Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 22

मीखायाचा अहाबला सावधगिरीचा इषारा

22 पुढील दोन वर्षे इस्राएल आणि अराम यांच्यामध्ये शांततेची गेली. तिसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलचा राजा अहाब याला भेटायला गेला.

यावेळी अहाबने आपल्या अधिकाऱ्यांना विचारले, “अरामच्या राजाने गिलाद मधील रामोथ आपल्याकडून घेतले होते ते आठवते ना? ते परत मिळवण्यासाठी आपण काहीच का केले नाही? रामोथ आपले असायला हवे.” आणि अहाब राजा यहोशाफाटला म्हणाला, “तुम्ही आमच्या बाजूने रामोथला अरामी सैन्याशी लढाल का?”

यहोशाफाट म्हणाला, “अवश्य माझे सैन्य आणि घोडे तुमचेच आहेत. पण प्रथम आपण परमेश्वराचा सल्ला घेतला पाहिजे.”

तेव्हा अहाबने संदष्ट्यांची एक सभा घेतली. तेव्हा तिथे चारशे संदेष्टे हजर होते. अहाबने त्यांना विचारले, “आपण आत्ताच रामोथ येथे अरामी फौजेवर चालून जावे का? की काही काळ थांबावे?”

संदेष्टे म्हणाले, “तुम्ही खुशाल आत्ताच हल्ला करा. परमेश्वर तुम्हाला जय मिळवून देईल.”

पण यहोशाफाटने शंका काढली, “परमेश्वराचा आणखी कोणी संदेष्टा यांच्या खेरीज इथे आहे का? तसा असेल तर त्यालाही देवाचे मत विचारलेले बरे.”

राजा अहाब म्हणाला, “तसा आणखी एक संदेष्टा आहे. इम्ला याचा मुलगा मीखाया. पण मी त्याचा द्वेष करतो. कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्यकथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते.”

यहोशाफाट म्हणाला, “अहाब राजा, तुझे असे बोलणे बरोबर नव्हे.”

तेव्हा अहाब राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला घेऊन येण्यास सांगितले.

10 यावेळी दोन्ही राजे राजवस्त्रे घालून सिंहासनावर बसले होते. शोमरोनच्या वेशीजवळ न्यायदान चालते त्या ठिकाणी ते होते. सर्व संदेष्टे त्यांच्या समोर उभे होते. त्यांचे भविष्यकथन चालले होते. 11 त्यांच्यापैकी एक कनानाचा मुलगा सिद्कीया हा होता. त्याने प्रचंड शक्तीचे प्रतीक अशी लोखंडाची शिंगे केली होती. तो अहाबला म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे, ‘ही शिंगे तू अरामी सैन्याविरुध्द लढताना वापरावीस असे देवाचे म्हणणे आहे. म्हणजे तू शत्रूचा पराभव करशील, त्याचा संहार करशील.’” 12 सिद्कीयाचे हे म्हणणे इतर सर्वच संदेष्ट्यांना पटले. पुढे सिद्कीया म्हणाला, “आता तुझ्या सैन्याने चढाई करावी. रामोथ येथे अरामी सैन्यावर हल्ला करावा. विजय तुमचाच आहे. परमेश्वर तुम्हाला यश देईल.”

13 हे चाललेले असतानाच एक सेवक मीखायाच्या शोधात गेला. त्याला भेटून म्हणाला, “राजा या युध्दात विजयी होईल असे सर्वच संदेष्ट्यांचे म्हणणे आहे. तेव्हा तूही तसेच म्हणणे श्रेयस्कर ठरेल व ते सुरक्षितपणाचे होईल.”

14 पण मीखाया म्हणाला, “नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगीन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.”

15 मीखाया मग राजाकडे आला. राजाने त्याला विचारले, “मीखाया, मी आणि राजा यहोशाफाट हातमिळवणी करु ना? रामोथला अरामच्या सैन्यावर आता चढाई करु का?”

मीखाया म्हणाला, “हो तुम्ही आत्ताच ही लढाई करा. परमेश्वर तुम्हाला यश देईल.”

16 पण अहाब त्याला म्हणाला, “तू हे परमेश्वराच्या शक्तीने सांगत नाहीस. आपल्या मनचे सांगतो आहेस. तेव्हा खरे काय ते सांग परमेश्वराचे म्हणणे सांग. कितीदा मी तुला तेच सांगू?”

17 तेव्हा मीखायाने सांगितले, “काय होणार ते मला दिसते आहे. इस्राएलचे सैन्य डोंगरांवर इतस्ततः पसरेल. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी त्यांची अवस्था होईल. परमेश्वराचे म्हणणे असे आहे: ‘यांना कोणी नेता नाही. यांनी घरी जावे. लढाईच्या भानगडीत पडू नये.’”

18 मग अहाब यहोशाफाटला म्हणाला, “पाहा, हेच बोललो होतो ना मी! हा संदेष्टा कधीही माझ्याबद्दल चांगले भविष्यकथन करत नाही. हा नेहमी अप्रिय गोष्टीच मला ऐकवतो.”

19 इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. त्याचे दूत त्याच्या शेजारी उभे आहेत. 20 देव म्हणाला, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथला अरामवर हल्ला करावा असे मला वाटते. त्यात त्याला मरण येईल.’ तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना. 21 मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.’ 22 परमेश्वर त्याला म्हणाला, ‘तू अहाबची फसगत कशी करशील?’ यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल.’ यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले जा आणि अहाब राजाला या मोहात पाड तुला यश येईल.’”

23 मीखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, “तेव्हा खरी हकीकत अशी आहे. परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरालाच वाटते.”

24 मग सिद्कीया हा संदेष्टा मीखायाजवळ गेला. मीखायाला त्याने एक थापड मारली. सिद्कीया म्हणाला, “माझ्यातली परमेश्वराची शक्ती संपली आहे आणि तो आता तुझ्या मार्फतच बोलतो आहे अशी खरेच तुझी समजूत आहे?”

25 मीखाया म्हणाला, “लवकरच आपत्ती येणार आहे. तेव्हा तू एका लहानशा खोलीत दडून बसशील तेव्हा माझे म्हणणे खरे असल्याचे तुझ्या लक्षात येईल.”

26 तेव्हा अहाब राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा. 27 मीखायाला तुरुंगात घालायला त्यांना सांगा. त्याला फक्त भाकर आणि पाणी द्या. युध्दावरुन मी परत येईपर्यंत त्याला तिथेच राहू द्या.”

28 मीखाया मोठ्याने म्हणाला, “मी काय म्हणतो ते सर्व लोकहो ऐका. राजा, तू युध्दावरुन जिवंत परत आलास तर परमेश्वरमाझ्या मार्फत बोलला नाही असे खुशाल समजा.”

29 नंतर राजा अहाब आणि राजा यहोशाफाट रामोथ येथे अरामच्या सैन्याशी लढायला गेले. गिलाद प्रांतात हे युध्द झाले. 30 अहाब यहोशाफाटला म्हणाला, “आपण आता युध्दाचा व्यूह रचू. मला राजा म्हणून कोणी ओळखणार नाही असे कपडे मी घालीन. पण तू मात्र राजाला शोभेल असाच पोषाख कर.” अशाप्रकारे इस्राएलच्या राजाने अगदी चारचौघांसारखे कपडे करुन युध्दाला सुरुवात केली.

31 अरामच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले. 32 तेव्हा युध्द चालू असताना या रथाधिपतींनी राजा यहोशाफाटला पाहिले. तोच इस्राएलचा राजा असे त्यांना वाटले. त्यामुळे त्याचा ते वध करायला निघाले. यहोशाफाट आरडाओरडा करु लागला. 33 हा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतींच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला मारले नाही.

34 तेव्हा एका सैनिकाने, कोणावर नेम धरुन नव्हे असा हवेतच एक बाण सोडला. हा बाण नेमका इस्राएलाचा राजा अहाब याला लागला. शरीराचा जो छोटा भाग चिलखताने झाकलेला नव्हता तिथे बाण लागला. तेव्हा राजा अहाब आपल्या सारथ्याला म्हणाला, “मला बाण लागला आहे. रथ येथून हलव. आपण या लढाईपासून दुर जाऊ.”

35 युध्द मात्र चालूच राहिले. राजा अहाब आपल्या रथात बसून राहिला. रथात टेकून बसून तो अरामच्या सैन्याकडे पाहात होता. त्याला एवढा रक्तस्त्राव झाला की रथाच्या बैठकीच्या भागात रक्ताचे थारोळे झाले. संध्याकाळच्या सुमारास राजाला मृत्यू आला. 36 सूर्यास्ताच्या वेळी इस्राएलच्या सर्वसैन्याला आपापल्या प्रांतात घरोघरी जायचा आदेश मिळाला.

37 राजा अहाबला अशा तऱ्हेने मरण आले. काही जणांनी त्याचा देह शोमरोनला आणला. त्याला त्यांनी तिथे पुरले.

38 शोमरोनमधल्या तळ्यावर या लोकांनी अहाबचा रथ धुतला. रथातील रक्त कुत्र्यांनी चाटले आणि त्या तळ्यातील पाण्याने वेश्या स्नान करीत असत. परमेश्वराने जे जे होईल असे सांगितले होते तसेच नेमके घडले.

39 इस्राएलच्या राजांचा इतिहास या ग्रंथात राजा अहाबच्या सर्व गोष्टींची नोंद केलेली आहे. आपला महाल सुशोभित करण्यासाठी त्याने हस्तिदंत कसे वापरले, त्याने नगरे उभारली याबद्दलही या ग्रंथात सांगितलेले आहे. 40 अहाब मरण पावला व त्याला त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला.

यहुदाचा राजा यहोशाफाट

41 अहाब इस्राएलचा राजा झाल्यावर चौथे वर्ष चालू असताना यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट [a] हा आसाचा मुलगा. 42 यहोशाफाट वयाच्या पस्तिसाव्या वर्षी राजा झाला आणि यरुशलेममध्ये त्याने पंचवीस वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव अजूबा. ती शिल्हीची मुलगी. 43 यहोशाफाट चांगला राजा होता. हा आपल्या वडीलांप्रमाणेच होता. परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. पण यहोशाफाटने उंचावरील पूजास्थळे काढली नाहीत. लोक त्या ठिकाणी होम करणे, धूप जाळणे वगैरे करत राहिले.

44 इस्राएलच्या राजाशी त्याने शांततेचा करार केला. 45 राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकीकत यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे.

46 धर्माच्या नावाखाली देह विक्रय करणाऱ्या स्त्रीपुरुषांना यहोशाफाटने प्रार्थनास्थळांमधून हाकलून लावले. यहोशाफाटचे वडील आसा राज्य करीत असताना हे लोक त्या ठिकाणी होते.

47 याच काळात अदोम प्रदेशाला राजा नव्हता. एक कारभारीच इथला कारभार पाहात असे. त्याची नेमणूक यहूदाचा राजा करी.

48 राजा यहोशाफाटने काही मालवाहू गलबते बांधली. त्यात त्याचा हेतू ओफीरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली. 49 इस्राएलचा राजा अहज्या याने यहोशाफाटला मदतीचा हात दिला. त्याच्या माणसांबरोबर आपले खलाशी देण्याची तयारी दर्शवली. पण अहज्याची कुमक स्वीकारण्यास यहोशाफाटने नकार दिला.

50 यहोशाफाट मरण पावला त्या नंतर दावीद नगरात आपल्या पूर्वजांबरोबर त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या जागी त्याचा मुलगा यहोराम राज्य करु लागला.

इस्राएलचा राजा अहज्या

51 अहज्या अहाबचा मुलगा होता. यहोशाफाटच्या यहूदावरील सत्तेच्या सतराव्या वर्षी अहज्या इस्राएलचा राजा झाला. शोमरोन मध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले. 52 अहज्याने परमेश्वराचे अनेक अपराध केले. आपले वडील अहाब, आई ईजबेल आणि नबाटाचा मुलगा यरोबाम या सगळ्यांनी केले तेच याने केले. या सर्व राज्यकर्त्यांनी इस्राएली लोकांना आणखी पापात लोटले. 53 आपल्या वडीलांप्रमाणेच अहज्यानेही बाल या अमंगळ दैवताची पूजा केली. त्यामुळे इस्राएलचा देव परमेश्वर याचा कोप ओढवला. परमेश्वर अहाबवर संतापला होता तसाच अहज्यावर संतापला.

1 थेस्सलनीकाकरांस 5

प्रभूच्या येण्यासाठी तयार राहा

बंधूंनो, वेळ आणि तारीखवार मी तुम्हांला लिहिण्याची गरज नाही. कारण तुम्ही स्वतःचे हे चांगल्या प्रकारे जाणता की, प्रभूच्या परत येण्याचा दिवस येईल. तो जणू काय रात्रीचा चोर जसा येतो तसा येईल. जेव्हा लोक म्हणतात, “सगळीकडे शांतता व सुरक्षितता आहे.” तेव्हा त्यांच्यावर अचानक विनाश ओढवेल, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रिला अचानक वेदना होतात व मग ते सूटू शकणार नाहीत!

परंतु बंधूनो, त्या दिवसाने चोराप्रमाणे अचानक येऊन आपल्याला गाठून आश्चर्यात टाकावे अशा प्रकारे आपण अंधारात नाही. कारण तुम्ही सर्वजण प्रकाशाचे पुत्र आहात व दिवसाचे पुत्र आहा, आम्ही अंधाराचे किंवा रात्रीचे नाही. म्हणून आपण इतरांसारखे झोपू नये. उलट आपण सावध राहू व आमच्या स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु. कारण जे झोपतात ते रात्री झोपतात व जे दारु पितात ते रात्री दारु पितात, परंतु आपण दिवसाचे असल्याने स्वःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु या. आपण विश्वास आणि प्रीतिचे छातीला उरस्त्राण घालू या. आणि आमचे शिरस्त्राण म्हणून तारणाची आशा ठेवू या.

कारण देवाने आम्हाला त्याचा क्रोध सहन करण्यासाठी निवडले नाही, तर आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे तारण मिळावे म्हणून निवडले आहे. 10 तो आमच्यासाठी मरण पावला यासाठी की, आम्ही मेलेले असू किंवा जिवंत असू, जेव्हा येशू येईल तेव्हा आम्हाला त्याबरोबर एकत्र राहता यावे. 11 म्हणून एकमेकांना उत्तेजन द्या. आणि जसे आता तुम्ही करीत आहात तसे आध्यात्मिक रीतीने एकमेकांना पूर्ण मनाने बळकट करा.

शेवटच्या सूचना आणि सलाम

12 परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांला विनंति करतो, की जे तुम्हामध्ये श्रम व प्रभुमध्ये मार्गदर्शन करतात आणि शिक्षण देतात, त्यांना तुम्ही मान द्या. 13 आम्ही तुम्हाला अशी विनंति करतो की, त्यांनी तुमच्याबरोबर केलेल्या कामामुळे त्यांना प्रेमाने मोठा मान द्या.

एकमेकांबरोबर शांतीने राहा. 14 बंधूंनो, आम्ही तुम्हाला आग्रह करतो की, “आळशी लोकांना ताकीद द्या.” भित्र्यांना उत्तेजन द्या आणि अशक्तांना मदत करा. व सर्व लोकांबरोबर सहनशीलतेने राहा. 15 कोणीही वाईटाची फेड वाईटाने करु नये म्हणून लक्षात ठेवा. परंतु नेहमी एकमेकांचे आणि सर्व लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न करा.

16 सर्वदा आनंद करा. 17 नेहमी प्रार्यना करीत राहा. 18 प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना.

19 आत्म्याला विझविण्याचा प्रयत्न करु नका. 20 संदेष्ट्यांच्या संदेशाचा उपहास करु नका. 21 पण हे देवाकडून आले आहेत याची परीक्षा करुन खात्री करुन घेण्याची सवय करा. जे चांगले ते धरुन ठेवा. 22 दुष्टाईच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.

23 देव स्वतः जो शांतीचा उगम आहे. तो तुम्हांला त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित करो आणि तुमचे सर्व मनुष्यत्व म्हणजे तुमचा आत्मा, जीव आणि शरीर प्रभु येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखो. 24 देव जो तुम्हाला बोलावितो तो विश्वासू आहे आणि खरोखरच तो तसे करील.

25 बंधूंनो, कृपा करुन आमच्यासाठीसुद्धा प्रार्थना करा. 26 पवित्र चुंबनाने सर्व बंधूंना सलाम करा. 27 मी तुम्हांला प्रभुची शपथ घ्यावयाला सांगतो की, हे पत्र सर्व बंधूना वाचून दाखविण्यात यावे. 28 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.

दानीएल 4

नबुखद्नेस्सरचे झाडाबद्दलचे स्वप्न

नबुखद्नेस्सर राजाने पुष्कळ राष्ट्रांना निरनिराव्व्या भाषा बोलणाऱ्या लोकांना आणि जगात वेगवेगव्व्या ठिकाणी राहणाव्या लोकांना पुढील पत्र लिहिले:

अभिवादन,

परात्पर देवाने माझ्यासाठी केलेले चमत्कार व विस्मयड्ढारक गोष्टी आपल्याला सांगताना मला आनंद होत आहे.

देवाने आश्चर्यकारक चमत्कार केले आहेत.
    क्ष्याने प्रभावी चमत्कार केले आहेत.
देवाचे राज्य चिरंतन आहे.
    आणि त्याचे प्रभत्व पिढ्यान्पिढ्या राहील.

मी नबुखद्नेस्सर माझ्या राजवाड्यात सुखात होतो. मी यशस्वी जीवन जगत होतो. पण मला पडलेल्या स्वप्नाने मी भयभीत झालो. मी झोपलो असताना मला काही प्रतिमा दिसल्या, काही दृष्टान्त झाले त्यामुळे मी फार घाबरलो. म्हणून बाबेलमधील सर्व ज्ञानी माणसांना बोलावून आणण्याचा हुकूम दिला. का? कारण तेच मला माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकले असते. मांत्रिक व खास्दी ह्यांना मी माझ्या स्वप्नाबद्दल सांगितले पण ते त्याचा अर्थ सांगू शकले नाहीत. अखेर, दानीएलने येऊन मला स्वप्नाबद्दल सांगितले, (मी दानीएलला माझ्या दैवताबद्दलची भक्तिभावना व्यक्त करण्यासाठी बेल्टशस्सर असे नाव दिले आहे. पवित्र दैवतांचा आत्मा त्यांच्या अंगात आहे.) मी म्हणालो, “बेलटशस्सर तू सर्व मांत्रिकांत श्रेष्ठ आहेस. तुझ्या अंगात पवित्र दैवतांचे आत्मे येतात हे मला ठाऊक आहे. तुला समजण्यास असे रहस्य कोणतेच नाहि,हेही मला माहित आहे.मला पडलेल्या ह्या स्वप्नाचा अर्थ तू मला सांग. 10 मी झोपलो असताना मला पुढील दृष्टान्त झाले मी पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष पाहिला. तो खूप उंच होता. 11 तो खूप वाढला व मजबूत झाला त्याचा शेंडा आकाशाला भिडला. [a] पृथ्वीच्या पाठीवरून तो कोठूनही दिसू शकत असे. 12 त्या वृक्षाची पाने सुंदर होती. त्याला पुष्कळ चांगली फळे आली होती. त्या वृक्षापासून प्रत्येकाला भरपूर अन्न मिळत होते. वन्य प्राण्यांना त्या वृक्षाच्या छायेत आसरा मिळत होता, तर पक्षी फांद्यांवर राहात होते. प्रत्येकाला वृक्षापासून भक्ष्य मिळत होते.

13 “मी झोपलो असताना, दृष्टान्तात हे सर्व पाहात होतो. मग मी पवित्र देवदूताला स्वर्गातून खाली येताना पाहिले. 14 तो खूप मोठ्याने बोलला, तो म्हणाला, वृक्ष तोडा, त्यांच्या फांद्या छाटा, पाने ओरबाडून काढा. त्याची फळे भोवताली विखरून टाका. मग वृक्षाखाली राहाणारे प्राणी दूर पळून जातील, फांद्यांवर राहाणारे पक्षी दूर उडून जातील. 15 पण खोड व मुळे जमिनीत तशीच; राहू द्यात. त्याभोवती लोखंड व कोसे यांची जाळी लावा. खोड व मुळे तेथेच राहातील. त्यांच्याभोवती गवत कढेल ते खोड व ती मुळे तेथेच झाडा-झुडुपांमध्ये वन्य पशूंबरोबर राहातील, व दवाने भिजतील. 16 तो वृक्ष ह्यापुढे माणसाप्रमाणे विचार करणार नाही. मानव-हदयाऐवची त्याला पशुहदय मिळेल अशा रीतीने त्याला सात पावसाळे (सात वर्षे) काढावे लागतील.

17 “त्या पवित्र देवदूतांनी अशी शिक्षा मोठ्याने सुनावली. का? कारण परात्पर देवाचेच प्रभुत्व मानवांच्या सर्व राज्यांवर आहे हे पृथ्वीवरील सर्व लेकांना कळावे, देव त्याच्या इच्छेप्रमाणे ही राज्ये त्याला वाटेल त्या माणसांच्या हाती सोपवितो.त्या राज्यांवर राज्य करण्यासाठी तो नम्र लोकांची निवड करतो.

18 “माझे, नबुखद्नेस्सर राजाचे स्वप्न असे होते. आता, बेल्टशस्सर (दानीएल) मला त्याचा अर्थ सांग. माझ्या राज्यातला कोणीही ज्ञानी माणूस मला ह्याचा अर्थ सांगू शकणार नाही. पण बेल्टशस्सर तुझ्या अंगात देवाच आत्मा (वास करीत) असल्याने, तू ह्या स्वप्नाचा अर्थ लावू शकतोस.”

19 मग काही काळापर्यंत दानीएल (म्हणजे बेल्टशस्सर) एकदम गप्प झाला. तो या गोष्टीचा त्याच्या मनात विचार करीत राहिला ते पाहून राजा म्हणाला, “बेल्टशस्सर (दानीएल) मला स्वप्नचा अर्थ सांगताना घाबरू नकोस.”

मग बेल्टशस्सर (दानीएल) राजाला म्हणाला, “हे स्वामी इडापिडा टळो! हे स्वप्न तुझ्या शत्रूंच्या संदर्भात असायला हवे होते. आणि त्या स्वप्नाचा अर्थ तुझ्या विरोधात असणाऱ्यांच्या संदर्भात असायला हवा होता. 20-21 तू स्वप्नात एक वृक्ष पाहिलास तो वृक्ष खूप वाढला भक्कम झाला त्याचा शेंडा आकाशाला भिडला. पृथ्वीवरच्या कोणत्याही जागेवरून तो दिसू शकत असे. त्याला सुंदर पाने होती व भरपूर फळे होती. त्यामुळे प्रत्येकाला अन्न मिळत होते. वन्य पशूंना त्याचा आसरा होता व त्याच्या फांद्यांवर पक्षी घरटी बांधीत. असा वृक्ष तू पाहिलास. 22 राजा, तूच तो वृक्ष आहेस, तू महान व सामर्थ्यशाली झाला आहेस आकाशाला भिडणाऱ्या उंच वृक्षाप्रमाणे तू आहेस आणि तुझी सत्ता पृथ्वीच्या टोकापर्यंत पसरली आहे.

23 “राजा तू पवित्र देवदूताला स्वर्गातून खाली येताना पाहिलेस.तो देवदूत म्हणाला, वृक्ष तोडून टाका. क्ष्याचा नाश करा.पण खोड व मुळे राहू द्या. त्याभोवती लोखंड व कासे यांची जाळी बसवा त्याला गवतात राहू द्या तो दवात भिजेल. तो वन्य पशूंप्रमाणे राहील. सात पावसाळे (सात वर्ष) असे काढावे लागतील.

24 “हे राजा, ह्याचा अर्थ परात्पर देवाने ह्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडवून आणण्याची आज्ञा दिली आहे. 25 नबुखद्नेस्सर राजा तुला सक्तीने लोकांपासून दूर जावे लागेल. तू वन्य पशूंमध्ये राहाशील, गुरांप्रमाणे तुला गवत खावे लागले.तू दवात भिजशील, सात पावसाव्व्यानंतर (सात वर्षानंतर) तू धडा शिकशील. परात्पर देवाचेच माणसांच्या राज्यावर प्रभुत्व असते हे तुला कळेल. देव त्याला पाहिजे त्यांच्याच हातात राज्ये सोपवितो.

26 “वृक्षाचा बुंधा व मुळे जमिनीत राहू देण्याची देवाची आज्ञा आहे. ह्याचा अर्थ तुला तुझे राज्य परत मिळेल. पण त्याआधी तुला राज्यावर परात्पर देवाचे प्रभुत्व आहे हे कळायला हवे. 27 तेव्हा राजा, माझे ऐक पाप करण्याचे सोडून दे. योग्य त्याच गोष्टी कर. वाईट कृत्ये करू नकोस गरिबांवर दया कर. मग कदाचित तुला यशच मिळेल.”

28 नबुखद्नेस्सरच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी घडल्या. 29-30 स्वप्न पडलेल्याला बारा महिने झाले. राजा नबुखद्नेस्सर एकदा त्याच्या बाबेलच्या राजवाड्याच्या छतावरून चालत असताना राजा म्हणाला, “पाहा! बाबेलकडे पाहा, हे प्रचंड शहर मी वसविले. हा माझा राजवाडा आहे. माझ्या सामर्थ्याच्या जोरावर मी हा राजवाडा बांधला.माझे मोठेपण दाखविण्यासाठीच मी तो बांधला.”

31 त्याचे शब्द त्याच्या तोंडातच होते की स्वर्गातून आवाज आला, “राजा नबुखद्नेस्सर, पुढे तुझे काय होणार आहे ते पाहा: राजा म्हणून तुला असलेली सत्ता तुझ्यापासून हिरावून घेतली जाईल. 32 तुला सक्तीने लोेकांपासून दूर नेले जाईल. तू वन्य पशूंबरोबर राहाशील. गाईप्रमाणे तू गवत खाशील तुला धडा शिकायला सात पावसाळे (सात वर्षे) जावे लागतील. मग तुला समजून चुकेल की परात्पर देवाचेच माणसांच्या राज्यांवर प्रभत्व असते व तो त्याच्या इच्छेनुसार त्या त्या माणसांच्या हाती राज्ये सोपवितो!”

33 ह्या गोष्टी ताबडतोब घडल्या नबुखद्नेस्सरला सक्तीने लोकांपासून दूर जावे लागले. त्यायाला गुरांप्रमाणे गवत खावे लागले. तो दवात भिजला. त्याचे केस गरूडाच्या पिसांप्रमाणे लांब वाढले,व नखे पक्ष्याच्या नखांप्रमाणे वाढली.

34 ह्या काळाच्या अखेरीला मी नबुखद्नेस्सरने स्वर्गाकडे पाहिले आणि माझे मन ताव्व्यावर आले मग मी परात्पर देवाचे स्तवन केले. त्या चिरंतनाचा मी मान ठेवला त्याचे उपकार मानले.

देवाचे प्रभुत्व अंखड आहे.
    त्याचे राज्य पिढ्यान्पिढ्या राहणारे आहे.
35 पृथ्वीवरचा मनुष्यप्राणी खरच महत्वाचा नाही.
स्वर्गीय सामर्थ्यांत व
    पृथ्वीवरच्या माणसांत देवाच्याच इच्छेने
सर्व काही घडते त्याच्या सामर्थ्यशाली हाताला कोणी अडवू शकत नाही.
    त्याच्या कृत्यांबद्दल कोणी त्याला प्रश्न विचारू शकत नाही.

36 अशारीतीने, त्या वेळी, देवाने माझे मन ताव्व्यावर आणले. राजा म्हणून माझा सन्मान व सत्ता मला त्याने परत दिली. माझे सल्लागार व राजवंशातील लोेक पुन्हा मला विचारू लागले. मी पुन्हा राजा झालो. आणि पूर्वोपेक्षा मी महान व अधिक सामर्थ्यशाली झालो. 37 आता मी नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गातो, त्याचा गौरव करतो, त्याचे उपकार मानतो. तो करतो ती प्रत्येक गोष्ट बरोबरच; असते तो नेहमीच न्याय मार्ग स्वीकारतो आणि गर्विष्ठांना तो नम्र करतो.

स्तोत्रसंहिता 108-109

दावीदाचे एक स्तुतिगीत.

108 देवा, मी तयार आहे.
    मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.
वीणांनो आणि सतारींनो,
    आपण सुर्याला जाग आणू या.
परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु.
    आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु.
परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे.
    तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे.
देवा, स्वर्गाच्याही वर उंच जा.
    सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे.
देवा, तुझ्या मित्रांना वाचवण्यासाठी हे कर आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
    आणि तुझी महान शक्ती उध्दार करण्यासाठी वापर.

देव त्याच्या मंदिरात बोलला,
    “मी युध्द जिंकेन आणि विजयाबद्दल आनंदी होईन.
मी ही जमीन माझ्या माणसांत वाटून टाकीन.
    मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.
गिलाद आणि मनश्शे माझी असतील.
    एफ्राईम माझे शिरस्त्राण असेल.
    यहुदा माझा राजदंड असेल.
मावब माझे पाय धुण्याचे पात्र असेल.
    अदोम माझी पादत्राणे नेणारा सेवक असेल.
    मी पलिष्ट्यांचा पराभव करीन आणि विजयाबद्दल हर्षनाद करीन.”

10 मला शत्रूच्या किल्ल्यात कोण नेईल?
    मला अदोमशी लढायला कोण नेईल?
11 देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करु शकतोस.
    पण तू आम्हाला सोडून गेलास.
    तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
12 देवा, आम्हाला आमच्या शत्रूंचा पराभव करायला मदत कर.
    लोक आम्हांला मदत करु शकत नाहीत.
13 फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो.
    देव आमच्या शत्रूंचा पराभव करु शकतो.

प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.

109 देवा, माझ्या प्रार्थनेला
    तुझे कान बंद करु नकोस.
दुष्ट लोक माझ्याविषयी खोटंनाटं सांगत आहेत.
    ते माझ्याबद्दल असत्य गोष्टी सांगत आहेत.
लोक माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगत आहेत.
    ते कारण नसताना माझ्यावर हल्ला करत आहेत.
मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करतात म्हणून देवा,
    मी आता तुझी प्रार्थना करतो.
मी त्या लोकांसाठी चांगल्या गोष्टी केल्या
    पण ते माझ्यासाठी वाईट गोष्टी करत आहेत.
    मी त्यांच्यावर प्रेम केले पण ते माझा द्वेष करत होते.

“माझ्या शत्रूंनी वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
    ते चुकले आहेत हे सिध्द करण्यासाठी एखादा माणूस शोध.
माझा शत्रू चुकला आणि तो अपराधी आहे हे न्यायाधीशांना ठरवू दे.
    माझा शत्रू जे काही बोलतो त्यामुळे त्याची परिस्थिती अधिकच बिघडते.
माझ्या शत्रूला लवकर मरु दे.
    त्याचा व्यवसाय दुसऱ्या माणसाला मिळू दे.
माझ्या शत्रूच्या मुलांना अनाथ
    आणि त्याच्या बायकोला विधवा कर.
10 त्यांना त्यांचे घर गमावू दे
    आणि त्यांना भिकारी होऊ दे.
11 माझ्या शत्रूंच्या धनकोंना त्याच्याकडचे सगळे घेऊ दे
    आणि परक्यांना त्याच्या सर्व श्रमांचे फळ घेऊ दे.
12 माझ्या शत्रूंशी कुणीही दयाळू असू नये असे मला वाटते.
    त्याच्या मुलांना कुणी दया दाखवू नये असे मला वाटते.
13 माझ्या शत्रूचा संपूर्ण नाश कर.
    पुढच्या पिढीला त्याचे नाव सर्व गोष्टीवरुन काढून टाकू दे.
14 परमेश्वराला माझ्या शत्रूच्या वडिलांच्या पापांची आठवण करुन दिली जाईल असे मला वाटते,
    त्याच्या आईची पापे कधीही पुसली जाऊ नयेत असे मला वाटते.
15 परमेश्वराला त्या पापांची सदैव आठवण राहील अशी मी आशा करतो.
    आणि तो लोकांवर माझ्या शत्रूला पूर्णपणे विसरुन जायची शक्ती देईल अशी मी आशा करतो.
16 का? कारण त्या दुष्ट माणसाने कधीही काहीही चांगले केले नाही,
    त्याने कधीच कुणावर प्रेम केले नाही.
    त्याने गरीब, असहाय्य लोकांचे आयुष्य कष्टी केले.
17 त्या दुष्ट माणसाला दुसऱ्या लोकांचे वाईट कर
    असे सांगायला आवडायचे म्हणून त्या वाईट गोष्टी त्या माणसालाच होऊ दे.
तो दुष्ट माणूस लोकांचे भले होवो
    असे कधीही म्हणाला नाही, म्हणून त्याचेही भले होऊ देऊ नकोस.
18 शाप हेच त्याचे कपडे असू दे.
शाप हेच त्याचे पिण्याचे पाणी असू दे.
    शाप हेच त्याच्या शरीरावरचे तेल असू दे.
19 शाप त्या दुष्ट माणसांच्या शरीराभोवती गुंडाळण्याचे वस्त्र असू दे,
    आणि शापच त्यांच्या कमरे भोवतीचा पट्टा असू दे.”

20 परमेश्वर या सगळ्या गोष्टी माझ्या शत्रूंच्या बाबतीत करील अशी मी आशा करतो.
    जे लोक मला ठार मारायचा प्रयत्न करीत आहेत,
    त्या सर्वांना परमेश्वर या गोष्टी करेल अशी मी आशा करतो.
21 परमेश्वरा, तू माझा प्रभु आहेस म्हणून
    तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल अशा रीतीने मला वागव.
माझ्यावर तुझे खूप प्रेम आहे म्हणून मला वाचव.
22 मी फक्त एक गरीब, असहाय्य माणूस आहे.
    मी खरोखरच दुखी: आहे आणि माझे ह्रदयविदीर्ण झाले आहे.
23 दिवसाच्या शेवटी येणाऱ्या लांब सावल्यांप्रमाणे माझे आयुष्य संपले आहे असे मला वाटते.
    कुणीतरी झटकून टाकलेल्या किड्याप्राणे मी आहे असे मला वाटते.
24 मी भुकेला असल्यामुळे माझ्या गुडघ्यातली शक्ती क्षीण झाली आहे.
    माझे वजन घटते आहे आणि मी बारीक होत आहे.
25 वाईट लोक माझा अपमान करतात.
    ते माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या माना हलवतात.
26 परमेश्वरा, देवा, मला मदत कर.
    तुझे खरे प्रेम दाखव आणि माझा उध्दार कर.
27 नंतर त्या लोकांना तू मला मदत केल्याचे कळेल.
    तुझ्या शक्तीनेच मला मदत केली हे त्यांना कळेल.
28 ते वाईट लोक मला शाप देतात.
    परंतु परमेश्वरा, तू मला आशीर्वाद देऊ शकतोस.
    त्यांनी माझ्यावर हल्ला केला म्हणून त्यांचा पराभव कर नंतर मी, तुझा सेवक आनंदी होईन.
29 माझ्या शत्रूंना लाज आण.
    त्यांना त्यांची लाजच अंगरख्या प्रमाणे घालायला लाव.
30 मी परमेश्वराला धन्यवाद दिले.
    खूप लोकांसमोर मी त्याची स्तुती केली.
31 का? कारण परमेश्वर असहाय्य लोकांच्या मदतीसाठी उभा राहातो
    जे लोक त्यांना ठार मारायची शिक्षा देतात त्यांच्यापासून देव त्यांना वाचवतो.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center