अलीशाने सावधगिरीचा इषारा दिला त्या ठिकाणच्या आपल्या माणसांना इस्राएलच्या राजाने तसा निरोप पाठवला आणि बऱ्याच जणांचे प्राण वाचवले.
11 या गोष्टीचा अरामच्या राजाला धक्का बसला. त्याने पुन्हा आपल्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “इस्राएलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा.”
12 तेव्हा त्या अधिकाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, “स्वामी, आमच्यापैकी कोणीही हेर नाही. इस्राएलचा तो संदेष्टा अलीशाच त्यांच्या राजाला अनेक गुपिते सांगतो. अगदी तुमच्या शयनगृहात चाललेले बोलणे देखील!”
13 तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “कुठे आहे तो अलीशा. त्याला पकडायला मी माणसे पाठवतो!”
तेव्हा अरामच्या राजाच्या सेवकांनी त्याला, अलीशा दोथानमध्ये असल्याचे सांगितले.
14 मग अरामच्या राजाने घोडे, रथ आणि बरेचसे सैन्य दोथान कडे रवाना केले. ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला. 15 अलीशाचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो, रथघोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले.
अलीशाचा सेवक अलीशाला म्हणाला, “स्वामी, आता आपण काय करायचे?”
16 अलीशा म्हणाला, “घाबरु नको! अरामच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य किती तरी मोठे आहे!”
17 आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “परमेश्वरा, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्याला नीट दिसेल.”
परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्याला अलीशाच्या भोवती अग्नीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले.
18 हे अग्नीरथ आणि अग्नीचे घोडे खाली अलीशाजवळ उतरले. अलीशाने परमेश्वराची प्रार्थना करुन म्हटले, “तू या लोकांना आंधळे करुन टाकावेस अशी मी तुला विनंती करतो.”
अलीशाच्या या विनंतीनुसार परमेश्वराने अरामी सैन्याला आंधळे केले. 19 अलीशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, “हा रस्ता बरोबर नाही तसेच तुम्हाला हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो माणूस मी तुम्हाला दाखवतो.” अलीशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले.
20 ते शोमरोन येथे आले तेव्हा अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड.”
परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनमध्ये असल्याचे कळले. 21 इस्राएलच्या राजाने हे अरामी सैन्य पाहिले. राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी यांना मारु का? त्यांना ठार करु का?”
22 अलीशा म्हणाला, “नाही, यांना मारु नको. लढाईत ज्यांना पकडून आणले त्यांना तलवारीने किंवा धनुष्यबाणाने मारायचे नसते. या अरामी सैन्याला खायला प्यायला दे. थोडी भाकर आणि पाणी दे मग त्यांना आपल्या धन्याकडे परत जाऊ दे.”
23 इस्राएलच्या राजाने या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मग त्या अरामी सैन्याचे खाणे पिणे झाल्यावर राजाने त्यांना परत पाठवले. ते सैन्य आपल्या राजाकडे परत आले. मग पुन्हा अरामी सैन्याची धाड इस्राएलवर आली नाही.
शोमरोन मधील भयंकर दुष्काळ
24 या नंतर, अरामचा राजा बेन-हदाद याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि शोमरोन नगराला वेढा दिला. 25 या सैन्याने नगरात अन्न धान्य जाऊ देण्यास बंदी घातली. त्यामुळे शोमरोनमध्ये लोकांची अन्नान्न दशा झाली. गाढवाचे मुंडके ऐंशी रौप्यमुद्रांना आणि कबुतराची विष्ठा पाच रौप्यमुद्रांना विकली जाऊ लागली इतकी लोकांवर वाईट वेळ आली.
26 असे चाललेले असताना इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन चालला होता. तेव्हा एका बाईने त्याला मोठ्याने हाक मारली आणि सांगितले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरुन मला मदत करा!”
27 इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाही तर मी कशी तुला मदत करु? माझ्या जवळ तुला देण्यासारखे काहीच नाही ना खळ्यांतले धान्य, ना द्राक्षकुंडातील द्राक्षारस.” 28 मग त्याने तिच्या समस्येविषयी विचारपूस केली.
ती म्हणाली, “ही बाई मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला मारुन खाऊ मग उद्या आपण माझा मुलगा खाऊ.’ 29 तेव्हा माझ्या मुलाला मारुन त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे त्याला आपण खाऊ.’ पण तिने आपल्या मुलाला लपवून ठेवले आहे.”
30 बाईचे हे बोलणे ऐकून राजा इतका व्यथित झाला की दु:खाच्या भरात त्याने आपले कपडे फाडले. तो तिथून पुढे गेला तेव्हा त्याने आतून जाडेभरडे कपडे घातलेले लोकांनी पाहिले. तेव्हा तो दु:खी आणि उदास आहे हे लोकांच्या लक्षात आले.
31 राजा म्हणाला, “आज दिवस मावळे पर्यंत शाफाटचा मुलगा अलीशा याचे मस्तक त्याच्या धडावर राहिले तर परमेश्वर मला हवे ते शासन करो!”
32 राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडीलधारी मंडळी त्याच्या बैठकीत बसली होती. हा दूत तेथे पोंचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांना म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा दार लावून घ्या. त्याला अजिबात आत येऊ देऊ नका. त्याच्या मागोमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहूल मला लागली आहे!”
33 अलीशा हे बोलत असतानाच दूत त्याच्या जवळ आला. त्याने निरोप दिला “हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे. आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहू?”
मंडलीतील पुढारी
3 हे सत्य वचन आहे: जर कोणी (मंडळीत) अध्यक्ष [a] (सर्वांगीण काळजीवाहक) होण्याची इच्छा धरतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो. 2 आता अध्यक्षाने (सर्वागीण काळजीवाहकाने) त्याचे जीवन लोकांनी टीका करु नये अशा रीतीने जगावे. त्याला एकच पत्नी असावी. 3 तो मद्य पिणारा नसावा, तो हिंसक वृत्तीचा नसावा तर तो सभ्य, आत्मसंयमी, आदरणीय, व आदरातिथ्य करणारा असावा. तो शिकविण्यात प्रवीण असावा. 4 तो पैशावर प्रेम करणारा नसावा. त्याने त्याच्या कुटुंबाचा चांगला पुढारी असावे आणि त्याने त्याची लेकरे त्याच्या आज्ञेत ठेवावीत. 5 जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करता येत नसेल तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल?
6 तो ह्या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून जाणार नाही. व सैतानाला जशी शिक्षा झाली तशी शिक्षा होऊन त्याचा अंत होणार नाही. 7 आणखी म्हणजे बाहेरच्या लोकांमध्ये त्याचे चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये. व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये
मंडळीत सेवाकार्य करणारे
8 त्याचप्रमाणे, विशेष मदतनीस [b] आदरणीय असावेत, ते दुटप्पी नसावेत, ते विश्वसनीय असावेत. ते अति मद्यपान करणारे व दुतोंडे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी. 9 देवाने जे आम्हांला प्रकट केले आहे ते आमच्या विश्वासाचे सखोल सत्य त्यांनी स्वच्छ विवेकाने धरून ठेवावे. 10 वडीलांप्रमाणे यांचीसुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग जर त्यांच्या विरुद्ध असे आढळले नाही, तर त्यांनी मदतनीसाचे काम करावे.
11 त्याचमप्रमाणे, [c] (विशेष मदतनीस) स्रियांनीही आदरणीय असावे. त्या चुगलखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात.
12 जे खास मदतनीस आहेत त्यांना फक्त एकच पत्नी असावी. आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी. 13 कारण मदतनीस म्हणून जे चांगली सेवा करतात, ते त्यांच्यासाठी आदरणीय स्थान मिळवितात आणि ख्रिस्त येशूमध्ये त्यांच्या विश्वासात महान आत्मविश्वास मिळवितात.
आपल्या जीवनाचे रहस्य
14 मी तुझ्याकडे लवकरच येण्याची इच्छा धरून असलो तरी मी तुला या गोष्टी लिहीत आहे. 15 यासाठी की, जरी मला उशीर झाला तरी देवाच्या घरात म्हणजे जिवंत देवाच्या मंडळीत एखाद्या व्यक्तीने कसे वागावे हे तुला माहीत असावे. ती मंडळी सत्याचा खांब व पाया अशी आहे. 16 आणि आपल्या सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे:
तो मानवी शरीरात दिसला;
आत्म्याने तो नीतिमान ठरविला गेला,
देवतूतांनी त्याला पाहीले होते;
राष्ट्रांमध्ये तो गाजविला गेला.
जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला
आणि स्वर्गामध्ये तो गौरवाने घेतला गेला.
दानीएलला हिद्देकेल नदीकाठी झालेला दृष्टान्त
10 कोरेश पारसचा राजा होता कोरेश राजाच्या कारकिर्दोच्या तिसऱ्या वर्षो, दानीएलला पुढील गोष्टीविषयी कळले. (दानीएलचे दुसरे नाव बेल्टशस्सर असे होते.) ह्या गोष्टी सत्य होत्या परंत समजण्यास कठीण होत्या.पण दानीएलला त्या समजल्या. दृष्टान्तामध्ये त्याला त्या समजावून सांगितल्या गेल्या.
2 दानीएल म्हणतो, त्या वेळी मी, दानीएल, तीन आठवडे, खूप दुःखी होतो. 3 त्या तीन आठवड्यांमध्ये मी आवडते जेवण केले नाही मांस अजिबात खाल्ले नाही, मी मद्य प्यायलो नाही, स्वतःला तेल लावले नाही तीन आठवडे मी असे केले.
4 वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या 24 व्या दिवशी मी हिद्देकेल नदीकाठी उभा असताना. 5 मी वर पाहिले, तर माझ्यासमोर एक माणूस उभा होता. त्याने तागाचे कपडे घातले होते उफाजमधील सोन्याचा कमरपट्टा त्याने बांधला होता. 6 त्याचा देह चकचकीत दगडासारखा होता. त्याचा चेहरा विद्युतलतेप्रमाणे चमकत होता त्याचे हात व पाय चमक दिलेल्या पितळाप्रमाणे होते. त्याचा आवाज लोकांच्या कोलहलाप्रमाणे मोठा होता.
7 दुष्टान्त पाहणारा मी, दानीएल, एकटाच होतो माझ्याबरोबरच्या लोकांना दृष्टान्त दिसला नाही. पण तरीही ते घाबरले. ते इतके घाबरल, की दूर पळून जाऊन लपून बसले. 8 मग मी एकटाच उरलो. मी दृष्टान्त पाहात होतो. त्या दृष्टान्ताने मी सुध्दा घाबरलो. माझा धीर खचला. मृत माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे माझा चेहरा पांढराफटक पडला, मी असहाय झालो. 9 मग मी दृष्टान्तातील त्या माणसाला बोलताना ऐकले त्याचा आवाज ऐकताना, मला गाढ झोप लागली मी जमिनीवर पालथा पडलो होतो.
10 मग मला एका हाताचा स्पर्श जाणवला. तो स्पर्श होताच मी हात गुडघे ह्यावर भार टाकून ओणवा झालो मी इतका घाबरलो होतो की थरथर कापत होतो. 11 दृष्टान्तातील माणस मला म्हणाला, “दानीएला, देव तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्याशी बोलेन त्यावर काळजीपूर्वक विचार कर. उभा राहा मला तुझ्याकडेच पाठविले आहे. तो असे म्हणताच मी उभा राहिलो भीतीमुळे अजूनही मी थरथर कापत होतो. 12 मग दृष्टान्तातील माणस पुन्हा बोलू लागला तो म्हणाला, “दानीएला, घाबरू नकोस ज्या दिवसापासून तू ज्ञान मिळविण्याचे व देवापुढे नम्र होण्याचे ठरविलेस, त्या दिवसापासून तो तुझी प्रार्थना ऐकत आहे. तू प्रार्थना करीत असल्यामुळेच मी तुझ्याकडे आलो. 13 पण पारसचा राजपुत्र (देवदूत) 21 दिवस माझ्याशी लढत होता व मला त्रास देत होता. पण महत्वाच्या राजपुत्रांपैकी (देवदूतांपैकी) एक मिखाएल माझ्या मदतीला आला. कारण मी तेथे अडकुन पडलो होतो 14 भविष्यात तुझ्या लोकांच्या बाबतीत काय घडणार आहे, हे तुला समजावून सांगायला मी येथे आलो आहे. दानीएला, हा दृष्टान्त भविष्यकाळासंबंधी आहे.”
15 तो माणूस माझ्याशी बोलत असताना, मी खाली वाकून जमिनीवर डोके टेकविले. मी बोलू शकत नव्हतो. 16 मग माणसाप्रमाणे दिसणाऱ्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला मग मी तोंड उघडले व बोलू लागलो. माझ्यासमोर उभ्या असणाऱ्याला मी म्हणालो, “महाराज दृष्टान्तात मी जे काही पाहिले, त्याने मी अस्वस्थ झालो आहे आणि घाबरलो आहे मी असहाय आहे. 17 महाराज, मी दानीएल तुमचा सेवक. मी तुमच्याशी कसा बोलू शकेन? माझा धीर खचला आहे व वास घेणेही मला कठीण आहे.”
18 माणसाप्रमाणे दिसणाऱ्याने मला पुन्हा स्पर्श केला त्या स्पर्शाने मला शक्ती आली. 19 मग तो म्हणाला, “दानीएला घाबरू नकोस, देवाचे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुला शांती लाभो! धीर धर! धीर धर!”
“त्याच्या बोलण्याने मला धीर आला मग मी म्हणालो, महाराज तुम्ही मला धीर दिलात आता तुम्ही बोलू शकता.”
20 मग तो म्हणाला, “दानीएला, मी तुझ्याकडे का आलो, तुला माहीत आहे का? लवकरच पारसच्या राजपुत्राशी (देवदूताशी) लढायला मला परत गेले पाहिजे. मी जाईल तेव्हा ग्रीसचा राजपुत्र (देवदूत) येईल. 21 पण दानीएल, जाण्याआधी. प्रथम सत्याच्या ग्रंथात काय लिहिले आहे ते मी तुला सांगितले पाहिजे, त्या दुष्ट देवदूतांच्या विरोधात माझ्या बाजूने मीखाएलशिवाय कोणीही उभा राहणार नाही. मीखाएल तुझ्या लोकांवर राज्य करणारा राजपुत्र (देवदूत) आहे.
आलेफ
119 शुध्द आयुष्य जगणारे लोक सुखी आहेत.
ते लोक परमेश्वराची शिकवण पाळतात.
2 जे लोक परमेश्वराचा करार पाळतात ते सुखी आहेत.
ते परमेश्वराच्या आज्ञा मनापासून पाळतात.
3 ते लोक वाईट गोष्टी करीत नाहीत.
ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात.
4 परमेश्वरा, तू आम्हाला तुझ्या आज्ञा दिल्यास
आणि त्या आज्ञा पूर्णपणे पाळायला तू आम्हाला सांगितलेस.
5 परमेश्वरा, मी जर नेहमी तुझे नियम पाळले.
6 तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन
तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही.
7 मी जेव्हा तुझा चांगलुपणा आणि
न्यायीपणा यांचा अभ्यास करीन तेव्हा मी तुला खरोखरच मान देईन.
8 परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञा पाळेन.
तेव्हा कृपाकरुन मला सोडून जाऊ नकोस.
बेथ
9 तरुण माणूस शुध्द आयुष्य कसे जगू शकेल?
तू दिलेली शिकवण आचरणात आणून.
10 मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो.
देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर.
11 मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो. का?
म्हणजे मी तुझ्याविरुध्द पाप करणार नाही.
12 परमेश्वरा, तुझे कल्याण असो
मला तुझे नियम शिकव.
13 मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयांबद्दल बोलेन.
14 तुझ्या कराराचा अभ्यास करणे
मला इतर कशाही पेक्षा आवडते.
15 मी तुझ्या नियमांबद्दल चर्चा करेन.
मी तुझी जीवन जगण्याची पध्द्त आचरेन.
16 मला तुझे नियम आवडतात.
मी तुझे शब्द विसरणार नाही.
गीमेल
17 माझ्याशी, तुझ्या सेवकाशी चांगला वाग, म्हणजे मी जिवंत राहू शकेन.
आणि तुझ्या आज्ञा पाळू शकेन.
18 परमेश्वरा, माझे डोळे उघड मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे.
आणि तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे.
19 मी या देशात परका आहे.
परमेश्वरा, तुझी शिकवण माझ्या पासून लपवू नकोस.
20 तू घेतलेल्या निर्णयांचा
मला सतत अभ्यास करावासा वाटतो.
21 परमेश्वरा, तू गर्विष्ठ लोकांवर सदैव टीका करतोस.
त्यांचे वाईट होईल ते तुझ्या आज्ञा पाळायचे नाकारतात.
22 मला शरम वाटू देऊ नकोस.
मला लाज आणू नकोस.
मी तुझा करार पाळला आहे.
23 नेते सुध्दा माझ्या विषयी वाईट बोलतात.
पण परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे
आणि मी तुझ्या नियमांचा अभ्यास करतो.
24 तुझा करार माझा सर्वांत चांगला मित्र आहे.
तो मला चांगला उपदेश करतो.
2006 by World Bible Translation Center