M’Cheyne Bible Reading Plan
दावीद राजाचा मृत्यू
2 दावीद राजाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता. तेव्हा त्याने शलमोनाला जवळ बोलवून सांगितले, 2 “आता मी जाणार. मरण सगळ्यांनाच अटळ आहे. तूही आता चांगला खंबीर, जबाबदार पुरुष झाला आहेस. 3 आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा, नियम व निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे, व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील. 4 तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील. परमेश्वराने मला सांगितले आहे ‘जर मी सांगितलेल्या मार्गाने मनापासून आणि प्रामाणिकपणाने तुझी मुले चालली तर इस्राएलचा राजा हा नेहमी तुझ्याच वंशातला असेल.’”
5 दावीद पुढे म्हणाला, “सरुवेचा मुलगा यवाब याने काय केले ते लक्षात आहे ना? त्याने इस्राएल सैन्याच्या दोन सेनापतींना, नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा यांना ठार केले आणि मुख्य म्हणजे हे शांततेच्या काळात केले. त्याचा तलवार खोचायचा कमरबंद आणि पायातले सैनिकी जोडे यांवर त्यांचे रक्त शिंपडले आहे. त्याला मीच शासन करायला हवे होते. 6 पण आता तू राजा आहेस. तेव्हा तुला योग्य वाटेल तसा तू त्यांना धडा शिकवू शकतोस. तो मारला जाईल याची तू खात्री करुन घे. त्याला शांततेने म्हातारपणी मरण येता कामा नये.
7 “गिलादच्या बर्जिल्ल्य याच्या मुलांवर लोभ असू दे. त्यांच्याशी सख्य ठेव आणि तुझ्या पंगतीला त्यांना बसू दे. तुझा भाऊ अबशलोम याच्यापासून मी पळ काढला तेव्हा त्यांनीच मला मदत केली.
8 “गेराचा मुलगा शिमी झकडे आसपासच आहे हे लक्षात ठेव. तो बहूरीम मधल्या बन्यामीन वंशातला आहे. मी महनाइमासला पळ काढला तेव्हा त्याने माझ्याविषयी फार वाईट उद्गार काढले. पुढे तो मला यार्देन नदीजवळ भेटायला आला. त्याला मी परमेश्वरासमक्ष वचन दिले की मी त्याला ठार करणार नाही. 9 पण आता त्याला तसा सोडू नकोस. तू सुज्ञ आहेस. काय करायचे ते तुला समजते. त्याला म्हातारपणी शांततेने मरु देऊ नकोस.”
10 मग दावीद मरण पावला. दावीद नगरात त्याचे दफन झाले. 11 हेब्रोनवर सात वर्ष आणि यरुशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे त्याने इस्राएलवर राज्य केले.
शलमोन राज्यावर ताबा मिळवितो
12 आता शलमोन राजा होता. तो आपल्या वडीलांच्या दावीदाच्या सिंहासनावर बसला. त्याच्या राजेपणाविषयी आता कोणताही किंतु नव्हता.
13 यानंतर हग्गीथेचा मुलगा अदोनीया शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. बथशेबाने त्याला विचारले, “तू सद्हेतूने आला आहेस ना?”
अदोनीया म्हणाला, “हो, ही शांतता भेट आहे. 14 मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.”
बथशेबा म्हणाली, “मग बोल.”
15 अदोनीया म्हणाला, “एक काळ असा होता की हे राज्य माझे होते. तुम्हाला हे माहीत आहे. मी राजा आहे अशीच इस्राएलच्या सर्व लोकांची भावना होती. पण पुढे सगळे बदलले. आता माझा भाऊ गादीवर आहे. परमेश्वरानेच त्याची निवड केली आहे. 16 आता माझे एक मागणे आहे. कृपा करुन नाही म्हणू नकोस.”
बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले.
17 अदोनीया म्हणाला, “राजा शलमोन तुला नाही म्हणणार नाही, तू सांगशील ते काहीही करील तेव्हा शुनेममधल्या त्या अबीशग नावाच्या तरुणीशी मला लग्र करायची संमती हवी आहे.”
18 बथशेबा म्हणाली, “ठीक आहे, मी राजाशी बोलते.”
19 मग बथशेबा राजा शलमोनाकडे गेली. तिला पाहिल्यावर तो उठून उभा राहिला. मग तिला वंदन करुन तो सिंहासनावर बसला. सेवकांना सांगून त्याने आईसाठी दुसरे सिंहासन आणवले. ती त्याच्या उजव्या हाताला बसली.
20 बथशेबा त्याला म्हणाली, “मला एक छोटीशी गोष्ट तुझ्याजवळ मागायची आहे. कृपाकरुन नाही म्हणू नकोस.”
राजा म्हणाला, “आई, तुला काय हवे ते माग मी नकार देणार नाही.”
21 तेव्हा बथशेबा म्हणाली, “तुझा भाऊ अदोनीया याला शुनेमच्या अबीशगेशी लग्न करु दे.”
22 राजा शलमोन आपल्या आईला म्हणाला, “अदोनीयासाठी अबीशगेचीच मागणी कशाला करतेस? त्याच्यासाठी हे राज्यच का मागत नाहीस? बोलून चालून तो माझा मोठा भाऊ आहे. याजक अब्याथार आणि यवाब त्याला पाठिंबा देतीलच.”
23 मग परमेश्वराची शपथ घेऊन शलमोन म्हणाला, “अदोनीयाला मी याची अद्दल घडवीन. त्याला आता प्राणाला मुकावे लागेल. 24 इस्राएलचा राजा म्हणून परमेश्वराने माझी निवड केली आहे. माझ्या वडीलांच्या गादीवर त्याने मला बसवले आहे. आपण दिलेला शब्द पाळून राज्याची सत्ता परमेश्वराने आमच्या घराण्यात ठेवली आहे. तेव्हा आता त्याची शपथ घेऊन सांगतो की अदोनीयाला आज मृत्युदंड होईल.”
25 राजा शलमोनाने मग बनायाला आज्ञा दिली आणि बनायाने बाहेर जाऊन अदोनीयाला ठार केले.
26 मग राजा शलमोन अब्याथार याजकाला म्हणाला, “तुलाही मी मारायला हवे पण अनाथोथ येथल्या आपल्याघरी मी तुला जाऊ देतो. माझ्या वडीलांबरोबर मार्गक्रमण करताना परमेश्वराचा पवित्र करारकोश उचलून न्यायला तू मदत केलीस म्हणून तुला मी यावेळी जिवे मारत नाही. शिवाय त्यांच्या कठीण काळातही तू त्यांना साथ दिली आहेस” 27 परमेश्वराचा याजक म्हणून त्याला यापुढे काम करता येणार नाही असे शलमोनाने अब्याथार याजकाला सांगितले. असे होणार हे परमेश्वराने सांगितलेच होते. शिलो येथील याजक एली आणि त्याचे कुटुंब यांच्याविषयी देवाने असेच सांगितले होते. अब्याथार याजक एलीच्या कुटुंबातील होता.
28 हे सर्व यवाबाच्या कानावर गेल्यावर तो भयभीत झाला. त्याने अबशालोमला पाठिंबा न देता अदोनीयाला पठिंबा दिला होता. म्हणून तो त्वरीत परमेश्वराच्या पवित्र मंडपात गेला आणि वेदीची शिंगे घटृ धरुन बसला. 29 कोणीतरी यवाब हा परमेश्वराच्या मंडपात वेदीपाशी आहे हे राजा शलमोनाला सांगितले. तेव्हा शलमोनाने बनायाला यवाबाला मारण्यासाठी पाठवले.
30 बनाया परमेश्वराच्या पवित्र मंडपात जाऊन यवाबाला म्हणाला, “तेथून बाहेर पड ही राजाची आज्ञा आहे.”
पण यवाबाने तेथेच मरण पत्करायला तयार असल्याचे सांगितले.
तेव्हा बनायाने राजाकडे जाऊन त्याला हे सांगितले. 31 तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्याला तिथेच ठार कर. मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय. 32 नेराचा मुलगा अबनेर आणि येथेरचा मुलगा अमासा या आपल्यापेक्षा चांगल्या अशा दोन माणसांना त्याने मारले होते. अबनेर इस्राएल सैन्याचा सेनापती तर अमासा यहूदा सैन्याचा सेनापती होता. माझे वडील दावीद यांना त्यावेळी या हत्येची कल्पना नव्हती. तेव्हा परमेश्वरच यवाबाला त्याच्या कृत्यांबद्दल शासन करत आहे. 33 त्यांच्या हत्येबद्दल यवाब अपराधी आहे. त्याच्या कुटुंबालाही हे ओझे कायमचे वागवावे लागेल. पण दावीद, त्यांचे वंशज, त्याच्या घराण्यातील राजे आणि त्याचे राज्य यांना देवाच्या कृपेने निरंतर शांतता लाभेल.”
34 तेव्हा यहोयादाचा मुलगा बनाया याने यवाबाला ठार केले व वाळवंटातील त्याच्या घराजवळ त्याचे दफन करण्यात आले. 35 यवाबाच्या जागी मग शलमोनाने बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथारच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकची केली. 36 मग त्याने शिमीला बोलावणे पाठवले. त्याला सांगितले, “इथे यरुशलेममध्ये स्वतःसाठी घर बांधून राहा. हे नगर सोडू नको. 37 हे नगर सोडून किद्रोन झऱ्यापलीकडे गेलास तर त्या गुन्ह्याबद्दल तुला जीव गमवावा लागेल. तो तुझा अपराध असेल.”
38 तेव्हा शिमी म्हणाला, “ठीक आहे, महाराज मी तुमच्या आज्ञेत आहे.” शिमी मग यरुशलेममध्येच बराच काळ राहिला. 39 पण तीन वर्षांनंतर शिमीचे दोन नोकर पळून गेले. गथचा राजा आणि माकाचा मुलगा आखीश याच्याकडे ते गेले. आपले चाकर गथ येथे असल्याचे शिमीला कळले. 40 तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले.
41 शिमी यरुशलेमहून गथला जाऊन आल्याचे कोणीतरी शलमोनाला सांगितले. 42 तेव्हा शलमोनाने त्याला बोलावून घेतले. शलमोन त्याला म्हणाला, “यरुशलेम सोडलेस तर तुझा वध होईल हे मी तुला देवाची शपथ घेऊन सांगितले होते. तू हे गाव सोडून इतरत्र गेलास तर तुझ्या मृत्यूला तूच जबाबदार राहशील असे मी तुला बजावले होते. आणि तू त्याला कबूल झाला होतास. माझा शब्द पाळायचे तू मान्य केले होतेस. 43 मग तू आज्ञाभंग का केलास? तू वचन का मोडलेस? 44 माझे वडील दावीद यांचे तू बरेच अपराध केले आहेस त्याबद्दल आता परमेश्वरच तुला शासन करील. 45 पण मला परमेश्वराचे आशीर्वाद राहतील. दावीदाचे राज्य तो सदासर्वकाळ सुरक्षित ठेवील.”
46 मग राजाने बनायाला शिमीचा वध करायची आज्ञा दिली आणि बनायाने ती अंमलात आणली. आता शलमोनाची आपल्या राज्यावर पूर्ण पकड बसली.
एकमेकांना मदत करा
6 बंधूंनो, कोणी दोषात सापडला, तर तुम्ही जे आध्यात्मिकदृष्ट्या पुढारलेले आहात त्या तुम्ही त्याला सुधारावे. पण ते सौम्यतेच्या आत्म्याने हे करा. आणि स्वतःकडे लक्ष ठेवा. यासाठी की तुम्हीही मोहात पडू नये. 2 एकमेकांची ओझी वाहा. अशा रितीने तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. 3 कारण जर कोणी स्वतःला महत्वाचा समजतो, प्रत्यक्षात तो नसला तरी, तर तो स्वतःची फसवणूक करुन घेतो. 4 प्रत्येकाने आपल्या कामाची परीक्षा करावी आणि मगच स्वतःची इतरांबरोबर तुलना न करता स्वतःविषयी अभिमान बाळगणे त्याला शक्य होईल. 5 कारण प्रत्येकाला त्याची स्वतःची जबाबदारी असलीच पाहिजे.
जीवन हे शेत पेरणान्यासारखे आहे
6 ज्याला कोणाला देवाच्या वचनांचे शिक्षण मिळाले आहे, त्याने जो शिक्षण देत आहे त्याला सर्व चांगल्या गोष्टीत वाटा द्यावा.
7 तुम्ही फसू नका. देवाची थट्टा होणे शक्य नाही. कारण एखादी व्यक्ति जे पेरीते त्याचेच त्याला फळ मिळेल. 8 जो कोणी आपल्या देहस्वभावचे बीज पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल. पण जो आत्म्यात बीज पेरतो, त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. 9 जे चांगले आहे ते करण्याचा आपण कंटाळा करु नये. कारण आपण आळस केला नाही, तर योग्य वेळी आपणांस आपले पीक मिळेल. 10 तर मग ज्याप्रमाणे आपणांस संधि मिळेल, तसे सर्व लोकांचे आणि विशेषतः ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे त्यांच्या घराण्याचे चांगले करु या.
Paul Ends His Letter
11 पाहा किती मोठे अक्षरे मी लिहिलीत. 12 ज्यांना बाह्य देखावा करणे आवडते, ते तुम्हांला सुंता करुन घेण्याची सक्ती करतात. परंतु ते अशासाठी की ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छळ होऊ नये. 13 परंतु सुंता करुन घेणारेही नियमशास्त्र पाळीत नाहीत आणि तरीही तुमची सुंता व्हावी असे त्यांना वाटते. यासाठी की, त्यांना तुमच्या देहावरुन फुशारकी मारता यावी.
14 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय मी कशाचाही अभिमान बाळगू नये. त्याच्या द्वारे मला जग वधस्तंभावर खिळलेले, व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. 15 कारण सुंता होणे किंवा न होणे काही नाही, तर नवी उत्पति हीच महत्वाची आहे. 16 तर जितके हा नियम पाळतील तितक्यांवर आणि देवाच्या सर्व इस्राएलावर शांति व दया असो.
17 आता इथून पुढे मी एवढेच मागतो की, यापुढे कोणीही मला त्रास देऊ नये, कारण आधीच मी येशूच्या खुणा माझ्या शरीरावर धारण केलेल्या आहेत.
18 बंधूनो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
इस्राएलचा पहारेकरी म्हणून देव यहेज्केलला निवडतो
33 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला. 2 “मानवपुत्रा, तुझ्या माणसांशी बोल त्यांना सांग, ‘ह्या देशावर हल्ला करण्यासाठी कदाचित्, मी शत्रूसैनिकांना आणीन. त्या वेळेस लोक एकाला पहारेकरी म्हणून निवडतील. 3 पहारेकऱ्याने शत्रूसैनिकांस येताना पाहिल्यास, तो तुतारी फुंकून लोकांना सावध करतो. 4 जर लोकांनी तुतारीचा आवाज ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केले, तर शत्रू त्यांना पकडतील व कैदी म्हणून घेऊन जातील. अशा वेळी मृत्यूला ज्याचा तोच जबाबदार असेल. 5 जर एखाद्याने तुतारीचा आवाज ऐकूनही दुर्लक्ष केले. तर त्याच्या मृत्यूची जबबादारी त्याची त्याच्यावरच असेल. तो जर तुतारीच्या आवाजाने सावध झाला असता, तर वाचू शकला असता.
6 “‘पण, कदाचित्, असेही होईल की शत्रूसैनिकांना पाहूनही पहारेकरी तुतारी फुंकणार नाही. त्याने लोकांना सावध न केल्याने, शत्रूसैनिक त्यांना पकडतील व कैदी म्हणून घेऊन जातील. त्यांनी पाप केले होते म्हणून ते पकडले जातील हे खरे, पण जर ते ठार मारले गेले, तर त्यांच्या मृत्यूला पहारेकरीही जबाबदार असेल.’
7 “आता, मानवपुत्रा, इस्राएल लोकांचा पहारेकरी म्हणून मी तुझी निवड करीत आहे. माझ्याकडून संदेश मिळताच, माझ्यावतीने तू लोकांना जागृत केलेच पाहिजेस. 8 मी कदाचित् तुला सांगीन ‘हा दुष्ट मनुष्य मरेल,’ तर तू माझ्यावतीने त्याच्याकडे जाऊन त्याला सावध केलेच पाहिजेस. जर तू त्या दुष्ट माणसाकडे जाऊन त्याला सावध केले नाहीस, त्याचा मार्ग बदलण्याबद्दल त्याला सांगितले नाहीस, तर त्याच्या पापामुळे तो मरेल, पण त्याच्या मृत्यूची जबाबदारी तुझ्यावरही येईल. 9 पण तू त्या पाप्यास सावध करुन कुमार्ग सोडून सन्मार्ग धरण्यास सांगितलेस आणि त्याने ह्यास नकार दिला, तर तो माणूस त्याच्या पापामुळे मरेल. पण तू वाचशील.
देवाला लोकांचा नाश करण्याची इच्छा नाही
10 “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या लोकांशी बोल. कदाचित्. ते लोक म्हणतील, ‘आम्ही पाप केले. नियम मोडले आमची पापे आम्हाला बोजा झाली आहेत. आमच्या पापांनी आम्ही सडलो आता जगण्यासाठी आम्ही काय करावे?’
11 “मी शपथपूर्वक सांगतो ‘दुष्टांचे मरण मी इच्छिले नव्हते. मला त्यांनी मरावे असे अजिबात वाटत नाही. त्या पापी लोकांनी परत माझ्याकडे यावे असे मला वाटते. त्यांनी आपला मार्ग बदलावा म्हणजे त्यांना खरोखरीचे जीवन जगता येईल. तेव्हा माझ्याकडे परत या. दुष्कृत्ये करायचे सोडा. इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही का मरावे?’ असे परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, असे तू त्या लोकांना सांगितले पाहिजेस.
12 “मानवपुत्रा, तू तुझ्या लोकांना असेही सांग ‘जर एखादा सज्जन कुमार्गाला लागून पाप करु लागला, तर त्याने पूर्वी केलेल्या चांगल्या गोष्टी त्याला वाचवू शकणार नाहीत. तसेच एखादा पापापासून परावृत झाला, तर त्याची भूतकाळातील पापे त्याचा नाश करु शकणार नाहीत. तेव्हा लक्षात ठेवा, पूर्वी केलेली सत्कृत्ये, आता तुम्ही दुष्कत्ये करु लागल्यास तुम्हाला वाचविणार नाहीत.’
13 “कदाचित् मी सज्जन माणसाला ‘तो जगेल’ असे सांगीन. पण त्यामुळे त्याला ‘आपण पूर्वी केलेली सत्कृत्ये आपल्याला वाचवतील असे वाटेल. म्हणून तो पाप करु लागेल, तर त्याची पूर्वीची सत्कृत्ये मी स्मरणार नाही. तो पाप करु लागल्याने तो मरेल.’
14 “किंवा मी दुष्टाला ‘तू मरशील’ असे सांगीन. पण तो कदाचित त्याचा जीवनमार्ग बदलेल. तो पाप करण्याचे सोडून देऊन चांगल्या रीतीने जगू लागेल. तो सज्जन व प्रामाणिक होईल. 15 त्याने कर्ज देताना गहाण म्हणून ठेवून घेतलेल्या वस्तू तो कदाचित परत करेल. त्याने चोरलेल्या वस्तूंची किंमत तो चुकती करील. जीवनातील नियमाप्रमाणे तो चालू लागेल, तो वाईट गोष्टी करण्याचे सोडून देईल, तर तो नक्कीच जगेल. तो मरणार नाही. 16 त्याने पूर्वी केलेली पापे मी स्मरणार नाही. का? कारण आता तो योग्य रीतीने जगत आहे, तो प्रामाणिक झाला आहे. तेव्हा तो जगेल.
17 “पण तुझी माणसे म्हणतात, ‘हे योग्य नाही, परमेश्वर, माझा प्रभू, असा असूच शकत नाही.’
“पण ते लोक प्रामाणिक नाहीत. त्यांनी बदललेच पाहिजे. 18 जर सज्जन सत्कृत्ये सोडून दुष्कृत्ये करु लागला, तर त्याच्या पापामुळे तो मरेल. 19 आणि जर दुष्टाने पाप करण्याचे सोडून दिले, तो चांगले जीवन जगू लागला, प्रामाणिक झाला, तर तो जगेल. 20 पण मी न्यायी नाही असे तुम्ही अजूनही म्हणता. पण मी तुम्हाला सत्य सांगत आहे. इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येकाच्या कर्मांचा मी न्याय करीन.”
यरुशलेम काबीज केले जाते
21 परागंदा अवस्थेच्या बाराच्या वर्षाच्या दहाव्या महिन्याच्या (जानेवारी महिन्याच्या) पाचव्या दिवशी यरुशलेममधून एक माणूस माझ्याकडे आला. तो तेथील लढाईतून निसटून आला होता. तो म्हणाला, “नगरी (यरुशलेम) काबीज केली गेली.”
22 तो माणूस येण्यापूर्वीच्या संध्याकाळी परमेश्वराचे, माझ्या प्रभूचे, सामर्थ्य माझ्यावर आले. देवाने मला मुके केले. पण तो माणूस येण्याच्या वेळी परमेश्वराने मला वाचा दिली व बोलण्यास प्रवृत्त केले. 23 मग मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, 24 “मानवपुत्रा, इस्राएलच्या विद्ध्वंस झालेल्या गावांतून इस्राएली राहात आहेत. ते म्हणतात, ‘अब्राहाम एकटा असताना देवाने त्याला ही सर्व भूमी दिली. आता, आम्ही पुष्कळ आहोत आणि ही भूमी नक्कीच आमची आहे. ही आमच्या मालकीची आहे.’
25 “तू त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो ‘तुम्ही रक्तासकट मांस खाता. तुम्ही मदतीकरिता तुमच्या मूर्तीकडे पाहता. तुम्ही लोकांचे खून करता. मग मी तुम्हाला ही भूमी का द्यावी? 26 तुम्ही तुमच्या स्वतःच्या तलवारीवर अवलंबून राहता. तुमच्यातील प्रत्येकजण भयानक कृत्ये करतो. शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करुन पाप करतो, तेव्हा तुम्हाला भूमी मिळू शकत नाही.’
27 “‘तू त्यांना सांगितले पाहिजेस की परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “माझी शपथ घेऊन प्रतिज्ञा करतो की त्या नाश झालेल्या गावांत राहणारे लोक तलवारीने मारले जातील. जर एखादा शेतांत असेल. तर मी त्याला प्राण्याकडून मारीन व त्या प्राण्याचे तो भक्ष्य होईल. जर लोक गडात वा गुहेत लपले असतील, तर ते रोगराईने मरतील. 28 मी ती भूमी ओसाड व निर्जन करीन. त्या देशाला अभिमानास्पद असणाऱ्या सर्व गोष्टी गमवाव्या लागतील. इस्राएलचे पर्वत ओसाड होतील. तेथून कोणीही जाणारसुद्धा नाही. 29 त्या लोकांनी खूप भयानक कृत्ये केली आहेत. म्हणून मी ती भूमी एक निर्जन, ओसाड प्रदेश करीन. मग ह्या लोकांना कळेल की मीच परमेश्वर आहे.”
30 “‘आणि, मानवपुत्रा, आता तुझ्याबद्दल तुझे लोक भिंतीला टेकून, त्यांच्या दारांत उभे राहून, तुझ्याबद्दल बोलतात, ते एकमेकांना म्हणतात “चला, परमेश्वर काय म्हणतो ते जाऊन ऐकू या.” 31 म्हणून ते माझे लोक असल्यासारखे तुझ्याकडे येतात. ते माझे लोक असल्याप्रमाणे ते करणार नाहीत. ते त्यांना भावते तेच करु इच्छितात. ते लोकांना फसवून खूप पैसा मिळवू बघतात.
32 “‘तू त्यांच्या दृष्टीने प्रेमगीते गाणारा फक्त एक गायक आहेस. तुझा गळा गोड आहे. तू तुझे वाद्य उत्तम वाजवितोस. ते तुझे फक्त ऐकतात पण त्याप्रमाणे ते करणार नाहीत. 33 पण तू गात असलेल्या गोष्टी खरोखरच घडतील. मगच लोकांना कळेल की त्यांच्यामध्ये खरोखरच एक संदेष्टा राहात होता.’”
प्रमुख गायकासाठी गित्तीथ चालीवर बसवलेले आसाफये स्तोत्र.
81 आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा,
इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
2 संगीताची सुरुवात करा.
डफ वाजवा.
सतार आणि वीणा वाजवा.
3 अमावस्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
याचवेळी आपला सण सुरु होतो.
4 हा इस्राएल देशाचा नियम आहे.
देवाने याकोबाला हीच आज्ञा केली.
5 जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले
तेव्हा त्याने योसेफाबरोबर हा करार केला.
मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजणारी भाषा ऐकली.
6 देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले.
तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली.
7 तुम्ही लोक संकटात होता.
तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली.
मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले.
मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”
8 “लोकहो! माझे ऐका, मी तुम्हाला माझा करार देईन
इस्राएल कृपा करुन माझे ऐक.
9 परदेशी लोक ज्या चुकीच्या देवाची पूजा करतात
त्यापैकी कुठल्याही देवाची पूजा करु नकोस.
10 मी, परमेश्वरच तुमचा देव आहे
मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले.
इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”
11 “परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही.
इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.
12 म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले.
इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले.
13 जर माझ्या लोकांनी माझे ऐकले,
जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला,
14 तर मी त्यांच्या शत्रूंचा पराभव करीन.
जे लोक इस्राएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन.
15 परमेश्वराचे शत्रू भीतीने थरथर कापतील.
त्यांना कायमची शिक्षा होईल.
16 देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल.
देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”
आसाफाचे स्तोत्र
82 देव देवांच्या सभेत उभा राहातो.
तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
2 देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस?
दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”
3 “गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे.
त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
4 त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर.
त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”
5 “काय घडते आहे ते त्यांना [a] कळत नाही.
त्यांना काही समजत नाही.
ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही.
त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
6 मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात
तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”
7 परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल,
इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.
8 देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो.
देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.
2006 by World Bible Translation Center