Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 24

दावीद सैन्याची शिरगणती करायचे ठरवतो

24 इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.”

राजा दावीद सेनापती यवाबाला म्हणाला, “दानपासून बैरशेबापर्यंत इस्राएलच्या झाडून सर्व वंशातील लोकांची मोजदाद करा. म्हणजे मग मला लोकसंख्या किती आहे ते कळेल.”

पण यवाब राजाला म्हणाल. “आपले लोक कितीही असोत देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो. तुम्हाला हे सर्व पाहायला मिळो पण तुम्हाला असे का करावेसे वाटते?”

पण राजा दावीदाचे शब्द यवाबाच्या शब्दांपेक्षा प्रभावी ठरले आणि त्यांनी यवाबाला आणि इतर सैन्याधिकाऱ्यांना इस्राएल प्रजेची मोजदाद करण्यास सांगितले. तेव्हा ते सर्व या कामाला लागले. यार्देन ओलांडून त्यांनी आरोएर येथे तळ दिला. ही जागा नगराच्या उजवीकडे होती. (नगर याजेरच्या वाटेवर, गादच्या खोऱ्याच्या मध्यावर आहे.)

तेथून ते गिलादला आणि पुढे तहतीम होदशी या प्रदेशात गेले. दान्यात आणि तिथून वळसा घेऊन सीदोन येथे गेले. सोर (तायर) हा गड आणि हिव्वी व कनानी यांची नगरे इकडे ते गेले. तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेला बैर-शेबा इथपर्यंत गेले. सगळा पालथा घालून ते नऊ महिने वीस दिवसांनी यरुशलेम येथे पोचले.

यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्राएलमध्ये तलवारधारी पुरुष आठ लक्ष होते. यहूदात ही संख्या पाच लक्ष होती.

दावीदाला परमेश्वराकडून शिक्षा

10 हे काम पार पाडल्यावर मात्र दावीदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वराला म्हणाला, “माझ्याहातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे.”

11 दावीद सकाळी उठला तेव्हा दावीदाचा संदेष्टा गाद याला देववाणी ऐकू आली. 12 परमेश्वर त्याला म्हणाला, “दावीदाला जाऊन सांग, ‘परमेश्वर म्हणतो, तुझ्यापुढे मी तीन गोष्टी ठेवतो त्यापैकी एकीची निवड कर.’”

13 गादने दावीदाकडे येऊन त्याला हे सर्व सांगितले. तो दावीदाला म्हणाला, “तिन्हीपैकी एकीची निवड कर. तुझ्या देशात सात वर्षे दुष्काळ पडावा, किंवा शत्रूंनी तीन महिने तुझा पाठलाग करावा की तीन दिवस रोगराई पसरावी? विचार कर आणि मी परमेश्वराला काय सांगावे ते सांग.”

14 दावीद गादला म्हणाला, “मी पेचात सापडलो आहे खरा! पण परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वरच मला शिक्षा देवो. लोकांच्या हाती मी पडू नये.”

15 तेव्हा परमेश्वराने इस्राएलवर रोगराई ओढवू दिली. सकाळी तिची सुरुवात होऊन नेमलेल्या काळपर्यंत ती राहिली. दान पासून बैरशेबापर्यंत सत्तर हजार माणसे मृत्युमुखी पडली. 16 यरुशलेमच्या संहारासाठी देवदूताचा हात उंचावला पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वराला फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, “आता पुरे तुझा हात खाली घे.” तेव्हा हा देवदूत अरवना यबूसी याच्या खळ्याजवळ होता.

अरवनाचे खळे दावीद विकत घेतो

17 लोकांना मारणाऱ्या देवदूताला दावीदाने पाहिले. दावीद परमेश्वराला म्हणाला, “माझे चुकले माझ्या हातून पाप घडले आहे. पण हे लोक मेंढरांसारखे माझ्या मागून आले. त्यांचे काहीच चुकले नाही. तेव्हा तू मला आणि माझ्या कुटुंबियांना शिक्षा कर.”

18 त्या दिवशी गाद दावीदाकडे आला. तो म्हणाला, “अरवना यबूसीच्या खळ्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध” 19 दावीदाने मग परमेश्वराच्या इच्छेनुसार गादच्या म्हणण्याप्रमाणे केले. तो अरवनाला भेटायला गेला. 20 अरवनाने राजाला आणि त्याच्या सेवकांना येताना पाहिले. त्याने पुढे होऊन जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला. 21 अरवना म्हणाला, “माझे स्वामी का बरे आले आहेत?”

दावीद म्हणाला, “तुझे खळे विकत घ्यायला. म्हणजे मग मी परमेश्वरा प्रीत्यर्थ इथे एक वेदी बांधीन. मग रोगराई संपुष्टात येईल.”

22 अरवना म्हणाला, “स्वामीनी मनाला येईल ते अर्पण करण्यासाठी घ्यावे. होमबलीसाठी हे बैल आहेत. इंधनासाठी मळणीची औते आणि बैलांचे सामान आहे. 23 महाराज, हवे ते मी तुम्हाला देईन.” महाराजांवर परमेश्वराची मर्जी असावी अशीही कामना त्याने पुढे व्यक्त केली.

24 पण राजा अरवनाला म्हणाला, “नाही, तुला मी खरे सांगतो, मी ही जमीन विकतच घेणार आहे. फुकटात मिळालेले मी होमबली म्हणून परमेश्वर देवाला अर्पण करणार नाही.”

तेव्हा दावीदाने खळे आणि बैल पन्नास शेकेल चांदी देऊन विकत घेतले. 25 मग तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली. होमबली आणि शांत्यार्पणे केली.

परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. इस्राएलवरील रोगराई परमेश्वराने संपुष्टात आणली.

गलतीकरांस 4

मी जे म्हणत आहे ते हे की, जोपर्यंत वारसदार हा लहान मूल आहे तोपर्यंत तो गुलामापेक्षा वेगळा नाही. जरी तो सर्वांचा मालक असला तरी, तो जोपर्यंत त्याच्या पित्याने नेमून दिलेला वेळ आहे तोपर्यंत पालकांच्या आणि विश्वास्तांच्या ताब्यात असतो. याच प्रकारे जोपर्यंत आम्ही “मुले” होतो तोपर्यंत आम्हीसुद्धा या जगाच्या निरर्थक नियमांचे गुलाम होतो. परंतु जेव्हा काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपला पुत्र पाठविला, जो स्त्रीपासून जन्मला, व नियम शास्त्राप्रमाणे वागला. यासाठी की, त्याने जे नियमशास्त्राधीन होते त्यांना सोडवावे व देवाची मुले म्हणून स्वीकारावे.

आणि तुम्ही त्याचे पुत्र आहात, म्हणून देवाने आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या अंतःकरणात पाठविले आहे. आत्मा “अब्बा” [a] म्हणजे “पित्या” अशी हाक मारतो. म्हणून तू आता गुलाम नाही, तर एक पुत्र आहेस, आणि जर पुत्र आहेस तर देवाने तुला त्याचा वारसदारही बनविले आहे.

गलतीया येथील ख्रिस्ती लोकांकरिता पौलाचे प्रेम

गतकाळात जेव्हा तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा खऱ्या अर्थाने जे देव नव्हते, त्यांचे तुम्ही गुलाम होता. परंतु आता तुम्ही देवाला ओळखता किंवा आता देवाने तुमची ओळख करुन घेतली आहे. तर मग आता तुम्ही ज्यांचे गुलाम होण्याचे प्रयत्न करीत आहात त्या दुर्बल आणि निरुपयोगी नियमाकडे कसे वळता? 10 तुम्ही विशेष दिवस, महिने, ऋतू आणि वर्षे पाळता. 11 मला तुमच्याविषयी भीती वाटते मला वाईट वाटते की, मी तुमच्यासाठी केलेले श्रम व्यर्थ आहेत.

12 बंधूनो, मी तुम्हांला कळकळीची विनंति करतो की कृपा करुन माझ्यासारखे व्हा. कारण मी तुमच्यासारखा झालो, असे काही नाही की, तुम्ही माझे काही वाईट केले होते. 13 तुम्हांला माहीत आहे की, माझ्या शारीरिक दुर्बलतेमुळे प्रथमतः मी तुम्हांला सुवार्ता सांगितली. 14 आणि माझ्या शारीरिक दुर्बलतेबाबत तुमची कठीण परीक्षा होत असतानाही उलट माझे एखाद्या देवदूतासारखे तुम्ही स्वागत केले, जणू काय मीच स्वतः ख्रिस्त असल्यासारखे स्वागत केले. 15 मग जो आनंद तुम्हांला मिळाला तो कोठे आहे? कारण मी तुम्हांविषयी साक्ष देतो की, जर तुम्ही समर्थ असता तर तुम्ही तुमचे स्वतःचे डोळे काढून ते मला दिले असते. 16 तुम्हांला खरे सांगितले म्हणून मी तुमचा वैरी झालो काय?

17 तुम्ही नियमशास्त्र पाळावे असे ज्यांना वाटते त्यांना तुमच्याविषयी उत्साहवर्धक आस्था आहे, पण चांगल्या हेतूसाठी नाही. मझ्यापासून तुम्हांला वेगळे करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. यासाठी की तुम्हांला त्याच्याविषयी उत्साहवर्धक आस्था वाटेल. 18 हे नेहमीच चांगले असते की, कोणासाठी तरी विशेष (उत्साहवर्धक) आस्था असावी पण ती कोणत्या तरी चांगल्या गोष्टीसाठी आणि मी जेव्हा तुमच्याबरोबर असतो, फक्त तेव्हाच नव्हे. 19 माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा प्रसूतिवेदनातून जात आहे आणि तुम्ही ख्रिस्तासारखे होईपर्यंत मला तसे करावेच लागेल. 20 आता मला तुमच्याबरोबर तेथे हजर राहावेसे व स्वर बदलून वेघळ्या प्रकारे बोलावेसे वाटते, कारण तुमच्याविषयी मी गोंधळात पडलो आहे.

हागार आणि साराचे उदाहरण

21 जे तुम्ही नियमशास्त्राधीन राहू इच्छिता त्या तुम्हांला मला विचारु द्या की, नियमशास्त्र काय म्हणते, ते तुम्हांला माहीत आहे का? 22 असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होते. एक त्याला गुलाम मुलीपासून झाला व दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून जन्मलेला 23 देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मला.

24 या गोष्टी दृष्टांतरुप आहेत, त्या स्त्रिया दोन करार आहेत. एक करार सीनाय पर्वतावर झाला. आणि ज्यांच्या नशिबी गुलामगिरी होती अशा लोकांना त्याने जन्म दिला. हा करार हागारशी संबंध दर्शवितो. 25 हागार ही अरबस्तानातील सीनाय पर्वताचे दर्शक हल्लीच्या यरुशलेमचे बाह्यरुप आहे. कारण ती आपल्या मुलासह गुलामगिरीत आहे. 26 परंतु स्वर्गीय यरुशलेम स्वतंत्र आहे. स्वर्गीय यरुशलेम ही आमची आई आहे. 27 कारण असे लिहिले आहे.

“जिने जन्म दिला नाही, त्या मूल नसलेल्या (स्त्रीने) आनंद करावा!
    ज्या तुला प्रसूतिवेदना झालेल्या नाहीत ती तू आनंदाने
घोष कर, आरोळी मार,
कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा
    सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत” (A)

28-29 बंधूनो, आता तुम्ही इसहाकासारखी देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मलेली मुले आहात, परंतु तो त्यावेळी जसा देहस्वभावाप्रमाणे जन्मला होता व त्याने आत्म्याच्या सामर्थ्याने जन्मलेल्यांचा छळ केला तसे आता आहे. 30 पण पवित्र शास्त्र काय सांगते? “त्या गुलाम मुलीला व तिच्या पुत्राला घालवून दे, कारण गुलाम मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारस होणार नाही.” 31 यासाठी बंधूंनो, आपण गुलाम मुलीची नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत.

यहेज्केल 31

अश्शूर गंधसरुप्रमाणे आहे

31 परागंदा काळाच्या अकराच्या वर्षीच्या तिसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला, “मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो आणि त्याचे लोक यांना पुढील गोष्टी सांग:

“मोठेपणात तुम्ही कोणासारखे आहात?
अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या
    व गर्द छाया असलेल्या लबानोनमधील
    उंच गंधसरुसारखा होता.
त्याचा शेंडा ढगांना भिडला होता.
पाण्यामुळे वृक्ष वाढला.
    नदीमुळे तो उंच झाला.
वृक्षाभोवती नद्या वाहत होत्या.
त्याच्यापासून निघणारे फक्त लहान पाटच
    मळ्यातील इतर झाडांपर्यंत जात.
म्हणून तो वृक्ष मळ्यातील इतर झाडांपेक्षा उंच होता.
    त्यांला खूप फांद्या फुटल्या.
त्याला भरपूर पाणी मिळाल्याने,
    त्याच्या फांद्या विस्तारल्या.
सर्व पक्ष्यांनी त्या वृक्ष्याच्या फांद्यांमध्ये
    आपली घरटी बांधली.
त्याच्या छायेत सर्व प्राण्यांची वीण होई.
    त्याच्या सावलीला सर्व मोठी राष्ट्रे राहात.
वृक्ष फारच सुंदर होता.
    त्याच्या मुळांना भरपूर पाणी मिळाल्याने
    त्याचा विस्तार मोठा झाला,
    त्याच्या फांद्या लांब झाल्या.
देवाच्या बागेतील, गंधसुरुंनासुध्दा
    एवढ्या फांद्या नव्हत्या
देवदारुलाही एवढ्या फांद्या नव्हत्या,
अर्मोन झाडांनाही अशा फांद्या नव्हत्या.
देवाच्या बागेतील कोठलाच वृक्ष,
    ह्या वृक्षा इतका, सुंदर नव्हता.
मी त्याला खूप फांद्या
    देऊन सुंदर बनविले.
मग एदेनमधील म्हणजेच देवाच्या
    बागेतील वृक्ष त्याचा द्वेष करु लागले.”

10 मग परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “वृक्ष उंच वाढला आहे. त्याचा शेडा ढगाला भिडला आहे. वृक्षाला आपल्या उंचीचा अभिमान आहे. 11 म्हणून मी त्यास एका बलिष्ट राजाच्या स्वाधीन करीन. तो त्या वृक्षाने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल त्याला शिक्षा करील. मी त्या वृक्षाला त्याच्या दुष्टाव्याबद्दल माझ्या बागेतून काढून टाकीन. 12 राष्ट्रांतील अत्यंत भयंकर परक्यांनी त्याला तोडून फेकले. वृक्षाच्या फांद्या डोंगरदऱ्यात पडल्या त्या फांद्या त्या देशातून वाहणाऱ्या नद्यांतून वाहत गेल्या. त्या वृक्षाची सावली राहिली नसल्याने, पृथ्वीवरचे सगळे लोक दूर निघून गेले. 13 आता त्या तोडून टाकलेल्या झाडावर पक्ष्यांची वस्ती आहे आणि हिंस्र श्वापदे त्याच्या तोडून टाकलेल्या फांद्यामधून संचार करत आहेत.

14 “आता, पाण्याजवळचे कोठलेही झाड गर्व करणार नाही. कोणीही ढगापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार नाही. ते पाणी पिणारे मोठे वृक्ष आपल्या उंचीची प्रौढी मिरविणार नाहीत. का? कारण प्रत्येकाला मरण अटळ आहे. त्यांना जमिनीखाली, शेओलमध्ये मृत्यूलोकांत जावे लागणार. इतर मृतांमध्ये, खोल विवरात त्यांना जावे लागणार.”

15 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “ज्या दिवशी तो वृक्षा शेओलमध्ये मृत्युलोकांत गेला, त्या दिवशी मी लोकांना शोक करायला लावला. मी खोल पाण्याने त्या वृक्षाला झाकले. [a] वृक्षाच्या नद्यांचा प्रवाह मी अडविला. त्यामुळे झाडांकडे वाहणारे पाणी वाहण्याचे थांबले. मी त्याच्यासाठी लबानोनला शोक करायला भाग पाडले. त्या मोठ्या वृक्षाबद्दलच्या दु:खाने मळ्यातील झाडे म्लान झाली. 16 मी वृक्ष पाडला. त्याच्या आवाजाने राष्ट्र हादरली, घाबरली. मी वृक्षाला मृत्यूलोकांत जायला भाग पाडले. तो वृक्ष इतर लोकांबरोबर खोल विवरात जाऊन पडला. पूर्वी, एदेनमधल्या सर्व वृक्षांनी आणि लबानोनमधील उत्तम झाडांनी तेच पाणी प्यायले होते. धरणीखाली गेलेले ते वृक्ष मग समाधान पावले. 17 हो! ते वृक्षही मोठ्या वृक्षाबरोबर खाली गेले. ते लढाईत मारल्या गेलेल्या लोकांमध्ये जाऊन मिसळले. त्या मोठ्या वृक्षाने इतरांना बलवान केले होते. राष्ट्रांमध्ये ती झाडे ह्या मोठ्या वृक्षाच्या सावलीला राहिली.

18 “तेव्हा हे मिसर देशा, एदेनमधल्या कोणत्या मोठ्या, बलवान वृक्षाशी मी तुझी तुलना करावी? तू, मृत्युलोकांत, त्या परदेशीयांबरोबर आणि लढाईत मारल्या गेलेल्या लोकांबरोबर, जाऊन पडशील, फारो आणि त्याची माणसे ह्यांच्याबाबतीत तसेच घडेल.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.

स्तोत्रसंहिता 79

आसाफाचे स्तोत्र

79 देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले.
    त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला.
    त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले.
शत्रूंनी तुझ्या सेवकांची प्रेते रानटी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवली
    त्यांनी तुझ्या भक्तांची प्रेते रानटी पशूंना खाण्यासाठी ठेवली.
देवा, शत्रूंनी तुझी इतकी माणसे मारली की रक्त पाण्यासारखे वाहायला लागले.
    प्रेते पुरायला एखादा माणूसही उरला नाही.
आमच्या भोवतालच्या लोकांनी आमचा पाणउतारा केला
    आमच्या भोवतालची माणसे आम्हाला पाहून हसली आणि त्यांनी आमची चेष्टा केली.
देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का?
    देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?
देवा, तू तुझा राग ज्या देशांना तू माहीत नाहीस अशा देशांकडे वळव.
    जे देश तुझी उपासना करीत नाहीत अशा देशांकडे तुझा राग वळव.
त्या देशांनी याकोबाचा नाश केला
    त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला.
देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस.
    आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव.
    आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे.
देवा, रक्षणकर्त्या, आम्हाला मदत कर.
    आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल.
    आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक.
10 इतर देशांना “कुठे आहे तुमचा देव?
    तो तुम्हाला मदत करु शकत नाही का?”
असे म्हणू देऊ नकोस.
    देवा, त्या लोकांना शिक्षा कर म्हणजे आम्ही ते बघू शकू.
तुझ्या सेवकांना मारल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
11 कैद्यांच्या कण्हण्याकडे लक्ष दे देवा,
    मारण्यासाठी ज्यांची निवड झाली होती त्या लोकांना तुझ्या सामर्थ्याने वाचव.
12 देवा, आमच्या भोवतालच्या माणसांनी आम्हांला
    जो त्रास दिला त्याबद्दल त्यांना सात वेळा शिक्षा दे.
    तुझा अपमान केल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
13 आम्ही तुझी माणसे आहोत, आम्ही तुझ्या कळपातल्या मेंढ्या आहोत.
    आम्ही सदैव तुझी स्तुती करु.
    देवा, आम्ही अगदी सर्वकाळ तुझी स्तुती करु.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center