M’Cheyne Bible Reading Plan
शलमोनाच्या भेटीस शबाची राणी
10 शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली. 2 नोकरा चाकरांचा लवाजमा आणि मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरुशलेमला आली. शलमोनाला भेटल्यावर तिने सुचतील ते सर्व प्रश्न विचारले. 3 शलमोनाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला कुठलाच प्रश्न अवघड वाटला नाही. 4 शलमोन अतिशय हुषार असल्याचे तिच्या लक्षात आले. त्याने बांधलेला सुंदर महालही तिने बघितला. 5 त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्यांची उठबस आणि त्यांचा पोषाख, त्याने दिलेल्या मेजवान्या आणि मंदिरात केलेले यज्ञ हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्र्चर्याने थक्क झाली.
6 ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते वस्तुस्थितीला धरुनच होते. 7 पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर्य आणि बुध्दिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे. 8 तुझ्या बायका [a] आणि कारभारी खरेच फार भाग्यवान आहेत. तुझ्या सेवेचे भाग्य त्यांना लाभले आणि तुझ्या ज्ञानाचा लाभ त्यांना होतो. 9 परमेश्वर देव थोर आहे. तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलचा राजा केले. परमेश्वराचे इस्राएलवर प्रेम आहे. म्हणूनच त्याने तुला राजा केले. तू नियमशास्त्राचे पालन करतोस आणि लोकांना न्यायाने वागवतोस.”
10 मग शबाच्या राणीने राजाला जवळजवळ 9,000 पौंड सोने नजर केले. शिवाय मसाल्याचे सुगंधी पदार्थ आणि मौल्यवान हिरेही दिले. इस्राएलमध्ये यापूर्वी कोणी आणले नसतील इतके मसाल्याचे पदार्थ एकट्या शबाच्या राणीने शलमोन राजाला दिले.
11 हिरामच्या गलबतामधून ओफिरहून सोने आले. तसेच रक्तचंदनाचे लाकूड आणि भारी रत्नेही आली. 12 शलमोनाने या लाकडाचा वापर मंदिरात आणि महालात आधाराचे कठडे उभारायला केला. शिवाय वादकांसाठी वीणा, सतारीही त्यातून करवून घेतल्या. तसे लाकूड परत कोणी कधी इस्राएलमध्ये आणले नाही की त्यानंतर कोणी तसे लाकूड पाहिले नाही.
13 दुसऱ्या देशाच्या राज्यकर्त्याला जे रीतीप्रमाणे भेटीदाखल द्यायचे ते सर्व शलमोन राजाने शबाच्या राणीला दिले. शिवाय तिला काय हवे ते विचारुन तेही दिले. यानंतर राणी आपल्या लवाजम्यासहित मायदेशी निघून गेली.
14 शलमोन राजाला दरसाल जवळपास एकोणऐंशी हजार नऊशेवीस पौंड सोने मिळत राहिले. 15 या मालवाहू जहाजांखेरीज व्यापारी, सौदागर, अरबस्तानचे राजे तसेच नेमलेले सुभेदार यांच्याकडूनही सोने येत राहिले.
16 शलमोन राजाने घडीव सोन्याच्या दोनशे मोठ्या ढाली केल्या. प्रत्येक ढालीचे वजन पंधरा पौंड होते. 17 तशाच पण जरा लहान तीनशे घडीव सोन्याच्या ढाली केल्या. त्यात चार पौंड सोने होते. “लबानोनचे वन” नामक वास्तूमध्ये त्याने या ठेवल्या.
18 शिवाय शलमोनाने हस्तिदंताचे एक प्रशस्त सिंहासन करवले. ते सोन्याने मढवले होते. 19 सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या. त्याची पाठ कमानदार होती. दोन्ही बाजूला हात होते. हातांच्या खाली दोन्ही बाजूला सिंह होते. 20 तसेच सहाही पायऱ्यांवर दोन-दोन सिंह होते. असे सिंहासन दुसऱ्या कोणत्याही राज्यात नव्हते.
21 शलमोनाचे सर्व पेले आणि चषक सोन्याचे होते. “लबानोनचे वन” नामक वास्तूमधली सर्व शस्त्रास्त्रे आणि सामुग्री शुद्ध सोन्याची होती. चांदीचे काहीही नव्हते. सोने इतक्या मुबलक प्रमाणात होते की शलमोनाच्या कारकिर्दीत लोकांच्या लेखी चांदीला काही किंमत नव्हती.
22 राजाकडे अनेक मालवाहू जहाजांचा ताफा होता. त्यांच्या इतर देशांशी व्यापार चाले. ही जहाजे हिरामची होती. दर तीन वर्षांनी ही जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत आणि जनावरे यांचा नवा साठा घेऊन येत.
23 शलमोन हा पृथ्वीतलावरील सर्वात महान राजा होता. त्याच्याकडे सर्वाधिक वैभव आणि बुध्दि चातुर्य होते. 24 लोक त्याला पाहायला उत्सुक असत. देवाने त्याला दिलेले बुध्दीचे वैभव त्यांना अनुभवायचे असे. 25 ठिकठिकाणाहून दरवर्षी लोक त्याच्या भेटीला येत. येताना प्रत्येकजण नजराणा आणी. सोन्या चांदीच्या वस्तू, कपडे, शस्त्रे, मसाल्याचे पदार्थ, घोडे, खेचरे अशा अनेक गोष्टी ते भेटीदाखल आणत.
26 शलमोनाकडे खूप रथ आणि घोडे होते. त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बाराहजार घोडे यांचा संग्रह होता. रथांसाठी त्याने खास नगरे उभारली आणि त्यात रथ ठेवले. काही रथ त्याच्या जवळ यरुशलेममध्येही होते. 27 राजाने इस्राएलला वैभवाच्या शिखरावर नेले. यरुशलेम नगरात चांदी दगडधोंड्यासारखी आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते. 28 मिसर आणि क्यू येथून शलमोन घोडे आणवत असे. त्याचे व्यापारी क्यूमध्ये ते खरेदी करत आणि तेथून ते इस्राएल मध्ये आणत. 29 मिसरचा एक रथ साधारण 15 पौंड चांदीला पडे, आणि घोड्याची किंमत पावणेचार पौंड चांदी इतकी पडे. हित्ती आणि अरामी राजांना शलमोन हे रथ आणि घोडे विकत असे.
1 ख्रिस्त येशूचे दास असलेल्या पौल व तीमथ्य यांजकडून, फिलिप्पै येथे राहणाऱ्या ख्रिस्त येशूमधील देवाच्या सर्व पवित्र लोकांना, तसेच सर्व वडील मंडळीला व खास मदतनिसांना,
2 देव आपला पिता आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त याजपासून तुम्हांस कृपा असो.
पौलाची प्रार्थना
3 प्रत्येक वेळी जेव्हा मी तुमची आठवण करतो, तेव्हा देवाचे आभार मानतो. 4 नेहमीच तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रार्थनेच्यावेळी मी आनंदाने प्रार्थना करतो. 5 कारण अगदी पहिल्या दिवसांपासून ते आजपर्यंत सुवार्तेच्या कामात तुमचा सहभाग आहे. 6 मला याची खात्री आहे की, ज्या देवाने तुमच्यामध्ये अशा प्रकारचे चांगले कार्य सुरु केले आहे, तो ख्रिस्त येशू येण्याच्या वेळेपर्यंत ते पूर्ण करीत आणीला.
7 तुम्हा सर्वांविषयी असा विचार करणे मला योग्य वाटते कारण तुम्ही माझ्या हृदयात आहात. आणि मी तुरुंगात असतानाच केवळ नव्हे तर जेव्हा मी सुवार्तेचे सत्य ठासून सिद्ध करीत होतो, तेव्हा ही देवाने जी कृपा मला दिली आहे त्यात तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर वाटेकरी होता. 8 देव माझा साक्षी आहे, कारण ख्रिस्त येशूने जे प्रेम दाखविले त्यामुळे तुम्हां सर्वांसाठी मी अधीर झालो होतो.
9 आणि माझी हीच प्रार्थना आहे:
की तुमचे प्रेम अधिकाधिक वाढत जाईल पूर्ण ज्ञान व सर्व प्रकारच्या समजबुद्धीने वाढत जाईल. 10 मी अशी प्रार्थना करतो की, तुमच्याठायी हे गुण असावेत, यासाठी की जे शुद्ध व निर्दोष ते तुम्ही निवडावे, आणि अशा प्रकारे ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे, 11 आणि देवाच्या गौरवासाठी, स्तुति साठी आणि नीतिमत्त्वाचे फळ देण्यासाठी भरुन जावे.
पौलाच्या त्रासामुळे प्रभूच्या कार्याला मदत होते
12 बंधूनो, जे काही माझ्या बाबतीत घडले त्यामुळे सुवार्ताकार्यात प्रत्यक्ष वाढ झाली हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छ आहे. 13 याचा परिणाम असा झाला की, राजवाड्याच्या सर्व पहारेकऱ्यांना व येथे असणाऱ्या सर्वांना हे माहीत झाले की, मी ख्रिस्ताला अनुसरतो म्हणून मला तुरुंगवास भोगावा लागत आहे. 14 शिवाय, पुष्कळशा बांधवांना माझ्या तुरुंगवासामुळे उत्तेजन मिळाले. व ते बोलण्यात ख्रिस्तामध्ये अधिकाधिक धीट होत चालले आहेत व न भिता संदेश देत आहेत.
15 हे खरे आहे की त्याच्यातील काही जण हेव्याने व वैरभावने ख्रिस्ताचा संदेश देतात, पण इतर चांगल्या भावनेने ख्रिस्ताचा संदेश देतात. 16 हे लोक प्रेमापोटी असे करतात, कारण त्यांना माहीत आहे की, सुवार्तेचे समर्थन करण्यासाठी देवाने मला येथे ठेवले आहे. 17 पण दुसरे ख्रिस्ताची घोषणा स्वार्थी ध्येयाने करतात आणि प्रामाणिकपणे करीत नाहीत, कारण त्यांना वाटते की, मी तुरुंगात असताना मला त्रास देणे त्यांना शक्य होईल. 18 पण त्यामुळे काय होते? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, प्रत्येक मार्गाने चांगला हेतू असो की वाईट हेतू असो, ख्रिस्त गाजविला जातो. आणि त्यामुळे मला आनंद होतो.
आणि मला आनंद होतच राहील. 19 कारण मला माहीत आहे तुमच्या प्रार्थनेमुळे आणि येशू ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे येणाऱ्या मदतीमुळे याचा परिणाम माझ्या सुटकेत होणार आहे. 20 हे माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे आहे, कारण मला खात्री आहे, की, माझी निराशा होणार नाही, पण आता नेहमीसारखे माझ्या सर्व धैर्याने माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराद्वारे महिमा होईल. 21 कारण माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि मरणे म्हणजे लाभ आहे. 22 पण जर मी या शरीरातच राहिलो तर त्याचा अर्थ असा की, माझ्या कामाचे फळ, आनंद मी अनुभवीन. मला माहीत नाही की मी काय निवडीन. 23 या दोन पर्यायातून निवडण्यासाठी माझ्यावर मोठा दबाव आहे. माझी अशी इच्छा आहे की, या जीवनातून जाऊन ख्रिस्ताबरोबर असावे कारण ते फार फार चांगले होईल. 24 पण तुमच्यासाठी या शरीरात राहणे हे माझ्यासाठी अधिक आवश्यक आहे. 25 आणि मला याची खात्री असल्याने मला माहीत आहे की मी येथेच राहीन व तुमच्याबरोबर असेन. 26 यासाठी की तुमच्याबरोबर पुन्हा असण्याचा परिणाम म्हणून तुम्हांला अभिमान बाळगण्यास अधिक योग्य कारण मिळेल.
27 पण कोणत्याही परिस्थितीत ख्रिस्ताच्या सुवार्तेला योग्य अशा प्रकारे तुम्ही वागा. यासाठी की, जरी मी तुम्हांला येऊन भेटलो किंवा तुमच्यापासून दूर असलो तरी मला तुमच्याविषयी असे ऐकायला मिळो की तुम्ही एका आत्म्यात खंबीर असे उभे आहात, तुम्ही सुवार्तेच्या विश्वासाने, एकजीवाने धडपड करीत आहात. 28 आणि जे तुम्हांला विरोध करतात त्यांना तुम्ही भ्याला नाहीत. तुमचे हे धैर्य त्यांच्या नाशाचा पुरावा होईल. पण तुमच्या तारणाचा पुरावा होईल. आणि हे देवाकडून असेल. 29 कारण, ख्रिस्ताच्या वतीने केवळ त्याच्यावर विश्वास ठेवणे एवढेच नव्हे तर त्याच्यासाठी दु:ख भोगणे असा हक्क तुम्हांला देण्यात आलेला आहे. 30 माझ्यामध्ये चाललेले युंद्ध तुम्ही अनुभवलेले आहे आणि पाहिले आहे आताही ते माझ्यामध्ये चालले असल्याचे तुम्ही ऐकत आहात.
नवे मंदिर
40 आमच्या परागंदा होण्याच्या काळातील पंचविसाव्या वर्षाच्या आरंभाला (आंक्टोंबरमध्ये) महिन्याच्या दहाव्या दिवशी परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. चौदा वर्षापूर्वी ह्याच दिवशी खास्द्यांनी यरुशलेम हस्तगत केले होते. दृष्टान्तात परमेश्वराने मला तेथे नेले.
2 दुष्टान्तात देवाने मला इस्राएल देशात नेले. मला त्याने खूप उंच पर्वताजवळ ठेवले. त्या पर्वतावर गावासारखे दिसणारे बांधकाम होते. ते दक्षिणेकडे होते. 3 परमेश्वराने मला तेथे आणले. तेथे एक माणूस होता. तो चकाकी दिलेल्या काशाप्राणे होता. त्याच्या हातात मोजमापाची सुती पट्टी व मापदंड होता. तो प्रवेशद्वाराजवळ उभा होता. 4 तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्या डोळ्यांचा व कानांचा उपयोग कर. ह्या गोष्टी पाहा आणि माझे म्हणणे ऐक. मी दाखवीत असलेली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहा. का? कारण ह्या गोष्टी मी तुला दाखविण्यासाठीच तुला येथे आणले आहे. येथे पाहिलेले सर्व काही तू इस्राएलच्या लोकांना सांगितले पाहिजेस.”
5 मंदिरच्या सभोवतीची भिंत मी पाहिली. त्या माणसाच्या हातात मोजपट्टी होती. ती सहा हात [a] (10 फूट इंच) लांब होती. मग त्याने त्या भिंतीची जाडी मोजली. ती एक पट्टी (10 फूट 6 इंच) भरली. मग त्या माणसाने भिंतीची उंची मोजली. ती एक पट्टी (10 फूट 6 इंच) भरली.
6 मग तो माणूस पूर्वेच्या दाराजवळ गेला. तो पायऱ्या चढला व त्याने दाराचा उंबरठा मोजला. तो एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुंद होता. दुसरा उंबराही तेवढाच रुंद होता. 7 चौकीदाराची खोली एक पट्टी (10 फूट 6 इंच) लांब व एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुद होती. मंदिरासमोरच्या प्रवेशद्वारच्या द्वारमंडपाच्या दाराची रुंदी एक पट्टी होती. 8 मग त्या माणसाने द्वारमंडप मोजला. 9 तो 8 हात लांब भरला. मग त्याने दाराच्या दोन्ही बाजूच्या भिंती मोजल्या. प्रत्येक भिंत दोन हात (3 फूट 6 इंच) रुद होती. मंदिराच्या समोरच्या प्रवेशद्वाराच्या शेवटी द्वारमंडप होता. 10 दाराच्या प्रत्येक बाजूला तीन लहान खोल्या होत्या. त्या सारख्या मापाच्या होत्या. दोन्ही बाजूच्या दाराच्या बाजूच्या भिंती सारख्या मापाच्या होत्या. 11 त्या माणसाने दरवाजांची रुंदी भरली. ते 10 हात आणि 13 हात लांब होती. 12 प्रत्येक खोलीसमोर एक बुटकी भिंत होती. ती एक हात (1 फूट 6 इंच) उंच आणि 1 हात (1 फूट 6 इंच) जाड होती. खोल्यांची प्रत्येक बाजू 6 हात (10 फूट 6 इंच) लांब होती.
13 माणासने एका खोलीच्या छतापासून दुसऱ्या खोलीच्या छतापर्यंतचे दाराचे मोजमाप केले. प्रत्येक दार दुसऱ्या दाराच्या बरोबर समोर होते. ते एका दारापासून दुसऱ्या दारापर्यंत 25 हात (43 फूट 9 इंच) भरले. 14 त्या माणसाने बाजूच्या भिंतीचे क्षेत्रफळ काढले. ह्यामध्ये पटांगणातील द्वारमंडपाच्या बाजूच्या भिंतींचाही समावेश होता. एकंदर क्षेत्रफळ साठ हात होते. 15 द्वारमंडप बाहेरच्या बाजूपासून आतल्या बाजूपर्यंत 50 हात (87 फूट 6 इंच) होता. 16 चौकीदाराच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप ह्यांच्यावर लहान लहान खिडक्या होत्या. खिडक्यांचा रुद भाग प्रवेशद्वाराकडे होता. प्रवेशद्वारच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर खजुराची झाडे कोरलेली होती.
बाहेरचे पटांगण
17 मग त्या माणसाने मला बाहेरच्या पटांगणात आणले. तेथे पटांगणाच्या सर्व बाजूंना खोल्या व फरसबंदी होती. फरसबंदीपुढे तीस खोल्या होत्या. 18 फरसबंदी दारांच्या लांबी इतकीच रुंद होती. ती प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूच्या शेवटापर्यंत होती. ही खालची फरसबंदी होय. 19 मग त्या माणसाने खालच्या दाराच्या आतील बाजूपासून पटांगणाच्या बाहेरच्या भिंतीपर्यंतचे माप घेतले. ते 100 हात (175 फूट) पूर्वेला आणि 100 हात उत्तरेला असे भरले.
20 बाहेरच्या पटांगणाच्या उत्तरेकडे तोंड असलेल्या दाराची लांबी व रुंदीही त्या माणसाने मोजली. 21 हे द्वार त्याच्या प्रत्येक बाजूला असलेल्या तीन तीन खोल्या आणि त्याचा द्वारमंडप ह्यांची मापे पहिल्या प्रवेशद्वाराएवढीच होती. द्वार 50 हात लांब व 25 हात रुंद होते. 22 पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराच्या खिडक्यांच्या, द्वारमंडपाच्या मापाच्याच ह्या द्वाराच्या खिडक्या व द्वारमंडप होता. खजुरीच्या झाडांचे नक्षीकामही अगदी तसेच होते. द्वाराला सात पायऱ्या होत्या व द्वारमंडप आतल्या बाजूला होता. 23 आतल्या पटांगणाला उत्तरेच्या बाजूकडील दारासमोर एक दार होते. ते पूर्वेच्या दाराप्रमाणे होते. त्या माणसाने एका दरापासून दुसऱ्या दारापर्यंतचे अंतर मोजले. ते 100 हात (175 फूट) होते.
24 मग त्या माणसाने मला दक्षिणेकडे नेले. तेथे मला एक दार दिसले. त्या माणसाने त्या दाराच्या बाजूच्या भिंती व द्वारमंडप ह्यांचे मोजमाप घेतले. ते इतर दारांच्या खांबांप्रमाणे व द्वारमंडपांप्रमाणेच भरले. 25 दार, त्याचा द्वारमंडप ह्यांना इतर दारांप्रमाणेच खिडक्या होत्या. दार 50 हात लांब व 25 हात रुंद होते. 26 दारापर्यंत सात पायऱ्या होत्या. त्याचा द्वारमंडप आतल्या बाजूला होता. त्याच्या भिंतींवर प्रत्येक द्वारमंडप आतल्या बाजूला होता. त्याच्या भिंतींवर प्रत्येक बाजूला एक खजुरीचे झाड कोरलेले होते. 27 आतल्या पटांगणाच्या दक्षिणेला एक दार होते. दक्षिणेकडील दारांमधील अंतर त्या माणसाने मोजले. ते 100 हात (175 फूट) होते.
आतले अंगण वा पटांगण
28 मग त्या माणसाने मला दक्षिणेकडील दारातून आतल्या अंगणात आणले. दक्षिणेकडचे दार इतर दारांच्याच मापाचे होते. 29 दक्षिणेकडच्या दाराजवळच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. दार 50 हात (87 फूट 6 इंच) लांब व 25 हात (43 फूट 9 इंच) रुंद होते. त्यांच्या सर्व बाजूंनी द्वारमंडप होते. 30 द्वारमंडप 25 हात (43 फूट 9 इंच) रुंद आणि 5 हात लांब होता. 31 दक्षिणेच्या दाराचा द्वारमंडपाचे तोंड बाहेरच्या पटांगणाकडे होते. त्याच्या खांबावर खजुरीची झाडे कोरलेली होती. त्यांच्या जिन्याला आठ पायऱ्या होत्या. त्या प्रवेशद्वारापर्यंत जात होत्या.
32 त्या माणसाने मला पूर्वेकडून आतल्या अंगणात आणले. त्याने दार मोजले. ते इतर दारांच्या मापाचेच होते. 33 पूर्वेच्या दाराकडील खोल्या बाजूच्या भिंती व द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच त्यांच्याच मापाचे होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. पूर्वेकडील दार 50 हात (87 फूट 6 इंच) लांब व 25 हात (43 फूट 9 इंच) रुंद होते. 34 त्याच्या द्वारमंडपाचे तोंड बाहेरच्या पटांगणाकडे होते. दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम होते. त्याच्या जिन्याला प्रवेशद्वारापर्यंत जाणाऱ्या आठ पायऱ्या होत्या.
35 मग मला त्या माणसाने उत्तरेच्या दाराकडे आणले. त्याने ते मोजले. त्याची मापे इतर दारांप्रमाणेच होती. 36 त्याच्या खोल्या, बाजूच्या भिंती, व द्वारमंडप हे इतर दारांच्या खोल्या, बाजूच्या भिंती व द्वारमंडप ह्यांच्याच मापाचे होते. ते दार 50 हात (87 फूट 6 इंच) लांब व 25 हात (43 फूट 9 इंच) रुंद होते. 37 आणि त्याचा द्वारामंडप बाहेरच्या पटांगणाच्या जवळ असलेल्या दाराच्या शेवटाला होता. दाराच्या दोन्ही भिंतीवर खजुरीच्या झाडांचे कोरीवकाम होते. जिन्याला प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या आठ पायऱ्या होत्या.
अर्पण (बळी) तयार करण्यासाठी खोल्या
38 ह्या प्रवेशद्वारच्या द्वारमंडपापाशी दार असलेली एक खोली होती. ह्या खोलीत, याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना धुवत असत. 39 द्वारमंडपाच्या प्रत्येक बाजूला दोन टेबले होती. त्यावर होमार्पण, पापार्पण व दोषार्पण यांसाठी आणलेले प्राणी मारीत असत. 40 द्वारमंडपाच्या बाहेर, उत्तरेच्या दाराच्या तोंडापाशी, दोन टेबले होती. द्वारमंडपाच्या दुसऱ्या बाजूलाही दोन टेबले होती. 41 चार टेबले भिंतीच्या आत होती. व चार बाहेर होती. एकूण तेथे आठ टेबले होती. ह्यावर याजक बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारीत असत. 42 होमार्पणासाठी ताशीव दगडाची चार टेबले होती. ती 11/2 हात (2 फूट 7.1/2 इंच) उंच होती. होमार्पण वा बळी देण्यासाठी आणलेल्या प्राण्यांना मारण्यासाठी लागणारी हत्यारे याजक ह्या टेबलावर ठेवीत. 43 सर्व मंदिरात 3 इंच लांबीचे आकडे भिंतीवर बसविलेले होते. अर्पण करण्यासाठी आणलेले मांस टेबलावर होते.
याजकांच्या खोल्या
44 आतल्या अंगणाच्या दाराच्या बाहेरच्या बाजूला दोन खोल्या होत्या. एक उत्तरेच्या दारालगत होती. तिचे तोंड दक्षिणेकडे होते. दुसरी दक्षिणेकडे होती. तिचे तोंड उत्तरेकडे होते. 45 तो माणूस मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली ही खोली मंदिरात सेवा करण्याच्या कामावर असलेल्या याजकाकरिता आहे. 46 पण उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीच्या सेवेचे काम करणाऱ्या याजकासाठी आहे. हे सर्व याजक लेवीचे वंशज आहेत. पण याजकांचा दुसरा गट सादोक वंशजांचा आहे व तेच फक्त बळी परमेश्वराकडे आणून परमेश्वराची सेवा करु शकतात.”
47 त्या माणसाने पटांगण मोजले. ते अगदी चौरसाकृती होते. ते 100 हात (175 फूट) लांब व 100 हात (175 फूट) रुंद होते. वेदी मंदिराच्या समोर होती.
मंदिराचे द्वारमंडप
48 मग त्या माणसाने मला मंदिराच्या द्वारमंडपापाशी नेले. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. बाजूची प्रत्येक भिंत 5 हात जाड आणि 3 हात रुंद होती. आणि दोन्हीमधील दार 14 हात होते. 49 द्वारमंडप 20 हात रुंद व 20 हात लांब होते. द्वारमंडपाकडे यायला दहा पायऱ्या होत्या. द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीला प्रत्येकी एक खांब होता. असे तेथे दोन खांब होते.
91 तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता.
तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
2 मी परमेश्वराला म्हणतो, “तू माझी सुरक्षित जागा आहेस, माझा किल्ला,
माझा देव आहेस मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.”
3 देव तुम्हाला अवचित् येणाऱ्या संकटांपासून
आणि भयानक रोगांपासून वाचवेल.
4 तुम्ही रक्षणासाठी देवाकडे जाऊ शकता.
पक्षी जसा आपले पंख पसरुन पिल्लांचे रक्षण करतो तसा
तो तुमचे रक्षण करील देव तुमचे रक्षण करणारी ढाल आणि भिंत असेल.
5 रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल
आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.
6 अंधारात येणाऱ्या रोगाची किंवा दुपारी येणाऱ्या भयानक
आजाराची तुम्हाला भीतीवाटणार नाही.
7 तुम्ही 1,000 शत्रूंचा पराभव कराल,
तुमचा उजवा हात 10,000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल.
तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्शसुध्दा करु शकणार नाहीत.
8 तुम्ही नुसती नजर टाकलीत तरी
त्या दुष्टांना शिक्षा झालेली तुम्हाला दिसेल.
9 का? कारण तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता.
परात्पर देवाला तुम्ही तुमची सुरक्षित जागा बनवले आहे.
10 तुमचे काहीही वाईट होणार नाही.
तुमच्या घरात रोगराई असणार नाही.
11 देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल
आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील.
12 तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून
ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील.
13 तुमच्याजवळ सिंहावरुन आणि
विषारी सापांवरुन चालण्याची शक्ती असेल.
14 परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन.
जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.
15 माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो.
ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन.
मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन.
16 मी माझ्या भक्तांना खूप आयुष्य देईन.
आणि त्यांना वाचवीन.”
2006 by World Bible Translation Center