M’Cheyne Bible Reading Plan
अबशालोमची अनेकांशी मैत्री
15 यानंतर अबशालोमने स्वतःसाठी रथ आणि घोड्यांची तजवीज केली. तो रथातून जात असताना पन्नास जणांचा ताफा त्याच्यापुढे धावत असे. 2 रोज लौकर ऊठून सकाळीच तो वेशीपाशी जाई आपल्या अडचणी घेऊन निवाड्यासाठी राजाकडे जायला निघालेल्या लोकांना भेटून त्यांच्याशी बोले. चौकशी करुन तो विचारी, “तू कोणत्या शहरातून आलास?” तो सांगत असे. “मी इस्राएलच्या अमुक अमुक वंशातला” 3 तेव्हा अबशालोम म्हणे, “तुमचे म्हणणे खरे आहे, पण राजा तुमच्या अडचणीत लक्ष घालणार नाही.”
4 अबशालोम पुढे म्हणे, “मला कोणी येथे न्यायाधीश म्हणून नेमले तर किती बरे होईल. तसे झाले तर फिर्याद घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मी मदत करु शकेन. यांच्या प्रकरणांना मी न्याय देऊ शकेन.”
5 अशावेळी कोणी त्याच्याजवळ येऊन त्याला आभिवादन करु लागला तर अबशालोम त्या माणसाला मित्रासारखी वागणूक देई. आपला हात पुढे करुन तो त्याला स्पर्श करी. त्याचे चुंबन घेई. 6 राजा दावीदाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्व इस्राएलांना तो असेच वागवी. असे वागून त्याने सर्व इस्राएलांची मने जिंकली.
दावीदाचे राज्य हस्तगत करण्याची अबशालोमची योजना
7 पुढे चार वर्षानी [a] अबशालोम राजा दावीदाला म्हणाला, “हेब्रोनमध्ये मी परमेश्वराला नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ दे. 8 अराममधील गशूर येथे राहात असताना मी तो बोललो होतो. परमेश्वराने मला पुन्हा यरुशलेमला नेले तर मी परमेश्वराच्या विशिष्ट सेवेला वाहून घेईन असे मी बोललो होतो”
9 तेव्हा राजा दावीदाने त्याला निश्चिंत होऊन जाण्यास सांगितले.
अबशालोम हेब्रोन येथे आला. 10 पण त्याने इस्राएलच्या सर्व वंशामध्ये हेर पाठवून लोकांना कळवले, “रणशिंग फुंकल्याचे ऐकल्यावर ‘अबशालोम हेब्रोनचा राजा झाला आहे’ असा तुम्ही घोष करा.”
11 अबशालोमने स्वतःबरोबर दोनशे माणसे घेतली. यरुशलेम सोडून ती त्याच्या बरोबर निघाली. पण त्यांना त्याच्या बेताची कल्पना नव्हती. 12 अहिथोफेल हा तेव्हा दावीदाचा एक सल्लागार होता. हा गिलो या गावाचा होता. यज्ञ करत असताना अबशालोमने अहिथोफेलला गिलोहून बोलावून घेतले. सर्व काही अबशालोमच्या योजने प्रमाणे सुरळीत चालले होते. त्याला अधिकाधिक पाठिंबा मिळत होता.
अबशालोमच्या बेताचा राजाला सुगावा लागतो
13 एकाने दावीदाकडे येऊन वर्तमान सांगितले की इस्राएलच्या लोकांचा कल अबशालोमकडे झुकत आहे.
14 तेव्हा यरुशलेममध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दावीद म्हणाला, “आता आपण पळ काढला पाहिजे. आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू. त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निघून जाऊ. नाही तर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही. यरुशलेमच्या लोकांना तो मारून टाकेल.”
15 तेव्हा राजाचे सेवक त्याला म्हणाले, “तुम्ही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत.”
दावीद आपल्या लोकांसह निसटतो
16 आपल्या कुटुंबातील सर्वांसह राजा बाहेर पडला. आपल्या दहा उपपत्न्यांना त्याने घराचे रक्षण करायला म्हणून मागे ठेवले. 17 राजा आणि त्याच्यामागोमाग सर्व लोक निघून गेले. अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले 18 त्याचे सर्व सेवक तसेच एकूणएक करथी, पलेथी आणि (सहाशे गित्ती) राजामागोमाग चालत गेले.
19 गथ येथील इत्तयला राजा म्हणाला, “तू ही आमच्याबरोबर कशाला येतोस? मागे फिर आणि नवीन राजा अबशालोम याला साथ दे. तू परकाच आहेस ही तुझी माय भूमी नव्हे. 20 तू कालच येऊन मला मिळालास. आम्ही वाट फुटेल तिकडे जाणार. तू कशाला भटकंत फिरतोस? तेव्हा तुझ्या बांधवांसह परत फिर. तुला प्रेमाची आणि न्यायाची वागणूक मिळो.”
21 पण इत्तय राजाला म्हणाला, “परमेश्वराची शपथ, तुम्ही जिवंत असेपर्यंत मी तुमची साथ सोडणार नाही. आता जगणे, मरणे तुमच्याबरोबरच.”
22 दावीद इत्तयला म्हणाला, “मग चल तर किद्रोन ओहोळा पलीकडे आपण जाऊ.”
तेव्हा इत्तय आपल्या बरोबरच्या सर्व मुला-माणसांसह किद्रोन ओहोळा पलीकडे गेला. 23 सर्व लोक मोठ्याने आकांत करत होते. राजाने ही किद्रोन झरा ओलांडला. मग सर्व जण वाळवंटाकडे निघाले. 24 सादोक आणि त्याच्या बरोबरचे सर्व लेवी देवाचा करारकोश घेऊन निघाले होते. त्यांनी देवाचा पवित्रकोश खाली ठेवला. यरुशलेममधून सर्व लोक बाहेर पडेपर्यंत अब्याथार कोशाजवळ उभा राहून प्रार्थना म्हणत होता. [b]
25 राजा दावीद सादोकला म्हणाला, “हा देवाचा पवित्र कोश यरुशलेमला परत घेऊन जा. परमेश्वराची कृपा असेल तर तो मला पुन्हा येथे आणेल. यरुशलेम आणि हे त्याचे मंदिर मला पुन्हा पाहता येईल. 26 पण तो माझ्यावर प्रसन्न नसेल तर त्याच्या मनात असेल ते माझे होईल.”
27 पुढे राजा सादोक याजकाला म्हणाला, “तू द्रष्टा आहेस तू सुखरुप नगरात परत जा. तुझा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा मुलगा योनाथान यांनाही घेऊन जा. 28 हा प्रदेश ओलांडून वाळवंट लागते त्याठिकाणी मी तुझा संदेश येईपर्यंत थांबतो.”
29 तेव्हा देवाचा पवित्र करारकोश घेऊन सादोक आणि अब्याथार यरुशलेमला परतले आणि तिथेच राहिले.
दावीदाचे अहिथोफेल विरुद्ध गाऱ्हाणे
30 दावीद शोक करत जैतूनच्या डोंगरावर गेला. मस्तक झाकून, अनवाणी तो चालत राहिला. त्याच्याबरोबरच्या लोकांनीही त्याचे अनुकरण केले. तेही रडत होते.
31 एकाने दावीदाला सांगितले, “अहिथोफेल हा अबशालोम बरोबर कारस्थाने करणाऱ्यांपैकी आहे.” तेव्हा दावीदाने देवाची करुणा भाकली. तो म्हणाला, “परमेश्वरा, अहिथोफेलचा सल्ला निष्फळ ठरु दे.” 32 दावीद डोंगरमाथ्यावर पोहोंचला. येथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे त्या वेळी हूशय अर्की त्याला भेटायला आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता, त्याने डोक्यात माती घालून घेतलेली होती.
33 दावीद हूशयला म्हणाला, “तू माझ्याबरोबर आलास तर एवढे लोक आहेत त्यात आणखी तुझा भार. 34 पण तू यरुशलेमला परतलास तर अहिथोफेलची मसलत तू धुळीला मिलवू शकशील. अबशालोमला सांग, ‘महाराज, मी तुमचा दास आहे. मी तुमच्या वडीलांच्या सेवेत होतो. पण आता तुमची सेवा करीन.’ 35 सादोक आणि अब्याथार हे याजक तुझ्याबरोबर असतील. राजाच्या घरी जे ऐकशील ते सगळे त्यांच्या कानावर घालत जा. 36 सादोकचा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा योनाथान हे ही त्यांच्या बरोबर आहेत. त्यांच्या मार्फत तू मला खबर कळवत जा.”
37 तेव्हा दावीदाचा मित्र हुशय नगरात परतला. अबशालोम ही यरुशलेममध्ये आला.
ख्रिस्ती देणे
8 आणि आता, बंधूनो, आम्हांला असे वाटते की, तुम्ही हे जाणून घ्यावे की, मासेदिनियातील मंडळ्यांना देवाने कशी कृपा दिली. 2 अत्यंत खडतर अशी संकटे असली तरी त्यांचा ओसंडून वाहणारा आनंद आणि त्यांचे आत्यांतिक दारिद्य विशाल उदारतेत उभे राहिले. 3 कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले. आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे स्वतःला दिले. 4 संतांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळावा म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हांला विनंति केली. 5 आणि आम्ही अपेक्षा केली त्याप्रमाणे त्यांनी केले नाही, तर त्यांनी स्वतःला प्रथम देवाला दिले. आणि मग देवाच्या इच्छेला राखून आम्हांला दिले.
6 मग आम्ही तीताला विनंति केली, त्याने अगोदर जशी सुरुवात केली होती तशीच त्याने तुम्हामध्ये या कुपेची पूर्णताही करावी. 7 म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हांवरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेतही फार वाढावे.
8 मी तुम्हांला आज्ञा करीत नाही, पण मला तुमच्या प्रेमच्या प्रामाणिकतेची तुलना इतरांच्या आस्थेशी करायची आहे. 9 कारण तुम्हांला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा माहीत आहे की, जरी तो श्रीमंत होता तरी तुमच्याकरिता तो गरीब झाला, यासाठी की, त्याच्या गरीबीने तुम्ही श्रीमंत व्हावे.
10 आणि तुमच्या फायद्यासाठी माझा सल्ला असा आहे की, गेल्या वर्षी तुम्ही केवळ देण्यातच नव्हे तर तशी इच्छा करण्यात पहिले होता. 11 आता ते काम पूर्ण करा, यासाठी की कार्य करण्याची तुमची उत्सुकता ही ती तुमच्याकडे ज्या प्रमाणात आहे त्यानुसार पूर्ण करण्यात यावी. 12 कारण जर इच्छा असेल, तर एखाद्याकडे जे असेल तसे मान्य होईल. जर नसेल तर मान्य होणार नाही. 13 दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी म्हणून. 14 सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी. यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागविल्या जाव्यात. मग समानता येईल. 15 पवित्र शास्त्र म्हणते,
“ज्याने पुष्कळ गोळा केले होते, त्याला जास्त झाले नाही.
ज्याने थोडे गोळा केले होते, त्याला कमी पडले नाही.” (A)
तीत आणि त्याचे सोबती
16 जी आस्था माझ्यामध्ये तुमच्याविषयी आहे ती आस्था देवाने तीताच्या अंतःकरणात घातली याबद्दल मी देवाचे आभार मानतो, 17 कारण तीताने आमच्या आवाहनाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकनेने आणि त्याच्या स्वतःच्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे. 18 आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या सुवार्तेबद्दलच्या मंडळ्यातील सेवेबद्दल वाहवा होत आहे, त्याला पाठवीत आहोत. 19 यापेक्षा अधिक म्हणजे मंडळ्यांनी आम्हासांगती दानार्पण घेऊन जाण्यासाठी त्याची निवड केली. जे आम्ही प्रभुच्या गौरवासाठी करतो आणि मदत करण्याची आमची उत्सुकता दिसावी म्हणून हे करतो.
20 ही जी विपुलता आम्हांकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हांवर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत. 21 कारण जे प्रभुच्या दृष्टीने चांगले तेच आम्ही योजितो, एवढेच नाही तर माणसांच्या दृष्टीने जे चांगले ते योजितो.
22 त्याला सोडून आम्ही त्यांच्याबरोबर आमच्या बंधूलाही पाठवित आहोत. ज्याने आम्हाला स्वतःला पुष्कळ बाबतीत आवेशी असल्याचे सिद्ध करुन दाखविले आहे आणि आता त्याला तुमच्याबद्दल वाटत असलेल्या विश्वासामुळे तो अधिक आवेशी झाला आहे.
23 तीताच्या बाबतीत सांगायाचे तर, तो तुमच्यामधील माझा एक सहकारी व सहकर्मचारी आहे, आमच्या इतर बंधूंच्या बाबतीत सांगायचे तर, ते ख्रिस्ताला गौरव व मंडळ्यांचे प्रतिनिधी आहेत. 24 म्हणून या लोकांना तुमच्या प्रेमाचा पुरावा द्या. आणि आम्हांला तुमच्याबद्दल वाटत असलेल्या अभिमानबद्दलचे समर्थन करा. यासाठी की, मंडळ्यांनी ते पाहावे.
यहेज्केल यरुशलेम विरुद्ध बोलतो
22 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले, तो म्हणाला, 2 “मानवपुत्रा, तू न्याय करशील का? खुन्यांच्या नगरीचा यरुशलेमचा तू न्यायनिवाडा करशील का? तिने केलेल्या भयंकर गोष्टीबद्दल तू तिला सांगशील का? 3 ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, असे तू तिला सांगितलेच पाहिजेस. नगरी खुन्यानी भरली आहे. म्हणूनच तिच्या शिक्षेची वेळ. लवकरच येईल. तिने स्वतःसाठी अंमगळ मूर्ती तयार केल्या, आणि त्या मूर्तींनी तिला गलिच्छ केले.
4 “‘यरुशलेमवासीयांनो, तुम्ही पुष्कळ लोकांना ठार केले. तुम्ही अमंगळ मूर्ती तयार केल्या. तुम्ही अपराधी आहात आणि तुम्हाला शिक्षा होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. तुमचा शेवट आला आहे. इतर राष्ट्रे तुमची टर उडवितील. ती तुम्हाला हसतील. 5 जवळचे व दूरचे तुमची चेष्टा करतील. तुम्ही तुमच्या नावाला काळिमा फासलात. तुम्हाला हास्याचा गडगडाट ऐकू येऊ शकतो.
6 “‘पाहा! यरुशलेममध्ये, प्रत्येक राज्यकर्ता दुसऱ्याला ठार करण्याइतका सामर्थ्यशाली झाला. 7 यरुशलेमचे लोक आई-वडिलांचा मान ठेवीत नाहीत. राहणाऱ्या परदेशींयांना ते त्रास देतात. ते विधवांना व अनाथांना फसवितात. 8 तुम्ही लोक माझ्या पवित्र वस्तूंचा तिरस्कार करता. माझ्या विश्रांतीच्या खास दिवसांना महत्व देत नाही. 9 यरुशलेमचे लोक दुसऱ्यांबद्दल खोटेनाटे सांगतात. निष्पाप लोकांना ठार माण्यासाठी ते असे करतात. लोक, डोंगरावर, खोट्या देवांची पूजा करण्यासाठी जातात व सहभोजन करण्यासाठी यरुशलेमला येतात.
“‘यरुशलेममध्ये, लोक पुष्कळ लैंगिक पापे करतात. 10 ह्या नगरीत, ते वडिलांच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतात. रजस्वला स्त्रीवरही ते बलात्कार करतात. 11 कोणी आपल्या शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करतो, कोणी स्वतःच्या सुनेबरोबर संबंध ठेऊन तिला अपवित्र करतो, तर कोणी त्यांच्या वडिलांच्या मुलीशी म्हणजेच स्वतःच्या बहिणीवरच बलात्कार करतो. 12 यरुशलेममध्ये, तुम्ही, लोकांना मारण्यासाठी पैसे घेता, उसने पैसे दिल्यास त्यावर व्याज आकारता, थोड्याशा पैशाकरीता शेजाऱ्यांना फसविता. तुम्ही लोक मला विसरले आहात.’” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
13 देव म्हणाला, “‘इकडे पाहा! मी जोराने हात आपटून तुम्हाला थांबवीन. लोकांना फसविल्याबद्दल व ठार मारल्याबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. 14 त्यो वेळी तुम्हाला धैर्य राहील का? मी शिक्षा करायला येईन तेव्हा तुम्हाला शक्ती राहील का? नाही! मी परमेश्वर आहे. मी हे बोललो आहे आणि मी बोलल्याप्रमाणे करीन. 15 मी तुम्हाला राष्ट्रां-राष्ट्रांमध्ये विखरुन टाकीन. मी तुम्हाला वेगवेगळ्या देशांत सक्तीने पाठवीन. ह्या नगरीतील अमंगळ गोष्टींचा मी संपूर्ण नाश करीन. 16 पण, यरुशलेम, तू अपवित्र होशील. इतर राष्ट्रे ह्या घटता पाहतील. मग तुम्हाला कळून चुकेल की मीच परमेश्वर आहे.’”
इस्राएल कवडीमोलच्या टाकाऊ वस्तूप्रमाणे आहे
17 परमेश्वराचे शब्द मला ऐकू आले. तो म्हणाला, 18 “मानवपुत्रा, चांदीच्या तुलनेत कास्य, लोखंड, शिसे व कथील कवडीमोलाचे आहेत. कामगार चांदी शुद्ध करण्यासाठी ती विस्तवात टाकतात. चांदी उष्णतेने वितळते आणि मग कामगार चांदीपासून टाकाऊ भाग वेगळा काढतात. इस्राएल हे राष्ट्र त्या टाकाऊ भागासारखे झाले आहे. 19 म्हणून परमेश्वर, प्रभू, पुढील गोष्टी सांगतो. ‘तुम्ही सर्व लोक टाकाऊ भागासारखे झाला आहात. म्हणून मी तुम्हाला यरुशलेममध्ये गोळा करीन. 20 कामगार चांदी, कास्य, लोखंड, शिसे व कथील आगीत टाकतात. फुंकून विस्तव फुलवितात. मग घातू वितळू लागतो. त्याचप्रमाणे, मी तुम्हाला माझ्या आगीत टाकून वितळवीन. माझा भयंकर क्रोध हीच ती आग होय. 21 मी माझ्या रागाच्या अग्नीत तुम्हाला टाकीन. तो फुंकून प्रज्वलित करीन. मग तुम्ही वितळू लागाल. 22 चांदी आगीत वितळते. मग कामगार ती ओतून घेऊन बाजूला काढतात. त्याच पद्धतीने, तुम्ही नगरीत वितळाल. मगच तुम्हाला कळेल की मी परमेश्वर आहे आणि माझ्या रागाचा मी तुमच्यावर वर्षाव केला आहे.’”
यहेज्केल यरुशलेम विरुद्ध बोलतो
23 मला परमेश्वराकडून संदेश मिळाला तो म्हणाला, 24 “मानवपुत्रा, इस्राएलशी बोल ‘ती शुद्ध नाही’ [a] असे तिला सांग. मी त्या देशावर रागावलो असल्याने, तेथे पाऊस पडणार नाही. 25 यरुशलेममधील संदेष्टे कट करीत आहेत. ते संदेष्टे सिंहासारखे आहेत. शिकारीचा समाचार घेताना तो गर्जना करतो. त्या संदेष्टांनी खूप आयुष्यांचा नाश केला, त्यांनी पुष्कळ किंमती वस्तू बळकावल्या आहेत, यरुशलेममधील अनेक स्त्रियांच्या वैधव्याला ते कारणीभूत झाले.
26 “याजकांनी माझ्या शिकवणुकीचा नाश केला. माझ्या पवित्र वस्तू त्यांनी अपवित्र केल्या. त्यांना महत्व देत नाहीत. ते माझ्या पवित्र गोष्टी व इतर अपवित्र गोष्टी ह्यात फरक करीत नाहीत. शुद्ध व अशुद्ध गोष्टी सारख्याच मानतात. ते लोकांनाही ह्याबद्दल शिकवण देत नाहीत. माझ्या सुटृ्यांच्या खास दिवसांचा मान राखत नाहीत. त्यांनी माझे पावित्र नष्ट केले.
27 “यरुशलेमचे नेते, आपल्या शिकारीवर तुटून पडणाऱ्या लांडग्यासारखे आहेत. ते संपत्तीसाठी लोकांवर हल्ला करुन त्यांना ठार मारतात.
28 “संदेष्टे लोकांना ताकीद देत नाहीत. ते सत्य झाकून ठेवतात. हे संदेष्टे, तटबंदीची दुरुस्ती न करता, वरवर गिलावा देऊन भगदाडे बुजविणाऱ्या, कामगारांप्रमाणे आहेत. त्यांना फक्त खोटेच दिसते. ते मंत्र-तंत्राच्या आधारे भविष्य जाणून घेतात, पण लोकांशी फक्त खोटेच बोलतात. ते म्हणतात ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो.’ पण हे सर्व खोटे आहे. परमेश्वर त्यांच्याशी बोललेला नाही.
29 “सामान्य लोक एकमेकांचा फायदा घेतात. ते एकमेकांना फसवितात आणि लुबाडतात. ते गरीब, असहाय लोकांना अगदी क्षुद्र लेखतात. ते परदेशींयांना फसवितात व ह्याबद्दल देशात कायदा अस्तित्वात नसल्याप्रमाणेच वागतात.
30 “मी, लोकांना, त्यांच जीवनमार्ग बदलून, देशाचे रक्षण करण्यास सांगितले. मी तटबंदीची दुरुस्ती करण्यास सांगितले. लोकांना तटबंदीला पडलेल्या भगदाडाजवळ उभे राहून देशाच्या रक्षणाकरिता लढावे, अशी माझी इच्छा होती. पण कोणीही मदतीला आले नाही. 31 म्हणून मी माझा जळता राग त्यांच्यावर ओतीन. मी त्यांचा संपूर्ण नाश करीन. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना शिक्षा करीन. चूक सर्वस्वी त्यांची आहे.” परमेश्वर, माझा देव, असे म्हणाला.
प्रमुख गायकासाठी “भूकमल” या चालीवरचे दावीदाचे स्तोत्र.
69 देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव.
पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.
2 इथे उभे राहाण्यासाठीही काही नाही.
मी बुडत चाललो आहे. चिखलात बुडत आहे.
मी खोल पाण्यात आहे आणि लाटा माझ्यावर येऊन आदळत आहेत.
मी आता लवकरच बुडणार आहे.
3 मी मदतीसाठी याचना करुन थकलो आहे.
माझा घसा दुखत आहे.
मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत
तुझ्या मदतीची वाट पाहिली.
4 मला माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही जास्त शत्रू आहेत.
ते विनाकारण माझा तिरस्कार करतात.
माझा नाश व्हावा म्हणून ते हरप्रकारे प्रयत्न करतात.
माझे शत्रू माझ्याविषयी खोटे सांगतात.
मी चोरी केली असे त्यांनी खोटेच सांगितले
आणि नंतर मी न चोरलेल्या वस्तूंसाठी त्यांनी मला किंमत मोजायला भाग पाडले.
5 देवा, मी मूर्खासारखा वागलो ते तुला माहीत आहे.
मी माझी पापे तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही.
6 प्रभु, सर्वशक्तीमान परमेश्वरा, तुझ्या भक्तांना माझी लाज वाटू देऊ नकोस.
इस्राएलाच्या देवा, तुझी उपासना करणाऱ्यांना माझ्यामुळे अडचणीत येऊ देऊ नकोस.
7 माझा चेहरा लाजेने झाकला गेला आहे.
मी तुझ्यासाठी ही लाज जवळ बाळगतो.
8 माझे भाऊ मला परक्याप्रमाणे वागवतात.
माझ्या आईची मुले मला परदेशी असल्याप्रमाणे वागवतात.
9 तुझ्या मंदीराविषयीच्या माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत.
जे लोक तुझी चेष्टा करतात त्यांच्याकडून मी अपमानित होतो.
10 मी रडतो, उपवास करतो
आणि त्यामुळे ते माझी चेष्टा करतात.
11 माझे दु:ख दाखवण्याकरता मी जाडेभरडे कपडे वापरतो
आणि लोक माझ्याविषयी विनोदी किस्से सांगतात.
12 ते सार्वजनिक ठिकाणी माझ्याबद्दल बोलतात.
मद्य पिणारे लोक माझ्यावर गाणी रचतात.
13 माझ्याविषयी म्हणशील तर परमेश्वरा,
ही माझी तुझ्यासाठी प्रार्थना आहे,
तू माझा स्वीकार करावास असे मला वाटते.
तू मला तारशील असा विश्वास मला वाटतो.
14 मला चिखलातून बाहेर काढ मला चिखलात बुडू देऊ नकोस.
माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांपासून मला वाचव.
मला ह्या खोल पाण्यापासून वाचव.
15 लाटांमुळे मला बुडू देऊ नकोस खोल
खड्यांना माझा घास घेऊ देऊ नकोस.
थडग्याच्या जबड्यात मला जाऊ देऊ नकोस.
16 परमेश्वरा, तुझे प्रेम चांगले आहे.
मला तुझ्या खऱ्या प्रेमाने उत्तर दे.
तुझ्यातल्या सगळ्या दया बुध्दीने तू माझ्याकडे वळ आणि मला मदत कर.
17 तुझ्या सेवाकापासून दूर जाऊ नकोस,
मी संकटात आहे, लवकर ये मला मदत कर.
18 ये माझ्या आत्म्याचा उध्दार कर.
मला माझ्या शत्रूंपासून सोडव.
19 तुला माझी लाज ठाऊक आहे.
माझे शत्रू माझा प्राण उतारा करतात ते तुला माहीत आहे.
या गोष्टी करताना तू त्यांना पाहिले आहेस.
20 शरमेने मला गाडून टाकले आहे.
लाजेमुळे मी लवकरच मरणार आहे.
मी सहानुभूतीसाठी ताटकळलो आहे पण मला ती मिळाली नाही.
कुणीतरी माझे सांत्वन करेल म्हणून मी वाट पाहिली, पण कुणीही आले नाही.
21 त्यांनी मला विष दिले, अन्न नव्हे.
त्यांनी मला आंब दिली द्राक्षारस नाही.
22 त्यांचे ताट अन्नाने भरलेले आहे त्यांच्या, टेबलाजवळ बसून जेवताना त्यांना खूप सुरक्षित वाटते.
हेच जेवण त्यांचा नाश करो अशी माझी इच्छा आहे.
23 ते आंधळे व्हावेत आणि त्यांच्या पाठी अशक्त व्हाव्यात अशी मी आशा करतो.
24 त्यांना तुझ्या क्रोधाची चव घेऊ दे.
25 त्यांची घरे रिकामी कर.
त्यांत कुणालाही राहू देऊ नकोस.
26 त्यांना शिक्षा कर म्हणजे ते पळून जातील,
त्यानंतर त्यांच्याजवळ बोलण्यासाठी दुख: आणि जखमा खरोखरच असतील.
27 त्यांनी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
तू किती चांगला असू शकतोस ते त्यांना दाखवू नकोस.
28 जिवंत माणसांच्या यादीतून त्यांचे नाव पुसून टाक.
त्यांचे नाव चांगल्या लोकांच्या यादीत लिहू नकोस.
29 मी खिन्न आणि दु:खी आहे देवा,
मला वर उचल, मला वाचव.
30 मी गाण्यातून देवाच्या नावाची स्तुती करीन.
मी त्याची धन्यवादाच्या गाण्यातून स्तुती करीन.
31 यामुळे देव आनंदित होईल.
एखादा बैल मारुन संपूर्ण प्राणी देवाला अर्पण करण्यापेक्षा हे कितीतरी चांगले.
32 गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात.
या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल.
33 परमेश्वर गरीबांचे, दीनांचे ऐकतो
परमेश्वराला तुरुंगातले लोक अजूनही आवडतात.
34 देवाची स्तुती करा स्वर्ग आणि पृथ्वी,
समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्व त्याची स्तुती करा.
35 परमेश्वर सियोनाला वाचवेल.
परमेश्वर यहुदाची नगरे परत बसवील.
ती जमीन ज्यांच्या मालकीची होती ते लोक तिथे पुन्हा राहातील.
36 त्याच्या सेवकाच्या वंशजांना ती जमीन मिळेल.
ज्या लोकांना त्याचे नाव आवडते ते लोक तिथे राहातील.
2006 by World Bible Translation Center