M’Cheyne Bible Reading Plan
शलमोनाला पुन्हा देवाचे दर्शन
9 शलमोनाच्या मनात होते त्याप्रमाणे त्याने परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांचे काम पूर्ण केले. 2 यापूर्वी गिबोनमध्ये परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले होते. त्याप्रमाणे पुन्हा दुसऱ्यांदा परमेश्वराने त्याला दर्शन दिले. 3 परमेश्वर त्याला म्हणाला,
“मी तुझी प्रार्थना ऐकली. तू मला केलेली विनंती ऐकली. तू हे मंदिर बांधलेस. मी आता ते स्थान पवित्र केले आहे. येथे माझा निरंतर सन्मान होत राहील. हे स्थान माझ्या ध्यानीमनी राहील. 4 तुझे वडील दावीद यांच्या प्रमाणेच तू तुझी वर्तणूक ठेव. ते न्यायी आणि प्रामाणिक होते. तूही माझ्या आज्ञा पाळ, मी सांगितलेले सर्व करत राहा. 5 तू त्याप्रमाणे वागलास तर तुमच्या घराण्यातील व्यक्तीच नेहमी राजासनावर येईल. तुझ्या वडीलांना मी तसे वचन दिले होते. त्यांच्या वंशजांचीच सत्ता इस्राएलवर राहील असे मी म्हटले होते.
6-7 “पण तू किंवा तुझी मुलेबाळे यांचा मार्ग भरकटला, माझ्या आज्ञांचे पालन झाले नाही, तुम्ही इतर दैवतांच्या भजनी लागलात तर मात्र मीच दिलेल्या या भूमीतून इस्राएलांना मी हुसकावून लावीन. इतर लोक तुमच्याकडे कुचेष्टेने बोट दाखवतील. तुमची टर उडवतील. मंदिर मी पवित्र केले आहे. येथे येऊन लोक माझे आदराने स्मरण करतील. पण माझे आज्ञापालन केले नाहीत तर ते मी जमीनदोस्त करीन. 8 हे मंदिर नामशेष होईल. ते पाहणारे स्तंभित होतील आणि म्हणतील, ‘परमेश्वराने या देशाचा आणि या मंदिराचा असा विध्वंस का बरे केला?’ 9 यावर इतर जण सांगतील, ‘याला कारण या लोकांनी परमेश्वर देवाचा त्याग केला. परमेश्वराने यांच्या पूर्वजांना मिसरमधून सोडवले. पण या लोकांनी इतर देव आपलेसे केले. त्या दैवतांच्या हे भजनी लागले. म्हणून परमेश्वराने हे अरिष्ट त्यांच्यावर आणले.’”
10 परमेश्वराचे मंदिर आणि महाल यांचे बांधकाम पूर्ण होण्यास राजा शलमोनाला वीस वर्षे लागली. 11 त्यानंतर शलमोनाने सोराचा (तायर) राजा हिराम याला गालील प्रांतातील वीस नगरे दिली. कारण हिरामने मंदिर व राजमहाल या दोन्हीच्या बांधकामांमध्ये शलमोनला खूपच मदत केली होती. देवदार, गंधसरुचे लाकूड तसेच सोनेही हिरामने शलमोनाला लागेल तसे पुरवले होते. 12 हिराम मग सोराहून (तायर) ही नगरे पाहण्यासाठी म्हणून आला. पण त्याला ती तितकीशी पसंत पडली नाहीत. 13 राजा हिराम म्हणाला, “काय ही तू दिलेली नगरे?” या भूभागाला हिरामने काबूल प्रांत असे नाव दिले. आजही तो भाग काबूल म्हणूनच ओळखला जातो. 14 हिरामने शलमोनाला मंदिराच्या बांधकामासाठी नऊहजार पौंड सोने पाठवले होते.
15 शलमोनराजाने मंदिर आणि महाल यांच्या बांधकामासाठी वेठबिगारीवर मजूर लावले होते. त्यांच्याकडून राजाने आणखीही वास्तू बांधून घेतल्या. मिल्लो, यरुशलेमभोवतीचा कोट तसेच हासोर, मगिद्दो व गेजेर या नगरांची पुनर्बांधणी त्याने करवून घेतली.
16 मिसरच्या राजाने पूर्वी गेजेर हे शहर युध्दात घेऊन मग ते जाळून टाकले होते. तेथे राहणाऱ्या कनानीं लोकांना त्याने ठार केले होते. या फारोच्या मुलीशी शलमोनाने लग्न केले होते. तेव्हा फाराने हे नगरही शलमोनाला लग्नातील आहेरादाखल दिले होते. 17 शलमोनाने ते पुन्हा बांधून काढले. तसेच खालचे बेथ-होरोनही बांधले. 18 तसेच बालाथ, तामार ही वाळवंटातील नगरे, 19 अन्नधान्य आणि इतर वस्तूंची गोदामे, त्याचे रथ आणि घोडे यांच्यासाठी वेगळ्या जागा बांधल्या. यरुशलेममध्ये, लबानोनमध्ये आणि आपल्या अधिपत्याखालील इतर प्रदेशात जे जे त्याला हवे ते ते बांधले.
20 इस्राएल लोकांखेरीज त्या प्रदेशात अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी, यबूसी हेही लोक होते. 21 इस्राएल लोकांना त्यांचा पाडाव करता आलेला नव्हता. पण शलमोनाने त्यांना आपले गुलाम केले. आजही त्यांची स्थिती तशीच आहे. 22 इस्राएल लोकांना मात्र शलमोनाने आपले गुलाम केले नाही. इस्राएली लोक सैनिक, सरकारी अधिकारी, कारभारी, सरदार, रथाधिपती आणि चालक अशा पदांवर होते. 23 शलमोनाने हाती घेतलेल्या कामांवर साडेपाचशे अधीक्षक होते. मजूरांवर ते देखरेख करीत.
24 फारोची मुलगी आपला महाल पूर्ण झाल्यावर दावीद नगरातून तेथे राहायला गेली. नंतर शलमोनाने मिल्लो बांधले.
25 शलमोन वर्षातून तीनदा वेदीवर होमबली आणि शांतीबली अर्पण करीत असे. ही वेदी त्याने परमेश्वरासाठी बांधली होती. तो परमेश्वरापुढे धूपही जाळी. तसेच मंदिरासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवत असे.
26 एसयोन गेबेर येथे शलमोनाने गलबतेही बांधली. हे नगर अदोम देशात तांबड्या समुद्राच्या काठी एलोथजवळ आहे. 27 समुद्राबद्दल चांगली जाण असलेले लोक राजा हिरामच्या पदरी होते. हे खलाशी बरेचदा समुद्रावर जात. हिरामने त्यांना शलमोनाच्या आरमारात, शलमोनाच्या खलाश्यांबरोबर पाठवले. 28 शलमोनाची गलबते ओफिर येथे गेली आणि त्यांनी तेथून एकतीसहजार पाचशे पौंड सोने शलमोनाकडे आणले.
मुले आणि आईवडील
6 मुलांनो, प्रभूशी प्रामणिक राहून आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळा. कारण ते योग्य आहे. 2 “तुझ्या वडिलाचा व आईचा मान राख.” [a] 3 अभिवचनाबरोबरची ही पहिली आज्ञा असल्याने, “तुझ्यासाठी सर्व काही चांगले असावे आणि पृथ्वीवर तुला दीर्घ आयुष्य लाभावे.” [b]
4 आणि वडिलांनो, आपल्या मुलांना राग येईल असे करु नका. उलट, देवापासून जी माहिती व शिक्षण येते त्यान त्यांना वाढवा.
गुलाम आणि मालक
5 गुलामांनो, तुमच्या पृथ्वीवरील मालकांची आज्ञा आदराने, थरथर कांपत, आणि तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने पाळा. ज्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पाळा. 6 जेव्हा माणसे तुमच्याकडे पाहत असतील तेव्हाच फक्त काम करु नका. मनुष्याला पसंत पडावे यासाठी प्रयत्न करु नका. उलट ख्रिस्ताच्या गुलामासारखे काम करा, कारण (ख्रिस्ताचे गुलाम) देवाची इच्छा आपल्या अंतःकारणापासून पूर्ण करतात. 7 गुलाम म्हणून उत्साहाने जणू काय माणसांची नव्हे, तर प्रभुची सेवा करीत आहात, असे काम करा. 8 लक्षात ठेवा की, तुम्हांतील प्रत्येकजण जर काही चांगले करतो तर तो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, ते त्याला प्रभूकडून परत मिळेल.
9 आणि मालकांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा आणि धमकाविण्याचे सोडून द्या. लक्षात ठेवा की तुमचा आणि त्यांचा धनी स्वर्गात आहे. आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा
10 शेवटी, प्रभूमध्ये तुम्ही त्याच्या महान शक्तीसामर्थ्याने सशक्त व्हा. 11 देवाने दिलेले संपूर्ण चिलखत धारण करा. यासाठी की तुम्हांला सैतानाच्या दुष्ट योजनांविरुद्ध उभे राहता यावे. 12 कारण आपले झगडणे, रक्तमांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुद्ध, अधिकान्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे. 13 म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल व वाईट दिवस आल्यावर तुम्हाला प्रतिकार करता येईल.
14 म्हणून भक्क मपणे उभे राहा! सत्याने आपली कंबर बांधा, नीतीमत्त्वाचे उररत्राण धारण करा. 15 आणि सुवार्ता व शांती यांची घोषणा करण्यासाठी सज्जतेच्या वहाणा पायी घाला. 16 या सर्व गोष्टींबरोबर ढाल म्हणून विश्वास घ्या. ज्यामुळे त्या दुष्टाने मारलेले सर्व जळते बाण तुम्हांला विझविणे शक्य होईल. 17 आणि तारणाचे शिररत्राण घ्या, आणि आत्म्याची तलवार जो देवाचा संदेश आहे, तो घ्या. 18 प्रत्येक प्रंसांगी सर्व प्रकारे प्रार्थनापूर्वक विनंति करुन आत्म्यात प्रार्थना करा. चिकाटी व प्रार्थनेसह सर्व संतांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
19 आणि माझ्यासाठी प्रार्थना करीत राहा. कारण जेव्हा मी तोंड उघडेन तेव्हा मला संदेश प्राप्त व्हावा. यासाठी की धैर्याने मला सुवार्तेचे रहस्य माहीत करुन देणे शक्य व्हावे. 20 त्याच्या वतीने मी साखळदंडनी बांधलेला राजदूत म्हणून सेवा करीत आहे. धैर्याने मला ती सांगता यावी म्हणून प्रार्थना करा.
शेवटच्या शुभेच्छा
21 यासाठी तुम्हाला हे कळावे की मी कसा आहे आणि काय करीत आहे, म्हणून तुखिक तुम्हांला सर्व काही सांगेल. तो आमचा प्रिय भाऊ आणि प्रभूमध्ये विश्वासू सेवक आहे. 22 मी त्याला केवळ या कारणासाठीच तुमच्याकडे पाठवीत आहे की माझ्याविषयीचे वर्तमान तुम्हांला कळावे आणि तुमच्या अंतःकरणाचे समाधान व्हावे.
23 देवपिता आणि प्रभु येशू ख्रिस्तापासून आता बंधु बहिणींना विश्वासासह प्रीति आणि शांति लाभो. 24 जे सर्व जण आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीति करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.
गोगचा आणि त्याच्या सैन्याचा मृत्यू
39 “मानवपुत्रा, माझ्यावतीने गोगच्याविरुद्ध बोल. त्याला, परमेश्वर, प्रभू, पुढील गोष्टी सांगतो म्हणून सांग: ‘गोग, मेशेख आणि तुबाल यांचा तू सर्वांत महत्वाचा नेता आहेस पण मी तुझ्याविरुद्ध आहे. 2 मी तुला पकडून परत आणीन. अती उत्तरेकडून मी तुला परत आणीन. इस्राएलच्या पर्वंतांशी लढण्यासाठी मी तुला परत आणीन. 3 पण मी तुझ्या डाव्या हातातील धनुष्य व उजव्या हातातील बाण खाली पाडीन. 4 तू इस्राएलच्या पर्वतांत मारला जाशील. लढाईत तू, तुझे सैन्य आणि तुझ्याबरोबरची राष्ट्रे यांना ठार मारले जाईल. मी तुला मांसभक्षक पक्ष्यांचे व हिंस्र प्राण्याचे भक्ष्य करीन. 5 तू गावात प्रवेश करणार नाहीस. मी सांगतो, बाहेरच्या मोकळ्या रानात तुला ठार मारले जाईल.’” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
6 देव म्हणाला, “मागोगमध्ये व किनाऱ्यावर सुरक्षिपणे राहणाऱ्या लोकांमध्ये मी आग लावीन. मग त्यांना ‘मी परमेश्वर आहे’ हे समजेल. 7 इस्राएलच्या माझ्या लोकांना मी माझे पवित्र नाव माहीत करुन देईन. यापुढे मी लोकांना माझ्या पवित्र नावाला बट्टा लावू देणार नाही. राष्ट्रांना कळेल की मीच परमेश्वर आहे, मीच इस्राएलमधील एकमेव पवित्र आहे. 8 ती वेळ येत आहे! ते घडेलच!” परमेश्वर असे म्हणाला, “त्याच दिवसाबद्दल मी बोलत आहे.”
9 “तेव्हा इस्राएलच्या गावांत राहणारे लोक त्या रानांत जातील. ते शत्रूची शस्त्रे गोळा करुन जाळतील. ते सर्व ढाली, धनुष्य बाण, दंड व भाले जाळतील. ते ह्या शस्त्रांचा उपयोग सरपण म्हणून सात वर्षे करतील. 10 त्यामुळे त्यांना सरपण गोळा करावे लागणार नाही वा जंगलांत लाकडे तोडावी लागणार नाहीत. कारण ते शस्त्रांचा उपयोग सरपणाप्रमाणे करतील. त्यांना लुटू पाहणाऱ्या सैनिकांकडूनच ते मौल्यवान वस्तू काढून घेतील. त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी बळकावू पाहणाऱ्या सैनिकांकडूनच ते अशा गोष्टी घेतील.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
11 देव म्हणाला, “तेव्हा मी गोगला पुरण्यासाठी इस्राएलमधील एक जागा निवडीन. मृत समुद्राच्या पूर्वेकडील, वाटसरुंच्या दरीत गोगला पुरले जाईल. मग प्रवाशांचा रस्ता अडेल. का? कारण त्या ठिकाणी गोग व त्याच्या सैन्याला पुरले जाईल. लोक त्या जागेला ‘गोगच्या सैन्याची दरी’ असे म्हणतील. 12 भूमी शुद्ध करण्यासाठी, इस्राएलच्या लोकांना, सात महिने त्यांना पुरावे लागेल. 13 सामान्य लोक त्या शत्रू सैनिकांना पुरतील. मी ज्या दिवशी गौरविला जाईन, त्या दिवशी इस्राएलच्या लोकांची कीर्ती होईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
14 देव म्हणाला, “त्या मेलेल्या सैनिकांना पुरण्यासाठी, कामगारांना, पूर्ण वेळचे काम द्यावे लागेल. अशा रीतीने, ते देशाला शुद्ध करतील. त्या कामगारांना सात महिने काम करावे लागेल. ते भोवताली प्रेतांचा शोध घेतील. 15 ते सभोवती पाहात जातील. त्यांच्यातील एखाद्याला एखादे हाड दिसताच, तो तेथे खूण करुन ठेवेल. कबर खणणारे येऊन त्या हाडाला गोगच्या सैन्याच्या दरीत पुरेपर्यंत ती खूण तेथेच राहील. 16 मृतांच्या त्या गावाला हमोना [a] असे नाव दिले जाईल. अशा प्रकारे ते देश शुद्ध करतील.”
17 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “मानवपुत्रा माझ्यावतीने सर्व पक्ष्यांशी व हिंस्र प्राण्याशी बोल. त्यांना सांग ‘इकडे या! भोवताली गोळा व्हा. मी तुमच्यासाठी देत असलेला बळी खा. इस्राएलच्या पर्वतांवर फार मोठा बळी दिला जाईल. या मांस खा व रक्त प्या. 18 शक्तिशाली सैनिकांचे मांस तुम्ही खाल. जागातिक नेत्यांचे रक्त तुम्ही प्याल. ते एडके, मेंढ्या, बोकड व बाशानमधील पुष्ट बैलांसारखे आहेत. 19 तुम्हाला हवी तेवढी चरबी तुम्ही खाऊ शकाल. पोट भरेपर्यंत रक्त तुम्ही प्याल. तुम्ही मी मारलेल्या बळीला खाल व त्याचे रक्त प्याल. 20 माझ्या टेबलावर तुम्हाला खाण्यासाठी भरपूर मांस असेल. तेथे घोडे, सारथी, शक्तिशाली सैनिक आणि इतर लढवय्ये असतील.’” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
21 देव म्हणाला, “मी जे केले, ते इतर राष्ट्रांना पाहू देईन. मग ती राष्ट्रे मला मान द्यायला लागतील. त्या शत्रूविरुद्ध वापरलेले माझे सामर्थ्य ते पाहतील. 22 मग त्या दिवसापासून, इस्राएलच्या लोकांना मीच त्यांचा परमेश्वर देव असल्याचे समजून येईल. 23 आणि इस्राएलच्या लोकांना कैदी म्हणून इतर देशांत का नेले गेले, हेही इतर राष्ट्रांना कळेल. त्यांना समजेल की माझी माणसेच माझ्याविरुद्ध गेली म्हणून मी त्यांच्याकडे पाठ फिरविली. त्यांच्या शत्रूंना त्यांचा पराभव करु दिला म्हणून माझे लोक लढाईत मारले गेले. 24 त्यांनी पाप केले व स्वतःला अमंगळ करुन घेतले म्हणून त्यांनी केलेल्या कर्माबद्दल मी त्यांना शिक्षा केली. मी त्यांच्याकडे पाठ फिरविली आणि त्यांना मदत करण्याचे नाकारले.”
25 म्हणून परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “याकोबच्या लोकांना कैदेतून परत आणीन. इस्राएलच्या सर्व लोकांवर मी दया करीन. माझ्या पवित्र नावाबद्दल आवेशाने भावना प्रकट करीन. 26 पूर्वी माझ्या विरुद्ध केलेल्या दुष्टाव्याची लोकांना लाज वाटेल. ते माझ्याविरुद्ध गेले ते सर्व विसरतील. ते त्यांच्या देशात सुरक्षितपणे राहतील. त्यांना कोणीही घाबरविणार नाही. 27 इतर देशांतून मी माझ्या माणसांना परत आणीन. त्यांच्या शत्रूंच्या देशांतून त्यांना गोळा करीन. मग मी किती पवित्र आहे ते इतर पुष्कळ राष्ट्रांना कळेल. 28 त्यांना कळेल की मीच त्यांचा परमेश्वर आहे. का? कारण मीच त्यांना कैदी म्हणून दुसऱ्या देशांत जायला भाग पाडले आणि मीच त्याना एकत्र गोळा करुन त्यांच्या देशात परत आणले. 29 इस्राएलच्या लोकांमध्ये मी माझा आत्मा ओतीन आणि त्या नंतर मी कधीच माझ्या लोकांपासून दूर जाणार नाही.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
भाग चौथा
(स्तोत्रसंहिता 90-106)
देवाचा माणूस मोशे याची प्रार्थना
90 प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.
2 देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि
पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा,
तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.
3 तूच लोकांना या जगात आणतोस आणि
तूच त्यांची पुन्हा माती करतोस.
4 तुझ्यासाठी हजारो वर्षे
म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र.
5 तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे.
सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो.
आम्ही गवतासारखे आहोत.
6 गवत सकाळी उगवते आणि
संध्याकाळी ते वाळते व मरणाला टेकते.
7 देवा, तू रागावतोस तेव्हा आमचा नाश होतो.
आम्हाला तुझ्या रागाची भीती वाटते.
8 तुला आमच्या सर्व पापांची माहिती आहे.
देवा, तू आमचे प्रत्येक गुप्त पाप पाहतोस.
9 तुझा राग आमचे आयुष्य संपवू शकतो एखाद्या कुजबुजी सारखे
आमचे आयुष्य विरुन जाऊ शकते.
10 आम्ही कदाचित् 70 वर्षे जगू आणि
जरा सशक्त असलो तर 80 वर्षे.
आमचे आयुष्य कठोर परिश्रम आणि दु:ख यांनी भरलेले आहे
आणि नंतर आमचे आयुष्य अवचित् संपते आणि आम्ही उडून जातो.
11 देवा, तुझ्या रागाच्या संपूर्ण शक्तीची कुणालाच जाणीव नाही.
परंतु देवा, आमची भीती आणि तुझ्याबद्दलचा आदर तुझ्या रागाइतकाच महान आहे.
12 आमचे आयुष्य खरोखरच किती छोटे आहे
ते आम्हाला शिकव म्हणजे आम्ही खरेखुरे शहाणे बनू शकू.
13 परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत
ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग.
14 तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल.
आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.
15 तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता दिलीस.
आता आम्हांला सुखी कर.
16 तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करु
शकतोस ते त्यांना बघू दे.
17 देवा, प्रभु, आमच्यावर दया कर.
आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.
2006 by World Bible Translation Center