Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

M’Cheyne Bible Reading Plan

The classic M'Cheyne plan--read the Old Testament, New Testament, and Psalms or Gospels every day.
Duration: 365 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
2 शमुवेल 17

अहीथोफेलचा दावीद विषयी सल्ला

17 शिवाय अहिथोफेलने अबशालोमला सांगितले, “मला आता बाराहजार माणसांची निवड करु दे म्हणजे आज रात्रीच मी दावीदाचा पाठलाग करतो. तो थकला भागलेला असताना, भयभीत झालेला असतानाच मी त्याला पकडीन. हे पाहून त्याचे लोक पळ काढतील फक्त राजा दावीदाचा मी वध करीन. बाकीच्यांना तुझ्या समक्ष हजर करीन. तो मेल्याची खात्री झाली की सगळे लोक बिनतक्रार परत येतील.”

अबशालोम आणि इस्राएलमधील सर्व वडीलधारी मंडळी यांना हा बेत पसंत पडला. पण तरीसुध्दा अबशालोम म्हणाला, “हूशय अर्की यालाही बोलावून घ्या. त्याचे म्हणणेही मला ऐकून घ्यायचे आहे.”

हूशय अहीथोफेलचा सल्ला धुडकावतो

मग हूशय अबशालोमकडे आला. अबशालोम त्याला म्हणाला, “अहिथोफेलची योजना अशी अशी आहे. तुला त्यावर काय वाटते? तसे करावे की नाही ते सांग.”

हूशय अबशालोमला म्हणाला, “अहिथोफेलचा सल्ला आत्ता या घटकेला तरी रास्त नाही.” तो पुढे म्हणाला, “तुमचे वडील आणि त्यांच्या बाजूचे लोक चांगले बळकट आहेत हे तुम्ही जाणताच. त्यातून ते आत्ता पिल्लं हिरावून नेलेल्या रानातल्या अस्वला सारखे चिडलेले आहेत. तुमचे वडील एक कुशल योद्धा आहेत. ते भरवस्तीत रात्रभर मुक्काम करणार नाहीत. एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी ते कदाचित् गेले सुध्दा असतील त्यांना तुमच्या लोकांवर आधी हल्ला केला तर लोक ते ऐकून म्हणतील, ‘अबशालोमचे लोक हरत चाललेले दिसत आहेत.’ 10 मग तर सिंहासारख्या शूरलोकांचेही धैर्य खचेल. कारण तुमचे वडील पराक्रमी आहेत आणि त्यांच्या बाजूची माणसे शूर आहेत हे सर्वच इस्राएल लोकांना ठाऊक आहे.

11 “तेव्हा मी असे सुचवतो. तुम्ही दानपासून बैरशेबापर्यंत समस्त इस्राएल लोकांना एकत्र आणा. म्हणजे वाळवंटाप्रमाणे विशाल सैन्य तयार होईल मग तुम्ही स्वतःयुध्दात उतरा. 12 दावीद जेथे लपला असेल तेथून आम्ही त्याला धरून आणू. जमिनीवर दव पडावे तसे आम्ही त्याच्यावर तुटून पडू. दावीदाला त्याच्या बरोबरच्या माणसांसहित आम्ही ठार करु. कुणालाही सोडणार नाही. 13 पण दावीदाने एखाद्या नगरात आश्रय घेतलेला असेल तर दोरखंड आणून आम्ही सर्व इस्राएल लोकाचे ते नगर ओढून दरीत ढकलू. मग एक धोंडासुध्दा त्याठिकाणी शिल्लक राहणार नाही.”

14 अबशालोम आणि सर्व इस्राएल लोक म्हणाले, “अहिथोफेलपेक्षा हूशय अर्कीचा सल्ला श्रेयस्कर आहे.” म्हणून तो सर्वांना पसंत पडला कारण ती परमेश्वराची योजनाच होती. अबशालोमला अद्दल घडावी म्हणून अहिथोफेलचा चांगला सल्ला थोपवून कुचकामी ठरवण्याचा तो परमेश्वराचा बेत होता. अशा प्रकारे तो अबशालोमला अद्दल घडवणार होता.

हूशयचा दावीदाला सावधगिरीचा इशारा

15 हूशयने हे सर्व सादोक आणि अब्याथार या याजकांच्या कानावर घातले. अबशालोम आणि इस्राएलमधील वडील मंडळी यांना अहिथोफेलने जे सुचवले ते हूशयने या दोघांना सांगितले. तसेच आपण काय सुचवले तेही साविस्तर सांगितले. हूशय म्हणाला, 16 “आता त्वरा करा ताबडतोब दावीदा कडे निरोप जाऊ द्या. नदीच्या उताराजवळ राहू नका असे त्यांना सांगा. ताबडतोब यार्देन नदी ओलांडून जायला सांगा म्हणजे ते आणि त्यांच्या बरोबरची माणसे पकडली जाणार नाहीत.”

17 योनाथान आणि अहीमास ही याजकांची मुले एन-रोगेल येथे थांबली. त्यांना गावात शिरताना कुणी पाहू नये म्हणून एक दासी त्यांच्या कडे आली. तिने त्यांना निरोप सांगितला तो त्यांनी राजा दावीदाकडे पोचवला.

18 पण एका मुलाने योनाथान आणि अहीमास यांना पाहिलेच. हे अबशालोमला सांगायला तो धावत निघाला. योनाथान आणि अहीमास तेथून चटकन् निघाले. ते बहूरीम येथे एकाच्या घरी पोचले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती. त्यात उतरुन ते लपले. 19 त्या माणसाच्या बायकोने आडावर एक चादर पसरुन वर धान्य ओतले. त्यामुळे तिथे धान्याची रास आहे असे दिसू लागले. तेव्हा तिथे योनाथान आणि अहीमास लपले असतील अशी शंकाही कोणाला आली नाही. 20 अबशालोमकडचे नोकर त्या घरातल्या बाईकडे आले. त्यांनी योनाथान आणि अहीमासचा ठावाठिकाणा विचारला.

ते थोड्या वेळापूर्वीच ओहळ ओलांडून गेल्याचे तिने त्यांना सांगितले.

मग अबशालोमचे ते नोकर योनाथान आणि अहीमास यांच्या शोधार्थ निघाले. पण ते कुठेच न सापडल्यामुळे हे नोकर यरुशलेमला परत गेले.

21 इकडे अबशालोमचे नोकर निघून जातात, तो योनाथान आणि अहीमास विहिरीतून बाहेर पडले. तडक राजा दावीदाकडे जाऊन ते त्याला म्हणाले, “असाल तसे निघा आणि नदी ओलांडून पलीकडे जा. अहिथोफेलने तुमच्याविरुध्द असे असे सांगितले आहे.”

22 तेव्हा दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांसह यार्देन नदी ओलांडली. सूर्य वर यायच्या आत सर्वजण पलीकडे पोहोंचले होते.

अहीथोफेलची आत्महत्या

23 इस्राएल लोकांनी आपला सल्ला मानला नाही हे अहिथोफेलच्या लक्षात आले. त्याने गाढवावर खोगीर टाकले आणि आपल्या गावाकडे प्रयाण केले. घरच्यांची पुढली तरतूद केली आणि स्वतःला फास लावून घेतला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याचे त्याच्या वडीलांच्या कबरीतच दफन केले.

अबशालोम यार्देन पार करतो

24 दावीद महनाइम येथे आला. अबशालोमने सर्व इस्राएलींसमवेत यार्देन नदी ओलांडली. 25 अबशालोमने अमासा याला सेनापती केले. यवाबाची जागा अमासाने घेतली. [a] अमासा इस्राएली इथ्राचा मुलगा. अमासाची आई अबीगल. सरुवेची बहीण नाहाश हिची ही अबीगल मुलगी. (सरुवे यवाबाची आई.) 26 अबशालोम आणि त्याच्या बरोबरचे इस्राएल लोक यांनी गिलाद प्रांतात मुक्काम केला.

शोबी, माखीर आणि बर्जिल्लय

27 दावीद महनाइम येथे आला. शोबी, माखीर आणि बर्जिल्ल्य तेथेच होते. (नाहाशचा मुलगा शोबी हा अम्मोन्यांच्या राब्बा नगरातला होता. अम्मीएलचा मुलगा माखीर हा लो-दबार मधील तर बर्जिल्ल्य गिलादमधील रोगलीमचा होता.) 28-29 ते म्हणाले, “हे वाळवंटातील लोक थकले भागलेले आणि तहानलेले भुकेलेले असे आहेत.” त्यांनी दावीद आणि इतर सर्व जणांसाठी बरेचसे खायचे प्यायचे पदार्थ आणले. तसेच बिछाने, भांडीकुंडी सुध्दा ते घेऊन आले. गहू जव, कणीक, हुरडा, शेंगा, डाळी, वटाणे, मध, लोणी मेंढरे तसेच गाईच्या दुधाचे पनीर याही वस्तू त्यांनी आणल्या.

2 करिंथकरांस 10

पौल त्याच्या सेवेचे समर्थन करतो

10 ख्रिस्ताच्या नम्रतेने व सौम्यतेने मी तुम्हांला उत्तेजन देतो. मी, पौल, जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा “भित्रा” असतो पण जव्हा तुमच्यापासून दूर असतो तेव्हा “धीट” असतो! मी आशा करतो की, जेव्हा मी येतो तेव्हा, काही लोक ज्यांना असे वाटते की आम्ही जगाच्या रीतीप्रमाणे जगतो त्यांच्याबाबतीत लोक जितकी अपेक्षा करतात, तितका मी धीट असणार नाही, जितकी मी अपेक्षा करतो. कारण जरी आम्ही जगामध्ये राहत असलो, तरी जगाप्रमाणे लढाई करीत नाही. ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत. उलट, त्यांच्यामध्ये दैवी शक्ति आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात. आम्ही वाद आणि जे देवाविषयीच्या ज्ञानाविरुद्ध उभे राहते ते नष्ट करतो आणि प्रत्येक विचार पकडून त्याला ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो. आणि तुमचा आज्ञाधारकपणा पूर्ण झाल्यावर आम्ही प्रत्येक आज्ञाभंगाच्या कृतीला शिक्षा करण्यास तयार असू.

तुम्ही वरवर बघता, जर कोणी तो ख्रिस्ताचा आहे याविषयी खात्री बाळगतो तर त्याने हे लक्षात घ्यावे की जितका तो ख्रिस्ताचा आहे तितके आम्हीसुद्धा आहोत. आणि जो आमचा अधिकार प्रभुने आम्हांस खाली पाडण्यास नव्हे, तर तुमच्या वाढीसाठी दिला आहे त्याविषयी जरी काही विशेष अभिमान बाळगला, तरी मी लज्जित होणार नाही. हे मी यासाठी बोलतो की, मी माझ्या पत्राद्वारे तुम्हांला भीति घालणारा असा वाटू नये. 10 कोणी म्हणतो की, त्याची पत्रे वजनदार आणि जोरदार आहेत पण व्यक्तिश: तो प्रभावहीन आणि बोलण्यात कमकुवत असा आहे. 11 अशा लोकांना हे समजावे की, जेव्हा आम्ही नसतो तेव्हा आम्ही आमच्या पत्रात जे असतो तसे जेव्हा आम्ही प्रत्याक्षात हजर राहू आमच्या कृतीमध्ये सुद्धा असू.

12 जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात, त्यांच्याबरोबर आम्ही आपणांस समजायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वतःस स्वतःकडून मोजत असता व स्वतःची स्वतःबरोबर तुलना करीत असता बुध्दिहीन असे आहेत.

13 परंतु आम्ही आमच्या आम्हांला आखून दिलेल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी प्रशंसा करणार नाही. तर जी मर्यादा देवाने आम्हांस घालून दिली आहे, तिच्याप्रमाणे आम्ही प्रशंसा करुन घेतो. ती मर्यादा तर तुम्हापर्यंतही पोहोंचणारी आहे. 14 आमच्या अभिमान बाळगण्यामध्ये आम्ही फार दूर जात आहोत असे नाही. तसे असते तर आम्ही तुमच्याप्रत आलो नसतो. ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो. 15 आम्ही आपल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी, दुसऱ्याच्या श्रमाविषयी नावाजून घेत नाही. किंवा आम्हांला नेमून दिलेल्या कामापेक्षा जास्त करणार नाही, तर आम्हांस अशी आशा आहे की, तुमचा विश्वास वाढेल तेव्हा आम्ही आपल्या मर्यादेच्या प्रमाणात तुम्हांकडून अगदी विस्तर पावलेले असे होऊ. 16 यासाठी की, शुभवर्तमानाचा तुमच्या पलीकडील प्रदेशात प्रसार करु. कारण दुसऱ्या माणसाच्या प्रदेशात अगोदरच झालेल्या कामाविषयी अभिमान बाळगण्याचे आम्हाला काही कारण नाही. 17 पण “जो अभिमान बाळगतो, त्याने प्रभूमध्ये बाळगावा.” [a] 18 कारण जो स्वतःची प्रशंसा करतो तो योग्य नाही, पण ज्याची देव प्रशंसा करतो तो मान्य असतो.

यहेज्केल 24

भांडे व मांस

24 मला परमेश्वराचा, माझ्या देवाचा, संदेश मिळाला. परागंदा काळातील नवव्या वर्षांच्या दहाव्या महिन्याच्या (डिसेंबरच्या) दहाव्या दिवशी हा संदेश आला तो म्हणाला, “मानवपुत्रा, तू आजची तारीख व पुढील टीपण लिहून ठेव. ‘आज बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातला.’ आणि ही गोष्ट आज्ञा पाळण्यास नकार देणाऱ्यांना (इस्राएलला) सांग त्यांना पुढील गोष्टी सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो.

“‘भांडे चुलीवर ठेव.
    ते चुलीवर ठेवल्यावर त्यात पाणी ओता.
त्यात मासांचे तुकडे टाका.
    मांड्या आणि खांदे ह्याचा प्रत्येक चांगला तुकडा त्यात टाका.
त्यात निवडक हाडे भरा.
    ह्यासाठी कळपातील उत्तम जनावर निवडा.
भांड्याखाली भरपूर लाकडे टाका
    आणि मांसाचे तुकडे शिजवा.
हाडे शिजेपर्यंत रस्सा उकळवा.

“‘प्रभू, माझा परमेश्वर, असे म्हणतो.
यरुशलेमचे वाईट होईल.
    खुनी लोकांच्या नगरीला वाईट काळ येईल.
यरुशलेम गंज चढलेल्या भांड्याप्रमाणे आहे.
    ते गंजाचे डाग निघू शकत नाहीत.
    ते भांडे स्वच्छ नसल्याने, तुम्ही प्रत्येक मांसाचा तुकडा बाहेर काढा
    ते मांस खाऊ नका आणि त्या खाराब झालेल्या मांसातून काहीही याजकांना निवडू देऊ नका.
यरुशलेम गंज चढलेल्या भांड्याप्रमाणे आहे.
    का? कारण खुनांचे रक्त अजून तेथे आहे.
तिने रक्त उघड्या खडकावर पडू दिले.
    तिने ते जमिनीवर टाकून त्यावर माती टाकली नाही. [a]
मग मीही तिचे रक्त उघड्या खडकावर टाकले.
    म्हणून ते झाकले गेले नाही
निष्पाप लोकांना मारल्याबद्दल चिडून जाऊन लोकांनी तिला शिक्षा करावी, म्हणून मी असे केले.

“‘परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो
खुन्यांनी भरलेल्या नगरीचे वाईटे होईल.
    मी आग भडकविण्यासाठी खूप लाकूडफाट्याचा ढीग रचीन.
10 खूप लाकडे भांड्याखाली सारा व पेटवा.
    मांस चांगले शिजवा.
त्यात मसाले घाला हाडे जळू द्या.
11 मग रिकामेच भांडे विस्तवावर ठेवा.
    त्याच्या वरचे डाग चमकू लागेपर्यंत ते तापू द्या.
ते डाग वितळून जातील.
    गंज नष्ट होईल.

12 “‘कदाचित् यरुशलेमने तिच्यावरील डाग घासून
    काढण्यासाठी खूप मेहनत घेतली असेल.
पण तो ‘गंज’ निघणार नाही.
    फक्त आगच (शिक्षा) तो काढील.

13 “‘तुम्ही माझ्याविरुध्द वागून पाप केले
    आणि पापांनी डागाळलात.
तुम्हाला धुवुन स्वच्छ करण्याची माझी इच्छा होती.
    पण डाग निघाले नाही.
माझा क्रोधाग्नी तुझ्याबाबतीत शांत होईपर्यंत
    मी तुला स्वच्छ करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार नाही.

14 “‘मी परमेश्वर आहे. मी तुला सुनावलेली शिक्षा, तुला होईलच. मी तुला शिक्षा करायला कचरणार नाही. मला तुझ्याबद्दल वाईट वाटणार नाही. तू केलेल्या वाईट कृत्यांबद्दल मी तुला शिक्षा करीन.’ असे प्रभू, माझा परमेश्वर, म्हणाला.’”

यहेज्केलच्या पत्नीचा मृत्यू

15 मग मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, 16 “मानवपुत्रा, तू तुझ्या पत्नीवर खूप प्रेम करतोस, पण मी तिला तुझ्यापासून दूर नेत आहे. तुझी पत्नी अचानक मृत्यू पावेल. पण तू अजिबात शोक करु नकोस. तू मोठ्याने रडू नकोस. तू अश्रू गाळू नकोस. 17 पण तुझ्या दु:ख दाखविणाऱ्या खुणा तू मूकपणे केल्या पाहिजेस. मृत पत्नीसाठी मोठ्याने आक्रोश करु नकोस. तू नेहमी घालतोस, तेच कपडे तू घातले पाहिजेस. फेटा किंवा पागोटे बांध, जोडे घाल. तुझे दु:ख दाखविण्यासाठी मिशा झाकू नकोस. लोक साधारणपणे सुतकात पाठवितात, ते अन्न खाऊ नकोस.”

18 दुसऱ्या दिवशी सकाळी देवाचे म्हणणे मी लोकांना सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळी, माझी पत्नी वारली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी देवाने सांगितल्याप्रमाणे केले. 19 मग लोकांनी मला विचारले, “तू असे का करीत आहेस? ह्याचा अर्थ काय?”

20-21 मग मी त्यांना म्हणालो, “मला परमेश्वराचा संदेश मिळाला. त्याने मला इस्राएलच्या लोकांशी बोलायला सांगितले आहे. परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, ‘असे पाहा, मी माझ्या पवित्र स्थानाचा नाश करीन. तुम्हाला त्या स्थानाचा अभिमान वाटतो व तुम्ही त्याची स्तुतिस्तोत्रे गाता. तुम्हाला ते स्थान पाहायला फार आवडते. पण मी त्या स्थानाचा नाश करीन आणि तुम्ही मागे ठेवलेली तुमची मुले लढाईत मारली जातील. 22 पण मी माझ्या पत्नीच्या मृत्यूच्या वेळी जसे वागलो, तसेच तुम्ही वागा. तुमचे दु:ख प्रदर्शित करण्यासाठी मिशा झाकू नका. साधारणपणे सुतकात खातात, ते अन्न खाऊ नका. 23 पागोटी बांधा व जोडे घाला. तुमचे दु:ख बाहेर दाखवू नका. रडू नका. पण तुम्ही तुमच्या पापांमुळे झिजत जाल. तुम्ही मुकाट्याने एकमेकाजवळ उसासे टाकाल. 24 यहेज्केल, हे तुमच्यापुढे एक उदाहरण आहे. त्याने केले तेच तुम्ही कराल. शिक्षेची वेळ येईल. मगच तुम्हाला मी परमेश्वर आहे हे कळेल.’”

25-26 “मानवपुत्रा, ती सुरक्षित जागा (यरुशलेम) मी लोकांकडून काढून घेईन. ते सुंदर ठिकाण त्यांना आनंद देते. त्यांना ते ठिकाण पाहायला आवडते. त्यांना ते खरोखरच प्रिय आहे. पण त्या वेळी, मी लोकांकडून ती नगरी आणि त्यांची मुले काढून घेईन. वाचलेला एकजण यरुशलेमबद्दल वाईट बातमी घेऊन तुझ्याकडे येईल. 27 त्या वेळी, तू त्या माणसाशी बोलू शकशील. तू अजिबात गप्प बसणार नाहीस. अशा रीतीने, तू त्यांना एक उदाहरण ठरशील मगच त्यांना मी देव आहे हे समजेल.”

स्तोत्रसंहिता 72

शलमोनासाठी स्तोत्र

72 देवा, तू राजाला तुझ्यासारखे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर.
    आणि राजाच्या मुलाला तुझ्या चांगुलपणा विषयी शिकायला मदत कर.
तुझ्या लोकांना चांगला न्याय मिळावा म्हणून राजाला मदत कर
    तुझ्या गरीब लोकांसाठी चांगले आणि शहाणपणाचे निर्णय घेण्यासाठी त्याला मदत कर.
पृथ्वीवर सगळीकडे शांती,
    आणि न्याय नांदू दे.
राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे.
    त्याला असहाय लोकांना मदत करु दे.
    त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे.
जो वर सूर्य चमकतो आहे आणि चंद्र आकाशात आहे तोवर लोकांनी राजाला मान द्यावा आणि त्याची भीती बाळगावी असे मला वाटते.
    लोक त्याला सदैव मान देतील आणि त्याची भीती बाळगतील अशी आशा मी करतो.
राजाला शेतात पडणाऱ्या पावसासारखे असू दे,
    त्याला पृथ्वीवर पडणाऱ्या पर्जन्यासारखे असू दे.
तो जो पर्यंत राजा आहे तो पर्यंत चांगुलपणा उमलू दे.
    जो पर्यंत चंद्र आहे तो पर्यंत शांती नांदू दे.
त्याचे राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत
    आणि युफ्रेटस नदीपासून पृथ्वीच्या दुसऱ्या टोकापर्यत वाढू दे. [a]
वाळवंटात राहाणाऱ्या सर्व लोकांना त्याच्या समोर मुजरे करु दे.
    त्याच्या सर्व शत्रूंना त्याच्यापुढे घाणीत तोंड घालून मुजरे करु दे.
10 तार्शीशच्या आणि दूरदूरच्या देशांच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणू दे.
    शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी खंडणी आणू दे.
11 सगळ्या राजांना आमच्या राजासमोर मुजरे करु दे
    सगळी राष्ट्रे त्याच्या सेवेत राहू दे.
12 आमचा राजा असहाय्याला मदत करतो.
    आमचा राजा गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करतो.
13 गरीब आणि असहाय्य लोक त्याच्यावर अवलंबून असतात.
    राजा त्यांना जिवंत ठेवतो.
14 जे दुष्ट लोक त्यांना दु:ख द्यायचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून राजा त्यांना वाचवतो.
    राज्याला त्या गरीबांचे आयुष्य खूप मोलाचे वाटते.
15 राजा चिरायु होवो!
    आणि त्याला शबाकडून सोने मिळू दे.
राज्यासाठी नेहमी प्रार्थना करा,
    त्याला रोज आशीर्वाद द्या.
16 शेतात खूप धान्य पिकू द्या,
    डोंगरावरही खूप धान्य उगवू द्या.
शेती लबानोन मधील शेतीसारखी सुपीक होऊ द्या
    आणि शहरे गवताने भरलेल्या शेतासारखी माणसांनी भरु द्या.
17 राजाला सदैव प्रसिध्द होऊ द्या.
    जो पर्यंत सूर्य तळपतो आहे तो पर्यत लोकांना त्याची आठवण राहू द्या.
त्याला लोकांना आशीर्वाद देऊ द्या
    आणि लोकांना त्याला आशीर्वाद देऊ द्या.

18 परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा.
    फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो.
19 त्याच्या गौरवपूर्ण नावाची सदैव स्तुती करा.
    त्याच्या गौरवाने सारे जग भरु द्या.
आमेन आमेन.

20 (इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या.)

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center