M’Cheyne Bible Reading Plan
अदोनीयाची राजा होण्याची इच्छा
1 आता राजा दावीद फार वृध्द झाला होता, वयोमानामुळे त्याला गारठा सहन होईना, नोकरांनी कितीही पांघरुणे घातली तरी त्याला ऊब येईना. 2 तेव्हा त्याचे सेवक त्याला म्हणाले, “तुमच्या सेवेसाठी आम्ही एखादी तरुण मुलगी बघतो, ती तुमच्या निकट झोपेल आणि तुम्हाला ऊब देईल.” 3 आणि सेवकांनी या कामासाठी इस्राएलभर सुंदर तरुण मुलींचा शोध सुरु केला, तेव्हा त्यांना शुनेम या नगरात अबीशग नावाची मुलगी सापडली, त्यांनी तिला राजाकडे आणले. 4 ती अतिशय देखणी होती. तिने अतिशय काळजीपूर्वक राजाची शुश्रूषा केली. असे असले तरी राजाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले नाहीत.
5 अदोनीया हा दावीद आणि त्यांची पत्नी हग्गीथ यांचा मुलगा, गर्वाने फुगून जाऊन त्याने स्वतः राजा व्हायचे ठरवले. राजा व्हायच्या प्रबळ इच्छेने त्याने स्वतःसाठी एक रथ, घोडे आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे तयार केली. 6 अदोनीया हा दिसायला सुंदर होता. अबशालोम पेक्षा हा धाकटा. पण राजा दावीदने मात्र अदोनीयाला “हे तू काय चालवले आहेस?” म्हणून कधी समज दिली नाही.
7 सरुवेचा मुलगा यवाब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्याला नवीन राजा करण्यात मदत करायचे त्यांनी ठरविले. 8 पण पुष्कळांना अदोनीयाच्या या हालचाली पसंत नव्हत्या. ते दावीदशी एकनिष्ठ राहिले. सादोक हा याजक, यहोयादाचा मुलगा बनाया, नाथान हा संदेष्टा, शिमी रेई आणि दावीदच्या पदरी असलेले वीर हे ते लोक होत. ते राजाच्याच बाजूला राहिले, हे लोक अदोनीयाला मिळाले नाहीत.
9 एकदा एन-रोगेलजवळ जोहेलेथ खडकापाशी अदोनीयाने मेढरे, गुरे, पुष्ट वासरे यांचा शांत्यर्पण म्हणून यज्ञ केला. आपले भाऊ, राजाची इतर मुले आणि यहूदातील सर्व अधिकारी यांना बोलावणे पाठवले,10 पण राजाच्या पदरचे खास शूर वीर, आपला भाऊ शलमोन, बनाया आणि संदेष्टा नाथान यांना मात्र वगळले.
शलमोनासाठी नाथान व बथशेबा मध्यस्ती करतात
11 नाथान संदेष्ट्यांच्या हे कानावर गेले तेव्हा तो शलमोनाची आई बथशेबा हिच्याकडे गेला. त्याने तिला विचारले, “हग्गीथेचा मुलगा अदोनीया याचे काय चालले आहे याचा तुला पत्ता आहे का? त्याने स्वतःला राजा म्हणून घोषित केले आहे आणि इकडे आपले स्वामी दावीद यांना त्याचा पत्तासुद्धा नाही. 12 तू आणि तुझा मुलगा शलमोन यांच्या जिवाला धोका पोहोंचू शकतो. यातून वाचायचा मार्ग मी तुला दाखवतो, 13 अशीच राजा दावीदकडे जा आणि त्याला सांग, ‘स्वामी तुम्ही मला वचन दिले आहे. त्याप्रमाणे माझा मुलगा शलमोन तुमच्यानंतर गादीवर बसेल पण अदोनीया राजा होत आहे हे कसे काय?’ 14 तुझे राजाशी बोलणे चाललेले असतानाच मी तेथे येईन. तू तिथून निघून गेल्यावर मी राजाला सर्व हकीगत सांगीन. म्हणजे तू बोललीस त्यात तथ्य आहे हे राजाला पटेल.”
15 तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या शयनगृहात गेली, राजा फारच थकला होता. शुनेमची अबीशग त्याची सेवा करत होती. 16 बथशेबाने राजाला लवून अभिवादन केले. राजाने तिची चौकशी केली.
17 बथशेबा त्याला म्हणाली, “महाराज, तुम्ही आपल्या परमेश्वर देवासमक्ष मला वचन दिले आहे. ‘माझ्यानंतर शलमोन राजा होईल. तो या गादीवर बसेल’ असे तुम्ही म्हणाला आहात. 18 आता तुमच्या नकळत अदोनीया स्वतःच राजा व्हायच्या खटपटीत आहे. 19 त्याने अनेक गुरे आणि उत्तम मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे. त्याने सर्वांना आमंत्रित केले आहे. तुमची मुळे, याजक अब्याथार, सेनापती यवाब यांना त्याने बोलावले आहे, पण तुमचा एकनिष्ठ पुत्र शलमोन याला मात्र बोलावणे पाठवले नाही. 20 महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वतःनंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत. 21 आपण प्राण सोडण्यापूर्वी नीट व्यवस्था केली पाहिजे. तसे तुम्ही केले नाहीत तर तुमचे आपल्याच वाडवडीलांच्या शेजारी दफन झाल्यावर मी आणि शलमोन लोकांच्या दृष्टीने गुन्हेगार ठरु.”
22 बथशेबा हे राजाशी बोलत असतानाच नाथान संदेष्टा राजाला भेटायला आला. 23 राजाच्या सेवकांनी त्याच्या आगमनाची राजाला वर्दी दिली, “तेव्हा नाथान राजाच्या समोर आला व खाली लवून अभिवादन केले.” 24 मग नाथान म्हणाला, “महाराज, तुमच्यानंतर अदोनीया राज्यावर येणार असे तुम्ही घोषित केले काय? आता राज्य अदोनीयाचे आहे असे तुम्ही ठरवले आहे काय? 25 कारण आजच त्याने खाली खोऱ्यात जाऊन गुरे मेंढरे कापून शांत्यर्पणाचा यज्ञ केला आहे तुमची मुले, सेनापती, अब्याथार याजक यांना त्याचे आमंत्रण आहे. ते सगळे आत्ता त्याच्याबरोबर खाण्यापिण्यात दंग आहेत. ‘राजा अदोनीया चिरायु होवो’ म्हणून घोषणा देत आहेत. 26 पण मी, सादोक याजक यहोयादाचा मुलगा बनाया आणि तुमचा मुलगा शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही. 27 माझे स्वामी, राजाने आम्हाला विश्वासात न घेता हे सर्व केले आहे का? आपला वारस तुम्ही कृपा करुन जाहीर करा.”
28 तेव्हा राजा दावीद म्हणाला, “बथशेबाला आत यायला सांगा” त्याप्रमाणे बथशेबा राजासमोर आली.
29 मग राजाने शपथपूर्वक वचन दिले: “परमेश्वर देवाने आत्तापर्यंत मला सर्व संकटातून सोडवले आहे. देवाला स्मरुन मी हे वचन देतो. 30 पूर्वी मी जे वचन तुला दिले त्याप्रमाणे मी आज करणार आहे. इस्राएलच्या परमेश्वर देवाने हे वचन द्यायचे मला सामर्थ्य दिले, त्याप्रमाणे मी कबूल करतो की माझ्यानंतर तुझा पुत्र शलमोन राजा होईल. या सिंहासनावर माझ्यानंतर तो आरुढ होईल. मी दिलेला शब्द खरा करीन.”
31 बथशेबाने हे ऐकून राजाला वंदन केले व म्हणाली “राजा चिरायु होवो.”
32 मग दावीद राजा म्हणाला, “सादोक हा याजक, नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा मुलगा बनाया यांना येथे बोलावून घ्या” तेव्हा ते तिघेजण राजाच्या भेटीला आले. 33 राजा त्यांना म्हणाला, “माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वतःच्या खेचरावर बसवून गीहोन झऱ्याकडे जा. 34 तेथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याला इस्राएलचा नवा राजा म्हणून अभिषेक करावा. रणशिंग फुंकून जाहीर करावे की शलमोन हा आता नवा राजा आहे. 35 मग त्याला घेऊन माझ्याकडे या, तो या सिंहासनावर बसेल आणि नवा राजा म्हणून माझी जागा घेईल. इस्राएल आणि यहूदाचा राजा म्हणून मी शलमोनला निवडले आहे.”
36 यहोयादाचा मुलगा बनाया राजाला म्हणाला, “आमेन! स्वामी, खुद्द परमेश्वर देवच याला मान्यता देईल. 37 महाराज, आपल्याला परमेश्वराची साथ आहे. तो परमेश्वर असाच शलमोनाच्याही पाठीशी उभा राहील अशी मला आशा आहे. राजा शलमोनाच्या राज्याची भरभराट होवो आणि माझे स्वामी, आपल्यापेक्षा ते अधिक बळकट होवो.”
38 सादोक, नाथान, बनाया आणि राजाचे सेवक यांनी राजा दावीदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले. 39 सादोक याजकाने पवित्र मंडपातून तेल आणले. आणि त्या तेलाने सादोकने शलमोनाच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यांनी कर्णा फुंकला आणि सर्वांनी “शलमोन राजा चिरायू होवो” असा एकच जयजयकार केला. 40 मग शलमोनाबरोबर सर्वजण नगरात आले. येताना ते पावा वाजवत आले. लोकांना उत्साहाचे, आनंदाचे भरते आले होते. त्यांच्या जल्लोषाने धरणी कंप पावली.
41 हे चाललेले असताना इकडे अदोनीया आणि त्याची पाहुणे मंडळी यांचे भोजन आटपत आलेले होते. त्यांनी हा कर्ण्यांचा आवाज ऐकला. यवाबाने विचारले, “हा कसला आवाज? नगरात काय चालले आहे?”
42 यवाबाचे बोलणे संपत नाही तोच अब्याथार याजकाचा मुलगा योनाथान तिथे आला. अदोनीया त्याला म्हणाला, “अरे तू भला माणूस आहेस. तेव्हा माझ्यासाठी तू चांगलीच बातमी आणली असशील.”
43 पण योनाथान म्हणाला, “नाही, तुम्हाला ही बातमी चांगली वाटणार नाही. राजा दावीदाने शलमोनाला राजा केले आहे. 44 दावीदाने सादोक याजक, नाथान संदेष्टा, यहोयादाचा मुलगा बनाया आणि आपले सेवक यांना शलमोनाबरोबर पाठवले, त्यांनी शलमोनाला खुद्द राजाच्या खेचरावर बसवले. 45 मग सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी गीहाने झऱ्याजवळ शलमोनाला अभिषेक केला. यानंतर ते सर्वजण नगरात परतले. लोक त्यांच्या मागोमाग गेले. नगरातील लोक त्यामुळे फार आनंदात आहेत. हा जल्लोष त्यांचाच आहे. 46 शलमोन आता गादीवर बसला आहे. 47 राजाचा सेवकवर्ग दावीदाचे अभिनंदन करत आहे. ते म्हणत आहेत, ‘राजा दावीद थोर आहे. शलमोन त्याच्यापेक्षा थोर व्हावा अशी देवाजवळ आमची प्रार्थना आहे. देव शलमोनाला दावीदापेक्षाही किर्तिवंत करो. त्याच्या राज्याची दावीदापेक्षाही भरभराट होवो.’ दावीद राजा तेथे जातीने हजर होता. पलंगावरच तो वाकून अभिवादन करत होता. 48 आणि म्हणत होता, ‘इस्राएलच्या परमेश्वर देवाचे गुणगान करा. परमेश्वराने माझ्या मुलांपैकीच एकाला सिंहासनावर बसवले आणि माझ्या डोळ्यादेखत हे झाले.’”
49 हे ऐकून अदोनीयाची पाहुणेमंडळी घाबरली आणि त्यांनी तिथून पळ काढला. 50 अदोनीयाही शलमोन काय करील या धास्तीने घाबरला. तात्काळ तो वेदीपाशी गेला आणि वेदीचे दोन्ही शिंगे घटृ पकडून बसला. [a] 51 कोणीतरी शलमोनाला सांगितले, “अदोनीया तुमच्या धास्तीने पवित्र मंडपात वेदीची शिंगे धरुन बसला आहे. तो तिथून हलायला तयार नाही. ‘शलमोन राजाने मला अभय द्यावे’ असे तो म्हणत आहे.”
52 तेव्हा शलमोन म्हणाला, “एक भला गृहस्थ असल्याचे अदोनीयाने सिध्द केले तर त्याच्या केसालाही इजा होणार नाही. पण त्याने आगळीक केल्यास त्याची गय केली जाणार नाही. तो मरण पावेल.” 53 मग राजा शलमोनाने अदोनीयाकडे आपल्या माणसांना पाठवले. ते त्याला राजाकडे घेऊन आले. अदोनीयाने राजा शलमोनाला वाकून अभिवादन केले. शलमोनाने त्याला घरी परत जाण्यास सांगितले.
तुमचे स्वातंत्र्य राखा
5 आम्ही स्वातंत्र्यात राहावे म्हणून ख्रिस्ताने आम्हांला मुक्त केले, म्हणून स्थिर राहा. आणि नियमशास्त्राच्या जुवाच्या गुलामगिरीचे ओझे पुन्हा लादून घेऊ नका. 2 ऐका! मी पौल, तुम्हांला सांगत आहे की, जर सुंता करुन घेऊन तुम्ही नियमशास्त्राकडे वळला तर ख्रिस्त तुमच्यासाठी कोणत्याही किंमतीचा नाही. 3 सुंता करुन घेणाऱ्या प्रत्येक माणसाल मी पुन्हा एकदा जाहीर करतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे, 4 तुमच्यापैकी जे नियमशास्त्राने नीतिमान ठरु पाहतात, त्यांचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध तुटला आहे. देवाच्या दयेच्या बाहेर आता तुम्ही आहात. 5 आम्ही तर आत्म्याने विश्वासाकडून न्यायीपणाच्या आशेची वाट पाहात आहोत. 6 कारण ख्रिस्त येशूमध्ये सुंता झालेले व सुंता न झालेले यांना काही अर्थ नाही तर विश्वास जो प्रीतीद्वारे कार्य करतो त्याला आहे.
7 तुम्ही इतकी चांगली ख्रिस्ती शर्यत धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडथळा केला? 8 सत्यापासून मन वळवणारे तुमचे कठोर वर्तन ज्याने तुम्हांला बोलाविले त्या देवापासून येत नाही. 9 “थोडेसे खमीर कणकेचा गोळा फुगवून टाकते.” 10 प्रभूमध्ये मला तुमच्याविषयी खात्री आहे की, जे मी तुम्हांला शिकविले त्याच्याशिवाय इतर विचार तुम्ही करणार नाही. परंतु जो तुम्हांला त्रास देत आहे, तो कोणी का असेना, दंड भोगील.
11 बंधूजनहो, काही जण असा आरोप करतात की, अजूनही सुंतेची गरज आहे असा उपदेश मी करतो. जर तसे आहे तर अजूनही माझा छळ का होत आहे? आणि जर मी सुंतेच्या आवश्यकतेविषयी उपदेश करीत असतो तर वधस्तंभाविषयीची तत्वे राहिली नसती. 12 माझी इच्छा आहे की, जे तुम्हामध्ये अस्थिरता उत्पन्र करतात त्यांनी सुंतेबरोबर स्वतःला नामर्द करुन घ्यावे.
13 परंतु स्वतंत्रतेमध्ये राहावे म्हणून तुम्हा बंधूना देवाने बोलावले आहे. फक्त तुमच्या देहाला जे आवडते ते करण्याची एक सबब म्हणून तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग करु नका. त्याऐवजी प्रीतिमध्ये एकमेकांची सेवा करा (दास व्हा). 14 कारण संपूर्ण नियमशास्त्राचा सारांश एकाच वचनात सामावला आहे. ते सांगते, “जसे आपणांवर तसे आपल्या सोबतीच्या व्यक्तीवरही प्रेम करा.” 15 पण जर तुम्ही एकमेकांना चावत राहिला व खाऊन टाकीत असला, तर एकमेकांना गिळून टाकणार नाही, याविषयी सावध राहा.
आत्मा आणि मानवी स्वभाव
16 पण मी म्हणतो: तुम्ही आत्म्यात चाला, आणि तुम्ही देहाच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही. 17 कारण आपला देह ज्याची इच्छा करतो ते आत्म्याविरुद्ध आहे, आणि आत्मा जी इच्छा करतो, ती देहाविरुद्ध आहेत. परिणाम म्हणून तुम्हांला जे करावयास पाहिजे ते करता येत नाही. 18 पण जर तुम्ही आत्म्याकडून चालविले जाता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.
19 देहाची कर्मे तर उघड आहेत, ती म्हणजे, जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा, 20 मूर्तिपूजा, चेटूक, द्वेष, मारामारी, मत्सर, राग, स्वार्थी हेवेदावे, पक्षभेद, 21 दारुबाजी, रंगेलपणा, अशासारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी. या गोष्टीविषयी मी तुम्हांला सूचना देत आहे. ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हांला सूचना केल्या होत्या. जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्या राज्यात वाटा मिळणार नाही. 22 पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो: प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, 23 सौम्यता व आत्मसंयमन. अशा गोष्टीविरुद्ध नियमशास्त्र नाही. 24 जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहस्वभावला त्यांच्या वासना व इच्छांसह वधस्तंभावर खिळले आहे. 25 जर आम्ही आत्म्याने जगतो, तर तो जसा चालवितो तसे आम्हीसुद्धा त्याच्यामागे चालू या. 26 आम्ही पोकळ बढाई मारणारे, एकमेकांना चीड आणणारे, एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.
फारो: सिंह का मगर?
32 परागंदा काळाच्या बाराव्या वर्षाच्या बाराव्या महिन्याच्या (मार्चच्या) पहिल्या दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो ह्याच्यासाठी हे शोकगीत गा. त्याला सांग:
“तू स्वतःला राष्ट्रांमध्ये उन्मत्तपणे चालणारा बलिष्ठ तरुण सिंह समजलास.
पण खरे म्हणजे तू तळ्यांतील मगरी प्रमाणे आहेस.
तू प्रवाहातून रेटा देऊन मार्ग काढतोस
तुझ्या पायाने पाणी गढूळ करतोस,
मिसरच्या नद्या घुसळून काढतोस.”
3 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:
“मी पुष्कळ लोकांना एकत्र जमविले आहे.
आता मी माझे जाळे तुझ्यावर फेकीन.
मग ते लोक तुला आत ओढून घेतील.
4 मग मी तुला कोरड्या जमिनीवर टाकीन.
मी तुला शेतांत टाकीन.
सर्व पक्षी येऊन तुला खाऊ देत.
सर्व ठिकाणचे सगळे हिंस्र प्राणी येऊन तुला खाऊन तृप्त होऊ देत.
5 मी तुझ्या मृत शरीराचे तुकडे पर्वतावर फेकीन
आणि त्या तुकड्यांनी दऱ्या भरुन टाकीन.
6 मी तुझे रक्त डोंगारांवर ओतीन.
ते जमिनीत मुरेल.
नद्याही रक्ताने भरतील.
7 मी तुला अदृश्य करीन.
मी आकाश झाकीन व तारे निस्तेज करीन.
मी सूर्याला ढगाने झाकीन.
आणि चंद्रप्रकाश पडणार नाही.
8 तुझ्यावर पडणारा आकाशातील सर्व प्रकाश मी निस्तेज करीन.
मी तुझ्या संपूर्ण देशाला अंधारात ठेवीन.”
माझा प्रभु परमेश्वर ह्या गोष्टी म्हणाला आहे.
9 “मी तुझा नाश करण्यासाठी शत्रूला आणले हे ऐकून पुष्कळ लोक अस्वस्थ व दु:खी होतील. तुला अनोळखी असलेली राष्ट्रेसुध्दा अस्वस्थ होतील. 10 तुझ्याकडे पाहून खूप लोकांना धक्क बसेल. मी माझी तलवार परजताच, त्या लोकांचे राजे अत्यंत भयभीत होतील. तुझ्या पतनाच्या दिवशी, क्षणाक्षणाला, ते थरथर कापतील. प्रत्येकाला आपल्या जीवाचे भय वाटेल.”
11 का? कारण परमेश्वर, माझा प्रभू. पुढील गोष्टी सांगतो: “बाबेलच्या राजाची तलवार तुमच्यावर उपसली जाईल. 12 लढाईत, त्या सैनिकांकरवी मी तुमचे लोक मारीन. ते सर्वांत भयंकर अशा राष्ट्रांतून आलेले सैनिक आहेत. मिसरच्या अभिमानास्पद गोष्टी ते लुटतील. मिसरच्या लोकांचा नाश केला जाईल. 13 मिसरच्या नद्यांच्या काठी असणाऱ्या सर्व प्राण्यांचा नाश होईल. ह्यापुढे लोकांच्या पायामुळे पाणी गढूळ होणार नाही. तसेच गुरांच्या खुरांमुळेही ते खराब होणार नाही. 14 मी मिसरचे पाणी शांत करीन. नद्यांचा प्रवाह मंद करीन. त्यांना तेलाप्रमाणे निसरड्या करीन.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला, 15 “मी मिसरची भूमी ओसाड करीन. त्यातील सर्व काही नष्ट होईल मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना मी शिक्षा करीन. मगच त्यांना ‘मी देव व प्रभू’ असल्याचे समजेल.
16 “लोक मिसरसाठी शोकगीत गातील. इतर राष्ट्रांतील मुलीही (गावे) त्याच्यासाठी शोकगीत गातील. त्या मिसर व त्याचे लोक यांच्यासाठी ते गीत गातील.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.
मिसरचा नाश
17 परागंदा काळातील बाराव्या वर्षांच्या त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी मला परमेश्वराचा संदेश मिळाला तो म्हणाला, 18 “मानवपुत्रा, मिसरच्या लोकांसाठी शोक कर. मिसरला आणि बलाढ्य राष्ट्रांच्या मुलींना थडग्याकडे ने. त्यांना जमिनीखाली ने. म्हणजे ते खोल विवरात गेलेल्या लोकांच्यामध्ये राहतील.
19 “मिसर, तू कोणापेक्षाही चांगला नाहीस. मृत्युलोकांत जा. त्या परदेशीयांबरोबर जाऊन पड.
20 “लढाईत मारल्या गेलेल्या लोकांत मिसर जाऊन पडेल. शत्रूने त्याला व त्याच्या सर्व लोकांना ओढून नेले आहे.
21 “बलवान व शक्तिशाली लोक युद्धात मारले गेले. ते परदेशी मृत्युलोकात गेले. तेथून ते मिसरशी व त्याच्या साहाय्यकर्तांशी बोलतील ते सुद्धा युद्धात मारले गेले.
22-23 “अश्शूर व त्याचे सैन्य मृत्युलोकात आहे. खोल विवरात अतिशय खोलात त्यांची थडगी आहेत. ते सर्व अश्शूरी सैनिक लढाईत मारले गेले. अश्शुरच्या थडग्याभोवती अश्शूरचे सैन्य आहे. ते जिवंत असताना त्यांनी लोकांना घाबरविले. पण आता ते सर्व शांत झाले आहेत-ते सर्व युद्धात मारले गेले.
24 “एलाम तेथेच आहे व तिच्या थडग्याभोवती त्याचे सर्व सैन्य आहे. ते सर्व लढाईत मारले गेले. ते परदेशी जमिनीखाली खोल गेले. ते जिवंत असताना, लोक त्यांना घाबरत. पण जमिनीखालच्या खोल विवरात त्यांनी आपल्याबरोबर आपली अप्रतिष्ठाही नेली. 25 त्यांनी एलाम व युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांसाठी शय्या तयार केली. एलामच्या थडग्याभोवती त्याचे सैनिक आहेत. ते सर्व परदेशी युद्धात मारले गेले. ते जिवंत होते, तेव्हा त्यांनी लोकांना घाबरविले. पण जमिनीखाली खोल विवरात त्यांनी आपल्याबरोबर आपली अप्रतिष्ठाही नेली. त्यांना मारल्या गेलेल्या इतर लोकांबरोबर ठेवले गेले.
26 “मेशेख, तुबाल आणि त्यांचे सैन्यही तेथेच आहेत. त्यांची थडगी सभोवती आहेत. ते सर्व परदेशी लढाईत मारले गेले. त्यांनी जिवंतपणी लोकांना घाबरविले. 27 पण ते आता पूर्वीच मृत्यू पावलेल्या बलवान लोकांबरोबर पडून आहेत. त्यांना त्यांच्या शस्त्रांबरोबर पुरले. त्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवल्या आहेत. पण त्यांचे पाप त्यांच्या हाडांवर आहे. का? कारण जिवंत असताना त्यांनी लोकांना घाबरविले.
28 “मिसर, तुझासुद्धा नाश होईल. तू सुद्धा त्या परदेशी लोकांच्यात जाऊन पडशील. युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्यामध्ये तू जाशील.
29 “तेथे अदोमसुद्धा आहे, तिच्याबरोबर तिचे राजे व नेते आहेत. ते सुद्धा शक्तिशाली होते. पण आता ते युद्धात मारल्या गेलेल्या इतर लोकांबरोबर पडतात. ते परदेशी लोकांवर पडून आहेत. ते खोल विवरात गेलेल्या लोकांबरोबर तेथे आहेत.
30 “उतरेकडचे सर्वच्या सर्व राज्याकर्ते तेथे आहेत. सीदोनचे सर्व सैनिकही तेथे आहेत. त्यांच्या बळाला लोक घाबरले. पण ते आता शरमले आहेत. ते परदेशी, युद्धात मारल्या गेलेल्या लोकांच्यामध्ये पडून आहेत. त्यांनी त्या खोल विवरात जाताना स्वतःची अप्रातिष्ठाही स्वतःबरोबर नेली.
31 “फारोला मृत्युलोकात गेलेले लोक दिसतील. तो आणि त्याच्या बरोबरचे इतर लोक मग समाधान पावतील. हो! फारो आणि त्याचे सर्व सैन्य युध्दात मारले जाईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
32 “फारो जिवंत असताना, मी लोकांना त्याची भीती दाखविली. पण आता तो परदेशी लोकांबरोबर पडेल. युद्धात मारल्या इतर सैनिकांबरोबर फारो व त्याचे सर्व सैन्य पडेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.
80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
आम्हाला तुला बघू दे.
2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
ये आणि आम्हाला वाचव.
3 देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर
आणि आम्हाला वाचव.
4 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी ऐकशील?
आमच्यावर तू सदैव रागावलेलाच राहाणार आहेस का?
5 तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस.
तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
6 तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त केलेस.
आमचे शत्रू आम्हाला हसतात.
7 सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.
8 भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पती सारखे वागवलेस.
तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्याबाहेर आणलीस.
तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस
आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस.
9 तू त्या “वेलीसाठी” जमीन तयार केलीस.
त्या “वेलीची” मुळं जोमाने वाढावीत म्हणून प्रयत्न केलेस.
थोड्याच अवधीत ती वेल सर्व देशभर पसरली.
10 तिने डोंगरांना आच्छादून टाकले,
मोठ्या देवदारुच्या वृक्षांवर सुध्दा तिच्या पानांनी छाया घातली.
11 तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या,
तिचे कोंब युफ्रेटस नदीपर्यंत गेले.
12 देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास?
आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
13 रानडुकरे येऊन तुझ्या “वेलीवर” चालतात.
रानटी पशू येतात आणि तिची पाने खातात.
14 सर्वशाक्तिमान देवा, परत ये स्वर्गातून खाली
तुझ्या “वेलीकडे” बघ आणि तिचे रक्षण कर.
15 देवा, तू तुझ्या हाताने कापलेल्या “वेलीकडे” बघ.
तू वाढवलेल्या तुझ्या लहान वेलाकडे बघ.
16 तुझी “वेल” वाळलेल्या शेणाप्रामाणे (गोवरीप्रमाणे) आगीत जळून गेली
तू तिच्यावर रागावला होतास आणि तू तिचा नाश केलास.
17 देवा, तुझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
तू वाढवलेल्या तुझ्या मुलाला मदत कर.
18 तो तुला सोडून परत जाणार नाही.
त्याला जगू दे आणि तो तुझ्या नावाचा धावा करेल.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये.
आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.
2006 by World Bible Translation Center