M’Cheyne Bible Reading Plan
शबा दावीदा विषयी इस्राएलांचे मन कलुषित करतो
20 शबा नावाचा एक माणूस तेथे होता. हा बिक्रीचा मुलगा. बन्यामीन घराण्यातील हा शबी अगदी कुचकामी पण खोडसळ प्रवृत्तीचा होता. त्याने एकदा रणशिंग फुंकले आणि लोकांना गोळा केले आणि त्यांना म्हणाला,
“दावीदाकडे आपला भाग नाही.
या इशायच्या मुलात आपला वाटा नाही इस्राएलींनो,
चला आपापल्या डेऱ्यात परत.”
2 हे ऐकून सर्व इस्राएल लोक दावीदाला सोडून बिक्रीचा मुलगा शबा याच्या मागे गेले. पण यहूदी लोक मात्र यार्देन नदीपासून यरुशलेमपर्यंत राजाच्या पाठीशी राहिले.
3 दावीद यरुशलेममधील आपल्या घरी परतला. आपल्या दहा दासींना त्याने घराच्या निगराणीसाठी मागे ठेवले होते. त्यांना त्याने एका खास घरांत [a] ठेवले. त्यांच्यावर पहारा ठेवला. मरेपर्यंत या बायका तेथेच राहिल्या दावीदाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी नीट व्यवस्था केली पण पुन्हा त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांची स्थिती विधवेसारखी होती.
4 राजा अमासाला म्हणाला, “यहूदाच्या लोकांना तीन दिवसात येऊन मला भेटायला सांग. त्यावेळी तूही बरोबर राहा.”
5 तेव्हा अमासा यहूदांना बोलवून आणायला रवाना झाला. पण राजाने सांगितल्यापेक्षा त्याला जास्त वेळ लागला.
शबाला मारायची दावीदाची अबीशयला सूचना
6 दावीद अबीशयला म्हणाला, “अबशालोमपेक्षाही हा बिक्रीचा मुलगा शबा आपल्या दृष्टीने धोकादायक आहे. तेव्हा माझ्या हाताखालच्यांना घेऊन त्याचा पाठलाग कर. तटबंदी असलेल्या नगरात तो जायच्या आधीच त्याला गाठायला हवे. एकदा तो मजबूत बंदोबस्त असलेल्या नगरात शिरला की त्याला पकडणे अवघड जाईल.”
7 तेव्हा यवाब, बिक्रीचा मुलगा शबा याच्या पाठलागासाठी यरुशलेमहून निघाला. त्याने बरोबर आपली माणसे, करेथी, पलेथी तसेच इतर सैनिक घेतले.
यवाब अमासाचा वध करतो
8 यवाब आणि त्याचे सैन्य गिबोनजवळच्या मोठ्या पहाडाशी आले तेव्हा अमासा त्यांना सामोरा आला. यवाबाच्या अंगावर चिलखत होते. त्याने कमरबंद बांधला होता आणि म्यानात तलवार होती. यवाब आमासाच्या दिशेने चालू लागला तेव्हा त्याची तलवार म्यानातून निसटून पडली. यवाबाने ती उचलली आणि हातात धरली. 9 त्याने अमासाला विचारले, “तुझे सर्व कुशल आहेना?” आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरुन त्याला पुढे खेचले. 10 यवाबाच्या डाव्या हातातील तलवारीकडे अमासाचे लक्ष नव्हते. पण तेवढ्यात यवाबाने अमासाच्या पोटात तलवार खुपसली, आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. यवाबाला पुन्हा वार करावा लागलाच नाही. अमासा गतप्राण झाला.
शबाचा शोध चालूच
यवाब आणि त्याचा भाऊ अबीशय यांनी बिक्रीचा मुलगा शबा याचा शोध चालूच ठेवला. 11 यवाबाच्या सैन्यातील एक तरुण सैनिक अमासाच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “यवाब आणि दावीदाला ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी यवाबामागे जावे.”
12 अमासा रस्त्याच्या मध्यभागी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. येणारा जाणारा प्रत्येकजण थांबून हे दृष्य पाहतोय हे त्या तरुण सैनिकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने ते प्रेत रस्त्यावरुन ढकलत शेतात नेऊन टाकले. त्याच्यावर एक कापड अंथरले. 13 अमासाचा देह तिथून हलवल्यावर लोक ते सरळ ओलांडून यवाबाच्या मागे चालू लागले. मग त्यांनी यवाबाबरोबर शबाचा पाठलाग सुरु केला.
आबेल बेथ व माका येथे शबाचे पलायन
14 इस्राएलांच्या सर्व वंशांमधून जात शबा आबेल व बेथ माका येथे गेला. सर्व बेरीही एकत्र येऊन शबाला मिळाले.
15 यवाब आपल्या माणसांसहित आबेल बेथ माका येथे पोचला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. तटबंदीभोवती त्यांनी माती कचऱ्याचा ढीग रचला. त्याच्यावरुन भिंत पार करणे त्यांना सोयीस्कर ठरले असते. त्याचबरोबर त्यांनी भिंत पाडण्यासाठी भिंतीतील दगड फोडायला सुरुवात केली.
16 नगरात एक चाणाक्ष बाई राहात होती. तिने नगरातून मोठ्याने ओरडून सांगितले, “माझे ऐका. यवाबाला येथे यायला सांगा. मला त्याच्याशी काही बोलायचे आहे.”
17 यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्याला तूच यवाब का म्हणून विचारले.
यवाबाने होकार भरला.
तेव्हा ती म्हणाली, “माझे ऐक.”
यवाब म्हणाला, “सांग मी ऐकतोय.”
18 मग ती बाई म्हणाली, “पूर्वी लोक म्हणत गरज पडली की आबेलमध्ये यावे म्हणजे मागाल ते मिळते. 19 इस्राएलमधील शांतताप्रिय, विश्वासू लोकांपैकी मी एक आहे. इस्राएलच्या एका महत्वाच्या शहराची तुम्ही नासधूस करत आहात. परमेश्वराच्या मालकीच्या वस्तुची तुम्ही मोडतोड का करता?”
20 यवाब म्हणाला, “मला कशाचाच नाश करायची इच्छा नाही. तुमच्या नगराची नासधूस मी करु इच्छित नाही. 21 पण एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शबा नावाचा एक माणूस तुमच्या नगरात आहे. दावीद राजाविरुध्द त्याने बंड केले आहे. त्याला माझ्यापुढे हजर केलेत तर नगराला धक्का लावणार नाही.”
तेव्हा ती बाई यवाबाला म्हणाली, “ठीक आहे. त्याचे मुंडके भिंतीवरुन तुझ्याकडे टाकण्यात येईल.”
22 मग तिने गावातील लोकांना शहाणपणाने आपले म्हणणे पटवून दिले. तेव्हा लोकांनी शबाचे मुंडके धडावेगळे करुन ते यवाबाकडे तटबंदी पलीकडे फेकले.
यवाबाने रणशिंग फुंकले आणि सैन्याने नगर सोडले. जो तो आपल्या घरी परतला आणि यवाब यरुशलेम येथे राजाकडे आला.
दावीद कडील लोक
23 यवाब इस्राएलचा सेनापती होता. यहोयादचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता. 24 अदोराम हा कष्टकरी लोकांचा प्रमुख होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता. 25 शवा कार्यवाह होता. सादोक आणि अब्याथार हे याजक होते. 26 आणि याईरी ईरा हा दावीदाचा मुख्य सेवक होता.
शेवटची सूचना आणि सलाम
13 ही माझी तुम्हांला भेटण्याची तिसरी वेळ आहे. “प्रत्येक गोष्ट दोन किंवा तीन साक्षीदारांच्या साक्षीने सिद्ध करावी.” [a] 2 मी अगोदरच सूचना दिलेली होती जेव्हा दुसऱ्यावेळी मी तुमच्याबरोबर होतो. आता मी तुमच्यात नसताना ती सूचना पुन्हा सांगतो: माझ्या परत येण्याच्या वेळी अगोदर ज्यांनी पाप केले त्यांना मी सोडणार नाही किंवा दुसऱ्यांनाही नाही. 3 ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो याविषयीच्या पुराव्याची तुम्ही मागणी करीत आहात. तुमच्याशी व्यावहार करताना तो अशक्त नाही तर सामर्थ्यशाली आहे. 4 कारण जरी तो अशक्तपणात वधस्तंभावर खिळला गेला तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत आहे, कारण आम्हीही त्याच्यामध्ये अशक्त आहोत. तरी देवाच्या सामर्थ्याने त्याच्याबरोबर तुमच्यासाठी आम्ही जिवंत असू.
5 तुम्ही विश्वासात आहा की नाही याविषयी स्वतःची परिक्षा पाहा. पारख करा. ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, ह्याची जाणीव तुम्हांला होत नाही का? जर अर्थात तुम्ही परीक्षेत उतरला नाही तर. 6 आणि माझा विश्वास आहे की, तुम्ही हे शोधाल की, या परीक्षेत आम्ही अनुत्तीर्ण झालो नाही. 7 आता आम्ही देवाजवळ आशी प्रार्थना करतो की, तुम्ही काहीही चुकीचे करणार नाही. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण व्हावे यासाठी नव्हे तर अशासाठी की, आम्ही जरी नाकारलेल्यासारखे असलो तरी तुम्ही चांगले काम करावे. 8 कारण खरेपणाविरुद्ध आम्हांस काही करता येत नाही. तर खरेपणासाठी करता येते. 9 जेव्हा आम्ही अशक्त आहो आणि तुम्ही शक्तीमान आहा, तेव्हा आम्ही आनंद करतो. आणि आम्ही प्रार्थनाही करतो, ती अशी की, तुम्ही पूर्ण व्हावे. 10 यामुळे तुम्हापासून आम्ही दूर असताना हे तुम्हाला लिहितो, यासाठी की, प्रभुने जो अधिकार तुम्हांला खाली पाडून टाकण्यासाठी नव्हे तर वृद्धीसाठी मला दिला त्याप्रमाणे जवळ आल्यावर मी कठोर वागू नये.
11 शेवटी बंधूनो, आपण भेटू या, परिपूर्णतेकडे ध्येय असू द्या. जसे मी तुम्हांला सांगितले तसे करा. एका मनाचे व्हा, शांतीने राहा. आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर असेल.
12 पवित्र चुंबनाने एकमेकास भेटा.
13 सर्व संत आपणांस सलाम सांगतात. 14 प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा आणि देवाची प्रीति आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वाबरोबर असो.
सोर समुद्रावरील व्यापाराचे मोठे केंद्र
27 मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, सोरसाठी शोकगीत गा. 3 तिच्याबद्दल पुढील गोष्टी सांग
“‘सोर, तू समुद्रावरचे प्रवेशद्वार आहेस.
तू खूप राष्ट्रांची जणू व्यापारी आहेस.
समुद्रकाठाने तू पुष्कळ देशांत प्रवास करतेस.
प्रभू, माझा परमेश्वर, पुढील गोष्टी सांगतो.
4 सोर, तू स्वतःला इतकी सुंदर समजतेस,
की जणू काही सौंदर्यांची खाणच!
तुझ्या शहराच्या सीमेवर भूमध्य समुद्र आहे.
तुझ्या जहाजाप्रमाणे, तुझ्या कर्त्यांनी, तुला सौंदर्यांने परिपूर्ण केले आहे.
5 तुझ्या तक्तपोशीसाठी
त्यांनी सनीरच्या सरुंचा उपयोग केला.
तुझ्या डोलकाठीसाठी
त्यांनी लबानोनचे गंधसरु वापरले.
6 त्यांनी तुझी वल्ही बाशानमधील
अल्लोन वृक्षापासून बनविली.
त्यांनी तुझ्या डेकवरील खोली
कित्ती बेटावरच्या बावस लाकडाची बनविली
व ती हस्तिदंताने सजविली.
7 तुझ्या शिडासाठी
त्यांनी मिसरचे सुंदर वेलबुट्टीदार तागाचे कापड वापले.
ते शीड तुझे निशाण होते.
तुझ्या खोलीचे पडदे निळे जांभळे होते.
ते पडद्याचे कापड एलीशाहून आणलेले होते.
8 सीदोन व अर्वद येथील लोक तुझ्या नावा वल्हवीत असत.
सोर, तुझे सुज्ञ लोक तुझे नावाडी होते.
9 गबालची वडील व कुशाल माणसे
तुझ्या जहाजावर डांबराने भेगा बुजविण्यासाठी होते.
सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे नावाडी व्यवसायासाठी
तुझ्याकडे येत आणि तुझ्याशी व्यापार करीत.
10 “‘पारसी, लूदी व पूटी लोक तुझ्या सैन्यात होते. तेच तुझे लढवय्ये वीर होते. आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्या तटबंदीवर टांगीत त्यांनी तुझ्या शहराला मान व वैभव प्राप्त करुन दिले. 11 अर्वाद येथील पहारेकरी तुझ्या वेशीवर पहारा करीत. गम्मादचे लोक बुरुजांवर असत. ते आपल्या ढाली तुझ्या तटावर टांगीत त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णत्वाला नेले.
12 “‘तार्शीश तुझा सर्वांत उत्तम ग्राहक होता. तुझ्याकडील उत्तमोत्तम वस्तूंच्या मोबदल्यात तो चांदी, लोखंड, कथील व शिसे देत असे. 13 यावान, तुबाल आणि काळ्या समुद्राजवळचे लोक तुझ्याबरोबर व्यापार करीत. तुझ्याजवळील वस्तूंच्या मोबदल्यात ते गुलाम व कास्य देत. 14 तोगार्मा राष्ट्रातील [a] लोक तुझ्याबरोबर घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे ह्यांचा व्यापार करीत. 15 ददानी लोकसुद्धा तुझ्याशी व्यापार करीत. तू पुष्कळ ठिकाणी तुझ्या वस्तू विकत होतीस. त्या बदल्यात लोक तुला हस्तिदंत व टेंबुरणीचे लाकूड देत. 16 तुझ्याजवळ पुष्कळ चांगल्या वस्तू असल्याने अरामने तुझ्याबरोबर व्यापार केला. ते तुझ्या मालाच्या मोबदल्यात पाचू. जांभळे कापड, सुंदर वीणकाम, तागाचे उत्तम कापड, पोवळे आणि माणके देत.
17 “‘यहूदा व इस्राएल ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या वस्तूंच्या मोबदल्यात गहू. आँलिव्ह, अंजिराचा पहिला बहर, मध, तेल आणि उपशामक औषध देत. 18 दिमिष्क तुझा चांगला ग्राहक होता. तुझ्याकडील उत्तम वस्तूंसाठी त्याने तुझ्याबरोबर व्यापार केला. तुझ्या मालाच्या मोबदल्यात तो तुला हेल्बोनचा द्राक्षरस व पांढरी लोकर देत. 19 दिमिष्क तुझ्याबरोबर उसालच्या द्राक्षरसाचा व्यापार करी. त्या मोबदल्यात ते पोलाद, एक प्रकारची दालचिनी, ऊस देत. 20 ददानचा तुझ्याबरोबर खोगीराच्या कापडाचा व रपेट करावयास लागणाऱ्या घोड्यांचा मोठा व्यापार होता. 21 अरबस्तानचा व केदारच्या सर्व नेत्यांचा तुझ्याबरोबर कोकरे, एडके आणि बोकड्यांचा मोठा व्यापार होता. 22 शबा व रामा येथील व्यापारी तुझ्याबरोबर उत्तम मसाले सर्व प्रकारचे जवाहीर आणि सोने यांचा व्यापार करीत. 23 हारान, कन्रे एदेन, शबा, अश्शूर व किल्मद 24 येथील व्यापारी उंची वस्त्रे, निळ्या रंगाची वीणकाम केलेली वस्त्रे, निळ्या रंगाची वीणकाम केलेली वस्त्रे, वेगवेगळ्या रंगाचे गालिचे, घट्ट विणीचे दोर व गंधसरुच्या लाकडापासून बनविलेल्या वस्तू ह्यांचा व्यापार करीत. 25 तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल नेत.
“‘सोर, तू त्या मालवाहू जहाजाप्रमाणे आहेस.
संपत्तीने भरलेल्या समुद्रावरील जहाजाप्रमाणे आहेस.
26 तुझ्या नविकांनी तुला खोल समुद्रात नेले.
पण पूर्वेचा जोरदार वारा तुझा समुद्रातील जहाजाचा नाश करील.
27 आणि तुझी सर्व संपत्ती समुद्रात सांडले.
तुझी संपत्ती, विकायचा व विकत घेतलेला माल सर्व समुद्रात पडेल.
तुझी सर्व माणसे, नावाडी, खलाशी आणि डांबराने भेगा बुजविणारे
कारागीर समुद्रात पडतील.
तुझ्या शहरातील सर्व व्यापारी
आणि सैनिक समुद्रात बुडतील.
तुझ्या नाशाच्या दिवशीच हे घडले.
28 “‘तू, तुझ्या व्यापाऱ्यांना दुरवरच्या ठिकाणी पाठवितेस
तुझ्या खलाशाचे रडणे ऐकून ती ठिकाणे भीतीने थरथर कापतील.
29 जहाजावरील सर्व कामगार नावाडी, खलाशी,
जहाजावरुन समुद्रात उड्या घेतील व पोहून किनाऱ्याला लागतील.
30 त्यांना तुझ्या स्थितीमुळे दु:ख वाटेल ते रडतील.
ते डोक्यांत माती टाकतील, व राखेत लोळतील.
31 ते तुझ्यासाठी डोक्यावरचे सर्व केस कापतील.
शोकप्रदर्शक कपडे घालतील.
मृतासाठी करतात तसे ते तुझ्यासाठी शोक करतील.
32 “‘ते तुझ्यासाठी रडतील आणि ओक्साबोक्सी रडताना तुझ्याबद्दलचे पुढील शोकगीत गातील:
“‘सोरसारखे कुणी नाही.
सोरचा भर समुद्रात नाश झाला.
33 तुझे व्यापारी समुद्रापर करुन गेले.
तुझ्या प्रचंड संपत्तीने आणि तुझ्या मालाने तू अनेकांना तुप्त केलेस.
तू पृथ्वीवरील राजांना श्रीमंत केलेस.
34 पण आता तू समुद्र
व त्याचे खोल पाणी यामुळे फुटलीस.
तुझा माल व माणसे समुद्रात पडली.
35 समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांना तुझ्याबाबत
धक्का बसला.
त्यांचे राजे फारच घाबरले.
त्यांच्या चेहऱ्यावरुनच, त्यांना केवढा धक्का बसला आहे, ते कळते.
36 दुसऱ्या राष्ट्रांतील व्यापारी धक्का बसल्यामुळे
आपापासात कुजबुज करत आहेत.
तुझ्या बाबतीत जे काही घडले, त्यामुळे लोक भयभीत होतील.
का? कारण तुझा शेवट झाला.
तुझा शेवट झाला.’”
प्रमुख गायकासाठी “नष्ट करु नकोस” या चालीवरचे आसाफाचे स्तोत्र
75 देवा, आम्ही तुझी स्तुती करतो.
आम्ही तुझी स्तुती करतो.
तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.
2 देव म्हणतो “मी न्यायदानाची वेळ निवडली,
मी बरोबर न्याय करीन.
3 पृथ्वी आणि तिच्यावरील सारे काही थरथर कापेल
आणि पडायला येईल पण मी त्याला स्थिरता देईन.”
4-5 “काही लोक गर्विष्ठ असतात.
ते शक्तीशाली आणि महत्वपूर्ण आहेत असे त्यांना वाटते,
परंतु मी त्यांना सांगतो, ‘फुशारक्या मारु नका.
एवढे गर्विष्ठ बनू नका.’”
6 या पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीला मोठा बनवू शकेल
अशी कोणतीही शक्ती नाही. [a]
7 देव न्यायाधीश आहे. कोणी मोठे व्हायचे ते देवच ठरवतो.
देव एखाद्याला वर उचलतो आणि त्याला मोठे बनवतो.
देव एखाद्याला खाली उतरवतो आणि त्याला मोठा करत नाही.
8 देव दुष्टांना शासन करण्यास तयार आहे.
परमेश्वराच्या हातात पेला आहे.
तो पेला विषयुक्त द्राक्षारसाने भरलेला आहे.
तो तो द्राक्षारस ओतेल आणि दुष्ट लोक तो शेवटच्या थेंबापर्यंत पितील.
9 मी नेहमी लोकांना याबद्दल सांगेन.
मी इस्राएलाच्या देवाचे गुणगान करीन.
10 मी दुष्टांकडून सत्ता काढून घेईन
आणि मी चांगल्या लोकांकडे सत्ता देईन.
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे आसाफाचे स्तोत्र
76 यहुदातील लोकांना देव माहीत आहे.
इस्राएलमधील लोक देवाच्या नावाला मान देतात.
2 देवाचे मंदिर शालेममध्ये आहे.
देवाचे घर सियोन डोंगरावर आहे.
3 देवाने त्या ठिकाणी धनुष्य बाण, ढाली, तलवारी
आणि इतर शस्त्रांचा नाश केला.
4 देवा, तू ज्या डोंगरावर शत्रूचा पराभव केलास
त्या डोंगरावरुन परतताना तू वैभवशाली दिसतोस.
5 त्या सैनिकांना आपण खूप बलवान आहोत असे वाटत होते.
परंतु आता ते रणांगणावर मरुन पडले आहेत.
त्यांची शरीरे आता त्यांच्या जवळच्या वस्तू ओरबाडल्या गेल्यामुळे उघडी पडली आहेत.
या शूर सैनिकांपैकी कुणीही स्वत:चे रक्षण करु शकला नाही.
6 याकोबाचा देव त्या सैनिकांवर ओरडला
आणि ते सैन्य त्यांचा रथ आणि घोडे यांच्यासकट मरुन पडले.
7 देवा, तू भयकारी आहेस.
तू रागावतोस तेव्हा तुझ्याविरुध्द कुणीही उभा राहू शकत नाही.
8-9 परमेश्वर न्यायाधीश म्हणून उभा ठाकला.
त्याने त्याचे निर्णय जाहीर केले.
देवाने देशातल्या दीन लोकांना वाचवले त्याने स्वर्गातून निर्णय दिला.
सर्व पृथ्वी शांत आणि घाबरलेली होती.
10 तू जेव्हा दुष्टांना शिक्षा करतोस, तेव्हा देवा लोक तुला मान देतात.
तू तुझा क्रोध दाखवतोस आणि वाचलेले लोक शक्तिमान होतात.
11 लोकहो! तुम्ही तुमच्या परमेश्वराला, देवाला वचने दिलीत.
आता तुम्ही जी वचने दिलीत ती पूर्ण करा.
प्रत्येक ठिकाणचे लोक देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात.
ते देवासाठी भेटी आणतात.
12 देव मोठ्या नेत्यांचा सुध्दा पराभव करतो.
पृथ्वीवरचे सर्व राजे त्याला घाबरतात.
2006 by World Bible Translation Center