Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
1 राजे 15

यहूदाचा राजा अबीया

15 नबाटाचा मुलगा यराबाम इस्राएलवर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष चालू असताना, त्याचा (रहबामचा) मुलगा अबीया यहूदाचा पुढचा राजा झाला. अबीयाने तीन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमची मुलगी.

आपल्या वडीलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ट नव्हता. दावीदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याखातर त्याने अबीयाला यरुशलेमचे राज्य दिले. परमेश्वराच्या कृपेने त्याला मुलगाही झाला यरुशलेमला परमेश्वर दयेने सुरक्षितताही लाभली. हे सर्व दावीदासाठीच परमेश्वराने केले. दावीदाचे वर्तन परमेश्वराच्या इच्छेनुसार, योग्य असेच होते. त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे नेहमीच पालन केले. उरीया हित्तीबद्दल घडलेले चुकीचे वर्तन एवढाच काय तो अपवाद.

रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत. अबीयाने आणखी जे काही केले त्याची नोंद यहूदाच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.

अहीयाच्या संपूर्ण कारकिर्दींत अहीया आणि यराबाम यांच्यात लढाई चालू असे. अबीयाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा मुलगा आसा राज्य करु लागला.

यहूदाचा राजा आसा

यराबामच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला 10 आसाने यरुशलेमवर एक्के चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माका. ती अबीशालोमची मुलगी.

11 आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले. 12 त्याकाळी दैवतांच्या नावाखाली शरीरविक्रय करणारे पुरुष होते. आसाने त्यांना देशत्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडीलांनी केलेल्या मूर्तीही हलवल्या. 13 आपली आजी माका हिला आसाने राणी, होण्यापासून दूर केले. अंमगळ दैवत अशेरा हिची एक मूर्ती या आजीनेही केली होती. आसाने त्या मूर्तीची मोडतोड केली. किद्रोन खोऱ्यात ती जाळून टाकली. 14 उंचवट्यावरील पूजास्थळांची त्याने नासधूस केली नाही, मात्र आयुष्यभर तो परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला. 15 आसा आणि त्याचे वडील यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करुन घेतल्या होत्या. सोन्याचांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यात होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या.

16 आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत. 17 बाशाने यहूदावर चढाया केल्या. आसाच्या प्रदेशातील लोकांचे येणेजाणे त्याला थांबवायचे होते. त्यामुळे रामा नगर त्याने चांगले मजबूत केले. 18 आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेनहदाद हा तब्रिम्मोनचा मुलगा आणि तब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती. 19 आसाने आपल्या संदेशात म्हटले होते, “माझे वडील आणि तुझे वडील यांच्यात शांततेचा करार झाला होता. आता मला तुझ्याशी करार करायचा आहे. तुला मी हा सोन्यारुप्याचा नजराणा पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याशी झालेल्या कराराचा तू भंग कर म्हणजे तो माझ्या प्रदेशातून निघून जाईल.”

20 राजा बेनहदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल-बेथ माका, गालिल सरोवरालगतची गावे आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य पाठवले. 21 या हल्ल्याची बातमी बाशाच्या कानावर गेली. तेव्हा त्याने रामा नगराच्या मजबुतीचे काम सोडले, ते गाव सोडले आणि तिरसा या ठिकाणी तो परतला. 22 मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामुग्री आणली. बन्यामीनमधील मेबा आणि मिस्पा येथे हे सर्व सामान त्यांनी वाहून नेले. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.

23 आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती यहूदाच्या राजांच्या इतिहास या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला. 24 त्याचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दावीदनगरात त्याचे दफन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा यहोशाफाट राज्य करु लागला.

इस्राएलचा राजा नादाब

25 यहूदाचा राजा म्हणून आसाचे दुसरे वर्ष चालू असताना यराबामचा मुलगा नादाब इस्राएलचा राजा झाला. त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले. 26 नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडील यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये त्याने केली यराबामने इस्राएल लोकांनाही पाप करायला लावले होते.

27 बाशा हा अहीयाचा मुलगा. हे इस्साखारच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले. 28 आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून तिसरे वर्ष होते. मग बाशा इस्राएलचा राजा झाला.

इस्राएलचा राजा बाशा

29 बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया याच्यामार्फत परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले. 30 राजा यराबामने बरीच पापे केली होती, तसेच इस्राएल लोकांनाही ती करायला लावली म्हणून हे घडले. इस्राएलचा परमेश्वर देव याचा यराबामवर कोप झाला.

31 इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात नादाबचे इतर पराक्रम नोंदलेले आहेत. 32 बाशा इस्राएलवर राज्य करत असताना यहूदाचा राजा आसा याच्याशी त्याचे सर्वकाळ युध्द चालले होते.

33 आसाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी अहीयाचा मुलगा बाशा हा इस्राएलचा राजा झाला. तिरसामध्ये राहून त्याने चोवीस वर्षे राज्य केले. 34 पण परमेश्वराच्या मते जे गैर ते त्याने केले. आपले वडील यराबाम यांनी केली तीच पातके बाशानेही केली. यराबामने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली होती.

कलस्सैकरांस 2

कारण माझी अशी इच्छा आहे की, तुमच्यावतीने जो महान झगडा मी करीत आहे आणि जे लावातिकीयात आहेत त्यांच्या वतीने आणि ज्यांची माझी व्यक्तिश: भेट झाली नाही अशा सर्वांसाठी जो महान झगडा मी केला तो तुम्हांला माहीत व्हावा. यासाठी की, त्यांच्या मनाला समाधान वाटावे. आणि ते प्रेमाने एकत्र जोडले जावेत, आणि खात्रीची सर्व संपत्ती जी समजबुद्धीने येते ती मिळावी. तसेच देवाचे रहस्य जो ख्रिस्त त्याच्याविषयी पूर्ण ज्ञान मिळावे. ज्यामध्ये ज्ञानाची आणि शहाणपणाची सर्व संपत्ती लपलेली आहे.

मी हे म्हणत आहे ते यासाठी की, तुम्हांला दिसायला चांगल्या पण खोट्या कल्पनांनी फसवू नये. कारण मी जरी शरीराने तुम्हांपासून दूर असलो तरीही आत्म्यात मी तुम्हाबरोबर आहे आणि तुमच्या जीवनातील नीटनेटकेपणा आणि ख्रिस्तावरील विश्वासासाठी खंबीरता पाहून मी आनंदीत आहे.

ख्रिस्तात जगत राहा

म्हणून ज्याप्रमाणे तुम्हांला दिलेल्या शिक्षणाद्वारे तुम्हाला येशू ख्रिस्त व प्रभु म्हणून मिळाला, तसे त्याच्यामध्ये एक होत चला. त्याच्यामध्ये मुळावलेले, त्याच्यावर उभारलेले, तुमच्या विश्वासात दृढ झालेले असे व्हा आणि देवाची उपकारस्तुति करीत ओसंडून जा.

मूलभूत शिक्षण जे ख्रिस्तापासून नाही व मनुष्यांनी हस्तांतरित केले आहे त्या मानवी तत्त्वज्ञानाने व पोकळ फसव्या कल्पनांनी तुम्हांला कोणीही कैद्यासारखे घेऊन जाऊ नये म्हणून सावध असा. कारण देवाचे पूर्णत्व त्याच्यात शरीरात राहते. 10 आणि तो जो प्रत्येक सत्तेच्या व अधिकाराच्या उच्चस्थानी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण झाले आहात.

11 मानवी हातांनी न केलेल्या सुंतेने तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सुंता झालेले आहात. ख्रिस्ताने केलेल्या सुंतेद्वारे तुम्ही तुमच्या पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त झाला होता, 12 हे असेच घडले जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा करण्याच्या कृतीमध्ये त्याच्याबरोबर पुरले गेला आणि तुम्ही त्याच्यामध्ये देवाच्या कृतीमध्ये तुमच्या विश्वासाद्वारे उठविले गेला, ज्याने (देवाने) ख्रिस्ताला मेलेल्यांतून उठविले.

13 तुमच्या पापांमुळे आणि तुमची सुंता न झाल्याने तुम्ही आध्यात्मिकरीत्या मृत झाला होता, परंतु देवाने ख्रिस्ताबरोबर तुम्हाला जीवान दिले आणि त्याने आमच्या सर्व पापांची क्षमा केली. 14 त्याने आमच्याविरुद्ध असलेल्या आरोपपत्राचा निवाडा असलेला दस्तऐवज आणि ज्यात आम्हांला विरोध होता, तो त्याने आमच्यातून काढून घेतला, आणि वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकून रद्द केला. 15 त्याने स्वतः वधस्तंभाद्वारे सत्ता आणि अधिकार हाणून पाडून त्यांवर विजय मिळविला आहे.

मनुष्यांनी केलेल नियम पाळू नका

16 म्हणून कोणीहा तुमच्यावर खाण्याविषयी आणि पिण्याविषयी किंवा मेजवान्यांविषयी, नवचंद्रोउत्सवाविषयी किंवा शब्बाथ दिवसांविषयी टीका करु नये. 17 कारण ते फक्त येणाऱ्या गोष्टींची सावली आहेत. परंतु खरे शरीर ज्यामुळे सावली पडते ते तर ख्रिस्ताचे आहे. 18 कोणीही जो स्वतःचा अपमान, नम्रतेची कृत्ये व देवदूतांची उपासना यात समाधान मानून घेतो, त्याने तुम्हाला बक्षिसासाठी अपात्र ठरवू नये. असा मनुष्य नेहमी हे सर्व दृष्टान्त पाहिल्यासारखे बोलतो आणि कोणतेही कारण नसता त्याच्या आध्यात्मिक नसलेल्या अंतःकरणामुळे गर्वाने फुगलेला असतो. 19 आणि असा मनुष्य ख्रिस्त जो मस्तक त्याला धरीत नाही. संपर्ण शरीर त्याच्या अस्थिबंधाचे स्नायू, स्नायूंनी आधार दिलेले आणि एकत्रित धरल्याने देवापासून होणारी वाढ यात वाढते त्याबद्दल त्याला धन्यवाद असो.

20 जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर मेला आहात व या जगाच्या प्राथमिक शिक्षणापासून मुक्त झाला आहात, तर मग का तुम्ही या जगाचे असल्यासारखे त्यांच्या नियमांच्या अधीन राहाता. 21 “याला स्पर्श करु नका!” “त्याची चव पाहू नका!” 22 या सर्व गोष्टी त्यांच्या वापराबरोबर नाहीशा होणार आहेत. अशा नियमांच्या अधीन होताना, तुम्ही मानवी नियम व शिकवणूक यांचे पालन करता. 23 खरोखर, मनुष्यांनी केलेला धर्म, स्वतःचा अपमान, नम्रतेची कृत्ये, शरीराचा छळ, या विषयीच्या ज्ञानाबद्दल त्यांची कीर्ति आहे, परंतु शरीराच्या समाधानाविरुद्ध लढताना ते काही किंमतीचे नाहीत.

यहेज्केल 45

पवित्र वापरासाठी जमिनीची विभागणी

45 “ज्या वेळी इस्राएली वंशाच्या लोकांसाठी तुम्ही, चिठृ्या टाकून, जमिनीची वाटणी कराल, तेव्हा जमिनीचा काही भाग वेगळा काढाल तो परमेश्वराचा पवित्र भाग असेल. ती जमीन 25,000 हात (8.12 मैल) लांबीची व 20,000 हात (8.12 मैल) लांबीची व 20,000 हात (6.6 मैल) रुंदीची असेल. ती सर्व जमीन पवित्र असेल. जमिनीचा 500 हाताचा (875 फूटाचा) चौरस हा मंदिरासाठी असेल. मंदिराभोवती 50 हात (87 फूट 6 इंच) रुंदीची मोकळी जागा असेल. पवित्र प्रदेश 25,000 हात (8.3 मैल) लाब व 10,000 हात (3.3 मैल) रुंद असेल. मंदिर ह्याच भागात असेल. मंदिराची जागा अती पवित्र जागा मानली जाईल.

“परमेश्वराची सेवा करण्यासाठी परमेश्वराजवळ जाणाऱ्या, मंदिरात काम करणाऱ्या सेवकांसाठी, याजकासाठी हा जमिनीचा पवित्र भाग असेल. ती जागा याजकांची घरे व मंदिर यांच्यासाठी असेल. जमिनीचा 25,000 हजार हाताचा (8.3 मैल लांबीचा) व 10,000 हात (3.3 मैल) रुंदीचा भाग हा मंदिरात सेवा करणाऱ्या लेवींसाठी असेल. लेवींची गावेसुद्धा याच भागात वसतील.

“गावासाठी तुम्ही 5,000 हात (1.6 मैल) रुंदीचा व 25,000 हजार हात (8.3 मैल) लांबची जागा द्याल. ती पवित्रे प्रदेशाच्या बाजूला असेल. इस्राएलच्या सर्व लोकांसाठी ही जागा असेल. पवित्र प्रदेशाच्या आणि गावाच्या मालकीच्या जमिनीच्या बाजूची जमीन राजसाठी असेल. म्हणजेच पवित्र प्रदेश व गावाच्या मालकीची जमीन या दोन्ही मधील ही जमीन असेल. ती लोकांना दिलेल्या जमिनीएवढीच असेल. ती पश्र्चिमेच्या सीमेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत पसरलेली असेल. ही जमीन म्हणजे राजाची इस्राएलमधील मालमत्ता असेल. त्यामुळे, यापुढे, राजा माझ्या लोकांना कष्ट देणार नाही उलट इस्राएलांना ते त्यांच्या वंशजांसाठी जमीन देईल.”

परमेश्वर, माझा प्रभू, पुढे म्हणतो, “इस्राएलच्या राजांनो, आता पुरे! लोकांशी क्रूरपणाने वागण्याचे सोडून द्या, लोकांची लुबाडणूक करु नका. न्यायाने वागा. सत्कृत्ये करा. माझ्या लोकांना सक्तीने घराबाहेर काढण्याचे सोडून द्या.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

10 “लोकांना फसवू नका. योग्य वजन-मापे वापरा. 11 एफा (कोरडे पदार्थ मोजण्याचे माप) बाथ (द्रव पदार्थ मोजण्याचे माप) सारख्याच आकाराचे असू द्या. ही मापे होमरच्या परिमाणात असली पाहिजेत. म्हणजे एफ व बाथ 1/10 होमर इतक्या मापाची असावीत. 12 शेकेल 20 गेरा एवढा असला पाहिजे. मीना हा 60 शेकेल म्हणजेच 20 शेकेल, 25 शेकेल, 15 शेकेल एवढा असला पाहिजे.

13 “पुढील गोष्टी तुम्ही अर्पण केल्याच पाहिजेत.

प्रत्येक होमर (6 बुशल) गव्हासाठी 1/6 एफ (14 वाडगे) गडू.

प्रत्येक होमर (6 बुशल) जवासाठी 1/6 एफ (14 वाडगे) जव.

14 प्रत्येक कोर (55 गॅलन) ऑलिव्ह तेलासाठी 1/10 बाथ (1/2 गॅलन) ऑलिव्ह तेल.

लक्षात ठेवा: 10 बाथचा एक होमर होतो 10 बाथचा एक कोर होतो

15 आणि इस्राएलच्या चांगल्यातल्या चांगल्या कुरणातील

200 मेंढ्यांच्या कळपातील एक मेंढरु द्यावे.

“ही खास अर्पणे धान्यार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे यासाठी आहेत. ह्यामुळे लोकांची शुद्धता होते.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

16 “ह्या देशातील, प्रत्येकजण, राजाकरिता, या गोष्टी अर्पण करील. 17 पण विशेष पवित्र दिवसांसाठी राजाने आवश्यक त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. सण, अमावस्या, शब्बाथ ह्या दिवसांसाठी आणि इस्राएलच्या खास सणांसाठी राजाने होमार्पणे, धान्यार्पणे व पेयार्पणे ह्यांची सोय केली पाहिजे. इस्राएलच्या शुद्धतेसाठी असलेली पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे व शांत्यर्पणेसुद्धा राजाने दिली पाहिजेत.”

18 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, मंदिराच्या शुद्धतेसाठी तुम्ही निर्दोष गोऱ्हा द्यावा. 19 याजक पापार्पणातील काही रक्त मंदिराच्या दाराच्या चौकटीच्या खांबावर, वेटीच्या कंगोऱ्याच्या टोंकावर आणि आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या खांबांवर शिंपडतील. 20 कोणाही माणसाच्या हातून नकळत वा माहीत नसल्याने पाप घडले असेल म्हणून महिन्याच्या सातव्या दिवशी तुम्ही मघाशी सांगितले तसे करावे. म्हणजे मंदिर शुद्ध होईल.

वल्हांडणाच्या सणातील अर्पणे

21 “पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही वल्हांडणाचा सण साजरा केला पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण ह्यावेळेसच सुरु होतो. तो सात दिवस चालतो. 22 त्या वेळी, राजा स्वतःकरिता आणि इस्राएलच्या लोकांकरिता पापार्पण म्हणून बैल देईल. 23 सणाच्या सात दिवसात राजा सात निर्दोष बैल व सात निर्दोष मेंढे ह्यांचे देवाला हवन करील. राजा प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे सात बैल अर्पण करील. तसेच पापार्पण म्हणून रोज एक बोकड देईल. 24 राजा प्रत्येक बैलाबरोबर एक एफ (1/2 बुशेल) जव धान्यार्पण म्हणून देईल. प्रत्येक मेंढ्याबरोबर पण तो एक एफ (1/2 बुशेल) जव देईल. प्रत्येक एफ धान्याबरोबर राजाने एक हीन (1 गॅलन) तेल दिलेच पाहिजे. 25 मंडपाच्या सणाच्या सात दिवसात राजाने असेच सर्व अर्पण करावे. हा सण सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. त्या वेळची पापार्पण, होमार्पण, धान्यार्पण आणि तेलार्पण ही अर्पणे असतील.”

स्तोत्रसंहिता 99-101

99 परमेश्वर राजा आहे
    म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या.
देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो
    म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
सियोन मधला परमेश्वर महान आहे.
    तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.
सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे.
    देवाचे नाव भीतीदायक आहे.
    देव पवित्र आहे.
बलवान राजाला न्यायीपणा आवडतो.
    देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि
    प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि
    त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते
    आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता.
त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली
    आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
देव उंच ढगांतून बोलला.
    त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या
    आणि देवाने त्यांना नियम दिले.
परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस,
    तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस
    आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा.
    परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे.

धन्यवाद स्तोत्र.

100 हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा.
    परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या.
परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या.
    त्यानेच आपल्याला निर्माण केले.
आपण त्याची माणसे आहोत.
    आपण त्याची मेंढरे आहोत.
त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या.
    त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या.
त्याला मान द्या.
    त्याच्या नावाचा जयजयकार करा.
परमेश्वर चांगला आहे.
    त्याचे प्रेम चिरंजीव आहे.
    आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.

दाविदाचे गीत

101 मी प्रेम आणि न्याय याबद्दल गाईन,
    परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आळवीन.
मी अगदी कसोशीने पवित्र शुध्द आयुष्य जगेन.
    परमेश्वरा, तू माझ्याकडे कधी येशील?
मी माझ्यासमोर कुठलीही मूर्ती ठेवणार नाही.
    जे लोक असे तुझ्याविरुध्द जातात त्यांचा मला तिरस्कार वाटतो.
    मी तसे करणार नाही.
मी प्रामाणिक राहीन.
    मी वाईट कृत्ये करणार नाही.
जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणे वाईट गोष्टी बोलत
    असेल तर मी त्या माणसाला थांबवेन.
मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि
    ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.

ज्यांच्यावर विश्वास टाकता येईल अशा माणसांना मी देशभर शोधेन
    आणि केवळ त्याच लोकांना मी माझी सेवा करु देईन.
    जे लोक शुध्द आयुष्य जगतात तेच माझे सेवक होऊ शकतील.
मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही.
    मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.
मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन.
    दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center