M’Cheyne Bible Reading Plan
शलमोनाचे साम्राज्य
4 समस्त इस्राएल लोकांवर राजा शलमोनाची सत्ता होती. 2 त्याला शासनात मदत करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांनी नावे अशी सादोकचा मुलगा:
अजऱ्या हा याजक होता
3 शिशाचे मुलगे अलिहोरेफ आणि अहीया न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते.
अहीलूदाचा मुलगा यहोसाफाट हा बखरकार होता.
4 बनाया हा यहोयादाचा मुलगा सेनापती होता.
सादोक आणि अब्याथार याजक होते
5 नाथानचा मुलगा अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता.
नाथानचा मुलगा जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता.
6 अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता.
अब्दाचा मुलगा अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता.
7 इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागातून अन्नधान्य गोळा करुन राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई. 8 त्या बारा कारभाऱ्यांची नावे अशी:
बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता.
9 माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी.
10 अरुबोथ, सीखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभाही होता.
11 बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची मुलगी टाफाथ ही याची पत्नी.
12 तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेएलच्या खाली बेथ-शानापासून अबेल-महोला पर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलूदाचा मुलगा बाना हा होता.
13 रामोथ-गिलादवर बेन-गेबेर हा प्रमुख होता. गिलादमधील मनश्शेचा मुलगा याईर याची सर्व गावे, बाशानमधील अर्गोब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि दिंडी दरवाजावर पंच धातूचा आगळा असलेली साठ नगरे होती.
14 इद्दोचा मुलगा अहीनादाब महनाईम प्रांतावर होता.
15 नफतालीवर अहीमास होता. त्यानेही शलमोनाची मुलगी बासमथ हिच्याशी लग्न केले होते.
16 हूशयाचा मुलगा बाना हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता.
17 पारुहाचा मुलगा यहोशाफाट इस्साखारवर होता.
18 एलाचा मुलगा शिमी बन्यामीनचा कारभारी होता.
19 उरीचा मुलगा गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सिहोन आणि बाशानचा राजा ओग हे या प्रांतात राहात होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता.
20 यहूदा आणि इस्राएलमध्ये समुद्रतीरावरील वाळूकणांसरखी अगणित माणसे होती. ती खात, पीत व मजाकरत आनंदाने जगत होती.
21 युफ्राटिस नदीपासून पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत शलमोनाची सत्ता होती. मिसरच्या सीमेला त्याची हद्द भिडली होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत.
22-23 शमोनाला त्याच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांसाठी दररोजच खालील अन्नपदर्थ लागत दीडशे बुशेल मैदा, तीनशेबुशेल कणीक, दहा पुष्ट गुरे, कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, हरण, सांबर, भेकर, खाण्यायोग्य पक्षी.
24 युफ्राटिस नदीच्या पश्र्चिमेकडील सर्व देशांवर त्याची सत्ता होती. तिफसाहापासून गज्जापर्यंतचा हा प्रदेश होय सर्वत्र शांतता नांदत होती. 25 दान पासून बैरशेबापर्यंत यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहात होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते.
26 रथाच्या चारहजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार घोडेस्वार होते. 27 शिवाय ते बारा कारभारी दर महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते. 28 रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभारी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी.
शलमोनाची सूज्ञता
29 देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण दिले होते. त्यामुळे त्याला अनेक गोष्टी समजत. त्याची हुषारी कल्पनातीत होती. 30 पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते. 31 पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची मुले हेमान व कल्यकोल व दर्दा यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र दुमदुमत होते. 32 आपल्या आयुष्यात त्याने तीनहजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली.
33 निसगर्विषयीही त्याला ज्ञान होते. लबानोनमधल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्याला ज्ञान होते. प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे. 34 देशादेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार माणसांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.
शलमोन मंदिर उभारतो
5 हिराम हा सोराचा (तायरचा) राजा होता. त्याचे दावीदाशी सख्य होते. त्यामुळे त्याने शलमोन राज्यावर आल्याचे कळताच आपल्या सेवकांना शलमोनाकडे पाठवले. 2 शलमोनाने राजा हिरामला असा निरोप पाठवला.
3 “माझे वडील सतत युध्दात गुंतलेले असल्यामुळे त्यांना परमेश्वर देवासाठी मंदिर बांधता आले नाही. सर्व शत्रूंचा पाडाव होईपर्यंत ते थांबले होते. 4 परंतु आता परमेश्वराने सर्व बाजूंनी माझ्या राज्याला शांतता दिली आहे. मला आता शत्रू नाहीत. माझ्या लोकांना कोणताही धोका नाही.
5 “परमेश्वराने माझ्या वडीलांना एक वचन दिले होते. परमेश्वराने सांगितले होते, ‘तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन. तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील’ त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ एक मंदिर उभारण्याची माझी योजना आहे. 6 त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. तुम्ही तुमची माणसे लबानोन येथे पाठवा. तेथील गंधसरुची झाडे त्यांना माझ्यासाठी कापायला सांगा. माझेही चाकर मी त्यांच्याबरोबर पाठवीन. तुम्ही तुमच्या नोकरांची जी मजुरी ठरवाल ती मी देईन. पण मला तुमची मदत हवी आहे. आमचे सुतार तुमच्या सिदोनी सुतारांइतके कुशल नाहीत.”
7 हिरामला शलमोनाचा निरोप ऐकून फार आनंद झाला. तो म्हणाला, “दावीदाला एवढा ज्ञानी मुलगा या मोठ्या देशावर राज्य करण्यासाठी दिल्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो.” 8 मग हिरामने शलमोनाला असा संदेश पाठवला:
“तुझे म्हणणे मला कळले. देवदार आणि गंधसरुची तुला हवी तितकी झाडे मी तुला देईन. 9 माझे नोकर ती लबानोनपासून समुद्रापर्यंत वाहून आणतील मग त्याचे तराफे करुन तुला हव्या त्या ठिकाणी समुद्रावरुन ते आणतील. तेथे ते तराफे सोडवले जातील. मग तू ती झाडे घे.”
10 हिरामने शलमोनाला त्याच्या गरजेप्रमाणे सर्व गंधसरु व देवदारुची झाडे दिली.
11 आणि शलमोनाने हिरामला त्याच्या कुटुंबासाठी दरवर्षी 1,20,000 बुशेल गहू आणि 1,20,000 गंलन निर्भेळ तेल दिले. 12 परमेश्वराने कबूल केल्याप्रमाणे शलमोनाला शहाणपण दिले. आणि हिराम व शलमोन या दोघांमध्ये सख्य निर्माण झाले. या दोन राजांनी आपसात शांततेचा करार केला.
13 शलमोनाने वेठबिगारीवर इस्राएलची 30,000 माणसे या कामासाठी नेमली. 14 अदोनीराम नावाच्या माणसाला त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. शलमोनाने या लोकांचे तीन गट केले. प्रत्येक गटात 10,000 माणसे होती. प्रत्येक गट लबानोनमध्ये एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत. 15 ऐंशी हजार लोकांना शलमोनाने डोंगराळ भागात कामाला लावले. त्यांना पाथरवटाचे काम होते. दगड वाहून नेणारी माणसे सत्तर हजार होती. 16 या कामकऱ्यांवर देखरेख करणारी तीन हजार तीनशे माणसे होती. 17 त्यांना शलमोनाने मोठे, मौल्यवान चिरे मंदिराच्या पायासाठी म्हणून कातायला सांगितले. ते फार काळजीपूर्वक कापण्यात आले. 18 मग शलमोन आणि हिरामच्या बांधकाम करणाऱ्यांनी आणि गिबलोस येथल्या लोकांनी ते चांगले घडवले. मंदिर उभारणीसाठी घडीव चिरे आणि ओंडके त्यांनी तयार केले.
मरणाकडून जीवनाकडे
2 पूर्वी तुम्ही आपले अपराध आणि पातके यांमुळे आध्यात्मिक रीतीने मेला होता. 2 ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे. 3 एके काळी आम्हीसुद्धा त्यांच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दुष्ट इच्छांचे समाधान करीत होतो आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांची पूर्तंता करीत होतो. तसेच जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो.
4 पण देव खूप दयाळू आहे. त्याच्या महान प्रीतिने त्याने आमच्यावर प्रेम केले. 5 आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या आमच्या पापांमध्ये मेलेले असतानाच त्याने आम्हांला ख्रिस्ताबरोबर जीवन दिले. (तुमचे तारण देवाच्या कृपने झाले आहे.) 6 देवाने आम्हांला ख्रिस्ताबरोबर नविन जीवनात उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्याबरोबर त्याच्या आसनावर बसविले, कारण आम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहोत. 7 देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या अतुलनीय कृपेची संपत्ती दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हांविषयीची ममता व्यक्त करावी.
8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नाही, तर ते देवापासूनचे दान असे आहे. 9 आणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे. यासाठी कोणी बढाई मारु नये. 10 कारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हांला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते. यासाठी की, त्यामध्ये चालणे आम्हांला शक्य व्हावे.
ख्रिस्तामध्ये एक
11 म्हणून, आठवा की एके काळी, तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना (विदेश्यांना) सुंता न झालेले असे, ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते. 12 आठवा की, त्यावेळी तुम्ही ख्रिस्तविरहित, देवाचे लोक जे इस्राएल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते, आणि देवाच्या अभिवचनाशी निगडित अशा कराराशी तुम्ही परके असे होता, तुम्ही या जगात आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला. 13 पण आता, ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एके काळी देवापासून दूर होता, ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात.
14 कारण त्याच्याद्वारे आम्हांला शांतीचा लाभ झाला आहे. त्याने दोन्ही गोष्टी एक केल्या आणि आपल्या शरीराने त्याने वैराचा, दुभागणाऱ्या भिंतीचा अडथळा पाडून टाकला. 15 त्याने नियमशास्त्र त्याच्या नीतिनियमांसहित रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक मानव निर्माण करुन शांति करणे त्याला शक्य व्हावे. 16 आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे देवाबरोबर एका शरीरात त्या दोघांमध्ये समेट घडवून आणता यावा, ज्यामुळे या दोन गोष्टीतील वैमनस्य संपवता येईल. 17 म्हणून तो आला आणि त्याने जे तुम्ही देवापासून दूर होता व जे तुम्ही देवाजवळ होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, 18 कारण त्याच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्याच्या द्वारे देवाजवळ प्रवेश होतो.
19 यामुळे, तुम्ही आता परके आणि यहूदीतर नाहीत. तर तुम्ही देवाच्या लोकांबरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात. 20 तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. 21 संपूर्ण इमारात त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभुमध्ये एक पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे. 22 त्याच्यामध्ये तुम्हीही इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.
अदोमबद्दल संदेश
35 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, सोईर पर्वताकडे पाहा, आणि माझ्यावतीने त्याच्याविरुद्ध बोल. 3 त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:
“‘सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे.
मी तुला शिक्षा करीन. मी तुला उजाड करीन.
4 तुझ्या गावांचा मी नाश करीन.
तू ओसाड होशील.
मग तुला कळून चुकेल की मी परमेश्वर आहे.
5 का? कारण तू नेहमीच माझ्या
माणसांच्या विरुद्ध होतास.
इस्राएलच्या अखेरच्या शिक्षेच्या वेळी,
त्यांच्या संकटकाळी,
तू त्यांच्यावर तलवार चालविलीस.’”
6 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “ती शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो की मी तुला मृत्युदंड देईन. मृत्यू तुझा पाठलाग करील. लोकांना ठार करण्यात तुला घृणा वाटली नाही. म्हणून मृत्यू तुझा पाठलाग करील. 7 सेईर पर्वताला ओसाड, उजाड करीन. त्या गावातून येणाऱ्या प्रत्येकाला मी ठार करीन. तसेच त्या गावात जाऊ पाहणाऱ्यालाही मी ठार मारीन. 8 त्याचे डोंगर मी मृत शरींरांनी झाकून टाकीन. टेकड्यांवर, दऱ्यांतून, आणि घळींतून प्रेते पडतील. 9 मी तुला कायमचा ओसाड करीन. तुझ्या शहरांतून कोणीही राहाणार नाही. मग तुला पटेल की मीच परमेश्वर आहे.”
10 तू म्हणालास “ती दोन राष्ट्रे (इस्राएल व यहूदा) माझी होतील आम्ही त्यांना आमच्या मालकीची करु.”
पण परमेश्वर तिथे होता. 11 आणि तो परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “तू माझ्या माणसांचा द्वेष केलास. त्यांच्यावर रागावलास, म्हणून मी तुझा तिरस्कार करतो. मी शपथपूर्वक वचन देतो की तू जसे त्यांना दुखावलेस, तशीच शिक्षा मी तुला करीन. मी तुला शिक्षा करुन लोकांना दाखवून देईन की मी त्यांच्या पाठीशी आहे. 12 मग तुलासुद्धा कळेल की मी तू त्यांना उच्चारलेले सर्व अपमानकारक शब्द ऐकले होते.
“इस्राएलच्या पर्वताबद्दल तू खूप वाईट बोललास. तू म्हणालास ‘इस्राएलचा नाश झाला आहे. मी त्याला भक्ष्याप्रमाणे चोखीन.’ 13 तुला गर्व झाला होता आणि तू माझ्याविरुद्ध बोललास. तू अनेक वेळा माझ्याविरुद्ध बोललास, आणि मी खरेच सांगतो की मी प्रत्येक शब्द ऐकला.”
14 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी तुझा नाश केल्यावर सर्व जगाला आनंद होईल. 15 इस्राएलचा नाश झाल्यावर तुला आनंद झाला होता. मी तुलाही अगदी तशीच वागणूक देईन. सेईर पर्वताचा व संपूर्ण अदोम देशाचा नाश होईल. मगच तुला समजेल की मी परमेश्वर आहे.”
प्रमुक गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तुतिगीत
85 परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव.
याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत.
कैद्यांना त्यांच्या देशात परत आण.
2 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
त्यांची पापे पुसून टाक.
3 परमेश्वरा, रागावणे सोडून दे.
क्रोधित होऊ नकोस.
4 देवा, तारणहारा, आमच्यावर रागावणे सोडून दे.
आणि आमचा पुन्हा स्वीकार कर.
5 तू आमच्यावर कायमचा रागावणार आहेस का?
6 कृपा करुन आम्हाला पुन्हा जगू दे.
तुझ्या लोकांना सुखी कर.
7 परमेश्वरा, आम्हाला वाचव आणि
तू आमच्यावर प्रेम करतोस ते दाखव.
8 परमेश्वर देव काय म्हणाला ते मी ऐकले.
तो म्हणाला की त्याच्या लोकांसाठी येथे शांती असेल,
जर ते त्यांच्या मूर्ख जीवन पध्दतीकडे परत वळले नाहीत तर त्याच्या भक्तांना शांती लाभेल.
9 देव लवकरच त्याच्या भक्तांना वाचवील.
आम्ही परत मानाने आमच्या जमिनीवर राहू.
10 देवाचे खरे प्रेम त्याच्या भक्तांना भेटेल.
चांगुलपणा आणि शांती त्यांचे चुंबन घेऊन त्यांचे स्वागत करील.
11 पृथ्वीवरचे लोक देवाशी प्रामाणिक राहातील
आणि स्वर्गातला तो देव त्यांच्याशी चांगला वागेल. [a]
12 परमेश्वर आपल्याला खूप चांगल्या गोष्टी देईल.
जमीन खूप चांगली पिके देईल.
13 देवाच्या समोर चांगुलपणा जाईल
आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करील.
2006 by World Bible Translation Center