M’Cheyne Bible Reading Plan
नागरी युध्द
12 शलमोनाकडून पळाल्यावर नबाटाचा मुलगा यराबाम मिसरमध्ये गेला. तो अजून तिथेच होता. शलमोनाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर एफ्राईमच्या डोंगराळ भागातील जेरेदा या आपल्या नगरात तो परतला.
शलमोन मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. त्यानंतर त्याचा मुलगा रहबाम हा पुढचा राजा झाला. 3 त्याला राज्याभिषेक करायला सर्व इस्राएल लोक शेखेम येथे जमले. रहबाम तिथे आला. लोक त्याला म्हणाले, 4 “तुझ्या वडीलांनी कामाच्या ओझ्याखाली आम्हाला भरडून काढले. आता आमचे ओझे थोडे हलके कर. आमच्यावर लादलेले मेहनतीचे जू काढ म्हणजे आम्ही तुझी सेवा करु.”
5 रहबाम म्हणाला, “तीन दिवसांनंतर मला भेटा. तेव्हा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन.” मग लोक निघून गेले.
6 शलमोन ज्यांच्याशी सल्लामसलत करत असे अशी काही वृध्द मंडळी होती. त्यांनाच राजा रहबामने याबाबतीत सल्ला विचारला. तो म्हणाला, “या लोकांना मी काय सांगू?”
7 यावर ही वयोवृध्द मंडळी म्हणाली, “तू आज यांचा सेवक बनलास तर तेही तुझी सेवा करतील. त्यांच्याशी प्रेमाने, समजुतीने बोललास तर तेही आयुष्यभर तुझे काम करतील.”
8 पण रहबामने हा सल्ला मानला नाही. आपल्या समवयस्क मित्रांना त्यांचे मत विचारले. 9 रहबाम त्यांना म्हणाला, “माझ्या वडीलांच्या कारकिर्दीतल्यापेक्षा या लोकांना कामाचा भार कमी करुन हवा आहे. त्यांना आता मी काय सांगू, त्यांच्याशी काय बोलू?”
10 तेव्हा ते तरुण मित्र म्हणाले, “ते लोक येऊन असे म्हणत आहेत, ‘तुझ्या वडीलांनी आमच्याकडून बेदम कष्ट करवून घेतले, तर आता आमचे काम कमी करा.’ तर तू त्यांना बढाई मारुन सांग, ‘माझ्या वडीलांच्या अख्ख्या शरीरापेक्षा या माझ्या करंगळीत जास्त जोर आहे. 11 माझ्या वडीलांनी तुम्हाला कामाला जुंपले. मी ते काम आणखी वाढवीन. त्यांनी तुम्हाला चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी असा झोडपीन की विंचू डसल्यासारखे तुम्हाला वाटेल.’”
12 रहबामने त्या लोकांना “तीन दिवसांनी यायला” सांगितले होते. त्याप्रमाणे सर्व इस्राएल लोक तीन दिवसांनी रहबामकडे आले. 13 त्यावेळी राजा रहबाम त्यांच्याशी अतिशय कठोरपणे बोलला. वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे त्याने दुर्लक्ष केले. 14 मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे तो बोलला. तो म्हणाला, “माझ्या वडीलांनी तुमच्यावर कष्टाचे काम लादले. मी तर तुम्हाला आणखीच कामाला लावीन. त्यांनी तुमच्यावर आसूड उगवले, पण मी तर असा मारीन की विंचवाच्या डंकासारख्या तुम्हाला वेदना होतील.” 15 हे अर्थातच लोकांच्या मनासारखे नव्हते. परमेश्वरानेच हे घडवून आणले होते. नबाटाचा मुलगा यराबाम याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने हे केले. शिलो येथील संदेष्टा अहिया याच्यामार्फत परमेश्वराने हे वचन दिले.
16 नवा राजा आपले म्हणणे मानत नाही हे इस्राएली लोकांच्या लक्षात आले. तेव्हा ते राजाला म्हणाले,
“आम्ही दावीदाच्या घराण्यातील थोडेच आहोत. काय?
नाही! इशायच्या जमिनीत आम्हाला थोडाच वाटा मिळणार आहे काय?
नाही! तेव्हा इस्राएलींनो, जा आपापल्या घरी.
करु दे या दावीदाच्या मुलाला आपल्या घराण्यापुरतेच राज्य.”
एवढे बोलून ते निघून गेले. 17 तरीही यहूदा नगरांमध्ये राहणाऱ्या इस्राएलींवर त्याची सत्ता होतीच.
18 अदोनीराम नावाचा एक माणूस सर्व कामगारांवर देखरेख करत असे. तेव्हा राजा रहबामने त्याला लोकांशी बोलणी करायला पाठवले. पण इस्राएल लोकांनी त्याच्यावर इतकी दगडफेक केली की तो प्राणाला मुकला. तेव्हा राजाने आपल्या रथात बसून पळ काढला आणि तो यरुशलेम येथे आला. 19 इस्राएल लोकांनी दावीदाच्या घराण्याविरुध्द बंड पुकारले. आजही त्या घराण्याशी त्यांचे वैर आहे.
20 यराबाम परत आला आहे असे इस्राएल लोकांना कळले. तेव्हा त्यांनी सगळ्यांची सभा भरवून त्याला इस्राएलचा राजा म्हणून घोषित केले. फक्त एका यहूदाच्या घराण्याने तेवढा दावीदाच्या घराण्याला आपला पठिंबा दिला.
21 रहबाम यरुशलेमला परतला. यहूदा आणि बन्यामीन यांच्या वंशातील सर्वांना त्याने एकत्र केले. एकंदर एकलक्ष ऐंशी हजाराचे सैन्य जमले. इस्राएल लोकांशी लढून आपले राज्य परत मिळवायचा रहबामचा विचार होता. 22 शमाया नामक देवाच्या माणसाशी या सुमारास परमेश्वर बोलला. तो म्हणाला, 23 “शलमोनाचा मुलगा आणि यहूदाचा राजा रहबाम, तसेच यहूदा आणि बन्यामीन लोक यांना जाऊन सांग, 24 ‘आपल्या बांधवांशी तुम्ही लढू नये अशी परमेश्वराची इच्छा आहे. सर्वजण आपापल्या ठिकाणी परत जा. या सगळ्यांचा करता करविता मीच होतो.’” या आदेशानुसार रहबामचे सैन्य माघारी गेले.
25 शेखेम हे एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर होते. ते चांगले मजबूत आणि सुरक्षित करुन यराबाम तेथे राहिला. पुढे त्याने पनुएल याही नगराची उभारणी केली.
26-27 यराबाम मनाशीच म्हणाला, “लोक यरुशलेम इथल्या परमेश्वराच्या मंदिरात असेच जात राहिले तर मग दावीदाच्याच घराण्याची सत्ता त्यांना हवीशी वाटू लागेल. यहूदाचा राजा रहबाम याच्याच मागे ते जातील. मग ते माझा वध करतील.” 28 त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. त्यांनी त्याला एक तोड सुचवली. त्यानुसार यराबामने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांना म्हणाला, “तुम्हाला यरुशलेमला उपासनेसाठी जायची गरज नाही. तुम्हाला मिसरबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.” [a] 29 राजाने मग एक सोन्याचे वासरु बेथेल येथे आणि दुसरे दान या शहरात बसवले. 30 पण त्याने हे मोठे पाप केले होते. इसाएलचे लोक बेथेल आणि दान येथे वासरांच्या पूजेसाठी जाऊ लागले. पण हेही मोठेच पाप होते.
31 उंचवट्याच्या ठिकाणीही यराबामने देऊळे बांधली. त्यासाठी पुरोहितही त्याने फक्त लेवी वंशातले न निवडता इस्राएलच्या वेगवेगळ्या वंशांमधून निवडले. 32 याखेरीज त्याने एक नवा सणही सुरु केला. यहूदामधील वल्हांडणाच्या सणासारखाच हा होता. पण पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवसाऐवजी हा आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्याने ठेवला. या दिवशी हा राजा बेथेल नगरातील वेदीवर यज्ञ करत असे.तसेच त्याने केलेल्या वासरांचा बळी अर्पण करत असे. त्याने उंच ठिकाणी बांधलेल्या देवळांसाठी बेथेल मधले पुरोहितही नेमले. 33 अशाप्रकारे यराबामने इस्राएल लोकांसाठी आठव्या महिन्याचा पंधरावा दिवस सण म्हणून ठरवला. त्यादिवशी बेथेलमधल्या वेदीवर तो यज्ञ करत असे आणि धूप जाळत असे.
कोणत्याही गोष्टीपेक्षा ख्रिस्त अधिक महत्त्वाचा आहे
3 शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. त्याच गोष्टी मी पुन्हा लिहिण्यास मला त्रासदायक वाटत नाहीत, आणि ते तुमच्यासाठी सुरक्षित आहे.
2 “कुत्र्या” विषयी सावध असा! दुष्कर्माविषयी सावध असा! शरीराला इजा करणाऱ्यांपासून सावध असा, 3 कारण आम्हीच खरे सुंता झालेले लोक आहोत, आणि आम्ही जे देवाच्या आत्म्याने त्याची सेवा करतो ते आम्ही येशू ख्रिस्ताचा अभिमान बाळगतो आणि ऐहिक गोष्टींवर विश्वास ठेवीत नाही. 4 जरी मला स्वतःला जगिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यास जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला जगिक गोष्टीवर विश्वास ठेवण्यास कारण आहे असे वाटते. 5 तर मला अधिक वाटते. मी जेव्हा आठ वर्षांचा होतो, तेव्हा माझी सुंता झाली. मी इस्राएल देशाचा आहे. बन्यामिन वंशाचा आहे. इब्री आईवडिलांपासून झालेला मी इब्री आहे. नियमशास्त्राच्या माझ्या दष्टिकोनाबद्दल म्हणाला तर मी परुशी आहे. 6 माझ्या आस्थेविषयी म्हणाल तर मी मंडळीचा छळ केला. नियमशास्त्राने ठरवून दिलेल्या नीतिमत्वाविषयी मी निर्दोष आहे.
7 त्याऐवजी जो मला लाभ होता तो आता मी ख्रिस्तासाठी नुकसान असे समजतो. 8 शिवाय माझ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या विषयीच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानामुळे मी इतर सर्व काही हानि समजतो. त्याच्यासाठी सर्व काही मी गमावलेले आहे. ख्रिस्ताला मिळविण्यासाठी मी सर्व काही कचरा समजतो. 9 आणि त्याला शोधण्यासाठी माझे नीतिमत्त्व नसताही म्हणजे नियमशास्त्रावर आधारित नव्हे, परंतु नीतिमत्व जे ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होते ते देवापासून प्राप्त होणारे आणि विश्वासावर आधारित आहे. 10 मला ख्रिस्ताला जाणून घ्यायचे आहे आणि जेव्हा तो मरणातून पुन्हा उठला तेव्हा जे सामर्थ्य प्रगट झाले त्याचा अनुभव घ्यायचा आहे, मला त्याच्या दु:खसहनामध्ये सुद्धा त्याचा अनुभव घेण्यासाठी त्यात भाग घ्यायचा आहे आणि त्याच्या मरणाशी अनुरुप व्हायचे आहे. 11 या आशेने की, मला मृतांमधून पुनरुत्थान मिळावे.
ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न
12 हे असे नाही की मी अगोदरच बक्षिस मिळविले आहे किंवा अगोदरच परिपूर्ण झालो आहे. ज्या बक्षिसासाठी ख्रिस्त येशूने मला ताब्यात घेतले ते बक्षिस मिळविण्याचा मी प्रयत्न करतो. 13 बंधूंनो, ते मी मिळविले असे मानीत नाही, परंतु एक गोष्ट आहे की, जी करण्याचा मी निश्चय करतो, जे भूतकाळात आहे ते मी विसरतो, आणि ते माझ्यापुढे आहे ते मिळविण्याचा प्रयत्न करतो. 14 ख्रिस्त येशूमध्ये वरील पाचारण जे देवाचे बक्षीस त्या उद्दीष्टासाठी मी झटतो.
15 तेव्हा आपण सर्व जे परिपक्व (प्रौढ) त्या आमची एकच प्रवृती आहे आणि एखाद्या मुद्यावर तुम्ही वेगळा विचार केला तरी देव तुम्हांस तेही प्रकट करील. 16 फक्त आपण ज्या सत्यापर्यंत पोहोंचलो त्याच्याच मागे चालत राहावे.
17 बंधूनो, माझे अनुकरण करण्यासाठी इतरांबरोबर सहभागी व्हा. आणि आम्ही जसे तुमच्यासमोर उदाहरणादाखल आहोत, त्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. 18 कारण यापूर्वी मी तुम्हांला जसे अनेक वेळा सांगितले व आताही पुन्हा रडत सांगतो, पुष्कळ जण असे आहेत की, जे ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैऱ्यासारखे वागतात. 19 नाश हा त्यांचा शेवट, पोट हा त्यांचा देव आहे आणि त्यांच्या निर्लज्जपणामध्ये त्यांचे गौरव आहे ते फक्त ऐहिक गोष्टीविषयींचा विचार करतात. 20 आमचा स्वदेश स्वर्गात आहे, तेथून येणारा तारणारा प्रभु येशू ख्रिस्त याची आम्ही वाट पाहता आहोत. 21 त्याच्या ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्याने तो आपले शरीर बदलून टाकील, आणि त्याच्या वैभवी शरीरासारखे करील.
याजकाची खोली
42 नंतर त्या माणसाने मला उत्तरेकडून बाहेरच्या पटांगणात आणले. मग त्याने मला राखीव जागेच्या पश्र्चिमेकडे असलेल्या खूप खोल्यांच्या इमारतीकडे नेले आणि उत्तरेकडच्या इमारतीकडेही नेले. 2 त्या इमारतीची लांबी 100 हात व रुंदी 50 हात होती. लोक उत्तेरेकडच्या पटांगणातून ह्या इमारतीत प्रवेश करत. 3 ह्या इमारतीला, एकमेकांकडे तोंड असलेले सज्जे तीनही मजल्यावर होते. त्यांच्यामध्ये 20 हात (35 फूटाची) मोकळी जागा होती. ही मोकळी जागा इमारत आणि मंदिर यांमध्ये होती. दुसऱ्या बाजूला असलेल्या खोल्यांची तोंडे बाहेरच्या पटांगणाच्या फरसबंदीकडे होती. 4 इमारतीचे प्रवेशद्वारे उत्तरेकडे असले तरी, 10 हात रुंदीचा आणि 100 हात लांबीचा रस्ता इमारतीच्या दक्षिणेकडून गेला होता. 5 ह्या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या, मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा अरुंद होत्या, कारण सज्जाने बरीच जागा व्यापलेली होती. 6 तीन मजल्यावर खोल्या होत्या. बाहेरच्या पटांगणाप्रमाणे त्यांना खांब नव्हते. म्हणून सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांच्या काहीशा मागे होत्या. 7 बाहेरच्या बाजूला, खोल्यांना समांतर अशी भिंत होती. ती बाहेरच्या पटांगणापर्यंत गेली होती. ती खोल्यांच्या समोर होती. तिची लांबी 50 हात (87 फूट 6 इंच) होती. 8 बाहेरच्या पटांगणात असलेल्या खोल्या 50 हात (87 फूट 6 इंच) लांबीच्या होत्या. मंदिराच्या बाजूची, इमारतीची एकूण लांबी 100 हात होती. 9 ह्या खोल्यांच्या खाली, पश्र्चिमेला, बाहेरच्या भिंतीच्या सुरवातीला, बाहेरच्या पटांगणातून पूर्वेच्या बाजूला येण्यासाठी एक दार होते. 10 दक्षिणेला, मंदिराच्या अंगणासमोर आणि मंदिराच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला खोल्या होत्या.
11 ह्या खोल्यांसमोर एक रस्ता होता. ह्या खोल्या उत्तरेकडील खोल्याप्रमाणेच होत्या. दक्षिणेकडची दारे, लांबी-रुंदीला उत्तरेकडच्या दारांएवढीच होती. दक्षिणेकडची दारे माप, नक्षी आणि प्रवेश याबाबतीत उत्तरेकडच्या दारांप्रमाणेच होती. 12 दक्षिणेकडच्या खोल्यांखाली, पूर्वेला उघडणारे दार होते. त्या दारातून लोकांना भिंती लगतच्या उघड्या रस्त्यावरुन आत येता येत असे. दारांच्या पलीकडे विभागणारी भिंत होती. [a]
13 तो माणूस मला म्हणाला, “पटांगणाच्या समोर असलेल्या उत्तर व दक्षिण दिशेकडील खोल्या ह्या पवित्र आहेत. देवाला बळी अर्पण करणाऱ्या याजकासाठी त्या आहेत. याजक तेथे अती पवित्र पदार्थ खातील. व असा पदार्थ ते तेथेच ठेवतात. का? कारण ती जागा पवित्र आहे. ते पवित्र पदार्थ म्हणजे धान्यार्पण, पापार्पण व दोषार्पण होत. 14 याजक तेथे जातील पण बाहेरच्या पटांगणात येण्याआधी त्यांना प्रथम आपली सेवेची वस्त्रे तेथेच उतरवून ठेवावी लागतील. का? कारण ती वस्त्रे पवित्र आहेत. इतर लोक मंदिराच्या ज्या भागात जातात, तेथे याजकाला जायचे असेल तर त्याने खोलीत जाऊन दुसरी वस्त्रे घातलीच पाहिजेत.”
बाहेरचे पटांगण
15 आतील मंदिराच मोजमाप करुन झाल्यावर त्या माणसाने मला पूर्वेकडच्या दारातून बाहेर आणले. त्यांने सर्व बाजूंनी बाहेरच्या पटांगणाचे मोजमाप केले. 16 मोजपट्टीने त्याने पूर्वेची बाजू मोजली. ती लांबीला 500 हात (875 फूट) भरली. 17 त्याने उत्तरेची बाजू मोजली. ती लांबीला 500 हात (875 फूट) भरली. 18 त्याने दक्षिणेची बाजू मोजली. तिची लांबी 500 हात (875 फूट) भरली. 19 मग पश्र्चिमेकडे जाऊन त्याने माप घेतले तेही 500 हात (875 फूट) भरले. 20 त्याने चारी बाजूंनी मंदिराचे मोजमाप केले. मंदिराभोवती भिंत होती. ती लांबीला 500 हात (875 फूट) व रुंदीला 500 हात (875 फूट) होती. तिच्यामुळे पवित्र (सोवळ्याची) जागा व अपवित्र जागा अशा (पवित्र न मानलेली) वेगवेगळ्या झाल्या होत्या.
94 परमेश्वरा, तू लोकांना शासन करणारा देव आहेस.
असा तू देव आहेस जो येतो आणि लोकांसाठी शासन आणतो.
2 तू संपूर्ण पृथ्वीचा न्यायाधीश आहेस.
गर्विष्ठ दुष्ट माणसांना योग्य अशी शिक्षा दे.
3 परमेश्वरा, दुष्ट लोक किती काळ मजा करीत राहाणार आहेत?
परमेश्वरा किती काळ?
4 आणखी किती काळ हे गुन्हेगार त्यांनी केलेल्या
गुन्ह्यांबद्दल गौरवोद्गार काढणार आहेत?
5 परमेश्वरा, ते तुझ्या माणसांना त्रास देतात.
त्यांनी तुझ्या माणसांना यातना भोगायला लावल्या.
6 ते दुष्ट लोक विधवांना आणि आपल्या देशात आलेल्या परकीयांना ठार मारतात.
ते अनाथ मुलांचा खून करतात.
7 आणि ते म्हणतात की या वाईट गोष्टी करताना परमेश्वर त्यांना बघत नाही.
ते म्हणतात की जे काही घडते आहे ते इस्राएलाच्या देवाला माहीत नाही.
8 तुम्ही दुष्ट लोक, मूर्ख आहात.
तुम्ही तुमचा धडा कधी शिकणार?
तुम्ही वाईट लोक किती मूर्ख आहात!
तुम्ही समजण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.
9 देवानेच आपले कान केलेत
तेव्हा त्यालाही कान असलेच पाहिजेत
आणि जे काही घडते ते तो ऐकू शकतो.
देवानेच आपले डोळे केलेत.
तेव्हा त्यालाही डोळे असलेच पाहिजेत
आणि जे काही घडते ते तो पाहू शकतो.
10 देव त्या लोकांना शिस्त लावेल.
देव लोकांना काय करायचे ते शिकवेल.
11 लोक काय विचार करतात ते देवाला माहीत असते.
लोक म्हणजे वाऱ्याचा झोत आहे हे देवाला माहीत आहे.
12 परमेश्वर ज्या माणसाला शिस्त लावेल तो सुखी होईल.
देव त्या माणसाला जगण्याचा योग्यमार्ग शिकवेल.
13 देवा, तू त्या माणसाला संकटात शांत राहाण्यास शिकवशील.
तू त्या माणसाला वाईट लोक थडग्यात जाईपर्यंत शांत राहाण्यास मदत करशील.
14 परमेश्वर त्याच्या माणसांना सोडून जाणार नाही.
तो त्याच्या माणसांना मदत केल्याशिवाय सोडून जाणार नाही.
15 न्याय प्रस्थापित होईल आणि तो न्यायीपणा आणेल आणि
नंतर प्रामाणिक आणि चांगले लोक तेथे येतील.
16 वाईट लोकांशी लढायला मला कोणीही मदत केली नाही.
वाईट कृत्य करणाऱ्या लोकांशी लढण्यासाठी माझ्या बरोबरीने कोणीही उभे राहिले नाही.
17 आणि जर परमेश्वराने मला मदत केली
नसतीतर मी मेलो असतो.
18 मी पडायला आलेलो आहे हे मला माहीत आहे,
पण परमेश्वराने त्याच्या भक्तांना आधार दिला.
19 मी खूप चिंताग्रस्त आणि उदास होतो.
परंतु परमेश्वरा, तू माझे सांत्वन केलेस.
20 देवा, तू दुष्ट न्यायाधीशांना मदत करीत नाहीस.
ते वाईट न्यायाधीश कायद्याचा दुरुपयोग करुन लोकांचे आयुष्य कठीण करतात.
21 ते न्यायाधीश चांगल्या माणसांवर हल्ला करतात.
ते निरपराधी लोक अपराधी आहेत असे म्हणतात आणि त्यांना ठार मारतात.
22 परंतु परमेश्वर माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहे.
देव माझा खडक माझी सुरक्षित जागा आहे.
23 देव त्या दुष्ट न्यायाधीशांना त्यांनी केलेल्या वाईटकृत्याबद्दल शिक्षा करेल.
त्यांनी पाप केले म्हणून देव त्यांचा नाश करेल.
परमेश्वर आपला देव त्या दुष्ट न्यायाधीशांचा सर्वनाश करेल.
2006 by World Bible Translation Center