Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 21

शौलाच्या कुटुंबीयांना शासन

21 दावीदाच्या या कारकिर्दीत एकदा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तीन वर्षे टिकला. तेव्हा दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वराने सांगितले, “शौल आणि त्याचे खुनी (रक्तपिपासू) घराणे यावेळच्या दुष्काळाला जबाबदार आहेत. शौलने गिबोन्यांना मारले म्हणून हा दुष्काळ पडला.” (गिबोनी म्हणजे इस्राएली नव्हेत. ते अमोरी होत. इस्राएलींनी त्यांना दुखापत न करण्याचे वचन दिले होते. [a] तरी शौलने गिबोन्यांच्या वधाचा प्रयत्न केला. इस्राएली आणि यहूदा लोकांविषयीच्या अति उत्साहामुळे त्याने तसे केले.)

गिबोन्यांना एकत्र बोलावून राजा दावीदाने त्यांच्याशी बोलणे केले. दावीद त्यांना म्हणाला, “तुमच्या साठी मी काय करु? इस्राएलचा कलंक पुसला जाईल आणि तुम्ही या परमेश्वराच्या प्रजेला आशीर्वाद द्याल यासाठी मी काय करु शकतो?”

तेव्हा गिबोनी दावीदाला म्हणाला, “शौलाच्या घराण्याने जे केले त्याची सोन्यारुप्याने भरपाई होऊ शकत नाही. पण त्यासाठी इस्राएलींना जिवे मारण्याचाही आम्हाला हक्क नाही.”

दावीद म्हणाला, “ठीक तर, तुमच्यासाठी मी आता काय करावे?”

ते राजाला म्हणाले, “त्या माणसाने (शौलने) आमच्याविरुद्ध कट केला. इस्राएली प्रदेशात राहणाऱ्या आमच्या सर्व लोकांचा त्याने नि:पात करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शौलची सात मुले आमच्या हवाली कर. शौलला परमेश्वराने राजा म्हणून निवडले होते. तेव्हा शौलाच्या गिबा डोंगरावर त्याच्या मुलांना आम्ही देवासमक्षच फाशी देऊ.”

राजा दावीद म्हणाला, “मला हे मान्य आहे. त्यांना मी तुमच्या हवाली करतो.” पण योनाथानचा मुलगा मफीबोशेथ याला राजाने अभय दिले. योनाथान हा शौलचा मुलगा. पण दावीदाने त्याला त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचे वचन दिले होते. म्हणून मफीबोशेथला राजाने इजा पोचू दिली नाही. अरमोनी आणि मफीबोशेथ (हा मफीबोशेथ वेगळा) ही शौलाला रिस्पा या पत्नीपासून झालेली मुले. शौलला मखिल नावाची मुलगीही होती. अद्रीएलशी तिचे लग्न झाले होते. महोलाथी येथील बर्जिल्ल्यचा हा मुलगा. या दांपत्याची पाच मुलेही दावीदाने ताब्यात घेतली. या सात जणांना त्याने गिबोन्यांच्या स्वाधीन केले. गिबोन्यांनी त्यांना गिबा डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिले. ते सातजण एकदमच प्राणाला मुकले. त्यांना ठार केले गेले ते दिवस हंगामाच्या सुरुवातीचे होते. जवाच्या पिकाच्या सुरुवातीचा तो (वसंतातील) काळ होता.

दावीद आणि रिस्पा

10 अय्याची मुलगी रिस्पा हिने शोकाकुलहोऊन एक मोठे कापड त्या गिबाच्या खडकावर अंथरले. तेव्हापासून पावसाला सुरुवात होईपर्यंत ते तसेच राहू दिले. रिस्पाने रात्रंदिवस त्या मृत देहांची निगराणी केली. दिवसा पक्ष्यांनी आणि रात्री जंगली जनावरांनी त्याचे लचके तोडू नयेत म्हणून राखण केली.

11 शौलाची दासी रिस्पा काय करत आहे हे लोकांनी दावीदाच्या कानावर घातले. 12 तेव्हा दावीदाने याबेश गिलाद मधील लोकांकडून शौल आणि योनाथान यांच्या अस्थी आणवल्या (शौल आणि योनाथान यांचा गिलबोवा येथे वध झाल्यावर याबोश गिलादच्या लोकांनी त्या नेल्या होत्या. बेथशान मधील भिंतीवर पलिष्ट्यांनी या दोघांचे देह टांगले होते. पण बेथशानच्या लोकांनी येऊन भरवस्तीतील ती प्रेते चोरुन नेली.) 13 याबेश-गिलाद मधून शौल आणि त्याचा पुत्र योनाथान या दोघांच्या अस्थी दावीदाने आणल्या. तसेच त्या फाशी दिल्या गेलेल्या सात जणांचे मृतदेहही आणले. 14 शौल आणि योनाथानच्या अस्थी त्यांनी बन्यामीनच्या प्रदेशात पुरल्या. शौलचे वडील कीश यांच्या कबरीत त्या पुरल्या. राजाच्या आज्ञेबरहुकूम लोकांनी हे सर्व केले. तेव्हा देवाने लोकांची प्रार्थना ऐकली आणि तिला त्याने प्रतिसाद दिला.

पलिष्ट्यांशी युध्द

15 पलिष्ट्यांनी पुन्हा इस्राएलीशी युध्द पुकारले. तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर पलिष्ट्यांशी युध्द करायला निघाला. पण यावेळी दावीद फार थकून गेला. 16 त्यावेळी तेथे रेफाई वंशातला इशबी-बनोब हा एक बलाढ्य माणूस होता. त्याच्या भाल्याचे वजनच साडेसात पौंड होते. त्याच्याजवळ नवी कोरी तलवार होती. दावीदाला मारायचा त्याने प्रयत्न केला. 17 पण सरुवेचा मुलगा अबीशय याने या पलिष्ट्याला मारले आणि दावीदाचे प्राण वाचवले.

तेव्हा दावीद बरोबरच्या लोकांनी दावीदाला शपथ घालून सांगितले “तुम्ही आता लढाईवर यायचे नाही. नाहीतर इस्राएल एका मोठ्या नेत्याला मुकेल.”

18 यानंतर गोब येथे पलिष्ट्यांशी आणखी एकदा लढाई झाली. तेव्हा हूशाथी सिब्बखय याने रेफाई वंशातील सफ याचा वध केला.

19 गोब येथेच पुन्हा पलिष्ट्यांशी युध्द झाले. तेव्हा बेथलहेमचा यारे ओरगीम याचा मुलगा एलहानान याने गथचा गल्याथ याला ठार केले. विणकराच्या तुरीएवढा त्याचा भाला होता.

20 गथ येथे आणखी एक युध्द झाले. तेथे एक धिप्पाड पुरुष होता. त्याच्या हातापायांना सहा सहा बोटे होती. म्हणजे एकंदर चोवीस. हाही रेफाई वंशातला होता. 21 त्याने इस्राएलला आव्हान दिले पण योनाथानने या माणसाचे प्राण घेतले. (हा योनाथान म्हणजे दावीदाचा भाऊ शिमी याचा मुलगा.)

22 ही माणसे गथ येथील रेफाई वंशातील होती. दावीद आणि त्याचे लोक यांनी त्यांना ठार केले.

गलतीकरांस 1

प्रेषित पौलाकडून, प्रेषित होण्यासाठी मी मनुष्यांकडून निवडला गेलो नाही. मनुष्यांकडून मला पाठविण्यात आले नव्हते. देव जो पिता त्याने व येशू ख्रिस्ताने मला प्रेषित केले, देवानेच येशूला मरणातून उठविले. हे पत्र ख्रिस्तामधील जे बंधु माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकडूनही आहे.

आणि हे गलतीया [a] येथील मंडळ्यांना (विश्वासणाऱ्यांच्या गटांना) लिहिले आहे.

यांची कृपा चांगुलपण व शांति तुम्हाबरोबर असो. येशूने स्वतःला आमच्या पापांसाठी दिले. ज्या दुष्ट जगात आम्ही राहतो त्यापासून आम्हांला मुक्त करण्यासाठी त्याने असे केले आणि देव जो पिता त्याची हीच इच्छा होती. त्याला सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.

फक्त एकच सुवार्ता खरी आहे

मला आश्चर्य वाटते की ज्या देवाने तुम्हांला ख्रिस्ताद्वारे बोलाविले आहे त्याच्यापासून तुम्ही इतक्या लवकर दुसऱ्या सुवार्तेकडे वळत आहात. ती खरी सुवार्ता नाही पण असे काही जण आहेत की ते तुम्हांला गोंधळात टाकीत आहेत व ख्रिस्ताविषयीची सुवार्ता बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही तुम्हाला सांगितली त्याहून निराळी सुवार्ता आम्ही किंवा स्वर्गातील दूतांनी जर तुम्हांला सांगितली तर देवाचा शाप त्याच्यावर येवो. आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे आणि आता पुन्हा सांगतो तुम्ही जी स्वीकारली आहे तिच्याहून वेगळी सुवार्ता जर कोणी तुम्हांस सांगत असेल तर देव त्याला शाप देवो.

10 आता मी मनुष्याला किंवा देवाला संतोषविण्याचा प्रयत्न करीत आहे काय? मी मनुष्याना संतुष्ट करीत राहिलो असतो तर ख्रिस्ताचा गुलाम झालो नसतो.

पौलाचा अधिकार देवाकडून आहे

11 बंधूनो, तुम्हांला माहीत असावे असे मला वाटते ते हे की जी सुवार्ता मी तुम्हांस सांगितली तो मानवी संदेश नाही. 12 कारण मला ती मनुष्यांकडून झालेल्या प्रकटीकरणामुळे कळली नाही तर येशू ख्रिस्ताने मला ती दाखविली.

13 यहूदी धर्मातील माझ्या पूर्वीच्या जीवनाविषयी तुम्ही ऐकले आहे. आणि हे जाणता की देवाच्या मंडळीचा मी भयंकर छळ केला होता. आणि तिचा नाश करण्याचा ही प्रयत्न केला. 14 माझ्या यहूदी धर्माच्या पालनाबाबत मी माझ्या वयाच्या लोकांपेक्षा कितीतरी पुढे होतो. माझ्या पूर्वजांनी दिलेल्या शिकवणीविषयी मी त्याला पूर्ण वाहिलेला होतो.

15 त्यामुळे मी जन्मण्याअगोदरच देवाने माझ्यासाठी वेगळी योजना आखली होती आणि त्याच्या कृपेत त्याची सेवा करण्यासाठी त्याने मला बोलावले. 16 आणि जेव्हा देवाने त्याचा पुत्र मला प्रगट करण्याचे ठरविले ते यासाठी की, विदेशी लोकांमध्ये पुत्राविषयीची सुवार्ता मी सांगावी. मी कोणत्याही मनुष्याबरोबर सल्लामसलत केली नाही. 17 किंवा जे माझ्यापूर्वी प्रेषित होते त्यांना भेटण्यासाठी यरुशलेमात वर गेलो नाही. त्याऐवाजी मी ताबडतोब अरबस्तानात गेलो आणि मग दिमिष्कास परत आलो.

18 मग तीन वर्षांनंतर पेत्राबरोबर ओळख करुन घेण्यासाठी यरुशेलमला गेलो. आणि त्याच्याबरोबर मी पंधरा दिवस राहिलो. 19 परंतु प्रेषितांपैकी दुसऱ्यांना मी पाहिले नाही; मी फक्त प्रभु येशूचा भाऊ याकोब यालाच पाहिल. 20 आणि मी देवासमोर शपथ घेऊन सांगतो की जे काही मी तुम्हांला लिहित आहे, ते खोटे नाही. 21 नंतर मी सूरीया व किलीकिया प्रांतांत गेलो.

22 परंतु यहूदीया येथे विश्वासात ज्या ख्रिस्ताच्या मंडळ्या आहेत त्यांना मी व्यक्तीश: माहीत नव्हतो. 23 त्यांनी फक्त ऐकले होते. लोक म्हणतातः “ज्या मनुष्याने ज्या विश्वासासाठी पूर्वी आपला छळ केला, ज्या विश्वासाचा त्याने नाश करण्याचा प्रयत्न केला तो आता त्याचीच घोषणा करीत आहे.” 24 आणि माझ्यामुळे त्यांनी देवाचे गौरव केले.

यहेज्केल 28

सोर स्वतःला देवाप्रमाणे समजते

28 मला परमेश्वराचा संदेश मिळाला तो म्हणाला, “मानवपुत्रा, ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, असे सोरच्या राजाला सांग:

“‘तू फार गर्विष्ठ आहेस.
    तू म्हणतोस “मी देव आहे.
समुद्राच्या मध्यभागी मी
    देवाच्या आसनावर बसतो.”

“‘पण तू मानव आहेस, देव नाही.
    तुला आपण देव आहोत असे फक्त वाटते.
तू स्वतःला दानीएलापेक्षा बुद्धिमान समजतोस
    तू सर्व रहस्ये शोधू शकतोस असे तुला वाटते.
तू तुझ्या शहाणपणाने व अकलेने स्वतःसाठी
    संपत्ती गोळा केली आहेस.
तुझ्या खाजिन्यांत तू चांदी-सोने ठेवले आहेस.
तुझ्या शहाणपणाने आणि व्यापारामुळे
    तुझी संपत्ती वाढली
आणि आता तुला त्यांचाच गर्व झाला आहे.

“‘म्हणून परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:
सोर, तू स्वतःला देवासारखी मसजतेस!
मी परक्यांना तुझ्याविरुद्ध लढण्यासाठी आणीन.
    ते राष्ट्रांमध्ये सर्वांत भयंकर आहेत.
ते तलवारी उपसतील आणि
    तुझ्या शहाणपणाने मिळविलेल्या सर्व सुंदर गोष्टींचा नाश करतील.
    तुझे वैभव ते लयाला घालवितील.
ते तुला थडग्यात पोहोचवतील समुद्रात
    मेलेल्या नावाड्याप्रमाणे तुझी स्थिती होईल.
माणूस तुला ठार मारेल.
    तरी तू त्याला “मी देव आहे.”
असे म्हणशील का? नाही तो तुला ताब्यात घेईल.
    मग तुला समजेल की तू मानव आहेस, देव नव्हे!
10 परका तुला परदेशीयांसारखे [a] वागवेल आणि ठार करील.
    माझ्या आज्ञेमुळे ह्या गोष्टी घडतील.’”
परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

11 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले तो म्हणाला, 12 “मानवपुत्रा, सोरच्या राजाविषयीचे पुढील शोकगीत गा. त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो

“‘तू एक आदर्श माणूस होतास.
    तू ज्ञानी होतास.
    तू अतिशय देखणा होतास.
13 तू एदेनमध्ये राहात होतास.
एदेन हा देवाचा बाग आहे.
    तुझ्याजवळ माणके, पुष्कराज,
    हिरे, लसणा, गोमेद, सूर्यंकांत मणी,
    नीलमणी, वैदूर्य पाच अशी सर्व प्रकारची मोल्यवान रत्ने होती,
आणि ती सर्व सोन्याच्या कोंदणात बसविलेली होती.
    ज्या दिवशी तुला निर्माण केले त्याच दिवशी तुला हे सौदंर्य देण्यात आले.
    देवाने तुला सामर्थ्यशाली केले.
14 तू एक अभिषिक्त करुब होतास
    तुझे पंख माझ्या सिंहासनावर पसरत.
मी तुला देवाच्या पवित्र पर्वतावर ठेवी.
    तू रत्नांतून हिंडत होतास आणि अग्नीप्रमाणे तळपत होतास.
15 मी तुला निर्मिले, तेव्हा तू सज्जन व प्रामाणिक होतास.
    पण नंतर तू दुष्ट झालास.
16 तुझ्या व्यापाराने तुला खूप संपत्ती मिळवून दिली खरी,
    पण त्याने तुझ्यात क्रूरपणा निर्माण झाला, आणि तू पाप केलेस.
म्हणून मी तुला एखाद्या घाणेरड्या गोष्टीसारखी वागणूक दिली.
    मी तुला देवाच्या पर्वतावरुन फेकून दिले.
तू एक खास अभिषिक्त करुब देवदूत होतास,
    तुझे पंख माझ्या सिंहासनावर पसरत होते,
पण मी तुला, अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेल्या
    रत्नांपासून, सक्तीने दूर केले.
17 तुझ्या सौंदर्यांने तुला गर्विष्ठ बनविले.
    तुझ्या वैभवाने तुझ्या ज्ञानाचा नाश केला.
म्हणून मी तुला खाली जमिनीवर लोटले.
    आता इतर राजे तुझ्याकडे डोळे विस्फारुन पाहतात.
18 तू खूप चुका केल्यास
तू कपटी व्यापारी झालास आणि अशा तऱ्हेने,
    तू पवित्र स्थान अपवित्र केलेस.
म्हणून मी तुझ्यातील आगीनेच
    तुला जाळीन.
जमिनीवर तू राख होऊन पडशील.
    आता सर्वजण तुझी लाजिरवाणी स्थिती पाहू शकतात.

19 “‘तुझी अशी स्थिती पाहून
    इतर राष्ट्रांतील लोकांना धक्का बसला.
तुझ्या बाबतीत जे घडले, ते पाहून लोक भयभीत होतील.
    तुझा शेवट झाला!’”

सीदोनसाठी संदेश

20 मला परमेश्वराचा संदेश मिळाला, तो म्हणाला, 21 “मानवपुंत्रा, सीदोनकडे पाहा व माझ्यावतीने तिच्याविरुद्ध असलेला संदेश तिला दे. 22 सांग, ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो.

“‘सीदोन, मी तुझ्याविरुद्ध आहे!
    तुझे लोक माझा मान राखायला शिकतील.
मी सिदोनला शिक्षा करीन.
    मग लोकांना कळेल की मीच परमेश्वर आहे, मी पवित्र आहे.
व ते त्याप्रमाणे माझ्याशी आचरण करतील.
23 मी सीदोनला रोगराई व मृत्यू पाठवीन.
    शहराबाहेरील तलवार (शत्रूसैनिक) तो मृत्यू आणील.
मगच त्यांना कळून चुकेल की मी परमेश्वर आहे.’

राष्ट्रे इस्राएलची चेष्टा करण्याचे सोडून देतील

24 “‘इस्राएलच्या सभोवतालच्या देशांनी इस्राएलचा तिरस्कार केला. पण त्यांचे वाईट होईल. मग इस्राएलच्या लोकांना बोचणारे तीक्ष्ण सुरे वा काटेरी झुडुपे उरणार नाहीत, व त्यांना समजून येईल की मीच परमेश्वर, त्यांचा प्रभू आहे.’”

25 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मी इस्राएलच्या लोकांना इतर राष्ट्रांत विखुरविले. पण मी पुन्हा त्यांना एकत्र आणीन मग त्या राष्ट्रांना मी पवित्र असल्याचे कळेल व ते माझ्याशी त्याप्रमाणे वागतील. त्या वेळी, माझा सेवक याकोब याला मी दिलेल्या भूमीवर इस्राएल लोक राहतील. 26 ते त्या भूमीवर सुरक्षितपणे राहतील. ते घरे बांधतील व द्राक्षमळे लावतील. त्यांचा तिरस्कार करणाऱ्या सभोवतालच्या राष्ट्रांना मी शिक्षा करीन. मग इस्राएलचे लोक निर्भयपणे राहतील व त्यांना पटेल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे.”

स्तोत्रसंहिता 77

प्रमुख गायकासाठी यदूथून सुरावर आधारलेले आसाफाचे स्तोत्र.

77 मी देवाला मदतीसाठी जोरात हाक मारली,
    देवा मी तुझी प्रार्थना करतो. माझ्याकडे लक्ष दे.
माझ्या प्रभु, मी संकटात असतो तेव्हा तुझ्याकडे येतो.
    मी रात्रभर तुझ्यापर्यंत पोहोंचण्याचा प्रयत्न केला.
    माझ्या आत्म्याने शांत व्हायला नकार दिला.
मी देवाचा विचार करतो आणि मला काय वाटते ते त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो,
    पण मला ते शक्य नाही.
तू मला झोपू देत नाहीस, मी काही तरी बोलायचा प्रयत्न केला
    पण मी फारच गोंधळलेल्या मनस्थितीत होतो.
मी सतत भूतकाळाचा विचार करीत राहिलो.
    खूप दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांचा मी विचार करत होतो.
रात्री मी माझ्या गाण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करतो.
    मी स्वःतशीच बोलतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
मी आश्चर्य करतो, “आमचा प्रभु आपल्याला कायमचा सोडून गेला का?
    तो आपल्याला कधी तरी परत घेईल का?
देवाचे प्रेम कायमचे नाहीसे झाले का?
    तो आपल्याशी कधी तरी परत बोलेल का?
देव दयेचा अर्थ विसरला का?
    त्याच्या कृपेचे आता रागात परिवर्तन झाले का?”

10 नंतर मी विचार केला, “जी गोष्ट मला राहून राहून खटकते आहे
    ती ही सर्वशक्तिमान सर्वोच्च असा देव त्याची शक्ती घालवून बसला आहे का?”

11 परमेश्वराने काय केले ते मला आठवते आहे.
    देवा, खूप पूर्वी तू ज्या अद्भूत गोष्टी केल्यास त्या मला आठवतात.
12 तू केलेल्या गोष्टींचा मी विचार केला.
    मी त्या गोष्टींबद्दल विचार केला.
13 देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत,
    देवा, तुझ्यासारखा महान कोणीही नाही.
14 अद्भुत गोष्टी करणारा देव तूच आहेस.
    तू लोकांना तुझी महान शक्ती दाखवलीस.
15 तू तुझ्या शक्तीने लोकांना वाचवलेस.
    तू याकोबाच्या आणि योसेफाच्या वंशजांना वाचवलेस.

16 देवा, पाण्याने तुला पाहिले आणि ते घाबरले,
    खोल पाणी भयाने थरथरले.
17 दाट ढगांनी पाणी खाली सोडले,
    लोकांनी वरच्या उंच ढगातला गडगडाट ऐकला.
    नंतर तुझे विजांचे बाण ढगातून चमकू लागले.
18 तिथे ढगांचा भयानक गडगडाट होत होता.
    विजांनी जगाला प्रकाशमय केले होते.
    पृथ्वी हलली आणि थरथरली.
19 देवा, तू खोल पाण्यातून चाललास.
    तू खोल समुद्र ओलांडलास, पण तुझे पाऊल कुठेही उमटले नाही.
20 तू मोशेच्या आणि अहरोनच्या मदतीने
    तुझ्या माणसांना मेंढ्यांप्रमाणे मार्गदर्शन केलेस.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center