M’Cheyne Bible Reading Plan
एलीयाला घेऊन जाण्याची परमेश्वराची योजना
2 एका वावटळीद्वारे एलीयाला स्वर्गास परमेश्वराने घेऊन जाण्याची वेळ जवळ येऊन ठेपली होती. एलीया अलीशाबरोबर गिलगालला गेला.
2 एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब कारण परमेश्वराने मला बेथेलला जायला सांगितले आहे.”
पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला अंतर देणार नाही.” तेव्हा ते दोघेही जण बेथेल येथे गेले.
3 तेव्हा संदेष्ट्यांचा बेथेलमधला एक गट अलीशाला येऊन भेटला. आणि म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला परमेश्वर घेऊन जाणार आहे हे तुला माहीत आहे ना?”
अलीशा म्हणाला, “होय, मला माहीत आहे, पण ह्या विषयासबंधी बोलू नका”
4 एलीया अलीशाला म्हणाला, “तू येथेच थांब, कारण परमेश्वराने मला यरीहो येथे जायला सांगितले आहे.”
पण अलीशा म्हणाला, “परमेश्वराची शपथ, मी तुम्हाला सोडून राहणार नाही.” तेव्हा ते दोघे यरीहोला गेले.
5 तेव्हा यरीहोचे संदेष्टे अलीशाकडे आले आणि म्हणाले, “परमेश्वर तुझ्या स्वामीला आज घेऊन जाणार आहे हे तुला माहीत आहे का?”
अलीशा म्हणाला, “हो, मला कल्पना आहे, पण त्याबद्दल आता बोलू नका.”
6 एलीया अलीशाला म्हणाला, “तू तेथेच थांब कारण परमेश्वराने मला यार्देन नदीवर जायला सांगितले आहे.”
अलीशा म्हणाला, “परमेश्वराची आणि तुमच्या आयुष्याची शपथ, मी तुम्हाला अंतर देणार नाही.” तेव्हा ते दोघे तसेच पुढे निघाले.
7 संदेष्ट्यांपैकी पन्नास जण त्यांच्या मागोमाग निघाले. एलीया आणि अलीशा यार्देन नदीजवळ थांबले. ते पन्नास जण मात्र बरेच लांब उभे राहिले. 8 एलीयाने आपला अंगरखा अंगातून काढला त्याची घडी घातली आणि पाण्यावर आपटली. त्याबरोबर पाणी मधोमध उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले. अलीशा आणि एलीया मधल्या कोरडया वाटेने नदी पार करुन गेले.
9 नदी ओलांडल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने मला येथून घेऊन जायच्या अगोदर तुला माझ्याकडून काही हवे असल्यास सांग.”
अलीशा म्हणाला, “तुमच्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
10 एलीया म्हणाला, “ही तर फारच कठीण गोष्ट तू मागितलीस. मला तुझ्या जवळून घेऊन जातील तेव्हा तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. नाहीतर नाही.”
परमेश्वर एलीयाला स्वर्गात नेतो
11 एलीया आणि अलीशा बोलत बोलत पुढे चालले होते. तेवढयात अचानक काही घोडे आणि एक रथ तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी एलीया आणि अलीशाला एकमेकांपासून दूर केले. तो रथ आणि घोडे अग्नीप्रमाणे होते नंतर एका वावटळीमधून एलीया स्वर्गात गेला.
12 अलीशाने ते पाहिले आणि तो ओरडू लागला, “माझ्या बापा! माझ्या बापा! काय हा इस्राएलचा रथ आणि हे स्वर्गीय घोडे स्वार!”
अलीशाला एलीयाचे पुन्हा कधीच दर्शन झाले नाही. अलीशाने दु:खाच्या भरात आपले कपडे फाडले. 13 एलीयाचा अंगरखा जमिनीवर पडला होता तो अलीशाने उचलला. अलीशाने पाण्यावर तडाका देऊन म्हटले, “एलीयाचा परमेश्वर देव कुठे आहे?” 14 अलीशाने पाण्यावर वार केल्याबरोबर पाणी डावीउजवीकडे दुभंगले. मग अलीशा नदी पार करुन गेला.
संदेष्ट्यांकडून एलीयाची चौकशी
15 यरीहो येथील संदेष्ट्यांनी अलीशाला पाहिल्यावर ते म्हणाले, “एलीयाच्या आत्म्याचा आता अलीशात प्रवेश झाला आहे.” ते सर्वजण अलीशाला भेटायला आले. त्याला त्यांनी जमिनीपर्यंत लवून अभिवादन केले. 16 मग त्याला ते म्हणाले, “हे बघ, आमच्याकडे पन्नास एक चांगली माणसे आहेत. त्यांना जाऊन तुझ्या स्वामीचा शोध घेऊ दे. कदाचित् परमेश्वराच्या आत्म्याने एलीयाला वर नेऊन पुन्हा कोठेतरी डोंगर-दऱ्यांमध्ये टाकले असेल.”
पण अलीशा म्हणाला, “नाही, आता एलीयाचा शोध घ्यायला माणसे पाठवू नका.”
17 पण त्या संदेष्ट्यांनी खूप मिनतवाऱ्या करुन अलीशाची पंचाईत करुन टाकली. शेवटी अलीशा म्हणाला, “ठीक आहे, पाठवा त्यांना एलीयाच्या शोधात.”
मग त्या संदेष्ट्यांनी पन्नास जणांना एलीयाच्या शोधार्थ पाठवले. त्यांनी एलीयाचा तीन दिवस शोध घेतला पण त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. 18 शेवटी ती माणसे यरीहो येथे अलीशा राहात होता तेथे आली. एलीयाचा शोध लागत नाही असे त्यांनी अलीशाला सांगितले. तेव्हा आपण या गोष्टीला नको म्हणत होतो असे अलीशाने त्यांना सांगितले.
अलीशाकडून पाण्याचे शुध्दीकरण
19 एकदा त्या नगरातील माणसे अलीशाला म्हणाली, “हे नगर फार चांगल्या ठिकाणी वसले आहे हे तुम्ही पाहताच आहात पण इथले पाणी खराब आहे. त्यामुळे या जमिनीत पिके निघू शकत नाहीत.”
20 अलीशा त्यांना म्हणाला, “एक नवीन पात्र घेऊन या आणि त्यात मीठ घाला.”
तेव्हा लोकांनी एक पात्र त्याला दिले. 21 अलीशा ते घेऊन त्या झऱ्याच्या उगमापाशी गेला. तिथे त्याने मीठ टाकले. मग तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘आता हे पाणी मी शुध्द करत आहे. आता या पाण्याने मृत्यू ओढवणार नाही की पिकाची वाढ खुंटणार नाही.’”
22 अशाप्रकारे पाणी शुध्द झाले ते पाणी अजूनही चांगले आहे. अलीशा म्हणाला होता तसेच झाले.
अलीशाची मुलांकडून चेष्टा
23 अलीशा मग त्या नगरातून बेथेलला आला. तो डोंगर चढून जात होता आणि काही मुले गावातून डोंगर उतरत होती. त्यांनी अलीशाची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.”
24 अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि शापवाणी उच्चारली. त्याबरोबर जंगलातून दोन अस्वले बाहेर आली आणि त्यांनी या मुलांवर हल्ला केला. बेचाळीस मुलांचा त्या अस्वलांनी चिंधड्या केल्या.
25 अलीशाने बेथेल सोडून कर्मेल डोंगराचा रस्ता धरला. आणि तिथून मग तो शोमरोनला गेला.
वाईट गोष्टी घडतील
2 आता बंधूंनो, आम्ही तुम्हांला विनंति करतो, ती प्रभु येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी, आणि त्याच्याबरोबर आमच्या एकत्र भेटण्याविषयी. 2 आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही तुमचे मन पूर्णपणे अस्वस्थ होऊ देऊ नका किंवा सतत विचलित होऊ नका, जर तुम्ही ऐकले की, प्रभूचा दिवस आला आहे, काही लोक अशा प्रकारचे भविष्य वर्तवतील. किंवा काही लोक शिकवणुकीद्वारे किंवा काही लोक आम्हांकडून पत्र लिहिले आहे असे भासवून असा दावा करतील. 3 तर कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे फसवू नये. म्हणून सावध असा. मी असे म्हणतो कारण पहिल्यांदा मोठी बंडखोरी झाल्याशिवाय प्रभूचा दिवस येणार नाही. आणि जो नाशासाठी नेमला आहे, तो नियम मोडणारा प्रकट होईल. 4 तो विरोध करील आणि स्वतःला सर्व गोष्टींच्या वर उच्च करील. त्याला देव किंवा उपासना करण्याची कोणतीही एखादी वस्तु असे म्हणतील. येथपर्यंत की तो देवाच्या मंदिरात जाईल आणि सिंहासनावर बसेल आणि तो स्वतःला देव असे जाहीर करील.
5 मी तुमच्याबरोबरच होतो तेव्हा तुम्हाला मी ह्या गोष्टींबद्दल सांगत होतो. ते तुम्हाला आठवत नाही काय? 6 आणि म्हणून अशा प्रकारे त्याला कशाचा प्रतिबंध होत आहे हे तुम्हांला माहीत आहे. यासाठी तो योग्य वेळी प्रकट व्हावा. 7 मी हे म्हणतो कारण दुष्टपणाची रहस्यमय शक्ति आधीपासूनच जगात काम करीत आहे. पण असा एक आहे जो दुष्टाची रहस्यमय शक्ति थोपवीत आहे. आणि जोपर्यंत ती शक्ति मार्गातून काढून बाजूला टाकली जात नाही, तोपर्यंत तो ती शक्ति थोपवून धरील 8 आणि मग दुष्ट प्रकट होईल. प्रभु येशू त्याला आपल्या मुखातील श्वासाने मारुन टाकील आणि प्रभु जेव्हा त्याच्या येण्याच्या वेळी मोठ्या वैभवाने प्रकट होईल तेव्हा तो त्याचा नाश करील.
9 दुष्टाचे येणे सैतानाच्या सामर्थ्याने होईल आणि त्याच्या येण्याबरोबर खोटे चमत्कार, चिन्हे आणि अद्भुत गोष्टी घडतील. 10 आणि जे नरकाच्या वाटेवर आहेत त्यांच्याविरुद्ध प्रत्येक प्रकारची दुष्टता फसवणूक व्हावी म्हणून तो आणील, कारण त्यांनी सत्यावर प्रेम करण्याचे नाकारले. यासाठी की त्यांचे तारण होणे शक्य व्हावे. 11 आणि या कारणासाठी देवाने त्यांना भ्रम पडेल असे केले. यासाठी की, जे खोटे आहे त्यावर त्यांनी विश्वास ठेवावा. 12 आणि त्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर दुष्टतेत आनंद मानला, त्यांना शिक्षा मिळावी.
तारणासाठी तुमची निवड झाली आहे
13 पण आम्ही देवाकडे तुमच्याविषयी नेहमीच आभार मानले पाहिजेत. ज्यांच्यावर देव प्रेम करतो असे तुम्ही आमचे बंधु आहात. कारण आत्म्याच्या द्वारे शुद्धीकरण आणि सत्यावर विश्वास ठेवून तारण व्हावे म्हणून देवाने तुम्हाला प्रारंभापासून निवडले आहे. 14 आणि या तारणासाठीच, आम्ही सांगितलेल्या सुवार्तेद्वारेच देवाने तुम्हांला बोलाविले. यासाठी की, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचे जे गौरव ते तुम्हांलाही मिळावे 15 म्हणून बंधूंनो, दृढ उभे राहा. आणि आमच्या तोंडच्या वचनाद्वारे किंवा आमच्या पत्राद्वारे जी परंपरा आम्ही तुम्हाला शिकविली आहे तिला धरुन उभे राहा.
16-17 आता प्रभु येशू ख्रिस्त स्वतः आणि देव आमचा पिता ज्याने आम्हावर प्रेम केले आणि ज्याने आपल्या कृपेमध्ये आम्हाला अनंतकाळचे समाधान आणि चांगली आशा दिली. ते तुमच्या अंतःकरणाला समाधान देवोत व तुम्ही ज्या प्रत्येक चांगल्या गोष्टी करता अथवा सांगता त्यामध्ये तुम्हाला बळकट करो.
दानीएल आणि सिंह
6 सर्व राज्याचा कारभार करण्यासाठी 120 प्रांताधिकारी (सत्रप) नेमल्यास चांगले होईल असा विचार दारयावेशाने केला. 2 ह्या 120 प्रांताधिकाऱ्यांवर (सत्रपांवर) लक्ष ठेवण्यासाठी त्याने जे तीनजण नेमले, त्यातील एक दानीएल होता. कोणी राजाला फसवू नये व राज्याचे काहीही नुकसान होऊ नये म्हणून दारयावेशने तिघांची नेमणूक केली. 3 दानीएल दुसऱ्या दोघांपेक्षा उजवा ठरला. कारण दानीएलचे चारित्र्य चांगले होते व त्याच्याजवळ प्रचंड क्षमता होती. दानीएलची राजावर इतकी छाप पडली की सर्व राज्याचा कारभार त्याच्या हाती सोपविण्याचा बेत त्याने केला. 4 पण इतर दोघा पर्यवेक्षकांना आणि सर्व प्राताधिकाऱ्यांना (सत्रपांना) ह्या बेताविषयी कळताच ते दानीएलचा द्वेष करू लागले. दानीएलला दोष देण्यासाठी काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. त्यासाठी दानीएल राज्यकारभार करताना ज्या ज्या गोष्टी करी त्या त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी नजर ठेवली. पण त्यांना दानीएलची चूक सापडली नाही. त्यामुळे ते दानीएलला दोषी ठरवू शकले नाहीत. दानीएल अतिशय प्रामाणिक व विशवासू होता. क्ष्याने राजाला फसविले नाही. तो अतिशय कष्ट करीत असे.
5 शेवटी ते सर्व म्हणू लागले, “दानीएलाला त्याच्या चुकीबद्दल दोषी ठरविणे आम्हाला कधीच जमणार नाही. तेव्हा त्याच्या देवाच्या नियमांच्या संदर्भात आम्हाला तक्रार करण्याजोगे काहीतरी शोधले पाहिजे.”
6 तेव्हा मग ते दोन पर्यवेक्षक प्रांताधिकाऱ्यांसह राजाकडे गेले व राजाला म्हणाले, “दारयावेश राजा, चिरंजीव होवो! 7 एक ठराव करण्याबाबत पर्यवेक्षक मुलकी अधिकारी, प्रांताधिकारी, सल्लागार व राज्यपाल यांचे एकमत झाले आहे. आमच्या मते राजा तू असा हुकूम काढावास की तुझ्याशिवाय, इतर दैवतांची वा माणसाची प्रार्थना जो कोणी पुढील 30 दिवसांत करील त्याला सिंहाच्या गुहेत (पिंजऱ्यात) टाकण्यात येईल. सर्वांनी हा कायदा पाळलाच पाहिजे. 8 तेव्हा राजा आताच्या आता हुकूम लिहून त्याच्यावर शिक्कामोर्तब कर. म्हणजे तो कोणीही बदलू शकणार नाही का? कारण मेदी का पारसी यांचे कायदे रद्द होऊ शकत नाहीत किवा बदलूही शकत नाहीत.” 9 मग दारयावेश राजाने असा लेखी कायदा करून त्यावर सही केली.
10 दानीएल दररोज तीन वेळा देवाची प्रार्थना करीत असे. दिवसातून तीन वेळा गुडघे टेकून तो देवाची प्रार्थना करी व स्तुतिस्तोत्र गाईर् नव्या कायद्याविषयी ऐकताच, दानीएल आपल्या घरी गेला. त्याने छतावरच्या त्याच्या खोलीची यरुशलेमच्या बाजूची खिडकी उघडली आणि नेहमीप्रमाणे गुडघे टेकून प्रार्थना केली.
11 मग ते सगळे लोेक एकत्र जमले व त्यांनी दानीएलला देवाची प्रार्थना करताना आणि करूणा भाकताना पकडले. 12 मग ते राजाकडे गेले. राजाशी त्याने केलेल्या कायद्याविषयी ते बोलले. ते म्हणाले दारयावेश राजा पुढील 30 दिवसात, तुझ्याशिवाय, देवताची वा माणसाची जो कोणी प्रार्थना करील, त्याला सिंहाच्या गुहेत (पिजंऱ्यात) टाकण्यात येईल, असा लेखी कायदा करून त्यावर तू सही केलीस हे खरे की नाही?
राजा म्हणाला “हो! मी त्यावर सही केली आणि मेदी व पारसी यांचे कायदे रद्द होऊ शकत नाहीत वा त्यात बदल होऊ शकत नाही.”
13 मग ते लोक राजाला म्हणाले, “दानीएल तुझ्याकडे दुर्लक्ष करीत आहे राजा! तो यहूदाच्या कैद्यांपैकी एक आहे, तो तु केलेल्या कायद्याकडे लक्ष देत नाही अजूनही दिवसातून तीन वेळा तो त्याच्या देवाची प्रार्थना करतो.”
14 हे ऐकून राजा फार दु:खी व अस्वस्थ झाला. राजाने दानीएलला वाचवायचे ठरविले. सुर्यांस्तापर्यंत राजाने दानीएलला वाचाविण्यासाठी काही मार्ग निघतो का ह्याचा विचार केला 15 मग ते लोक एकत्र जमून राजाकडे गेले व त्याला म्हणाले, “हे राजा मेदी व पारसी यांनी शिक्कामोर्तब केलेला कायदा किंवा हुकूम कधीही रद्द होत नाही किंवा बदलू शकत नाही हे लक्षात ठेव.”
16 अखेर दारयावेश राजाने हुकूम दिला. मग त्यांनी दानीएलला आणून सिंहाच्या गुहेत (पिजंऱ्यात) टाकले. राजा दानीएलला म्हणाला “तू ज्या देवाची उपासना करतोस तो तुझा देव तूला वाचवील अशी मी आशा करतो”. 17 गुहेच्या तोंडावर एक मोठी शिळा आणून बसविण्यात आली. मग राजाने त्या शिळेवर आपल्या अंगठीने आपली मुद्रा उमटविली. तसेच इतर दहबाऱ्यांच्या अंगठ्यांनी त्याने त्यांच्याही मुद्रा उमटविल्या. ह्याचा अर्थ कोणीही शिळा सरकवून दानीएलला सिंहाच्या गुहेच्या (पिजऱ्यांच्या) बाहेर काढू शत नव्हता. 18 मग दारयावेश राजवाड्यात परतला. त्या रात्री त्याने अन्नाला स्पर्श केला नाही. कोणी येऊन आपले मनोरंजन करावे असे त्याला वाटले नाही, त्याला त्या रात्री झोपही आली नाही.
19 दुसऱ्या दिवशी फटफटताच दारयावेश राजा उठला आणि त्याने सिंहाच्या गुहेकडे (पिंजऱ्याकडे) धाव घेतली. 20 राजा खूप काळजीत होता. सिंहाच्या गुहेजवळ जाताच, त्याने दानीएलला हाक मारली. राजा ओरडला, “दानीएला जिवंत देवाच्या सेवका तुला तुझ्या देवाने, सिंहांपासून वाचविले का? तू नेहमीच देवाची सेवा करीत आलास.”
21 दानीएल उत्तरला, “राजा चिरायु असो! 22 माझ्या देवाने मला वाचविण्यासाठी, देवदूताला पाठविले देवदूताने सिंहाची तोंडे बंद केली. मी निरपराधी आहे,” हे माझ्या देवाला माहीत आहे म्हणूनच सिंहानी मला मारले नाही. राजा, मी तुझे कधीही काहीही वाईट केले नाही.
23 दारयावेश राजाला खूप आनंद झाला त्याने आपल्या सेवकांना दानीएलला सिंहाच्या गुहेतून (पिंजऱ्यातून) बाहेर उचलून आणण्यास सांगितले. दानीएलला बाहेर आणले तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती. दानीएलचा त्याच्या देवावर विश्वास असल्याने त्याला सिंहानी काहीही इजा केली नाही.
24 मग राजाने दानीएलला सिंहाच्या गुहेत (पिंजऱ्यात) टाकण्यासाठी त्याच्यावर दोषारोप ठेवणाऱ्या लोकांना आणण्याचा हुकूम दिला. त्या लोकांना बायकामुलांसट सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. गुहेच्या जमिनीला त्यांनी स्पर्श करण्याआधीच सिंहांनी त्यांना पकडले आणि त्यांना खाऊन टाकले. 25 मग दारयावेश राजाने पृथ्वीवर सर्वत्र पसरलेल्या, निरनिराव्व्या भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांतील लोकांना पुढील पत्र पाठविले.
अभिवादन.
26 मी नवीन कायदा करीत आहे. हा कायदा राज्याच्या सर्व भागातील सर्व लोकांना लागू आहे. तुम्ही सर्वांनी दानीएलच्या देवाला भ्यायला पाहिजे आणि त्याचा मान राखला पाहिजे.
दानीएलचा देव हा जिंवत देव आहे, साक्षात देव आहे.
तो सनातन आहे.
क्ष्याच्या राज्याचा कधीच नाश होत नाही.
क्ष्याचा प्रभाव कधीच नाहीसा होत नाही.
27 देव माणसांना मदत करतो व त्याचे रक्षण करतो.
स्वर्गात व पृथ्वीवर तो विस्मयकारक चमत्कार करतो.
देवानेच सिंहांपासून दानीएलाला वाचविले.
28 अशारीतीने राजा दारयावेश व पारसी राजा कोरेश या दोघांच्याही कारकिर्दोत दानीएल यशस्वी झाला.
112 परमेश्वराची स्तुती करा.
जो माणूस परमेश्वराला भितो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील.
त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात.
2 त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील.
चांगल्या लोकाच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील.
3 त्या माणसाचे कुटुंब श्रीमंत होईल
आणि त्याचा चांगुलपणा सदैव राहील.
4 चांगल्या लोकांना देव म्हणजे अंधारात चमकणारा प्रकाश वाटतो.
देव चांगला, दयाळू आणि कृपाळू आहे.
5 माणसाने दयाळू आणि उदार असणे चांगले असते.
माणसाने त्याच्या व्यापार उद्दोगात सचोटीने वागणे चांगले असते.
6 तो माणूस कधीही पडणार नाही.
चांगला माणूस सदैव आठवणीत राहील.
7 त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही.
त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.
8 ज्याच्याजवळ दृढ विश्वास आहे त्याला भीती वाटणार नाही.
तो त्याच्या शत्रूचा पराभव करेल.
9 तो माणूस सहजपणे गरीबांना वस्तू देतो
आणि त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
10 दुष्ट लोक हे बघतात आणि रागावतात.
ते रागाने त्यांचे दांत खातील आणि
नंतर ते नाहीसे होतील दुष्ट लोकांना जे खूप हवेहवेसे वाटते ते मिळणार नाही.
113 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा.
परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा.
2 परमेश्वराचे नाव आता आणि
सदैव धन्य व्हावे असे मला वाटते.
3 पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत
परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते.
4 परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे.
त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते.
5 कुणीही माणूस आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही.
देव स्वर्गात उंच बसतो.
6 देव आमच्या वर इतका उंच आहे की त्याला आकाश
आणि पृथ्वी यांकडे खाली वाकून बघावे लागते.
7 देव गरीब लोकांना घाणीतून वर उचलतो.
देव भिकाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून काढतो.
8 आणि देव त्या लोकांना महत्व देतो.
देव त्या लोकांना महत्वाचे नेते बनवतो.
9 स्त्रीला मूल होत नसेल तर देव तिला मुले देईल
आणि तिला आनंदी करेल.
परमेश्वराची स्तुती करा.
2006 by World Bible Translation Center