M’Cheyne Bible Reading Plan
एलीया आणि दुष्काळ
17 गिलादमधील तिश्बी या गावात एलीया हा संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या सामर्थ्यावर मी हे सांगतो की येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. पाऊस पडलाच तर माझ्या आज्ञेने पडेल.”
2 मग परमेश्वर एलीयाला म्हणाला, 3 “हा भाग सोड आणि पूर्वेला जा. करीथ या ओहोळापाशी लपून राहा. यार्देन नदीच्या पूर्वेला हा ओहोळ आहे. 4 त्या ओहोळाचे पाणी तू पी. कावळे तिथे तुला अन्न आणून देतील. त्यांना मी तसे सांगितले आहे.” 5 तेव्हा एलीया परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यार्देन नदीच्या पूर्वेला असलेल्या करीथ या ओहोळा जवळ राहायला गेला. 6 रोज सकाळ संध्याकाळ त्याला कावळे जेवण आणून देत. ओहोळाचे पाणी एलीया पीत असे.
7 पाऊस नव्हताच, तेव्हा काही काळानंतर ओहोळ सुकला. 8 तेव्हा परमेश्वर एलीयाला म्हणाला, 9 “सिदोनमधील सारफथ येथे जाऊन राहा तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.”
10 तेव्हा एलीया सारफथ येथे गेला. तो वेशीजवळ जातो तर त्याला एक बाई भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करत होती. एलीया तिला म्हणाला, “मला थोडे पाणी प्यायला मिळेल का?” 11 ती पाणी आणायला निघाली तेव्हा एलीया तिला म्हणाला, “मला एखादा भाकरीचा तुकडाही दिलास तर बरे!”
12 तेव्हा ती बाई म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा मुलगा आणि मी जेवू आणि मग भुकेने मरु.”
13 तेव्हा एलीया तिला म्हणाला, “काही काळजी करु नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करुन मला आणून दे मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. 14 इस्राएलचा परमेश्वर देव म्हणाला आहे, ‘तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.’”
15 तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा मुलगा यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. 16 पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.
17 काही दिवसांनंतर या बाईचा मुलगा आजारी पडला. त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्वास थांबला. 18 तेव्हा ती बाई म्हणाली, “एलीया, तू तर संदेष्टा आहेस मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?”
19 एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्याला ठेवले. 20 एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?” 21 मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखर घातल्यासारखे करुन प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.”
22 एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा श्र्वासेच्छवास पुन्हा सुरू झाला व तो जिवंत झाला. 23 एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्याला सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा मुलगा जिवंत आहे.”
24 ती बाई म्हणाली, “तू खरोखरच देवाचा माणूस आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्यामार्फत बोलतो हे आता मला कळले.”-
4 मालकांनो, आपल्या गुलामांना जे न्याय्य व योग्य ते द्या.
पौल ख्रिस्ती लोकांना काही गोष्टी करावयास सांगतो
2 नेहमी प्रार्थना करीत राहा. उपकारस्तुति करीत त्यामध्ये दक्ष राहा. 3 त्याचवेळी आमच्यासाठीसुद्धा प्रार्थना करा, यासाठी की, ख्रिस्ताविषयीचे जे रहस्य देवाने आम्हांला कळविले, त्याविषयी बोलण्यासाठी, त्याचा संदेश ऐकण्यासाठी, देवाने आमच्यासाठी दार उघडावे. कारण त्या उपदेश करण्याने मी बंधनात आहे. 4 ते रहस्य ज्या रीतीने मी सांगावयास पाहिजे, त्याप्रकारे सांगण्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा.
5 बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा आणि प्रत्येक संधीचा चांगला फायदा करुन घ्या. 6 तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. यासाठी की प्रत्येक मनुष्याला कसे उत्तर द्यावे हे तुम्हांला कळावे.
पौलाबरोबर असलेल्या लोकांविषयीची बातमी
7 तुखिक, प्रिय बंधु, विश्वासू सेवक आणि प्रभूमधील सहकारी तो तुम्हांला माझ्याविषयी सगळी माहिती देईल. 8 त्याला मी याच कारणाने पाठवीत आहे की, आमच्याविषयीची बातमी तुम्हांला कळावी आणि तुमची अंतःकरणे उत्तेजित व्हावीत. 9 मी त्याला आमचा विश्वासू व प्रिय बंधु अनेसिम, जो तुमच्यातील एक आहे, याच्याबरोबर पाठवीत आहे, तो तुम्हांला येथे काय घडत आहे ते सांगतील.
10 अरिस्तार्ख, माझ्या सोबतीचा कैदी, तुम्हाला सलाम सांगतो, त्याचप्रमाणे बर्णबाचा चुलत भाऊ मार्क ज्याच्याविषयी तुम्हाला अगोदरच माहिती मिळाली आहे, तो जर तुमच्याकडे आला तर त्याचे स्वागत करा. 11 येशू ज्याला युस्त म्हणतात तोसुद्धा तुम्हाला सलाम सांगतो. यहूदी विश्वासणाऱ्यांपैकी फक्त हेच काय ते देवाच्या राज्याचा प्रसार करण्यात माझ्याबरोबर काम करीत आहेत. ते मला आधीच फार मोठा आधार आहेत.
12 एपफ्राससुद्धा तुम्हाला सलाम सांगतो, तो तुमच्यापैकीच ख्रिस्त येशूचा सेवक आहे. तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्क वाढलेले आणि देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यात तुम्ही पूर्णपणे गुंतलेले असावे. 13 जे लवादिकीयात व हेरापल्लीत राहत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे. याचा मी साक्षी आहे. 14 प्रिय वैद्य लूक आणि देमास तुम्हांला सलाम सांगतात.
15 लावदिकीयात राहणारे बंधु आणि नेफा आणि तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम सांगा. 16 आणि जेव्हा तुम्हाला हे पत्र वाचून दाखविले जाईल, तेव्हा ते लावदकीयाच्या मंडळीतसुद्धा वाचले जाते की नाही ते पाहा आणि तू सुध्दा माझे पत्र वाच. 17 आणि अर्खिप्पाला सांगा, “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पुढे चालू ठेव.”
18 मी, पौल, हा सलाम माझ्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहितो. मी तुरुंगात आहे हे लक्षात ठेवा. देवाची कृपा तुम्हांबरोबर असो.
मंदिरातून वाहणारे पाणी
47 त्या माणसाने मला पुन्हा मंदिराच्या दाराशी नेले. मंदिराच्या पूर्वेकडील उंबऱ्याच्या खालून पाणी वाहताना मला दिसले (मंदिराचे तोंड पूर्वेला होते.) मंदिराच्या दक्षिणेच्या भागाखालून पाणी वेदीच्या दक्षिणबाजूने वाहात होते. 2 त्या माणसाने मला उत्तरेच्या दाराने बाहेर आणले आणि फिरवून पूर्वेकडील बाहेरच्या दाराकडे नेले. पाणी दाराच्या दक्षिणेकडून येत होते.
3 हातात मोजमापाची फीत घेऊन तो माणूस पूर्वेला गेला. त्याने 1,000 हात (1/3 मैल) अंतर मोजले मग त्याने मला त्या अंतरापर्यंत पाण्यातून जायला सांगितले. पाणी फक्त घोट्यापर्यंत होते. 4 मग त्याने आणखी 1,000 हाताचे (1/3 मैलाचे) अंतर मोजले. पुन्हा मला पाण्यातून तेथपर्यंत चालण्यास सांगितले. तेथे पाणी माझ्या गुडघ्यापर्यंत आले. मग त्याने पुन्हा 1,000 हाताचे (1/3 मैलाचे) अंतर मोजून, तेथपर्यंत मला पाण्यातून चालण्यास सांगितले. तेथे पाणी कमरेइतक्या खोलीचे होते. 5 त्या माणसाने पुढे आणखी 1,000 हात (1/3 मैल) अंतर मोजले. पण येथे पाणी खूपच खोल असल्याने त्यातून चालणे शक्य नव्हते. त्याची नदी झाली होती. पाणी पोहता येईल इतके खोल होते. पार करता येणार नाही इतक्या खोलीची ती नदी होती. 6 तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुला दिसलेल्या गोष्टी तू लक्षपूर्वक पाहिल्यास ना?”
मग त्याने मला नदीच्या काठाने परत आणले. 7 नदीच्या काठाने परत येताना नदीच्या दोन्ही तीरांवर मला दाट झाडी दिसली. 8 तो माणूस मला म्हणाला, “हे पाणी पूर्वेला वाहते. हे अरब दरीतून जाऊन मृत समुद्राला मिळते. त्यामुळे त्या समुद्राचे पाणी ताजे होते. 9 हे पाणी मृत समुद्राला मिळत असल्याने तेथील पाणी ताजे व स्वच्छ होते. तेथे खूप मासे मिळतात. ह्या नदीकाठच्या प्रदेशात सर्व प्रकारचे प्राणी आहेत. 10 एन-गेदीपासून एन-इग्लाइमपर्यंत तुला मच्छीमार नदीकाठी उभे असलेले दिसू शकतील. आपापली जाळी टाकून अनेक प्रकारचे मासे ते पकडत असल्याचे तुला दिसेल. भूमध्य समुद्रात जितक्या प्रकारचे मासे आहेत, तितक्याच प्रकारचे मासे मृतसमुद्रात आहेत. 11 पण दलदल आणि पाणथळीच्या लहान लहान जागा मिठासाठी तशाच ठेवल्या जातील. 12 नदीच्या दोन्ही काठावर सर्व प्रकाराची फळझाडे वाढतात. त्यांची पाने कधीच सुकून गळत नाहीत. त्या झाडांवर नेहमीच फळे असतात. दर महिन्याला झाडांना बहर येतो का? कारण झाडांना मंदिरातून येणारे पाणी मिळते. झाडांची फळे खाण्यासाठी उपयोगी पडतील व पाने औषधी असतील.”
वंशांसाठी जमिनीची विभागणी
13 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “इस्राएलच्या बारा वंशासाठी जमिनीची विभागणी पुढीलप्रमाणे होईल. योसेफाला दोन भाग मिळतील. 14 तुम्ही जागेची सारखी वाटणी कराल. मी तुमच्या पूर्वजांना ही जमीन देण्याचे कबूल केले होते. म्हणून मी ती तुम्हाला देत आहे.
15 “जमिनीच्या सीमा अशा असतील. उत्तरेला भूमध्य समुद्रापासून, हेथलोनच्या बाजूने हमाथकडे रस्ता वळतो तेथपर्यंत आणि पुढे सदाद, 16 बेरोथा, सिब्राईम (जे दिमिष्क व हमाथ यांच्या सीमेवर आहे.) हासेर-हत्तीकोन (जे हौरानच्या सीमेवर आहे.) हासेर-हत्तीकोने (जे हौरानच्या सीमेवर आहे.) येथपर्यंत. 17 म्हणजेच उत्तरेची सीमा समुद्रापासून, दिमिष्क व हमाथ यांच्या उत्तरसीमेवर असलेल्या हसर-एनोनपर्यंत असेल.
18 “पूर्वेला सीमारेषा हसर-एनोनपासून हौरान व दिमिष्कमधून. पुढे यार्देन नदीच्या कडेने गिलाद व इस्राएलच्या मधून पूर्व समुद्राच्या पुढे पार तामारपर्यंत जाईल.
19 “दक्षिणेला तामारपासून पार मेरीबोथ-कादेशच्या हिरवळीच्या प्रदेशा पलीकडे मिसरच्या ओढ्याच्या पुढे भूमध्य समुद्रापर्यंत सीमा असेल.
20 “पश्र्चिमेला अगदी लेबो-हामाथपर्यंतचा भूमध्य समुद्र हीच सीमा असेल.
21 “तेव्हा तुम्ही ही जमीन इस्राएलच्या वंशांमध्ये आपापासात वाटाल. 22 तुम्ही तुमच्यात आणि तुमच्यामध्ये राहात असलेल्या परक्यांमध्ये अथवा ज्या परक्यांची मुले तुमच्यात राहात आहेत त्यांच्यात वाटाल. हे परके इस्राएलमध्ये जन्मलेल्या लोकांप्रमाणेच इस्राएलचे रहिवासी आहेत. त्यामुळे इस्राएलच्या वंशांना दिलेल्या जमिनीतील काही भाग तुम्ही ह्या लोकांना द्यावा. 23 हे परके जेथे राहतात, तेथे राहणाऱ्या इस्राएलींनी त्यांना काही जमीन दिलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
दावीदाचे स्तोत्र
103 माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर.
माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे.
2 माझ्या आत्म्या, परमेश्वराचा जयजयकार कर आणि
तो खरोखरच दयाळू आहे हे विसरु नकोस.
3 देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर.
तो आमचे सर्व आजार बरे करतो.
4 देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि
तो आम्हांला प्रेम आणि सहानुभूती देतो.
5 देव आम्हाला खूप चांगल्या गोष्टी देतो.
तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो.
6 परमेश्वर न्यायी आहे. जे लोक इतरांकडून दु:खी झाले आहेत
त्यांना देव न्याय देतो, त्यांच्यासाठी देव न्याय आणतो.
7 देवाने मोशेला नियम शिकवले,
देव ज्या सामर्थ्यशाली गोष्टी करु शकतो त्या त्याने इस्राएलला दाखवल्या.
8 परमेश्वर सहानुभूतिपूर्ण आणि दयाळू आहे.
देव सहनशील आणि प्रेमाचा सागर आहे.
9 परमेश्वर नेहमीच टीका करीत नाही.
परमेश्वर आमच्यावर सदैव रागावलेला राहात नाही.
10 आम्ही देवाविरुध्द पाप केले
पण त्याने आम्हाला त्या पापाला साजेशी शिक्षा केली नाही.
11 देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम
हे स्वर्ग पृथ्वीवर जितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे.
12 आणि देवाने आमची पापे
पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली.
13 वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात
तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो.
14 देवाला आमच्याबद्दल सारे काही माहीत असते.
आम्ही धुळीपासून निर्माण झालो आहोत हे देवाला माहीत आहे.
15 आमचे आयुष्य कमी आहे हे देवाला माहीत आहे.
त्याला माहीत आहे की आम्ही गवताप्रमाणे आहोत.
16 आम्ही एखाद्या छोट्या रानफुलासारखे आहोत हे देवाला माहीत आहे.
ते फूल लवकर वाढते.
गरम वारा वाहायला लागला की ते मरते आणि थोड्याच वेळात ते फूल कुठे वाढत होते ते देखील कुणी सांगू शकत नाही.
17 परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले
आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे.
देव त्यांच्या मुलांशी आणि
मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे.
18 जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो.
जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो.
19 देवाचे सिंहासन स्वर्गात आहे
आणि तो सर्वांवर राज्य करतो.
20 देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा.
देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात.
तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता.
21 परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो देवाची स्तुती करा.
तुम्ही त्याचे सेवक आहात.
देवाला जे हवे ते तुम्ही करा.
22 परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या.
देव चराचरावर राज्य करतो. आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे.
माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
2006 by World Bible Translation Center