Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 राजे 5

नामानची समस्या

नामान हा अरामच्या राजाचा सेनापती होता. तो राजाच्या लेखी फार महत्वाचा माणूस होता कारण त्याच्या मार्फतच परमेश्वर अरामाच्या राजाला विजय मिळवून देत असे. नामान चांगला शूर वीर होता खरा, पण त्याला कोड होते.

अरामी सैन्याच्या बऱ्याच फौजा इस्राएलमध्ये लढाईवर गेल्या होत्या, तेथून त्या सैनिकांनी बरेच लोक गुलाम म्हणून धरुन आणले होते. एकदा त्यांनी इस्राएलमधून एक लहान मुलगीही आणली. ती पुढे नामानच्या बायकोची दासी झाली. ती नामानच्या बायकोला म्हणाली, “आपल्या मालकांनी शोमरोनमधला संदेष्टा अलीशा याला भेटावे असे मला वाटते. तो यांचे कोड बरे करु शकेल.”

नामान मग अरामच्या राजाकडे गेला. त्याने राजाला ही इस्राएलची मुलगी काय म्हणाली ते सांगितले.

त्यावर राजा म्हणाला, “तू आत्ताच जा. इस्राएलच्या राजासाठी मी पत्र देतो.”

तेव्हा नामान इस्राएलला निघाला. आपल्याबरोबर त्याने नजराणा घेतला. साडेसातशे पौंड चांदी, सहा हजार सुवर्णमुद्रा आणि दहा वस्त्रांचे जोड घेतले. आपल्या राजाकडून त्याने इस्राएलच्या राजासाठी पत्रही घेतले. पत्रात म्हटले होते: “आणि पत्रास कारण की माझ्या सेवेतील नामान याला तुमच्याकडे पाठवत आहे. त्याचे कोड बरे करावे.”

इस्राएलच्या राजाने हे पत्र वाचले तेव्हा आपण दु:खी आणि हतबल झालो आहोत हे दाखवण्यासाठी त्याने आपले कपडे फाडून घेतले. तो म्हणाला, “मी परमेश्वर आहे की काय? छे छे! जीवन आणि मृत्यू यावर माझी सत्ता नाही. असे असताना अरामच्या राजाने कोड असलेल्या माणसाला उपचारासाठी माझ्याकडे का बरे पाठवावे? तसा विचार केला तर यात काही तरी कारस्थान दिसते. अरामचा राजा काही तरी कुरबूर सुरु करायच्या विचारात आहे!”

राजाचे हे दु:खाने कपडे फाडणे आणि अस्वस्थ होणे संदेष्टा अलीशाच्या कानावर गेले. त्याने मग राजाला निरोप पाठवला, “तू कपडे का फाडलेस? (तू एवढा दु:खी का होतोस?) नामानला माझ्याकडे येऊ दे म्हणजे इस्राएलमध्ये संदेष्टा असल्याचे त्याला कळेल.”

तेव्हा नामान आपले रथ, घोडे यांसह अलीशाच्या घराशी आला आणि दाराबाहेर थांबला. 10 अलीशाने नोकरा मार्फत नामानला निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देन नदीच्या प्रवाहात सात वेळा स्नान कर म्हणजे तुझी त्वचा रोगमुक्त होईल. तू निर्मळ, नितळ होशील.”

11 नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “मला वाटले, अलीशा निदान बाहेर येईल, माझ्या समोर येऊन उभा राहील. त्याच्या परमेश्वर देवाचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवील आणि मला बरे करील. 12 अबाना आणि परपर या दिमिष्कातील नद्या इस्राएलमधील पाण्यापेक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यातच स्नान करुन मी शुध्द का होऊ नये?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला.

13 पण नामानचे नोकर त्याच्या पाठोपाठ गेले आणि त्यांनी त्याला समजावले. ते म्हणाले. “स्वामी, संदेष्ट्याने तुम्हाला एखादी मोठी गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती नाही का? मग एखादी साधीशी बाब तुम्ही ऐकायलाच हवी नाही का? ‘आंघोळ कर.’ त्याने तू स्वच्छ, निर्दोष होशील एवढेच तर त्याने सांगितले.”

14 तेव्हा नामानने अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे केले. यार्देन नदीत त्याने सात वेळा बुडी मारुन स्नान केले. त्याने तो स्वच्छ, नितळ झाला. त्याची त्वचा लहान बाळासारखी कोमल झाली.

15 नामान आणि त्याच्या बरोबरचे लोक अलीशा संदेष्ट्याकडे आले. त्याच्यासमोर उभे राहून म्हणाले, “इस्राएल मधल्या खेरीज दुसरा कोणी परमेश्वर पृथ्वीतलावर नाही हे आता मला कळले. माझ्याकडून कृपया, ही भेट घ्यावी.”

16 पण अलीशा त्यांना म्हणाला, “मी परमेश्वराचा सेवक आहे आणि त्याची शपथ घेऊन सांगतो, मी कोणतीही भेट वगैरे घेणार नाही.”

आपल्या भेटीचा स्वीकार करावा म्हणून नामानने अलीशाला परोपरीने विनवले पण अलीशाचा नकारच होता. 17 तेव्हा नामान म्हणाला, “माझ्या कडून तुम्ही भेट तर घेत नाहीच. मग एवढे करावे. माझ्या दोन खेचरावर लादून नेता येईल इतकी इस्राएलची माती नेण्याची मला मुभा द्यावी. [a] म्हणजे मी यापुढे दुसऱ्या कोणत्याही दैवतांना होमबली अर्पण करणार नाही. फक्त परमेश्वरासाठीच यज्ञ करीन. 18 आणखी एका गोष्टीसाठी परमेश्वराने मला क्षमा करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. अरामचा राजा माझा स्वामी, रिम्मोनच्या खोट्या दैवतांच्या पूजेला जातील. ते माझा आधार मागतील तेव्हा मला ही तिथे नमन करावे लागले असे झाले असता परमेश्वराने मला क्षमा करावी, माझी ही विनंती आहे.”

19 तेव्हा अलीशाने नामानला निर्धास्तपणे जायला सांगून निरोप दिला.

मग नामान तिथून निघाला आणि थोडा पुढे गेला असेल तेवढ्यात 20 अलीशाचा नोकर गेहजी याला वाटले, “पाहा, माझ्या धन्याने या अरामच्या नामानला तसेच, त्याच्या कडून भेट न स्वीकारता जाऊ दिले. मीच आता धावत जाऊन त्याला गाठतो आणि काहीतरी पदरात पाडून घेतो.” 21 आणि गेहजी नामानच्या मागे निघाला.

नामानने आपल्या मागून कोणाला तरी पळत येताना पाहिले. तेव्हा तो रथातून उतरला. त्याला गेहजी दिसला. नामान म्हणाला, “सगळे ठीक आहे ना?”

22 गेहजी म्हणाला, “हो, तसे सगळे ठीक आहे. माझे स्वामी अलीशा यांनी मला पाठवले आहे. त्यांनी सांगितले आहे, ‘एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातून संदेष्ट्यांची दोन तरुण मुले आमच्याकडे आली आहेत. तेव्हा त्यांना पंचाहत्तर पौंड चांदी आणि दोन वस्त्रांचे जोड द्या.’”

23 नामान म्हणाला, “जरुर, ही घ्या दीडशे पौंड चांदी.” नामानने गेहजीला ती चांदी घ्यायला लावली. नामानने ती दीडशे पौंड चांदी दोन थैल्यांमध्ये भरली आणि दोन वस्त्रांचे जोड घेतले. मग या वस्तू आपल्या दोन नोकरांच्या हवाली करुन गेहजीकडे त्या पोचवायला सांगितल्या. 24 डोंगराशी आल्यावर गेहजीने नोकरांकडून ते सर्व घेतले आणि त्यांना परत पाठवले. नोकर माघारी आले. गेहजीने मग हा ऐवज आपल्या घरात लपवला.

25 गेहजी आला आणि आपले स्वामी अलीशा यांच्यासमोर उभा राहिला अलीशाने गेहजीला विचारले, “तू कुठे गेला होतास?”

गेहजी म्हणाला, “मी कुठेच गेलो नव्हतो.”

26 अलीशा त्याला म्हणाला, “हे खरे नव्हे, नामान तुला भेटायला आपल्या रथातून उतरला तेव्हा माझे ह्दय तुझ्यापाशीच होते. पैसाअडका, कपडेलत्ते जैतूनाची फळे, द्राक्षे, शेळ्या, गायी, किंवा दास दासी भेटी दाखल घेण्याची ही वेळ नव्हे. 27 नामानचा रोग आता तुला आणि तुझ्या मुलांना होईल. तुमच्यावर हे कोड सतत राहिल.”

अलीशाकडून गेहजी निघाला तेव्हा त्याची त्वचा बर्फासारखी पांढरी शुभ्र झाली होती. गेहजीला कोड उठले होते.

1 तीमथ्याला 2

पुरुष आणि स्त्रियांसाठी काही नियम

सर्वांत प्रथम मी कळकळीने विनंति करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व माणसांच्या वतीने करावे. आणि विशेषतः राजांच्या वतीने करावे आणि अधिकाऱ्याच्या वतीने करावे. प्रार्थना करा की, आम्हांला स्थिर, शांत आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,

ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. कारण फक्त एकच देव आहे. आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे: तो म्हणजे ख्रिस्त येशू जो स्वतःमनुष्य होता. सर्व लोकांच्या पापांची खंडणी म्हणून त्याने स्वतःला दिले. अशा प्रकारे देवाच्या योजनेविषयी त्याने योग्य वेळी साक्ष दिली. आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित (मी खरे सांगतो, खोटे सांगत नाही!) असा विदेशी लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले.

Special Instructions for Men and Women

म्हणून प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. ते प्रार्थना करीत असताना त्यांनी आपले हात उंचवावेत, जे देवाला पवित्र असे आहेत. व असे न रागावता व न भांडण करता करावे.

त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला साध्यासुध्या वेशाने, नम्रतेने, मर्यादेने, शोभित करावे. त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या केसरचना करु नयेत. तसेच सोने, किंवा मोती किंवा महाग कपडे वापरु नयेत. 10 उलट देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांनी स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करणे अगदी योग्य आहे.

11 स्त्रीने शांतपणे, पूर्ण अधीनतेने शिकावे. 12 मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत राहावे. 13 मी असे म्हणतो, कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला. 14 त्यानंतर हवा. आदाम फसविला गेला नाही तर स्त्री फसविली गेली. आणि ती पापात पडली. 15 परंतु स्त्रिया जर विश्वास, प्रीती, पवित्रता व योग्य आत्मसंयमनात राहिल्या तर बालकाला जन्म देण्यामुळे त्यांचे तारण होईल.

दानीएल 9

दानीएलची प्रार्थना

दारयावेश राजाच्या कारकिर्दोच्या पहिल्या वर्षातच ह्या गोष्टी घडल्या. दारयावेश हा अहश्वेरोशाचा मुलगा होता. तो मेदी वंशातील होता. तो बाबेलचा राजा झाला. दारयावेश गादीवर बसला,त्या वर्षो मी, दानीएल काही ग्रंथ वाचीत होतो. त्या ग्रंथात असे लिहिले होते की परमेशवराने यिर्मयाला सांगितले, 70 वर्षांनंतर यरुशलेम पुन्हा वसविले जाईल.

मग मी देव माझा प्रभू, याची प्रार्थना केली व कृपेची याचना केली. मी उपवास केला व शोकप्रदर्शक कपडे घातले. मी डोक्यात धूळ टाकून घेतली. मी परमेशवराची, माझ्या देवाची, प्रार्थना केली मी त्याच्याजवळ माझ्या पापांचा पाढा वाचला मी म्हणालो

“परमेशवरा तू महान आणि भीतिदायक देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर दया व प्रेम करून तू तुझा करार पाळतोस तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांबरोबरही तू कराराचे पालन करतोस.

“पण परमेश्वरा आम्ही पाप केले,आम्ही चुकीचे वागलो आम्ही दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याकडे पाठ फिरविली, तुझ्या आज्ञा आणि न्याय निर्णय यांच्यापासून आम्ही दूर गेलो. आम्ही संदेष्ट्यांचे ऐकले नाही. ते तुझे सेवक होते. ते तुझ्यावतीने आमच्या राजाशी, नेत्यांशी, थोर मंडळींशी बोलले. इस्राएलमधील सर्व लोकांशी ते बोलले पण आम्ही त्या संदेष्ट्यांचे ऐकले नाही.

“परमेश्वरा, तू फार चांगला आहेस. आणि चांगुलपणा तुझ्यातच आहे. पण आज आमच्याकडे फक्त अप्रतिष्ठा आहे. आणि यरुशलेमच्या लोकांजवळ फक्त अपमान आहे. इस्राएलच्या लोकांजवळ मग ते जवळ असोत की लांब अपमानाखेरीच काही नाही. परमेशवरा, तू त्या लोकांना पुष्कळ राष्ट्रांत विखरून टाकलेस आणि अशा, सर्व राष्ट्रांत राहाणाऱ्य, इस्राएलच्या लोकांना लाज वाटायला पाहिजे. परमेश्वरा तुझ्याविरुध्द केलेल्या वाईट कर्मामुळे त्यांना शरम वाटायला पाहिजे.

“परमेश्वरा, आम्हा सर्वांना लाज वाटली पहिजे. आमच्या सर्व राजांनी नेत्यांनी आणि आमच्या पूर्वजांनी लाजेने मान खाली घातल्या पाहिजेत. का? कारण परमेश्वरा, त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले.

“पण, परमेश्वरा, तू दयाळू आहेस. लोकांनी वाईट गोष्टी केल्या तरी तू क्षमा करतोस. आम्ही खरोखरच तुझ्याविरुध्द वागलो. 10 आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे ऐकले नाही परमेशवराने त्याच्या सेवका मार्फत संदेष्ट्यांमार्फत आम्हाला नियम सांगितले पण आम्ही त्या नियमांचे पालन केले नाही. 11 तुझी शिकवण इस्राएलच्या एकाही माणसाने मानली नाही. त्या सर्वानी तुझ्याकडे पाठ फिरविली त्यांनी तुझे ऐकले नाही मोशेच्या नियमांत शाप आणि वचने लिहिलेली आहेत (मोशे देवाचा सेवक होता). त्या शापांत आणि वचनांत, नियमांचे लालन न केल्यास होणाऱ्या शिक्षेबद्दल सांगितले आहे आणि त्या सर्व गोष्टी आमच्याबाबतीत घडल्या आहेत. आम्ही परमेश्वरा विरुध्द पाप केले, म्हणूनच असे घडले.

12 “देवाने ह्या गोष्टी आमच्या आणि आमच्या नेत्यांच्या बाबतीत घडतील असे सांगितले आणि तशा त्या घडवूनही आणल्या. त्याने आमच्यावर वाईट प्रसंग आणले. यरुशलेमने जे सोसले ते दुसऱ्या कोणत्याही नगराने सोसले नाही 13 आमच्याबाबतीत सर्व भयंकर गोष्टी घडल्या मोशेच्या नियमांत लिहिल्याप्रमाणेच सर्व घडले. पण अजूनही आम्ही परमेशवराची करूणा भाकली नाही. अजूनही आम्ही पाप करीतच आहोत परमेश्वरा, अजूनही आम्ही, तुझ्या सत्याकडे, लक्ष दिलेले नाही. 14 परमेशवराने भयानक संकटे आमच्यासाठी निर्माण करून ठेवली आणि त्याने ती आमच्यावर आणली. परमेश्वराची प्रत्येक कृती न्याय असल्यामुळेच. त्याने हे घडवून आणले पण अजूनही आपण परमेश्वराचे ऐकले नाही.

15 “परमेशवर, आमच्या देवा, तू तुझ्या सामर्थ्याच्या बळावर आम्हाला मिसरमधून बाहेर आणलेस, आम्ही तुझे आहोत तुझ्या ह्या कृतीमळे आजही तुझी ख्याती आहे. परमेशवरा, आम्ही पाप केले. आम्ही भयानक कृत्ये केली. 16 परमेश्वरा तू योग्य त्याच गोष्टी करतोस. तू न्याय जाणतोस. त्यानुसार तुझे शहर जे यरुशलेम त्याच्यावरचा तुझा राग काढून घे. यरुशलेम हा तुझा पवित्र पर्वत आहे. आमच्या सभोवतालचे लोक आमचा अपमान करतात आणि तुझ्या लोकांची चेष्टा करतातय. ह्याचे कारण आम्ही आणि आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले, हेच होय.

17 “आता परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.मी तुझा दास आहे, माझी मदतीसाठी केलेली प्रार्थना ऐक, तुझ्या पवित्र स्थानाचे भले कर [a]. तुझे पवित्र स्थान ओसाड पडले आहे. पण प्रभु तुझ्या चांगल्यासाठी ह्या चांगल्या गोष्टी कर. 18 माझ्या देवा, माझा धावा, ऐक. डोळे उघडून आमच्यावर आलेली भयानक संकटे पाहा. तुझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या नगरीची काय अवस्था झाली आहे ती पाहा. आम्ही चांगले आहोत असे मी म्हणत नाही. त्याकरिता मी ह्या गोष्टी मागत नाही, तर तू दयाळू आहेस हे मला ठाऊक आहे म्हणून मी तुझ्याकडे ह्या गोष्टी मागत आहे. 19 परमेशवरा, माझे ऐक आम्हाला क्षमा कर. परमेश्वरा, आमच्याकडे लक्ष दे आणि आमच्यासाठी काहीतरी कर. आता वाट पाहू नकोस! आताच काहीतरी कर. तुझ्या चांगल्यासाठी काहीतरी कर. परमेश्वरा तुझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या नगरीसाठी आणि तुझ्या लोकांसाठी काहीतरी आताच कर!”

70 आठवड्यांचा दृष्टान्त

20 मी देवाजवळ ही प्रार्थना करीत होतो, मी त्याला माझ्या आणि इस्राएलच्या लोकांच्या पापांबद्दल सांगत होतो, मी परमेश्वराच्या पवित्र पर्वतासाठी प्रार्थना करीत होतो. 21 तेवढ्यात गाब्रिएल माझ्याकडे आला दृष्टान्तात मी ज्याला पाहिले होते तोच हा गाब्रिएल. तो घाईघाईने उडत माझ्याकडे आला. संध्याकाळच्या अर्पणाच्या वेळेला तो आला. 22 मला जाणून घ्यावयाच्या होत्या त्या गोष्टी समजावून घेण्यास गाब्रिएलने मला मदत केली. तो म्हणाला, “दानीएला, मी तुला ज्ञान देण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी आलो आहे. 23 तू प्रार्थनेला सुरवात करता क्षणीच, आज्ञा मिळाली व ती तुला सांगायला मी आलो. देव तुझ्यावर खूप प्रेम करतो तूला ही आज्ञा व दुष्टान्त समजेल.

24 “दानीएला, देवाने तुझ्या लोकांसाठी आणि तुझ्या पवित्र नगरीसाठी 70 आठवडे दिले आहेत. हे 70 आठवडे, वाईट गोष्टी व पाप करावयाचे सोडून द्यावे, लोकांना पवित्र करावे कायम राहाणारा चांगुलपणा आणावा,दुष्टान्त व संदेष्टे यांच्यावर शिक्कामोर्तब करावे, आणी पवित्र स्थान देवासाठी अर्पण केले जावे म्हणून दिले आहेत.

25 “दानीएल, ह्या गोष्टी शिकून, समजावून घे. परत जा व यरुशलेम वसवा,” हा संदेश मिळाल्यापासून निवडलेला राजा [b] येईपर्यंतचा काळ सात आठवड्यांचा असेल मग यरुशलेम पुन्हा वसविली जाईल. यरुशलेममध्ये पुन्हा लोकांना एकत्र येण्यासाठी जागा बांधल्या जातील. नगरीच्या संरक्षणासाठी नगरीभोवती चर असेल. आठवड्यांत यरुशलेम वसविली जाईल पण ह्या काळात खूप संकटे येतील. 26 62 आठवड्यानंतर निवडलेला माणूस ठार मारला जाईल तो गेलेला असेलm मग भावी नेत्याचे लोक नगरीचा आणि पवित्र स्थानाचा नाश करली हा शेवट पुराप्रमाणे येईल अखेरपर्यंत युध्द चालू राहील त्या जागेचा संपूर्ण नाश करण्याची आज्ञा देवाने दिली आहे.

27 “मग भावी नेता पुष्कळ लोकांबरोबर एक करार करील. तो करार एक आठवड्याचा असेल आठवड्याच्या मध्येच अर्पणे व बळी देणे बंद होईल. मग विध्वंसक येईल तो भयानक विध्वंसक कृत्ये करील [c] पण देवानेच त्याला संपूर्ण विनाशाची आज्ञा केलेली आहे.”

स्तोत्रसंहिता 117-118

117 सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा.
    सर्व लोकांनो परमेश्वराची स्तुती करा.
देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि
    देव आपल्याशी सदैव खरा वागतो.

परमेश्वराचा जयजयकार करा!

118 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा.
    त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
इस्राएल, म्हण
    “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
याजकांनो, म्हणा,
    “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा,
    “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली.
    परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही.
    लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करु शकणार नाहीत.
परमेश्वर मला मदत करणारा आहे.
    माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मी बघेन.
परमेश्वरावर विश्वास ठेवणे
    हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
परमेश्वरावर विश्वास ठेवणे
    हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.

10 बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते.
    परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.
11 शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले,
    मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.
12 शत्रूंनी मला मधमाशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते.
    परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या झुडपाप्रमाणे लवकरच नाश झाला.
    मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.

13 माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि
    माझा जवळ जवळ सर्वनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली.
14 परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे.
    परमेश्वर मला वाचवतो.
15 चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता.
    परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.
16 परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत.
    परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.

17 मी जगेन आणि मरणार नाही
    आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
18 परमेश्वराने मला शिक्षा केली
    परंतु त्याने मला मरु दिले नाही.
19 चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा.
    मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
20 ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि
    केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
21 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
    तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.

22 इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता
    तो कोनाशिला झाला.
23 हे परमेश्वराने घडवून आणले आहे
    आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
24 आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे.
    आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.

25 लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा.
    परमेश्वराने आपला उध्दार केला. [a]
26 परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा.”
    याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.
27 परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो.
    बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या.”

28 परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो.
    तुझी स्तुती करतो.
29 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा.
    त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center