M’Cheyne Bible Reading Plan
बेन-हदाद आणि अहाब यांच्यात लढाई
20 बेन-हदाद अरामचा राजा होता. त्याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली. त्याच्या बाजूला बत्तीस राजे होते. त्यांच्याकडे घोडे आणि रथ होते. त्यांनी शोमरोनला वेढा घातला आणि युध्द पुकारले. 2 इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे बेन-हदादने दूतांकरवी निरोप पाठवला. 3 संदेश असा होता, “बेन-हदादचे म्हणणे आहे, ‘तुमच्याकडील सोने रुपे तुम्ही मला द्यावे. तसेच तुझ्या बायका आणि मुलेही माझ्या हवाली करावी.’”
4 यावर इस्राएलच्या राजाचे उत्तर असे होते, “महाराज मी तर आता तुमच्याच ताब्यात आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळे जे माझे ते सर्व तुमचेच आहे.”
5 अहाबकडे हे दूत पुन्हा एकदा आले आणि म्हणाले, “बेनहदादचे म्हणणे असे आहे, ‘तुझ्याजवळचा सोन्याचांदीचा ऐवज तसेच बायकामुले तू माझ्या स्वाधीन केली पाहिजेस. 6 उद्याच मी माझ्या माणसांचे एक शोधपथक तिकडे पाठवणार आहे. ते तुझ्या तसेच तुझ्या कारभाऱ्यांच्या घराची झडती घेतील. तुमच्याजवळच्या सर्व मौल्यवान चीजा त्या माणसांच्या हवाली करा. ती माणसे त्या वस्तू मला आणून देतील.’”
7 तेव्हा राजा अहाबने आपल्या देशातील सर्व वडीलधाऱ्या माणसांची सभा घेतली. अहाब त्यांना म्हणाला, “हे पाहा, बेन-हदाद हा विघ्न आणत आहे. आधी त्याने माझ्या जवळचे सोने-चांदी तसेच माझी बायका मुले मागितली. त्याला मी कबूल झालो. आणि आता त्याला सर्वच हवे आहे.”
8 यावर ती वडीलधारी मंडळी आणि इतर लोक म्हणाले, “त्याच्या म्हणण्याला मान तुकवू नको. तो म्हणतो तसे करु नको.”
9 तेव्हा अहाबने बेन-हदादकडे निरोप पाठवला. अहाबने सांगितले, “तुझी पहिली मागणी मला मान्य आहे. पण तुझ्या दुसऱ्या आज्ञेचे मी पालन करु शकत नाही.”
बेनहदादला त्याच्या दूतांनी हा निरोप सांगितला. 10 तेव्हा बेन-हदादकडून दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या माणसांना काही राहणार नाही. असे झाले नाही तर देवाने माझे वाटोळे करावे.”
11 अहाब राजाचे त्याला उत्तर गेले. त्यात म्हटले होते. “बेनहदादला जाऊन सांगा की, जो चिलखत चढवतो त्याने, जो ते उतरवण्याइतक्या दीर्ख काळापर्यंत जगतो त्याच्या इतके फुशारुन जाऊ नये.”
12 राजा बेन-हदाद इतर राजांच्या बरोबर आपल्या तंबूत मद्यपान करत बसला होता. त्यावेळी हे दूत आले आणि राजाला हा संदेश दिला. त्याबरोबर बेनहदादने आपल्या माणसांना चढाईचा व्यूह रचायला सांगितले. त्याप्रमाणे लोकांनी आपापल्या जागा घेतल्या.
13 त्याच वेळी इकडे एक संदेष्टा अहाब राजांकडे आला. राजाला तो म्हणाला, “अहाब राजा, परमेश्वराचे तुला सांगणे आहे की, ‘एवढी मोठी सेना बघितलीस? मी, प्रत्यक्ष परमेश्वर, तुझ्या हातून या सैन्याचा पराभव करवीन. म्हणजे मग मीच परमेश्वर असल्याबद्दल तुझी खात्री पटेल.’”
14 अहाबने विचारले. “या पराभवासाठी तू कोणाला हाताशी धरशील?”
तेव्हा तो संदेष्टा म्हणाला, “प्रांत अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची परमेश्वर मदत घेईल.”
यावर राजाने विचारले, “या सैन्याचे नेतृत्व कोण करील?”
“तूच ते करशील” असे संदेष्ट्याने सांगितले.
15 तेव्हा अहाब राजाने अधिकाऱ्यांच्या हाताखालच्या तरुणांची कुमक गोळा केली. त्या तरुणांची संख्या दोनशे बत्तीस भरली. मग राजाने इस्राएलच्या सर्व फौजेला एकत्र बोलावले. तेव्हा ते एकंदर सात हजार होते.
16 राजा बेन-हदाद आणि त्याच्या बाजूचे बत्तीस राजे दुपारी आपापल्या तंबूमध्ये मद्यपान करण्यात आणि नशेत गुंग होते. त्यावेळी अहाबने हल्ला चढवला. 17 तरुण मदतनीस आधी चालून गेले. तेव्हा शोमरोनमधून सैन्य बाहेर आल्याचे राजा बेनहदादच्या माणसांनी त्याला सांगितले. 18 तेव्हा बेनहदाद म्हणाला, “ते हल्ला करायला आले असतील किंवा सलोख्याची किनंती करायला आले असतील. त्यांना जिवंत पकडा.”
19 राजा अहाबच्या तरुणांची तुकडी पुढे होती आणि इस्राएलचे सैन्य मागोमाग येत होते. 20 प्रत्येक इस्राएलीने समोरुन येणाऱ्याला ठार केले. त्याबरोबर अराममधली माणसे पळ काढू लागली. इस्राएलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. राजा बेनहदाद तर एका रथाच्या घोड्यावर बसून पळाला. 21 राजा अहाबने सेनेचे नेतृत्व करुन अरामच्या फौजेतील सर्व घोडे आणि रथ पळवले. अरामचा दारुन पारभव झाला.
22 यानंतर तो संदेष्टा राजा अहाबकडे गेला आणि म्हणाला, “अरामचा राजा बेनहदाद पुढच्या वसंत ऋतुत पुन्हा तुझ्यावर चालून येईल. तेव्हा तू आता परत जा आणि आपल्या सैन्याची ताकद आणखी वाढव. काळजीपूर्वक आपल्या बचावाचे डावपेच आखा.”
बेन हदादची आणखी एक स्वारी
23 राजा बेन-हदादचे अधिकारी त्याला म्हणाले, “इस्राएलचे देव हे पर्वतराजीतले देव आहेत. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू. 24 आता तुम्ही असे करायला हवे त्या 32 राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा. 25 जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएलोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली.
26 वसंत ऋतुत बेनहदादने अराममधील लोकांना एकत्र आणले आणि तो इस्राएलवरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला.
27 इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता.
28 एक देवाचा माणूस (संदेष्टा) इस्राएलच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता: “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करवणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.’”
29 दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकांनी अरामचे एकलक्ष सैनिक एका दिवसात ठार केले.
30 जे बचावले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेनहदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका खोलीत लपला होता. 31 त्याचे सेवक त्याला म्हणाले, “इस्राएलचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण जाडेभरडे कपडे घालून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळून [a] इस्राएलच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल सुध्दा.”
32 त्या सर्वांनी मग भरडे कपडे घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलच्या राजाकडे आले. त्याला म्हणाले, “तुमचा दास बेनहदाद तुमच्याकडे ‘जीवदान मागत आहे’”
अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा भाऊच [b] आहे.”
33 बेनहदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबने बेनहदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेनहदाद तुमचा भाऊच आहे.”
अहाबने बेनहदादला “आपल्यासमोर बोलावून घेतले.” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबने त्याला आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले.
34 बेनहदाद अहाबला म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुझ्या वडीलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडीलांनी शोमरोन मध्ये बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील”
अहाब त्यावर म्हणाला, “या करारावर मी तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतिचा करार केला. मग राजा अहाबने राजा बेन-हदादला मुक्त केले.
अहाबला संदेष्ट्याचा विरोध
35 एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला सांगितले, “मला एक फटका मार.” परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला, पण दुसऱ्या संदेष्ट्यांने तसे करायचे नाकारले. 36 तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला, “तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस. तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल” तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्याला ठार मारले.
37 मग हा पहिला संदेष्टा एका माणसाकडे गेला. त्याला त्याने स्वतःला “फटका मारायला!” सांगितले.
त्या माणसाने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले. 38 त्या संदेष्ट्याने मग स्वतःच्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहात बसला. 39 राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्याला म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, ‘याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा पंचाहत्तर पौंड चांदीचा दंड भरावा लागेल.’ 40 पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो माणूस पळून गेला.”
यावर इस्राएलचा राजा म्हणाला, “त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे. तेव्हा निकाल उघडच आहे. तो माणूस म्हणाला ते तू केले पाहिजेस.”
41 आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. राजाने त्याला पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले. 42 मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्याला तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.’”
43 यानंतर राजा शोमरोनला आपल्या घरी परतला. तो अतिशय चिंताग्रस्त आणि खिन्न झाला होता.
3 म्हणून, आम्हाला अधिक वाट पाहणे शक्य नसल्याने, आम्ही अथेन्स येथेच राहण्याचे ठरविले.आणि आम्ही तीमथ्याला पाठविले, जो आमचा भाऊ आणि देवाच्या कामाकरीता ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करण्याकरीता सहकारी असा आहे, आम्ही त्याला तुम्हाला दृढ करण्यासाठी आणि तुमच्याविषयीच्या विश्वासात तुम्हाला उत्तेजन देण्यासाठी पाठविले आहे. 3 यासाठी की, सध्या होणाऱ्या छळामुळे तुम्ही कोणी अस्वस्थ होऊ नये. कारण तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे की, यासाठीच आमची दैवी नेमणूक झाली आहे. 4 खरे तर जेव्हा आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा आम्ही तुम्हांला अगोदरपासूनच सातत्याने सांगत होतो की, आपला छळ होणार आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, नेमके तसेच घडले आहे. 5 म्हणून मी अधिक काळ वाट पाहू शकत नसल्याने तुमच्या विश्वासाविषयी माहिती करुन घेण्याविषयी तीमथ्याला पाठविले. कारण मोहात टाकणाऱ्याने तुम्हाला मोहात टाकले असेल आणि आमचे श्रम व्यर्थ गेले असतील अशी मला भीति वाटत होती.
6 पण तीमथ्य आताच तुमच्याकडून परत आला आहे. आणि त्याने आम्हांला तुमचा विश्वास व प्रिति याविषयी चांगली बातमी सांगितली आहे. त्याने आम्हाला सांगितले की, तुम्ही नेहमीच आमच्याविषयीच्या चांगल्या आठवणी काढता आणि ज्याप्रमाणे आम्ही तुम्हांला भेटण्यासाठी आतुर झालो आहोत, तसे तुम्हीही झाला आहात. 7 म्हणून आमच्या सर्व अडचणीत व त्रासात बंधूंनो, तुमच्याविषयी आम्ही उत्तेजित झालो याला कारण म्हणजे तुमचा विश्वास. 8 होय आम्हाला माहीत आहे तुम्ही प्रभूमध्ये भक्कमपणे उभे आहात आणि ही गोष्ट आमच्यासाठी जीवनदायी श्वास आहे. 9 तुमच्यामुळे आमच्या देवासमक्ष ज्या सर्व आनंदाचा अनुभव आम्ही घेत आहोत त्याबद्दलचे देवाकडे तुमच्यासाठी आम्ही पुरेसे आभार कसे मानायचे? 10 दिवस आणि रात्र आम्ही कळकळीने प्रार्थना करीत आहोत की, आम्हाला तुमची व्यक्तिश: भेट घेणे शक्य व्हावे आणि अजुनही तुमच्या विश्वासात जी उणीव आहे ती पुरवावी.
11 आता देव स्वतः आमचा पिता आहे आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त तो आम्हांला तुमच्याकडे येण्याचा मार्ग दाखवो. 12 प्रभु करो आणि तुम्हाला प्रीतीत वाढवो. आणि भरुन टाको. जसे आम्ही तुम्हावरील प्रेमाने भरभरुन वाहत आहोत तसे तुम्हीही एकमेकासाठी व सर्वांसाठी प्रीतीने भरभरुन वाहावे. 13 यासाठी की, जेव्हा आमचा प्रभु येशू त्याच्या पवित्र जनांसह येतो तेव्हा तो अशा प्रकारे तुमची अंतःकरणे बळकट करो आणि त्यांना पवित्रतेने निर्दोष करो.
नबुखद्नेस्सरचे स्वप्न
2 नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षांत काही स्वप्ने पडली. त्या स्वप्नांमुळे तो काळजीत पडला व त्याची झोप उडाली. 2 म्हणून त्याने त्याच्या ज्ञानी माणसांना बोलावून घेतले. हे ज्ञानी स्वप्नांचा अर्थ लावण्यासाठी आणि भविष्यात काय घडेल, हे सांगण्यासाठी मंत्र-तंत्र करीत व ताऱ्यांचे निरीक्षण करीत. ह्या लोकांनी राजाला काय स्वप्न पडले आहे, ते सांगावे, अशी राजाची इच्छा होती. मग ते लोक राजाच्या समोर येऊन उभे राहिले.
3 राजा त्यांना म्हणाला, मला पडलेल्या स्वप्नामुळे मी चिंतेत पडलो आहे. मला स्वप्नाचा अर्थ समजावून घ्यायचा आहे.
4 मग खास्दी अरामी भाषेत राजाला म्हणाले, राजा, चिरंजीव हो! आम्ही तुझे सेवक आहोत. कृपा करून आम्हाला तुझे स्वप्न सांग, म्हणजे मग आम्ही तुला त्याचा अर्थ सागू.
5 तेव्हा नबुखद्नेस्सर राजा त्यांना म्हणाला, नाही! तुम्हीच मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगितला पाहिजे. तुम्ही हे सांगितले नाही, तर तुमचे तुकडे करण्याचा हुकूम मी देईन. एवढेच नाही तर तुमच्या घरांची राखरांगोळी करीन. 6 पण तुम्ही मला माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगितलात, तर मी तुम्हाला भेटी, बक्षिसे देईन. तुमचा सन्मान करीन. तेव्हा आता माझे स्वप्न व त्याचा अर्थ सांगा.
7 ते ज्ञानी लोक पुन्हा राजाला म्हणाले, “कृपा करून बस आम्हाला तुझे स्वप्न सांग म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
8 मग नबुखद्नेस्सर उत्तरला, तुम्ही वेळ काढीत आहात, हे मला कळले आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्हाला कळला, असे मला वाटते. 9 तुम्ही मला माझे स्वप्न सांगितले नाहीत तर तुम्हाला शिक्षा होणार, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणून तुम्ही सर्व एक होऊन माझ्याशी खोटे बोलत आहात. तुम्ही वेळकाढूपणा करू पाहत आहात. मी तुम्हाला सांगितलेले विसरेन अशी आशा तुम्ही धरून आहात. पण आता आधी मला माझे स्वप्न सांगा. तुम्ही मला स्वप्न सांगू शकलात, तर तुम्ही त्याचा खूरा अर्थही सांगू शकाल हे मला पटेल.
10 खास्दी राजाला म्हणाले, “राजा, तू जे मागत आहेस, ते देऊ शकणारा एकही माणूस या पृथ्वीवर नाही. अजूनपर्यंत कोणत्याही राजाने, ज्ञानी वा मात्रिक अथवा खास्दी याच्याजवळ अशा प्रकारची मागणी केलेली नाही. अगदी मोठ्या व सामर्थ्यवान राजांनीसुध्दा ज्ञानी माणसांकडे असे काही, कधीही मागितलेले नाही. 11 राजा, अशक्य गोष्ट करण्यास सांगत आहे. फक्त दैवतंच राजाला त्याचे स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकतात. पण दैवत माणसांमध्ये राहात नाहीत.”
12 हे बोलणे ऐकून राजाचा पारा चढला. मग त्याने बाबेलमधील सर्व ज्ञानी माणसांना ठार करण्याचा हुकूम दिला. 13 राजाच्या हुकूमाची दवंडी पिटविण्यात आली. सर्व ज्ञानी माणसे ठार केली जाणार होती. राजाचे लोक दानीएलला व त्याच्या मित्रांना ठार मारण्यासाठी त्यांचा तपास करण्यासाठी गेले.
14 अर्योक शिपायांचा म्होरक्या होता. तोच बाबेलमधील ज्ञानी माणसांना ठार मारणार होता. पण दानीएल त्याच्याशी चातुर्याने व विनयाने बोलला. 15 “दानीएल अर्योकला म्हणाला राजाने अशी कडक शिक्षा का ठोठावली?”
मग अर्योकने राजाच्या स्वप्नाची सर्व हकिगत वर्णन केली. मग दानीएलला सर्व समजले. 16 सर्व हकिगत समजताच दानीएल नबुखद्नेस्सर राजाकडे गेला व त्याने राजाजवळ थोडा वेळ मागितला. मग तो राजाला त्याचे स्वप्न व त्या स्वप्नाचा अर्थ सांगणार होता.
17 मग दानीएल त्याच्या घरी गेला. हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्या आपल्या मित्रांना त्याने सर्व हकिगत सांगितली. 18 दानीएलाने आपल्या मित्रांना स्वर्गातील देवाची प्रार्थना करण्यास सांगितले. दानीएलने त्यांना प्रार्थना करण्यास सांगितले कारण त्यामुळे देव त्यांच्यावर कृपा करील व हे रहस्य समजण्यास मदत करील. मग तो व त्याचे मित्र, बाबेलच्या इतर ज्ञानी माणसाबरोबर मारले जाणार नाहीत, असे त्याला वाटले.
19 रात्री, देवाने दानीएलला दृष्टान्त देऊन सर्व रहस्य उलगडून सांगितले. मग दानीएलने स्वर्गातील देवाचे स्तुतिस्तोत्र गायले. तो म्हणाला,
20 “सदासर्वकाळ देवाच्या नावाची स्तुती करा.
सामर्थ्य व ज्ञान त्याच्यापाशीच आहे.
21 तो काळ आणि ऋ तू बदलतो.
आणि राजेही बदलतो.
तोच राजांना सत्ता देतो.
आणि तोच त्यांची सत्ता काढून घेतो.
लोकांनी शहाणे व्हावे म्हणून तो त्यांना शहाणपण देतो,
त्यांनी ज्ञानी व्हावे म्हणून तो त्यांना सर्व गोष्टी शिकू देतो.
22 समजण्यास अतिशय कठीण असलेली, गुप्त रहस्ये त्याला माहीत असतात.
प्रकाश त्याच्याबरोबर असल्यामुळे,
अंधारात आणि गुप्त जागी काय आहे ते त्याला कळते.
23 माझ्या पूर्वजांच्या देवा, मी कृतज्ञ आहे, मी तुझी स्तुती करतो.
तू मला ज्ञान व शक्ती दिलीस.
मी विचारलेल्या गोष्टी सांगितल्यास.
तूच मला राजाच्या स्वप्नाबद्दल सांगितलेस.”
दानीएल स्वप्नचा अर्थ सांगतो
24 मग दानीएल अर्योककडे गेला. नबुखद्नेस्सर राजाने.बाबेलमधील ज्ञानी माणसांना ठार मारण्याच्या काम अर्योकचीच निवड केली होती. दानीएल त्याला म्हणाला, बाबेलमधील ज्ञानी माणसांना मारू नको. मला राजाकडे घेऊन चल! मी राजाला, त्याचे स्वप्न व त्याचा अर्थ, सांगीन.
25 मग अर्योकने ताबडतोब दानीएलला राजाकडे नेले. अर्योक राजाला म्हणाला, महाराजांना त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकणारा एकजण मला यहूदातील कैद्यां मध्ये सापडला आहे.
26 राजाने दानीएलला (बेलशटस्सरला) प्रश्न केला, तू मला माझे स्वप्न व त्याचा अर्थ सागू शक तोस का?
27 दानीएलने उत्तर दिले राजा, नबुखद्नेस्सर, तू विचारलेली गुप्त गोष्ट ज्ञानी किवा मांत्रिक अथवा खास्दी कोणीच सांगू शकणार नाही. 28 पण अशा रहस्यमय गोष्टी स्वर्गातील देवच सांगतो. पुढे काय घडणार हे दाखविण्यासाठीच नबुखद्नेस्सर राजाला देवाने स्वप्नात पाडले. तू झोपला असताना पुढील गोष्टी स्वप्नात पाहिल्यास. 29 राजा, तू तुझ्या शय्येवर झोपला होतास. मग तू भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबंद्दल विचार करायला लागलास. देव लोकांना रहस्ये सांगू शकतो त्याने तुला भविष्यात काय घडणार ते दाखविले. 30 देवाने मलाही ते रहस्य सांगितले. का? मी इतरांपेक्षा ज्ञानी आहे म्हणून नव्हे, तर तुला त्याचा अर्थ कळावा आणि तुझ्या मनात काय विचार येऊन गेले ते तुला समजावे, म्हणूनच देवाने मला हे रहस्य सांगितले.
31 राजा, तू स्वप्नात तुझ्यासमोर एक प्रचंड, चकचकीत, मनावर छाप पाडणारा पुतळा पाहिलास. त्याच्याकडे बघताच कोणाचेही डोळे आश्चर्याने विस्फारावे असा तो होता. 32-33 पुतव्व्याचे डोके शुध्द सोन्याचे होते. छाती आणि हात चांदीचे होते पोट व वरील पायाच्या बाकीचा भाग काशाचा होता. खालील पायाचा भाग लोखंडाचा होता. ह्या पुतव्व्याची पावले लोखंड व माती यांची होती. 34 तू पुतव्व्याकडे बघत असतानाच एक कापलेला दगड तुला दिसला. तो दगड कोणा माणसाने छेदलेला नव्हता. मग तो दगड (हवेतून गेला) आणि पुतव्व्याच्या लोखंड व माती यांनी बनेलेल्या पायावर आदळला.त्याने पावलांचा चक्काचूर केला. 35 त्यानंतर एकदमचलोखंड माती, काशे, चांदी, सोने ह्यांचा चुरा झाला तो चुरा उन्हाळ्यातील खळ्यातील फोलकटाप्रमाणे वाऱ्याने दूरवर उडवला गेला. मागे काहीच उरले नाही. तेथे पुतळा होता हे कोणलाही खरे वाटले नसते. मग पुतव्व्यावर आदळणाऱ्या दगडाचा मोठा पर्वत झाला व त्याने सर्व पृथ्वी व्यापली.
36 “हेच तुझे स्वप्न होते. आता आम्ही राजाला त्या स्वप्नाचा अर्थ सांगतो. 37 राजा तू सर्वांमध्ये मोठा राजा आहेस. स्वर्गातल्या देवाने तुला राज्य, सत्ता, सामर्थ्य व वैभव दिले आहे. 38 देवाने तुझ्याहाती नियंत्रण दिले आहे. म्हणून तू माणसे, हिंस्र प्राणी, पक्षी ह्यावर काबू ठेवतोस. ते जेथे कोठे असतील तेथे त्यांच्यावर देवाने तुझी सत्ता ठेवली आहे. नबुखद्नेस्सर राजा, तूच त्या पुतव्व्याचे सोन्याचे डोके आहेस.
39 “तुझ्यानंतर येणारे राज्य म्हणजेच पुतव्व्याचा चांदीचा भाग, हे राज्य तुझ्या राज्याएवढे श्रेष्ठ नसेल. नंतर, तिसरे राज्य पृथ्वीवर सत्ता गाजवेल हा काशाचा भाग होय. 40 मग चौथे राज्य येईल ते लोखंडाप्रमाणे मजबुत असेल. ज्याप्रमाणे लोखंड वस्तूचे तुकडे करते, चुरा करते, त्याप्रमाणे ते इतर सर्व राज्यांचा चक्काचूर करील.
41 “पुतव्व्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा बनलेला होता, असे तुला दिसले. ह्याचा अर्थ चौथ्या राज्यात भाग असतील. तू लोखंड मातीत मिसळलेले पाहिलेस. म्हणजेच त्या राज्याला थोडे लोखंडासारखे बळ असेल. 42 पुतव्व्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. म्हणजेच चौथे राज्य काही प्रमाणात लोखंडासारखे बळकट तर काही प्रमाणात मातीसारखे दुर्बळ, कच्चे असेल. 43 तू लोखंडात माती मिसळलेली पाहिलेस पण लोखंड व माती यांचे एकजीव मिश्रण होऊ शकत नाही त्याचप्रमाणे चौथ्या राज्यात वेगवेगळे लोक असतील त्यांची एकी होणार नाही.
44 “चौथ्या राजाच्या कारकिर्दीत, स्वर्गातला देव आणखी एक राज्य निर्माण करील. ते कायमचे राहील. त्याचा कधीही नाश होणार नाही. ते दुसऱ्या घराण्याकडे सोपविता येणार नाही. हे राज्य इतर राज्यांना चिरडून टाकील, त्यांचा शेवट करील पण ते राज्य सदासर्वकाळ टिकून राहील.
45 “राजा तू पर्वेंतातून एक दगड छेदलेला पाहिलास. पण तो कोणा माणसाने छेदलेला नव्हता. त्या दगडाने लोखंड, मैंती, काशे चांदी सोने यांचा चुराडा केला. ह्यातून देवाने तुला भविष्यात घडणाऱ्या घटनाच दाखविल्या आहेत. स्वप्न खरे आहे व त्याच्या अर्थावरही तू विश्वास ठेऊ शकतोस.”
46 मग नबुखद्नेस्सर राजाने दानीएलापुढे नमन केले. क्ष्याने दानीएलची स्तुती केली. दानीएलाच्या सन्मानार्थ त्याला भेट व धूप देण्याचा त्याने हुकूम दिला. 47 मग राजा दानीएलला म्हणाला, “तुझा देव अती महत्वाचा व सामर्थ्यशाली आहे, ह्याची मला खात्री पटली. तो परमेश्वरच राजांचा राजा आहे, तो लोकांना अज्ञात गोष्टी सांगतो, हे खरेच आहे म्हणून तू रहस्याचा उलगडा करून देऊ शकलास.”
48 मग राजाने दानीएलला राज्यात महत्वाचे अधिकारपद दिले. त्याने त्याला बहुमोल भेटी दिल्या. राजांने बाबेलच्या परगण्याची सत्ता दानीएलकडे सोपविली. त्याने सर्व ज्ञानी माणसांचा प्रमुख म्हणून दानीएलची नेमणूक केली. 49 मग शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांची बाबेल परगण्याचे मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची विनंती दानीएलने राजाला केली व राजाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केले. दानीएल स्वतः राजाचा महत्वाचा व जवळचा माणूस बनला.
106 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या.
देवाचे प्रेम सदैव राहील.
2 परमेश्वर खरोखरच किती महान आहे याचे वर्णन कुणीही करु शकणार नाही.
देवाची जितकी स्तुती करायला हवी तितकी कुणीही करु शकणार नाही.
3 जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात ते सुखी असतात.
ते लोक सदैव चांगली कृत्ये करतात.
4 परमेश्वरा, तू जेव्हा तुझ्या माणसांशी दयाळू असतोस तेव्हा माझी आठवण ठेव.
मलाही वाचवायचे आहे हे लक्षात ठेव.
5 परमेश्वरा, तू तुझ्या माणसांसाठी
ज्या चांगल्यागोष्टी करतोस त्यांत मला वाटेकरी होऊ दे.
मला तुझ्या माणसांबरोबर आनंदी होऊ दे.
मला ही तुझ्या माणसांबरोबर तुझा अभिमान वाटू दे.
6 आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले.
आम्ही चुकलो.
आम्ही दुष्कृत्ये केली.
7 परमेश्वरा, मिसरमधले आमचे पूर्वज
तू केलेल्या चमत्कारांपासून काहीही शिकले नाहीत.
ते लाल समुद्राजवळ होते तेव्हा
आमचे पूर्वज तुझ्याविरुध्द गेले.
8 परंतु देवाने आमच्या पूर्वजांचा उध्दार केला तो केवळ त्याच्या नावा खातर,
देवाने त्याची महान शक्ती दाखविण्यासाठी त्यांना वाचवले.
9 देवाने आज्ञा केली आणि लाल समुद्र कोरडा झाला.
देवाने आमच्या पूर्वजांना खोल समुद्रातून वाळवंटासारख्या कोरड्या प्रदेशात नेले.
10 देवाने आमच्या पूर्वजांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवले.
देवाने त्यांची त्यांच्या शत्रूंपासून सुटका केली.
11 देवाने त्यांच्या शत्रूंना समुद्रात झाकून टाकले.
शत्रूंपैकी एकही जण सुटू शकला नाही.
12 नंतर आमच्या पूर्वजांचा देवावर विश्वास बसला.
त्यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली.
13 परंतु आमचे पूर्वज लवकरच देवाने केलेल्या गोष्टी
विसरले त्यांनी देवाचा उपदेश ऐकला नाही.
14 आमचे पूर्वज वाळवंटात भुकेले झाले
आणि त्यांनी शुष्क झालेल्या भूमीत देवाची परीक्षा पाहिली.
15 परंतु देवाने त्यांना त्यांनी मागितलेल्या गोष्टी दिल्या.
पण त्याने त्यांना भयानक रोगही दिला.
16 लोकांना मोशेचा मत्सर वाटला.
त्यांनी अहरोनचा, परमेश्वराच्या पवित्र याजकाचा हेवा केला.
17 म्हणून देवाने त्या मत्सरी लोकांना शिक्षा केली.
जमीन दुभंगली आणि तिने दाथानला गिळले.
नंतर ती मिटली आणि तिने अबिरामच्या समुदायाला झाकून टाकले.
18 नंतर अग्नीने त्या जमावाला जाळले.
अग्नीने त्या दुष्टांना जाळून टाकले.
19 त्या लोकांनी होरेब पर्वतावर सोन्याचे वासरु केले.
त्यांनी मूर्तीपूजा केली.
20 त्या लोकांनी त्याच्या वैभवशाली देवाची गवतखाणाऱ्या
बैलाच्या मूर्तीबरोबर अदलाबदल केली.
21 देवाने आमच्या पूर्वजांना वाचवले.
पण ते मात्र त्याला पूर्णपणे विसरले.
ज्या देवाने मिसरमध्ये चमत्कार केले त्या देवाला ते विसरले.
22 देवाने हामच्या देशात अद्भुत गोष्टी केल्या.
देवाने लाल समुद्राजवळ भयानक गोष्टी केल्या.
23 देवाला त्या लोकांचा नाश करायची इच्छा होती.
परंतु मोशेने त्याला थोपवले.
मोशे देवाचा निवडलेला सेवक होता.
देव खूप रागावला होता.
पण मोशेने त्याचा मार्ग अडविला म्हणून देवाने लोकांचा नाश केला नाही. [a]
24 परंतु नंतर त्या लोकांनी कनानच्या सुंदर देशात जायला नकार दिला.
त्या देशात राहाणाऱ्या लोकांचा पराभव करायला देव मदत करेल यावर विश्वास ठेवायला त्यांनी नकार दिला.
25 आमच्या पूर्वजांनी देवाचे
ऐकायला नकार दिला.
26 म्हणून देवाने शपथ घेतली की
ते वाळवंटात मरतील.
27 देवाने वचन दिले की मी दुसऱ्या लोकांना त्यांच्या वंशजांचा पराभव करु देईन.
देवाने वचन दिले की मी आमच्या पूर्वजांना भिन्नभिन्न राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.
28 नंतर बआल पौर येथे देवाचे लोक बआलची पूजा करण्यास एकत्र जमले.
ते जंगली भोजनावळीत सामील झाले आणि मेलेल्या [b] लोकांना अर्पण केलेले बळी त्यांनी खाल्ले.
29 देव त्याच्या माणसांवर खूप रागावला,
देवाने त्यांना खूप आजारी पाडले.
30 पण फीनहासने देवाची प्रार्थना केली [c]
आणि देवाने आजार थांबवला.
31 फीनहासने चांगली गोष्ट केली हे देवाला माहीत होते.
व याची सदैव आठवण ठेवील.
32 मरीबा येथे लोक खूप रागावले
आणि त्यांनी मोशेला काही तरी वाईट करायला लावले.
33 त्या लोकांनी मोशेला खूप अस्वस्थ केले
म्हणून मोशे विचार करण्यासाठी न थांबता बोलला.
34 परमेश्वराने लोकांना कनानमध्ये राहाणाऱ्या इतर देशाचा नाश करायला सांगितले.
पण इस्राएलच्या लोकांनी देवाची आज्ञा पाळली नाही.
35 ते इतर लोकांत मिसळले आणि
ते लोक जे करीत होते तेच त्यांनीही केले.
36 ते लोक देवाच्या माणसांसाठी सापळा बनले.
ते लोक ज्या देवाची प्रार्थना करीत होते त्याच देवाची पूजा करायला देवाच्या माणसांनी सुरुवात केली.
37 देवाच्या माणसांनी स्वःतचीच
मुले मारली आणि मुले त्या राक्षसांना अर्पण केली.
38 देवाच्या माणसांनी निरपराध लोकांना ठार मारले.
त्यांनी स्वतच्या मुलांना ठार मारले
आणि त्यांना त्या खोट्या देवाला अर्पण केले.
39 म्हणून देवाची माणसे त्या इतर माणसांबरोबर अमंगल झाली.
देवाची माणसे त्यांच्या देवाशी प्रामाणिक राहिली नाहीत
आणि इतर लोकांनी जी कृत्ये केली तीच त्यांनीही केली.
40 देव त्याच्या माणसांवर रागावला.
देवाला त्यांचा कंटाळा आला.
41 देवाने त्याच्या माणसांना इतर देशांना देऊन टाकले.
देवाने त्याच्या शत्रूंना त्यांच्यावर राज्य करु दिले.
42 देवाच्या माणसांच्या शत्रूंनी त्यांना आपल्या काबूत ठेवले
आणि त्यांचे आयुष्य कठीण केले.
43 देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले.
पण ते देवाविरुध्द गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले.
देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्टी केल्या.
44 पण जेव्हा जेव्हा देवाची माणसे संकटात होती
तेव्हा तेव्हा त्यांनी देवाला मदतीसाठी हाक मारली
आणि प्रत्येक वेळी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली.
45 देवाने नेहमी आपल्या कराराची आठवण ठेवली
आणि आपल्या महान प्रेमाने त्यांचे सात्वन केले.
46 इतर देशांनी त्यांना कैदी बनवले
पण देवाने त्यांना त्याच्या माणसांशी दयाळू राहायला सांगितले.
47 परमेश्वरा, देवा आमचे रक्षण कर इतर देशातून
आम्हाला गोळाकर म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू
आणि तुझे गुणगान करु.
48 परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या.
देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे.
आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन!”
परमेश्वराची स्तुती करा.
2006 by World Bible Translation Center