M’Cheyne Bible Reading Plan
राजा शलमोन सूज्ञता मागतो
3 मिसरचा राजा फारो याच्या मुलीशी लग्र करुन शलमोनाने फारोशी करार केला. शलमोनाने तिला दावीद नगरात आणले. त्याच्या महालाचे आणि परमेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम तेव्हा चालू होते. यरुशलेमभोवती तटबंदी उभारायचे कामही शलमोनाने हाती घेतले होते. 2 मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बली अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात. 3 शलमोनही आपले वडील दावीद यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे मनःपूर्वक पालन करुन परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. दावीदाने सांगितलेल्या गोष्टींखेरीज आणखीही एक गोष्ट तो करत असे. यज्ञ करायला आणि धूप जाळायला तो उंच ठिकाणी जात असे.
4 गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन एकदा यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली. 5 तो गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्याला स्वप्नात दर्शन दिले देव म्हणाला, “तुला काय हवे ते माग मी ते देईन.”
6 शलमोन तेव्हा म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडील यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते भलेपणाने आणि योग्य मार्गाने जगले. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलालाच गादीवर बसवून तू मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस. 7 माझ्या वडीलांनंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी अजाण मुलासारखाच आहे. माझे कर्तव्य बजावायला योग्य ते शहाणपण माझ्याजवळ नाही. 8 मी तुझा सेवक तू निवडलेल्या अक्षरश: अगणित अशा लोकांपैकी एक आहे. शासकाला तर अनेक निर्णय करावे लागतात. 9 तेव्हा राज्य करायला आणि लोकांशी न्यायबुध्दीने वागायला आवश्यक ते शहाणपण तू मला दे. त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज एवढ्या लोकांवर राज्य करता येणे अशक्य आहे.”
10 शलमोनाने हे मागितले याचा परमेश्वराला फार आनंद झाला 11 म्हणून देव त्याला म्हणाला, “तू स्वतःसाठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस. 12 तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तू ज्ञानी आणि चाणाक्ष होशील तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही. 13 शिवाय तू न मागितलेल्या गोष्टीही बक्षीस म्हणून मी तुला देईन. आयुष्यभर तुला मानसन्मान मिळेल आणि तुझ्यासारखा थोर राजा कोणी असणार नाही. 14 मी दाखवलेल्या मार्गांने चाल आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळ. आपल्या वडीलांप्रमाणेच वाग. असे वागलास तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.”
15 शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरुशलेमला जाऊन परमेश्वराच्या करारकोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यात त्याने परमेश्वराला शांतीअर्पणे वाहिली. मग आपल्या राज्यकारभारात ज्यांची मदत झाली त्या सर्व वडिलधाऱ्यांना आणि सेवकांना मेजवानी दिली.
16 एकदा दोन वेश्या शलमोनाकडे आल्या. राजापुढे त्या दोघी उभ्या राहिल्या. 17 त्यातली एक म्हणाली, “महाराज, ही आणि मी एकाच घरात राहतो. आम्ही दोघी गर्भवती होतो आणि आमचे दिवस भरत आले होते. मी बाळाला जन्म दिला तेव्हा ही माझ्या जवळच होती. 18 तीन दिवसांनंतर ही पण प्रसूत झाली. आमच्याखेरीज घरात आणखी कोणी नव्हते. आम्ही दोघीच काय त्या राहात होतो. 19 एका रात्री ही बाळाला घेऊन झोपलेली असताना तिचे बाळ तिच्याखाली चेंगरुन मेले. 20 तेव्हा मी झोपेत असताना त्या रात्रीच तिने माझे बाळ माझ्या कुशीतून घेतले आणि ते स्वतःकडे ठेवून आपले मृत बालक माझ्या अंथरुणावर ठेवले. 21 दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी बाळाला पाजायला घेतले तर बाळ मृत असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून मी बारकाईने न्याहाळले असता हे बाळ माझे नाही असे मला आढळले.”
22 पण तेवढ्यात ती दुसरी बाई म्हणाली, “नाही, जिवंत मूलच माझे आहे, मेलेले बाळ तुझे आहे.”
पहिली त्यावर म्हणाली, “तू खोटे बोलतेस, मेले ते तुझे बाळ आणि जिवंत आहे ते माझे.” अशाप्राकरे दोघींचाही राजासमोर कडाक्याचा वाद झाला.
23 तेव्हा राजा शलमोन म्हणाला, “जिवंत मूल आपले आणि मेलेले बाळ दुसरीचे असे तुम्ही दोघीही म्हणता.” 24 राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले. 25 राजा शलमोन म्हणाला, “आता आपण असे करु. त्या जिवंत बाळावर वार करुन त्याचे दोन तुकडे करु आणि दोघींना एक एक देऊ.”
26 दुसरी बाई म्हणाली, “फार छान! बाळाचे दोन तुकडे करा, म्हणजे आमच्यापैकी कोणालाही ते मिळणार नाही.” पण पहिल्या बाईला, खऱ्या आईला, वात्सल्याचा उमाळा आला. ती राजाला म्हणाली, “नको, बाळाला मारु नका ते तिच्याकडेच राहू द्या.”
27 तेव्हा हे ऐकून राजा म्हणाला, “बाळाला मारु नका. त्याला पहिल्या बाईच्या हवाली करा. तीच खरी आई आहे.”
28 राजाचा हा निवाडा इस्राएलच्या लोकांच्या कानावर गेला. राजाच्या चाणाक्षपणाबद्दल त्यांना आदर वाटला. योग्य निर्णय घेण्याचे उच्च कोटीचे परमेश्वरी शहाणपण त्याच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आले.
1 देवाच्या इच्छेने झालेला येशू ख्रिस्ताचा दास पौल याजकडून, इफिस [a] येथे जे देवाचे लोक आहेत त्यांना व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना,
2 देव आपला पिता आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त यांजकडून कृपा व शांति असो.
ख्रिस्तात आध्यात्मिक आशीर्वाद
3 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गराज्यातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आम्हांला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. 4 ख्रिस्तामध्ये देवाने आम्हांला जग निर्माण होण्यापूर्वी त्याच्या आमच्यावरिल प्रेमामुळे त्याच्यासमोर आम्ही निर्दोष व पवित्र असावे म्हणून निवडले आहे. 5 त्याच्या कृपायुक्त हेतूनुसार येशू ख्रिस्ताद्वारे त्याने दत्तक होण्यासाठी आमची नेमणूक केली. 6 त्याने हे त्याच्या गौरवी कृपेची स्तुति व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हांला फुकट दिली.
7 त्याच्यामध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही स्वंतत्र केले गेलो, त्याच्या कृपेच्या समृद्धीने आम्हांला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. 8 त्याची कृपा आपले ज्ञान आणि समजबुद्धी वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे. 9 ख्रिस्तामध्ये आपणांला दाखविण्याच्या त्याच्या अनुग्रहाप्रमाणे त्याच्या इच्छेचे रहस्य आपल्याला कळविले. 10 पृथ्वीवरील आणि स्वर्गातील सर्व गोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र आणण्यासाठी अशी ती योजना काळाच्या पूर्णतेसाठी होती.
11 ख्रिस्तामध्ये आम्ही देवाचे लोक म्हणून निवडले गेलो होतो. यासाठी आम्ही अगोदरच निवडले गेलो होतो. देवाचा हेतू लक्षात घेऊन जो सर्व गोष्टी त्याच्या इच्छेच्या हेतूनुसार पूर्णत्वास नेतो 12 यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर अगोदरच आशा ठेवली होती, त्या आम्हांकडून त्याच्या गौरवाची स्तुति व्हावी. 13 ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा जेव्हा सत्याची म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आणि ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा देवाने तुम्हांवर शिक्का मारला 14 जोपर्यंत देव, आम्ही जे त्याचे आहोत त्यांना पूर्ण आणि शेवटचे स्वातंत्र्य देईपर्यंत पवित्र आत्मा हा आमच्या वतनाच्या हिश्शाचा विसार आहे. आणि यामुळे त्याच्या गौरवाची स्तुति होईल.
पौलाची प्रार्थना
15-16 यासाठी, जेंव्हापासून मी तुमच्या प्रभु येशूवरील विश्वासाविषयी ऐकले आणि देवाच्या लोकांबद्दलच्या तुमच्या प्रेमाविषयी ऐकले, तेव्हापासून तुमच्यासाठी देवाचे उपकार मानण्याचे मी थांबविले नाही. 17 मी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचे आध्यात्मिक सामर्थ्य जे पित्याविषयीचे ज्ञान तुम्हांला पुरवील, ते देवो.
18 मी असे सांगतो की, तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित होवोत यासाठी की तुम्हाला तुमच्या पाचारणाची आशा व संतांमध्ये त्याच्या वतनाच्या वैभवाची श्रीमंती किती आहे हे कळावे. 19 आणि आम्हांला विश्वासणाऱ्यांसाठी त्याचे अतुलनीय सामर्थ्य किती महान आहे, जणू काय त्याच्या प्रचंड सामर्थ्याचा तो सराव आहे. 20 जो तो ख्रिस्तामध्ये करतो. जेव्हा त्याला (ख्रिस्ताला) मरणातून उठविले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले. 21 देवाने ख्रिस्ताला प्रत्येक अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे या युगातच नव्हे तर येणाऱ्या युगातही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा उंच ठिकाणी ठेवले. 22 आणि देवाने ख्रिस्ताला मंडळीचा सर्वोच्च प्रमुख केले. 23 मंडळी ख्रिस्ताचे शरीर आहे. जी पूर्णता त्याने सर्व गोष्टींमध्ये सर्व रीतीने भरली आहे, ती पूर्णता तो मंडळीला देतो.
इस्राएल मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे आहे
34 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या मेंढपाळांविषयी (नेत्यांविषयी) बोल. माझ्यासाठी त्यांच्याबरोबर बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो. ‘तुम्ही इस्राएलचे मेंढपाळ स्वतःच फक्त चरत आहात. त्यामुळे तुमचे वाईट होईल. तुम्ही कळपाला खायला का घालत नाही? 3 तुम्ही धष्टपुष्ट मेंढ्या खाता, त्यांच्या लोकरीचा उपयोग स्वतःला कपडे करण्याकरिता करता. तुम्ही धष्टपुष्ट मेंढ्या मारता. पण कळपाला खायला घालीत नाही. 4 तुम्ही दुर्बळांना सबळ केले नाही. तुम्ही आजारी मेंढ्यांची काळजी घेतली नाही. जखमींना मलमपट्टी केली नाही. काही मेंढ्या भरकटल्या पण तुम्ही जाऊन त्यांना परत आणले नाही. तुम्ही त्यांना शोधायला गेला नाहीत. नाही! तुम्ही फारच दुष्ट आणि निष्ठुर होता. आणि मेंढ्यांनाही तुम्ही दुष्टपणाने व निष्ठुरतेनेच वागविण्याचा प्रयत्न केला.
5 “‘आणि कोणीच मेंढपाळ नसल्याने मेंढ्या आता विखुरल्या आहेत. त्या हिंस्र पशूंचे भक्ष्य झाल्या आहेत, कारण त्या पसरल्या गेल्या. 6 माझा कळप सर्व डोंगरांतून व सर्व टेकड्यांवरुन भटकला, जगाच्या पाठीवरील प्रत्येक ठिकाणी विखुरला आणि त्याचा शोध घेण्यास कोणीही नव्हते.’”
7 म्हणून, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, 8 “मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो. हिंस्र पशूंनी माझ्या मेंढ्या पकडल्या. खरंच! माझ्या मेंढ्या वन्य प्राण्यांचे भक्ष्य झाल्या. का? कारण त्यांना खरा मेंढपाळ नव्हता. माझ्या मेंढपाळांनी माझ्या कळपावर लक्ष ठेवले नाही. नाही! त्यांनी फक्त मेंढ्या मारल्या व स्वतःची पोटे भरली. त्यांनी माझ्या कळपाला खाऊ घातले नाही.”
9 तेव्हा, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. 10 परमेश्वर म्हणतो, “मी त्या मेंढपाळांच्याविरुद्ध आहे. मी माझ्या मेंढ्या त्यांच्याकडून परत मागीन. मी त्यांच्यावर तोंडसुख घेईन. ह्यापुढे ते माझे मेंढपाळ असणार नाही. मग ते स्वतःच्या तुंबड्या भरु शकणार नाहीत. आणि त्यांच्यापासून मी माझ्या कळपाला वाचवीन. मग माझ्या मेंढ्या त्यांचे भक्ष्य होणार नाहीत.”
11 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी स्वतःच त्यांचा मेंढपाळ होईन. मी माझ्या मेंढ्यांचा शोध घेईन. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. 12 मेंढपाळ जर मेंढ्यांबरोबर असेल, तर त्या भरकटू लागताच, तो त्यांचा शोध घेईल, त्याचप्रमाणे, मी करीन. मी माझ्या मेंढ्यांना वाचवीन. त्या अंधाऱ्या व ढगाळ दिवशी, त्या जेथे जेथे विखुरल्या असतील, तेथून तेथून मी त्यांना परत आणीन. 13 त्या त्या राष्ट्रांतून मी त्यांना परत आणीन. निरनिराळ्या देशांतून मी त्यांना एकत्र आणीन. मी त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलच्या डोंगरांवर, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी चरु देईन. 14 मी त्यांना चांगल्या कुरणांत नेईन. इस्राएलच्या डोंगरावरील उंच ठिकाणी त्या जातील. तेथे चांगल्या डोंगरावरील उत्तम हिरवळीवर त्या चरतील. 15 हो! मी माझ्या कळपाला खायला घालीन. आणि त्यांना विश्रांतीच्या जागी घेऊन जाईन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
16 “हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन. भटकलेल्यांना मी परत आणीन. जखमी झालेल्या मेंढ्यांना मी मलमपट्टी करीन. दुर्बलांना मी सबळ करीन. मी त्या लठ्ठ व मत्त मेंढपाळांचा मात्र नाश करीन. त्यांना योग्य अशीच शिक्षा मी देईन.”
17 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, तू माझ्या कळपा “मी माझ्या कळपातील मेंढ्या-मेंढ्यात, एडका व बोकड ह्यांच्यात न्यायनिवाडा करीन. 18 सुपीक जमिनीवर वाढणारे गवत तुम्ही खाऊ शकता. मग इतर मेंढ्यांचे गवत तुम्ही का चिरडून टाकता? तुम्ही भरपूर शुद्ध पाणी पिऊ शकता. मग तुम्ही इतरांचे प्यायचे पाणी का ढवळता? 19 तुमच्या पावलांनी, चिरडलेले गवत आणि ढवळलेले पाणी, माझ्या कळपाने प्यायलेच पाहिजे.”
20 म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, त्यांना म्हणतो, “मी स्वतः लठ्ठ मेंढी आणि बारीक मेंढी ह्यांच्यात निवाडा करीन. 21 तुम्ही बाजूने व खांद्याने ढकलता. तुमच्या शिंगांनी तुम्ही दुर्बळ मेंढ्यांना खाली पाडता. तुम्ही, त्यांना ढकलून दूर घालवून देता. 22 म्हणून, मी माझ्या कळपाला वाचवीन. यापुढे हिंस्र पशू त्यांना पकडणार नाहीत. मी मेंढ्या-मेंढ्यात न्यायनिवाडा करीन. 23 मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन. माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांना खायला घालील व त्यांच्या मेंढपाळ होईल. 24 मग मी, परमेश्वर व प्रभू, त्यांच्या देव होईन. माझा सेवक, दावीद राजा म्हणून त्यांच्यात राहील हे माझे परमेश्वराचे शब्द आहेत.
25 “मी माझ्या मेंढ्यांबरोबर एक शांततेचा करार करीन. मी अपायकारक प्राण्यांना या भूमीतून दूर करीन. मग मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहू शकतील आणि रानात सुरक्षितपणे झोपू शकतील. 26 माझ्या टेकडी (यरुशलेम) भोवतालच्या जागा आणि मेंढ्या ह्यांना मी आशीर्वाद देईन. योग्य वेळी मी पाऊस पाडीन. ते आशीर्वादांच्या वर्षावात न्हाऊन निघतील. 27 शेतांत वाढणारी झाडे फळतील. पृथ्वीवर सुगीचा मोसम येईल. त्यामुळे मेंढ्या त्यांच्या बळापासून मी त्यांना वाचवीन. मग त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे. 28 यापुढे इतर राष्ट्रांकडून ते प्राण्याप्रमाणे पकडले जाणार नाहीत. हिंस्र पशू त्यांना खाणार नाहीत. ते सुखरुप राहतील. त्यांना कोणीही घाबरिणार नाही. 29 जी सुंदर आणि प्रसिद्ध होईल, अशी जमीन मी त्यांना देईन. मग त्या देशात त्यांची उपासमार होणार नाही. यापुढे इतर राष्ट्रांकडून त्यांना अपमान सहन करावा लागणार नाही. 30 मग त्यांना समजून येईल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे, व मी त्यांच्याबरोबर आहे, इस्राएलच्या लोकांना ती माझी माणसे आहेत हेही कळेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
31 “तुम्ही माझी मेंढरे आहात, माझ्या कुरणातील मेंढरे आहात. तुम्ही फक्त माणसे आहात आणि मी तुमचा देव आहे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
आसाफाचे स्तोत्र
83 देवा, गप्प राहू नकोस.
तुझे कान बंद करु नकोस.
देवा, कृपा करुन काही तरी बोल.
2 देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत.
ते लवकरच हल्ला करतील.
3 ते तुझ्या लोकांविरुध्द गुप्त योजना आखत आहेत.
ते तू ज्या माणसांवर प्रेम करतोस त्या माणसांविरुध्दच्या योजनाची चर्चा करत आहेत.
4 ते शत्रू म्हणत आहेत, “या त्यांचा पूर्णनिपात करु.
यानंतर कोणालाही ‘इस्राएल’ या शब्दाची आठवण सुध्दा येणार नाही.”
5 देवा, ते सगळे लोक तुझ्याविरुध्द आणि
तू आमच्याशी केलेल्या करारा विरुध्द लढण्यासाठी एकत्र आले.
6-7 ते शत्रू आमच्याशी लढण्यासाठी एकत्र आले,
अदोम आणि इश्माएलीचे लोक, मवाब आणि हागारचे वंशज गाबाल,
अम्मोन अमालेकचे लोक, पलेशेथ आणि सोरचे लोक.
ते सगळे लोक आमच्याशी लढायला एकत्र आले.
8 अश्शूरही त्यांना मिळाले.
त्यांनी लोटाच्या वंशजांना खूप बलशाली बनवले.
9 देवा, तू जसा मिद्यानचा, सीसरा व याबीन यांचा
किशोन नदीजवळ पराभव केलास तसाच तू शत्रूचा पराभव कर.
10 तू त्यांचा एन-दोर येथे पराभव केलास
आणि त्यांची प्रेते जमिनीवर कुजली आणि त्यांचे खत बनले.
11 देवा, शत्रूच्या प्रमुखाचा पराभव कर.
तू ओरेब व जेब यांचे जे केलेस तेच त्यांचेही कर जेबह व सलमुन्ना यांचे जे केलेस तसेच त्यांचे ही कर.
12 देवा, ते लोक आम्हाला जबरदस्तीने तुझ्या वस्तीवरुन जायला सांगत होते
म्हणजे त्यांना तिचा ताबा घेता येईल.
13 देवा, तू त्यांना गवतासारखे वाऱ्यावर उडवून लाव वाऱ्याने
वाळलेलं गवत इतरत्र पसरतं तस तू त्यांना पसरवून दे.
14 अग्नी जसा जंगलाचा व डोंगराचा नाश करतो
तसा तू शत्रूचा नाश कर.
15 देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव.
त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे.
16 देवा, आपण खरोखरच अशक्त आहोत हे त्यांना कळून येऊ दे.
नंतर त्यांना तुझ्या नावाचा धावा करायची इच्छा होईल.
17 देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर.
त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
18 नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल.
तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल.
तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस
हे ही त्यांना कळेल.
प्रमुख गायकासाठी गित्तीथच्या चालीवर बसवलेले कोरहाच्या मुलांचे स्तुतिगीत.
84 सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे.
2 परमेश्वरा, मला वाट पहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे.
मला तुझ्या मंदिरात यायचे आहे.
माझ्यातला कण कण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे.
3 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना
आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात.
ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात
आणि तिथे त्यांना पिल्ले होतात.
4 तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात.
ते नेहमी तुझी स्तुती करतात.
5 जे लोक तुला त्यांच्या शक्तीचा स्त्रोत मानतात ते खूप सुखी असतात,
ते तुला त्यांचे नेतृत्व करु देतात. [a]
6 ते बाका दरीतून जातात तेव्हा देव तिला
झऱ्याचे शिशिरातल्या पावसाने निर्माण
केलेल्या जलाशयांचे स्वरुप देतो. [b]
7 लोक देवाला भेटण्यासाठी सियोनाला जाताना
एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात.
8 सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक
याकोबाच्या देवा, माझे ऐक.
9 देवा, आमच्या रक्षणकर्त्याचे रक्षण कर.
तू निवडलेल्या राजाला दया दाखव.
10 तुझ्या मंदिरातला एक दिवस इतर ठिकाणच्या हजार दिवसांपेक्षा चांगला आहे.
माझ्या देवाच्या प्रवेशद्वारापाशी उभे राहाणे हे वाईट माणसाच्या घरात राहाण्यापेक्षा चांगले आहे.
11 परमेश्वर आमचा रक्षणकर्ता आणि आमचा गौरवशाली राजा आहे.
देव आम्हाला दयेचा आणि गौरवाचा आशीर्वाद देतो
जे लोक परमेश्वराची प्रार्थना करतात
आणि त्याचे ऐकतात त्यांना परमेश्वर प्रत्येक चांगली गोष्ट देतो.
12 सर्वशक्तिमान परमेश्वरा,
जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात.
2006 by World Bible Translation Center