M’Cheyne Bible Reading Plan
सीबा दावीदाला भेटतो
16 जैतूनच्या डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती. दोनशे पाव, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते. 2 राजा दावीदाने “हे सर्व कशासाठी?” म्हणून सीबाला विचारले
सीबा म्हणाला, “राजाच्या कुटुंबियांना बसण्यासाठी म्हणून ही गाढवे आहेत. पाव आणि फळे नोकरांना खाण्यासाठी आणि वाळवंटात चालून थकलेल्यांसाठी हा द्राक्षारस आहे.”
3 राजाने त्याला मफिबोशेथाचा ठावाठिकाणा विचारला.
सीबाने सांगितले, “मफिबोशेथ यरुशलेममध्येच आहे. कारण ‘आता माझ्या आजोबांचे राज्य मला इस्राएली परत देतील’ असे त्याला वाटते.”
4 तेव्हा राजा सीबाला म्हणाला, “ठीक आहे, जे जे मफिबोशेथच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे.”
सीबा म्हणाला, “मी आपल्या पाया पडतो. मी तुम्हाला आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो.”
शिमी दावीदाला शाप देतो
5 पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी. तो दावीदाला पुन्हा पुन्हा शिव्याशाप देत चालला होता.
6 त्याने दावीदावर आणि त्याच्या सेवकांवर दगडफेक करायला सुरवात केली. पण इतर लोकांनी आणि सैनिकांनी चहूकडून दावीदाला वेढा घातला. 7 शिमी दाविदला शाप देतच होता, “चालता हो, तोंड काळं कर इथून. तू खूनी आहेस! 8 देव तुला शासन करीत आहे. कारण शौलाच्या घरातील लोकांना तू मारलेस. त्याचे राज्य बळकावलेस. पण ते राज्य परमेश्वराने तुझा मुलगा अबशालोम याच्या हवाली केले आहे. तुझे आता हाल होत आहेत कारण तू खुनी आहेस.”
9 सरुवेचा मुलगा अबीशय राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्यासारख्या नगण्य माणसाने तुम्हाला शिव्याशाप द्यावेत म्हणजे काय? स्वामी, मला त्याचा शिरच्छेद करु द्या.”
10 पण राजा त्याला म्हणाला, “सरुवेच्या मुलानो, मी काय करु? शिमी मला शाप देत आहे. पण परमेश्वरानेच त्याला तसे करायला सांगितले आहे.” 11 अबीशयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, “माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जिवावर उठला आहे. बन्यामीनच्या वंशातील या शिमीला तर मला मारायचा हक्कच आहे. त्याला हवे ते म्हणू द्या. देवानेच त्याला तशी बुध्दी दिली आहे. 12 माझ्याबाबतीत घडणारे हे अन्याय कदाचित् परमेश्वर पाहील आणि शिमीच्या या शिव्याशापाच्या बदल्यात उद्या तो माझे भलेच करील.”
13 दावीद आणि त्याच्या बरोबरचे लोक मग आपल्या वाटेने तसेच पुढे गेले. शिमी त्यांच्या मागोमाग जात राहिला. डोंगराच्या कडेने तो दुसऱ्या बाजूने जात होता. तो दाविदाबद्दल खूप वाईट गोष्टी बोलत होता. दावीदावर तो दगड आणि मातीही फेकत होता.
14 राजा दावीद आणि बरोबरचे सर्व लोक यार्देन नदीजवळ आले. दमल्यामुळे ते तेथे विश्रांतीला थांबले. म्हणून त्यांनी विसावा घेतला व ते ताजेतवाने झाले.
15 अबशालोम, अहिथोफेल आणि इस्राएलचे सर्व लोक यरुशलेम येथे आले. 16 दावीदाचा मित्र हूशय अर्की अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, “राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो.”
17 अबशालोम त्याला म्हणाला, “तू आपल्या मित्राची, दावीदाची साथ का सोडलीस? तुही त्याच्याबरोबर यरुशलेम का सोडले नाहीस?”
18 हूशय म्हणाला, “परमेश्वर ज्याची निवड करेल त्याला माझा पाठिंबा आहे. या आणि इस्राएल लोकांनी आपली निवड केली आहे. म्हणून मी तुमच्या बाजूचा आहे. 19 पूर्वी मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो. आता त्यांच्या मुलाची सेवा केली पाहिजे. मी तुमची सेवा करीन.”
अबशालोम अहीथोफेलचा सल्ला मागतो
20 अबशालोमने अहिथोफेलला विचारले “आम्ही काय करावे ते सांग.”
21 अहिथोफेल त्याला म्हणाला, “घराची राखण करायला तुझ्या वडीलांनी त्यांच्या दासी येथेच ठेवल्या आहेत. त्यांच्याशी तू संबंध ठेव मग तुझ्या वडीलांना तुझा तिरस्कार वाटतो ही गोष्ट सर्व इस्राएलांमध्ये पसरेल. त्यामुळे त्या सर्वांचा तुला पाठींबा मिळेल.”
22 मग सर्वांनी घराच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या दासींशी लैंगिक संबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली. 23 अहिथोफेलचा सल्ला दावीद आणि अबशालोम या दोघांनाही उपयोगी पडला. लोकांना त्याचे म्हणणे देवाच्या शब्दा इतके महत्वाचे वाटले.
ख्रिस्ती बांधवांकरिता मदत
9 या संताच्या सेवेसाठी मी तुम्हांला काही लिहावे याची गरज भासत नाही. 2 कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे. आणि मी मासेदोनियातील लोकांना याविषयी अभिमानाने सांगत होतो की, गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या जोशामुळे पुष्कळ जण कृति करण्यास आवेशाने पुढे आले आहेत. 3 परंतु मी भावांना यासाठी पाठवीत आहे की, आमचा तुमच्याविषयी या बाबतीत अभिमान पोकळ ठरु नये. पण जसे आम्ही तुम्हांला सांगितले तसे तुम्ही तयार असावे. 4 कारण कोणी मासेदोनियाचा मनुष्य माझ्याबरोबर आला, आणि जर त्याने तुम्हांला तयार नसलेले पाहिले, तर तुम्ही लज्जित व्हाल असे आम्हाला म्हणायचे नाही. तर आम्ही लज्जित होऊ. 5 म्हणून मला हे आवश्यक आहे की, बंधूनी आम्हांला आगाऊ भेट देण्यासाठी त्यांना विंनति करावी आणि उदार देणगी जी तुम्ही देण्याचे अभिवचन दिले आहे, तिच्याविषयीची व्यावस्था संपवावी. मग ती उदारहस्ते दिलेली देणगी ठरेल व कुरकुर करीत दिलेले दान ठरणार नाही.
6 हे लक्षात ठेवा: जो हात राखून पेरतो तो त्याच मापाने कापणी करील, आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच मापाने कापणी करील. 7 प्रत्येक माणसाने अंतःकरणात ठरविल्याप्रमाणे द्यावे, खेदाने किंवा बळजबरीने देणे भाग पडते म्हणून देऊ नये. कारण आनंदाने देणाऱ्यावर देव प्रेम करतो. 8 आणि देव तुम्हाला कृपेने विपुल देण्यास समर्थ आहे. यासाठी की सर्व गोष्टीत सर्व वेळी, तुम्हांला विपुलता मिळेल आणि चांगल्या कामसाठी अधिक तत्पर व्हाल. 9 असे लिहिले आहे:
“तो गरीबांना उदारहस्ते देतो,
त्याची दया अनंतकाळपर्यंत राहील.” (A)
10 जो पेरणाऱ्याला बी व खाणऱ्याला अन्न पुरवितो, तो तुम्हाला पेरायला बी पुरवील आणि ते अनेकपट करील. आणि तुमच्या नीतिमत्वाची फळे वाढवील. 11 सर्व प्रकारच्या उदारपणाकरिता प्रत्येक गोष्टीत धनवान व्हाल. यामुळे तुम्हीदेखील उदारपणे द्यावे ज्यामुळे देवाची स्तुति होईल.
12 कारण या अर्पणकार्याची ही सेवा संताच्या गरजा पुरविते. इतकेच केवळ नाही तर देवाला अनेक गोष्टी दिल्याने विपुलता येते. 13 कारण या सेवेमुळे तुम्ही स्वतःला योग्य शाबित करता, आणि ते देवाचे गौरव करतात, तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता त्या ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाला अधीन असल्याने तुमचे स्वीकारणे. 14 आणखी ते तुम्हाकरिता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे, त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात. 15 देवाच्या अनिर्वाच्य देणग्यांबद्दल त्याचे आभार मानतो.
23 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, शोमरोन व यरुशलेम ह्यांची गोष्ट ऐक, दोन बहिणी होत्या. त्यांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतला होता. 3 त्या अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, मिसरमध्ये, वेश्या झाल्या. मिसरमध्ये, त्यांनी प्रथम प्रियाराधन केले आणि पुरुषांना स्तनाग्रांना स्पर्श करु दिला व आपली स्तने त्यांच्या हाती दिली. 4 त्यातील थोरल्या बहिणीचे नाव अहला व धाकटीचे अहलीबा असे होते. त्या व वाहिणी माझ्या पत्नी झाल्या आम्हाला मुले झाली. (खरे म्हणजे अहला म्हणजेच शोमरोन व अहलीबा म्हणजे यरुशलेम होय.)
5 “मग अहलाने माझा विश्वासघात केला-ती वेश्येसारखी वागू लागली. तिला प्रियकर हवेसे वाटू लागले. तिने अश्शूरच्या सैनिकांना 6 निळ्या गणवेषांत पाहिले. ते सर्व तरुण, हवेसे वाटणारे. घोडेस्वार होते. ते नेते व अधिकारी होते. 7 अहलाने स्वतःत्या सर्वांच्याबरोबर व्यभिचार केला. ते सर्व अश्शूरच्या सैन्यातील निवडक सैनिक होते. तिला ते सर्व हवे होते. त्यांच्या अंमगळ मूर्तींबरोबर तीही अमंगळ झाली. 8 ह्या व्यतिरिक्त, तिने आपले मिसरबरोबरचे प्रेम प्रकाश चालूच ठेवले. ती अगदी तरुण असतानाच मिसरने तिच्याबरोबर प्रियाराधन केले होते. तिच्या कोवळ्या स्तनांना स्पर्श करणारा पहिला प्रियकर मिसरच होय. मिसरने आपले खोटे प्रेम तिच्यावर ओतले. 9 मी तिच्या प्रियकरांना तिच्या बरोबर व्यभिचार करु दिला. तिला अश्शुरी पाहिजे होते, म्हणून मी तिला त्यांच्या स्वाधीन केले. 10 त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी तिची मुले घेतली. आणि तलवारीने तिला ठार केले. त्यांनी तिला शिक्षा केली. तिचे नाव सर्व स्त्रियांच्या तोंडी अजूनही आहे.
11 “तिच्या धाकट्या बहिणीने अहलीबाने हे सर्व पाहिले, पण तिने आपल्या बहिणीपेक्षा जास्त पापे केली. ती अहलापेक्षा जास्त विश्वासघातकी होती. 12 तिलाही अश्शुरी नेते व अधिकारी हवे होते. निळ्या गणवेषातील ते घोडेस्वार तिला हवेसे वाटले. ते कामना करण्यास योग्य असेच तरुण होते. 13 सारख्याच चुका करुन, दोन्ही स्त्रिया, स्वतःच्या आयुष्याचा नाश करुन घेत आहेत, हे मला दिसले.
14 “अहलीबा माझा विश्वासघात करीतच राहिली. बाबेलमध्ये, भिंतीवर कोरलेली पुरुषांची चित्रे तिने पाहिली. ती लाल गणवेष घातलेल्या खास्दी पुरुषांची चित्रे होती. 15 त्यांनी कमरेला पट्टे बांधले होते आणि डोक्याला लांब फेटे बांधले होते. ते सर्व अतीरथीप्रमाणे दिसत होते. ते सर्व मूळच्या खास्द्यांप्रमाणे दिसत होते. 16 अहलीबा त्यांच्यावर आसक्त झाली. 17 म्हणून ते बाबेलचे पुरुष समागम करण्यासाठी तिच्या शृंगारलेल्या शय्येवर गेले. त्यांनी तिला भोगले आणि इतकी घाणेरडी, अमंगळ केले की तिला त्यांची घृणा वाटू लागली.
18 “अहलीबाने आपली बेईमानी सर्वांना पाहू दिली. तिने आपल्या नग्न शरीराशी अनेक पुरुषांना मौज करु दिली. त्यामुळे तिच्या बहिणीप्रमाणे मला तिचीही अतिशय घृणा वाटू लागली. 19 तिने पुन्हा पुन्हा माझा विश्वासघात केला. मग तिला मिसर बोररच्या तिच्या ऐन तारुण्यातील प्रेम प्रकरणाची आठवण झाली. 20 गाढवासारखे इंद्रिय व घोड्यासारखा वीर्यसाठा असलेल्या प्रियकराची तिला आठवण झाली.
21 “अहलीबा, तू तरुण होतीस तेव्हा तुझा प्रियकर तुझ्या स्तनाग्रांना स्पर्श करी व तुझे स्तन हातात धरी, त्याची तुला स्वप्ने पडू लागली. 22 म्हणून, अहलीबा, परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो ‘तुला तुझ्या प्रियकरांची किळस वाटते. पण मी त्यांना येथे आणीन. ते तुझ्याभोवती कोंडाळे करतील. 23 बाबेलच्या पुरुषांना विशेषतः खास्द्यांना मी येथे आणीन. पकोड, शोआ येथील पुरुषांनाही आणीन आणि अश्शुरींना ही आणीन. त्या सर्व हवेसे वाटणाऱ्या तरुण नेत्यांना, अधिकाऱ्यांना, अतीरथींना व निवडक घोडेस्वारांना मी येथे आणीन. 24 ह्या लोकांचा जथा तुझ्याकडे येईल. ते घोड्यांवर स्वार होऊन वा रथांतून तुझ्याकडे येतील. ते पुष्कळजण असतील. त्यांच्याजवळ भाले, ढाली, शिरस्त्राणे असतील, ते तुझ्याभोवती जमतील. तू माझ्याशी कसे वागलीस, हे मी त्यांना सांगीन. मग ते त्यांच्या परीने तुला शिक्षा करतील. 25 मी किती इर्ष्यावान आहे, ते मी तुला दाखवीन. ते सर्व खूप संतापून तुझा समाचार घेतील. ते तुझे नाक, कान कापतील. तलवारीने तुला ठार करतील. ते तुझी मुले घेतील आणि तुझे असेल नसेल ते सर्व ते जाळतील. 26 ते तुझी उंची वस्त्रे व दागिने घेतील. 27 मिसरबरोबरच्या प्रेम प्रकराणाच्या स्वप्नांचा मी चुराडा करीन. तू पुन्हा त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाहीस. तू पुन्हा कधीही मिसरची आठवण काढणार नाहीस.’”
28 परमेश्वराने, माझ्या देवाने, पुढील गोष्टी सांगितल्या. “तू ज्यांची घृणा करतेस, त्यांच्याच ताब्यात मी तुला देत आहे. तुला ज्यांची किळस वाटते, त्यांच्याच स्वाधीन मी तुला करीत आहे. 29 ते तुझा किती तिरस्कार करतात हे ते तुला दाखवून देतील. तू मिळविलेली प्रत्येक गोष्ट ते काढून घेतील. ते तुला उघडी नागडी करतील. लोकांना तुझी पापे स्पष्ट दिसतील. तू वेश्येप्रमाणे वागलीस आणि दुष्ट स्वप्ने पाहिलीस हे त्यांना कळेल. 30 दुसऱ्या राष्ट्रांच्या मागे लागून तू माझा त्याग केलास आणि ह्या वाईट गोष्टी केल्यास. त्या अमंगळ मूर्तींना पूजायाला तू सुरवात केलीस तेव्हाच ही दुष्कृत्ये तू केलीस. 31 तू तुझ्या बहिणीमागून गेलीस आणि तिच्याप्रमाणे वागलीस. तू तिचा विषाचा प्याला स्वतःच्या हातात घेतलास, तूच तुझ्या शिक्षेल कारणीभूत आहेस.” 32 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो.
“तुझ्या बहिणीचा विषाचा पेला तू पिशील.
तो पेला खूप मोठा आहे.
त्यात खूप विष (शिक्षा) मावते.
लोक तुला हसतील व तुझी चेष्टा करतील.
33 तू दारुड्याप्रमाणे झोकांड्या खाशील.
तू खूप दु:खी होशील.
तो विद्ध्वंस व नाश यांनी
भरलेला पेला आहे.
तुझ्या बहिणीने प्यायला,
तसाच हा पेला (शिक्षा) आहे.
34 तू त्या पेल्यातील विष पिशील.
तू शेवटचा थेंबसुद्धा पिशील.
तू पेला फेकून देशील
व त्याचे तुकडे तुकडे होतील.
तू वेदनेने स्वतःचेच स्तन उपटून काढशील.
असेच घडेल कारण मी परमेश्वर व प्रभू आहे
आणि मीच ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
35 “म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो ‘यरुशलेम, तू मला विसरलीस. तू मला दूर ढकललेस. मला मागे ठेवले तेव्हा माझा त्याग केल्याबद्दल आणि वेश्येप्रमाणे वागल्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. तुझ्या दुष्ट स्वप्नांमुळे आणि दुराचारामुळे तुला भोग भोगलेच पाहिजेत.’”
अहला व अहलीबा यांचा न्यायनिवाडा
36 परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू अहला व अहलीबा यांचा न्यायनिवाडा करशील का? मग त्यांनी केलेल्या भयंकर गोष्टीबद्दल त्यांना सांग. 37 त्यांनी व्याभिचाराचे पाप केले आहे. खुनाचा अपराध त्यांनी केला आहे. त्या वेश्येप्रमाणे राहिल्या. त्या अमंगळ मूर्तीसाठी त्यांनी माझा त्याग केला. त्यांना माझ्यापासून झालेल्या मुलांना त्यांनी बळजबरीने आगीतून जायला लावले. त्यांच्या घाणेरड्या मूर्तींना अन्न देण्यासाठी त्यांनी हे सर्व केले. 38 त्यांनी माझे मंदिर अशुद्ध केले आणि माझ्या सुटृ्यांचे खास दिवस भ्रष्ट केले. 39 त्यांच्या मूर्तींना बळी देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलांना ठार मारले. ते माझ्या पवित्र स्थळी गेले आणि ते स्थळ त्यांनी अपवित्र केले. त्यांनी हे कृत्य माझ्या मंदिरात केले.
40 “निरोपे पाठवून त्यांनी दूरदूरच्या पुरुषांना बोलाविले, ते पुरुष त्यांना भेटायला आले. त्यांच्यासाठी तुम्ही स्नान केले, डोळ्यात काजळ घातले, अलंकार घातले. 41 तुम्ही सुंदर शय्येवर बसलात व पुढे टेबल ठेवून त्यावर माझा धूप व तेल ठेवलेत.
42 “पुष्कळ लोकांची मेजवानी सुरु असल्याप्रमाणे यरुशलेममधून आवाज आला. मेजवानीस खूप लोक जमले. वाळवंटाकडून येणारे आधीपासूनच मद्य प्राशन करीत होते. त्यांनी स्त्रियांना बांगड्या व मुकुट दिले. 43 तेव्हा व्यभिचाराच्या पापाने कंटाळलेल्या एका स्त्रीशी मी बोललो. मी तिला विचारले, ‘ते तुझ्याशी व तू त्यांच्याशी असेच व्यभिचाराचे पाप करीत राहणार का?’ 44 पण वेश्येकडे जावे, तसे ते तिच्याकडे जातच राहिले. खरेच! ते पुन्हा पुन्हा अहला व अहलीबा या दुष्ट स्त्रियांकडे जातच राहिले.
45 “पण सज्जन लोक त्यांना अपराधी ठरवितील. त्या स्त्रियांचा व्यभिचार व खून या अपराधांबद्दल ते त्यांचा न्यायनिवाडा करतील. का? कारण अहला व अहलीबा यांनी व्याभिचार तर केला आहेच, पण त्यांनी मारलेल्या लोकांचे रक्त अजून त्यांच्या हाताला लागले आहे.”
46 परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “लोकांना एकत्र करा. मग त्या लोकानाच अहला व अहलीबा यांना शिक्षा करु द्या. लोकांचा जमाव त्यांना शिक्षा करील व त्या दोघींची चेष्टा करील. 47 मग जमाव त्यांना दगडाने ठेचून मारील. मग तलवारीने तो त्यांचे तुकडे तुकडे करील त्यांच्या मुलांनाही जमाव मारील व त्यांची घरे जाळील. 48 अशा रीतीने, ह्या देशावरचा कलंक मी घालवतो. तुमच्यासारख्या लज्जास्पद गोष्टी न करण्याचा इशारा इतर स्त्रियांना मिळेल. 49 तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल ते तुम्हाला शिक्षा करतील. तुमच्या अमंगळ मूर्तींची पूजा केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा होईल. मग तुम्हाला मीच परमेश्वर व प्रभू असल्याचे कळेल.”
प्रमुख गायकासाठी लोकांना आठवण देण्यासाठी लिहिलेले दावीदाचे एक स्तोत्र.
70 देवा, माझा उध्दा्र कर.
देवा लवकर ये आणि मला मदत कर.
2 लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत,
त्यांची निराशा कर त्यांची मानखंडना कर.
लोकांना माझ्या बाबतीत वाईटगोष्टी करायच्या आहेत
ते पडावेत आणि त्यांना लाज वाटावी असी माझी इच्छा आहे.
3 लोकानी माझी चेष्टा केली त्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी
आणि त्यांना शरम वाटावी अशी मला आशा वाटते.
4 जे लोक तुझी उपासना करतात,
ते खूप खूप सुखी व्हावेत असे मला वाटते.
ज्या लोकांना तुझी मदत हवी आहे
त्या लोकांना नेहमी तुझी स्तुती करणे शक्य होईल अशी मला आशा वाटते.
5 मी गरीब आणि असहाय्य माणूस आहे.
देवा, लवकर ये आणि मला वाचव.
देवा, फक्त तूच माझी सुटका करु शकतोस.
उशीर करु नकोस.
71 परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
2 तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील.
तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.
3 माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो,
तू माझे सुरक्षित ठिकाण माझा खडक आहेस.
तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे.
4 देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव.
मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.
5 प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच
तुझ्यावर विश्वास टाकला आहे.
6 जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे
मी माझ्या आईच्या शरीरात होतो
तेव्हा पासूनच तुझ्यावर विसंबून होतो मी नेहमीच तुझी प्रार्थना केली.
7 तू माझ्या शक्तीचा ठेवा आहेस म्हणून,
मी दुसऱ्यांसाठी एक उदाहरण झालो.
8 तू केलेल्या अद्भुत गोष्टींचे मी नेहमी गुणगान करीत असतो.
9 केवळ मी आता म्हातारा झालो आहे म्हणून मला दूर लोटू नकोस,
माझी शक्ती क्षीण होत असताना मला सोडून जाऊ नकोस.
10 माझ्या शंत्रूंनी माझ्याविरुध्द योजना आखल्या आहेत.
ते लोक खरोखरच एकत्र आले, भेटले आणि मला मारण्याची योजना त्यांनी आखली.
11 माझे शत्रू म्हणाले, “जा त्याला पकडा देवाने त्याला सोडले आहे
आणि कोणीही माणूस त्याला मदत करणार नाही.”
12 देवा, मला सोडून जाऊ नकोस.
देवा, त्वरा कर! ये आणि मला वाचव.
13 माझ्या शत्रूंचा पराभव कर.
ते मला इजा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यांना त्याबद्दल लाज वाटावी अशी माझी इच्छा आहे.
14 नंतर मी तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवीन
आणि मी तुझी जास्त स्तुती करीन.
15 तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन,
तू जेव्हा जेव्हा मला वाचवलेस त्याबद्दलही मी सांगेन.
ते प्रसंग मोजता न येण्याइतके अगणित होते.
16 मी तुझ्या मोठेपणाबद्दल सांगेन, परमेश्वरा,
माझ्या प्रभु मी केवळ तुझ्याबद्दल आणि तुझ्या चांगुलपणाबद्दल बोलेन.
17 देवा, तू मला मी लहान मुलगा होतो तेव्हापासून शिकवीत आहेस
आणि आजच्या दिवसापर्यंत मी लोकांना तू करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगितले.
18 आता मी म्हातारा झालो आहे आणि माझे केस पांढरे झाले आहेत.
पण देवा, तू मला सोडून जाणार नाहीस हे मला माहीत आहे.
मी प्रत्येक नव्या पिढीला तुझ्या सामर्थ्याबद्दल
आणि महानतेबद्दल सांगेन.
19 देवा, तुझा चांगुलपणा आकाशापेक्षाही उंच आहे.
देवा, तुझ्यासारखा देव कुठेही नाही.
तू अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
20 तू मला संकटे आणि वाईट काळ दाखविलास
परंतु तू मला त्या प्रत्येकातून वाचविलेस आणि मला जिवंत ठेवलेस.
मी कितीही खोल बुडालो तरी तू मला माझ्या संकटांतून वर खेचलेस.
21 पूर्वीपेक्षाही महान गोष्टी करण्यास मला मदत कर.
माझे सांत्वन करणे चालूच ठेव.
22 आणि मी तंतुवाद्य वाजवून तुझी स्तुती करीन.
देवा, तुझ्यावर विश्वास टाकणे शक्य आहे असे गाणे मी गाईन.
माझ्या तंतुवाद्यावर मी इस्राएलाच्या पवित्र देवासाठी गाणी वाजवीन.
23 तू माझ्या आत्म्याचा उध्दार केलास.
माझा आत्मा आनंदी होईल.
मी माझ्या ओठांनी स्तुतिगीते गाईन.
24 माझी जीभ नेहमी तुझ्या चांगुलपणाची गाणी गाईल आणि
ज्या लोकांना मला ठार मारायची इच्छा होती त्यांचा पराभव होईल आणि ते कलंकित होतील.
2006 by World Bible Translation Center